डिजिटल अर्काईव्ह

मार्क टली : भारतीय पत्रकारितेवरील एक अमीट ठसा

बी.बी.सी. (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) चे गारुड माझ्या मनावर अगदी बालपणापासून आहे. कारण आमच्या घरात 5 बँड्स रेडिओवर वडील ऐकत असलेल्या बातम्या आणि क्रिकेट कॉमेंटरी. माझे काका श्री. शरद साठ्ये हे बीबीसीवर 'रेडिओ झंकार' या कार्यक्रमाचे निर्माते म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. पुढे, पत्रकारिता अभ्यासक्रम शिकताना बीबीसी हे आदर्श बातमीदारीचे उदाहरण म्हणून मनावर ठसले. आपल्या देशाची खरी ओळख हा परकीय रेडिओ अधिक चांगली करून देतो ही भावना पक्की होण्यात मोठा वाटा आहे मार्क टली या पत्रकाराचा. त्यांचा जन्म कोलकाता इथला. 25 जानेवारी, 2026 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी नवी दिल्लीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

मी दूरदर्शनसाठी अलिप्त राष्ट्रांच्या परिषदेच्या (1983) वार्तांकनासाठी नवी दिल्लीत गेलो होतो, तेव्हा मार्क टली यांना प्रत्यक्ष भेटता आले. आमच्या मीडिया सेंटरमध्ये जगभरातील पत्रकारांची धावपळ, लगबग सुरू असताना ते भेटले. मी त्यांच्या वृत्तांकनाचा चाहता आहे, असे सांगितले. त्यांनीही आमच्या दूरदर्शनच्या नियोजनाची चौकशी करून उमदेपणाने हस्तांदोलन करून निरोप घेतला. या संपूर्ण परिषदेचे त्यांनी केलेले वार्तांकन अतिशय संतुलित तर होतेच; पण शीतयुद्धाच्या काळात भारताच्या पुढाकाराने सुरू असलेल्या शांततेच्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले होते. अण्वस्त्रबंदी, आर्थिक विकास या कळीच्या मुद्द्यांवर या परिषदेत दिलेला भर त्यांना महत्त्वाचा वाटला होता. एखाद्या घटनेची बातमी देताना तिचा आब राखून घटनेचे विश्लेषण कसे करावे याची टली म्हणजे एक पाठशाळाच होते.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यामधील महत्त्वाच्या घटना जगभरात घेऊन जाणारा आवाज ही त्यांची ओळख आजही ताजी आहे. त्यांनी बांगलादेश युद्ध, आणीबाणी, बाबरी मशीद प्रकरण, ऑपरेशन ब्लू स्टार, भोपाळ गॅस दुर्घटना, राजीव गांधी यांची झालेली हत्या अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन केले. केवळ माहिती न देता अतिशय संयमित विश्लेषण ते करत असत. बाबरी मशीद हिंसाचारात तर त्यांना धुडगूस घालणाऱ्या टोळक्याने मारण्याच्या धमक्या दिल्या, 'टली मुर्दाबाद'च्या घोषणा सुरू केल्या. त्यांना एका मंदिरात आश्रय घ्यावा लागला होता. बातमी देताना या घटनेचे पडसाद भारतीय राजकारणावर आणि समाजावर दीर्घ काळ टिकणारे असतील आणि त्यातून कट्टरता वाढेल अशी मांडणी त्यांनी केली होती. यातील वस्तुनिष्ठता त्यांच्या उत्तम निरीक्षणाचा दाखला आहे.

टली हे पत्रकार म्हणून मोठे असले तरी, सर्वच राज्यकर्ते त्यांच्या बातम्यांवर नाराज असत. त्याचा परिणाम म्हणून आणीबाणीच्या काळात त्यांची इंग्लंडला हकालपट्टी झाली होती. 'सरकारला काय हवे यापेक्षा सत्य काय आहे हेच मी सांगणार, मग त्यासाठी मला किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही' हा पवित्रा त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू होता.

त्यांच्या आवाजात एक निःसंदिग्धपणा होता, घटनेचे पुरेपूर आकलन झाल्याचा आत्मविश्वास होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फलनिष्पत्तीचे आणि परिणामांचे सहज विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता होती. बातमीदार हा केवळ निःपक्षपाती असून भागत नाही. त्याचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिघांचे आकलनही तेवढेच सशक्त असावे लागते. टली हे या निकषाला पूर्णपणे उतरणारे पत्रकार होते. त्यांच्या बातम्या अचूक असायच्या. आकडेवारी आणि इतर संदर्भ अतिशय काटेकोरपणे ते आपल्या बातमीपत्रात मांडत असत. '300 शब्द टंकित केल्यानंतर मी थांबतो', असे टली म्हणत. त्यामागचे कारण सांगताना त्यांनी एका समारंभात सांगितले होते की, 'बीबीसीमध्ये एक बातमी 300 शब्दांपेक्षा जास्त नसावी असा दंडक होता. त्यापेक्षा जास्त शब्द झाले तर ते कमीपणाचे मानले जाई.' बातमीची लांबी, रुंदी आणि खोली यांचा समग्र विचार करणारी बीबीसी जगात जास्त लोकप्रिय का आहे हे अशा गोष्टींवरून लक्षात येते.

भारतातच (कोलकाता) त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे या देशाबद्दल त्यांना विशेष आस्था असणे साहजिकच होते. आपल्या गाडीच्या चालकाच्या आकडे मोजण्याच्या पद्धतीची ते लहानपणी नक्कल करत असत, तेव्हा त्यांना सांभाळणारी दाई सांगत असे, 'अरे, ती आपली भाषा नाही. ती नोकरांची भाषा आहे'. पण मार्क ती (हिंदी) व्यवस्थित शिकले. त्यामुळे दिल्लीत असताना उच्च पदस्थ आणि मंत्रिगण यांच्याशी जवळीक साधणे त्यांना सोपे झाले. भारतीयांचा आवाज त्यांना नेमका ऐकू यायचा आणि तोच त्यांच्या बातम्यांमधून रेडिओ लहरींमधून जगभरात निनादत असे.

1965 मध्ये बीबीसीच्या कार्मिक विभागातील एक सहायक म्हणून आलेले मार्क वृत्तविभागात बातमीदारी करू लागले आणि तिथे रमले आणि स्थिरावलेही. भारतातील दारिद्र्य आणि जातीयवाद यांबद्दल त्यांना वेदना होत; पण येथील एकूण सामाजिक सलोखा समाधान देणारा होता. कार्यालयात बसून ऐशारामी बातमीदारी त्यांनी कधी केली नाही. भारतभर फिरून, लोकांशी बोलून, घटना प्रत्यक्ष पाहून, त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी केलेले वृत्तकथन कमालीचे जिवंत होत असे. बातमीला सौष्ठव केवळ भाषा आणि अलंकारांनी येत नाही, तर त्यातील सत्यता आणि खरेपणा हेच तिचे सामर्थ्य असते हे मार्कच्या बातम्या ऐकल्या की जाणवल्यावाचून राहत नसे. केवळ भारतातीलच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका येथील महत्त्वाच्या बातम्या मार्कनी बीबीसीमार्फत जगभर नेल्या.

नैतिक मूल्यांची जपणूक करणारे मार्क बीबीसीमधील महासंचालक जॉन बर्ट यांच्या बोटचेप्या धोरणाबद्दल जाहीरपणे बोलले. परिणामतः, पुढील वर्षी (1994) त्यांची गच्छंती झाली. अर्थात, पुढेही ते बीबीसीच्या 'रेडिओ चार' या वाहिनीवर तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या विषयावर कार्यक्रम सादर करू लागले. त्यांनी भारतात केलेलं काम इतके मोलाचे होते की, सरकारी धोरणांवर टीका करूनही केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' (1992) आणि 'पद्मभूषण' (2005) हे सर्वोच्च नागरी सन्मान खळखळ न करता बहाल केले. ते त्यांनी नम्रतापूर्वक स्वीकारले, अर्थात बीबीसीची परवानगी घेऊनच. भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांत त्यांना मुक्त संचार होता. ब्रिटनचा नागरिक म्हणून इंग्लंडमध्ये, तर भारतात जन्माला आलेला असल्यामुळे 'द ओव्हरसीज सिटीझन' म्हणून इथला परवाना त्यांना प्राप्त होता. साहजिकच, दोन्ही देशांबद्दल त्यांच्या मनात उदंड प्रेम होते.

मला आठवते आहे, इंदिरा गांधी यांची गोळ्या घालून हत्या झाली ती बातमी सर्वप्रथम बीबीसीने जगभरात नेली याचे श्रेयही मार्क टली यांनाच जाते. इंग्लंडच्या राणीने 2002 मध्ये टली यांना पत्रकारिता आणि रेडिओ क्षेत्रातील कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवले होते. आपल्या तीन दशकांच्या कार्यकाळात त्यांना अनेक कसोटीच्या बातम्या द्याव्या लागल्या. विकासात्मक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय घटनाही त्यांनी समतोल समालोचन पद्धतीने श्रोत्यांपर्यंत नेल्या. 'समथिंग अंडरस्टुड' या कार्यक्रमातून कविता, साहित्य, संगीत अशा अनेक माध्यमांमधून त्यांनी आपला कार्यक्रम फुलवत ठेवला.

2017 मध्ये त्यांनी 'भारतीय स्वातंत्र्याची सात दशके' या नावाचा माहितीपट बीबीसीसाठी तयार केला. त्या वेळी चित्रीकरणात सहभागी असलेल्या निर्माता, छायालेखकार मंडळींना टलीचा करिश्मा लक्षात आला. एक परदेशी माणूस म्हणून कोणी त्यांच्याकडे पाहत नव्हते, तर आपला माणूस म्हणून अनेक जण त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची धडपड करत होते. अनेक भागांत ते या माहितीपटासाठी फिरले. प्रत्येक ठिकाणी ही आपुलकी अनुभवायला मिळाली. 1972 ते 1993 अशी 21 वर्षे ब्युरो चीफ म्हणून काम करताना टलींनी अतिशय मन लावून आणि निष्ठापूर्वक काम केले याचीच ती पावती होती.

आपण स्वतःला ख्रिश्चनच मानतो असे सांगताना टली हेही स्पष्ट करतात की, 'भारतात इतकी वर्षे राहिल्यानंतर ख्रिश्चनिटी हा देवाकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग नाही', हे मला पटले आहे. हे टली यांचे विधान केवळ धार्मिक लोलकातून पाहून चालणार नाही तर आपली जीवनपद्धती, आपली संस्कृती यापलीकडे जाऊन पाहण्याचे औदार्य त्यांना त्यांच्या पेशातून मिळाले असे म्हणता येईल. सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्म समभाव यापलीकडे घेऊन जाणारा हा विचार म्हणून महत्त्वाचा ठरतो.

'अमृतसर : मिसेस गांधीज लास्ट बॅटल' हे त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे पुस्तक आहे. सुवर्ण मंदिर परिसरात अतिशय धोकादायक अवस्थेत त्यांनी केलेल्या वृत्तसंकलनाचा सच्चा स्पर्श या पुस्तकाला आहे.

'फ्रॉम राज टू राजीव' या पुस्तकातून मार्क यांनी भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षांचा इतिहास मांडला आहे. राजकारण, समाजकारण, पक्षीय संघर्ष यांचा अतिशय तपशीलवार आढावा यात घेतला आहे.

भारतीय राजकारणाचे उभे आडवे धागे समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे इतके परिपूर्ण आहे. 'नो फुल स्टॉप इन इंडिया' हा 10 लेखांचा संग्रह भारतातील समाज, संस्कृती, राजकारण यांचा अतिशय साध्या-सोप्या भाषेत वेध घेणारा आहे. आपले वैयक्तिक अनुभव आणि मोजक्या घटनांचा उल्लेख करत टली भारतीय माणसांशी आपले असलेले अतूट नाते त्यात अधोरेखित करतात. टली यांनी बहुतेक आपला कार्यकाळ रेडिओसाठी व्यतित केला; पण 1996 मध्ये त्यांनी बीबीसी टीव्हीसाठी तयार केलेली 'द लाइव्हज ऑफ जिझस' ही मालिका त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनवृत्तीचे उदाहरण म्हणावे लागेल. इस्रायल, रोम आणि भारत अशा तीन देशांतील नागरिक जिझसकडे कसे पाहतात, त्याचे कसे विश्लेषण करतात हे मांडत त्यांनी धर्मातील लवचिकता आणि बदलत जाणारे दृष्टीकोन यांचे सुभग दर्शन घडवले आहे.

आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक मेल्विन डिमेलो यांचा करिश्मा, सिलोन रेडिओची वाढत जाणारी लोकप्रियता या पार्श्वभूमीवर भारतात पाय रोवून उभे राहणे हे टली यांच्यासाठी एक आव्हानच होते; पण निष्ठापूर्वक बातमीदारीने त्यांनी आपले एक स्थान मिळवले आणि लवकरच टली म्हणजे 'भारताचा आवाज' या स्थानापर्यंत ते बीबीसीला घेऊन गेले. आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. बीबीसीचा निःपक्षपाती चेहरा आता पूर्वीचा राहिला नाही. वार्तांकनातील असमतोल, विशिष्ट विषयांची हेतुपुरस्सर पेरणी, राजकीय बातम्या देतानाचा दुजाभाव यांबद्दल त्यांच्यावर मोठी टीका होताना दिसते. आता तर मार्क टलीही गेले. बीबीसीची पूर्वीची ओळख धूसर होत असताना त्यांचे जाणे कालसुसंगत म्हणता येईल काय?

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी