डिजिटल अर्काईव्ह

इटालियन संस्कृतीत फुलांना खास स्थान आहे. घराच्या गॅलरीज, रेस्टॉरंट्स, सिमेंट्रीस सगळीकडे रंगीबेरंगी फुलांची सुंदर मांडणी केलेली दिसते. मडोना लिली हे पांढऱ्या रंगाचे फूल व लाल रंगाचा रेड रोज ही इटालीची आवडती फुले आहेत. लेछेत कोपऱ्याकोपऱ्याकडे चर्चेस आहेत. लेछेत, किंबहुना सर्व इटालीत Near the church हा पत्ता गोंधळात टाकणारा आहे. लेछेत असताना Tour de France ह्या सायकल सफारीत भाग घेणारे सायकलस्वार आम्हाला भेटले. फ्रान्समधून सुरू होणारी ही सायकल सफारी फ्रान्स, बेल्जियम, इटाली, स्पेन, स्वित्झर्लंड व जर्मनी ह्या देशांतून जाते. एकूण साडेतीन हजार किलोमीटर अंतर सायकलस्वारांना पार करावे लागते. टूर द फ्रान्सच्या धर्तीवर आपण Tour de India ही सायकल सफारी सुरू करायला हवी.

 

 

मी वृत्तीने धार्मिक असतो तर म्हटले असते "ईश्वर म्हणाला- भूतलावर इटाली जन्मू दे आणि मेडिटेरियन समुद्रातून इटाली तरारून वर आला."

इटाली आणि गोव्याच्या जीवनशैलीत कमालीचे साम्य आहे. गोव्यात आम्ही सुशेगाद जीवन जगतो. तसेच इटालियन लोक नेहमीच आरामात, मजेत राहतात. या जीवन पद्धतीला इटालियन भाषेत La Vita Dolce (ला विटा डोल्चे) म्हणतात. ला विटा डोल्चे म्हणजे sweetness of doing nothing.

La Vita e bella म्हणजे जीवन सुंदर आहे. Carpem Diem म्हणजे Seize the day.

भूतकाळाचे ओझे न बाळगता आणि भविष्यकाळाची चिंता न करता इटालियन लोक वर्तमानकाळात जगतात. इटालियन माणूस जगण्यासाठी खात नाही तर खाण्यासाठी जगतो.

Italy त एक 'Eat'ly समाविष्ट आहे.

इटालियन माणूस सावकाश जेवतो. जेवणात सर्वप्रथम वाईन घेतात. नंतर बटाटे, गाजर, कोबी, कांदे घालून केलेला मिनस्ट्रोन सूप घेतात. त्यानंतर गार्लिक ब्रेड, सेझर सॅलेड, टँको सॅलेड, क्रॉ स्टीनो हे अॅन्टी पास्ता पदार्थ येतात. त्यानंतर येणाऱ्या पिझा, पास्ता, स्पागेती, लासांजे, रिवोली, रिझोटा ह्यांना सेकेंडो म्हणतात, तर शेवटी तिरामिसु व अन्य डेझर्टचा कॉन्तेरो येतो.

इटालियन जेवणात चीज, ऑलिव्ह ऑईल, बटाटे व वांगे ह्यांचा भरपूर वापर केलेला असतो. इटालियनांना मीठ नसलेले पांढरे लोणी आवडते. भारतात आपल्याला मीठ असलेले पिवळे लोणी आवडते. अमूलने मीठहीन पांढरे लोणी बाजारात आणले तेव्हा ते ग्राहकांनी नाकारले. त्या वेळी पॉल्सनचे मीठ असलेले पिवळे लोणी आरामात खपत असे. अमूलने आपली चूक सुधारली आणि आता रंकापासून रावापर्यंत सर्वांच्या टेबलवर अमूल बटर असते.

पिझाचा शोध समुद्रचाच्यांनी लावला व त्यानंतर इटालियन खाद्यसंस्कृतीने पिझाला आपल्यात सामावून घेतले. आज सँडविच, बर्गरप्रमाणे पिझा हा खाद्यपदार्थ जगभर लोकप्रिय आहे.

पास्ताचा शोध चीनमध्ये लागला. पण आज पास्ताला कोणीच चायनीज मानत नाहीत. इटालियन पास्ता भरपूर चीज व क्रीम घालून केलेल्या व्हाईट सॉसमध्ये मिळतो. पास्तात वेगवेगळ्या भाज्या, चिकन, सलामी, पोर्क, बीफ, कोलंबी व अन्य माशांचा समावेश होतो.

16 व्या शतकात लॅटिन अमेरिकेतून टॉमेटो इटालीतआला. त्यानंतर पास्ता टोमॅटो सॉसमध्येही बनवण्यात येऊ लागला.

जेलेटो नावाचा आईस्क्रीम सदृश्य पदार्थ इटालीत लोकप्रिय आहे. आईस्क्रीमपेक्षा जेलेटोत दुधाचे प्रमाण जास्त असते. इटालीत जेलेटोची 39 हजार दुकाने आहेत. प्रत्येक इटालियन माणूस दरवर्षी 4 किलो जेलेटो फस्त करतो. इटालीतले जेलेटोचे वार्षिक उत्पादन 1,68,000 टन आहे.

लिमोसिलो हे लिंबापासून तयार करण्यात येणारे मद्य इटालियन लोकांना फार आवडते.

पास्ताचिटो ह्या पेस्ट्रोल पेस्टीच्या आतल्या थरात गोड, मऊ कस्टर्ड असते. पास्ताचिटो ह्याचा शब्दशः अर्थ चुकून बनवलेला पदार्थ, इटालियन बेकरच्या चुकीमुळे ही पेस्ट्री बनली व लोकांना ती आवडू लागली.

याशिवाय Frittatina de pasta हा पास्तापासून बनवलेला, तळलेला बॉल, अरासीनी नावाचा उरलेल्या भातापासून बनवलेला फ्राइड बॉल व इस्टरच्या सणावेळी केला जाणारा मीट बॉल इटालियन लोकांना आवडतो.

इटालियन लोकांनी शोधक वृत्तीने आपल्या खाद्यसंस्कृतीत अनेक नवे नवे खाद्यपदार्थ बनवण्यात यश मिळवले. संशोधक व शोधक वृत्तीच्या इटालियन लोकांनी पियानो, ऑपेरा, चष्मे, बॅरोमिटर्स, रेडिओ, टेलिफोन, कॅल्क्युलेटर, एक्स्प्रेसो कॉफी मशिन, दैनिके, रायफल्स, बॅटरीज, टायपरायटर, न्युक्लियर रिअॅक्टर, मायक्रो चिप, टचपेंड हे शोध लावले. त्यांनी डावखुऱ्यांसाठी खास वेगळा पियानो बनवला.

परदेशातून आलेल्या प्रवाशांनी आणलेले रोग स्थानिक लोकांत पसरू नये यासाठी त्यांना सक्तीने काही दिवस वेगळ्या आरक्षित जागेत राहायची 'कारेन्टाईन' ही पद्धत इटालीत सुरू झाली.

अकाउंटन्सीत क्रांती करणारी डबल एन्ट्री अकाउंट्स पद्धती इटालीत सर्वप्रथम रूढ झाली. जाकुझी, कॅसिनो, टोल घेण्याची पद्धत, मॉन्टेसरीचे शिक्षण हेदेखील इटालियन शोध. अष्टपैलू शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विन्वी, बास्तुशिल्पज्ञ व चित्रकार मायकल एंजलो, चित्रकार राफायल, डिव्हाईन कॉमेडी लिहिणारा कवी डान्टे, चित्रतारका सोफिया लोरेन, शास्त्रज्ञ गॅलीलिओ, गणितज्ञ फिबोनाची, प्रसिद्ध खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस, मॉन्टेसरी शिक्षणपद्धती शोधून काढणाऱ्या मादाम मॉन्टेसरी, सम्राट ज्युलीयस सीझर, फर्डा वक्ता सिसेरिओ हे जगप्रसिद्ध, सर्जनशील इटालियन !

Dome (घुमट) हा शोधदेखील रोममध्ये लागला. पुढे तो ग्रीकांनी व त्यानंतर मुसलमानांनी आपल्या आर्किटेक्चरमध्ये समाविष्ट केला. मुसलमानांनी तो भारतात आणला. त्यापूर्वी भारतात भरीव स्तूप व उंच गोपुरे होती. पण घुमट नव्हता. इटालियन मार्बल्स ह्या इटालीत मिळणाऱ्या संगमरवरी दगडाला जगभर मागणी आहे.

व्हेस्पा, लॅम्बरेटा व पियाजिओ ह्या स्कूटर्स व फियाट, फेरारी, लॅम्बॅर्गिनी ह्या गाड्यांचे इटालीत उत्पादन होते.

फेरेरो रोशर ही हेजलनट क्रीमपासून करण्यात येणारी चॉकलेट, किंडर जॉय, नटेला चॉकलेट स्प्रेड हे सर्व जगप्रसिद्ध पदार्थ इटालीत बनतात.

इटाली ही फॅशनची काशी आहे. गुची, प्रादा, अरमानी, डॉल्चे हे सुप्रसिद्ध इटालियन ब्रेन्ड्स.

इटालीत जनावरांच्या कातडीपासून उत्कृष्ट दर्जाचे चामडे बनवले जाते. लुई व्हिताँ ही कंपनी आपल्या दर्जेदार व महाग बॅगा बनवण्यासाठी इटालियन चामडे वापरते. इटाली फर्निचरसाठीही प्रसिद्ध आहे. इटालीच्या मान्जानो नावाच्या गावात उत्कृष्ट खुर्च्छा बनतात. ह्या गावात खुर्चीचे प्रचंड मॉडेल एका चौथऱ्यावर ठेवले आहे. ते पाहण्यासाठी व उत्कृष्ट खुर्चा घेण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात.

इटालीत मी तिसऱ्यांदा येत होतो.

रोम हे इटालीच्या राजधानीचे शहर. रोम हे ओपन म्युझियम आहे. इतिहासाच्या 2 हजार पायऱ्या उतरून भूतकाळाच्या तळघरात रोम बसले आहे. लासांजेप्रमाणे रोम शहराला एकात एक अनेक थर आहेत.

अर्नेस्ट हेमिंग्वे पॅरीसला 'moving feast' म्हणतो. रोम हीदेखील moving feast आहे. रोमला 'city of echoes - इतिहासाचे प्रतिध्वनी ऐकू येणारे शहर' मानले जाते.

रोममधल्या स्पॅनिश स्टेप्स, ट्रिव्ही फाउंटन, रोमन फॉरम, कलॉसिअम, पॅन्थेऑन व व्हॅटिकनमधला पीटर स्केअर पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. रोमचे रात्रदर्शनहीनयनमनोहर आहे.

आम्ही रोममध्ये होतो तेव्हा पोप फ्रान्सिस्कोचे निधन झाले होते. शाही इतमामाने त्याचे दफन करण्यात आले होते. त्यानंतर नवा पोप निवडण्याची वेळ आली. व्हॅटिकनच्या चर्चच्या चिमणीतून दोन दिवस संध्याकाळी काळा धूर आला. याचा प्रतीकात्मक अर्थ म्हणजे नच्या पोपची निवड झाली नाही. तिसऱ्या दिवशी उत्तर दुपारी व्हॅटिकनच्या चिमणीतून पांढरा धूर आला व अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट प्रेतोस्टची नवे पोप म्हणून निवड झाल्याची रीतसर घोषणा झाली. नव्या पोपनी 14 वे लिओ हे नाच घेतले व लाल पडद्यांनी सुशोभित केलेल्या व्हॅटिकनच्या खिडकीतून लोकांना दर्शन दिले.

ह्या धामधुमीत पर्यटकांसाठी व्हॅटिकन बंद होते. त्यामुळे इच्छा असूनही मायकेल एंजेलोने चित्रित केलेले सिस्टीन चॅपल पाहता आले नाही.

रोममध्ये आम्ही गोल्फ कार्टमधून फिरलो. माझ्यासारख्या ज्येष्ठ पर्यटकाला अनेक किलोमीटर्स चालत जाण्याची तसदी न घेता आरामात रोम शहर पाहता आले. झेब्रा क्रॉसिंगही फार सोयीस्कर आहे. झेब्रा क्रॉस हा शोध सर्वप्रथम 1951 मध्ये इंग्लंडमध्ये लागला. झेब्रा क्रॉसवर पाय ठेवला तर वाहने थांबतात. अत्यंत साधा वाटणारा हा फार मोठा शोध आहे.

परदेशी प्रवासात विमानतळावर खूप चालावे लागते. किमान अडीच किलोमीटर, विमानतळाच्या वास्तूची आखणी सदोष असते का? नाही. एका सर्वेक्षणातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, विमानातून उतरणारे प्रवासी किमान दोन किलोमीटर चालले की थकल्यानंतर ते विमानतळावरील फूडकोर्टमध्ये कितीतरी अधिक पटीने खाद्यपदार्थांची व पेयांची खरेदी करतात. एवढंच नव्हे तर थकव्यातून बाहेर निघून ताजेतवाने होण्यासाठी पर्यटक कपडे, खेळणी खरेदी करतात. शॉपिंगला एक मानसशास्त्रीय आयाम असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 फियोपाँटी ह्या इटालियन आर्किटेक्ट व डिझाईनरने Forme Finita ही संकल्पना रूढ केली. Forme Finita म्हणजे, Design is complete when nothing can be added or taken away.

19 व्या शतकात इटालीच्या सिसिली बेटावर माफिया ह्या आक्रमक व हिंसक संस्थेचा जन्म झाला. मारिओ पुझोच्या सुप्रसिद्ध 'Godfather' चित्रपटात इटालियन माफियाचे यथार्थ दर्शन घडते.

इटालीत जेम्स बॉन्डच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. त्यात 'The Spy Who Loved Me', 'No Time to Die', 'From Russia with Love', 'Casino Royale', 'Moonraker' ह्या चित्रपटांचा समावेश होतो.

'The Prince' हा ग्रंथ लिहिणारा मॅकिआव्हेली हा इटालियन चाणक्य तथा इटालियन राष्ट्रवादाचा जनक मानला जातो. पुढे दुसऱ्या महायुद्धात मुसोलिनीच्या रूपाने ह्या राष्ट्रवादाचे क्षुद्र, बीभत्स आणि भयानक रूप जगाने पाहिले. मुसोलिनीने जवाहरलाल नेहरूंना अनेक वेळा इटालीत येण्याचे निमंत्रण दिले. त्याचे अंतःस्थ रूप ओळखून नेहरू मुसोलिनीला कधीच भेटले नाहीत. पण जहाल राष्ट्रवादाबद्दल ज्यांनी सर्वप्रथम भारतीयांना सावध केले, ते महाकवी रवींद्रनाथ टागोर ह्यांनी मात्र मुसोलिनीचे आतिथ्य स्वीकारले.

मागच्या दोन भेटींत लॉरेन्स, पिसा, व्हेनिस ही उत्तर इटालीतली पर्यटन स्थळे पाहिली होती. ह्या वेळची आमची भेट दक्षिण इटाली पाहण्यासाठी होती. उत्तर इटालीवर फ्रेंच व जर्मन प्रभाव आहे, तर दक्षिण इटालीवर ग्रीक, स्पॅनिश व अरब प्रभाव आहे.

उत्तर इटाली हा औद्योगिक टापू आहे, तर दक्षिण इटाली हा प्रामुख्याने शेतीप्रधान आहे. दक्षिण इटालीतले लोक उत्तर इटालीतल्या लोकांपेक्षा अधिक मनमिळाऊ, दिलदार व ऊबदार आहेत.

Italy celebrates diversity. इटालीने आपल्या संस्कृतीतल्या विविधतेला जाणीवपूर्वक जपले आहे. इटालीची लोकसंख्या 6 कोटी आहे. लोकसंख्यावाढीचे प्रमाण शून्य टक्के असल्याने इटालीत फिरताना लहान मुले व गरोदर स्त्रिया तुरळक दिसतात.

रोममध्ये आमचा मुक्काम तीनच दिवस होता. Rome was not built in a day, When in Rome do as Romans do. ह्या प्रमाणेच Veni, Vidi, Vici म्हणजेच He came, He saw and He conquered. ह्या म्हणी सर्वश्रुत आहेत.

रोममधून विमानाने नेपल्सला आलो. नेपल्सला इटालियन भाषेत नापोली म्हणतात. नेपल्स हे बंदराचे शहर आहे. हे पुरुषी, (मॅस्क्युलीन) शहर आहे. त्याला स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. नेपल्समधल्या वास्तू आकर्षक, लाल, नारंगी, पिवळ्या रंगांत रंगवलेल्या आहेत. त्यामुळे शहर दर्शनीय, प्रियदर्शनीय झाले आहे. नेपल्समधल्या इमारती एकमेकांना लागून आहेत. त्यामध्ये Setback नाही.

प्रसिद्ध गोमंतकीय आर्किटेक्ट चार्लस कुरैयांनी एकदा माझ्याशी बोलताना भारतात प्रचलित असलेल्या दोन इमारतीतील तीन मीटर्सच्या Setback बद्दल नाराजी व्यक्त केली होती. शहरातील इमारती एकाला एक लागून असल्या की शहरदेखील रेखीव होते, ह्या त्यांच्या म्हणण्याचा प्रत्यय नेपल्समध्ये फिरताना आला.

नेपल्समधल्या स्पॅनिश कार्टरमध्ये जाऊन आम्ही पिझा, स्पागेती ह्या पदार्थांवर ताव मारला. नेपल्समधून आम्ही सेरेन्तोला आलो. सेरेन्तो शहरातून दक्षिण इटालीतील निसर्गसुंदर आमाल्फी कोस्ट ह्या समुद्रकिनाऱ्यावरील गावाला भेट दिली. आमाल्फीतले सेंट एन्ड्रयूज कॅथेड्रलचे वास्तुशिल्प अनोखे, वेगळे, अप्रूप आहे, आमाल्फी हा पर्यटकस्नेही गाव आहे. इथे पायाळू होऊन पायी फिरावे. इथल्या कॉफी शॉपमध्ये किंवा तावेर्नमध्ये आरामात बसावे, इथल्या गल्लीतून सोव्हिनिर्सची खरेदी करावी.

आमाल्फी कोस्ट आणि त्यातल्या त्यात सेरेन्तो शहर व त्याच्या आसपास लिंबाचे प्रचंड पीक येते. सेरेन्तो शहराने धम्मक पिवळ्या लिंबाचा रंग परिधान केला आहे. सेरेन्तोत लिंबाचे मद्य, लिंबाचे जेलेटो, लिंबाची चित्रे असलेली टी-शर्ट्स, बॅगा, सिरॅमिक वस्तू मिळतात.

इटालियन खलाशांना दीर्घ समुद्रप्रवासात स्कर्वी नावाच्या रोगाने मरण येत असे. विटामिन सी भरपूर असलेल्या लिंबाच्या रसाचे प्राशन केल्यास हा स्कर्वी रोग होत नाही, ह्याचा शोध लागला.

सेरेन्टोचे रहिवासी लिंबाच्या झाडाला आपल्या परिवारातील एक सदस्य असे मानतात. लिंबाचे झाड पडले, मेले तर आपला जवळचा नातेवाईक गेल्याचे दुःख त्यांना होते. लिंबाचे झाड दीर्घायुषी असते. ते पाचशे वर्षे जगते.
पिवळे ऊन पिऊन लिंबू जर्द पिवळा झालेला असतो. पिवळ्या उन्हाच्या जिभा लिंबाला चाटतात आणि आपल्यातील हळद पिवळा रंग लिंबाला देतात.

आमाल्फीत एखाद्याला पुढच्या गावचे अंतर विचारले, तर तो 'Go down 20 curves' असे म्हणतो. म्हणजेच 20 वळणे झाल्यानंतर तो गाव येईल. आमाल्फीतील लोक किंबहुना सर्व इटालियन बोलघेवडे आहेत. बोलताना हातवारे करून बोलायची त्यांना सवय आहे. म्हणूनच इटालियन माणसाचा आवाज बंद करायचा असेल तर त्याचे हात बांधावेत असे म्हणतात. आमाल्फी गाव पुरातन आहे. त्याला 1300 वर्षांचा इतिहास आहे.

आमाल्फीत येण्यापूर्वी आम्ही नेपल्स जवळच पोम्पेई हे शहर पाहिले. 24 ऑगस्ट 79 रोजी झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटात हे शहर पूर्ण भस्मसात झाले. सुमारे 20 हजार लोकांना मरण आले. पोम्पेई शहराच्या भग्न वास्तू आणि जळून लाकूडसदृश्य झालेली तिथल्या रहिवाशांची प्रेते तिथे आम्ही पाहिली आणि गलबलून आले. कवी आणि चित्रकाराने प्रशंसित केलेला निसर्ग किती क्रूर, भयंकर असतो ह्याचे दर्शन पोम्पेईत झाले!

आमाल्फी कोस्ट इटालीच्या पश्चिम दिशेला आहे. तिथून इटालीच्या पूर्व किनाऱ्याकडे आलो. वाटेत मातेरा ह्या 9 हजार वर्षांपूर्वी बसलेल्या शहराला भेट दिली. दुपारच्या वेळी मातेरा शहरात फेरफटका मारला. तेव्हा रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. सगळे शहर स्तब्ध, शांत होते. पण त्या शांततेला प्रसन्नतेची किनार होती.

इटालीला पांढरा, पिवळा रंग आवडतो. मातेरातल्या पुरातन वास्तू फिकट पिवळ्या रंगाच्या आहेत. पिवळ्या रंगाच्या किती छटा! उन्हें पिवळा, हळद पिवळा, लिंबू पिवळा, सूर्यफूल पिवळा, खरबस पिवळा, गडद पिवळा, फिकट पिवळा, पेस्टल पिवळा, आम्र पिवळा, पितांबर पिवळा, गार पिवळा, नारिंगी पिवळा, शेवंती पिवळा, झेंडू पिवळा, कणीस पिवळा, मोतीचूर  पिवळा, गव्हाळ पिवळा !

पिवळ्या रंगाच्या गोड साखरपाकात खिरबलेला हा गाच होता.
मातेराहून आलबेरोलो ह्या गावात आलो.

तिथे Trulli नावाची पिरॅमिडच्या आकाराची छप्परे असलेली पांढरी घरे रांगेने उभी आहेत. 'ज्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत तो रस्ता', ही रस्त्याची व्याख्या आलबेरेलोत सार्थ होते.

हे वेगळेच जग आहे. लाइमस्टोनने बांधलेली ही साधी घरे पण त्यांच्या साधेपणातच त्यांचे अंगभूत सौंदर्य आहे. आलबेरेलो हे storybook village आहे. ते परिकथेतील गाव आहे.

आर्किटेक्चरमध्ये वैयक्तिकता आणि सार्वजनिकता ह्या संकल्पना आहेत. ताजमहालला वैयक्तिकता आहे. लाल किल्ल्याला, वेरूळच्या कैलास मंदिराला सार्वजनिकता आहे. पण आलबरेलोतल्या ह्या घरांच्या मांडणीत आर्किटेक्चरमधली वैयक्तिकता व सार्वजनिकता ह्यातली सीमारेषा पुसट झाली आहे.

त्यानंतर ओट्रान्टो ह्या दर्याकिनाऱ्यावरील गावात गेलो. इथल्या सूर्यचुंबित (sunkissed) दर्याचे पाणी निवळशंख आहे. आरस्पानी आहे. निळ्या पाण्याच्या लगूनमध्ये पर्यटक मजेत पोहतात.

ओट्रान्टोत Sofish नावाचे छान रेस्टॉरंट आहे. तिथे सर्व प्रकारचे ताजे मासे मिळतात. आम्ही तळलेली खमंग कालवे (ऑईस्टर्स), कोलंबी (श्रिम्प्स), लॉबस्टर्स ह्यावर खरपूस ताव मारला, Sofish रेस्टॉरंटमध्ये इटालीचा लाल, पांढरा, हिरवा ध्वज माशांच्या आकारात भिंतीवर लटकवलेला आहे.

तिथून लेछे शहरात गेलो. तिथे Pizzia नावाचे लोकनृत्य पाहिले. काळा वा लाल वेष परिधान करून नर्तक व नर्तकी हे नृत्य करतात. काळा रंग दुःखाचे वा लाल रंग आनंदाचे प्रतीक मानले जाते.

इटालियन संस्कृतीत फुलांना खास स्थान आहे. घराच्या गॅलरीज, रेस्टॉरंट्स, सिमेंट्रीस सगळीकडे रंगीबेरंगी फुलांची सुंदर मांडणी केलेली दिसते. मडोना लिली हे पांढऱ्या रंगाचे फूल व लाल रंगाचा रेड रोज ही इटालीची आवडती फुले आहेत.

लेच्छेत कोपऱ्याकोपऱ्याकडे चर्चेस आहेत. लेछेत, किंबहुना सर्व इटालीत Near the church हा पत्ता गोंधळात टाकणारा आहे.

लेच्छेत असताना Tour de France ह्या सायकल सफारीत भाग घेणारे सायकलस्वार आम्हाला भेटले.

फ्रान्समधून सुरू होणारी ही सायकल सफारी फ्रान्स, बेल्जियम, इटाली, स्पेन, स्वित्झर्लंड व जर्मनी ह्या देशांतून जाते. एकूण साडेतीन हजार किलोमीटर अंतर सायकलस्वारांना पार करावे लागते. टूर द फ्रान्सच्या धर्तीवर आपण Tour de India ही सायकल सफारी सुरू करायला हवी.

लेछेमध्ये इमारती बेज, बिस्किटी रंगाच्या आहेत. भूतकाळात रममाण झालेला हा गाव आहे. भूतकाळचा रंगही बेज, बिस्कीटी असावा. थोडासा करडा असावा. वर्तमानकाळ श्वेतधवल पांढरा असावा आणि भविष्यकाळ पिवळाधमक असावा ह्याची जाण मला इटालीतल्या दक्षिणायनातून झाली.

दक्षिण इटाली सोडताना A. A. Milne ह्या कवीची 'Daffodowndilly' ही कविता मला आठवली.

She wore her yellow
Sun-bonnet
She wore her
Greenest gown
She turned to
South wind
And curtisied
Up and down
She turned to
Sunlight
And shook her
Yellow head
And whispered
To her neighbour:
'Winter is dead'

दक्षिण इटालीत सगळीकडे सोनेरी सूर्यप्रकाश होता. पिवळे उन्हें होते. पानगळीचा हिवाळा निद्रिस्त होता. उन्हाचे प्राशन करून तुप्त, संतृप्त झालेला ग्रीष्म, सुग्रीष्म, समर सीझन सुरू झाला होता.

हे सगळे ला विटा डोल्वेचे दिवस होते.

 

Tags: italian culture Daffodowndilly coast amlaphe gallelio comedy poet dante leonardo da vinci angelo Montessori julius ceaser Columbus fibonachi ferrero rocher piano pasta cheato pizza pasta Eat'ly tour for france Italy Rome A A Milne poetry weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 58 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी