गोव्यात पोर्तुगीज प्रभावामुळे व कॅथोलिक लोकांच्या आवडीमुळे वेगवेगळ्या प्रकारचं पाश्चात्त्य संगीत अस्तित्वात आहे. गोव्याचे संगीत कंपोजर अॅन्थनी गॉन्साल्वीस हे माजोर्डा गावचे. त्यांनी भारतीय फिल्म सृष्टीसाठी संगीत अॅरेंजमेंट दिलं. 1965 मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यांचं योगदान फार मोठं आहे. भारतीय पोर्तुगीज गायक रेमो हे सुप्रसिद्ध पॉप, रॉक गायक आहेत. मांडो, धुल्पदां ही कॅथोलिक बांधवांमधील लोकप्रिय लोकगीतं आहेत. 'फुगड्यो', 'धालो', 'होंवयो' हे हिंदू महिलांचे लोकप्रिय लोकगीत प्रकार आहेत. त्यांच्याही स्पर्धा शासकीय पातळीवर होत आहेत व मजकुराचं दस्तऐवजीकरणही पहिल्यांदाच होऊ लागलं आहे.
गोव्याच्या कणाकणांत संगीत भरलेलं आहे. ताल, लयकारी, सुरावट, ठेका यांची स्पंदने, कंपने गोमंतकीय भूमीच्या संपन्न निसर्गातही ऐकू येतात. लहानपणी वृद्ध असं म्हणायचे की, गोव्यातील लहान मुलं रडू लागतात तेव्हा ती सहसा बेसूर रडत नाही, विशिष्ट सुरातच रडतात.
खूप मोठे गायक, वादक, कलाकार गोव्याच्या भूमीने दिले. अनेक मैफली आम्ही ऐकल्या, अनुभवल्या व महान कलाकारांना जवळून पाहिले.
फोंडा तालुक्याच्या केरी या निसर्गसंपन्न गावात शास्त्रीय गायिका सुरश्री केसरबाई केरकर यांचं घर आहे. त्या घरात त्यांच्याच नावाने एक स्कूल चालतं. मुख्य दर्शनी भाग अगोदर होता तसाच मुद्दामहून दगडी ठेवला आहे. त्या स्कूलमध्ये गेल्यावर केसरबाई केरकर यांच्या रियाझाचे सूर एक वेगळाच नूर घेऊन तिथं आवतीभोवती खेळत तर नाही ना असं वाटतं. हा गावच झाडं, वेली, पाणी यांनी भरलेला. केसरबाईंच्या वाड्यासमोर रस्त्यालगत एक छोटीशी तळी आहे. सभोवती गर्द हिरवाई. माड, पोफळी व इतर वनस्पती. हा निसर्ग या महान गायक, गायिकांना, कलाकारांना रियाझासाठी एक ऊर्जा आणि प्रेरणा देत असावा.
लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर हे गुडी पारोडा नजीकच्या पर्वत गावचे. विविध तालांबरोबर अनेक मात्रांचे ताल, लीलया व सहज बद्ध करण्यात निपुण. त्यांची ख्याती थोर. सतार वादक पं. रवी शंकर एकदा गोव्यात आले होते. तेव्हा ते कला अकादमी, पणजीचे तत्कालीन तबला प्रशिक्षक तारानाथ यांना घेऊन त्यांच्या घरी गेले. तद्वंतर त्यांनी जो ध्वनी बाइट दिला, 4 मिनिटांचा, त्यावरून खात्रुमामची महती कळते.
खात्रुमाम घराण्याच्या लयकारीचा वसा पुढे चालू ठेवला तो नंदकुमार पर्वतकर या तबलावादकाने. ते आकाशवाणीच्या सेवेत होते. गोव्याचे एक उत्कृष्ट तबलापटू, पखवाजसुद्धा छान वाजवायचे.
कवळ्याला श्री शांतादुर्गा मंदिर आवारात सम्राट संगीत संमेलन डिसेंबरमध्ये तीन दिवस व्हायचं. त्यात इतर राज्यांत स्थायिक गोवेकर व इतर ख्यातनाम गायक, गायिका यांना आमंत्रित करत. एकदा किशोरीताई आमोणकरांची मैफील होती. तिथं अनेक तबलजी असूनही ताईंनी साथीसाठी नंदकुमारांची पसंती दाखवली. शेवटची ठुमरी नंदकुमारांनी इतकी गोड वाजवली, रसिकांना डोलवलं की, ताई त्यांना 'वाजय रे नंदू, वाजय' असं खुशीत म्हणतच होत्या. या संगीत संमेलनातून हौशी होतकरू कलाकारांची संस्कारिता घडली. कला अकादमीच्या सूरश्री केसरबाई केरकर संमेलनात दिग्गज कलाकार येऊन गेले. सध्या ते संमेलन होत नाही. गिरिजाताई केळेकर या गायिकेच्या नावाने अजूनही फर्मागुडीला संगीत संमेलन होतं. गोमंतकीय मंचावर संगीताची जाण असलेल्या दर्दी गुणग्राहक
रसिकांसमोर गाणं पेश करणं, दाद मिळवणं हा अनोखा आनंददायी अनुभव असतो, असं सर्व कलाकार सांगतात.
किशोरीताईंचं गाणं कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होतं. केसरबाई केरकर संमेलनात ताईंनी त्या दिवशी यमन गायला. सव्वा तास की दीड तास आठवत नाही; पण अख्खं सभागृह ताईंनी अंतरीक्षातून विमानयान घेऊन जावं तसं वर उचललं. तो यमनविहार जीवनातील आजपर्यंतचा सर्वोच्च होता. यमनचे इतके पॅटर्न, विभ्रम, आयाम असू शकतात, या शक्यता आमच्यासारखे सामान्य रसिक पहिल्यांदाच अनुभवत होते. किशोरीताईंची अद्वितीय खुबी ती ही.
आपल्या आई व गुरू मोगुबाई कुर्डीकर यांच्याविषयी किशोरीताईंचं अफाट प्रेम कायम दिसलं. त्यांनी एकदा पणजीत आठवड्याभराची कार्यशाळासुद्धा घेतली. मार्गदर्शन केलं.
गोव्याचेच दीनानाथ मंगेशकर यांनी हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले हे फार मोठे कलाकार जगाला दिले. अंजनीताई मालपेकर, रत्नकांत रामनाथकर यांच्या नावे दरवर्षी गोव्यात संगीत संमेलने आयोजित केली जातात.
गोव्याची तबल्याची समृद्ध परंपरा दीर्घ आहे. सावई वेरेचे मलबाराव सरदेसाय हे ताल लयीची समीकरणे मांडणारे फार मोठे जाणकार होते. नागेशीचे पंढरीनाथ नागेशकर, श्रीपाद नागेशकर व विभव नागेशकर यांचं तबला वादन नागेशीच्या देवळात ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले. यशवंत केरकर यांचा एकल तबला लहानपणी मडगावला ऐकला होता तो कानांत आहे. पाव मात्रेची लय हलली, चुकली, घसरली तर प्रलय होतो ही शिकवण, इशारा आम्हांला या लयकारीच्या संस्कारितेने दिला.
हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर बोरीचे. त्यांची संवादिनी ऐकणं हा एक रसिला अनुभवच होता. आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या 'मनपसंत गीते' या कार्यक्रमासाठी त्यांची ट्यून (धून) वाजवून ध्वनिमुद्रित केली होती, जी अनेक वर्षे म्हणजे रेडिओच्या सुवर्णकाळात गोवेकरांनी ऐकली.
पं. जितेंद्र अभिषेकी हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. संगीताविषयी अपार निष्ठा. चिंतक कलाकार. मंचावर बसणंच एखाद्या योगी पुरुषासारखं. गांभीर्यही तसंच. गाणं सुरेल. लयीच्या झोपाळ्यावर श्रोत्यांना बसवून डोलवल्यासारखा अनुभव देणाऱ्या बुवांच्या अनेक मैफली आम्ही ऐकल्या. नाट्यसंगीताला एक विलक्षण वळण अभिषेकींनी दिलं. कट्यार काळजात घुसली असो की मत्स्यगंधा, महाराष्ट्राला व गोव्याला त्यांनी नाट्यगीतांच्या अप्रतिम संगीताचा व चालींचा अजरामर नजराणा दिला. ते फार थोर प्रतिभावान संगीत रचनाकार होते. बाकीबाब बोरकरांचं 'पांयजणां' व इतर कोंकणी गीतेही त्यांच्या आवाजात रेडिओ ऐकवतो. त्यांचं 'अबीर गुलाल' भजन जितकं प्रसिद्ध आहे तितकीच काही कोंकणी गीतेही त्यांनी संगीत देऊन गायली, जी लोकप्रिय आहेत. 'हात्या भशेन हात गो तुजे गोरे गोरे पान' (केवड्यासारखे हात तुझे, अगदी गोरे गोरे पान) हे त्यांचं गीत आकाशवाणीवरून अजून ऐकू येतं.
गोव्यातील भजनी परंपरा जरा आगळी आहे. या भजनी वारशाची पद्धतशीर बुनियाद मनोहरबुवा शिरगावकर यांनी घातली. नरहरी वळवईकर, दत्ताराम वळवईकर, हार्मोनियम वादक मुकुंद मडकईकर, रामनाथ मठकर व इतर अन्य कलाकारांनी या भजनी कलेच्या बीजाचं संगोपन करून गावागावांत कलाकार घडवले. आज कला अकादमीतर्फे दरवर्षी भजनी स्पर्धा होते. सर्वसाधारण, महिला व बाल अशा तीन विभागांत ही स्पर्धा होते. त्याला कायम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. संगीतातून एकात्मता व महिला सशक्तीकरण उत्तम प्रकारे साध्य झालं आहे. विशेष करून पखवाज हे वाद्य या स्पर्धेमुळे टिकून उरलं आहे. युवा पिढी त्यात सामील होते हे समाधानकारक.
'घुमट' हे मातीच्या कळशीसारखं व एका बाजूला चामडं असलेलं बाराव्या शतकातील वाद्य. त्याचबरोबर कांसाळे (मोड्डी झांज), बारीक काठ्या घेऊन वाजवतात ते समेळ (संबळ) चर्मवाद्य, यांच्या साथीने घुमट आरती स्पर्धा होतात. हल्ली मोठ्या प्रमाणात युवा पिढी या स्पर्धांत सहभागी होते. त्यामुळे या लोककला प्रकाराबरोबरच ही वाद्येही टिकून राहिली आहेत. मडगावचा दिंडी उत्सव व वास्कोच्या दामोदर सप्ताहात भजनं कायम गायली जातात. निसर्गाबरोबरच गोव्यात मंदिरांनीही भजन भक्तिसंगीताचं संगोपन करण्यास मौल्यवान भूमिका बजावली आहे. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सणांप्रसंगी भजनं होतात.
गोव्यात नाटकांची उज्ज्वल परंपरा आहे. संगीत नाटकांचीही. शासनाद्वारे दरवर्षी महिला संगीत नाटक स्पर्धा होते यावरून कल्पना यावी. प्रभाकर कारेकर, रामदास कामत, अजित कडकडे, प्रसाद सावकार व इतरांनी नाट्यसंगीताच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. प्रभाकर कारेकर यांनी शास्त्रीय संगीतातही नाव कमावलं.
गोव्यात पोर्तुगीज प्रभावामुळे व कॅथोलिक लोकांच्या आवडीमुळे वेगवेगळ्या प्रकारचं पाश्चात्त्य संगीत अस्तित्वात आहे. गोव्याचे संगीत कंपोजर अॅन्थनी गॉन्साल्वीस हे माजोर्डा गावचे. त्यांनी भारतीय फिल्म सृष्टीसाठी संगीत अॅरेंजमेंट दिलं. 1965 मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यांचं योगदान फार मोठं आहे. भारतीय-पोर्तुगीज गायक रेमो हे सुप्रसिद्ध पॉप, रॉक गायक आहेत. मांडो, धुल्पदां ही कॅथोलिक बांधवांमधील लोकप्रिय लोकगीतं आहेत. 'फुगड्यो', 'धालो', 'होंवयो' हे हिंदू महिलांचे लोकप्रिय लोकगीत प्रकार आहेत. त्यांच्याही स्पर्धा शासकीय पातळीवर होत आहेत व मजकुराचं दस्तऐवजीकरणही पहिल्यांदाच होऊ लागलं आहे.
गोव्यातील कॅथॉलिक बांधवांच्या तियात्र नाट्यप्रकारातील 'कांतांरां' लोकप्रिय आहेत. लॉर्ना, ख्रिस पॅरी, आल्फ्रेड रोज-रीता रोज व इतरांनी कांतांरां जगभर स्थायिक गोवेकरांपर्यंत पोहोचवली. काणकोणची 'गुडुलींगीतां' व जागर लोकप्रकारातील संगीत नाट्य ही लोकगीते अजूनही आपलं तेज राखून आहेत. नवी पिढीही त्यात उत्साहाने सहभागी होते, ही आनंदाची गोष्ट.
'चान्याच्या राती माडाचे सावळेंत', हे उदय भेंब्रे यांचं गीत समूह अॅन्थम म्हणावं इतकं लोकप्रिय आहे. गोव्यातील कॅथॉलिक व हिंदू समाज समन्वयाने नांदतात याचं चित्रण या गीताच्या शब्दाखालच्या अंतःप्रवाहात दिसतात. आणखीन एक गीत आहे ज्याच्या शब्दाशब्दांत गोव्यातील धार्मिक सलोखा प्रतीकरूपांनी दर्शवला आहे. शंकर भांडारी यांचं हे गीत. ओळी अशा -
'गोड गोड गोड गळ्यान गोमटें गोंय गायता.
संगीताच्या निजान ताच्या निर्मितल्याक होरायता.'
(गोजिरवाणा गोंडस गोवा आपल्या कमालीच्या गोड कंठाने गात आहे. आपलं नीज संगीत लेऊन निर्मात्याला आर्त साद घालत आहे.) या गीतात एका कडव्यात 'मांडवीची मांदोलिनां आणि झुवारेचीं पांयजणां' ही शब्दलेणी चपखल बसवली आहेत. 'मांडवी', 'झुवारी' या गोव्याच्या नद्या. मांदोलिनां इथं कॅथोलिक बांधवांसाठी व पैंजण (पांयजणां) हिंदू बांधवांचं वाद्य अशी सुंदर प्रतीकं त्यात आहेत.
गाणं हा गोव्याचा स्थायीभाव. संगीत ही वृत्ती. गाऊ दे. गोव्याला गाऊ दे. गाण्याच्या सुरांचं शिंपण श्रुति-विश्वाचा गुरुत्व बिंदू भेदून जाऊ दे. हृदयाकाशात परावर्तित होऊन त्या सर्जनशील नादब्रह्माची उपजलेली प्रकाशवलये दाही दिशांना पसरत जाऊ दे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या