लिमये बंदीवान होते. परंतु त्यांचे धैर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याकांक्षा अतूट होती. परिणामांची तमा न बाळगता त्यांनी न्या. यशवंत चंद्रचूड आणि न्या. भगवतींना पत्र लिहिले. त्यात 1932 साली गोलमेज परिषदेपुढे महात्मा गांधींनी सर्वोच्च न्यायलयाबद्दलची आपली जी संकल्पना मांडली होती ती विशद केली. गांधी म्हणाले होते, 'अशी कोणतीही अन्यायकारक गोष्ट नाही की ज्यावर न्यायालयाकडे उत्तर नाही.' ट्रान्सवालमधील एका कायदेपंडिताने गांधींना सांगितले होते की "जर एखादा न्यायाधीश अशी सबब सांगू धजला तर त्याला ताबडतोब पदावरून दूर करायला हवे." न्या. चंद्रचूड आणि न्या. भगवती या दोघांना तुरुंगातून हे खरे आणि कटू बोल सुनावण्याचे धैर्य लिमयेच दाखवू शकत होते.
त्या वेळच्या प्रथेप्रमाणे मधु लिमयांची 1932 साली म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी मुंज झाली. पण संध्या करणे, जानवे घालणे वगैरे कर्मकांडांना त्यांनी लहान वयातच फाटा दिला. "धार्मिक कर्मकांड म्हणजे मला शुद्ध जुलूम वाटे," असे ते स्पष्टपणे लिहितात. त्यांच्या बालवयात झालेला आणखी एक संस्कार म्हणजे गांधीप्रणीत सत्याग्रहाचा. त्यातून "उदात्त भावनांना आवाहन करणारे राष्ट्रीय लढ्याचे चित्र त्यांना दिसले आणि देशसेवक व सेविकांच्या धीरोदत्त त्यागाचे दर्शनही झाले." हिंदू आणि मुसलमानांमध्ये होणारे दंगेही त्यांनी पाहिले आणि जमातवादी राजकारणाविषयी, त्याच्या हिंसक आविष्काराविषयी त्यांच्या मनात जन्मभराचा तिटकारा निर्माण झाला.
त्यांना लहान वयातच स्वतःच्या बळावर ज्ञान संपादन करण्याची सवय लागली. इतिहास वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे आयुष्यभर त्यांनी अनेक देश आणि संस्कृतींच्या इतिहासाचा व्यासंग केला. पुण्याचे नगरवाचन मंदिर हे त्यांच्या बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे एक विद्यापीठ ठरले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, न. चिं. केळकर, वि.का.राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे यांचे वैचारिक साहित्य, ना. सी. फडके, वि.स. खांडेकर, ग.त्र्यं. माडखोलकर यांचे ललित लेखन, वामन मल्हार जोशींच्या कादंबऱ्या, आचार्य अत्र्यांची साहित्यसंपदा, पु.ल. देशपांडेंच्या कादंबऱ्या, हरि नारायण आपटे आणि भा.वि. वरेरकरांचे साहित्य असे विविधांगी वाचन करून ते बहुश्रुत बनू लागले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे वाचनाचे त्यांच्यावर चिरस्थायी परिणाम झाले. "एक म्हणजे देशभक्तीच्या राष्ट्रीयतेच्या भावनेने माझ्या मनात अंकुर धरला, त्याचे पोषण केले. दुसरा म्हणजे दुष्ट सामाजिक चालीरिती, जुनाट परंपरागत विचार, दलित शोषितांचे दैन्य वाढविणारी प्रस्थापित समाजव्यवस्था याविरुद्ध लोकनिंदेची पर्वा न करता लढणारे नेते मला परमपूजनीय वाटू लागले." आत्मकथेमध्ये ते पुढे असेही म्हणतात की, माझ्या बाबतीत आधुनिक मराठी साहित्य हे 'वाघिणीचे दूध'च नव्हे तर 'बंडखोरीची नशा चढविणारी मदिरा'च ठरले.
महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी टिळक पंथीयांकडून 'नेमस्त पंथीय' म्हणून हिणवले जात. परंतु तेही कुठल्या तरी एका क्षेत्राला धरून समर्पणाच्या भावनेने कार्य करत याकडे लिमयांनी लक्ष वेधले आहे. गोखलेपंथीयांचे नेमस्त राजकारण जरी आपल्याला रूचले नाही तरी, ते सच्चे देशभक्त असल्याचा निर्वाळा लिमये देतात.
1935च्या ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या फेडरेशनच्या योजनेचा अभ्यास करण्याची संधी लिमयेंना इंटरच्या वर्गात असताना मिळाली. त्यांचे इतिहासाचे प्राध्यापक केळावाला यांनी या विषयावर एक प्रबंध लिहायला सांगितले. त्या निमित्ताने ते पुण्यातल्या अनेक राजकीय नेत्यांना भेटले. त्यापैकी एक होते एस. एम. जोशी.
एसेम यांच्या पारदर्शक आणि निर्मळ व्यक्तिमत्वाचा लिमयांवर चांगलाच प्रभाव पडला त्यांचे जीवनही स्फूर्तिप्रद वाटले. इतिहास आणि हिंदुस्थानची शासनव्यवस्था यांचे अध्ययन यामुळे लिमयांची राष्ट्रीय वृत्ती तसेच देशप्रेमाची भावना युवावस्थेतच जागृत झाली होती. आणि एसेमच्या संस्कारांमुळे आणि समानधर्मी मित्रवर्तुळामुळे सार्वजनिक जीवनाविषयी ओढ आणि आस्था निर्माण झाली. त्यातूनच ते स्वातंत्र्य आंदोलन आणि समाजवादी चळवळीकडे ओढले गेले. अत्यंत तारुण्यावस्थेत असताना मार्क्स आणि एंगल्सच्या 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' मुळे आपले डोळे कसे दिपून गेले आणि आपल्याला जणू दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यासारखे वाटले, हेही त्यांनी प्रांजळपणे लिहिले आहे. इतिहासाबद्दलचे मार्क्सचे म्हणणे एकांगी आणि अतिरंजित असल्याचे पुढे अर्थात लक्षात आल्यावाचून राहिले नाही. पण भारतातल्या लोकशाही समाजवाद्यांनी मार्क्स/एंगल्सचा चिकित्सकपणे अभ्यास केला होता, हे यावरून लक्षात येते. एसेम जोशींनी शिक्षक, मित्र, वडील भाऊ, माता अशा सर्व भूमिका आपल्या बाबतीत पार पाडल्या असल्याचे ते कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.
आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, युसूफ मेहर अली, अशोक मेहता, अच्युतराव पटवर्धन इत्यादी समाजवादी चळवळीच्या संस्थापकांची विलोभनीय व्यक्तिचित्रणे या आत्मकथेत वाचायला मिळतात. मार्क्सवादी असणाऱ्या नरेंद्र देव यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता ही गोष्ट गंमतीदार वाटते. जयप्रकाश हे अमेरिकेत शिक्षणासाठी गेले असताना मार्क्सवादाच्या प्रभावाखाली आले. आणि प्रसंगी सशस्त्र लढा उभारूनही स्वातंत्र्य मिळविण्याची त्यांची तयारी होती. लोहियांचे संभाषणपटुत्व, बुदधीची झेप आणि फकिरी वृती याविषयी लिमये आपुलकीने लिहितात. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस पक्षाच्या परराष्ट्र विभागाची जबाबदारी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी लोहियांवर सोपविली होती, हे लिमये अधोरेखित करतात. अशोक मेहता हे मुळात बरेचसे माणूसघाण्या आणि तुसड्या वृतीचे होते आणि नंतर म्हणजे 1942 च्या आंदोलनानंतर ते बदलले याचा उल्लेख लिमये करत. लोहिया आणि अशोक मेहता यांची दोस्ती होती आणि लोहिया मुंबईत आले की अशोक मेहतांकडे राहत असत. अशोक मेहतांनी 1950 च्या दशकात मुंबईत पक्षाची उभारणी केली आणि पुढे ते काँग्रेसधार्जिणे झाले या नंतरच्या घटना लक्षात घेता, ही गोष्ट अजब वाटते. युसुफ मेहर अलींच्या स्वभावातला मैत्रभाव आणि गोडवा लिमयांच्या कायम स्मरणात राहिला. आपण धुळ्याच्या तुरुंगात वयाच्या अठराव्या वर्षी बंदीवान झालो तेव्हा मेहरअलींनी कोणती पुस्तके वाचायला पाठवली होती, यांची नावेही लिमयांना आठवतात. अच्युतराव पटवर्धनांबरोबरच्या वैचारिक चर्चाचा उल्लेखही या आत्मकथेत आला आहे.
सोविएत युनियन आणि तिथली स्टॅलिनची क्रूर आणि पाशवी हुकूमशाही याबाबत लिमये पहिल्यापासून सजग होते. क्रांतीच्या पर्वातील आपल्या एकेक सहकाऱ्याला स्टॅलिनने वेचून काढले आणि यमसदनास धाडले. त्या वेळच्या काँग्रेस सोशलिस्ट पक्षात लोहिया आणि मिनू मसानी हे ज्येष्ठ नेते आणि लिमये व विनायकराव कुलकर्णीसारखे तेव्हा तरुण असलेले कार्यकर्ते वगळता इतर नेते हे वास्तव मान्य करत नव्हते. लिमयांनी आत्मकथेत लिहिल्याप्रमाणे लिऑन ट्रॉटस्की या सोविएत क्रांतीच्या आघाडीच्या प्रणेत्याने लिहिलेले 'द रेव्होल्यूशन ब्रिट्रेड' या पुस्तकामुळे सोविएत युनियनकडे ते अंधश्रद्धेने पाहण्याऐवजी विश्लेषक दृष्टीने पाहू लागले. ही फार महत्वाची कलाटणी होती.
तरुण वयात असताना सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर वाद घालण्याची संधीही लिमयांनी सोडली नाही. नेहरूंप्रमाणेच सुभाषबाबूही त्यांचे 'हिरो' होते. पण सुभाषबाबू पुण्याला आले होते तेव्हा हिंदू महासभेच्या व्यासपीठाचे आमंत्रण यांनी स्वीकारले होते, याबद्दल लिमयांनी आणि त्यांच्या साथींनी आपली नाराजी सुभाषबाबूंजवळ स्पष्ट शब्दात व्यक्त केली होती. 'केसरी'चे आ.रा.भट हे आपले व्यक्तिगत मित्र आहेत, म्हणून त्यांचे आमंत्रण नाकारणे आपल्याला जमले नाही, असे सुभाषबाबूंनी स्पष्टीकरण दिले. विश्राम बेडेकरांची 'रणांगण' ही कादंबरी तसेच अनंत काणेकरांचे 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' ही पुस्तके वाचल्याचे लिमये आवर्जून लिहितात.
1942च्या 'चले जाव' आंदोलनात लिमयांनी सक्रीय भाग घेतला होता. खानदेशात फिरत राहून त्यांनी भूमिगत चळवळ उभारली. नंदूरबारला गोळीबार झाला आणि त्यात शिरीषकुमार प्रभृती पाच तरुण शहीद झाले. त्यानंतर मनात आलेल्या अपराधीपणाच्या भावनेबद्दल त्यांनी मोकळेणाने लिहिले आहे. तिथल्या दहशतवादी क्रांतिकार्यात माहिती घेण्याबाबत गफलत झाल्यामुळे चाळीसगावजवळ मालगाडी उडवून देण्याऐवजी चुकून प्रवाशांना वायव्य सरहद्द प्रांताकडे नेणाऱ्या 'पेशावर एक्सेप्रस' या मुंबईहून निघालेल्या गाडीला घातपाताने उडवून देण्यात आले आणि त्यात अनेकांचे जीव गेले. या घटनेमुळे लिमयांचा घातपात आणि हिंसाचारावरचा विश्वास कायमचा उडाला. आपल्या मनाला कुरतडून काढणाऱ्या आणि झोप उडवणाऱ्या यातनांबद्दल लिमयांनी जे लिहिले आहे ते अत्यंत हृदयस्पर्शी आहे. 'पंजाब मेल'ला घातपात करण्यात आला होता. त्याबाबतही मनस्वी पश्चाताप झाला असल्याचा कबुलीजवाब लिमये देतात.
युद्धविषयक धोरणाबाबत नेहरू बोटचेपी भूमिका 1942 साली घेत होते. त्याबद्दल समाजवादी त्यांच्यावर नाराज होते. तेव्हा 'क्रांतिकारी' या भूमिगत साप्ताहिकात लिमयांनी नेहरूंवर टीका केली हे मात्र अच्युतराव पटवर्धनांना खटकले होते आणि त्यांनी आपली नापसंती या तरुण रक्ताच्या नेत्याकडे व्यक्त केली होती. समाजवादी नेते त्यागी आणि ध्येयवादी निश्चितच होते. परंतु त्यांच्यात सुप्त ईर्षेची वा स्पर्धेची भावना किंवा महत्त्वाकांक्षा यांचा टकराव होता. याविषयी लिमयांनी संयत भाषेत लिहिले आहे. उदाहरणार्थ, अच्युतराव हे 1942 चे 'हिरो' होते. पण त्यांनी 'सोशलिस्ट पार्टी'च्या मुंबई शाखेच्या कामात रस घ्यावा हे अशोक मेहतांना पसंत नव्हते. किंवा पक्षाचे सर्वमान्य नेते म्हणून आपण जे.पीं.ना पुढे आणले पाहिजे असा अशोक मेहतांचा आग्रह असे.
लिमयांनी रेखाटलेले साने गुरुजींचे व्यक्तिचित्रण अत्यंत मनोवेधक आहे. धुळ्याच्या तुरुंगात ते साने गुरुजींच्या प्रथम सहवासात आले, तेव्हा त्यांचे वय 18 होते. लिमयांची बुद्धिमत्ता आणि ध्येयनिष्ठा पाहून साने गरुजी इतके भारावून गेले की, त्यांनी लिमयांना आपला मानसपुत्रच मानायला सुरुवात केली. साने गुरुजींच्या आग्रहामुळे तुरुंगातल्या साथींसाठी लिमयांनी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर जे अभ्यासवर्ग घेतले होते, त्याची टिपणे गुरुजींनी घेतली होती. दुर्दैवाने ते जाडजूड हस्तलिखित 1942 नंतर पोलिसांनी धाड टाकली त्यात गायब झाले. साने गुरुजी पूर्वी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि अन्य कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होते. राष्ट्रीय चळवळीशी कम्युनिस्टांनी द्रोह केला आणि संपूर्णपणे रशियाधार्जिणे धोरण अंगिकारून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे पोरसवदा मधु लिमयेंनी गुरुजींना पटवून दिले. आणि गुरुजींचे हृदय परिवर्तन झाले. याबद्दल ना. ग. गोरे, एस. एम. जोशी यांनी लिमयेंचे कौतुक आणि अभिनंदन केले. हा तपशील आत्मकथेत आला आहे. लिमयांची गुरुजींच्या आधी तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांचा तुरुंगातील सदरा आठवण म्हणून गुरुजींनी ठेवून घेतला होता, ही खूपच हृद्य स्मृती आहे. तसंच आपल्या लेखनातून मिळालेले सर्व मानधन ते लिमयांना देऊ पाहत होते आणि लिमयांनी ते नम्रपणे नाकारले. गुरुजींनी या पैशातून एक विश्वस्त संस्था स्थापन करावी असा सल्ला लिमये यांनी गुरुजींना दिला आणि त्यातून 'साधना' साप्ताहिकाचा जन्म झाला. ही कहाणी या आत्मकथेतून प्रथम जाहीर झाली आहे. साने गुरूजींच्या मानसिक अवस्थेतील हेलकावे आणि त्यांना वारंवार येणारे विषण्णतेचे झटके यातूनच त्यांनी मृत्युला कवटाळले. 'मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी' असे आचार्य अत्रेनी गुरुजींचे वर्णन केले होते. गुरुजींच्या मनोदशेतले चढउतार आणि आंदोलने लिमयांनी सुरेख टिपली आहेत.
स्वतःच्या तारुण्यसुलभ भावनांबद्दल ते सूचकपणे पण प्रांजळपणे लिहितात. कुसुम कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या कुसुम हेगडे) या 'सखाराम बाईंडर 'मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीच्या प्रथम दर्शनाने ते इतके हरखून गेले होते की 'बिजली कौंध गयी' या एका वाक्यात आपल्या भावना समर्पकपणे पण संयत शब्दात ते व्यक्त करतात. अंमळनेरच्या अभ्यासवर्गात उपस्थित राहून टिपणे घेणाऱ्या चंपावती गुप्ते या युवतीबरोबर बंध-अनुबंध कसे जुळत गेले तेही यात येते. तारा पेंडसे या महिलेने एसेम जोशींचा 'पाठपुरावा' कसा केला. याविषयीही ते संयमाने लिहितात. आणि 'जेव्हा माणूस जागा झाला'च्या लेखिका आणि कम्युनिस्ट नेत्या गोदावरी गोखले यांच्या रूपगुणांमुळे एसेम कसे मोहित झाले होते, हेही ते मोजक्या शब्दांत सूचित करतात. या सर्व लेखनात 'गॉसिप'चा लवलेशही नाही. फक्त माफक गंमत आहे.
साने गुरुजींनी सांगितले होते म्हणून त्यांनी 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला विनोबा भावेंबरोबर खानदेश दौरा केला होता. विनोबांचे सूत्रबद्ध रेखीव लिखाण, शैली आणि विवेचन पद्धती याबद्दल लिमयांचे अत्यंत अनुकूल मत होते. परंतु त्यांच्या लेखनाचा आशय आपल्याला पटला नाही, हेही ते लिहितात. विनोबांनी हे प्रत्यक्ष प्रतिकार, सत्याग्रह किंवा सामुदायिक संघर्ष हा अनावश्यक असल्याचे आपल्या प्रवचनांमधून सांगितल्याने आपण विनोबांच्या वाटेला पुन्हा कधी गेलो नाही हेही लिमयांनी संयत भाषेत सांगितले आहे.
लिमयांपाशी उपजत न्यायबुद्धी आणि सहृदयता होती. सुप्रसिद्ध वकील नानी पालखीवाला म्हणजे सुशिक्षित आणि उच्चभ्रू मध्यमवर्गीय तसेच शहरी उच्चवर्गीयांच्या गळ्यातले ताईत होते. अत्यंत तलम आणि अस्खलित इंग्रजी वक्तृत्वशैलीबद्दल ते प्रसिद्ध होते. घटनेतल्या मूलभूत हक्कांबद्दल ते आग्रही होते. बँक राष्ट्रीयीकरण, जमीनदारीविरोधी कायदे, संस्थानिकांचे तनखे वगैरे प्रकरणांमध्ये ते सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात लढले. लिमयांनी जाहीर सभेत अनेक न्यायविदांच्या उपस्थितीत पालखीवालांची बेगडी स्वातंत्र्यप्रेमाबद्दल खरडपट्टी काढली. "तुम्हाला फक्त श्रीमंताच्या आणि धनिकांच्या मालमत्ता हक्कांची चिंता असते. ते अधिकार सुरक्षित राहावेत यासाठी तुम्ही झगडता. परंतु वंचितांच्या स्वातंत्र्यासंबंधी तुम्ही काहीच करत नाही. प्रतिबंधक स्थानबद्धतेत खितपत पडलेल्यांसाठी तुम्ही कधीच न्यायालयात उभे राहत नाही." पालखीवाला यावर काही बोलू शकले नाहीत.
इंदिरा गांधींची 1971 ची लोकसभा निवडणुकीद्वारे मिळालेली खासदारकी अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर, इंदिरा गांधीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या खासदारकीवरची सशर्त स्थगिती उठवावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी इंदिरा गांधींच्या वतीने नानी पालखीवाला युक्तिवाद करण्यासाठी पुढे आले होते. पत्रकारांना त्याबाबत विचारले असता लिमये म्हणाले, "पालखीवाला हे नेहमी बँकर्स, कॉर्पोरेट जगत, मोठे जमीनदार, संस्थानिक यांच्यासाठी लढतात. आणि आता पंतप्रधानांची भर या यादीत पडली आहे." पालखीवालांना झोंबणारे हे उद्रार होते.
सर्वोच्च न्यायालयात त्यांची नजरानजर झाली. तेव्हा पालखीवाला लिमयांना म्हणाले, "तुमची प्रतिक्रिया माझ्यावर अन्याय करणारी होती." यावर लिमये तत्काळ म्हणाले, "त्यात अन्यायकारक काय होते? माझे म्हणणे खरे आहे." पण पुढे इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि हुकूमशाही राजवट आणली तेव्हा मात्र पालखीवालांनी इंदिरा गांधींच्या याचिकेतून आपले अंग काढून घेतले. यावर लिमयांनी साहाजिकच, पालखीवालांचे कौतुक करताना म्हटले की, त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होती. यातून लिमयांची न्यायबुद्धी दिसून येते.
लिमयांनी प्रतिबंधक स्थानबद्धतेसंबंधीचे आपले खटले स्वतः लढले होते. आणि प्रत्येक वेळी ते जिंकले होते. आणीबाणीत त्यांना 'मिसा' कायद्याखाली स्थानबद्ध केल्यावर तुरुंगातून 'हेबियस कॉर्पस' अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांनी हा अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण आणीबाणी लागू करताना राष्ट्रपतींनी जो अध्यादेश काढला होता, त्यानुसार प्रतिबंधक स्थानबद्धतेविषयक लिमयेंची याचिका आपोआप मागे घेतली गेल्याचे सरन्यायाधीश ए.एन.रे यांनी आपल्या आदेशात म्हटले होते. ही अत्यंत शरमेची गोष्ट होती. सर्वोच्च न्यायालयाने बहुमताने हा निकाल दिला की, स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराबाबत न्यायालय काहीही करू शकत नाही.
लिमये बंदीवान होते. परंतु त्यांचे धैर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याकांक्षा अतूट होती. परिणामांची तमा न बाळगता त्यांनी न्या. यशवंत चंद्रचूड आणि न्या. भगवतींना पत्र लिहिले. त्यात 1932 साली गोलमेज परिषदेपुढे महात्मा गांधींनी सर्वोच्च न्यायालयाबद्दलची आपली जी संकल्पना मांडली होती ती विशद केली. गांधी म्हणाले होते, 'अशी कोणतीही अन्यायकारक गोष्ट नाही की, ज्यावर न्यायालयाकडे उत्तर नाही.' ट्रान्सवालमधील एका कायदेपंडिताने गांधींना सांगितले होते की, "जर एखादा न्यायाधीश अशी सबब सांगू धजला तर त्याला ताबडतोब पदावरून दूर करायला हवे." न्या. चंद्रचूड आणि न्या. भगवती या दोघांना तुरुंगातून हे खरे आणि कटू बोल सुनावण्याचे धैर्य लिमयेच दाखवू शकत होते. अंग तापाने फणफणले असताना आणि बाहेर धो धो पाऊस पडत असताना कर्तव्यभावनेला सर्वोपरी स्थान देऊन त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली होती. आणि सत्याग्रहाला शोभणाऱ्या धीरोदत्तपणे रानटी पोर्तुगीज पोलिसांची अमानुष मारहाण आणि मानहानी सहन केली. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या मधु लिमयेंवर एक पोलीस थुकला तेव्हा त्यांना संताप अनावर झाला होता. पण महात्मा गांधींची प्रतिमा मनःचंसमोर कल्पून त्यांनी स्वतःच्या संतप्त भावनांवर नियंत्रण ठेवले. असा आदर्श सत्याग्रही क्वचितच पाहायला मिळतो.
समाजवादी विचासरणी तर्कशक्ती आणि विवेकबुद्धी यांना सर्वोपरी स्थान देते. तर्कहीनता आणि अंधश्रद्धा यांचे निराकरण करण्यासाठी विज्ञाननिष्ठा जोपासायला हवी. लिमयांच्या समाजवादात तथ्ये, तर्कशक्ती, विवेकबुद्धी आणि विज्ञाननिष्ठा यांना केंद्रस्थान आहे. समाजवाद्यांच्या दृष्टीने लोकशाही हा एक श्रद्धेचा विषय आहे. जुन्या काळातले नेमस्तपंथीय ज्याला लोकशाही मानत तशी लोकशाही इथे लिमयेंना अभिप्रेत नाही. नेमस्तांच्या लेखी लोकशाही म्हणजे अर्ज विनंत्या आणि विधीमंडळातील कामकाज. लिमयांची जी संकल्पना आहे त्यात जनआंदोलने, सत्याग्रह, संप, संघटना बांधणी आणि रचनात्मक कार्य या सर्वांचा अंतर्भाव होतो. आणि ती गांधीवादी अहिंसा तत्वावर आधारित आहे. गरिबी आणि दारिद्य यामुळे जीवन असुंदर बनते आणि वंचित समूहाच्या वाट्याला असेच जगणे येते. ती दुःखे नष्ट व्हावीत आणि त्यांचे जगणे सुंदर व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे युसुफ मेहरअली म्हणत. "मी सौंदर्याचा पूजक आहे, म्हणून समाजवादी आहे, हे मेहरअलीचे वाक्य / वचन प्रसिद्ध आहे. लिमयेही सौंदर्यपूजक होते. अभिजात साहित्य, संगीत आणि नृत्याची त्यांना अत्यंत आवड आणि सखोल जाण होती. त्यांचे वडील आणि मोठे बंधू संगीत शिकवीत. संगीतज्ञ वामनराव देशपांडे हे लिमयांच्या वडिलांचे शिष्य होते. त्यांच्यासंबंधी वामनरावांनी आपल्या 'आलापिनी' या पुस्तकात लिहिले आहे. "तुम्हाला संगीताची इतकी गोडी/आवड आहे. मग शिकला का नाहीत?" असा मी त्यांना एकदा प्रश्न विचारला होता. त्यांच्या स्वभावाला आणि चिंतनशीलतेला साजेसे 'फिलॉसॉफिकल' उत्तर त्यांनी दिले होते. "नीतितत्त्वे आणि सौंदर्यतत्वे (म्हणजे एथिक्स आणि एस्थेटिक्स - श्रेयस/कर्तव्य आणि प्रेयस) यांच्यात एक अंगभूत संघर्ष आहे. मी राजकारणात पडलो ते नीतितत्वांच्या ध्यासापोटी. त्या मागे लागलो म्हणून सौंदर्यतत्वांचा केवळ आस्वाद घेण्यापुरती उसंत मिळाली. अध्ययन करू शकलो नाही. पण त्याबद्दल खंत नाही." लिमयेंच्या या उद्गारात जणू त्यांच्या आयुष्याचे सार सामावलेले आहे.
(येत्या 9 ऑगस्टला मधु लिमये यांच्या 'आत्मकथा' या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. या आवृत्तीला लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.)
Tags: अमरेंद्र धनेश्वर आत्मकथा मधु लिमये Amarendra Dhaneshwar Autobiography Madhu Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या