डिजिटल अर्काईव्ह

परवा ठाण्याचे मित्र सचिन जोशींनी फोन केला : 'तुम्ही जीतेंद्रची प्रकट मुलाखत घ्या'. मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. गेल्याच महिन्यात मी मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयाच्या सभागारात निवडक रसिकांसमोर अशोककुमार आणि बलराज साहनी या दोन दिग्गज नटांवर कार्यक्रम केला.आता जीतेंद्र ? हाय रब्बा!

मी सबब शोधू लागलो. पण सचिन जोशी ऐकेनात. जोशी राजकारणात असले तरीही दोन कारणांसाठी ते बरे वाटतात. एक, ते निवडणूक लढवत नाहीत आणि ते संगीत नि काव्याचे दर्दी आहेत.

वार्ताहर म्हणून जीतेंद्रच्या कारकिर्दीवर माझी नजर होतीच; पण मी त्याचा फॅनबिन कधीच नव्हतो. जीतेंद्र उत्तम नट आहे असं कुणीच मानत नाही; तो स्वतः सुद्धा तसा दावा करत नाही. हिंदी सिनेमाच्या लोकशाहीकरणाच्या धकाधकीत जीतेंद्रला (आणि मनोजकुमार, राजेंद्रकुमार, धर्मेंद्र वगैरे पंजाबदा पुत्तरांना) सिनेमात काम नि नाव मिळालं. तर ते ठीक आहे.

1960चं दशक संपता संपता, हिंदी सिनेमानं कात टाकली. सिनेमा रंगीत झाला. आउटडोअर शूटिंगचं स्तोम माजलं. काश्मीर, नैनीताल, डेहराडूनच्या दऱ्याखोऱ्यांत हुंदडणारा सिनेमाचा नायक दर्दभरी नि रडकी गाणी म्हणणार नाही. तो नाचेल, उड्या मारेल, गवतात लोळेल, गुलबदन नायिकेच्या अंगाशी लगट करेल. हेच करत करत शम्मी कपूर मोठा नट झाला.

शम्मीचा कित्ता जीतेंद्रने पुढे चालवला. मात्र, त्याच्यात शम्मीची ग्रेस आणि अदब नव्हती. पण तोवर ग्रेस आणि हिंदी सिनेमाचा रिश्ता भंग पावला होता. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी 1964-65 मध्ये सतरा-अठराच्या आसपासची झाली होती. तिला जीतेंद्र आपलासा वाटला. The boy next door. दिसायला कोवळा, सडपातळ, लवचीक, चटपटीत आणि जुगाडू. शम्मी मोठा डोंगर; पण आपल्याला आपल्या गावातलं टेकाडच छान वाटतं.

लोकशाहीत इंद्राच्या ऐरावतापेक्षा श्यामभट्टाची तट्टाणीच सरस ठरते.

मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्याच्या राम गणेश गडकरी सभागारात झाला. जीतेंद्रने उपस्थितांना छान सरप्राइज दिला. तो सुरेख बोलला नि निगर्वी वागला. पहिल्याच प्रश्नाला त्यानं सुरेख मराठीत उत्तर दिलं. दुसरं, त्याच्यापाशी मजकूर होता.

जीतेंद्र हा मूळचा पंजाबी पठ्ठा. पाळण्यातलं नाव रवी कपूर. जन्म मुंबईचा. बालपण मुंबईच्या गिरगावात गेलं, प्रार्थनासमाज परिसरातल्या एका चाळीत. शेजारपाजारचे सगळे मराठी नि गोव्याचे कोकणी लोक. जीतेंद्र छान मराठी बोलतो. चाळसंस्कृतीत वाढला. गणपती-गोविंदा, दिवाळी पाडवा एकत्र साजरा करण्याचा रिवाज. जीतेंद्रला भात-आमटी आवडते.

गिरगावातल्या मराठी हॉटेलांची ख्याती त्यानं सांगितली : कुलकर्णी भजीवाले, वीरकर आहार भुवन, वेलणकरांची मिसळ आणि सांडूंचा दुधी हलवा. हे ऐकून सगळे थक्कच झाले. तो मराठी बोलू लागला की, टाळ्यांचा कडकडाट सुरू. बहुतेक रसिक कधीकाळी गिरगावकर होते. 1970च्या आसपास ठाण्याला वस्तीला आले. तरीही गिरगावचा मोह मनातून जात नाही.

हा रोगट नॉस्टॅल्जिया नाही. कधीतरी पाहिलेला चांगला काळ, त्या काळातलं साधं, जिव्हाळ्यानं तुडुंब भरलेलं जगणं. अशा आठवणी स्थलांतरामुळे आणि बकाल शहरीकरणामुळे बेचैन झालेल्या मनाला दिलासा देतात.

खरं तर, जीतेंद्र आज बकिंगहॅम राजवाड्याच्या तोडीस तोड अशा टोलेजंग बंगल्यात जुहूकिनारी राहतोय. तरीही, 'प्रार्थनासमाज'च्या दोन खोल्यांच्या आठवणीनं तो हळवा झाला होता. "आमच्या घरी क्रॉम्प्टनचा पंखा लागला तर शेजारी पाहायला आले", तो म्हणाला. ही आपुलकी आज दिसत नाही.

जीतेंद्रचं हे मुलाखतीपुरतं नव्हतं. अलीकडे तो गप्पांच्या ओघात तो हमखास गिरगावच्या आठवणी काढतो नि हळवा होतो.

बलराज साहनी आपल्या आत्मचरित्रात म्हणतात की, 'सिनेमात यश मिळालं, धन मिळालं, दारात तीन गाड्या आल्या; परंतु पन्नास वर्षांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेननं प्रवास करायचो ते जुने दिवस आजही मनाला भुरळ पाडतात'.

हिंदी सिनेमा ही दुष्टांची नगरी आहे. सिनेमात यश, कीर्ती, वैभव मिळतं; पण जगण्याचा बेसिक सांधा तुटतो हे जीतेंद्रला कळलंय याचं मला राहून राहून नवल वाटत होतं.

बशीर बद्रचा एक मार्मिक शेर आहे :
'शोहरत की बुलंदी भी एक पल का तमाशा है 
जिस डाल पे बैठे हो वो टूट भी सकती है।' 
(प्रसिद्धीचं शिखर हा क्षणभराचा तमाशा आहे ज्या फांदीवर बसला आहात ती तुटूही शकते.)

जीतेंद्रच्या पहिल्या सिनेमाची गोष्ट विस्मयकारक आहे; सिनेमात शोभेल अशी.

जीतेंद्रच्या वडिलांचं नकली दागिन्यांचं दुकान होतं. वडील आणि काका मिळून दुकान चालवायचे. जीतेंद्रचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं. जेमतेम मॅट्रिक झाला. कॉलेजात टाइमपास चालायचा.

वडील म्हणाले, "दुकानात लक्ष घाल". सिनेमावाल्यांना नकली दागिन्यांची गरज असते. एके दिवशी वडिलांनी जीतेंद्रला व्ही. शांताराम यांच्या विख्यात राजकमल स्टुडिओत पिटाळलं. गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं.

खोट्या दागिन्यांचं बोचकं घेऊन जीतूभाईनं सिनेमाच्या खोट्या जगात पहिलं पाऊल ठेवलं, परळच्या 'राजकमल' स्टुडिओत. तिथं नृत्याचा सेट लागला होता. जीतेंद्र हरखून गेला. सिनेमात काम मिळालं तर बरं, असा एक विचार डोक्यात चमकला. शांतारामबापूंनी त्याला पाहिलं. कोण, कुठला वगैरे चौकशी केली. जीतेंद्र म्हणाला, "अण्णासाहेब, सिनेमात काम द्या ना".
दुसऱ्या खेपेलाही तेच.
"मी देईन ते काम करशील?" बापू.
'होय' : जीतूभाई.
'सेहरा' सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. शांतारामबापूंनी नृत्याच्या दृश्यात जीतेंद्रला उभं केलं, 'एक्स्ट्रा' मंडळींच्या कळपातला एक म्हणून. पुढच्या पिक्चरची जुळवाजुळव सुरू झाली. जीतेंद्रचा बापूंकडे सारखा तगादा : 'काम द्या मला, प्लीज'.

जीतेंद्रच्या ऑडिशनची गोष्ट भन्नाट आहे. शांतारामबापूंनी स्क्रीन टेस्टसाठी त्याला बोलावलं. राजेश खन्ना आणि जीतेंद्र हे शाळासोबती. राजेश खन्नासुद्धा गिरगावचाच. दोघे सेंट सेबॅस्टिअन शाळेत एकाच वर्गात होते. कॉलेजसुद्धा एकच. राजेश खन्ना तेव्हा हिंदी नाटकांतून छोट्या छोट्या भूमिका करू लागला होता नि त्याला सिनेमात काम करायचं होतं.

जीतेंद्रनं राजेश खन्नाला ऑडिशनचं सांगितलं. के.सी. कॉलेजच्या कँटीनमध्ये राजेश खन्नानं आपल्या मित्राची कसून तालीम घेतली. शब्दोच्चार, आवाजाची पट्टी, भावमुद्रा, वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या. एका हिंदी नाटकातले पल्लेदार संवाद पाठ करायला लावले.

ठरलेल्या दिवशी जीतूभाई चकाचक होऊन 'राजकमल'ला पोहोचला. शांतारामबापूंनी त्याच्या हाती एक कागद दिला. त्यावर संस्कृतप्रचुर हिंदीत लांबलचक संवाद लिहिलेले. बोलताना जीतूभाईची जीभ घसरून बाहेर आली. त्याला lisp होता. संवाद बोलताना वांधे झाले; पण बापूंनी सांभाळून घेतलं.

नंतर कॅमेरा नावाचं अस्वल समोर आलं. स्क्रीन टेस्ट म्हणजे जणू काय नटाचा (किंवा नटीचा) एक्स-रे. सहाय्यक दिग्दर्शक खेकसला, "पायांतले बूट काढ". पावलांचे क्लोज-अप घ्यायचे होते. जीतूभाई ओशाळतो नि बिचकत बिचकत बूट काढतो. फाटलेले मोजे पाहून सगळे हसू लागतात.

एवढ्यात, राजश्री सेटवर येते. ती त्या काळातली ख्यातनाम नटी आणि शांतारामबापूंची मुलगी. जीतेंद्रला निरखून निरखून पाहते नि वडलांना म्हणते, "काय बाबा हा कसला हिरो. याच्या नाकातले केस पहा किती वाढलेत. ते कापायला सांगा".

नाकातल्या केसानं आपला गळा कापलाय नि पिक्चर हातातून गेलंय, असं जीतेंद्रला वाटतं. पण बापूंना जीतेंद्र पसंत पडलाय. शिवाय, अस्खलित मराठी बोलतो. 'राजकमल प्रॉडक्शन'च्या 'गीत गाया पत्थरों ने' या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा हिरो म्हणून रवी कपूरची निवड होते.

ही सगळी हकिकत जीतेंद्रनं मुलाखतीत मनमोकळेपणानं सांगितली. स्वतःची फजितीदेखील सांगितली. "अण्णासाहेब (व्ही. शांताराम) यांनी मला नवा जन्म दिला. मला नाव दिलं 'जीतेंद्र'. माझ्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष केलं. मी मराठी बोलतो म्हणून मला हिरोची भूमिका दिली. मुंबई आणि मराठीमुळे मी मोठा झालो", जीतेंद्र भारावून सांगत होता.

'गीत गाया पत्थरों ने' 1964 मध्ये झळकला, ठीक ठीक चालला. पुढचा सिनेमा होता 'बूँद जो बन गए मोती'. हा सिनेमा 'राजकमल'चाच. तो आपटला. दोनेक वर्षं अशी तशी गेली. 1966 मध्ये 'फर्ज' आला आणि जीतूभाई स्टार झाला. 'मस्त बहारों का मैं आशिक मैं जो चाहे यार करूं' या गाण्यानं नव्या पिढीला पागल केलं. पहिले चौदा आठवडे 'फर्ज' रेंगाळत होता. नंतर एकदम उसळला. "अण्णासाहेबांच्या 'राजकमल'चा सुपरस्टार एकच नि तो मी", जीतेंद्र म्हणाला.

शांतारामबापूंच्या सिनेमात स्टार हिरो कधीच नसायचा. सिनेमाचा सगळा फोकस (आधी) जयश्रीबाईंवर आणि पोस्ट-जयश्रीकाळात संध्याबाईंवर. बापूंचे हिरो तुपा-पाकात घोळलेले; साधे नि भीरू : शाहू मोडक, महिपाल किंवा गोपीकृष्ण. जीतेंद्र एकदम झणझणीत मुर्ग-ए-मुसल्लम निघाला. अखेरपर्यंत बापूंना जीतेंद्रचा अभिमान वाटायचा.

'फर्ज' नंतर जीतूभाईची गाडी सुसाट सुटली. 'अनमोल मोती', 'बनफूल', 'औलाद', 'एक बेचारा', 'विश्वास', 'गुनाहों का देवता', 'परिवार', 'रूप तेरा मस्ताना', 'धरती कहे पुकार के' असे एकूण नऊ सिनेमे एका ओळीत झळकले. 'हमजोली', 'जिगरी दोस्त', 'जीने की राह' आणि 'कारवां' या चार चित्रपटांनी तर कहर केला. अभिनयाच्या नावाखाली जीतेंद्रचा धसमुसळेपणा, पोरकट नाच आणि लक्ष्मीकांत -प्यारेलाल यांची सुरेल गाणी हा फॉर्म्युला पब्लिकला भावला.

'कारवां'चं संगीत आर. डी. बर्मनचं होतं. 'कारवां'चं एकूणएक गाणं गाजलं. जीतेंद्रची मुलाखत सुरू असताना मध्ये मध्ये त्याच्या चित्रपटांतली निवडक गाणी सादर झाली. पहिलंच गाणं 'कारवां'चं होतं 'कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों का'. जीतूभाई खूश झाले. गाण्याची आठवण सांगितली.

"आउटडोअर शूटिंग होतं. त्या वेळच्या शिरस्त्याप्रमाणे लाउडस्पीकरवर गाणं लावलं होतं. मी नि आशा पारेख ओठ हलवता हलवता जोरजोरात गाऊ लागलो. आमचं गाणं रेकॉर्ड होत नव्हतं. एवढ्यात, लाउडस्पीकर अचानक बंद पडला. तेव्हा मी माझा बेसूर आवाज ऐकला. दिलासा इतकाच की, आशाचा आवाज माझ्यापेक्षा भसाडा होता."

जीतेंद्रला गाण्याची फार हौस; पण गळा नाही. एकदा रात्री गाढ झोपेतून खडबडून जागा झाला. बायकोनं विचारलं, "काय झालं?"
"स्वप्न पाहिलं."
'काय?’
"मी गातोय."
"अशी वाईट स्वप्नं पाहू नका."

संगीतकार म्हणून लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन यांच्यात निवड करायची झाली तर?

"नाही, असं नाही म्हणता येणार. आर. डी. हा कमालीचा कल्पक आणि गुणी संगीतकार यात शंका नाही; पण माझं लक्ष्मीकांत प्यारेलालशी छान ट्यूनिंग जमलं. त्यांनी मला फार सुरेख गाणी दिलीएत."

हाणामाऱ्या, पांचट विनोद आणि थिल्लर नाच करून करून जीतेंद्र वैतागला. आपली ही 'इमेज' बदलली पाहिजे, असं त्याला वाटू लागलं. ही 1970ची गोष्ट. त्याच सुमारास त्यानं राजेश खन्नाचा 'आनंद' पाहिला नि तो सर्दच झाला. राजेश खन्नाचा अभिनय तर क्लासच होता; पण गुलजारांचे संवाद किती अर्थगर्भ आणि काळजाला भिडणारे. जीतेंद्रनं गुलजारांना गळ घातली 'माझ्यासाठी दोन-तीन दर्जेदार चित्रपट करा ना'. निर्माता होता प्रसन्न कपूर, जीतेंद्रचा भाऊ.

गुलजारांनी जीतेंद्रला तीन अनमोल सिनेमे दिले : 'परिचय', 'किनारा' आणि 'खुशबू'. 'किनारा'त मिशीवाला जीतेंद्र भेटतो. तिन्ही सिनेमे उत्तम झाले; परंतु बॉक्स ऑफिस हिट नाही ठरले. लोकांना सौम्य नि डीसेंट जीतेंद्र नको होता; त्यांना 'जंपिंग जॅक' हवा होता. जीतेंद्रनं पुन्हा आपला जुना अंगरखा चढवला आणि पुढच्या पंचवीस वर्षांत सटासट दोनशे सिनेमे केले. दाक्षिणात्य निर्मात्यांकडे पायलीभर सिनेमे केले. महिन्यातले सव्वीस दिवस मद्रासला (आता चेन्नई) मुक्काम.

रेखा, श्रीदेवी आणि जयाप्रदा या त्याच्या आलटून पालटून नायिका असायच्या. कधीकधी दोन नायिका नि हीरो जीतेंद्र. "मुलं मोठी होत होती नि मी घरी नसायचो. मग शुक्रवारी बायको-मुलं फ्लाइटनं मद्रासला यायची, दोन दिवस राहायची नि रविवारी संध्याकाळी मुंबईला परत जायची".

"दक्षिणेतली कामाची पद्धत कशी वाटली ?"

"उत्तम. तिथं सगळं शिस्तीत चालतं. बी. नागेश्वर राव हा तेलुगूचा सुपरस्टार. तो बहुतेक पौराणिक सिनेमे करायचा. श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी सगळ्या शरीराला निळा रंग फासून घ्यायचा. नागेश्वर राव पहाटे तीन वाजता मेकअप करायला बसायचे. सात वाजता शूटिंग सुरू. अशी शिस्त मुंबईत नव्हती."

2005 नंतर जीतेंद्रनं आवरतं घेतलं. तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी सुरू झाल्या. खूप सैल नि बेशिस्त जगणं. अलीकडे तो संध्याकाळी चार वाजता जेवतो. दिवसा फक्त फळं खातो. डॉक्टरांनी आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळतो.

दरम्यान, काळ, सिनेमाचं तंत्र, कथेचा ढाचा हे सगळं झपाट्यानं बदलत होतं. नवे नट गाजू लागले : रणवीर कपूर, रणवीर सिंग, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी, शाहीद कपूर.

जीतेंद्रनं निवृत्ती स्वीकारली.
"आत्मचरित्र लिहिणार काय ?"
"बिलकूल नाही. आत्मचरित्र लिहायचं म्हणजे खरं खरं सांगायचं. तसं लिहिलं तर माझ्यासकट अनेकांची फजिती व्हायची. खोटं लिहायचं तर त्याला आत्मचरित्र म्हणायचं नाही."

या एप्रिलला जीतेंद्रला पंचाऐंशीवं लागेल. तसा एकदम फिट वाटला. भडक रंगाचं चकचकीत जाकिट, घट्ट पँट. पायात बूट. एकदम फिल्मी. केसाएवढी बारीक तार लावलेलं श्रवणयंत्र वापरतो. स्टेजवर त्यानं पाऊल ठेवलं नि वादकांनी त्याच्या एका लोकप्रिय गाण्याची धून सुरू केली. जीतूभाई हलक्या पावलांनी जागच्या जागी थिरकू लागला. तीच अदा, तोच जोश. लोकांनी सभागृह डोक्यावर घेतलं.

"रवी कपूर (पाळण्यातलं नाव) आणि जीतेंद्र यांच्यात निवड करायची झाल्यास कोणाची कराल?"

"रवी कपूर आहे म्हणून जीतेंद्र आहे. तो जीतेंद्रची काळजी घेतो. माणूस आपापल्या परीनं काम करत असतो, जगण्याची धडपड करत असतो. परंतु, सरतेशेवटी नशीब महत्त्वाचं. नशिबापुढे कोणाचं काहीही चालत नाही. माणसाचं कर्म त्याचा सतत पिच्छा पुरवत असतं."

जीतेंद्रला सिनेमा कळला की नाही, ते त्याचं त्याला ठाऊक; मात्र, आयुष्य समजलं.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी