डिजिटल अर्काईव्ह

जयंत नारळीकर यांची वैज्ञानिक कामगिरी आणि आयुका

नारळीकरांना आदर्श मानून तरुण विद्यार्थ्यांच्या चार ते पाच पिढ्या घडल्या. 'नारळीकरांसारखे व्हा', असा आशीर्वाद आपल्या आजी-आजोबांनी दिल्याची आठवण काही प्रतिष्ठित लोकांकडूनही मी ऐकलेली आहे. आयुकाच्या स्थापनेपासून पहिली 15 वर्षं या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर नारळीकर संचालकपदावरून पायउतार झाले, तेव्हासुद्धा त्यांनी एक दाखला घालून दिला. माणसाने स्वतःच्या निर्मितीपासून नम्रतेने आणि आब राखून कसं अलिप्त व्हावं, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी ग्रंथालय आणि संगणक कक्षातील एका शांत कोपऱ्यातलं ऑफिस निवडलं. ते केवळ सकाळी साडेदहा वाजता चहा पिताना दिसायचे तेवढंच. बाकीचा वेळ ते पूर्णपणे अदृश्य असत. हाही त्यांचा गुण अनुकरणीय होता. ते 'जन्टलमन सायन्टिस्ट' होते आणि त्यांची शहाणीव अव्वल दर्जाची होती.

 

जयंत नारळीकरांनी भारताच्या वैज्ञानिक अवकाशात नेहमीच्या मार्गाने प्रवेश केला नाही, तर ते अचानक उडी मारून या अवकाशात अवतरले, असं म्हणावं लागेल. भारतातील वृत्तपत्रांमध्ये 1964 वर्षाच्या अखेरीला ठळक बातम्यांमधून त्यांचं नाव पहिल्यांदा झळकलं : 'जयंत नारळीकर या तरुण भारतीय संशोधकाने त्याचे मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्यासह गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धान्त मांडला असून त्यात ते आईनस्टाइनच्या मांडणीपलीकडे गेले आहेत,' असं या बातम्यांमध्ये नमूद केलं होतं. लंडनमधील रॉयल सोसायटीत या सिद्धान्ताविषयीचं सादरीकरण करण्यात आलं आणि जगभरात उत्साहाने त्यातील निष्कर्षांचं स्वागत झालं.

अशा मान्यतेसाठी आसुसलेल्या स्वतंत्र भारताला तरुण नारळीकरांच्या रूपाने विज्ञानाच्या क्षेत्रात मानाने मिरवता येईल असा चेहरा आणि नायक लाभला. त्या बातमीनंतर ते एका रात्रीत देशातील घरोघरी परिचयाचे झाले. त्या वेळी इंदिरा गांधींनी नारळीकरांना पत्र लिहून या विलक्षण शोधाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं, असं म्हटलं जातं. तोवर इंदिरा पंतप्रधान झाल्या नव्हत्या. दोनेक आठवड्यांपूर्वीच जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं होतं. नारळीकरांच्या या पथदर्शी यशाबद्दल नेहरूंना अत्यानंद झाला असता, असंही इंदिरांनी पत्रात नमूद केलं होतं.

जयंत नारळीकरांनी सर्वसामान्य लोकांशी वैज्ञानिक पद्धतीविषयी आणि आपल्या जीवनात विज्ञान कोणती उद्बोधक व अर्थपूर्ण भूमिका निभावू शकतं याविषयी सातत्याने आणि उत्साहाने संवाद साधला. ज्योतिषशास्त्र, अंधश्रद्धा, यांविरोधातील प्रमुख विज्ञानवादी आवाज उठवणाऱ्यांमध्ये नारळीकर आघाडीवर होते. विद्यापीठीय पातळीवर विज्ञान शाखेमध्ये ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगात मांडला गेला, तेव्हा त्या विरोधात ठामपणे आवाज उठवणारे नारळीकर पहिले आणि बहुधा एकटेच होते. या भूमिकेमुळे त्यांना बराच विरोध आणि अस्वस्थता सहन करावी लागली, हे इथे नमूद करायला हवं. सर्वसामान्य लोकांशी विज्ञानविषयक संवाद साधणं आणि वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार करणं, याबद्दलच्या बांधिलकीपोटी त्यांनी देशात व परदेशात सर्व स्तरांवर, अनेक ठिकाणी लोकाभिमुख रितीने व्याख्यानं दिली, उन्हाळी सुट्ट्यांत आयुकाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते बोलत असत आणि शिवाय त्यांनी विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि इतर विपुल वैज्ञानिक ललित लेखन केलं. वैज्ञानिक मनोवृत्ती असणारा समाज निर्माण करण्याचं नेहरूंचं स्वप्न होतं आणि नारळीकर हे निश्चितपणे त्या स्वप्नाशी सुसंगत ठरतील असेच होते. नारळीकरांप्रमाणे 'समाजाभिमुख वैज्ञानिका'ची बिरुदावली खऱ्या अर्थाने शोभून दिसेल असं दुसरं व्यक्तिमत्त्व म्हणजे यश पाल - तेसुद्धा मनमिळाऊपणे लोकांना आपलंसं करून घेत असत. आपल्या सुखासीन जगण्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं योगदान असतं, या ऋणाची जाणीव आपण सर्वांनीच ठेवायला हवी, असं मला वाटतं. शिवाय, या ऋणाची परतफेड म्हणून विज्ञानविषयक संवादप्रक्रियेत सहभागी होणं, लोकांपर्यंत विज्ञानाविषयी अधिक सजगता निर्माण होण्यासाठी परिणामकारक रितीने सवाद साधणं, आवश्यक आहे. अशी सजगता निर्माण झाली तर लोकांना अधिक जाणतेपणाने आणि वस्तुनिष्ठपणे निर्णय घेणं शक्य होईल, तसंच परंपरेतून लादलं गेलेलं अंधश्रद्धेचं ओझं झुगारण्यासाठीसुद्धा मदत होईल.

सर्वसामान्य लोकांपर्यंत वैज्ञानिक पद्धती आणि विचार यांचा प्रसार करण्याबाबत नारळीकरांनी दाखवलेली बांधिलकी त्यांना समकालीनांहून वेगळं ठरवते. त्यांना सार्वत्रिक लोकप्रियता लाभण्यामागचं कारणसुद्धा हेच होतं.

ते पहिल्यापासूनच उत्कृष्ट विद्यार्थी होते आणि केम्ब्रिज विद्यापीठातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळेच केम्ब्रिजमध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा असायचा, त्या फ्रेड हॉयल यांनी स्टिफन हॉकिंग, मार्टिन रीस, ब्रँडन कार्टर व जॉर्ज एलिस यांसारख्या उल्लेखनीय विद्यार्थ्यांमध्ये नारळीकरांची निवड केली. त्यांना संशोधक विद्यार्थ्यांसाठी असणारं 'स्मिथ्स मेडल' सुद्धा मिळालं, आणि पाच वर्षांनी त्यांना प्रतिष्ठेचं 'अॅडम्स प्राइझ' रॉजर पेनरोझ याच्यासह विभागून मिळालं. कालांतराने, 2020 मध्ये पेनरोझ यांना कृष्णविवरासंदर्भात त्यांनी वर्तवलेल्या भाकितासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.

नारळीकरांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाविषयी बऱ्याच गोष्टी सर्वज्ञात आहेत आणि त्याबद्दल बरंच काही लिहून आलं आहे, परंतु त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीविषयी मात्र भरीव असं काही लिहिलं गेलेलं नाही. मी प्रस्तुत लेखामध्ये शक्य तितक्या सुलभपणे हेच लिहायचा प्रयत्न करणार आहे. गहन मूलभूत प्रश्नांविषयी सामान्य वाचकांशी संभाषण करताना आपल्याला तो विषय किती चांगला समजला आहे याचंही मोजमाप होत असतं. त्यामुळे इथे माझी कसोटी असणार आहे. माझ्या आकलनाच्या मर्यादांसह जे काही बोलतोय ते समजून घ्यावं.

नारळीकरांची वैज्ञानिक कामगिरी

जयंत नारळीकर 1960 च्या दशकारंभी पदवीच्या अभ्यासाकरता केम्ब्रिजला गेले, तेव्हापासूनच ते इतर समर्थ सहाध्यायींचं अनुकरण न करता स्वतःची वाट चोखाळू लागले. त्यांनी कायम मूलभूत समस्यांमध्ये रस घेऊन त्यावर काम केलं. ही त्यांच्या वैज्ञानिक कामामधील बाब ठळकपणे उठून दिसते. त्यांचे ख्यातनाम गुरू फ्रेड हॉयल यांच्याकडून त्यांनी हा गुण घेतला. हॉयल अत्यंत स्वतंत्र मनोवृत्तीचे होते आणि प्रवाहाविरोधात पोहण्यात त्यांना विशेष आनंद होत असे. याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे फ्रेड हॉयल यांच्याप्रमाणे नारळीकरही स्वतंत्रपणे विचार करत आणि त्यांच्या मूल्यमापनानुसार प्रस्थापित दृष्टीकोन स्वतंत्र व निष्पक्षपाती छाननीपुढे टिकून राहत नसेल तर त्या दृष्टीकोनाला आव्हान देण्यासाठी लागणारं धाडस व निग्रह त्यांच्यामध्ये होता. त्यांनी स्वतःच्या वैज्ञानिक कारकिर्दीत सातत्याने हे काम केलं. तथ्यांचा व तत्त्वांचा वस्तुनिष्ठ व निष्पक्षपाती शोध घेण्याच्या या अढळ निष्ठेपायीच त्यांना कालांतराने व्यावसायिक पातळीवर एकटेपणा सहन करावा लागला.

इथे मी नारळीकरांनी मूलभूत भौतिकशास्त्र, अंतराळभौतिकी आणि विश्वरचनाशास्त्र यांमध्ये दिलेल्या तीन सर्वांत महत्त्वाच्या योगदानांवर बोलणार आहे. त्यांनी अनेक कल्पना मांडल्या तेव्हा त्या खूप जहाल वाटतील अशा होत्या, पण कालांतराने त्या सत्य असल्याचं सिद्ध झालं. परंतु, तेव्हासुद्धा त्यांची पुरेशी प्रशंसा झाली नाही आणि त्यातील अभिनवता, शोधकता व प्राधान्यक्रम यांची दखल घेतली गेली नाही. हे काहीसं विचित्र आहे. सर्वसाधारणपणे आगामी कल्पना व घडामोडी यांचं पूर्वानुमान बांधणाऱ्याचं कौतुक केलं जातं. मग नारळीकरांच्या बाबतीत हे का झालं नाही, या प्रश्नाचं उत्तर बहुधा विज्ञानाच्या सामाजिक संदर्भामध्ये लपलेलं असावं. त्यावर आपण लेखाच्या शेवटी बोलू.

गुरुत्वाकर्षणाचा हॉयल-नारळीकर सिद्धान्त

मूलभूत भौतिकशास्त्रज्ञांसाठी मॅकचं तत्त्व (Mach's Principle) हे एक सतत भुरळ घालणारं गूढ आहे. कोणालाही त्याचं पूर्ण आकलन झालेलं नाही आणि गुणात्मक रितीने हाताळणी करता येईल अशी त्याची स्पष्ट वैज्ञानिक मांडणीही कोणाला करता आलेली नाही. हे तत्त्व म्हणजे मुळातच अचूक वैज्ञानिक विधान नसून काव्यात्मक आणि तात्त्विक स्वरूपाची ही संकल्पना आहे. त्यामुळे निरनिराळ्या लोकांना तिचा निरनिराळा अर्थ लागतो. विश्वातील सर्व कण परस्परांसोबतच्या आंतरक्रीडेद्वारे अस्तित्वात असतात आणि या आंतरक्रीडेतून त्यांना भौतिक अस्तित्वासाठी अत्यावश्यक असणारं वस्तुमान किंवा जडत्व प्राप्त होतं, असा या विधानाचा अगदी साध्या शब्दांतला अर्थ सांगता येईल. थोडक्यात, एकच कण सुटा अस्तित्वात असू शकत नाही.

हे तत्त्व काव्यात्मक आहे, सौंदर्यदृष्ट्या अतिशय आकर्षक आहे, तसंच त्यातली संकल्पना वैश्विक आहे, त्यामुळे एकंदरच कोणत्याही सर्जनशील मनाला आणि विशेषतः मूलभूत भौतिकशास्त्रज्ञाला त्याची भुरळ पडणं अटळ होऊन जातं. आईनस्टाइनलाही गुरुत्वाकर्षणासंदर्भातील सामान्य सापेक्षतेच्या (General Relativity) सिद्धान्तामध्ये या तत्त्वाचा समावेश करायचा होता, हे स्वाभाविकच आहे. परंतु, त्याच्या सिद्धान्तामध्ये एका विलग कणाची उत्पत्ती मान्य केलेली असल्यामुळे मॅकचं तत्त्व त्याच्या सिद्धान्ताचा भाग होऊ शकलं नाही.

हॉयल-नारळीकर यांनाही 1960 च्या दशकारंभी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडताना त्यात मॅकच्या तत्त्वाचा समावेश करायचा होता. त्यामुळे, इतर सर्व कणांसोबतच्या आंतरक्रीडेची गोळाबेरीज म्हणून एका कणाला जडत्व प्राप्त होतं, या विधानासह त्यांनी सुरुवात केली. यातून गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धान्त जन्माला आला. हॉयल नारळीकर सिद्धान्ताने अनेक कणांच्या मर्यादेत सामान्य सापेक्षतेचा संक्षेप घडवला. हा सिद्धान्त मोहक आणि गणितीदृष्ट्या सफाईदार होता. मॅकच्या तत्त्वामधील चटकन पकडीत न येणारा भाग या सिद्धान्ताने परिणामकारक वैज्ञानिक रितीने स्पष्ट केला, हा यातील सर्वांत आकर्षक पैलू ठरला. या सिद्धान्तामध्ये 'स्थिर स्थिती विश्वरचना' (Steady State Cosmology) या प्रारूपाचा आधार घेण्यात आला; त्यानुसार, विश्व कायम स्थिर स्थितीमध्ये असतं आणि त्याला कोणताही आरंभ वा अंत नसतो.

-आईनस्टाइनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्तामध्ये विश्वातील द्रव्य एकजिनसी व समगुणी मानलेलं आहे सर्व ठिकाणी आणि सर्व दिशांमध्ये ते समान आहे, आणि विस्तारतं आहे. रशियन वैज्ञानिक अलेक्झांडर फ्रीडमनने 1924 मध्ये या विस्तारत्या विश्वाची उत्पत्ती शोधली. आईनस्टाइनने 1917 मध्ये स्थितिशीलतेचा पर्यायी सिद्धान्त मांडला, त्यासाठी त्याला स्वतःच्या समीकरणामध्ये विश्वरचनात्मक स्थिरांकाची (Cosmological Constant) भर घालावी लागली. या प्रारूपामध्ये आकाशगंगेसारख्या विलग गोष्टींचा समावेश होता आणि त्या आपापल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे परस्परांना खेचून ठेवत होत्या, त्यामुळे त्या शून्य आकारापर्यंत येऊन ठेपतात. यात स्थिर स्थितिशील वाटप होण्यासाठी गुरुत्वाकर्षणासंदर्भात प्रतिसमतोल साधण्याच्या दृष्टीने काही यंत्रणा शोधणं आवश्यक होतं. परंतु, आईनस्टाइनच्या समीकरणाने भौतिक अर्थ न बदलता स्थिरांकाचा समावेश करायला वाव दिला, आणि तो स्थिरांक गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करू शकत होता. या स्थिरांकाला विश्वरचनात्मक स्थिरांक असं म्हटलं गेलं.

फ्रीडमनने विस्तारत्या विश्वाचं प्रारूप शोधल्यानंतर त्या विस्ताराने आपोआप प्रतिसमतोल साधणारा घटक दिला, त्यामुळे विश्वरचनात्मक स्थिरांक गरजेचा उरला नाही. तेव्हापासून या स्थिरांकाचा सिद्धान्तांमधील समावेश हा त्या-त्या व्यक्तीच्या लहरीचा आणि कल्पनेचा खेळ ठरला. विश्वरचनात्मक स्थिरांकाची मांडणी ही आपली सर्वांत मोठी घोडचूक असल्याचं खुद्द आईनस्टाइन म्हणाला असावा.

सर्व जवळपासच्या आकाशगंगा परस्परांपासून दूर जात आहेत, असं 1929 मध्ये इर्विन हबलच्या निदर्शनास आलं. यातून फ्रीडमनच्या विस्तारत्या विश्वाच्या प्रारूपाला निरीक्षणाचा आधार व वैधता मिळाली. आकाशगंगांमधील विभाजनाचा वेग त्यांच्यातील अंतराच्या प्रमाणानुसार होता. हा विश्वाच्या विस्तारासंदर्भातील हबलचा नियम म्हणून ओळखला गेला.

त्यानंतर अशी कल्पना करण्यात आली की विश्वाची उत्पत्ती एकाच घटनेतून झाली. या घटनेवेळी घनता, तापमान, इत्यादींसारखी सर्व भौतिक परिमाणं विभक्त होऊन अनंतरूपी झाली. हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीचा महास्फोट सिद्धान्त (Big Bang Theory) म्हणून ओळखला गेला. या सिद्धान्ताचे कट्टर विरोधक फ्रेड हॉयल यांनी उपहासाने या सिद्धान्ताला 'बिग बँग' असं संबोधलं होतं, पण शेवटी त्याच नावाने तो सिद्धान्त लोकप्रिय झाला !

हर्मान बॉन्डी, फ्रेड हॉयल व थॉमस गोल्ड या तीन मित्रांनी 1948 मध्ये स्थिर स्थिती विश्वरचनाशास्त्रासंदर्भात एक पर्यायी सिद्धान्त मांडला. त्यांच्या सिद्धान्तानुसार विश्व सर्व स्थानांवरून आणि सर्व दिशांमधूनच नव्हे, तर सर्व काळांमध्येही सारखंच दिसतं. हे परिपूर्ण विश्वरचनात्मक तत्त्व (Perfect Cosmological Principle) आहे, तर महास्फोट सिद्धान्तासाठी आधारभूत मानलेल्या तत्त्वानुसार मात्र विश्व सर्व स्थानांवरून व सर्व दिशांमधून एकसारखंच दिसत असलं तरी सर्व काळ ते तसं नसतं.

हे दोन प्रतिस्पर्धी सिद्धान्त होते पण त्यांच्यातील एकाची निवड करावी इतपत त्यातली निरीक्षणं सुस्पष्ट नव्हती. परिपूर्ण विश्वरचनात्मक तत्त्वाला आणि पर्यायाने स्थिर स्थिती विश्वरचनेच्या सिद्धान्ताला एक नैसर्गिक सौंदर्याची आकर्षकता होती, कारण त्यात एकाच आरंभाचा अडसर ठेवलेला नव्हता या सिद्धान्तानुसार विश्व कायमच असं राहिलेलं आहे आणि पुढेही ते कायम असंच राहणार आहे. यात आरंभही नाही आणि अंतही नाही.

महास्फोट सिद्धान्त आणि स्थिर स्थिती विश्वरचना सिद्धान्त यांच्यात समेट घडवणं हा 1950 च्या दशकातील प्रमुख प्रश्न होता. अधिक सुस्पष्ट व अधिक अचूक निरीक्षणांद्वारेच हा समेट घडवणं शक्य होतं. त्यातून नवीन आणि अधिक मोठे टेलिस्कोप उभारण्याला चालना मिळाली. 1965 मध्ये एक पथदर्शक शोध लागला 'बेल लॅब'मधील अर्को पेन्झिआस व रॉबर्ट विल्सन या दोन अभियंत्यांना सर्व दिशांनी येणाऱ्या सर्वव्यापी किरणोत्साराचा अपघाताने शोध लागला. हे वैश्विक सूक्ष्मलहर पार्श्वभूमीचं किरणोत्सर्जन (Cosmic Microwave Background Radiation) होतं आणि त्याचं तापमान 3 अंश केल्विन इतकं होतं. महास्फोट सिद्धान्ताने आधी हेच भाकीत केलं होतं.

हबलच्या विस्तारत्या विश्वानंतरचा हा खूपच मोठा शोध होता. त्यामुळे महास्फोट सिद्धान्ताच्या बाजूने पारडं निर्णायकरीत्या झुकलं. स्थिर स्थिती विश्वरचना सिद्धान्ताचे एक पुरस्कर्ते हर्मान बाँडी यांनी जाहीरपणे असं विधान केलं की, हा सिद्धान्त सुंदर होता, पण त्याच्याशी जुळणारी निरीक्षणं नसतील तर काय करणार !

अशा रितीने स्थिर स्थिती विश्वरचना सिद्धान्ताचा पराभव झाला आणि विश्वरचनेचा वैध सिद्धान्त म्हणून महास्फोट सिद्धान्त सर्वत्र स्वीकारण्यात आला. हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धान्ताचीसुद्धा हीच गत झाली, कारण त्यांनी स्थिर स्थिती विश्वरचनेचं भाकीत वर्तवलं होतं आणि त्याला निरीक्षणं अनुकूल नाहीत. हॉयल-नारळीकर सिद्धान्तात मॅकच्या तत्त्वाचा समावेश करण्यात आला, हे अत्यंत आकर्षक वैशिष्ट्य होतं, पण वैश्विक सूक्ष्मलहर पार्श्वभूमीचं किरणोत्सर्जन शोधणाऱ्या निरीक्षणांशी हा सिद्धान्त जुळणारा नसल्यामुळे त्याची आवाहकता संपुष्टात आली.

कोणताही मूलभूत सिद्धान्त एका परिप्रेक्ष्याला व कथनाला वाव देतो, त्यातून संभाव्य घटितांचा व्यापक पट खुला होतो आणि त्याचा मग वेगळा शोध घ्यावा लागतो.

महास्फोट सिद्धान्तानुसार विश्वाची उत्पत्ती सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी एकाच घटनेतून झाली. त्या वेळी द्रव्याची घनता आणि कालावकाशाचे वक्र विभक्त होऊन अनंतरूप झाले. हा एक खूप उष्णता निर्माण करणारा मोठा स्फोट होता, त्यातून विश्व विस्तारत राहण्याला प्रचंड आरंभिक चालना मिळाली. तेव्हापासून विश्व सतत विस्तारतं आहे म्हणजे सर्व आकाशगंगा परस्परांपासून दूर जात आहेत. याची कल्पना पुढीलप्रमाणे मांडता येईल एका फुग्यावर काही ठिपके काढावेत आणि मग तो फुगा फुगवावा. फुगा मोठा होत जाताना प्रत्येक ठिपका दुसऱ्या ठिपक्यांपासून दूर जात राहील. विश्वाची निर्मिती झाली तेव्हा द्रव्य व किरणोत्सर्जन परस्परांशी घट्ट बांधलेलं होतं, मग विश्वाचा विस्तार होत ते थंड झालं आणि एका टप्प्यावर द्रव्य व किरणोत्सर्जन विभक्त झाले. या घटनेची खूण सर्व दिशांनी मुक्तपणे वाहणाऱ्या किरणोत्सर्जनातून मिळते. या किरणांचे विशिष्ट तापमान असतं. विश्व विस्तारल्यावर हे तापमान कमी होतं. आज सदर तापमान 3 अंश केल्विन (उणे 270 अंश सेंटिग्रेड) इतकं आहे. आधी नमूद केलेलं विश्वरचना सूक्ष्मलहर पार्श्वभूमीचं किरणोत्सर्जन म्हणजे हेच. महास्फोट सिद्धान्तामध्ये विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी करण्यात आलेल्या उलगड्याची ही स्पष्ट खूण आहे.

दूर अंतरावरील कृतीचा सिद्धान्त

जॉन व्हिलर व रिचर्ड फेनमन यांनी 1945 मध्ये मांडलेल्या किरणोत्सर्जनाच्या अवशोषक सिद्धान्ताचं (Absorber Theory of Radiation) हॉयल-नारळीकर यांनी केलेलं सर्वसाधारणीकरण, हे या संदर्भातील आत्तापर्यंतचं बौद्धिकदृष्ट्या सर्वांत समाधानकारक व उत्साहवर्धक योगदान आहे. व्हिलर-फेनमन यांनी मॅक्सवेलच्या विद्युतगतिकीचा (Electrodynamics) विकास साधून दूर अंतरावरील कृतीचा सिद्धान्त (Action at a Distance Theory) मांडला. या सिद्धान्तामध्ये अशी कल्पना मांडण्यात आली की, एखादा संकेत कोणत्याही स्थानावरील एका भारापासून दुसऱ्या स्थानावरील परक्या भारापर्यंत पोहोचतो, आणि अशा रितीने विद्युतगतिक आंतरक्रीडा पार पडते. पारंपरिक क्षेत्र सिद्धान्ताहून वेगळ्या दिशेने जाणारी ही मांडणी होती. पारंपरिक क्षेत्र सिद्धान्तामध्ये क्षेत्राची निश्चिती प्रत्येक बिंदूपाशी केली जात असे आणि भारांमधील आंतरक्रीडा क्षेत्राच्या कर्तेपणाद्वारे होते. ही कल्पित रचना अत्यंत उपयोगी व परिणामकारक होती. दूर अंतरावरील कृतीच्या सिद्धान्ताने या क्षेत्रकेंद्री रचनेची जागा घेतली आणि भारित कणांमधील थेट कृती म्हणून या प्रक्रियेकडे पाहिलं.

मॅक्सवेलचा सिद्धान्त काल सममित (time symmetric) आहे, त्यामुळे त्यात प्रगत (कारणाच्या आधी कार्य असतं) आणि मंदित (कारण कार्याच्या आधी असतं) अशा दोन्ही उपायांना मान्यता असते, हे सर्वज्ञात आहे. सदर समीकरणात दोन्ही उपायांचा स्वीकार आहे, पण आपल्याला कायम मंदित कार्य दिसतं, प्रगत कार्य दिसत नाही. ही सममिती मोडून काढून कालाची दिशा निश्चित करावी लागते. व्हिलर फेनमन यांनी थर्मोडायनेमिक्सच्या आधारे हे केलं आणि प्रगत घटक विश्वातील इतर द्रव्यांमध्ये शोषला गेला, त्यातून कालाची दिशा निश्चित झाली.

मॅकच्या तत्त्वामध्ये कल्पिलेली उर्वरित विश्वासोबतची आंतरक्रीडा पुन्हा एकदा कालाची दिशा निश्चित करणारी ठरली, हे इथे नमूद करायला हवं. मग एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झालाः मॅकच्या तत्त्वाचा समावेश करणाऱ्या एखाद्या गुरुत्वाकर्षण सिद्धान्ताच्या चौकटीत या मुद्द्याचा विचार करावा का? हॉयल-नारळीकर यांनी हेच केलं. विश्वरचनेतील विस्तारत्या विश्वाने अधिक स्वाभाविक रितीने काळाची दिशा निश्चित केली, असे त्यांचं प्रतिपादन होतं. त्यासाठी त्यांना दूर अंतरावरील कृतीचं सार्वत्रिकीकरण वक्राकार कालावकाशामध्ये करावं लागलं आणि विश्वरचनात्मक विस्ताराने प्रगत/मंदीत सममिती मोडल्याचं दाखवून द्यावं लागलं. केवळ सिद्धान्तापुरता यातून अचूक निष्कर्ष निघाला, हे लक्षणीय होतं (केवळ स्थिर स्थिती सिद्धान्ताला लागू होतं, महास्फोट सिद्धान्ताला नाही). मॅक्सवेलच्या विद्युतगतिकीमधील दूर अंतरावरील कृतीची मांडणी स्पष्टपणे महास्फोटाऐवजी स्थिर स्थितीच्या सिद्धान्ताला कौल देणारी होती. हा परिणाम निश्चितपणे लक्षणीय होता.

क्षेत्रीय सिद्धान्ताचा दृष्टीकोन काम करण्यासाठी सोपा आहे, त्यामुळे तो खूप लोकप्रिय झाला. परंतु, दूर अंतरावरील कृतीचा सिद्धान्त प्रत्यक्ष भौतिक पातळीवर अधिक आकर्षक आहे, कारण त्यात कणांमधील थेट कृतीचा संबंध येतो.

या चौकटीमध्ये विद्युतगतिकीचं प्रमात्रीकरण करणं (Quantise), हे त्यापुढचं आव्हान होतं. फेनमनने याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश मिळालं नाही. परंतु, या प्रक्रियेत त्याने एका अत्यंत उपयुक्त गणिती तंत्राचा शोध लावला. पथ संकलक सूत्रीकरण (Path Integral Formalism) हे ते तंत्र त्यानंतर बरंच वापरलं गेलं. दूर अंतरावरील कृती या दृष्टीकोनातून प्रमात्रीकरण शक्य नसल्यामुळे त्याऐवजी क्षेत्र सिद्धान्ताला प्राधान्य द्यावं, असं त्याला वाटलं.

हॉयल-नारळीकरण यांनीसुद्धा ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. दूर अंतरावरील कृती या चौकटीमध्ये आण्विक इलेक्ट्रॉनचं उत्स्फूर्त स्थित्यंतर, जोडी उत्पादन व उच्चाटन, कॉम्प्टन विकिरण यांसारख्या प्रमाणविषयक प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो, हे दाखवून देणं त्यांना शक्य झालं. विश्वाच्या प्रतिसादामुळे विविध संकलकांना मर्यादित किरणोत्सारी दुरुस्त्यांपर्यंत रोखून ठेवलं जातं, हा अत्यंत मूलगामी निष्कर्षही त्यांनी काढला. तर, व्हिलर फेनमन सिद्धान्ताचं प्रमाणीकरण शक्य होतंच आणि त्यासाठी पुनर्सामान्यीकरण करणं आवश्यक नव्हतं (सामान्यीकरण / Normalisation हे परिणामकारक तंत्र क्वान्टम क्षेत्र सिद्धान्तामधील अनंतरूपांवर उपाय करण्यासाठी शोधून काढण्यात आलं). याचं कोणतंही भौतिक समर्थन नव्हतं, पण प्रयोगांनी त्यातील सर्व भाकितं अत्यंत अचूक प्रमाणात सिद्ध केल्यामुळे तो सिद्धान्त परिणामकारक ठरला. परंतु, या प्रश्नावर स्पष्टीकरण अजूनही मिळालेलं नाही.

विश्वाच्या प्रतिक्रियेमुळे नैसर्गिक फारकत झाली. या विलक्षण निष्कर्षाकडे अजूनही पुरेसं लक्ष गेलेलं नाही आणि त्याची योग्य ती दखलही घेतली गेलेली नाही. विश्वरचनात्मक निरीक्षणांचा आधार न मिळालेल्या स्थिर स्थिती सिद्धान्ताचा संदर्भ या मांडणीला असल्यामुळे बहुधा तिच्याकडे दुर्लक्ष झालं असावं.

आपण आधी चर्चा केलेला हॉयल-नारळीकर सिद्धान्त हा प्रत्यक्षात दूर अंतरावरील कृतीचा सिद्धान्तच आहे. या चौकटीत गुरुत्वाकर्षणाचा विचार करणारे ते दोघे पहिलेच होते. क्षेत्र सिद्धान्ताच्या जागी थेट कण सिद्धान्त कसा आणता येईल, याबद्दलही नारळीकरांनी 1968 मध्ये सर्वसाधारण पत्रव्यवहार केला होता.

निम-स्थिर स्थिती सिद्धान्त

मुख्यप्रवाही दृष्टीकोनाने समोर उभ्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना हॉयल, जॉफरी बर्बिज व नारळीकर या विख्यात बंडखोर त्रिकुटाने 1993 मध्ये विश्वरचनेचा निम-स्थिर स्थिती सिद्धान्त (Quasi-Steady State Theory of Cosmology) मांडला. तोवर सुप्रस्थापित तथ्य म्हणून स्वीकारल्या गेलेल्या वैश्विक सूक्ष्मलहर पार्श्वभूमीचं किरणोत्सर्जनाचं स्पष्टीकरण कसं द्यायचं, हा त्यांच्या समोरचा मुख्य प्रश्न होता. हॉयल यांनी त्यांच्या स्वभावानुसार सदर किरणोत्सर्जनाच्या निरीक्षणाला त्यांचे मित्र व स्थिर स्थिती सिद्धान्ताचे सहसंस्थापक हरमान बाँडी यांच्याहून निराळ्या तन्हेने प्रत्युत्तर दिलं. विश्वातील धुळीमुळे ताऱ्याच्या प्रकाशाचं ध्रुवीकरण होऊ शकतं, आणि त्यातून वैश्विक सूक्ष्मलहर पार्श्वभूमी किरणोत्सर्जन झालेलं असू शकतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. ही धूळ सदासर्वकाळ अस्तित्वात असते.

त्यानंतर अशी कल्पना मांडण्यात आली की, विश्व सदासर्वकाळ स्थिर स्थितीमध्ये राहत नाही, तर ते अत्यंत तीव्र घनता असलेल्या ऊर्जास्थितीच्या चक्रांमधून जातं आणि त्या वेळी द्रव्य निर्माण होतं. महास्फोटाच्या वेळी हेच झालं. त्यानंतर मग सर्वसामान्य विस्ताराचा टप्पा येतो, त्यानंतर विश्व अत्यंत घनता असलेल्या स्थितीमध्ये जाण्याचा टप्पा येतो. अशा रितीने ही निम-स्थिर स्थिती येते. हे चक्राकार विश्व असून ते महास्फोटाशी साधर्म्य राखणाऱ्या तीव्र घनतेच्या स्थितीमधून जातं आणि मग पुन्हा विस्तारत्या स्थितीमध्ये येतं. एका चक्रातून धुळीच्या रूपातील द्रव्य पुढील चक्रामध्ये नेलं जातं, त्यामुळे ताऱ्यांच्या प्रकाशाचं ध्रुवीकरण करून सूक्ष्मलहर किरणोत्सर्जन निर्माण करण्यासाठी कायमच धुळीची आवश्यकता असते.

अशा रितीने त्यांनी निम स्थिर स्थिती विश्वरचना सिद्धान्ताची मांडणी केली. ही मांडणी अत्यंत कल्पक आणि सर्जनशील असली तरी या सिद्धान्तासाठी आवश्यक असणारी विशेष धूळ अस्तित्वात आहे का, याबद्दल अनेक विश्वरचनाशास्त्रज्ञांना शंका आहे. धातूच्या वाफांचं संघनन धुळीच्या कणांसारख्या रूपात होत असल्याचं दाखवणारे निर्णायक प्रयोग झालेले आहेत. ताऱ्यांच्या प्रकाशाचं ध्रुवीकरण होण्यासाठी लागतात तशाच प्रकारचे हे धुळीचे कण असतात, पण अंतराळातही ते कण अस्तित्वात असतील हा विचार अकल्पनीय मानला जातो. परंतु, कोणताही प्रयोगशाळेतील पुरावा नसलेलं विचित्र कृष्णद्रव्य (Dark Matter) अस्तित्वात असल्याचं गृहीतक स्वीकारायला मात्र विश्वरचनाशास्त्रज्ञांची काही हरकत नसते, हा विरोधाभासच म्हणायला हवा.

स्थिर स्थिती सिद्धान्ताने परिपूर्ण विश्वरचनात्मक तत्त्वामधील अत्यंत मोहक व सुंदर संकल्पनेशी बांधिलकी कायम ठेवली, पण निम स्थिर स्थिती सिद्धान्ताने हे तत्त्व सोडलं, त्यामुळे त्याची सौंदर्यात्मक आवाहकता पूर्णपणे संपुष्टात आली. निम-स्थिर स्थिती सिद्धान्तामध्ये महास्फोटासारखी घटना सातत्याने व चक्राकार घडत असल्याचं प्रतिपादन केलं आहे. आता याला पूर्णपणे घटितशास्त्राचा आधार देण्यात आला; त्यामागे कोणतंही ठोस मार्गदर्शक तत्त्व नव्हतं. संकल्पना व तत्त्व यांच्या निखळ अवकाशातून हा सिद्धान्त घटितशास्त्राच्या यांत्रिकी कार्यशाळेत उतरला. शिवाय, एकंदरच त्यातील सर्व युक्तिवाद ओढूनताढून केल्यासारखा वाटतो.

त्याच वेळी परिपूर्ण स्थिर स्थितीमधील विश्व ही एक अचल वस्तू असते. त्यात कोणताही बदल होत नाही आणि त्याची उत्क्रांती होत नाही. वास्तविक सगळ्या गोष्टींना बदल चालना देत असतो. मग स्थिर स्थिती मोडण्याकरता एकतर निम-स्थिर स्थिती सिद्धान्ताचा आधार घ्यायचा की इतर काही आधार शोधायचा, हा प्रश्न निर्माण होतो.

यातून उभं राहणारं चित्र पुढीलप्रमाणेः आधीच्या घनताप्राप्त टप्प्याप्रमाणे विश्व निर्मितीच्या दिशेने जातं आणि विस्तार झाल्यावर ते सर्वसाधारण स्थिर स्थितीच्या टप्प्यात जाऊन स्थिरावतं तेव्हा निर्मिती थांबते. त्यानंतर ते उच्च ऊर्जेच्या सर्जनशील रूपात परत जाण्यासाठी शक्तिपाताच्या टप्प्यात जातं, आणि ही चक्रं अनिश्चित काळापर्यंत सुरू राहतात. या प्रक्रियेत काही अत्यंत जुने तारेही अस्तित्वात असावे लागतात. ते आधीच्या चक्रातून पार होत शक्तिपाताच्या टप्प्यातही टिकून राहतात. त्यामुळे निम-स्थिर स्थिती सिद्धान्तामध्ये विश्वाच्या सध्याच्या वयाहून (महास्फोट सिद्धान्तानुसार येणारं वय) जुन्या ताऱ्यांच्या अस्तित्वाचं भाकीतही वर्तवलं आहे. हे सुस्पष्ट भाकीत आहे, पण अजून तरी त्याची पडताळणी झालेली नाही. विश्वाहून जुना तारा खरोखरच अस्तित्वात असेल तर महास्फोटाचा सिद्धान्त फोल ठरेल. लोक निम-स्थिर स्थिती सिद्धान्त स्वीकारतील की नाही हा वेगळा मुद्दा. सिद्धान्ताने स्पष्ट भाकीत करणं आवश्यक असतं आणि त्याने निरीक्षणाच्या कसोटीला उतरणंही गरजेचं असतं. या प्राथमिक निकषावर निम स्थिर स्थिती विश्वरचना सिद्धान्त अगदी ठामपणे उभा राहतो.

हॉयल, बर्बिज व नारळीकर यांना त्यांचा दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. या परिस्थितीचं वर्णन 'नेचर'चे संपादक जॉन मेडॉक्स यांनी 'द रिटर्न ऑफ कॉस्मॉलॉजिकल क्रिएशन' या शीर्षकाच्या संपादकीय भाष्यामध्ये योग्यरीत्या केलंः "... कोणतेही कारण नसलेली महास्फोटासारखी घटना व्यापक चौकटीमध्ये आणण्याचा एक मार्ग त्यांनी (म्हणजे हॉयल, बर्बिज व नारळीकर यांनी) सुचवला, याचं तरी श्रेय त्यांना द्यायला हवं." सुमारे पाच दशकांपूर्वी स्थिर स्थिती सिद्धान्तामधील सातत्यपूर्ण निर्मितीचं समर्थन करताना हॉयल यांनी केलेल्या विधानाचेच प्रतिनिधित्व वरील उद्धृतामध्ये उमटले आहेत. या तीन प्रतिष्ठित बंडखोरांच्या प्रयत्नांची व कल्पकतेची किमान 'नेचर'च्या संपादकांनी तरी दखल घेतली. हॉयल आणि बर्बिज फार पूर्वीच आपल्यातून निघून गेले, आणि आता त्यांचा तिसरा सहकारी असणारे नारळीकरही निघून गेल्यामुळे स्थिर स्थिती सिद्धान्ताशी निगडित युगाचा अंत झाला आहे.

विज्ञानाचं समाजशास्त्र

विज्ञानाचं अंतिम विश्लेषण प्रयोग व निरीक्षण यांच्या आधारे होतं. संकल्पना आणि तत्त्वं यांच्याशी बांधील राहून मूलभूत प्रश्न मांडले जातात, आणि मग व्यापक चौकट पुरवणारं प्रारूप रचलं जातं. त्यात नवीन घटितांची व प्रश्नांची हाताळणी व मांडणी करता येते. स्थिर स्थिती सिद्धान्तासारखी कल्पना कितीही सुंदर असली तरी ती निरीक्षणांशी जुळत नसेल तर ती संपुष्टात येते. या सिद्धान्ताबाबत तेच झालं.

विज्ञानाचं नियमन निःसंदिग्धपणे संवर्धनाच्या नियमानुसार होतं. ऊर्जा, गती, इत्यादींसारख्या भौतिक गुणांच्या संवर्धनाचा संदर्भ इथे आहे. स्थिर स्थिती सिद्धान्तामध्ये शून्यातून द्रव्याची सातत्यपूर्ण निर्मिती आवश्यक ठरत होती, आणि हा मुद्दा ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम मोडणारा होता. या सिद्धान्ताचं हे सर्वांत घृणास्पद वैशिष्ट्य होतं, आणि या सिद्धान्ताला सपशेल नाकारण्यात येण्यामागेही हाच मुद्दा आहे. महास्फोटाचा सिद्धान्तसुद्धा संवर्धनाच्या नियमाचा भंग करतो, पण एकाच घटनेपुरतं एकदाच ते घडतं, आणि सदर सिद्धान्ताच्या वैधतेची मर्यादा तेवढी त्यातून सूचित होते. ते वगळता या सिद्धान्तातील इतर तत्त्वं सुसंगत आहेत. याउलट स्थिर स्थिती सिद्धान्तामध्ये संवर्धनाच्या नियमाचा सातत्याने, सर्वत्र भंग होतो आणि ते स्वीकारणं जड जातं.

हॉयल-नारळीकर यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धान्तामध्ये मॅकच्या तत्त्वाचा समावेश करण्यात आला, हे त्या सिद्धान्ताचं आकर्षक वैशिष्ट्य होतं. पण या सिद्धान्ताने स्थिर स्थिती सिद्धान्तामधील विश्वरचनेच्या मांडणीचा पुरस्कार केल्यामुळे त्यांच्या हॉयल-नारळीकर सिद्धान्ताकडेही दुर्लक्ष झालं. गुरुत्वाकर्षणाचा समावेश असलेल्या आणि उर्वरित विश्वाच्या प्रतिसादापासून नैसर्गिक फारकत घेणाऱ्या दूर अंतरावरील कृतीच्या त्यांनी मांडलेल्या सिद्धान्ताबाबतसुद्धा हेच झालं. क्वान्टम सिद्धान्ताच्या चौकटीमधील हे एक मोठं पाऊल होतं, पण त्यातही स्थिर स्थिती सिद्धान्ताच्या संदर्भामुळे स्वीकाराला खीळ बसली.

अशा पूर्णपणे असांकेतिक कल्पना मांडल्या जात नाहीत असं नाही, पण त्यांना सर्वसाधारणपणे निरीक्षणाची साथ नसते. फुगवट्याची संकल्पनाही अशीच आहे अगदी आरंभी विश्वाचा वेगाने विस्तार झाला, त्यातून त्याच्या विभिन्न भागांमध्ये कार्यकारण संबंध प्रस्थापित झाले, असं या संकल्पनेत मानलं जातं. या घटिताचं स्पष्ट आकलन व स्पष्टीकरण आपल्याकडे नाही, पण महास्फोट सिद्धान्ताच्या एकंदर परिप्रेक्ष्यात ही संकल्पना बसते आणि निरीक्षणाच्या कसोटीवरही टिकते. कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा यांच्या स्पष्टीकरणाबाबतही अत्यंत असांकेतिक कल्पना मांडल्या गेल्या आहेत. यात फॅन्टम क्षेत्राची एक कल्पना आहे ही कल्पना स्थिर स्थिती सिद्धान्तामधील ऊर्जा संवर्धनाच्या नियमाचा भंग करणाऱ्या क्षेत्राहून निराळी नाही. एकंदर परिप्रेक्ष्याशी या संकल्पना जुळत असतील तर त्या स्वीकारल्या जाऊन त्यावर आणखी काम होतं.

स्थिर स्थिती सिद्धान्तामधील निर्मितीच्या क्षेत्राचा वापर करून नारळीकरांना असं दाखवणं शक्य झालं की, आकाशगंगांच्या केंद्रस्थानी प्रचंड मोठी कृष्णविवरं निर्माण होऊ शकतात. कालांतराने डोनाल्ड लिंडन बेल व मार्टिन रीस यांनी प्रचलित द्रव्य वापरूनसुद्धा हाच शोध घेतला.

विज्ञानाचं समाजशास्त्र हे असं कार्यरत असतं. पायाभूत संवर्धनाचे नियम व कार्यकारणसंबंध यांचं पालन करणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार होतो. सक्षम घटितशास्त्र व कठोर निरीक्षण यांचा आधार असेल तर संकल्पनांना तत्त्वांच्या बाबतीत स्वातंत्र्य घ्यायची मुभा दिली जाते. काही काळाने त्यातून नवीन मर्मदृष्टी व स्पष्ट आकलन होईल, अशी आशा त्यामागे असते.

जयंत नारळीकर यांनी अल्पसंख्येत राहण्याची जोखीम पत्करूनही कायम मूलभूत प्रश्नांचा ध्यास घेतला. त्यांच्या दृष्टीकोनाशी काहींची सहमती नसेल तरीही त्यांच्याविषयी जगभर आदराची आणि आस्थेची भावना होती.

आयुका

नारळीकरांनी भारताला, एकंदरच विज्ञानाच्या क्षेत्राला आणि विशेषतः खगोलविज्ञानाला दिलेली सर्वांत मोठी भेट म्हणजे पुणे येथील आयुका ही संस्था ! विद्यापीठांमध्ये खगोलभौतिकीच्या अध्ययनाला व संशोधनाला चालना मिळावी यासाठी जागतिक दर्जाचं हे खगोलभौतिक केंद्र नारळीकरांनी उभारलं. आयुकाची संकल्पना मांडण्यापासून ही सुंदर संस्था वाढवण्यापर्यंत नारळीकरांसोबत काम करण्याचा अतुलनीय अनुभव मला मिळाला. त्यांच्या स्वप्नाची व दृष्टीची अंमलबजावणी करत असताना आपल्यालाही समान पातळीवरचा भागीदार करून घेण्याचं खास कौशल्य त्यांच्याकडे होतं. अशा प्रकारचा गुण खूपच कमी लोकांकडे असतो.

आयआयटी, कानपूरचे संस्थापक संचालक पुरुषोत्तम काशिनाथ केळकर यांचं व्यक्तिमत्त्वही असंच होतं ते त्यांच्या संस्थेमधील सुरक्षारक्षकालाही तो संस्थेसाठी किती मूल्यवान आहे याची जाणीव होईल असं वागत असत. प्रत्येक सहकाऱ्याला सर्वोत्तम कामगिरीसाठी उद्युक्त करण्यासाठी हा गुण कळीचा असतो.

1980 च्या दशकात 'एनसीआरए'चे संस्थापक-संचालक गोविंद स्वरूप यांनी 'जीएमआरटी'ची संकल्पना मांडली आणि त्यासाठी ते योग्य जागेच्या शोधात होते. पुण्याच्या अवतीभवती जागा बघत असताना मी त्यांना काही मदत करत होतो. अशा निरीक्षणात्मक सुविधाकेंद्राच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये खगोलभौतिकीच्या अध्ययनाला व संशोधनाला चालना देणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. त्यातून मग आयुका हे विद्यापीठांसाठी सामायिक सुविधाकेंद्र म्हणून उभारण्याची कल्पना पुढे आली. त्याच वेळी नारळीकर टीआयएफआरमधून बाहेर पडून काहीतरी अधिक आव्हानात्मक काम हाती घेण्याच्या प्रयत्नात होते. तर, दुसरीकडे नवीन कल्पनांसाठी व प्रकल्पांसाठी आसुसलेले यशपाल यांच्याकडे विद्यापीठ अनुदान आयोगाची धुरा होती. या अत्यंत फलदायी परिस्थितीमुळे आयुकाच्या कल्पनेला गती मिळाली आणि नारळीकरांनी तत्काळ हे आव्हान स्वीकारलं. त्यानंतरच्या गोष्टी सुंदरपणे उलगडत गेल्या. आयुकाची कथा सांगण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

आत्मगौरवाचा दोष पत्करूनही मी निःसंदिग्धपणे असं म्हणेन की, आयुका ही अग्रगण्य संशोधन संस्था आहेच, पण त्याशिवाय संस्थेचं कामकाज सहभागावर आणि लोकशाहीवर आधारलेलं कसं राखावं याचाही वस्तुपाठ या संस्थेने घालून दिला. विश्वासातून विश्वास वाढतो, या तत्त्वाला अनुसरून आयुकाचं काम चालतं. आर्थिक जबाबदाऱ्यांपासून अन्य जबाबदाऱ्या सर्व कर्मचारी वाटून घेतात आणि सर्व निर्णयप्रक्रियांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. इथे संचालकाला फारसं काही करावं लागत नाही, हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो. रवी कुलकर्णी 'एचआरआय'चे संचालक होते तेव्हा त्यांनी एकदा मला फोन केला नि विचारलं,

"नारळीकर हे प्रशासकीय बाबींमध्ये केवळ 25 टक्के वेळ खर्च करतात असं त्यांनी त्यांच्या गेल्या संचालकीय अहवालात लिहिलंय, ते खरं आहे का?" मी म्हणालो, "नारळीकर वेळेचं उत्कृष्ट नियोजन करतातच, पण मला तितकाही वेळ प्रशासकीय बाबींवर खर्च करावा लागत नाही.” जबाबदारी वाटून घेण्याची व्यवस्था इतक्या सुरळीतपणे बसवण्यात आल्यावर सगळ्या गोष्टी सहजपणे आणि विनासायास होत राहतात, त्यामुळे कोणालाच त्याचा तगादा होत नाही, याचा दाखला आयुकाच्या रूपात मिळतो. या संस्थेत पाहुण्यांची सतत ये-जा असते. वर्षभरात एक हजारांहून अधिक लोक आयुकाला भेट देतात, तरीही संस्थेतील अभ्यासक व संशोधक यांच्या कामात हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली जाते, हे लक्षणीय आहे. संस्थेला भेट देणारे सर्व लोक इथल्या आदरातिथ्याबद्दल कौतुकोद्वार काढतात, याचं श्रेय तिथल्या मदतनीस कर्मचाऱ्यांना जातं. कामाचं स्वातंत्र्य देऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला तो जे काही करतोय त्यात मनापासून गुंतवणं, हा यामागचा कळीचा मुद्दा आहे.

संस्थेच्या कामकाजात सर्वांचा सहभाग असावा आणि लोकशाही मूल्य पाळलं जावं, यावर नारळीकरांची किती निष्ठा होती, याचा आणखी एक दाखला सांगतो. अध्यापकांची भरती करताना वरिष्ठ अध्यापकांची एक छाननी समिती असते, त्यांना संबंधित उमेदवार योग्य वाटल्यास मग रेफरींकडून मत मागवलं जातं, त्यानंतर उमेदवाराचं नाव निवड समितीसमोर येतं. एकदा नारळीकरांनी एक नाव विचारार्थ सुचवलं आणि छाननी समितीची बैठक बोलावण्यासंबंधी ई-मेल पाठवली. संबंधित व्यक्ती पात्रतांची पूर्तता करत नसल्याचं आम्ही सर्व जण म्हणालो, तेव्हा नारळीकर चिडले नि त्यांनी समितीची बैठक बोलावली. आम्ही सर्वांनी आपापली मतं मांडली, ती त्यांनी शांतपणे ऐकून घेतली आणि मोठ्या मनाने आमचं मत मान्य केलं. त्यांना केवळ बैठकीमध्ये याबद्दल चर्चा व्हावी असं वाटत असल्याचं ते म्हणाले. नारळीकर स्वतःच्या उक्तीनुसार कृती करण्याबाबतीत किती सच्चे होते, याचा हा ठळक दाखला आहे. त्यांचे सहकारी त्यांच्यावर ठाम विश्वास ठेवत आणि निष्ठाही बाळगत, हे स्वाभाविकच होतं.

आयुकाचं कामकाज चांगलं चालू आहे आणि भविष्यात तिथे मोठी कामं उभी राहतील. रायपूर विद्यापीठातील एक विद्यार्थी चिलीतील वाळवंटात एटीएसीएएमए इथे जगातील सर्वांत मोठ्या टेलिस्कोपचा वापर करत असताना पाहणं, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक होतं. जगातील सर्वोत्तम खगोलशास्त्रीय सुविधा सर्वसामान्य विद्यापीठीय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध व्हाव्यात, हे स्वप्न उराशी बाळगून नारळीकरांनी आयुकाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

नारळीकरांना आदर्श मानून तरुण विद्यार्थ्यांच्या चार ते पाच पिढ्या घडल्या. 'नारळीकरांसारखे व्हा', असा आशीर्वाद आपल्या आजी-आजोबांनी दिल्याची आठवण काही प्रतिष्ठित लोकांकडूनही मी ऐकलेली आहे. आयुकाच्या स्थापनेपासून पहिली 15 वर्ष या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर नारळीकर संचालकपदावरून पायउतार झाले, तेव्हासुद्धा त्यांनी एक दाखला घालून दिला. माणसाने स्वतःच्या निर्मितीपासून नम्रतेने आणि आब राखून कसं अलिप्त व्हावं, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी ग्रंथालय आणि संगणक कक्षातील एका शांत कोपऱ्यातलं ऑफिस निवडलं. ते केवळ सकाळी साडेदहा वाजता चहा पिताना दिसायचे तेवढंच. बाकीचा वेळ ते पूर्णपणे अदृश्य असत. हाही त्यांचा गुण अनुकरणीय होता. ते 'जन्टलमन सायन्टिस्ट' होते आणि त्यांची शहाणीव अव्वल दर्जाची होती.

या माणसाने उल्लेखनीय संशोधन केलं, विज्ञानाचा संदेश व पद्धती सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी उत्साहाने काम केलं, पुस्तकं लिहिली, व्याख्यानं दिली आणि संस्था उभारली. त्याचप्रमाणे विविध समित्यांच्या माध्यमातून ते सरकारला सल्ला देण्याचं कामही करत होते. तरीही ते कधी थकलेले किंवा चिडचिडे दिसत नसत. त्यांची पत्नी मंगला यांनी त्यांना मिळवून दिलेली मनःशांती हे यामागचं गुपित होतं. त्यांची जोडी विलक्षण होता दोघेही साधे आणि मदतीसाठी सतत तत्पर असायचे. नारळीकरांना वयाच्या तिशीच्या आतच प्रचंड कौतुकाचा धनी होता आलं (त्यानंतरही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतच आला). हे कौतुक पचवून कार्यरत राहणं अवघड असतं, पण त्यांनी भारतीय परंपरेला साजेशा रितीने विनयाने वाटचाल केली. दुसऱ्या बाजूला त्यांचं व्यावसायिक काम दुरावलं जात होतं आणि त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाची पुरेशी दखल समकालीनांकडून घेतली जात नव्हती, हे पचवणंही तितकंच आव्हानात्मक होतं. पण इथेही त्यांनी स्वतःचा तोल ढळू दिला नाही, कोणाबद्दल आकस बाळगला नाही आणि आब राखून स्वतःचं काम करत राहिले. हा त्यांचा खरा मोठेपणा होता.

व्यक्तिगत पातळीवर सांगायचं तर, नारळीकरांसोबत काम करताना मला आलेला अनुभव अत्यंत मूल्यवान आणि आनंददायी होता. त्यांनी नुसतं नजरेने खुणावलं तरीही मी त्यांच्या साहाय्यासाठी पुढे जात असे. कोणाची किती दखल घेतली गेली, हे अंतिमतः महत्त्वाचं नसतं. पुरस्कार मिळोत वा निराशा पदरी पडो, शेवटी आपण कसं जगलो व कसं काम केलं ते महत्त्वाचं ठरतं. जयंत नारळीकरांचं जीवन आणि कार्य निश्चितपणे लक्षणीय होतं.

भाषांतर - प्रतिनिधी

 

20 मे 2025 रोजी, जयंत नारळीकर यांचे निधन झाले. त्यानंतरच्या अडीच महिन्यांत, त्यांच्याविषयी बरेच लेखन प्रसिद्ध झाले, ते प्रामुख्याने त्यांनी केलेले विज्ञान प्रसाराचे कार्य आणि विज्ञानविषयक लेखन या संदर्भात होते. मात्र ते ज्या सिद्धान्तामुळे जगभर प्रसिद्धीला आले तो सिद्धान्त नेमका होता तरी काय आणि त्याचे पुढे काय झाले, या संदर्भात मराठीत काहीच प्रसिद्ध झाले नाही. अर्थातच तसे लिहिणे अवघडही होते, गणिती व खगोलशास्त्रीय संज्ञा संकल्पना यांच्याशिवाय ते मांडता येणे अशक्य होते. त्यामुळे, मिलिंद बोकील यांनी असे सुचवले की, 'आयुका'चे संचालक राहिलेले भौतिक शास्त्रज्ञ नरेश दधीच यांना विनंती करावी. तशी विनंती आम्ही त्यांना केली आणि त्यांनी तो लेख इंग्रजीत लिहिला. तो शक्य तितक्या सोप्या मराठीत आणून इथे प्रसिद्ध करीत आहोत. या लेखाचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग अगदीच सुबोध आहे, मधला भाग मात्र काळजीपूर्वक वाचून, समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मूळ इंग्रजी लेख 'कर्तव्य साधना' या डिजिटल पोर्टलवर वाचता येईल.

- संपादक
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी