डिजिटल अर्काईव्ह

बॅकवॉटरमधून जाताना चहा घेण्यासाठी किनाऱ्यावरच्या छोट्या खेड्यात थांबलो. तिथल्या चहाच्या दुकानात सगुणा नावाची आठ-दहा वर्षांची चुणूकदार पोरगी भेटली. मी सगुणाला विचारले, "सगुणा, तुला काय हवे?" सगुणा चॉकलेट, पेपरमिंट मागेल असे मला वाटले होते. मग सगुणाने माझ्या खिशातील पेनाकडे बोट केले व ती म्हणाली, "मला पेन द्या". पेन मागणारी सगुणा हे साक्षर केरळाचे प्रतीक आहे! सगुणाची गोड आठवण घेऊन मी केरळच्या भूमीचा निरोप घेतला.

 

श्रावणात गोव्यात केळीच्या हिरव्यागार चोळख्यावर रंगीत फुले वाहून सूर्यदेव रविवाराची पूजा केली जाते. केरळ अशाच केळीच्या हिरव्यागार चोळख्यावर रंगीबेरंगी फुलांमध्ये बसले आहे !

केरळची आठवण आली की मोत्यासारखे पिवळे गबे असलेले, पिक्या, पिवळ्या केळीच्या घडांनी सालंकृत झालेले केळीचे बन डोळ्यासमोर येते.

कवींना ताज्या, टवटवीत केळीत सुंदर स्त्री दिसते तर सुंदर स्त्री ही केळ आहे अशी कल्पना कवी रंगवतात.

लाल चोचीचा हिरव्या पोपटांचा थवा डोळ्यांपुढे येतो. पिवळ्या चोचीचा काळा हॉर्नविल डोळ्यापुढे येतो. निळा नारिंगी रंगाचा किंगफिशर डोळ्यापुढे येतो. माड हा केरळचा मानदंड आहे. माड कधीच एकटा नसतो. माड दाटीदाटीने उभे असतात. आकर्षक झावळे असलेले, बिनफांदीचे लांब माड कधी विशाल कोनात, कधी काटकोनात, तर कधी लघुकोनात आभाळाकडे झेप घेतात. हे माड जणू लक्ष्मण पैच्या चित्रांतून मूर्त रूप घेतात. लक्ष्मण पैच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रातील माड खरेखुरे वाटू लागतात आणि त्या तुलनेत खरे माड आभासी असतात.

केरळ ही सुगंधित, रंगीबेरंगी फुलांची रांगोळी आहे ! गर्द लाल आणि फिकट गुलाबी, अधोमुख फुलांनी गच्च भरलेली जास्वंद इथल्या प्रत्येक अंगणात असते.

आचार्य काकासाहेब कालेलकरांनी जिचे 'भुवनवेल' असे यथार्थ नामकरण केले ती पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी, लाल फुलांनी बहरलेली बोगनवेल केरळीय घराला रमणीय बनवते.

पांढऱ्या, पिवळ्या आणि तांबड्या फुलांनी पुष्पजडीत झालेला चाफा घराच्या राजांगणात असतो. 

लालेलाल, गुलकंदी फुलांचे गेंद फुललेले पळस सर्वत्र दिसतात. पळसाला Flame of the Forest (बनजवाला) हे यथार्थ नाव आहे.

गर्द गुलाबी आणि फिकट गुलाबी, तजेलदार, ताजी, टवटवीत फुले फुलणाऱ्या फुलझाडास 4 O'clock असे नाव आहे. कारण ही फुले संध्याकाळी नेमकी चार वाजता फुलतात.

ग्रीष्माचे तप्त उन्हं पिऊन सोनेरी फुलांनी भरगच्च फुललेला बहावा अमलताश (Golden Shower) परिसराला आगळेवेगळे रूपलाघव बहाल करतो. बहावा हे केरळचे राज्य फुलवृक्ष आहे.

केरळात पाणी आद्य आहे. भूमी गौण आहे. वर्षभर निवांतपणे वाहणाऱ्या नद्या, निवळशंख, आरस्पानी, वस्त्रगाळ पाण्याने ओसंडणारी बॅक वॉटर्स आणि शुभ्रधवल फेसांच्या लाटांनी नटलेला अरबी समुद्र हे केरळचे जलवैभव आहे.

केरळात प्रतिवर्षी 5 लाख 65 हजार टन केळीचे उत्पादन होते. सुमारे 65 हजार हेक्टर जमिनीत केळीचे मळे आहेत.

केरळात तब्बल 20 कोटी माड आहेत. केरळची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे. इथे दर माणसामागे सहा माड आहेत. केरळात प्रतिवर्षी 20 कोटी नारळाचे उत्पादन होते. केरळात 15 लाख टन फणस पिकतो.

केरळात चहाचे प्रतिवर्षी 60 हजार टन, कॉफीचे 35 हजार टन, रबराचे 5 लाख टन, तर ताज्या माशांचे 90 लाख टन उत्पादन होते.

देशविदेशांत कुठेही गेलो तर मी न चुकता तिथल्या फिश मार्केटला भेट देतो. केरळला 600 किलोमीटरचा अरबी समुद्र असल्याने केरळात ताज्या माशांची रेलचेल आहे. इथे माशाला मीन हा संस्कृत तत्सम शब्द आहे. केरळात करीमीन, सार्दीन, बांगडे, कोलंबी, लोबस्टर, सुरमई, पापलेट, टुना, टेड स्नेपर, वेल्लयो हे मासे मिळतात. मुडदशी, शेंवटे, काळुंदरे, खापी हे मासे मिळत नाहीत. इथल्या माशांची चव स्वादिष्ट असते. कैरीबरोबर केलेले माशांचे कालवण रुचकर असते. गोव्याप्रमाणे इथेही सुकवलेले खारे मासे मिळतात.

केरळ हा निसर्गसंपन्न, सृष्टीसमृद्ध प्रदेश आहे. हा वृक्षवेलींचा, फळाफुलांचा प्रदेश आहे. खरोखर केरळ ही देवभूमी (God's own country) आहे.

केरळ हा 'हिरवा' प्रदेश आहे. इथला समुद्र बिलोरी आहे, तर सृष्टीला 'पाचवा' महिना लागला आहे. इथे कार्तिकी चांदण्याची रैना आहे.

केरळात पर्यावरण दक्ष लोकचळवळ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. ह्या लोकचळवळीमुळेच इथल्या खोऱ्यातील शांतीवनाचा (Silent valley) विध्वंस झाला नाही.

जल, जंगल आणि जमीन खांडवांनी मानसिकतेने उद्ध्वस्त करून हिरव्या जमिनीचे निवासी वा औद्योगिक क्षेत्रात रूपांतर करण्याचे 'कृष्ण' कारस्थान गोव्यात राजरोस चालू आहे. तसे केरळात होत नाही.

खुद्द केरळचे मुख्यमंत्री पर्यावरण संवेदनशील आहेत. त्यांना ग्रीन सीएम म्हटले जाते.

केरळातील गाव व शहरे स्वच्छ आहेत. कुठेच कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत. इथे सेल्फ हेल्प ग्रुपचे सदस्य घरोघर जाऊन सेंद्रिय व असेंद्रिय कचरा गोळा करतात. गावोगाव असलेल्या विकेंद्रित प्रकल्पात सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅसचे उत्पादन केले जाते.

केरळ ही भूमीपुत्र बळीराजाची भूमी आहे. कपटीने बळीला भूमीत गाडणाऱ्या वामनाला लोक विसरले. गोव्यातील ढवळीमधल्या वामनेश्वर देवळाचा अपवाद सोडल्यास भारतात अन्यत्र कुठेच विष्णुच्या वामन अवताराचे देऊळ नाही.

बळीराजाला मात्र बहुजन विसरले नाहीत. 'बळीचे राज्य येवो' ही प्रार्थना सतत त्यांच्या ओठी असते.

राजा बळी वर्षातून दोनदा केरळाच्या भूमीला भेट देतो. एकदा भाद्रपदात दहा दिवसांसाठी आणि दुसऱ्यांदा दर अश्विनात बळी प्रतिपदेला तीन दिवसांसाठी. भाद्रपदात बळीराजाचे स्वागत करण्यासाठी ओणम उत्सव साजरा केला जातो. केरळातल्या दर घरापुढे फुलांची रांगोळी असते. कधी मोठ्या, गोल परातीत पाणी घालून त्यात फुलांची तरंगती रांगोळी केलेली असते. पिवळी, केशरी झेंडू, लाल जास्वंद, गुलाबी कमळे, पांढरा चाफा ह्या फुलांनी ही रांगोळी सजते.

अश्विनात तीन दिवसांसाठी बळीराजा केरळात येतो तेव्हा दिव्यांची दिवदिवाळी साजरी केली जाते.

मुन्नार हे केरळातील थंड हवेचे हिलस्टेशन परीकथेच्या साखरझोपेतील पहाटस्वप्न आहे !

उतारावरील गर्द हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी मुन्नारला त्याचे निजाचे सौंदर्य बहाल केले आहे.

टेकडीवरच्या विस्तृत जलाशयात बिनफांद्यांचे, बिनपानांचे, बोडके वृक्ष दिसतात. त्यांना आपल्या मृत पितरांना अर्घ्य देणारे वंशज मानले जाते.

केरळातले बॅकवॉटर नयनरम्य आहे. अलेपीला किंवा कुमारकोमला रायस बोट घ्यावी आणि ह्या बॅकवॉटरमधून निवांत सैर करावी. इथे कोणताच आवाज नसतो. कोलाहल नसतो. प्रसन्न शांती असते. शांती हा अनाहत नाद असलेला भारतीय शास्त्रीय संगीतातला अनामिक राग आहे !

केरळातील बॅकवॉटरमधील मासे खाण्यासाठी इथे हॉर्नविल, मलबार पॅराकीट, सिलोन फ्रॉगमाउथ, किंगफिशर, बारबेन, बदके, बगळे, गरूड, बुलबुल, भारद्वाज, कोकिळा, ब्राह्मिनी कायट असे 500 प्रकारचे पक्षी येतात.

उत्तर केरळला मलबार म्हणतात. मलबारमधले कोची शहर इथल्या किनाऱ्यावरील वैशिष्ट्यपूर्ण चिनी जाळ्यांनी आगळेवेगळे होऊन जाते.

व्हेनीसप्रमाणे कोचीत बिनालेचा कलामहोत्सव होतो. कोचीत केरळातले कथ्थकली लोकनृत्य व कलारी पायत्तु नावाचा तलवारीचा खेळ पाहायला मिळतो.

केरळचे राजपाटण त्रिवेंद्रमचे नामकरण आता तिरूवनंतपुरम असे झाले आहे. तिरूवनंतपुरमपासून जवळच जगविख्यात कोवालम बीच आहे. इथे तारांकित रिसोर्टस आहेत.

कन्याकुमारीला बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र ह्यांचा संगम होतो. इथल्या समुद्रात असलेल्या खडकावर स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले होते. ह्या खडकावर आता विवेकानंदांचे सुंदर मंदिर आहे.

तिरूवनंतपुरमला पद्मनाभम मंदिर आहे. शिवलेले कपडे घालून पद्मनाभम मंदिरात जाता येत नाही !

पद्मनाभम मंदिरात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ उगवले तो विष्णू.

निद्रित बुद्धाच्या शिल्पावरून शेषशायी विष्णूची संकल्पना पुढे आली. पद्मनाभम मंदिराच्या प्राकारात निळ्या पाकळ्यांची विस्तृत तळी आहे.

रात्री मंदिरात दिव्याची रोषणाई केली जाते ती पाहण्यासारखी असते. ह्या मंदिरात लुंगी नेसून व स्त्रियांनी साडी नेसून जावे लागते.

शिवणकला मुसलमानांनी भारतात आणली. त्याआधी आपण वस्त्रे पांघरत असू. शिवणकला हे इस्लामिक योगदान असल्याने भ्रष्ट मानले जाते. त्यामुळे शिवलेले कपडे अपवित्र मानले जातात.

पद्मनाभ मंदिराच्या प्राकारात ताज्या, मऊ, पांढऱ्याशुभ्र, खडीसाकरी लोण्याने माखलेला माखन मारूती आहे. सीताहरणामुळे क्रुद्ध, तप्त झालेल्या मारुतीला शीतल करण्यासाठी भागण त्याला थंड लोण्याचे सचैल स्नान घालतात.

अलाहबादला गंगेच्या किनारी लेटा मारुतीचे देऊळ आहे. देवळातला मारूती उताणा पडलेला आहे.

सोन्या मारुती, पंचमुखी मारुती, दक्षिणमुखी मारुती, वीर मारुती, प्रतापी मारुती व दास मारुती हे अन्य मारुती आपल्याला भारतात आढळतात.

अन्यत्र असलेले मारुती लाल शेंदुराने माखलेले असतात, कारण लंकादहनानंतर मारुतीचे अंग लाल झाले होते.

वास्तविक मारुती हा चाणाक्ष, बुद्धिमान दाक्षिणात्य राजकारणी आहे. राम-सुग्रीवचे, राम-विभीषणाचे राजकीय सत्य मारुतीशिवाय शक्य झाले नसते. दुर्दैवाने ह्या कर्तबगार मारुतीला राम, सीता, लक्ष्मण ह्यांच्या मूर्तीशेजारी ओणव घालून दासाच्या रूपाने बसवले आहे.

हिंदू धर्माला ही दास संस्कृती आवडते. मारुतीला रामाचा दास बनवणारी ही संस्कृती धुडकावून लावायला हवी आणि स्वयंभू, स्वाभिमानी मारुतीचा वारसा पुढे न्यायला हवा !

गुरूवायूरमध्ये श्रीकृष्णाचे देऊळ आहे. ह्या देवळात उत्सवाच्या वेळी सजवलेल्या साठ हत्तींची मिरवणूक देवाच्या रथापुढे जाते.

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, ओरिसा ह्या दक्षिणात्य भारतात मुसलमान आक्रमक पोहोचले नाहीत. त्यामुळे इथली प्राचीन देवळे सुरक्षित राहिली. ह्या भागात मुस्लीम द्वेष नसल्यामुळे हिंदुत्ववादी लोकांना उत्तर भारताप्रमाणे फारसे स्थान मिळाले नाही.

केरळची खाद्यसंस्कृती आगळी आहे. मलबरी चिकन करी, मटण स्ट्यू, फीश मौली, फीश इन रॉ मँगो करी, प्रॉन्स पोलीचे स्ट्यू (केळीच्या पानात भाजलेली मसालेदार कोलंबी), आपम, चार्मन (कोलंबी) इडियापम हे केरळी खाद्यसंस्कृतीतले प्रमुख खाद्यपदार्थ आहेत.

ओणम सणाच्या शाकाहारी थाळीत 26 वेगवेगळे शाकाहारी पदार्थ असतात. केळीच्या हिरव्यागार पानावर वाढलेली ही थाळी पाहूनच डोळे निवतात. केरळात दुधाचे दुर्भिक्ष असल्याने दुग्धजन्य मिठाई व पक्वान्ने केली जात नाहीत. नारळाच्या रसात तांदळाचे तुकडे शिजवून त्यात गूळ, तूप, काजूगर व खोबऱ्याचे तुकडे घालून केलेला गरमागरम पायसम हे केरळचे प्रमुख पक्वान आहे. आपडम आणि पापडम हे दोन पदार्थाचे पापड इथे मिळतात. खजुराचे स्वादिष्ट आंबट गोड लोणचे जेवणाची लज्जत वाढवते.

केरळात सुमारे 3 हजार हत्ती आहेत. भारतात राज्यात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात (6 हजार), त्यानंतर आसामात (4 हजार) व मग तामिळनाडूत (3 हजार) आहेत.

भारतीय संस्कृतीने आणि बौद्ध धर्माने हत्तीला समृद्धीचे प्रतीक मानले आहे. कमळस्थित लक्ष्मीवर सोंडेने जलाभिषेक करणाऱ्या दोन हत्तींच्या व गजांतलक्ष्मीच्या मूर्ती भारतात अनेक ठिकाणी आढळतात. प्राचीन काळी लोक हत्तीला घाबरत. त्यामुळे हत्तीला देव मानण्यात आले. गणपती हा ह्याच संकल्पनेचा परिपाक आहे.

होडी हे केरळचे प्रतीक आहे. इथली होडी लांबलचक असते. 'नांव' ह्या संस्कृत शब्दावरून नेव्ही हा इंग्रजी शब्द नाविक दलासाठी रुढ झाला पण द्वारकेचे कृष्ण, बलराम, छत्रपती शिवाजी महाराज व दाक्षिणात्य चोला राजे ह्यांचा अपवाद सोडल्यास भारतीय इतिहासातील अन्य राजा-महाराजांनी नाविक दलाचे महत्त्व ओळखले नाही. बालाजी बाजीराव पेशव्याने तर मूर्खपणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेले मराठ्यांचे नाविक दल बुडवले. पुढे नाविक दलाच्या बळावर पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज भारतात येऊन त्यांनी भारत काबीज केला.

ख्रिस्तानंतर पहिल्या शतकात केरळांत ख्रिश्चन आले. त्यांना सिरियन ख्रिश्चन म्हणतात. मग ज्यू आले. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने केरळच्या भूमीवर प्रथम पाय ठेवला. इथेच त्याचे निधन झाले व केरळच्या भूमीतच वास्को द गामाचे दफन करण्यात आले.

सातव्या शतकात केरळात अरब व्यापाऱ्यांनी इस्लाम आणला. इथले हिंदू स्वेच्छेने मुसलमान झाले.

आज केरळच्या लोकसंख्येत 27 टक्के मुसलमान व 18 टक्के ख्रिश्चन मिळून एकूण 45 टक्के अल्पसंख्याक आहेत. त्यामुळेच बहुसंख्यवादी भाजप केरळात मूळ धरू शकला नाही.

ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम, अरब ह्या धर्मीयांच्या खाद्यसंस्कृतीतून केरळची आगळीवेगळी खाद्यसंस्कृती बनली आहे.

इथे फणस कापून केळीच्या चोळख्यावर काही गरे ठेवून फणसाचे मायक्रो मार्केटिंग करतात.

मायक्रो मार्केटिंग हे विपणनातले महत्त्वाचे अस्त्र आहे. अपार गरिबी असलेल्या आफ्रिका खंडात गरीब माणसांना काड्यापेटी घेणे परवडत नाही. त्यामुळे आफ्रिकेत काड्यांचे मायक्रो मार्केटिंग केले जाते. भारतात कलिंगडाच्या मायक्रो मार्केटिंगमुळे अनेक कलिंगडे खपतात. अंधेरीतला एक विक्रेता 'लाल बर्फ खाओ, आई लाल बर्फ खाओ' असे म्हणून गिऱ्हाइकांचे लक्ष वेधतो व मीठ, मसाला, चाट लावलेल्या लालेलाल कलिंगडाच्या शिरा व फोडी आणि कलिंगडाचा थंडगार रस विकतो. सॅचेट्समुळे शेम्पोची विक्री अनेक पटीने वाढली. हा मायक्रो मार्केटिंगचा प्रकार आहे.

आठव्या शतकात केरळात आदि शंकराचार्याचा जन्म झाला. बौद्ध धर्मामुळे हतबल झालेल्या हिंदू धर्माला अद्वैत तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या आदि शंकराचार्यानी संजीवनी दिली. आदि शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण करून उत्तरेला काश्मीर, दक्षिणेला शृंगेरी, पश्चिमेला द्वारका व पूर्वेला जगन्नाथपुरी इथे मठ बांधले.

'ब्रह्म सत्य जगत् मिथ्या'

'ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्य आहे' असा उपदेश आदि शंकराचार्यांनी केला.

एकदा आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांसह रानातून जाताना रानटी हत्तींचा कळप त्यांना सामोरा आला. जीव वाचवण्यासाठी आदि शंकराचार्यांनी आपल्या शिष्यांसह पलायन केले. त्यानंतर एका चाणाक्ष शिष्याने आदि शंकराचार्यांना विचारले, "आचार्य, जग माया आहे तर हे हत्तीही माया आहेत. मग आपण पलायन का केले?" चिदघनचपला प्रज्ञा असलेल्या प्रज्ञावंत आदि शंकराचार्यांनी तत्काळ आपल्या शिष्याला उत्तर दिले, "गजापि माया, मया पलायनपि माया" हत्ती माया आहेत तसे माझे पलायनही माया आहे !

आदि शंकराचार्य त्यांच्या काळात फारसे लोकप्रिय नसावेत. त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले तेव्हा तिचे प्रेत स्मशानात नेण्यास कोणीच आले नाही. मग आदि शंकराचार्यांनी आपल्या आईच्या प्रेताचे तीन तुकडे केले व ते स्वतःच्या खांद्यावर घेऊन आदि शंकराचार्य एकटेच स्मशानात गेले व तिथे त्यांनी आईला भडाग्नी दिला.

आदि शंकराचार्य आणि बौद्ध पंडित मंडनमिश्रा ह्यांच्या वादांत मंडनमिश्राने आदि शंकराचार्यांचा पराभव केला. हरणाऱ्याने मृत्यूला सामोरे जावे अशी वादाची अट असल्याने वादात पराभूत झालेल्या आदि शंकराचार्यांना अल्पवयात आत्महत्या करावी लागली अशी वदंता आहे.

केरळ हा बुद्धिमान लोकांचा प्रदेश आहे. जगद्विख्यात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन केरळच्या भूमीत जन्मले.

इथल्या पालघाटचे ब्राह्मण बुद्धिमान असतात. माजी निवडणूक आयुत्त टी. एd. शेषन, व्ही.आर. कृष्ण अय्यर हे पालघाटचे ब्राह्मण आहेत. सिनेतारका विद्या बालन व संगीतकार शंकर महादेवनही इथलेच.

देशाचे संरक्षणमंत्री असताना ज्यांनी 1961 मध्ये ऑपरेशन विजयाची लष्करी मोहीम आखून गोवा स्वतंत्र केला, 1962 मध्ये चीनकडून झालेल्या लष्करी पराभवानंतर ज्यांची नाचक्की झाली व त्यांना संरक्षणमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले ते विचक्षण कृष्ण मेननही केरळचे.

केरळ कलासंपन्न आहे. 'रोजा' सिनेमाला दिलेल्या अप्रूप संगीतामुळे भारतभर ज्यांची ख्याती झाली त्या संगीतकार ए. आर. रेहमानला 'मोझार्ट ऑफ मद्रास' म्हणतात.

अदूर गोपालकृष्णन हे केरळच्या सिनेसृष्टीचे कीस्टोन आहेत.

कमला दास, वायक् महमद बशीर व एम. टी. वासुदेवत नायर हे सुप्रसिद्ध मल्याळम लेखक.

श्रीनाथ व संजू सॅमसन हे केरळात जन्मलेले भारतीय संघातले क्रिकेटपटू तर पी. टी. उषा ही इथली धावपटू.

ज्यांची लक्ष्मी, सरस्वती व गणपतीची चित्रे भारतभरच्या व्यापार पेठेत लावली जातात. ते देवांचे लोकशाहीकरण करणारे चित्रकार राजा रविवर्माही केरळचेच.

केरळात लॉरी बेकर ह्या ब्रिटिश आर्किटेक्टने गांधीवादाच्या प्रभावाने स्थानिक दगड व माती वापरून सेंद्रिय घरे बांधली.

वैशिष्ट्यपूर्ण छपरामुळे केरळातली घरे आपले लक्ष वेधून घेतात.

इस्त्रोचे अंतरिक्ष स्थानक केरळात आहे.

लक्षद्वीप बेट केरळच्या भूमीपासून 450 किलोमीटर आहे. तिथले सर्व लोक मुसलमान आहेत.

केरळात शंकर पार्वती पुत्र कार्तिकेयाला भजतात. त्याला इथे अय्यपम् म्हणतात. शबरीमलाला असलेल्या स्त्रीद्वेष्ट्या कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही.

केरळात नारायण गुरू (1856-1928) ह्यांच्या उपदेशामुळे केरळातल्या समाजात सामाजिक समता रुजली. दलितांना मंदिरात प्रवेश मिळाला.

केरळचा समाज अजूनही मातृसत्ताक कुटुंबव्यवस्थेच्या प्रभावाखाली आहे.

केरळात कोडिन्ही ह्या गावाला 'जुळ्या मुलांचा गाव' म्हणून ओळखले जाते. 460 जुळ्या मुलांच्या जोड्या आहेत. संख्याशास्त्राप्रमाणे 1 हजार प्रसूती झाल्या तर 7 जुळी मुले होतात. इथे त्याचे प्रमाण जागतिक सरासरीत सहापट म्हणजे 1 हजार प्रसूतीमागे 42 जुळी मुले असे आहे. ह्या गावांतल्या मुली दुसऱ्या गावांत लग्न करून दिल्या तर त्यांनाही बहुतांशी जुळी मुलेच होतात. इथल्या स्त्री-पुरुषांच्या गुणसूत्रांवर संशोधन करूनही हे जुळ्या मुलांचे गूढ उकलले नाही.

केरळात अनेक हॉटेलांत आयुर्वेदिक उपचार केले जातात. अभ्यंग, चूर्ण अभ्यंग, शिरोधारा, तक्रधारा, पोडी कोजी मुखलेपम हे आयुर्वेदिक उपचार इथे केले जातात. आहार शाकाहारी व संतुलम असतो. सकाळी मसाज, मग पोहणे, संध्याकाळी मसाज असा दिनक्रम असतो.

आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी केरळात असंख्य भारतीय व परदेशी पर्यटक येतात. दरवर्षी केरळात अडीज कोटी पर्यटक येतात.

साम्यवादाच्या प्रभावामुळे केरळचे औद्योगिकीकरण झाले नाही. एम. आर. एफ, व्ही. गार्ड, मुथूट फायनान्स, कीटेक्स गारमेंट ह्या अवघ्या औद्योगिक कंपन्या केरळात स्थापन झाल्या. रोजगार नसल्याने केरळातले तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर भारतात व परदेशात नोकरीसाठी स्थलांतर करतात.

केरळात सुती कापडाच्या साड्या हातमागावर विणल्या जातात. पांढरी, क्रीम, ऑफ व्हाइट रंगाची व सोनेरी काठ असलेली सुती साडी व निळ्या, गुलाबी लाल काठ असलेल्या लुंग्या हा केरळचा वेश आहे.

केरळच्या प्रवासात दोन अनुभव आले. एक कटू आणि दुसरा गोड.

टॅक्सीने जाताना एका जंक्शनवर दोन रस्ते फुटले होते. तिथल्या स्थानिक माणसाला वाट विचारली तर त्याने चक्क पन्नास रुपये मागून घेतले व पैसे मिळाल्यावरच पत्ता सांगितला.

बॅकवॉटरमधून जाताना चहा घेण्यासाठी किनाऱ्यावरच्या छोट्या खेड्यात थांबलो. तिथल्या चहाच्या दुकानात सगुणा नावाची आठ-दहा वर्षांची चुणूकदार पोरगी भेटली. मी सगुणाला विचारले, "सगुणा, तुला काय हवे ?" सगुणा चॉकलेट, पेपरमिंट मागेल असे मला वाटले होते. मग सगुणाने माझ्या खिशातील पेनाकडे बोट केले व ती म्हणाली, "मला पेन द्या". पेन मागणारी सगुणा हे साक्षर केरळाचे प्रतीक आहे !

सगुणाची गोड आठवण घेऊन मी केरळच्या भूमीचा निरोप घेतला.

विशेष टीप: केळीचा चोळखा केळीचे पान


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 64 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके