माझा विजय झाला. त्याने कोणतातरी प्राणी दाखवला, तो त्याने छातीशी धरला होता. त्याचा चेहरा लांब होता आणि डोळे चमकत होते. मी पळत जाऊन तो प्राणी कजाकीच्या हातातून घेतला. ते हरणाचे पिल्लू होते. ओह! माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतरच्या आयुष्यात मी कितीतरी कठीण परीक्षा पास केल्या, चांगली पदे मिळवली, रायबहादुरदेखील झालो, पण तसा आनंद मला कधीच पुन्हा मिळाला नाही. मी त्याला छातीशी धरून घराकडे धावलो. कजाकीला यायला उशीर का झाला याची चौकशी करायलादेखील मी विसरलो. मी विचारले, "हे कुठे मिळाले कजाकी?"
माझ्या बालपणाच्या आठवणीत 'कजाकी' हा कधीही न पुसला जाणारा माणूस होता. आज चाळीस वर्षं उलटली; कजाकीची मूर्ती डोळ्यासमोर नाचते आहे. मी त्या दिवसांत आपल्या वडिलांबरोबर आजमगढमधील एका तहसीलमध्ये होतो. कजाकी हा फासेपारधी जातीचा होता. तो हसमुख, साहसी आणि जिंदादिल माणूस होता. तो दररोज संध्याकाळी पत्रांची थैली घेऊन येत असे, रात्रभर राहत असे, आणि सकाळी डाक घेऊन निघून जात असे. संध्याकाळी पुन्हा तिकडून डाक घेऊन येत असे. मी दिवसभर एका उद्विग्न अवस्थेत त्याची वाट पाहत असे. चार वाजता व्याकूळ होऊन रस्त्यावर येऊन उभा राहत असे, आणि थोड्याच वेळात कजाकी खांद्यावर सोटा घेऊन, खुळखुळा वाजवत दुरून पळत येताना दिसत असे. तो सावळ्या रंगाचा, सडसडीत बांध्याचा तरुण होता. त्याचे शरीर साच्यामधून काढल्यासारखे रेखीव होते. त्याच्या छोट्या मिश्या त्याच्या चेहऱ्यावर शोभून दिसत असत. मला पाहून तो अजून जोराने पळू लागे. त्यामुळे त्याच्या हातातीत खुळखुळा अधिक जोराने वाजू लागे. आणि माझा आनंद गगनात मावत नसे. हर्षातिरेकाने मीदेखील त्याच्या दिशेने धावू लागे. आणि एका क्षणात कजाकीचा खांदा माझे सिंहासन बनत असे. ते स्थान माझ्या अभिलाषेचा स्वर्ग होते. स्वर्गात राहणाऱ्यांनादेखील जो आनंद मिळत नसेल तो मला कजाकीच्या विशाल खांद्यावर बसून मिळत होता. जग माझ्या दृष्टीने तुच्छ होऊन जात असे. जेव्हा कजाकी मला खांद्यावर घेऊन पळत असे तेव्हा मला असे वाटत असे की, मी हवेच्या घोड्यावर बसलो आहे.
कजाकी पोस्टात पोहोचे तेव्हा घामाने भिजलेला असे; पण त्याला आराम करायची सवय नव्हती. थैली ठेवताच तो आम्हा मुलांना घेऊन मैदानात पोहोचत असे. तो कधी आमच्याबरोबर खेळत असे, एखादे विरहगीत गाऊन दाखवत असे, तर कधी एखादी कथा ऐकवत असे. त्याला चोरीच्या, मारपिटीच्या, भूतप्रेतांच्या शेकडो कथा येत असत. मी त्या कथा ऐकून विस्मयपूर्ण आनंदात मग्न होत असे; त्याच्या कथेतील चोर, डाकू खरे योद्धे असत, जे श्रीमंतांना लुटून दीनदुबळ्यांना मदत करीत असत.
2
एक दिवस कजाकीला डाक घेऊन यायला उशीर झाला. सूर्यास्त झाला पण तो दिसला नाही. मी रस्त्यावर उभे राहून दूरदूरपर्यंत पाहत राहिलो; पण ती परिचित आकृती दिसत नव्हती.
प्रकाशाच्याबरोबर माझी आशादेखील मलीन होत चालली होती. तिकडून कुणी येताना दिसले तर मी त्याला विचारी की, "कजाकी दिसला?" एक तर तो माणूस मी काय म्हटले ते ऐकत नसे किंवा फक्त मान हलवत पुढे निघून जात असे.
अचानक त्याच्या 'खुळखुळ्या'चा आवाज कानावर पडला. मला अंधारात चारही बाजूला भुतेच दिसत होती. पण खुळखुळ्याचा आवाज ऐकताच मी त्याच्या दिशेने धावलो. हो, तो कजाकीच होता. त्याला पाहताच मला राग आला. मी त्याला मारू लागलो. मग रुसून बाजूला जाऊन उभा राहिलो.
कजाकी हसून म्हणाला, "मला मारणार असशील तर मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे ती मी तुला देणार नाही."
मी साहस करून म्हणालो, "जा, नको देऊस. मी घेणारही नाही."
"आता दाखवली तर पळत येऊन मला मिठी मारशील." कजाकी म्हणाला.
"अच्छा, दाखव." मी थोडा विरघळत म्हणालो.
"तर मग येऊन माझ्या खांद्यावर बैस. आपण पळत जाऊ. आज खूप उशीर झाला आहे. बाबूजी चिडले असतील."
मी आखडून म्हटले, "पहिल्यांदा दाखव."
माझा विजय झाला. त्याने कोणतातरी प्राणी दाखवला, तो त्याने छातीशी धरला होता. त्याचा चेहरा लांब होता आणि डोळे चमकत होते.
मी पळत जाऊन तो प्राणी कजाकीच्या हातातून घेतला. ते हरणाचे पिल्लू होते. ओह! माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतरच्या आयुष्यात मी कितीतरी कठीण परीक्षा पास केल्या, चांगली पदे मिळवली, रायबहादुरदेखील झालो, पण तसा आनंद मला कधीच पुन्हा मिळाला नाही. मी त्याला छातीशी धरून घराकडे धावलो. कजाकीला यायला उशीर का झाला याची चौकशी करायलादेखील मी विसरलो.
मी विचारले, "हे कुठे मिळाले कजाकी?"
“भैया, इथून थोड्या अंतरावर एक जंगल आहे. त्या जंगलात बरीच हरणे आहेत. मला खूप वाटत असे की, मला एखादे हरणाचे पिल्लू मिळाले तर मी ते तुला देईन. आज हे पिल्लू हरणाच्या कळपाबरोबर दिसले. मी त्या कळपाच्या दिशेने पळत गेलो, तेव्हा सगळी हरणे पळून गेली. हे पिल्लूदेखील पळाले; पण मी पाठलाग करायचे सोडले नाही. हरणे खूप पुढे निघून गेली, पण हे मागे राहिले. मी याला पकडले. त्यामुळे इतका उशीर झाला."
असे बोलत बोलत आम्ही पोस्टात पोहोचलो. बाबूजींनी माझ्याकडे किंवा हरणाच्या पिल्लाकडे पाहिले नाही. त्यांचे लक्ष कजाकीकडे होते. ते नाराज होऊन म्हणाले, "आज इतका उशीर का झाला? तू आत्ता थैला घेऊन आला आहेस, त्याचे मी आता काय करू? डाक तर निघून गेली... इतका उशीर का झाला?"
कजाकीच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही.
बाबूजींच्या रागाचा पारा चढला. ते म्हणाले, "तुला कदाचित नोकरी करायची नसावी. पोट भरले की, लगेच माजलास ! जेव्हा भुकेले राहण्याची वेळ येईल तेव्हा डोळे उघडतील."
कजाकी गुपचूप उभा राहिला.
"अच्छा, थैला ठेव आणि घरची वाट धर. डाक घेऊन आला आहे, मोठा शहाणा. तुझे काहीच बिघडणार नाही, तू कुठेही मजुरी करशील. पण मला उत्तर द्यावे लागेल त्याचे काय?" बाबूजी रागात होते.
कजाकी रडवेला होऊन म्हणाला, "सरकार, यापुढे उशीर होणार नाही."
"आज का उशीर केलास त्याचे उत्तर दे."
कजाकीजवळ त्याचे काही उत्तर नव्हते. आश्चर्य म्हणजे मीदेखील गप्प बसलो. बाबूजी खूप रागीट होते. त्यांना काम करावे लागत होते
त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत होते. मी तर त्यांच्यासमोर कधी जातच नव्हतो. तेही कधी माझ्यावर प्रेम करीत नसत. ते घरात केवळ दोन तासांकरिता जेवण्यासाठी येत असत, बाकी सगळा दिवस ऑफिसात काम करीत असत. त्यांनी अनेक वेळा वरच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी एका सहकाऱ्याची मागणी केली होती, पण त्यांच्या मागणीकडे कुणी लक्ष दिले नव्हते. इतकेच नाही तर सुट्टीच्या दिवशीदेखील बाबूजी पोस्ट ऑफिसमध्येच राहत होते. केवळ आईच त्यांचा राग शांत करणे जाणत होती; पण ती ऑफिसमध्ये कशी येणार होती.
बिचारा कजाकी त्या वेळी माझ्या नजरेसमोर नोकरीतून काढला गेला. त्याची थैली, ड्रेस आणि पागोटे काढून घेतले गेले आणि त्याला पोस्ट ऑफिसमधून निघून जायला सांगण्यात आले. त्या वेळी मला असे वाटले की, जर माझ्याजवळ सोन्याची लंका असती तर मी ती कजाकीला दिली असती आणि बाबूजींना दाखवून दिले असते की, त्यांनी काढून टाकल्याने कजाकीचे काहीच नुकसान झालेले नाही. कुण्या योद्ध्याला आपल्या तलवारीचा जेवढा गर्व असतो, तितकाच गर्व कजाकीला आपल्या चपराशी या पदाच्या बिल्लयासंबंधी होता. जेव्हा तो बिल्ला सोडवू लागला तेव्हा त्याचे हात थरथर कापत होते. आणि या सगळ्या उपद्रवाचे मूळ माझ्याजवळ होते, जे माझ्या हातात तोंड लपवून बसले होते. जेव्हा कजाकी निघाला तेव्हा मी हळूहळू त्याच्या मागे निघालो. माझ्या घराच्या दारात येताच कजाकी म्हणाला, "भैया, आता घरी जा. संध्याकाळ झाली आहे."
मी गुपचूप माझे रडू दाबत होतो. कजाकी पुन्हा म्हणाला, "भैया, मी बाहेर थोडाच निघून जाणार आहे. पुन्हा येईन आणि तुला खांद्यावर बसवून उड्या मारीन. बाबूजींनी मला नोकरीवरून काढले आहे म्हणजे ते मला हेही करू देणार नाहीत असे थोडेच आहे. तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. जाऊन अम्माला सांगा की, कजाकी निघाला, त्याचे काही चुकले असले तर त्याला माफ करा."
मी पळत पळत घरी गेलो. पण अम्माला काही सांगण्याऐवजी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. अम्मा स्वयंपाकघराच्या बाहेर निघून विचारू लागली, "काय झाले बेटा ? कुणी मारले का? बाबूजी काही बोलले का? अच्छा रडू नकोस, ते घरी आले की, त्यांना विचारते. जेव्हा पाहावे तेव्हा माझ्या मुलाला मारत असतात. गप्प बस. आता तू त्यांच्याकडे कधी जाऊच नको."
मी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत म्हटले, "कजाकी..."
अम्माला वाटले की, कजाकीने मला मारले आहे. म्हणाली, "अच्छा, येऊ दे कजाकीला, तू बघशील मी त्याला उभ्या उभ्या काढून टाकते की नाही ते. चपराशी असून माझ्या मुलावर हात उचलतो म्हणजे काय? आज त्याचा बिल्लाच काढून घेते. वा!"
मी घाईघाईने म्हटले, "कजाकीने नाही मारले.
बाबूजींनी त्याला काढून टाकले. त्याची पगडी, बिल्ला सगळे काढून घेतले."
"हे तुझ्या बाबूजींनी खूप वाईट केले. तो बिचारा आपल्या कामात किती तरबेज होता. तरीही त्याला काढले?" अम्मा म्हणाली.
"आज त्याने यायला उशीर केला." मी सांगितले.
असे म्हणत मी हरणाच्या पिल्लाला खाली उतरवले. घरातून ते पळून जाण्याची भीती नव्हती. आतापर्यंत अम्माची नजर त्याच्यावर पडली नव्हती. त्याला उड्या मारताना पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने पुढे होऊन माझा हात पकडला. मला ते चावणार तर नाही ना, याची तिला भीती वाटत होती. मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो, पण अम्माचे घाबरलेपण बघून मी खळखळून हसू लागलो.
अम्मा म्हणाली, "अरे हे तर हरणाचे पिल्लू आहे. कुठे मिळाले?"
मी हरणाच्या पिल्लाचा सगळा इतिहास तिला सांगितला. "अम्मा हे इतक्या जोरात धावते की, कुणी दुसरा असता तर तो त्याला पकडू शकला नसता. कजाकी पाच-सहा तास त्याच्या मागे धावत राहिला. तेव्हा कुठे हे पिल्लू सापडले. अम्माजी कजाकीप्रमाणे या जगात कुणीच धावू शकत नाही. यामुळेच त्याला उशीर झाला. त्यासाठी बाबूजींनी त्या बिचाऱ्याला काढून टाकले. त्याचे कपडे, पगडी, बिल्ला सगळे काढून घेतले. आता तो बिचारा काय करेल? उपाशी मरेल."
"कुठे आहे कजाकी, त्याला जरा बोलावून आण." अम्मा म्हणाली.
मी म्हणालो, "बाहेर तर उभा आहे. म्हणत होता अम्माजींना मी काही उलटेसुलटे बोललो असेन तर त्यांना म्हणावे मला माफ करा." आतापर्यंत अम्मा माझ्या बोलण्याला चेष्टा समजत होती. कदाचित तिला वाटले होते की, बाबूजी कजाकीला रागावले असतील; पण माझे शेवटचे वाक्य ऐकून तिला शंका आली की, बाबूजींनी कजाकीला खरेच काढले की काय ? ती बाहेर येऊन 'कजाकी! कजाकी!' अशा हाका मारू लागली. पण कजाकीचा कुठेच पत्ता नव्हता. मीदेखील त्याला हाका मारल्या, पण तो कुठेच नव्हता.
मी खाली उतरलो आणि मी माझ्याजवळ जमलेले सगळे पैसे बरोबर घेतले. कजाकी मला भेटला. म्हणाला, "हे पैसे कुठून आणले?"
मी गर्वाने म्हटले, "माझेच आहेत ते."
"तुझी अम्मा तुला मारेल, म्हणेल कजाकीने मागितले असतील. भैया या पैशाची मिठाई घे आणि मडक्यात ठेवून दे. मी उपाशी मरणार नाही. मला दोन हात आहेत. मग मी उपाशी कसा मरेन?"
मी खूप सांगितले की, पैसे माझे आहेत, पण कजाकीने ते घेतले नाहीत. त्याने खूप वेळ मला इकडे तिकडे फिरवले, गाणी ऐकवली आणि घरी पोहोचवून तो निघून गेला. माझ्या दारात पिठाची टोपलीदेखील ठेवली.
मी घरात पाऊल ठेवलेच होते की, अम्माजीने रागावून म्हटले, "चोरा, तू पीठ घेऊन कुठे गेला होतास? आता तू चोरी करायला शिकलास? सांग, कुणाला पीठ देऊन आलास, नाहीतर तुझी चामडी सोलीन."
अम्मा रागात सिंहिणी होते. मी गडबडलो आणि म्हणालो, "कुणाला नाही दिले."
"तू पीठ काढले नाहीस? बघ किती आटा सगळ्या अंगणात पसरला आहे ते."
मी गप्प उभा होतो. ती किती धमकावत होती, चुचकारत होती, पण माझे तोंड काही उघडत नव्हते. येणाऱ्या संकटाच्या भीतीने माझा घसा कोरडा पडला होता. इतकेच नाही तर असेही म्हणायची हिंमत होत नव्हती की, "रागावतेस कशाला, पीठ तर दारात ठेवले आहे." ते पीठ उचलून आणायचेदेखील सुचत नव्हते. जणू काही करायची शक्तीच लुप्त पावली होती.
इतक्यात कजाकीने आवाज दिला, "अम्माजी, पीठ दारात ठेवले आहे. भैया, मला देण्यासाठी घेऊन आले होते."
हे ऐकताच अम्मा दाराच्या दिशेने निघाली. ती कजाकीशी काही बोलली की नाही हे मला माहिती नाही; पण अम्माजी रिकामी टोपली घेऊन घरात आली. मग कोठीमध्ये जाऊन तिने पेटीतून काहीतरी काढले आणि ती पुन्हा दाराच्या दिशेने गेली. मी बघितले की, तिची मूठ बंद होती. आता माझ्याच्याने तिथे उभे राहावले गेले नाही.
अम्माच्या मी मागे मागे गेलो. अम्माने दारात जाऊन कितीतरी वेळा हाका मारल्या; पण कजाकी निघून गेलेला होता.
मी अधीरपणे म्हणालो, "मी जाऊन त्याला शोधून आणू?" अम्माने दार बंद करीत म्हटले, "तू अंधारात कुठे जाशील ? तो आता तर इथे उभा होता. मी त्याला म्हणाले की, इथेच थांब मी येते. तेवढ्यात कुठे निघून गेला कुणास ठाऊक ? खूप संकोची आहे! आटा तर घेतच नव्हता. मी जबरदस्ती त्याला बांधून दिला. मला त्या बिचाऱ्याची खूप दया येते आहे. त्याच्या घरात काही खायला आहे की नाही कुणास ठाऊक? रुपये देणार होते, पण तो कुठे गेला तेच समजायला मार्ग नाही." मग माझ्यामध्येही हिंमत आली. मी आपल्या चोरीची सगळी कथा अम्माला सांगून टाकली. मुलांबरोबर मूल बनून आई-वडील त्यांच्यावर जितका प्रभाव टाकू शकतात, तितका प्रभाव ते पालक बनून टाकू शकत नाहीत.
अम्मा म्हणाली, "तू मला विचारले का नाहीस? मी काय कजाकीला थोडे पीठ द्यायला नको म्हटले असते?"
मी याचे उत्तर दिले नाही. मनात म्हणालो, 'या वेळी तुझ्या मनात कजाकीविषयी दया उत्पन्न झाली आहे... त्यामुळे तू त्याला काय वाट्टेल ते देऊन टाकशील. पण मी मागितले असते तर तू मला मारायला धावली असतीस...' हो, असा विचार करून मला आनंद झाला की, कजाकी आता उपाशी मरणार नाही. अम्मा त्याला रोज खायला देईल आणि तो मला खांद्यावर बसवून फिरवून आणेल.
3
दुसऱ्या दिवशी मी दिवसभर मुन्नूच्या बरोबर खेळत होतो. मी संध्याकाळी रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. पण अंधार झाला तरी कजाकीचा पत्ता नव्हता. दिवेलागण झाली, रस्त्यावर शांतता पसरली; पण कजाकी आला नाही.
मी रडत रडत घरी आलो. अम्माने विचारले, "का रडतो आहेस ? कजाकी आला नाही का?"
मी अजून जोराने रडू लागलो. अम्माने मला छातीशी घेतले. मला असे जाणवले की, तिचादेखील कंठ दाटून आला आहे. ती म्हणाली, "बेटा, गप्प बस. मी उद्या कुणाला तरी पाठवून कजाकीला बोलावून घेते."
मी रडत रडत झोपी गेलो. सकाळी जसे डोळे उघडले, मी अम्माला म्हणालो, "कजाकीला बोलावून घे."
अम्मा म्हणाली, "माणूस गेला आहे, बेटा! कजाकी येतच असेल. मी खूश होऊन खेळू लागलो. मला माहिती होते की, अम्मा जे म्हणते ते पूर्ण करते. तिने सकाळीच एका माणसाला पाठवले होते. दहा वाजता मी जेव्हा मुन्नूला घेऊन घरी आलो, तेव्हा कळले की, कजाकी त्याच्या घरी नव्हता. त्याची बायको रडत होती. तिला भीती वाटत होती की तो कोठेतरी निघून गेला असावा.
तिसऱ्या प्रहरी मी रस्त्यावर उभा होतो. अचानक मी कजाकीला गल्लीमध्ये पाहिले. हो, तो कजाकीच होता. मी त्याच्या दिशेने ओरडतच पळालो; पण गल्लीत त्याचा पत्ता नव्हता. तो कुठे गायब झाला होता कुणास ठाऊक? मी गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पाहिले; पण कुठेच कजाकीचा मागमूसदेखील नव्हता.
मी घरी जाऊन अम्माला हेच सांगितले. हे ऐकून ती चिंतेमध्ये पडली असे मला जाणवले.
त्यानंतर दोन-तीन दिवस कजाकी दिसला नाही. मीदेखील हळूहळू त्याला विसरू लागलो. लहान मुले आधी खूप प्रेम करतात, पण नंतर तितकीच निष्ठुर होतात. ज्या खेळण्यासाठी प्राण टाकतात, तेच खेळणे दोन-चार दिवसांनी आपटून फोडतात.
दहा-बारा दिवस उलटून गेले. दुपारची वेळ होती. बाबूजी जेवत होते. एक स्त्री घुंगट काढून आली आणि अंगणात उभी राहिली. तिचे कपडे फाटले होते, पण ती स्त्री रंगाने गोरी आणि सुंदर होती. तिने मला विचारले, “भैया, अम्मा कुठे आहे?"
मी तिच्या जवळ जाऊन विचारले, "तुम्ही काय विकता आहात? तुम्ही कोण आहात?"
"मी काही विकत नाहीये. तुझ्यासाठी हे कमलगट्टे आणले आहेत. भैया, तुला कमलगट्टे खूप आवडतात ना?"
मी तिच्या हातातील गाठोड्याकडे पाहून विचारले, "कुठून आणले आहेत? बघू."
"तुझ्या डाकवाल्याने पाठवले आहेत." मी उडी मारून विचारले, "कजाकीने?"
त्या स्त्रीने मान हलवत म्हटले, "हो.." आणि ती गाठोडे सोडू लागली. इतक्यात अम्मादेखील स्वयंपाकघरातून आली. तिने अम्माच्या पायांना हात लावून नमस्कार केला. अम्माने विचारले की, "तू कजाकीची घरवाली आहेस?"
त्या स्त्रीने मान खाली घातली.
"आता कजाकी काय करतो?" अम्माने विचारले.
स्त्रीने रडून सांगितले, "ज्या दिवशी तुमच्याकडून पीठ घेऊन गेले त्या दिवसापासून आजारी पडले आहेत. फक्त 'भैया, भैया' करीत आहेत. भैयाच त्यांच्या मनात बसले आहेत. 'भैया, भैया' म्हणत दाराच्या दिशेने धावतात. त्यांना काय झाले आहे कुणास ठाऊक! एक दिवस मला न सांगता घरातून निघाले आणि गल्लीत लपून भैयाकडे पाहत बसले.
जेव्हा भैयाने त्यांना पाहिले तेव्हा ते पळाले. तुमच्याकडे यायची त्यांना लाज वाटते आहे."
मी म्हणालो, “अम्मा, मी त्या दिवशी तुला सांगितले होते."
"घरात काही खायचे-प्यायचे आहे?" अम्माने त्या स्त्रीला विचारले.
"हो, अम्माजी, तुमच्या आशीर्वादाने खाण्या-पिण्याची काळजी नाहीये. आज सकाळी ते उठले आणि तलावाच्या दिशेने गेले. मी म्हणत राहिले की, बाहेर जाऊ नका, हवा लागेल, पण त्यांनी ऐकलेच नाही.
त्यांनी तलावात घुसून कमलगट्टे तोडून आणले. मला म्हणाले, "हे घेऊन जा. भैयाला देऊन ये. त्याला कमलगट्टे खूप आवडतात. त्याचे कुशल-क्षेम विचारून ये."
मी गाठोड्यातून कमलगट्टे काढून घेतले होते आणि ते मी मजेने खात होतो. अम्माने खूप डोळे वटारले, पण मला तितका धीर कुठे होता !
अम्मा तिला म्हणाली, "त्याला सांगा, इकडे सगळे कुशल मंगल आहे."
मी म्हणालो, "त्याला सांग की, भैयाने बोलावले आहे. आला नाहीस तर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही."
बाबूजी जेवण आटोपून बाहेर आले होते. टॉवेलला हात पुसत म्हणाले, "आणि सांग की, त्याला पुन्हा नोकरीवर घेतले आहे. लगेच ये. नाहीतर दुसरा माणूस घेतला जाईल."
त्या स्त्रीने आपले कापड उचलले आणि ती निघून गेली. अम्माने तिला खूप हाका मारल्या पण ती थांबली नाही. कदाचित अम्मा तिला शिधा देऊ इच्छित असावी.
अम्माने विचारले, "त्याला खरेच नोकरीवर पुन्हा घेतले?"
"मग मी काय खोटे बोलतो आहे का? मी पाचव्या दिवशीच त्याला परत घेण्यासंबंधीचा रिपोर्ट तयार केला होता."
"हे तुम्ही खूप चांगले केलेत." अम्मा म्हणाली. "त्याच्या आजारपणावर हेच औषध आहे." बाबूजी म्हणाले.
4
भल्या सकाळी मी उठलो, बघतो तर काय कजाकी काठी टेकत येत होता. तो खूप अशक्त झालेला होता. वाटले की, तो म्हातारा झाला आहे. मी त्याच्या दिशेने पळालो आणि त्याच्या कमरेला मिठी मारली. कजाकीने माझ्या गालाची पापी घेतली आणि मला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला ते जमले नाही. मग तो घोड्याप्रमाणे हाता-पायावर वाकला आणि मला पाठीवर घेऊन पोस्ट ऑफिसच्या दिशेने निघाला. मला खूप आनंद झाला होता, पण कदाचित कजाकीला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असावा.
बाबूजी म्हणाले, "कजाकी, तुला पुन्हा कामावर घेतले आहे. या पुढे कधी उशीर करू नकोस."
कजाकी रडत रडत पिताजींच्या पायावर पडला; पण दोन्ही सुखे भोगणे माझ्या नशिबात नव्हते. मुन्नू (हरणाचे पिल्लू) मिळाला, तर कजाकी दूर गेला. आता कजाकी आला तर मुन्नू हातातून निसटला. तो असा निसटला की, त्याच्या जाण्याचे दुःख मला आजदेखील वाटते आहे. मुन्नू माझ्या ताटातच जेवत होता. जोपर्यंत मी जेवायला बसत नसे तोपर्यंत तोही काही खात नसे. त्याला भात विशेष आवडे; पण त्यात जोपर्यंत खूप तूप वाढले जात नसे तोपर्यंत त्याचे समाधान होत नसे. तो माझ्याबरोबरच झोपत असे आणि माझ्याबरोबरच उठत असे.
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
'कजाकी' ही हिंदी कथा, मासिक पत्रिका 'माधुरी'मध्ये एप्रिल 1926 च्या अंकात प्रकाशित झाली.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या