डिजिटल अर्काईव्ह

मुलाखत संपली. झकास वाटले. सी. के. प्रल्हाद नावाचे बिझनेस स्ट्रॅटेजी या विषयातील थोर तज्ज्ञ होऊन गेले. ते म्हणत की, भारतात तळागाळातील जनतेमध्ये (बॉटम ऑफ द पिरॅमिड) धंद्याची मोठीच संधी आहे. मला जाणवले की, बॉटम ऑफ द पिरॅमिड ही धंद्यातल्या कर्तृत्वाची मोठी खाणही आहे. मात्र तिथल्या हिऱ्यांना 'लक्ष्यवेध'च्या अतुल राजोळी सारख्या मंडळींनी पैलू पाडून तेजस्वी बनवायला हवे. मग कोकणातल्या अडाणी तरुणांचे, नव्हे नव्हे, महाराष्ट्रातील तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न सत्यात येईल. ते काही असो. आपण अशी आशा करू या की, येत्या काही वर्षांत भारतातील प्रत्येक छोटा कारखानदार आपल्या वीज बिलाबद्दल जागरूक राहील आणि त्यातून पैशाची मोठी बचत करेल. हे करण्याची इच्छा असेल, पण ते करावे कसे कळत नसेल, तर आहेतच आपले जयवंत गोसावी.

31 जानेवारीची संध्याकाळ. सुखद गारवा. प्रसन्न वातावरण. दिवे, चित्रे, पोस्टर्स यांनी सजलेला माटुंग्याच्या म्हैसूर असोसिएशनचा हॉल. छान छान साड्यांनी नटलेली महिला मंडळी. रुबाबात फिरणारे पुरुष. एखाद्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा माहोल. पण फलकावर लिहिले होते, 'उद्योजक स्फूर्ती सोहळा'. फारच कुतूहल वाटले.

आधी मराठी माणसांत उद्योजक विरळा. बहुतेक सगळा मावळा चाकरमानी. 'नको रे बाबा धंद्यातला धोका' अशी वृत्ती. ज्या मूठभर उद्योजकांनी उड्या घेतल्या, त्यांच्यापैकी बहुतेकांचे चेहरे वैतागलेले. कोणाला इन्कम टॅक्सचा जाच, तर कोणाला तपासणी इन्स्पेक्टरचा त्रास. कोणी उधारी वसुलीच्या चिंतेत, तर कोणी कंत्राट मिळेल ना या शंकेने व्याकूळ. अशा लोकांनासुद्धा स्फूर्ती देणारे कोणी देवदूत असतात का, अशी मनात शंका. म्हणून हा सोहळा पहिल्या रांगेत बसून बघायचे ठरवले. अगदी तीन तास लांबीच्या सिनेमासारखे.

हॉल तुडुंब भरला होता. यशस्वी कारखानदार, होतकरू उद्योजक, या सगळ्यांचे कामगार, कुटुंबीय, उद्योजकांना ट्रेनिंग आणि स्फूर्ती देणारा 'लक्ष्यवेध' संस्थेचा कर्मचारी गण, आणि माझ्यासारखे प्रेक्षक.

लक्ष्यवेध किती वेधक नाव! त्यांचे चित्र चिन्हसुद्धा तितकेच आकर्षक. नेमबाजी स्पर्धेत असते तसे एकात एक अनेक वर्तुळे असलेले 'टार्गेट', बाण त्या टार्गेटच्या केंद्रबिंदूला छेदणारच अशा खात्रीने धनुष्याची प्रत्यंचा ताणून धरलेला अर्जुन, आणि तोही सूट-बूट या आधुनिक पोशाखात. या ट्रेनर्सच्या आत्मविश्वासाला तर आपण मानले बुवा.

सोहळा म्हणजे काय? 'लक्ष्यवेध'चे प्रशिक्षण संपवून, मिळविलेल्या विद्येने आपल्या धंद्यात घसघशीत प्रगती केलेल्या वेचक मंडळींची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. कोणाची टेक्स्टाईल डिझाईन कंपनी, तर कोणाची खेळ प्रशिक्षण सेवा, कोणी इंटिरियर डिझायनर, तर कोणी वाहतूक कंत्राटदार.

प्रेझेंटेशन संपली. प्रेक्षकांना मिळाल्या मतदान चिठ्ठया. सर्वांत उत्तम प्रेझेंटेशन निवडण्यासाठी. मतमोजणी झाली. 'लक्ष्यवेध'चे मुख्य मार्गदर्शक अतुल राजोळी निकालाचे पाकीट घेऊन प्रेक्षकांसमोर आले. क्रमांक एक ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. बक्षीस घेताना जयवंत काशिनाथ गोसावी यांचा चेहरा अगदी फुलला होता. मला त्यांची काही वाक्ये आवडली 'माझा मित्र निलेश याने आयुष्यात फार चांगले काम केले. मला लक्ष्यवेधमध्ये आणून बसवले.

एका टाकाऊ माणसाचा टिकाऊ माणूस झाला.'
'मी छोट्या कारखानदारांच्या वीज बिलामध्ये बरीच घट घडवतो आणि वर्षाला कोट्यवधी रुपयांचा धंदा करतो.'
मी चकित झालो. ठरविले की या माणसाची सविस्तर मुलाखत घ्यायची. तो तयार झाला. मी पहिलाच प्रश्न विचारला, "तुम्ही इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग कोणत्या कॉलेजात शिकला ?"
तो हसून म्हणाला, "अहो, मी कॉलेजचे तोंडसुद्धा पाहिलेले नाही. मॅट्रिक झालो तेव्हा वाटत होतं की, सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाला जावे. पण त्यांची फीसुद्धा परवडण्यासारखी नव्हती. म्हणून मी आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन कोर्स शिकलो. तेच माझे शिक्षण."
"आणि हाच कोर्स का निवडला?"
"घरची परिस्थिती ओढघस्तीची होती. शाळेत शिकताना पैसे मिळविण्याची गरज सारखीच असे. मग पेपर टाक, दूध पोहोचव, असली कामे करायची. अगदी मजुरीसुद्धा. वायरमनच्या हाताखाली काम करायला आवडायचे. म्हणून तेच शिकायचे ठरवले."
"कधी शॉक वगैरे बसला का हो तुम्हाला?"

"बसला की. अधून मधून शॉक बसणारच. एकदा मोठाच लागला. खोलीत रामभाऊ सुतार रंधा मारत होते. मी वीजकाम करू लागलो की त्यांच्या छातीत धस्स व्हायचे. माझ्यासारख्या पोराला कामाला लावतात म्हणून ते तात्या वायरमनला शिव्या द्यायचे. शिडीवर चढून मी मेन स्विच उघडत होतो. रामभाऊंना राहावे ना. 'अरे जयवंत, कशाला एवढी जोखमीची कामे करतोस ? बागडायचे वय तुझे. त्या तात्याला काय होतंय काम करायला?' असे बोलत ते पुढे आले आणि माझ्याकडे बघत उभे राहिले. तेवढ्यात मला मोठा चटका बसला. त्या धयाने माझा उजवा हात उडाला आणि रामभाऊंच्या कानफटात बसली. ते आडवेच झाले. मीच त्यांना सावरले."

"मग आयटीआयमध्ये कितपत जमले?"
"अगदी उत्तम. विषय आवडत होता. कष्टाची तयारी होती. बऱ्यापैकी बुद्धी होती. आई-बापाचा आशीर्वाद होता. पहिल्या नंबराने पास झालो."
"आणि नंतर?"
"नोकऱ्या केल्या. कंत्राटे घेतली. आता ही कंपनी काढून बसलो आहे."
"तुमचा नेमका बिझनेस तरी काय आहे?"
"तशी आम्ही अनेक कामे करतो. पण आमची खासियत म्हणजे छोट्या उद्योजकांच्या वीज वापराचे व्यवस्थापन, खर्चात काटकसर करणे, बिले घटवणे."
"हे तुम्ही कसे जमवता? पूर्वी ऑटो रिक्षाचे मीटर जास्त फास्ट करून देणारे लोक असत. मग भाडे जास्त दिसत असे. तसा तुम्ही मीटर स्लो करता का?"
जयवंत गोसावी खळखळून हसले.

"मी उदाहरण सांगतो. ऐका. एका छोट्या कारखान्याला बरीच पॉवर मंजूर करून घेतली होती. पण प्रत्यक्षात वापर कमीच होता. म्हणजे ते लोक विनाकारण चढ्या दराने वीज घेत होते. त्या वेळी जास्त वीज वापराला जास्त वीज दर लागत असे. कमी पॉवर मंजूर करून घेतल्यावर 20 टक्के बचत झाली.

"एक दगडाचा क्रशर होता. त्यांच्या बिलात सुमारे 80 हजार रुपये पेनल्टी होती. कनेक्शनची नीट व्यवस्था करून ती पेनल्टी मी थांबविली.

"एका कॉलेजच्या वीज वापराचा अभ्यास करून आम्ही त्यांना अंदाज सांगितला की, तुमचे मासिक बिल रुपये 75 हजारांनी घटवता येईल. बिल कमी झाले तरच पैसे द्या."

"अहो, पण हे अपवाद असतील ना? हे सरसकट कसे लागू होईल ?"

"काय सांगू तुम्हाला ! मी 3 हजार बिलांचा अभ्यास केला. असे दिसले की, चारपैकी तीन बिलांत बचत शक्य आहे. बचत किती? पाच ते पंचवीस टक्के.

"असाच प्रकार मोठ्या वापराच्या ठिकाणीसुद्धा असतो. एका मॉलची कथा ऐका. त्यांच्या कॉमन एरियासाठी विजेचा खर्च फार होता. मंजुरीपेक्षा वापर 50 टक्के जास्त. यावर उपाय म्हणून त्यांना कोणी सल्ला दिला की, ट्रान्सफॉर्मर बदला. त्याचा खर्च होता 25 लाख.

"आम्हाला पाहणीत दिसले की, त्यांना हाय टेन्शन एच टी विजेची गरज नाही. म्हणजे ट्रान्सफॉर्मर नकोच आहे. एच टी ऐवजी एल टी कनेक्शन घेतले. ट्रान्सफार्मरचे 25 लाख वाचले. त्याची 15 फूट x 20 फूट एवढी जमीन मोकळी झाली. गैरसमजुतीने त्यांच्याकडे जनरेटर ठेवला होता. तो विकून टाकला. त्याचे अडीच लाख रुपये मिळाले. 40 चौरस फूट जागा मिळाली. खरी अडचण होती ती एअर चिलर्स. ते नीट काम करत नव्हते. म्हणून बदलायला सांगितले. अखेर वीज बिल 11 लाखांवरून 6 लाखांवर आले.

"माथेरानच्या एका मोठ्या हॉटेलच्या वीज वापराचा अभ्यास आम्ही केला. त्यांना विजेबद्दल अनेक अडचणी होत्या. तेथे आम्ही शिफारस केली की एल टी ऐवजी एच टी वीज घेतली पाहिजे.

"तर असा आमच्या कामाचा आवाका आहे. आता मुंबई-ठाणे-डोंबिवली-अंबरनाथ या टापूतील हजारो छोट्या उद्योजकांकडे जाऊन त्यांच्या वीज वापरात काटकसर करून दाखवण्याची इच्छा आहे."

मला वाटले, किती छान आहे हा प्रकार ! वीज बिल हटवण्यात कोणाला रस नाही? शिवाय सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत करायच्या. विन-विन कल्पना म्हणतात ती अशी.

प्रश्न हा की पुढच्या प्रवासाची दिशा कोणती ?

आजवरच्या यशामुळे जयवंत गोसावी यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. एवढ्यात त्यांनी एका मोठ्या कामाची बोली लावली आहे. काम म्हणजे तयार होत असलेल्या एका नव्या कारखान्याचे सर्व इलेक्ट्रिकल अंग सांभाळणे. बोली आहे तीन कोटी रुपये.

"आता मला शंका अशी की तुमच्याजवळ कौशल्य आहे, धंदा आहे, मग 'लक्ष्यवेध' च्या प्रशिक्षणाची गरज काय?"

"याचे उत्तर माझ्या कुटुंबाच्या इतिहासात आहे. तुम्ही माझ्या आई-वडिलांशी बोलणार का?"

मी अर्थातच होकार दिला. आनंदाची गोष्ट म्हणजे वडील पटकन बोलते झाले. त्यांनी जणू मला निवेदन दिले.

"माझे नाव काशिनाथ सखाराम गोसावी. वय 85. मूळ गाव मालवणजवळ चिंदर-सडेवाडी. आम्ही नाथपंथी गोसावी. सडेवाडी म्हणजे चिंदर गावाजवळ चाळीस गोसावी कुटुंबांची वस्ती. काही नाथपंथी मंडळी गावोगाव फिरून उपदेश करून पोट भरणारे. आमची वस्ती शेतकऱ्यांची. माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी वडील वारले. शेती होती, बैल होते. पण करणारा हात नाही. माझ्या मायने कष्ट करून काही वर्षे संसार रेटला. पण मी सोळा वर्षांचा झालो तेव्हा माझ्या हातात आठ रुपये किमतीचे मालवण-मुंबई बोटीचे तिकीट दिले आणि सांगितले की, 'बाळा, मुंबईला जा, कष्ट कर, पोट भर.' वर्ष 1950. गावातल्या कोणाच्या ओळखीने मी भाऊच्या धयावरून थेट 'लक्ष्मी विलास भुवन' या हॉटेलात कामगार म्हणून दाखल झालो. भायखळाहून भाजी आणणे, मशीद बंदरहून दूध आणणे, पडेल ती कामे करणे. गिऱ्हाईक संपल्यावर तेथेच पथारी पसरणे. महिना अखेर 12 रुपये पगार मिळाला की 10 रुपये आईला पाठवून द्यावेत. असा क्रम पाच वर्षे चालला. मग नशीब फळफळले.

"नरसिंह मिलमध्ये 100 रुपयांची नोकरी लागली. मालवण जवळच्या पेंडुरकट्ट्याची सत्यभामा बायको म्हणून लाभली. म्हाडाच्या सोडतीत नंबर लागला आणि विक्रोळीला कन्नमवार नगर येथे खोली मिळाली. मग जयवंत जन्माला आला. आमच्यात बाकी वेगळा रिवाज नाही. पण मृत्यूनंतर दहन नव्हे तर दफन करतात. मांडी घालून बसल्या अवस्थेत. लिंगायत लोकांप्रमाणेच. शिक्षणाकडे कल आहे. पण जयवंतच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत उरली नव्हती. त्याने एकट्याने सर्व निभावले.

"आमच्याकडे शिक्षण नाही. पण आम्ही त्याला प्रेम दिले. सचोटी शिकवली. भलेपणाचे मोल समजावले. तसा तो कन्नमवार नगरातल्या गुंड पोरांबरोबर दोस्ती करून असायचा. थोडा बहुत मारामाऱ्यासुद्धा करायचा. साधारणपणे 'ठकासी महाठक' अशा रितीने."

या बोलण्याने माझे वेगळेच कुतूहल जागे झाले. मी जयवंतरावांना विचारले, "तुम्हाला ठक कोठे भेटले आणि तुम्ही महाठक कसे बनवतात?"

"अहो, व्यवहारी जगात असे अनेक प्रसंग यायचे. अगदी छोटी चिमुकली कंत्राटे मिळवून बिझनेसमन होण्याची पहिली पावले टाकत होतो तेव्हाची गोष्ट. प्रथम रुबाबात लेटरहेड छापून घेतलं 'जयंत इलेक्ट्रिकल्स'. तुम्ही विचाराल जयंत का? तर कोणीच मला धडपणे जयवंत म्हणत नसे. सगळे जयंत अशीच हाक मारत. म्हणून.

"रुबाब कितीही केला तरी धंद्याच्या आडवाटा ठाऊक नव्हत्या. सन 1998. ट्रेडिंग कॉर्पोरेशन या बड्या कंपनीत ट्रान्सफॉर्मर तपासणीचे 11 हजारांचे छोटे कंत्राट मिळाले. जरूर ती हत्यारेसुद्धा जवळ नव्हती. उसनी घेऊन कामाला गेलो. तर लोक म्हणू लागले की, 'अरे, तू या भानगडीत कशाला पडलास ? ही एका भाईची टेरिटरी आहे. भलत्याना कंत्राट घ्यायला बंदी आहे.'

"मी काम सुरू ठेवले. तर घरी फोनवर धमक्या येऊ लागल्या. म्हटले याला तोंड द्यायलाच पाहिजे. मिळालेले काम सोडू लागलो तर कसा होणार मी बिझनेसमन ? म्हणून कन्नमवार नगरातील चार पोरं गोळा केली आणि त्या भाईला 'भेटायला' गेलो. तो दिसल्यावर माझा चेहरा पडला. कारण तो फारच किरकोळ होता. त्याला तर मी एकट्याने पटवला असता. आता चार पोरांना बरोबर आणले म्हणजे विनाकारण खिशाला खड्डा पडणार.

"हा एक अनुभव.

"मी बीईएसटीमध्ये 18 वर्षे नोकरी केली. जायचे होते ते इलेक्ट्रिक सप्लाय खात्यात. पण प्रवेश मिळाला इमारत खात्यात. वाट पाहत राहिलो. एक दिवस बातमी आली की, सप्लाय खात्यातून सहा लोक गैरव्यवहाराबद्दल डिसमिस झाले. असे हे खाते. त्यापैकी एका जागेवर मी रुजू झालो.

"इथले काम म्हणजे गिऱ्हाइकांच्या तक्रारींबद्दल पाहणी करणे. या कामाला सर्व जण नाखूश. त्यात अपघाताने कोणी मेले असेल तेथे जाण्याला सगळे घाबरत. माणसे गर्दी करून अंगावर येत. उलट मीटर मंजुरीची विजिट करायला सगळे एका पायावर तयार. त्यातला एक मोठा घोटाळा म्हणजे तेच गिऱ्हाईक नव्या नावाने आणणे. नवीन कनेक्शन मागण्यामागे कारण म्हणजे प्रचंड थकबाकी. तिच्यामुळेच जुने कनेक्शन तोडलेले असे.

"माहीमच्या रेती बंदरवरची एक केस होती. त्याची 2 लाख 30 हजार बाकी. तो म्हणे नवेच कनेक्शन द्या. फार कडक वागलो तर खात्यातून बदली करतील ही भीती पोटात होतीच. रिपोर्ट लिहिला मागणी मंजूर करावी (सर्व नियमांच्या अधीन राहून).

"एक दिवस कामावर आलो तर दोन केसेस होत्या. एका बड्या हॉटेलला आग लागली होती. तेथे जायला सगळे उत्सुक होते. दुसरी केस होती अँटॉप हीलजवळ एका घरी शॉक लागून दोन बायका इस्पितळात गेल्या होत्या. ती केस माझ्याकडे आली. साईटवर रात्री पोहोचलो. घर मालक मलाच खूप शिव्या देऊ लागला. तपासणीत लक्षात आले की, घरातले पंख्याचे बटन ऑन केले की शॉक येतो. पंख्याला लिक होते. त्यातून छताच्या लोखंडी तुळयामध्ये आणि शेवटी बाहेरच्या खांबापर्यंत शॉक येत होता. मी या घराची वीज तोडली. बाकीच्यांची जोडली. त्यांचे दिवे लागले. सगळ्या जमावाला बरोबर घेऊन घरात शिरलो. त्यांना दाखविले की या पंख्यामुळे शॉक येतो. लोकांचा बीईएसटीवरचा राग गेला. मालक म्हणे, 'हा पंखा माझा नाही. माझा पंखा दुरुस्तीला गेला म्हणून त्यांनी हा तात्पुरता दिला आहे.' मी म्हटले, 'तुझे तू बघून घे. घरातले वायरिंग निर्दोष झाले असे प्रमाणपत्र आणशील, तेव्हा पुन्हा मी वीज पुरवठा सुरू करीन.' मग तो रखडला."

"ठीक आहे. आपण पुन्हा आता 'लक्ष्यवेध' वर्गात झालेल्या फायद्याकडे वळू या."

"सांगतो. फायदा मिळण्याचे प्रकार दोन. एक म्हणजे धंद्यातील एखाद्या विशिष्ट बाबींमध्ये. समजा एच आर. अतुल सरांनी मला विचारले की, 'एक तरी कारण सांग ज्यासाठी गुणी लोकांनी तुझ्या कंपनीत नोकरी स्वीकारावी. ना तुझे ऑफिस, ना भपका, ना नोकरी टिकण्याचा भरवसा.'

"मला अगदी मुस्काटात मारल्यासारखे झाले. मग मी एक ऑफिस थाटले. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली. तिचे नाव अर्थपूर्ण असावे असा आग्रह धरला तोसुद्धा लक्ष्यवेधनेच. मी ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड हे नाव धारण केले. ऊर्जा विजय ऊर्जय असा नवाच शब्द घडवून लक्ष्यवेधने माझ्या वाडग्यात ठेवला.

"फायदा दुसरा. हा बाकी सगळ्यांपेक्षा फारच महत्त्वाचा. त्यांनी मला आत्मविश्वास दिला."

"कमाल आहे, मला आश्चर्य वाटले. इतकी कामे करून, नोकऱ्या करून, कंत्राटे करूनसुद्धा आत्मविश्वास नव्हता?"

"तसे नाही हो. आत्मविश्वास होता. पण कुठे? तर गाव खात्यातील कामे आणि गाव खात्यातील माणसे यांच्यामध्ये. सुटा-बुटातली माणसे आणि चकाचक ऑफिसे दिसली की जीव कावराबावरा व्हायचा. एकदा कोणी मला लोअर परेलच्या लोखंडवालामध्ये काम घ्यायला पाठवले. तिथला श्रीमंती थाट पाहून मी पळूनच आलो.

"अतुल सरांनी मला गृहपाठ काय दिला माहीत आहे? ब्लेझर घालून ताज हॉटेलमध्ये खाऊन-पिऊन यायचे. मी घाबरून सबबी काढू लागलो. माझ्याकडे ब्लेझर नाही. (मग मित्राचा उसना घे) आज वेळ झाला नाही. आज प्रकृती बरी नाही.

"शेवटी अतुल सरांनी धमकावले, 'शनिवारपर्यंत गृहपाठ पुरा झाला नाही तर रविवारी वर्गाला येऊ नको.'

"मग नाइलाज झाला. 8 हजार रुपये रोख खिशात ठेवले. कमी पडू नयेत. ब्लेझर कोट घातला. टॅक्सीने निघालो. सारखे वाटे की, टॅक्सी ड्रायव्हर आरशातून आपल्याला न्याहाळतो आहे. 'कोण हा कोकण्या माठ्या निघालाय ताज हॉटेलकडे?' अशा नजरेने. ताजच्या दाराते मला सोडले. आणि निघून गेला. हा माझा शेवटचा आधार. आता मला कोणी नाही. समोर ताजच्या प्रवेशद्वारावर तो धिप्पाड सरदारजी दरवान त्याच्या नखरेबाज युनिफॉर्ममध्ये. अखेर जिवाच्या कराराने पुढे झालो. त्याने मला सलाम केला. आत गेलो. त्या वेटर्सचे कपडे साधारण माझ्यासारखेच होते. मग हॉलमध्ये चक्कर मारली. पडलेली मासिके चाळली. एक वेटर तत्परतेने माझ्यापाशी आला. मी त्याला ऑर्डर दिली. एक व्हेज सँडविच आणि फालुदा. ते बिल लॅमिनेट करून माझ्या फाईलमध्ये लावून ठेवले सर.

"एकदा भीड चेपल्यावर मग काय, चौफेर टोलेबाजी सुरू केली.

"एका बड्या कंपनीतल्या बड्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बसायला सांगितले. पाहतो तर तिथे एक क्रिकेटची बॅट होती. आम्ही पोरे क्रिकेट खेळायचो, पण टेनिस बॉलने. लेदर बॉलने खेळणे खूप खर्चाचे. लेदर बॉल प्रथम हातात घेतला तो गरवारे पेंट कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून होतो तेव्हा. त्यामुळे साहेबांची बॅट लेदर बॉलने खेळण्याची आहे हे मला कळले. म्हणून साहेब आल्यावर त्यांना विचारलं, 'तुम्ही लेदर बॉलने क्रिकेट खेळता का?' ते खुलले. त्यांनी विचारले, 'तू खेळतोस का आणि कुठे ?' मी पत्ता सांगितल्यावर त्यांनी मला एका खेळाडूचे नाव सांगितले. म्हणाले, 'याला ओळखतोस का?' 'हो' मी म्हणालो, 'हा तर आमच्या रोजच्या बैठकीतला!'

"साहेबनी सरळ त्या माणसाला फोन लावला. 'अरे, माझ्यासमोर जयवंत गोसावी बसला आहे.' फोनवर हात ठेवून साहेब मला म्हणाले, 'अरे, तो तुला ओळखत नाही.' मी म्हणालो, 'जरा तो फोन माझ्या हाती द्या.' त्या मित्राला सांगितले, 'अरे, मी बाबू बोलतो आहे.' मग तो मोठ्याने हसला. म्हणाला, 'मला तुझं ऑफिशियल नाव माहीतच नाही रे बाबा.' असा सगळा मिलाप झाला. माझे काम झाले.

"एकदा कसल्या तरी लायसन्ससाठी माझा अर्ज पीडब्ल्यूडी मध्ये पडून होता. मी सूट-बूट घालून चीफ इंजिनियरच्या ऑफिसात गेलो. त्यांना भेटण्याबद्दल विचारले. काय काम आहे वगैरे चौकशी झाली. साहेब ऑफिसात नव्हते. मी सांगितले की, माझ्या भावाचा कागद कुठे आढळला आहे ते पहा. मग खालच्या ऑफिसमधून फोन आला, 'तुम्ही वरच्या ऑफिसमध्ये का गेला? आम्ही चार दिवसांत पूर्तता करणारच होतो.'

"हा आणखी एक अनुभव.

"तात्पर्य लक्ष्यवेधने दिशा दाखवली. क्षितिज रुंदावले. येत्या 10 वर्षांत मी वर्षाला 100 कोटींचा धंदा करणार."

मुलाखत संपली. झकास वाटले. सी. के. प्रल्हाद नावाचे बिझनेस स्ट्रॅटेजी या विषयातील थोर तज्ज्ञ होऊन गेले. ते म्हणत की, भारतात तळागाळातील जनतेमध्ये (बॉटम ऑफ द पिरॅमिड) धंद्याची मोठीच संधी आहे.

मला जाणवले की, बॉटम ऑफ द पिरॅमिड ही धंद्यातल्या कर्तृत्वाची मोठी खाणही आहे. मात्र तिथल्या हिऱ्यांना लक्ष्यवेधच्या अतुल राजोळी सारख्या मंडळींनी पैलू पाडून तेजस्वी बनवायला हवे. मग कोकणातल्या अडाणी तरुणांचे, नव्हे नव्हे, महाराष्ट्रातील तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न सत्यात येईल.

ते काही असो. आपण अशी आशा करू या की, येत्या काही वर्षांत भारतातील प्रत्येक छोटा कारखानदार आपल्या वीज बिलाबद्दल जागरूक राहील आणि त्यातून पैशाची मोठी बचत करेल. हे करण्याची इच्छा असेल, पण ते करावे कसे कळत नसेल, तर आहेतच आपले जयवंत गोसावी.


जयवंत गोसावी : 9869156035 
urjayelectrical.com
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी