फेब्रुवारी 1959 मध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांना जवाहरलाल नेहरूंशी ज्या प्रश्नांविषयी चर्चा करायची होती, ते प्रश्न त्या काळाशी निगडित होते. तसंच ते प्रश्न आपल्या काळाशीही निगडित आहेत. आज, 2025 मध्ये सामाजिक व राजकीय वाद सोडवण्यामधील अहिंसेची भूमिका, लोकशाही व एकाधिकारशाही यांचे वेगवेगळे दावे, गांधीविचारांतील आर्थिक (आणि विशेषतः पर्यावरणीय) कल्पनांची प्रस्तुतता, तसंच भारत-अमेरिका संबंधांचं वर्तमान व भवितव्य, हे सर्व अत्यंत कळीचे प्रश्न आहेत. नेहरू आणि किंग यांच्यात या विषयांवर सविस्तर बोलणं झालं असतं तर ते न भूतो न भविष्यती स्वरूपाचं ठरलं असतं.
जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर रोजी असतो, त्यादरम्यानच हा लेख प्रकाशित होईल. बरीच प्रशंसा लाभलेल्या आणि तितकीच चिखलफेक सहन केलेल्या नेहरूंचं नाव अलीकडे पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आलं. अमेरिकेतील एका तरुण सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाने नुकतंच नेहरूंचं नाव घेत त्यांची काही विधानं उद्धृत केली. या पार्श्वभूमीवर डॉ. मार्टिन ल्यूथर किंग या दुसऱ्या एका अमेरिकी सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला जवाहरलाल नेहरूंविषयी काय वाटत होतं, याची आठवण नोंदवणं प्रस्तुत ठरेल.
डॉ. किंग हे 1950 च्या दशकारंभी डॉक्टरेट पदवीसाठी अभ्यास करत होते. त्या वेळी त्यांनी गांधींविषयी व भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी अनेक पुस्तकं वाचली. त्यातून त्यांचा परिचय स्वतंत्र करिश्मा राखणारे गांधींचे साथीदार आणि त्यांचे उत्तराधिकारी जवाहरलाल नेहरू यांच्याशी झाला. त्यांनी नेहरूंचं आत्मचरित्रही वाचलं असावं. नोव्हेंबर 1958 मध्ये, वयाच्या तिशीतही प्रवेश न केलेल्या डॉ. किंग यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना 'स्ट्राइड टूवर्ड्स फ्रीडम' हा स्वातंत्र्याचा ग्रंथ पाठवला. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीच्या संदर्भात मॉन्टेगोमेरी बस बहिष्काराच्या घटनेला प्रचंड महत्त्व आहे; त्याच घटनेबद्दलचं हे पुस्तक होतं. डॉ. किंग यांनी दिल्लीला पाठवलेल्या या पुस्तकाच्या प्रतीवर पुढील शब्द लिहिलेले होते : 'तुमची प्रामाणिक सदिच्छावृत्ती, तुमची व्यापक मानवतावादी आस्था, आणि भारतातील तुमच्या महान संघर्षाने मला व मॉन्टेगोमेरीच्या पन्नास हजार नीग्रोंना दिलेल्या स्फूर्तीचं स्मरण म्हणून हे पुस्तक पाठवतो आहे.'
नेहरूंनी पुस्तकाची प्रत मिळाल्याची पोहोच देताना लिहिलं, 'तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल, विशेषतः तुम्ही ज्या त-हेने हे काम करत आहात, त्याबद्दल मला पूर्वीपासून रुची वाटत आली आहे. या पुस्तकातून मला त्याबद्दल सखोल माहिती मिळेल. त्यामुळे या भेटीचं स्वागतच आहे.' त्यांनी पुढे लिहिलं, 'तुम्ही भारतात येण्याची शक्यता असल्याचं मला समजलं. तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.'
किंग लवकरच भारतात जाणार होते. काका कालेलकर व राजकुमारी अमृत कौर यांच्यासह गांधींच्या इतर जुन्या सहकाऱ्यांनी या दौऱ्याचं नियोजन केलं. किंग आणि त्यांची पत्नी कोरेट्टा 10 फेब्रुवारी 1959 रोजी भारतात आले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांसमोर वाचलेल्या निवेदनात म्हटलं होतं की :
'मित्रांनो,
खूप पूर्वीपासूनच मला तुमच्या महान देशात येण्याची इच्छा होती.
इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जाऊ शकतो; पण भारतात मात्र मी यात्रेकरू म्हणून आलो आहे.
माझ्या लेखी, भारताचा अर्थ महात्मा गांधींशी जोडलेला आहे. महात्मा गांधी हे अनेक युगांदरम्यान जन्माला आलेलं खऱ्या अर्थाने महान व्यक्तिमत्त्व होतं.
माझ्या लेखी, भारताचा अर्थ पंडित नेहरूंशीही जोडलेला आहे. त्यांचं सुज्ञ राजकारणपटुत्व आणि बुद्धिमत्ता यांना जगभरात मान्यता आहे.'
किंग दाम्पत्याला नेहरूंनी 13 फेब्रुवारी 1959 रोजी तीन मूर्ती भवनावर संध्याकाळी भोजनासाठी निमंत्रित केलं. बोस्टन विद्यापीठात किंग यांची कागदपत्रं अभ्यासत असताना मला एक पानाचं टाइप केलेलं टिपण सापडलं. ते संपूर्ण टिपण पुढे देतो आहे :
किंग आणि नेहरू यांच्यातील संभाषणाच्या नोंदी
1. आजच्या जगातील अहिंसक सामाजिक परिवर्तनाची सद्यःस्थिती काय आहे?
अ) देशांतर्गत समस्यांच्या दृष्टीने
आ) आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने
2. देशातील लोकांचं कल्याण साधण्यासंदर्भातील भारताच्या विद्यमान संघर्षामध्ये गांधीवाद कितपत मौलिक आहे आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे?
अ) यात कोणते बदल आवश्यक आहेत ?
आ) औद्योगिकीकरण वा राष्ट्रीय संरक्षण यांच्याशी हे विजोड ठरतं का?
3. लोकशाहीशी बांधिलकी मानणाऱ्या एखाद्या राष्ट्राने सर्व लोकांना चांगलं जीवनमान मिळवून देण्यासाठीची प्रगती पुरेशा वेगाने कशी साधायची ? लोकांनी, लोकशाही सोडून अधिक वेगाने प्रगती साधणाऱ्या साम्यवादाची निवड करू नये, या दृष्टीने हा प्रश्न कसा सोडवायचा ?
अ) चीन की भारत ?
आ) आफ्रिका कोणत्या दिशेने जाईल ?
4. अमेरिकेतील नीग्रो लोक आणि भारतातील लोक यांच्यातील मैत्रीसंबंध कसे बळकट होतील?
अ) विद्यार्थी, प्राध्यापक व पत्रकार यांचं आदानप्रदान.
आ) अमेरिकेतील दक्षिणेकडच्या भागांना भारतीय नेत्यांनी भेटी देणं आणि नीग्रो नेत्यांनी भारताला भेटी देणं.
या टिपणाखाली संबंधिताची सही नसली तरी हे स्मरणपर टिपण खुद्द किंग यांनी लिहिलं असल्याचं जवळपास निश्चितपणे म्हणता येतं. दुर्दैवाने, किंग यांना नेहरूंशी जसा संवाद साधण्याची इच्छा होती, तसा प्रत्यक्षात साधला गेला नाही. त्या भोजनसमारंभाला इतरही पाहुणे होते, त्यामुळे या दोन व्यक्तिमत्त्वांना अत्यंत आस्थेच्या वाटणाऱ्या विषयांवर खाजगीमध्ये अधिक खोलवर बोलणं शक्य झालं नाही.
दिल्लीहून किंग दाम्पत्य तीन आठवड्यांच्या भारतदौऱ्यावर गेलं. या दौऱ्यात त्यांनी कलकत्ता, पाटणा, मद्रास व मुंबई या ठिकाणांना भेटी दिल्या. ते विविध अभ्यासकांशी व सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलले. तसंच साबरमती आणि सेवाग्राम इथल्या गांधीआश्रमांमध्ये जाऊन आदरांजलीही वाहिली. दिल्लीच्या वास्तव्यादरम्यान या जोडप्याला 'गांधी पीस फाउंडेशन'चे अध्यक्ष जी. रामचंद्रन यांनीही एकदा भोजनासाठी निमंत्रित केलं. या वेळी पंतप्रधान नेहरूंनाही बोलावण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने, त्या दिवशी आपण बाहेरगावी असल्याचं नेहरूंनी कळवलं. 'पण डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या कार्याला मी अभिवादन करू इच्छितो. त्यांना व त्यांच्या पत्नीला भेटून मला अतिशय आनंद झाला...', असंही नेहरूंनी रामचंद्रन यांना पाठवलेल्या उत्तरात नोंदवलं.
डॉ. किंग अमेरिकेत परतल्यानंतर 'फ्रंट पेज चॅलेन्ज' या कॅनडातील एका लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत झाली. मुलाखतकाराने त्यांना पहिल्यांदा गांधींचं त्यांच्यावर कोणतं ऋण आहे याबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देताना किंग म्हणाले की, गांधी हे निःसंशयपणे त्यांच्यासाठी मोठं प्रेरणास्थान आहेत, पण 'मानवी प्रतिष्ठेसाठीच्या कोणत्याही संघर्षात आदर्शाचं नियमन करताना प्रेम व अहिंसा या तत्त्वांचा अवलंब करावा, हा निष्कर्ष काढताना' त्यांना येशूच्या विचारांचाही आधार मिळाला. त्यानंतर मुलाखत जवाहरलाल नेहरूंकडे वळली. नेहरूसुद्धा अहिंसक वृत्तीचे आहेत का, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला. त्यावर किंग म्हणाले की, स्वातंत्र्याच्या
संघर्षामध्ये 'हिंसा अनैतिक व अव्यवहार्य ठरेल' यावर नेहरूंचा निश्चितपणे विश्वास होता, पण याबाबतीत ते त्यांच्या गुरूपासून भिन्न मत राखून होते. 'गांधी सर्व परिस्थितींमध्ये संपूर्ण अहिंसेवर विश्वास राखून होते; तर, नेहरू राष्ट्रांतर्गत परिस्थितीबाबतीत अहिंसेच्या तत्त्वावर विश्वास राखून असावेत; पण आंतरराष्ट्रीय संघर्षांबाबतीत प्रत्येक राष्ट्राने सैन्य दिमतीला ठेवायला हवं अशी त्यांची धारणा आहे', असं किंग यांनी नमूद केलं.
मार्टिन ल्यूथर किंग यांना जवाहरलाल नेहरूंविषयी अतीव आदर होता, त्याचप्रमाणे त्या वेळी तरुण असलेल्या किंग यांच्याविषयी नेहरूंनाही कौतुक वाटत होतं, हे मी उद्धृत केलेल्या या दस्तऐवजावरून दिसतं. आता या दोघांमधल्या कधीही होऊ न शकलेल्या संभाषणाकडे परत जाऊ. किंग यांनी नेहरूंशी कशाविषयी बोलायचंय, याबद्दलच्या नोंदी काढल्या होत्या, त्यावरून त्यांच्या नैतिक व राजकीय बुद्धिमत्तेची व्याप्ती लक्षात येते. त्यांनी नोंदवलेले चार मध्यवर्ती प्रश्न विचारात घेता येतील. एक, राष्ट्रांतर्गत सामाजिक दुफळी आटोक्यात ठेवण्याचं साधन म्हणून, तसंच राष्ट्राराष्ट्रांमधील राज्यक्षेत्रीय संघर्षांचं नियमन करण्याचं साधन म्हणून अहिंसेमध्ये कोणत्या शक्यता व सामर्थ्य आहेत? दोन, भारतातील सामाजिक व आर्थिक विकासाच्या अवकाशात गांधीवादी आदर्शाची प्रस्तुतता काय होती? तीन, व्यापक गरिबी संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या आशिया व आफ्रिकेतील नवस्वतंत्र देशांमध्ये लोकशाहीची राजकीय व्यवस्था अधिक अनुरूप होती की एकाधिकारशाहीची व्यवस्था अधिक अनुरूप होती? चार, एकंदरच भारतीय लोक आणि अमेरिकेतील काळे लोक यांच्यातील मैत्रीसंबंध दृढ कसे करता येतील ?
फेब्रुवारी 1959 मध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांना जवाहरलाल नेहरूंशी ज्या प्रश्नांविषयी चर्चा करायची होती, ते प्रश्न त्या काळाशी निगडित होते. तसंच हे प्रश्न आपल्या काळाशीही निगडित आहेत. आज, 2025 मध्ये सामाजिक व राजकीय वाद सोडवण्यामधील अहिंसेची भूमिका, लोकशाही व एकाधिकारशाही यांचे वेगवेगळे दावे, गांधीविचारांतील आर्थिक (आणि विशेषतः पर्यावरणीय) कल्पनांची प्रस्तुतता, तसंच भारत-अमेरिका संबंधांचं वर्तमान व भवितव्य, हे सर्व अत्यंत कळीचे प्रश्न आहेत.
नेहरू आणि किंग यांच्यात या विषयांवर सविस्तर बोलणं झालं असतं तर ते न भूतो न भविष्यती स्वरूपाचं ठरलं असतं. कारण, दोघांनाही इतिहासात व राजकीय सिद्धान्तांमध्ये सखोल रुची होती. दोघांचंही वाचन असामान्य होतं. दोघेही स्वतःचे विचार काळजीपूर्वक व स्पष्टपणे मांडत असत. नेहरूंनी चीनच्या एकपक्षीय राज्यसंस्थेविरोधात भारतातील बहुपक्षीय लोकशाहीची बाजू कशी मांडली असती, असा विचार मनात येतो. किंग यांनी नेहरूंच्या आर्थिक धोरणांबाबतीत प्रश्न उपस्थित केले असते का? तुटपुंजं भांडवल आणि मुबलक कामगारवर्ग असलेल्या भारतासारख्या समाजात अवजड उद्योगांवर भर देणं गांधीविचाराला फाटा देणारं आणि सुज्ञतेला धरून नसणारं होतं, असं किंग यांनी कदाचित नेहरूंना सुचवलं असतं का? भारत व अमेरिका यांच्या गतकालीन व भविष्यातील संबंधांबद्दल त्यांनी कोणती मतं मांडली असती? हे संभाषण एखाद्या टप्प्यावर राजकीय अवकाशाकडून व्यक्तिगत अवकाशाकडे वळलं असतं का? मग नेहरू आणि किंग यांनी प्रेम, कुटुंब, विवाह यासंदर्भातही मतांची देवाणघेवाण केली असती का ?
यासंदर्भात इतिहासकाराला केवळ अनुमानच बांधता येईल. परंतु, सर्जनशील लेखक या अनुमानांमधून कलाकृती घडवू शकतात. एखादा प्रतिभावान नाटककार किंग यांनी नेहरूंसाठी काढलेल्या प्रश्नांच्या टिपणांवरून नाटक लिहू शकतो. आपल्याला ऐतिहासिक नोंदींमधून जे काही कळतं, त्यातील प्रेरणेला बाधा न पोहोचवता त्यापलीकडे जाणारे संवाद अशा नाटकात लिहिले जाऊ शकतील. या नाटकात केवळ दोनच अभिनेते असतील साठीच्या उत्तरार्धात असणारा भारतीय आणि तिशीतील अमेरिकी, असे दोन अभिनेते आणि दोनच अंक. पहिला अंक नवी दिल्लीतील पंतप्रधान नेहरूंच्या दिवाणखान्यात घडेल, आणि दुसरा अंक त्यांच्या भोजनाच्या जागेवर घडेल. हे नाटक भारतीय किंवा अमेरिकी असलेल्या, किंवा त्याहून चांगलं म्हणजे भारतीय-अमेरिकी असलेल्या एखाद्या नाटककार व्यक्तीला लिहिता येऊ शकेल.
भाषांतर : प्रभाकर पानवलकर
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या