डिजिटल अर्काईव्ह

जसूबेन इंजिनियर हट्टी होती; पण प्रेमळ. तिच्यात एक सावकाशपण होतं - एक ठहराव. आपली डिग्निटी सांभाळून जगली. जमेल तितकं लोकांचं करत राहिली. जीवनाकडून फार अपेक्षा नाही ठेवल्या. आपल्या कुवतीप्रमाणे जीवनाचं कूटस्थ गूढ समजून घेत घेत जगली : 'जिंदगी कैसी है पहली हाए / कभी यह हंसाए, कभी यह रुलाए' हे मुकंनिकं सत्य तिला थोडंबहुत गवसलं होतं. जसूबेनचे तिन्ही नातू चांगले निपजले. सगळ्यात थोरला मात्र अकाली गेला. दोन नंबरचा नातू धर्मा हा भाग्यनगरात (तोच ब्लॉक नंबर 59) राहतो. तीन नंबरचा नातू आपल्या बायकोमुलांसह दहिसरला आहे. धर्माची एकुलती एक लेक रिया इंग्रजी कॉन्वेंट शाळेत सहावीत शिकते. तीसुद्धा 'सांभळो छो'चं पालुपद लावते, पण इंग्रजीत 'Papa, will you listen to me?'

राजेश खन्ना पडद्यावर आला की, जसूबेन लाजून लालेलाल व्हायची. जणू देवच तो. पदरात बाळ टाकणारा. 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' हे जसूबेनचे अतिशय आवडते सिनेमे. मी कधी बाज्याची पेटी घेऊन बसलो तर मला सांगायची, 'अंबू, तू ते 'कटी पतंग'चं गाणं म्हण ना 'प्यार दिवाना होता है मस्ताना होता है...'

काही वर्षांनी मी बातमीदारीत आलो. या ना त्या निमित्तानं राजेश खन्नाला भेटण्याचा योग दोन-चारदा आला. पुष्कळ गप्पा झाल्या. काकाला जसूबेनविषयी सांगावं असं एकदा मनात आलं. पण नाही सांगितलं. राजेश खन्ना-जसूबेनचं 'अमर प्रेम' ही फक्त भाग्यनगरची लीजंड आहे नि ती तशीच राहावी असं वाटलं.

ठेंगणीठुसकी, गोल चेहऱ्याची नि मिचमिच्या डोळ्यांची जसूबेन. केस म्हणजे चमचम चांदी. मानेवर इवली आंबुडीची चिंबुडी. जसूबेन आमची शेजारी. बोरीवलीच्या भाग्यनगर वसाहतीत आमचा ब्लॉक नंबर 61. एक खोली सोडून 59 नंबरचा ब्लॉक जसूबेनचा.

ती, नवरा नि तीन मुलं दोन मुलगे नि सर्वात थोरली बेबी. बेबी अंगानं थोराड नि रांगडी. जसूबेनपेक्षा मोठी दिसायची. जसूबेनची तिन्ही मुलं औघडच. जंगली वेलीसारखी भराभरा वाढली पण मुलं भल्या मनाची. जसूबेन नाजूक नि बैठ्या अंगाची. जीवनव्यवहार आटोपशीर. हालचाली चपळ. सगळं काम निगुतीनं नि नियमानुसार. आमची चाळ चार मजल्यांची. मध्ये एक चिंचोळा पॅसेज. दोन्ही बाजूला ब्लॉक. दोन-दोन सुटसुटीत खोल्या नि ऐसपैस गॅलरी. संडास न्हाणीघर आत.

बहुतेक प्रजा गुजराती. एखाद-दुसरं घर मराठी किंवा दक्षिण भारतीय. आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये मजूमदार राहायचे. बंगाली कुटुंब. जसूबेन गुजराती; कर्नाटकातल्या यशोदाबेन; बंगाली गायत्रीदीदी; कोकणी मुसलमान खातून-बी आणि आमची आई अशा सगळ्या एकत्र गप्पा मारायला बसल्या की, साने गुरुजींचं 'आंतरभारती'चं स्वप्न डोळे किलकिले करून सगळीकडे विस्मयानं पाहू लागायचं. आमची आई नाटकात काम करतेय याचं त्या स्त्रियांना कौतुक वाटायचं. घरासाठी ही बाई काम करते. आम्हाला टोमणे नि कटू वचनं पुरुषांनी ऐकवली.

पॅसेजात स्त्रियांची सतत लगबग नि ऊठबस. पुरुषांना मज्जाव. जिन्याच्या तोंडापाशी बसायचं नि गप्पा छाटायच्या. अधूनमधून 'जाते हो. आधण ठेवायचंय' किंवा 'भाजी चिरायचीए' हे नुस्ते बहाणे. पॅसेजातून पाय हलायचा नाही. पुन्हा पाच मिनिटं बसायचं. अशा गप्पाबैठकांमुळे स्त्रियांचा ताण हलका व्हायचा.

मी पॅसेजचं नामकरण करून टाकलं no man's land. मागे 1964 मध्ये झालेली लता मंगेशकर-नूरजहाँ भेट अनेकांना आठवत असेल. भारत-पाकिस्तान सीमेवर दोघी भेटल्या. No man's land नामक निर्जन टापूत. संगीतकार सी. रामचंद्र यांनी दुरूनच पाहिला तो सोहळा असं म्हणतात. तसा आमचा पॅसेज. पुरुषांना मज्जाव.

जसूबेनचं मूळ गाव सूरत. लग्न करून मुंबईला आली ती थेट बोरीबंदरच्या चाळीत. कुटुंबावर पारशी संस्कृतीचा पगडा होता. दोनशे वर्षांपूर्वी सूरत सोडून इंग्रज मुंबईला आले. येताना आपल्याबरोबर बारा-पंधरा धनिक पारशी कुटुंबं घेऊन आले. त्या मंडळींना मुंबईत वसवलं. पारशांनी उद्योग व्यापार सुरू केला. कापडाच्या गिरण्या, जहाजबांधणी, रस्तेबांधणी, वगैरे.

पारशांबरोबर कारागीर, गुमास्ते, मजूर, रंगारी, सुतार, लोहार, इलेक्ट्रिशियन असा एक मोठा ताफाच मुंबईत दाखल झाला. पारशी व्यापारी कुलाबा, मलबार हिल इत्यादी दिमाखदार वस्तीत राहायचे. बोरीबंदर, बोराबाजार, दवाबाजार, जीपीओ परिसरात मजूर, तंत्रज्ञांच्या चाळी. जसूबेनचं आडनाव इंजिनियर. त्यांचे वाडवडील ब्रिटिशांकडे इलेक्ट्रिकची कामं करायचे.

विख्यात विक्टोरिया टर्मिनसच्या (आता सीएसटी) मोठ्ठाल्या, मौल्यवान क्लॉकला वर्षातून दोनदा तेल-पाणी करणारे नि जसूबेनच्या नात्यातले एक तंत्रज्ञ भाग्यनगरात राहायचे. तेही इंजिनियर.

जसूबेनचं कुटुंब पारशी गुजराती बोलायचं. ते बडोदा-अहमदाबादेच्या गुजरातीपेक्षा वेगळं. मुख्य प्रवाहातल्या गुजरातीत लहान मुलांना 'छोकरा', 'छोकरी', 'टाबरिया' किंवा 'झीणा-झीणी' असं संबोधन, तर सूरतचे गुजराती सरळ पॉईंटवरच येतात : 'पोयरावो' (पोरं). धाकट्या मुलाला अहमदाबादचे लोक 'न्हाना' म्हणणार. सूरत-बिलिमोरियाकडे 'न्हल्लो'. पुन्हा सूरतचं गुजराती कलरफुल. पुष्कळ शिव्या.

सकाळी सकाळी जसूबेन पॅसेज दणाणून सोडायची. पहिल्या चहाची चव जिभेवर ठेवूनच ती पॅसेजात एण्ट्री घ्यायची. आमचे वडील जसूबेनला ब्यूक गाडी म्हणायचे. 'सांभळो छो?' (अहो, ऐकता?) ही सलामीची ओळ.

हा प्रश्न आपण कुणाला उद्देशून विचारतोय ते तिचं तिलाच ठाऊक नसायचं. उत्तरेच्या एका टोकाला तिचा ब्लॉक. एकदम कोपऱ्यात. तिथून जसूबेन आख्ख्या पॅसेजचा कानोसा घ्यायची. दक्षिणेच्या टोकाला तिला सुशिलाबेन दिसली तर प्रश्न तिनं झेलायचा. तिनं नाही झेलला तर तितक्यात जसूबेनला जयश्रीबेन किंवा यशोदाबेन दिसायच्या. त्यांनीदेखील 'सांभळो छो'चा मान नाही राखला म्हणून जसूबेनचं काहीही बिघडत नसे.

ती आस्ते आस्ते, सरकत सरकत पॅसेजच्या मध्यभागी पोझ (नि पॉज) घ्यायची. तोपर्यंत चाळीतली बहुतेक सगळी दारं उघडलेली असायची. एखाद्या घरात वाकून पाहायची. 'सांभळो छो? हूं शू कहूं छू -ऐकताय? मी काय म्हणत्येय...'

जसूबेनला सतत काहीतरी सांगावंसं वाटे. तो तिचा जीवनमंत्र होता; जगण्याचा कार्यकारणभाव. आपल्या मनातलं कुणाला सांगू असा भाव सतत चेहऱ्यावर. सतत चाळीत फेरफटका नि घराघरात डोकावणं. स्त्रियासुद्धा तिचं रीतसर, तपशीलवार ऐकायच्या 'काल संध्याकाळी मी आपल्या राशनवाल्या हंसराजभाई आहे ना त्याच्याकडे गेलते. मी त्याला म्हटलं की, मला चार किलो वाडा कोलम तांदूळ दे. तर मी काय चुकीचं बोलले का हो, वन्नाबेन ?' वन्नाबेन म्हणजे माझी आई वंदनाबेन. 'तर माल नाहीए असं तो म्हणाला. वाडा कोलमची गोणी मला समोर दिसत्येय...'

पुढची पंधराएक मिनिटं जसूबेन हंसराजभाईचं बाखोट धरून तांदूळ, साखरभात, वांगीभात, देशाची अन्नधान्य परिस्थिती, टंचाई, महागाई, दगाबाज व्यापारी असं करत करत समेवर यायची 'जाते. भाताची पेज काढायचीए'.

जसूबेनसमोर आजचा पॉडकास्ट म्हणजे उकडा तांदळाची पांचट पेज.

जसूबेनचं वागणं काटेकोर. दोन-अडीच तासांत स्वयंपाक रांधून होई. सगळ्यांच्या मदतीला धावून जायची, पण लुडबूड नाही. एखाद्या कुटुंबावर संकट आलं असेल तर ते कसं निवारायचं ते त्या कुटुंबानं ठरवायचं. त्यात आपण ढवळाढवळ करायची नाही. आपली भूमिका मदतीची. बस्स. ही सहिष्णुता नाही तर काय ?

कुणी आजारी असेल तर जसूबेनच्या त्या घरी चार-पाच चकरा व्हायच्या; पण तब्येतीची विचारपूस हाच हेतू. रोगाचं परस्पर निदान करणं नि फुकटचे वैद्यकीय सल्ले देणं ही दुर्धर व्याधी प्रत्येक तिसऱ्या भारतीय माणसाला असते. जसूबेन त्यांपैकी नव्हती.

आपण बरे नि आपलं काम बरं असा जसूबेनचा सरळसोट फंडा होता. स्त्रियांना पुष्कळ दुःखं. गप्पांच्या ओघात मनं सैल व्हायची. जसूबेनला खोदून खोदून विचारण्याची सवय नव्हती. जे ऐकलं ते ती पोटात ठेवायची. अनेक जणींना वाटायचं की, जसूबेन स्वतःचं काही सांगत नाही.

तिच्यापाशी सांगण्यासारखं विशेष असं काही नव्हतं. तिचं आयुष्य मजेत चाललं होतं. पैसा बरा होता. नसलेलं दुःख रंगवून रंगवून सांगण्याची तिला सवय नव्हती. नवरा जसूबेनच्या आज्ञेत होता. किती आज्ञेत ? तर दर रविवारी न चुकता टी. व्ही. वरचा हिंदी सिनेमा सोडून तो बोरीवली-बोरीबंदर असा प्रवास करायचा. बोरीबंदरला जसूबेनची एक लाडकी बेकरी होती. तिथले पाव तिला आवडायचे.

मुलांचं शिक्षणात लक्ष नव्हतं याबद्दलही जसूबेन नाराज नसायची. बघतील आपापलं. पुढे जसूबेनचा न्हल्ला (धाकटा) घर सोडून गेला. सहाएक महिन्यानंतर परत आला नि महिन्याभरात परागंदा झाला. असं सतत सुरू असायचं त्याचं. 'न्हल्ला काय करतो?' हा प्रश्न ती उडवून लावायची. 'करत असेल काहीतरी. उपाशी तर मरत नाहीए. बघेल तो त्याचं'. एकदा न्हल्ला एका मुलीला घरी घेऊन आला. 'ही माझी बायको', असं जसूबेनला म्हणाला. पाचेक महिने दोघांनी भाग्यनगरला संसार केला. एके दिवशी दोघे गायब. सहा महिन्यांनी न्हल्ला एकटा परत आला. 'बायको सोडून गेली', म्हणाला. जसूबेन बरेच दिवस गप्प गप्प होती. जसूबेनची मुलांविषयीची अनास्था शेजारपाजारच्यांना समजत नसे. जसूबेन सगळ्याच्या पलीकडे गेली होती.

अधूनमधून नवरा-बायकोत ठिणगी पेटायची. मग दोघे वचावचा भांडायचे. नि पाहता पाहता जसूबेनच्या घरात एकच कलकलाट सुरू व्हायचा. सगळे एकमेकांवर आगपाखड करायचे. मनातलं किल्मिष ओकून झालं की, सगळे तास-दोन तास निपचित पडून असायचे. दुपारी चार-साडेचारला जसूबेन पॅसेजात अवतीर्ण व्हायची : 'सांभळो छो...'

नव्यानं जन्म घेतल्यासारखी जसूबेन पॅसेजात कबुतराच्या पावलांनी फिरू लागे.

सेक्स नि मांसाहार हे दोन विषय जसूबेनला वर्ज्य होते. खरं तर तिला तीन मुलं झाली होती नि मांसाहार तिला खूप प्रिय होता, खासकरून मासे. परंतु, ज्या गोष्टीची मनाला अत्यंत भुरळ पडते ती शक्यतो टाळावी; किमान तिचा जाहीर उच्चार करू नये असं तिचं ठाम मत होतं.

'आज माछली खाल्ली' हे ती अगदी खालच्या पट्टीत सांगायची. मासा हे जसूबेनचं totem होतं नि सेक्स हे तिला अतिशय पवित्र क्रियाकांड ritual -वाटे.

मोठ्या मुलानं लग्न केलं तर ती दोघांना एकत्र येऊ देईना. रात्री सगळे लोक बैठकीच्या खोलीत एका लायनीत झोपायचे. एका कोपऱ्यात थोरला मुलगा नि दुसऱ्या कोन्यात सून. 'रातभर करवटें बदलते रहे...' अशी दोघांची अवस्था. हे लवकरच शेजारपाजाऱ्यांना समजलं. मुलगा वैतागला. सुनेचं माहेर बोरीवलीच्या कुठच्याशा पाड्यात होतं. तो दर शनिवार-रविवारी तिथं जायचा. दरम्यान, एका दुपारी पॅसेज परिषदेत बायांनी तिची खरड काढली. खातुन-बीनं तिला रोकडा प्रश्न केला : 'जसूबेन, तुला तीन मुलं कशी झाली गं?'

'मुलं तर देव देतो ना...'

सुनेला दिवस गेले. खातुन-बी म्हणाली, 'जसूबेन, अशा कामाकरता देवाला जुंपणं बरोबर नाही हं. यह तो तुम ने खुदा पर सितम किया.'

जसूबेन छान लाजली. पुढे मोठ्या सुनेला तीन मुलगे झाले. जसूबेननं तिघांचे भरपूर लाड केले. जरा जास्तच.

जसूबेन आणि माझी थोरली बहीण कुंतलादीदी - या घट्ट मैत्रिणी. शेजारी म्हणायचे, 'दीदी, ह्या म्हातारीशी तुझं कसं काय जमतं?' दीदीला मात्र जसूबेन लहान, चुणचुणीत मुलगी वाटायची. दोघींत भरपूर वाटी-व्यवहार चालायचा. जसूबेनला दीदीच्या हातचं मुगाचं घट्ट वरण आवडायचं. दीदी जसूबेनच्या शेव-टोमॅटो रश्श्यावर आशिक होती.

जसूबेननं देव देव केल्याचं आठवत नाही. रोज सकाळी अंघोळ करून देवाला फुलं वाहायची, दिवाबत्ती करायची नि प्रसाद म्हणून गुळाचा खडा समोर ठेवायचा, झालं. ही त्या काळातली पद्धत होती. देवाला त्याचं काम करू दे, आपण आपलं करावं. 1990 नंतर चाळीत धार्मिक चोचले सुरू झाले. आता तर विचारू नका.

खरंतर खातुन-बी मुसलमान, पण घरी सारखं अल्ला अल्ला सुरू नसायचं. सकाळी उठल्यापास्नं खातुन-बीची एकच गडबड सुरू असायची उत्तम स्वयंपाक करून सगळ्यांना पोटभर जेवू घालायचं. 'बेबी, आवार ये. पयला तू चावलची डेकची चुलीवर चढव' ही खातुन-बीची सकाळची पहिली आयत. अधूनमधून नवऱ्याला झापायची : 'हाजी, तुझी ही हरकत बरोबर नाय, सांगते तुला. जास्ती गुमान नको करू. परवरदिगार ऐकतोय.'

1990 नंतर भाग्यनगरात धार्मिक चोचले सुरू झाले. नव्व्दीच्या दशकातल्या पिढीला ते समजू येईनात. आपापल्या आयांच्या अंधश्रद्धेला वैतागून भाग्यनगरचे काही मुलगे घराबाहेर पडले. काहींनी लग्न करून दुसऱ्या शहराची वाट धरली. एक-दोन मुलगे परदेशी गेले. एक घरजावई झाला. त्याच्या आईला मी एकदा विचारलं, 'तुमच्या धार्मिक कर्मकांडांपायी तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला.'

बाई म्हणाल्या, 'जाऊ दे. माझा धर्म मी टिकवला ना?' त्या देरासरला चालल्या होत्या.

जसूबेन, आमची आई, सुशिलाबेन, जयश्रीबेन, खातुन-बी आज हयात नाहीत हे बरंच झालं. त्यांना हा उन्माद समजलाच नसता. नि उगा उगा कष्टी झाल्या असत्या.

एकेकदा जसूबेन कुंतलादीदीला सिनेमाला घेऊन जायची. सकाळीच दोघींचा बेत ठरायचा. राजेश खन्ना हा जसूबेनचा सॉफ्ट स्पॉट होता. त्या काळात दीदीनं जसूबेनबरोबर राजेश खन्नाचे बरेच सिनेमे पाहिले. एकदा तर दोघींनी 'छैलाबाबू' पाहिला. राजेश खन्नाचा उतरत्या काळातला बोगस सिनेमा.

राजेश खन्ना पडद्यावर आला की, जसूबेन लाजून लालेलाल व्हायची. जणू देवच तो. पदरात बाळ टाकणारा. दीदीच्या कानात जसूबेन हळूच बुडबुडायची : 'कुंतला, बघ गं, माझ्याकडेच टक लावून बघतोय तो...' दीदीला फार गंमत वाटायची. 'अहो, तो एकट्या तुमच्याकडे बघत नाहीए. हा सिनेमा आहे, जसूबेन'. पण जसूबेनला ते ऐकूच जायचं नाही. तिला राजेश खन्नाची 'किक' लागलेली असायची.

'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' हे जसूबेनचे अतिशय आवडते सिनेमे. मी कधी बाज्याची पेटी घेऊन बसलो तर मला सांगायची, 'अंबू, तू ते 'कटी पतंग'चं गाणं म्हण ना 'प्यार दिवाना होता है मस्ताना होता है...'

काही वर्षांनी मी बातमीदारीत आलो. या ना त्या निमित्तानं राजेश खन्नाला भेटण्याचा योग दोन-चारदा आला. पुष्कळ गप्पा झाल्या. काकाला जसूबेनविषयी सांगावं असं एकदा मनात आलं. पण नाही सांगितलं. राजेश खन्ना-जसूबेनचं 'अमर प्रेम' ही फक्त भाग्यनगरची लीजंड आहे नि ती तशीच राहावी असं वाटलं.

जसूबेन कोणत्या वर्षी गेली नेमकं आठवत नाही. अचानक आजारी पडली नि तब्येत खालावत गेली. घराबाहेर पडणं बंद झालं. सूर्यकांतभाई (जसूबेनचा नवरा) अगोदरच गेला होता. मोठ्या मुलीचं लग्न झालं. थोरल्या मुलाला तीन मुलगे झाले. न्हल्ला अचानक वारला, पण आई गेल्यावर.

एके दिवशी थोरली सून आईला म्हणाली, 'जसूबेनचं आता काही खरं नाही.' मी भेटायला गेलो. सकाळचा. तिचं अंथरूण बाल्कनीत ठेवलं होतं. शरीराला चतकोरभर दूधकोवळं ऊन मिळावं म्हणून. शरीर कृश झालं होतं. मला पाहून जसूबेन फिक्कट हसली. हात किंचित वर उचलला कसा आहेस? 

दुसऱ्या दिवशी गेली.

जसूबेन इंजिनियर हट्टी होती; पण प्रेमळ. तिच्यात एक सावकाशपण होतं एक ठहराव. आपली डिग्निटी सांभाळून जगली. जमेल तितकं लोकांचं करत राहिली. जीवनाकडून फार अपेक्षा नाही ठेवल्या. आपल्या कुवतीप्रमाणे जीवनाचं कूटस्थ गूढ समजून घेत घेत जगली: 'जिंदगी कैसी है पहली हाए / कभी यह हंसाए, कभी यह रुलाए' हे मुकंनिकं सत्य तिला थोडंबहुत गवसलं होतं.

जसूबेनचे तिन्ही नातू चांगले निपजले. सगळ्यात थोरला मात्र अकाली गेला. दोन नंबरचा नातू धर्मा हा भाग्यनगरात (तोच ब्लॉक नंबर 59) राहतो. तीन नंबरचा नातू आपल्या बायकोमुलांसह दहिसरला आहे. धर्माची एकुलती एक लेक रिया इंग्रजी कॉन्वेंट शाळेत सहावीत शिकते. तीसुद्धा 'सांभळो छो'चं पालुपद लावते, पण इंग्रजीत 'Papa, will you listen to me?"

 

मागील पन्नास वर्षे इंग्रजी पत्रकारितेत वावरत असलेल्या अंबरीश मिश्र यांनी अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन व अनुवाद केले आहेत. ललितरम्य लेखन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. ते महिन्यातून दोनदा याप्रमाणे आगामी वर्षभर साधनात सदर लिहिणार आहेत. त्यातील हा सहावा लेख.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी