डिजिटल अर्काईव्ह

जोहरान ममदानी जगभरात चर्चेत आला आहे. न्यूयॉर्क शहराचा महापौर होण्याचा मान मिळवतानाच जोहारान याने एक इतिहास रचला आहे. राजकारणातील नवी वाट रचताना तरुण राजकारण्यांसाठी एक आदर्शही त्याने घालून दिला आहे. प्रस्थापित राजकारणाला तडा देणारं हे नवं मॉडयूल आहे, जगभरातील तरूणांना राजकीय दिशा देणारं मॉड्यूल...

 

हातात स्वतःचं पोस्टर घेऊन प्रचार करणारा तो तरुण उमेदवार पाहून लोक कुत्सितपणे पाहत होते. कुणी हसत होतं. कुणी गंमत घेत होतं. NYC अर्थात, न्यू यॉर्क हे जगातील प्रख्यात शहर. अमेरिकेतील व्यापार, अर्थ आणि संस्कृतीचं केंद्र. 1624 मध्ये वसलेल्या याच शहरात हातात मशाल घेऊन 'लिबर्टी' उभी आहे. गर्भश्रीमंतांचं 'मोस्ट हॅपनिंग' शहर. जागतिक नकाशावर दबदबा असलेल्या या शहराला लाभलेले मेयर हे दिग्गज आहेत. अशा शहराच्या मेयरपदाचा उमेदवार फूटपाथवर उभा राहून प्रचार करतोय, हे लोकांना हास्यास्पद वाटणं साहजिकच होतं.

मेयर अर्थात महापौर हे पद आपल्याकडे नामधारी आहे, पण अमेरिकेत मेयरला संविधानिक अधिकार आहेत. शहराची धोरणं आखण्याची आणि कर प्रणालीची. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला तो आदेश देऊ शकतो. अगदी एखाद्याला अटक करण्याचे आदेशही देऊ शकतो. आणि या पदासाठी जोहरान ममदानी नामक साधा तरुण उमेदवार म्हणून प्रचार करतो, हे हास्यास्पदच नाही का? पण गांधीजी म्हणतात ना, 'आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर ते तुमच्यावर हसतील, नंतर ते भांडतीलही.. पण शेवटी विजय तुमचाच असेल...' आज याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा झोहरान ममदानी !

झोहरान ममदानी कोण आणि त्याचं भारतीय कनेक्शन याचीही पुरेशी चर्चा झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली. डेमोक्रॅटिक पक्षाने उमेदवारी दिल्याने सारेच अचंबित झाले, अमेरिकन वर्तमानपत्रांत हेडलाइनचा विषय झाला. त्यांची उमेदवारी जाहीर करताना डेमोक्रॅटिक पक्षालाही पुढचा अंदाज नसावा. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यापुढे हे ट्रम्प कार्ड खेळलं गेलं, हे नक्की.

जोहरान हा तसा चळवळ्या तरुण. सर्वसामान्य माणसासोबतची नाळ आणि तीच त्याची कमिटमेंट. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी, गृहनिर्माण सल्लागार म्हणून काम करत होता. अमेरिकेतील बांधकाम मजूर, कामगार हे तसे स्थलांतरितच. महागड्या न्यू यॉर्क शहरात राहताना त्यांच्या समस्या समोर आल्यानंतर जोहरान अस्वस्थ झाला. अत्यंत कमी उत्पन्न आणि न परडवणारा खर्च असलेली ही असंख्य कुटुंबं बेदखल होती. हा प्रश्न त्याने जाहीरपणे मांडत सगळ्यांचे लक्ष वेधलं. हळूहळू, एकूणच स्थलांतरितांच्या समस्या त्याने ऐरणीवर आणल्या. न्यू यॉर्कच नव्हे, तर अमेरिका हा देशच स्थलांतरितांनी वसवला आहे. मात्र, आज 'स्थलांतरित' द्वेषाचा मुद्दा झाले आहेत आणि जोहरान त्यांचा आवाज झाला. यातूनच त्याचा राजकीय प्रवास 2020 मध्ये सुरू झाला. त्याने आपला मतदार तयार केला. न्यू यॉर्क राज्य विधानसभेत तो पोहोचला.

न्यू यॉर्क महापौरपदाची निवडणूक हे आव्हान प्रचंड मोठं होतं. कोणतीही साधनसंपत्ती हाती नव्हती. पाठीशी कुणी उद्योजक नव्हता की श्रीमंत लोक नव्हते. गरिबांचे, स्थलांतरितांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर कोण मदत करणार? आणि जोहारान हा स्वतः तसा 'उपराच'. अशा पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो प्रचारात उतरला. विचारांची स्पष्टता होतीच. पण त्याच्याकडे जे भांडवल होतं ते म्हणजे त्याची संवादाची हातोटी. हसतमुख चेहरा, आपलंसं करणारी वाणी, विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा. व्हायब्रेट व्हिज्युअल ओळख हा त्याचा पेहराव होता. भारतीय वंशाचे अमेरिकन डिझायनर अनीश भूपथी यांनी त्याचे सूट्स डिझाइन केले होते. इतर उमेदवारांच्या चर्चा माध्यमांतून सुरू असताना प्रचारासाठी जोहरान एकटाच रस्त्यावर उतरला.

ममदानीच्या विरोधात दिग्गज उमेदवार मैदानात होते. माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांच्या मागे धनाढ्य उद्योजक आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मागे उभे होते. विद्यमान महापौर एरिक अॅडम्स हेसुद्धा ताकदीनिशी मैदानात होते. तर रिपब्लिकनमार्फत कर्टिस स्लिवा रिंगणात होते. याशिवाय, ममदानी यांच्याच डेमोक्रॅट पक्षाचा एक उमेदवार विरोधकांनी मतविभागणीसाठी उभा केला होता. अशा सर्व वयाने ज्येष्ठ आणि श्रीमंतांनी 33 वर्षीय ममदानीला घेरलं होतं. ही भिंत भेदण्यासाठी एक जबरदस्त मोहीम आखली गेली. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम होती. बर्नी सँडर्स आणि अलेक्झांड्रिया ओकासिओ कॉर्टेझसारख्या पुरोगामी नेत्यांनी यासाठी ममदानीला पाठिंबा दिला होता.

'तरुण वेलची' :

जोहरानने आपली भारतीय मुळं आणि आई, फिल्ममेकर मीरा नायर ही ओळख या प्रचारात अधिक गडद केली. सगळा बॉलीवुड मसाला प्रचारात वापरला. ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये जोहरानने शिक्षण घेतलं होतं. तिथे त्याने 'Young Cardamom' या नावाने स्टेजवर रॅपिंग आणि संगीताची बाजी मारली होती. हेच सगळं आता त्याच्या प्रचारात दिसत होतं. त्याची लोकांसोबतची सहज नृत्यशैली आनंददायी होती. हे सारं नेहमीच्या अमेरिकन शिष्टाचाराला धरून नव्हतं.

धूम मचाले धूम :

ममदानीने प्रचारात या घटकांवर फोकस केला होता : भाडेकरू, तरुण मतदार आणि क्वीन्स, ब्रुकलिन तसंच अप्पर मॅनहॅटनमधील तरुण. न्यू यॉर्कमधील भाडेकरूंचा मोठा प्रश्न होता. प्रचारात तीन मुख्य मुद्दे घरभाडेवाढीला स्थगिती, मोफत बस प्रवास आणि बालसंगोपनासाठी विशेष योजना. याशिवाय, वसतिपातळीवर सहकारी वा स्वस्त धान्यांची दुकानं... आणि या सगळ्यांसाठी श्रीमंत
आणि मोठ्या उद्योजकांवर करवाढ ! म्हणजे एकदम रॉबिनहूडच जणू! अशा अजेंड्यांवर कोणता उमेदवार टिकू शकेल ?

जोहरानने आपले हे मुद्दे परिणामकारक मांडले, त्याची मोहीम बॉलीवुडच्या संदर्भानी भरलेली होती. 'दीवार'मधील डायलॉगच्या धर्तीवर 'अब्जाधीशों के पास पहिलेच सब कुछ है, बडी बडी बिल्डिंगें हैं... लेकिन मेरे पास आप हो', असं लोकांकडे हात करत तो म्हणायचा. 'रोटी कपडा और मकान'चा संदर्भदेत घरभाडेवाढीला स्थगिती, मोफत बस प्रवास, बालसंगोपन आणि स्वस्त धान्यांची दुकानं हा अजेंडा मांडायचा. 'अपना टाइम आयेगा'... असं म्हणत लोकांना हिंमत आणि प्रेरणा द्यायचा. नेहमीचा टिपिकल प्रचार-भाषणांपेक्षा त्याने या अनोख्या पद्धतीने प्रचारात जान आणली. विजयी भाषणानंतरही 'धूम मचाले' या गाण्याच्या धूनवरच त्याने स्टेजवरून एक्झिट घेतली.

प्रचार डिझाइन :

वेगळ्या वळणाचा प्रचार ही ममदानीची ताकद ठरली. विचारांची स्पष्टता आणि प्रामाणिकपणा या आधारे दिग्गजांना चपराक देणारी प्रचाराची ही ऐतिहासिक मोहीम होती. प्रचाराची पोस्टर्स विचारपूर्वक तयार केली गेली होती. अमेरिकेत साधारणतः लाल, हिरवा, निळा, रंग वापरला जातो. ममदानीच्या पोस्टरमध्ये पिवळ्या रंगाचा वापर केला गेला आणि त्याची खास टायपोग्राफी निवडली होती. अगदी हिंदी सिनेमाच्या पोस्टरसारखीच पोस्टर्स तयार झाली होती. छोट्या दुकानांवर, चौकांत ही पोस्टर्स लोकांनी लावली होती.

ममदानीची मोहीम बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक होती. या मोहिमेचा आणखी एक अनोखा घटक म्हणजे सर्व साहित्य हिंदी, बंगाली, उर्दू, अरबी आणि स्पॅनिश अशा आठ भाषांमध्ये अनुवादित केलं गेलं होतं. यांपैकी काही भाषांमध्ये प्रचार मोहिमेचे व्हिडिओदेखील प्रसिद्ध केले होते. न्यू यॉर्कमधील जे स्थलांतरित समुदाय होते, त्यांच्यापर्यंत ते थेट पोहोचलं गेलं. हा टर्निंग पॉइंट ठरला. सहसा निवडणूक किंवा राजकीय घडामोडींत हे असंघटित समुदाय दुर्लक्षित असतात किंवा त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नसतं. मात्र, ओळखीच्या भाषेमुळे ही निवडणूक त्यांना जिव्हाळ्याची आणि सर्वसमावेशक वाटली असावी. दक्षिण आशियाई मतदारांसाठी ममदानीचा प्रचार म्हणजे त्यांच्या जीवनातील अनुभवांचं प्रतिबिंब होतं. दुसऱ्या बाजूला LGBTQ या समुदायाचे प्रश्न ममदानीने उचलून धरले. या लहानलहान घटकांनी त्याची ताकद वाढवली. 'हॉट गर्ल्स फॉर जोहरान' ही अशीच एक Hashtag चळवळ सुरू झाली, ज्याचे हॅशटॅगवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. थोडक्यात, ही मोहीम तरुण न्यू यॉर्कर्ससाठी राजकीय सहभाग होता. असंख्य मुली यात आघाडीवर होत्या.

गांधीगिरी :

न्यू यॉर्क हे शहर अधिक परवडणारं शहर बनवण्याचं उद्दिष्ट ममदानीने मांडलं. लोकशाही, समाजवादाचा तो पुरस्कर्ता आहे. आपली मांडणी करताना, प्रचारासाठी फिरताना कमालीचा साधेपणा होता. कोणत्याही सामान्य न्यू यॉर्करसारखा पोशाख त्याने वापरला. प्रचार मोहिमेदरम्यान, तो वारंवार सिटी बस, मेट्रो आणि सबवेवरून प्रवास करताना दिसला. आणि शहरभर हा अनोळखी तरुण प्रत्येकाला आपलासा वाटू लागला. हीच त्याची गांधीगिरी होती. मात्र, सोशल मीडियामुळे त्याची प्रतिमा कमअस्सल होता काम नये, यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत होती. ममदानीच्या रात्रीच्या प्रचाराचं सूत्र सांभाळणारी ज्युली, मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचवण्यासाठी घरोघरी पायाला भिंगरी लावून फिरत होती. ही सगळी तरुणांची फौज प्रचारासाठी एकवटली होती. निवडणुकीच्या रात्रीपर्यंत, एक लाख स्वयंसेवकांचं सैन्य तैनात झालं होतं.

तोच किस्सा आर्थिक मदतीचा. महापौरपदाचा प्रचार सुरू झाला तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर ते सामान्य करदात्यापर्यंत अनेकांनी अगदी काही डॉलर्सची मदत ममदानीला दिली. हा छोटा प्रवाह पुढे वाढत गेला. निवडणुकीच्या सुमारे दोन महिने आधी, जोहरान ममदानी याने 8 दशलक्ष डॉलर निधी उभारणी केली. ममदानीने त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. 'आम्ही अधिक पैसे घेऊ शकत नाही, आता नका पाठवू', असं सांगत, 'एकेका पैशाचा हिशोब देईन', असं आश्वासन त्याने दिलं.

एक वर्षापूर्वी ममदानीला केवळ 1% मतदान दाखवलं जात होतं. सरतेशेवटी, प्रभाव वाढला तसे त्याला रोखण्यासाठी 28 अब्जाधीशांनी 22 दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याचं वृत्त आहे. ममदानीला 'हमास'सारख्या वादग्रस्त संघटनांनी मदत केल्याचा आरोप होतोय. अर्थात, त्याची चौकशी सुरू आहे. असो.

जोहरान ममदानीच्या यशाचा केंद्रबिंदू सामुदायिक सहभाग हा होता. शेवटी, लोक ब्रँड किंवा राजकारण्यांपेक्षा भावलेल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतात. डेटा पाहिला तरी ममदानीने 18-29 वयोगटातील 78% मतदारांना जिंकलं. यात त्याचं मुस्लीम असणं हा मुद्दाच कुठे उरला नाही.

राष्ट्रीय स्तरावर डेमोक्रॅटिक पक्षाचं रेटिंग खालावलं होतं. गेल्या नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर डेमोक्रॅटिक पक्ष संकटात असताना ममदानी याने आता पक्षाला 'अच्छे दिन' आणून दिले आहेत. ट्रम्पचा प्रतिकार करण्याच्या लढाईत अमेरिकेच्या इतर स्टेटमध्ये याची पुनरावृत्ती होऊ शकते का, असा अंदाज डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते घेत आहेत.

भारतीयांसाठी :

ममदानी याला अमेरिकन भारतीयांनी आपला उमेदवार मानलाच नाही. भारतीय किंवा महाराष्ट्र मंडळं यांची याबाबत काही जाहीर भूमिका आलेली नव्हती. याची अनेक कारणं आहेत, तो मुस्लीम असणं, ट्रम्पला न दुखावणं वगैरे.. मात्र, कुणी बोलत नसलं तरी शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि लघु-व्यवसाय मालकांच्या मोठ्या भारतीय समुदायासाठी, ममदानीचा उदय याचं भावनिक आणि व्यावहारिक महत्त्व आहे. भारतीय स्थलांतरितांसाठी आणि अमेरिकेत मोठे राजकीय प्रतिनिधित्व मिळवणाऱ्या दुसऱ्या पिढीतील अमेरिकन लोकांसाठी हा एक मैलाचा दगड मानला जातो.

ममदानी यांनी विजयानंतर मेयर हॉलमध्ये केलेल्या भाषणात जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. ब्रिटिशांकडून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा मध्यरात्री नेहरूंनी केलेल्या ऐतिहासिक भाषणातील एक उद्धरण उद्गारत ममदानी याने विजय साजरा केला. मात्र, यासोबतच गेली अकरा वर्षे नेहरूंची बदनामी करणाऱ्यांना ममदानीने त्यांची जागाही दाखवली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी