21 ऑगस्ट 1941 ते 18 जुलै 2026 असे जवळपास 85 वर्षांचे आयुष्य कुमार सप्तर्षी यांना लाभले. वयाच्या पंचविशीमध्ये त्यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली आणि त्यानंतर साठ वर्षे ते सार्वजनिक जीवनात कार्यरत होते, हे सर्वांना माहीत आहे. मात्र वयाच्या पंचविशीपूर्वी कुमार सप्तर्षी कसे होते आणि पंचविशीनंतरचे फारसे माहीत नसलेले कुमार सप्तर्षी कसे होते, याचे विहंगम चित्र त्यांचे बंधू प्रवीण सप्तर्षी यांनी रेखाटले आहे. या लेखातून कुमार सप्तर्षी यांचे वेगळेच दर्शन घडते, पुन्हा पुन्हा अचंबित व्हावे लागते, नतमस्तक व्हावेसे वाटते.
माझा मोठा भाऊ कुमार सप्तर्षी लोकनेता झाला, जननायक बनला. त्याने चाळीस-पन्नास यशस्वी आंदोलने केली. तरुणाईला प्रेरित केले. ग्रामीण आणि शहरी, सुशिक्षित आणि अशिक्षित वर्गाला प्रोत्साहित केले. वेठबिगारापासून, विद्यापीठांचे कुलगुरू ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा विविध स्तरांतील लहान-थोरांचा आदर त्याने मिळवला. त्याच्या जडणघडणीत अनेक ध्येयवादी नेत्यांचा आणि असंख्य ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे. पण बालवयातच त्याची नियत कशी घडत गेली, याचा मी एक साक्षीदार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील, कर्जत तालुक्यातील, खेड या गावात आमचे वडील 1938 मध्ये सरकारी डॉक्टर म्हणून आले. त्या काळात संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात खूप कमी डॉक्टर असायचे. त्या डॉक्टरांना पंधरा रुपये मासिक पगार असायचा. पण गावात ते चांगल्या आर्थिक स्थितीत असायचे. 1939 मध्ये त्यांचं लग्न झालं. माझी आई नगर जिल्ह्यातील शेवगावची. तिचे वडील म्हणजे माझे आजोबा बापू मास्तर, ते बाळासाहेब भारदे यांचे मित्र. बाळासाहेबांना नगर जिल्ह्यात सद्गुरु तर शेवगावमध्ये दादा म्हटले जायचे, मात्र आम्ही त्यांना मामा म्हणायचो. 1941 मध्ये कुमारचा जन्म आई वडील खेडला असताना झाला. त्यानंतर खेडवरून आमच्या वडिलांची बदली राशीनला झाली. माझा आणि अन्य चार भावंडांचा जन्म राशीन येथे झाला.
भाऊ राशीन येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिकला. वडील स्वतः त्याला घरी शिकवायचे, त्यामुळे त्याच्या एका वर्षात दोन इयत्ता झाल्या. आठव्या वर्षीच तो चौथी पास झाला. पुढे काय ? वडिलांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. लाडक्या मुलाला पाचवीपासूनच नगरला पाठवलं. वडील अनाथ होते, त्यांना ज्यांनी सांभाळलं होतं त्या पापा हातवळणे यांच्याकडे भाऊला ठेवलं. त्यांना एक मुलगा, त्यांना आम्ही ओम काका म्हणायचो. त्यांची एक बाल विधवा बहीण घरात होती, तिची शिस्त फार कडक. त्यामुळे, भाऊचे अकरावीपर्यंतचे शिक्षण कडव्या शिस्तीत आणि पापांच्या प्रेमळ सहवासात झाले. पापांकडून आणि आमच्या वडिलांकडून त्याने जिव्हाळा घेतला, तो शेवटपर्यंत त्याच्यात राहिला. कोणत्याही कार्यकर्त्याला विचारा, जिव्हाळा हा एक कॉमन डिनोमीनेटर लक्षात येईल.
आम्ही धाकटी भावंडं तिसरी-चौथीत शिकत होतो, तेव्हा भाऊ मॅट्रिकला होता. मी तिसरी-चौथीत असतानाची एक गोष्ट आठवते. माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आमच्या गावी आले होते. एका वर्षात दोन इयत्तांचा प्रयोग माझ्यावरही झाला होता, त्यामुळे मी आणखीच लहान. मला भाषण करायला सांगितले गेले. यशवंतरावांच्या समोरील टेबलाजवळ उभे राहून मी बोलू लागलो. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन मला उचलून टेबलावर उभे केले. सर्वांना विशेषतः वडिलांना एकच चिंता. हा पाठ झालेले भाषण विसरला तर काय होईल? पण मी न डगमगता मलेरिया निर्मूलनाचे महत्त्व (वडिलांनी सांगितल्याप्रमाणे) बोललो. आणि "आम्हाला सातवीपर्यंतची शाळा या गावातच हवी", हे भाऊने सांगितल्यानुसार बोललो. आणि काय गंमत. नंतर लगेच आमच्या गावात सातवीपर्यंतची शाळा झाली. स्वातंत्र्य चळवळीतला मुख्यमंत्री असला की आश्वासन पूर्तता कशी लवकर होते, हे त्या वेळी फारसे समजले नाही, पण आजच्या काळात फार भावते. मला आणि दोन बहिणींना सातवीपर्यंत गावातच शिकायला मिळाले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील गावात आले, तेव्हा आमच्या घरीच उतरले. त्यांनी गावात आठवी ते अकरावी हायस्कूलही सुरू केले.
भाऊ सुट्टीत घरी यायचा तेव्हा, नगरला जे पाहिले ते आपल्या गावात असावे अशी त्याची जबरदस्त इच्छा असायची. लहान वयात आई-वडिलांपासून दूर राहण्याचे दुःख त्याच्या मनावर कोरलेले असावे. (पुढे खेडच्या मुलींनी त्याला हायस्कूल काढण्याची विनंती केली, तेव्हा त्याने ती शून्य मिनिटात मान्य केली आणि काढलेही. परवानगीसाठी थेट मुख्यमंत्री वसंतदादांची भेट घेतली. सगळी कामे त्या काळात सुरळीत होत असत. सरकार विरोधी अनेक आंदोलने करण्याची पार्श्वभूमी असलेल्या भाऊला वसंतदादांनी परवानगी दिली. आणि 7 जून 1984 रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय खेडला सुरू झाले.)
भाऊ 1960 साली नगर कॉलेजमधून बीएससीच्या द्वितीय वर्षासाठी पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये आला. त्यानंतरच्या वर्षी दोन नंबरचा अनिल प्रीडिग्रीला फर्ग्युसनमध्ये होता, तिसरा भाऊ सतीश अकरावी पास झाला. तेव्हा लता, मंगल, प्रवीण यांनाही पुण्याच्या शाळेत आणण्याचा प्रस्ताव भाऊने वडिलांना दिला, त्यांनी तो मान्य केला. 'कॉलेजला असलेल्या तिघांचा हॉस्टेल आणि मेस खर्च करण्यापेक्षा, त्या खर्चात एक बंगला भाड्याने घेऊन आम्ही सर्व जण आईसह इथे राहू शकू,' हे त्याने वडिलांना पटवून दिले. मग मला मॉडर्न हायस्कूलमध्ये, तर दोन्ही बहिणींना भावे हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. त्या वेळी आम्ही राजेंद्रनगरमधील स्वानंद बंगल्यात राहत होतो. नवीन कॉलनी होती. मागे आंबील ओढा. साप निघायचे. साप दिसला की लोक ओरडायचेः सप्तर्षीपैकी कोणीतरी या. आमच्यापैकी कोणीही अगदी लहान बहीण मंगलसुद्धा धावत जाऊन साप मारायची. भाऊने आम्हाला विषारी साप कसा ओळखायचा आणि कोणती काळजी घ्यायची याची शास्त्रशुद्ध माहिती दिली होती.
माझ्यावर भाऊचे अतोनात प्रेम. आमच्यात नऊ वर्षांचे अंतर. म्हणजे मी चार वर्षांचा असताना तो तेरा वर्षांचा होता, तेव्हा हे खूप मोठे अंतर वाटायचे. मला सायकल शिकवणे, पोहायला शिकवणे भाऊनेच केले. मुख्य म्हणजे वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी मला मराठी आणि इंग्रजी लिहिता यायला लागले, ते भाऊने शिकविले. तो बोटाने माझ्या पाठीवर अक्षरे व अंक लिहायचा आणि ते मी पाटीवर लिहायचो. माझा हात हातात घेऊन त्याने गिरविले नाही, तर ते माझ्या मज्जासंस्थेत बसविले. त्यामुळेच कदाचित, माझे अक्षर बऱ्यापैकी चांगले आहे.
मी चौथीत होतो तेव्हा वडिलांनी राशीनमध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला, वर्ष 1958. वडील 1938 मध्ये नोकरीला लागले होते, पुढील वीस वर्षे आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. प्रॉपर्टी करायची नाही, जमीन घ्यायची नाही हे त्यांचं तत्त्व. त्यांच्यावर गांधीजींच्या तत्त्वाचा प्रभाव होता. त्यांचे नगरचे मित्र भाटिया हे इंजिनियर होते, त्यांनी स्लॅबचे घर बांधण्याचा सल्ला दिला. त्यासाठी लागणारे एक ट्रक सिमेंट कुठून आणायचे असा प्रश्न होता. त्या वेळी ब्लॅकने सिमेंट विक्री चालू होती. तेव्हा भाऊ केवळ सतरा वर्षांचा होता. पण त्याने जबाबदारी घेतली. मुंबईला गेला, मंत्र्यांना भेटला, ओळख सांगितली, गळ घातली, सिमेंटचा परवाना घेतला, स्टॉकिस्टला दिला. काही पैसे कमी पडले होते, तर वडिलांच्या ओळखीच्या पुण्यातल्या व्यापाऱ्याकडून घेतले आणि सिमेंटचा ट्रक भरून तो राशीनला घेऊन आला. गावातलेच काय, भाटियांच्या ओळखीचे नगरचे व्यापारीसुद्धा अचंबित झाले. मला वाटतं, येथूनच सरकारशी बोलण्याची आणि सरकारी कामकाजाच्या रियाजाची त्याने सुरुवात केली, ती अखेरपर्यंत. कोणाही सरकारी अधिकाऱ्याला मग तो सचिव असो की पोलीस कमिशनर तो आपले काम पटवून द्यायचा आणि करून घ्यायचा. मुख्य म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याशी कितीही उलट-सुलट चर्चा झाली तरी अखेरीस तो अधिकारी भाऊच्या प्रेमात पडायचा.
'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी' या म्हणीप्रमाणे भाऊच्या मनात सतत राशीन हे गाव असायचे. अहमदनगरला नगर कॉलेजमध्ये असताना त्याने होमगार्डचे प्रशिक्षण घेतले होते, सुट्टीत राशीनला आला की तो तेच ट्रेनिंग त्याच्या बालमित्रांना द्यायचा. तेव्हा त्याने एक कार्यक्रमही दिला. आमच्या गावात दसऱ्याला मोठी जत्रा भरते, त्यामुळे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत गावात गर्दी असते. भाविकांना थंड पाणी मिळावे या हेतूने रांजण, ग्लास, ओरगाळे (राशीनच्या भाषेत वगराळे) ठेवून लोकांची सोय करावी. प्रस्ताव अर्थात मालकांपर्यंत गेला. गावचा एक मालक असतो, सरंजामशाहीत असेच असते. तेम्हणाले, "कुमार, हे काय खूळ घेऊन बसलास ? अशा सोयी केल्या तर लोक माजतील, पुढे जेवणही मागतील.” तिथून मालकशाहीशी भाऊचा खरा संघर्ष सुरू झाला. तेव्हापासून भाऊ समजून गेला की भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण ते इथपर्यंत पोहोचले नाही. कारण स्पष्ट होते. जे सरंजामदार मोगल काळात मोगलांचे होते, तेच सरंजामदार पेशवाईच्या काळात पेशव्यांचे झाले आणि ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांचे झाले. ब्रिटिश गेल्यानंतर काँग्रेसचे झाले. सध्या ते भाजपामध्ये आहेत. यालाच तो म्हणायचा, "क्रांतीच्या पोटातच प्रतिक्रांतीची बीजे असतात.” याबाबत रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन, बाळासाहेब भारदे इत्यादी जवळच्या विचारवंतांशी चर्चा करायचा. त्यांची एक शिकवण होती, 'गावगाड्याला हात घालण्यापूर्वी तू सक्षम बनला पाहिजे, नाहीतर हकनाक बळी जाशील.'
मालकशाही विरोधात भाऊने प्रबोधन करायचे ठरवले. एक कल्पक विचार त्याच्या मनात आला. आमच्या दुष्काळी भागात पारधी समाज फार होता. त्यातील अनेक लोक चोऱ्या करायचे, दरोडे घालायचे. त्यांच्याबद्दल जनमानसात भीती होती. म्हणून भाऊने पारध्यांचा मेळावा घेतला. दोन महिने सायकल यात्रा व पदयात्रा काढून त्याने संघटन केले. पारध्यांशी संवाद साधला, विश्वास संपादन केला. सुमारे दोन हजार पारध्यांचा एक दिवसाचा मेळावा राशीनला शाळेच्या आवारात घेतला. धान्य व भाजीपाला गोळा करून त्यांच्याकडूनच स्वयंपाक करून घेतला. भाऊचे कार्यकर्ते आणि पारधी एकत्र जेवले. चर्चा केली. संध्याकाळी पाच वाजता भाऊचे समारोपाचे भाषण दीड-दोन तास चालले. पारध्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्याने अशा पद्धतीने मांडल्या की, तो त्यांचाच झाला होता. शेवटी निष्कर्ष स्पष्ट केला. 'आजपर्यंत चोऱ्या केल्या, त्यात तुम्हाला परतावा (नफा) मिळाला का?' सभेचे उत्तर, 'नाही मिळाला.' भाऊचा प्रश्न, 'का नाही मिळाला?' सभेचे उत्तर, 'रुपयातले आठ आणे मालकाला, चार आणे हवल्यांना आणि आम्हाला चार आणेच फक्त. रुपयातले सोळा आणे मार फक्त आम्हाला.' रिस्क आणि प्रॉफिट शेअरिंग कसे विसंगत आहे, हे तत्त्व निरक्षर लोकांना समजावून देण्याची भाऊची ही आगळीवेगळी पद्धत तेव्हापासून सुरू झाली. शेवटी त्याने पारध्यांना शपथ दिली, "आजपासून आम्ही चोरी करणार नाही." तिथेच मालकशाहीचा एक पंख छाटला गेला. ही किमया साधणारा माझा भाऊ कसा घडला, हे मी पाहत होतो. तसेच गावातील तरुणाईही पाहत होती. त्यामुळे भाऊला कार्यकर्त्यांचे बळ मिळू लागले.
पुण्यात आल्यावर भाऊ बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये आणि मी एस.पी. कॉलेजमध्ये होतो, तेव्हा भाऊचा गोतावळा बराच वाढलेला होता. युथ ऑर्गनायझेशनच्या मीटिंगा होत असत. पुण्याजवळ नांदेड गावी (आताची नांदेड सिटी) आम्ही दर रविवारी जात असू. मेडिकलची मुलं औषधपाणी करायचे, तर आम्ही सर्वेक्षण. चर्चा म्हणजे 'टकुऱ्याला टकुरं घासणं' सातत्याने व्हायचं. 'बिहारच्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी या', अशी हाक जयप्रकाश नारायण यांनी दिली. तेव्हा युथ ऑर्गनायझेशनमध्ये ठरले, 'जायचे, पण बिहार रिलीफ कमिटीकडून पैसे घ्यायचे नाहीत. आपण गोळा करायचे.' कसे? बूट पॉलिश करून, गाड्या पुसून, वेटरचे काम करून इत्यादी मार्गांनी. शंभर तरुण-तरुणी या कामाला लागले. पैसे तर गोळा झालेच, पण आम्ही खऱ्या अर्थाने डी-क्लास आणि डी-कास्ट होण्याच्या प्रक्रियेतून गेलो. त्यानंतर चार-पाच जणांच्या बॅचने एक एक महिना किंवा पंधरा-पंधरा दिवस असे करून आम्ही तीस-चाळीस जण बिहारला जाऊन आलो. महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा अनेकांचा हा पहिलाच अनुभव होता. भाऊ पहिल्या बॅचमध्ये होता, रजौली नावाच्या खेड्यात ते राहिले. मेडिकल ट्रीटमेंट दिली. रोज एक वेळ जेवण द्यायची व्यवस्था होती. दुसऱ्याची भूक भागविणे हाच धर्म, हाच परमेश्वर, याची प्रचिती आली. त्याच काळात तेथेही गौरीबाबू नामक मुखिया होता. त्याच्याकडे दोन हत्ती पाळलेले होते. चाळीस माणसांना पुरेल एवढे धान्य एका हत्तीला लागायचे. दुष्काळ ही असमानी आपत्ती असली तरी मानवनिर्मित आपत्ती निरंतर कशी चालू असते, हे भाऊने आम्हा सर्वांना दाखवून दिले. याबाबत जेपी, विनोबा, करपुरी ठाकूर इत्यादी नेत्यांशी चर्चा करूनच तो परतला. मला वाटते, येथेच युवक क्रांती दलाच्या स्थापनेची बीजे रुजू लागली होती.
आमची बिहारवरून आलेली शेवटची बॅच. त्यात दिलीप भंडारे, संप्रसाद विनोद आणि मी होतो. तिथे आमच्यावर ट्यूबवेल तयार करण्याचे काम सोपवले होते. अनेक खेड्यांत हिंडलो. मंत्र्यांना भेटलो. कुमार सप्तर्षांचे कार्यकर्ते म्हणून ते आमचे खूप कौतुक करायचे. विनोबांनी आमची ओळख, "ये पूना के लोग बहुत अच्छे है, कुमारने इनको प्रेरित किया है, ये लगातार छे महिने बिहारमें कार्यरत है", अशा शब्दांत जमलेल्या लोकांना करून दिली. ते संप्रसादच्या वडिलांनाही (धुंडीराज शास्त्री विनोद) ओळखत होते. आम्ही मुक्कामाला जेव्हा जेव्हा सदाकत आश्रमात राहायचो, तेव्हा तेव्हा जेपींच्या खोलीतच झोपायचो. मी एकदा कण्हत होतो, तेव्हा 'बच्चा थक गया है' असे म्हणून त्यांनी आईच्या मायेने माझे पाय चेपले होते.
हा जिव्हाळा मी भाऊमध्येही अनुभवला होता. एकदा मी टायफॉईडने आजारी होतो. घरीच उपचार होत होते, पण ताप उतरेना. मग ससूनमध्ये अॅडमिट झालो, सुमारे तीन आठवडे तिथे होतो. रोज रात्री भाऊ झोपायला असायचा. तेव्हा तो तिथे तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मोठमोठे डॉक्टर्स, अगदी डॉ. सरदेसाईसुद्धा मला तपासायचे. तेथे त्याचे खूप मित्र होते, ते माझ्याही ओळखीचे झाले. दाणी, बाळ मुळे, अशोक दीक्षित, तावरे, अनिल अवचट इत्यादी. हे सर्व पुढे प्रथितयश डॉक्टर झाले. अनिल अवचट मात्र युक्रांदमध्येच रमला. भाऊचा हा मोठा मेडिकलचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून होता, त्यात त्याचे सरही होते. मुख्य म्हणजे त्याने बी.जे. मेडिकल कॉलेजचे डीन मेंडोसा यांच्या विरुद्ध आंदोलन केले होते, तरीही नंतर त्यांच्याशी संबंध प्रेमाचेच राहिले. कुलगुरू डॉ. आपटेही त्याचे सरच, त्यांच्याही विरुद्ध आंदोलन केले होते. तरीही त्यांच्या बरोबरचे संबंध सुधारले. मला वाटते, इथूनच त्याने गांधीवाद पूर्णांशाने स्वीकारला होता.
तर बिहारवरून आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवर उतरून घरी न जाता तडक सिंहगडावर गेलो. तिथे जोरदार चर्चेनंतर युवक क्रांती दलाची स्थापना (नोव्हेंबर 1967) झाली. आमचा सिम्बॉल ठरला, चौकट तोडून बाहेर पडणारा पक्षी. युक्रांदची भूमिका स्पष्ट झाली, त्या भूमिकेनुसार कोणताही राजकीय पक्ष अथवा संघटना आम्हाला योग्य वाटत नव्हती. त्या वेळी भाऊला लोक प्रश्न करीत, "मग तुमची ताकद कशी वाढणार?" त्यावर त्याचे उत्तर स्पष्ट असायचे, "समविचारी पक्षांनी यावं आमच्याबरोबर. युक्रांद ही केडर ऑर्गनायझेशन नसून, मास ऑर्गनायझेशन आहे. त्यात कोणीही येऊ शकतो, पण आमची भूमिका मान्य करूनच !" मुख्य म्हणजे पुण्यातीलच काय, महाराष्ट्रातील सर्व आदरणीय नेत्यांचा आशीर्वाद होता. एस.एम. अण्णा तर त्याचे गुरू बनले, जेपींप्रमाणे तेही आम्हा सर्वांशी खूप प्रेमाने वागायचे.
पुण्यात दंगल झाली तेव्हा ती थांबविण्याच्या कामात भाऊ सतत एस.एम. अण्णांसोबत असायचा. त्यातूनच दंगल होऊ न देण्याचं शास्त्र आणि कसब भाऊला अवगत झालं. तो अगदी छातीठोकपणे म्हणायचा, "पुणे दंगलमुक्त ठेवण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे." दंगल कशी घडवून आणली जाते, त्याची कारणे कोणती, याबाबत युक्रांद मध्ये सातत्याने चर्चा होत राहायची. दर आठवड्याला मीटिंग असायची, त्यात चर्चा व्हायची. विचार घासून पुसून स्वच्छ ठेवण्याची ती प्रक्रिया होती. एक महत्त्वाचा मंत्र भाऊ आम्हाला सांगायचा. 'आपली भूमिका आणि कार्य पॉलिटिकली करेक्ट असावे, आपल्या आंदोलनाचा कोणी गैरफायदा घेता कामा नये, त्यातून उडाणटप्पू प्रवृत्तींना खतपाणी मिळता कामा नये.' दुसरा एक फरक तो नेहमी स्पष्ट करायचा, "आपण सर्व जण कॉम्रेड आहोत, मित्र आहोत. चळवळ कोणत्या प्रश्नावर करायची याची प्रदीर्घ चर्चा करू, मतभेद स्पष्ट करू, पण एकदा का ती सुरू केली तर यश मिळालेच पाहिजे. पक्षीय राजकारणात तसे नसते. तिथे सर्व जण आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यात कॉम्रेडशिप नसते, कॉम्पिटिशन असते." हे त्याचे म्हणणे आजच्या काळात किती स्पष्टपणे जाणवते.
चळवळीचे व सत्याग्रहाचे एक शास्त्र त्याने विकसित केले होते. सत्याग्रहाचे टप्पे तो सांगायचा. आम्हालाच नाही तर जाहीर सभेतही! राशीनच्या एका सभेत त्याने सांगितले, "आपल्या सध्याच्या स्थितीला कोण जबाबदार हे ओळखा, त्याला प्रेमाने मामा म्हणा." त्यानंतर राशीनच्या मालकांना लहान पोरंसुद्धा 'मामा, नमस्कार' म्हणू लागले होते. त्याची खेड्यातील भाषणे तर दोन-दोन तास चालायची. कीर्तनाप्रमाणे तो प्रत्येक मुद्दा उदाहरणे देऊन समजून सांगायचा. गर्दीबरोबर संवाद साधायचा. लोकांना प्रश्न विचारायचा. फारच परिणामकारक अशी त्याची भाषणशैली होती. युक्रांदमध्येही काही विचारवंत होतेच, ते त्याची खिल्ली उडवायचे. त्याला 'टू मच ग्रॅग्मॅटिक' म्हणायचे. डॉग्मॅटिक प्रेग्मॅटिक या वादात न अडकता शुद्ध विचार, निःस्पृहता आणि लोकांच्या प्रश्नांची खरी समज व अभ्यास असेल तर आंदोलन पुढे जात असते, असा प्रगल्भ विचार तो करायचा. त्यातूनच त्याला ऊर्जा मिळायची. त्याचा सर्व विचारसरणींचा अभ्यास दांडगा होता. सामान्य माणसांशी त्याचा कसा संबंध जोडायचा, ही कला त्याच्याजवळ होती.
चळवळ करताना जसं निःस्पृह असावं लागतं, तसं निर्भय असणं आवश्यक असतं. ते तो डेमॉन्स्ट्रेट करून पटवायचा. एकदा अकलूजमध्ये सभा होती. सभास्थानी तिथल्या मालकशाहीने टिपाडं लावली होती. सभा घेऊ नका, असे पोलीस सांगत होते. मालकाची दहशत खूप होती, कोणी सभेला येऊ शकत नव्हते. युक्रांदचे कार्यकर्तेही "आता पुढे काय?" असा विचार करू लागले. भाऊने पुढे जाऊन एका टिपाडावर लाथ मारून ते बाजूला केलं. सभा सुरू झाली. पण लाईट कट, माईक बंद. मात्र 'हा नेता आपल्या मालकाला घाबरत नाही, पोलिसांना व गुंडांना घाबरत नाही, म्हणजे कोणीतरी ग्रेट असावा' या समजुतीने एक-एक करत लोक रस्त्यावर आले. बसले. सर्व टिपाडे बाजूला केली गेली. मग लाईट आले, माइक सुरू झाला आणि दोन तास सभा झाली. अकलूजमध्ये कार्यकर्ते निर्माण होण्याची ही सुरुवात होती.
राशीनला तो आला की सभा ठरलेली असायची. एकदा युक्रांदच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. प्रकाश बजाज, त्याचा भाऊ, त्याचे आई-वडील या सर्वांना गुंडांनी खूप मारले होते. पोलीस स्टेशनला तक्रार घेत नव्हते. हा मुद्दा धसास लावण्यासाठीच भाऊ आला होता. तेव्हा 'आता कुमारलाही संपवू' अशी धमकी मिळाली होती. सभेसाठी घराबाहेर पडताच चार-पाच जणांनी भाऊला घेरले, वस्तरे काढले, कोयते सज्ज झाले. सगळे ओळखीचेच होते. "कुमार, मालकाच्या वाटेला जाऊ नकोस, लय वंगाळ होईल." भाऊने एकाच्या पोटात हात घातला, तो घाबरला. "ए कुमार, काय करतोस?" भाऊ म्हणाला, "अरे, मी डॉक्टर आहे, पोट तपासून बघतोय, तुझं आतडं स्टीलचं आहे का ! मला तर दिसतंय, माझ्यासारखंच तुझ बी आतडं मांसलच हाय." एका निर्भय नेत्याचा त्याला मारून टाकण्याच्या इराद्याने आलेल्यांशी हा संवाद. कोयते हातातून गळून पडले, वस्तरे मिटले. शत्रुत्व संपले. पुढे तोच दशरथ आजारी पडल्यावर भाऊच्या ओळखीने पुण्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत होता.
भाऊ खेड्यापाड्यात हिंडताना कार्यकर्त्यांबरोबर वाडी-वस्तीवर पायी जायचा, तो पोहोचला की त्याची सभा असायची. त्याची सभा खूप पॉप्युलर झाली होती. इतकी की एकदा भाऊच्या सभेला गर्दी कमी व्हावी म्हणून मालकशाहीने तमाशा ठेवला होता. तमाशाचा खेळ आठ वाजता सुरू होणार होता, भाऊची सभा सात-साडेसात वाजता सुरू झाली. इतरांची भाषणे झाल्यावर रात्री आठ वाजता भाऊने माईक हातात घेतला. सभा सुरू झाली. लोकसंवाद बहरला. शेवटी तमाशातली कलाकार मंडळीही पुढे येऊन बसली. तेथे संयोजकाने जाहीर केले, डॉ. कुमार सप्तर्षांची सभा झाल्यावर गणगवळण सुरू होईल. ग्रामीण भागात इतकी लोकप्रियता असलेला नेता मी तरी अजून पाहिला नाही.
तर एकदा एका वाडीहून सभा घेऊन जेवणखान करून भाऊ आणि दहा-बारा कार्यकर्ते राशीनला यायला निघाले. वेळ रात्रीची होती. कुऱ्हाडी व कोयते घेऊन काही पैलवान समोरून आले, दमदाटी करू लागले. आम्ही सर्व खाली बसलो. 'निर्भय बनो'चं ते प्रात्यक्षिक होतं. त्यांनाही बसवलं. तुमची ही परिस्थिती का झाली, मालकशाही तुमचं कसं वाटोळं करतेय, हे त्यांना सांगितलं. भाऊ म्हणाला, "हे बघ, मी डॉक्टर आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे, तू माझ्यावर वार केले की मी मरेन. मग तुला पोलीस आज, उद्या, महिनाभरात पकडतील. केस होईल. फासावर लटकशील. मालकाला काय, दुसरा पैलवान मिळेल. हे तुला चालेल का? मारून टाक मग सर्वांना." हा संवाद चालू असताना त्यातले काही जण म्हणाले, "अरे, कशाला सोन्यासारख्या माणसांना मारता. चला, घावलेच नाही म्हणून सांगू मालकाला." असं मतपरिवर्तन घडवून आणण्याची ताकद भाऊने वयाच्या पंचविशीतच मिळवली होती. ही निर्भयता वैचारिक ठामपणा असल्याशिवाय आत्मसात करता येत नाही !
तुरुंगवास म्हणजे भाऊचं माहेरघरच होतं. मिसा लागलेलाव 24 तास फॉलोअप असलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच नेता होता. एल. आय.बी. च्या कॉन्स्टेबलशी त्याची दोस्ती असायची. त्यांना भाऊबरोबर वारंवार राशीनला यायला मिळायचं. आमच्या आई-वडिलांशी ते छान संवाद साधत. याचा भाऊला खूप फायदा झाला. गुप्त पोलिसांना कसे ओळखावे याची तो उजळणी घ्यायचा. पुढे आणीबाणीत युक्रांदचे कार्यकर्ते साध्या वेशातल्या पोलिसांना सहजी ओळखायचे.
रेडिओवर आणीबाणीची बातमी ऐकली तेव्हा भाऊबरोबर दोन हवालदार होते. 'टॉयलेटला जाऊन येतो' असे म्हणून तो गेला आणि भूमिगत झाला. भूमिगत ऐवजी 'अंडर द पीपल' ही संज्ञा तो वापरायचा. मला निरोप आला, 'राशीनला जाऊन कार्यकर्त्यांना निरोप दे.' तेव्हा राशीनचं कम्युन चालू होतं. रोज लोकांच्या प्रश्नांवर कार्यकर्ते तहसीलदार, फौजदार, बीडीओ, कलेक्टर यांना धारेवर धरायचे. 'लोकांची कामे करा, गरजेपुरते ते देतात' अशी भाऊची शिकवण. विजय दर्प, रेखा, नीलम गोहे, शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, रामराव जाधव इत्यादी कार्यकर्ते दलित वस्तीत राहत होते. मुली तर आमच्या घरी वारंवार यायच्या. तिथले काम म्हणजे लोकसंवाद आणि लोकांचे प्रश्न सोडविणे, असे असायचे. विरोध व्हायचा, पण तो निपटून काढायला कार्यकर्ते सक्षम बनले होते.
अधूनमधून भाऊ आणि पुण्याहून, नांदेडहून, औरंगाबादहून काही सीनियर मंडळी यायची. त्यांनी हा कम्युनचा प्रयोग योग्य आहे अशी पावती दिली. आणीबाणीमुळे सर्व जण पांगले, काही भूमिगत झाले. पुन्हा मालकशाही जोमात आली. 'लोकशाहीचा संकोच होतो तेव्हा उजव्या शक्ती डोकं वर काढतात', हे भाऊचे म्हणणे खरे ठरले. मालक लोकांनी पोलिसांना वाड्या-वस्त्यांवर नेले. कोणी भेटले नाही. तेव्हा गावातले प्रतिष्ठित पाच जण ताब्यात घेतले. डीवायएसपी पवार यांनी मलाही बोलावले. मी पोलिसांना विचारले, "अटक करणार का?" तर ते 'हो' म्हणाले. मी घरासमोर रस्त्यात बसून राहिलो. युक्रांदच्या विचारधारेप्रमाणे तो पॅसिव्ह रेजिस्टन्स होता. अशी भाऊची शिकवण संकट काळी आम्हाला उपयोगी यायची.
भाऊचा सामाजिक अभ्यास जबरदस्त होता. बावड्यात (तालुका इंदापूर) दलित वस्तीत बहिष्कार चालू होता. युक्रांदची टीम तेथे गेली. भाऊने प्रथम मातंग वस्तीत व नंतर दलित वस्तीत सभा घेतली. त्यांच्यात एकी झाली आणि पाटील वाड्यासमोर सकाळपासून धरणे धरले. गावातल्या लोकांचा मोठा सहभाग असावा, हे त्याचे धोरण. प्रश्न चार तासांत सुटला. बहिष्कार उठला, मालकशाही वाकली.
तुरुंगातून सुटल्यावर 1978 मध्ये भाऊने नगर विधानसभा निवडणूक लढविली, ती संघर्षमय झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून कार्यकर्ते आले. तेव्हा मी एस.पी. कॉलेजात प्राध्यापक होतो. जनू 1971 ते 76 या काळात मी नगरला सारडा महाविद्यालयात प्राध्यापक होतो. माझ्याच खोलीत कार्यालय होते. जनता पक्षाचे तिकीट मिळवण्याचा नवनीतभाई बार्शीकरांचा डाव भाऊने उधळून लावला. त्याआधी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाऊ खूप हिंडला होता. रोज दहा-बारा सभा व्हायच्या, त्याच्या सभांमुळे जनता पक्षाच्या बाजूने मतांमध्ये परिवर्तन व्हायचं.
आमदार झाल्यावर त्याने विधायक कार्यात लक्ष घातलं. भारतीय समाज विकास संशोधन संस्था स्थापन केली. डॉ. अशोक जोशी, डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. अनिल गोरे, निळू फुले, प्रा.एन. बी. जाधव, व्यंकपा पत्की इत्यादी युक्रांदीय कॉम्रेड साथीला होते. 1978 मध्ये 26 एकर बरड जमीन (जिला पोट खराबा असं संबोधले जात असे) विकत घेतली, तेथे ग्रामीण विकास केंद्र स्थापन केले. भाऊ तेथेच राहू लागला, त्याने ग्रामीण विकासाची काही सूत्रे निश्चित केली होती. त्याने ठरवले, ही संस्था अनुदान केंद्रित न करता लोकांच्या विकासासाठी काम करायचे. दुष्काळी भागात वाया जाणारी नैसर्गिक साधनसामग्री आणि मानवी संसाधने एकत्र करून विकास करायचा, हे त्याचे ध्येय होते. मुख्य म्हणजे त्याची दृष्टी सामाजिक उद्योजकतेची असायची. समाजात सकारात्मक बदल घडावा, त्यांची गरिबी दूर व्हावी, त्यांना शिक्षण व पर्यावरणसंबंधी हक्क समजावेत, मानवी मूल्यं रुजावीत हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्याने एक-एक प्रकल्प आखले.
एक साधं उदाहरण इथे द्यावेसे वाटते. लिंबोळी गोळा करणाऱ्या सर्वहारा वर्गाला रास्त रोजगार मिळावा म्हणून एक प्रकल्प हाती घेतला. ट्रक भरून लिंबोळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला नेऊन विकायची आणि आलेल्या पैशाचे संबंधितांना वाटप करायचे. यात एक हजार तरी सर्वहारा मजूर होते. सप्लाय चेनमधील कार्यकर्ते सक्षम झाले. पुढे बार्शीला पाठविण्याचा खर्च वाचावा म्हणून श्रमशक्ती ऑइल मिल उभारली, ते एक परिवर्तनाचे हत्यार बनले. वीट भट्टी काढली, पुण्यातील कॉन्ट्रॅक्टरना वीट विकून मजुरांचे दर वाढविले. कोरडवाहू शेतीत ज्वारी, बाजरी, गहू करण्यासाठी शहरांतून खेळतं भांडवल गोळा केले. व्याजाच्या बदल्यात त्यांना गहू द्यायचा. त्या वेळेस एक हजार रुपये पीककर्ज मिळालं तर शेतकरी एक एकर पिकवू शकायचा. आजूबाजूचे हजारो शेतकरी सक्षम झाले. शहरी मित्रही खूश. यालाच कम्युनिटी स्पॉन्सर्ड अॅग्रीकल्चर म्हणतात, भाऊने ते 1979 मध्येच सुरू केले होते.
पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावावीत अशी सरकारी घोषणा व्हायची. पण पोट खराबा जमिनीत, तेही दुष्काळी वातावरणात, खूप अवघड होते. सुबाभूळ हे उत्तर त्याला सापडले. संस्थेच्या परिसरात सुबाभूळ लागवड केली. रोपं तयार करण्याचे काम सुरू होते, तेव्हा त्याचे द्रष्टेपण अधोरेखित झाले. लाखो रोपे तयार केली. माती चाळणे, पिशव्या भरणे, रोप तयार करणे, पाणी घालणे या कामांसाठी 300 महिलांना रोजगार उपलब्ध झाला. ती रोपे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन, मोठमोठ्या कंपन्या, फॉरेस्ट विभाग यांना विकली. सुमारे दोन कोटी रोपं लावली गेली. रोपे लावण्यासाठी खेड, वायसेवाडी, आवटेवाडी इत्यादी ग्रामीण भागांतून मजूर आणून पुण्यात रोपे लावली. केवढा मोठा रोजगार मिळाला. वाया जाणाऱ्या मानवी शक्तीचे रूपांतर पैशात झाले, ही ती सामाजिक उद्योजकता.
सुबाभूळवर खेडला संशोधन झाले. 'चाऱ्यासाठी सुबाभूळ' हे भाऊने खूप पॉप्युलर केले. जाहीर भाषणात तो सांगायचा, "गोळी पेंड वापरू नका. त्याऐवजी जगात सर्वात जास्त प्रथिनांचे प्रमाण असलेला सुबाभूळ चारा वापरा." त्याची वैज्ञानिक दृष्टी सातत्याने या प्रयोगात दिसायची. व्हेटरनरी तज्ज्ञांना बोलावून घ्यायचा, गुरांचे शिबिर भरवायचा. सुबाभूळ, संकरित गाया, दूध उत्पादन यांमुळे बरड जमिनीतून कमीत कमी पाण्यावर होणारा चारा अशी सेंद्रिय पद्धती शेतकऱ्यांना दिली. गावात दवंडी पिटवून, "कोणाची गाय उडविली असेल तर, भानामती झाली असेल तर संस्थेवर आणा. दहा मिनिटांत दुधावर कशी येते ते दाखवले जाईल." संकरित शेळी हाही यशस्वी प्रयोग लोकोपयोगी होत होता. विज्ञान, ज्ञान यांचा उपयोग गरिबांपर्यंत कसा होईल याचा त्याने ध्यासच घेतला होता. या आर्थिक उन्नतीच्या प्रयोगाबरोबरच त्याने लोकसंसद भरविली होती. प्रा.ना.स. फरांदे तेव्हा विधान परिषदेचे सभापती होते. त्यांना अध्यक्षपद देऊन लोक प्रशासनाला प्रश्न विचारत होते, ही तर लोकजागृतीची भन्नाट कल्पना होती.
भाऊची एक खासियत होती. तो कधी भावनाविवश, निराश होत नसे. हेलावून जात नसे. त्याचे एक जीवन तत्त्व होते. कोणत्याही अडचणीत शांत डोके ठेवून विचार करायचा. उपाय त्याला सापडायचा. म्हणूनच मी त्याला प्रज्ञावंत मानतो. खेडला येताना एकदा त्याच्या गाडीला अपघात झाला. चौफुला ते पाटस दरम्यान गाडी रस्त्यावरून खाली पडली, तिने दोन कोलांट्या मारल्या. ड्रायव्हर, रामराव जाधव, पोपट आबा भिसे बरोबर होते. ते सर्व बेशुद्ध पडले. भाऊ कसाबसा रस्त्यावर आला. त्याने गाड्या थांबविल्या, एका गाडीतून सर्वांना मित्राच्या दवाखान्यात नेले. मित्रही तेथे नव्हता. स्टाफकडून सर्व औषधं घेऊन त्यांना सलाईन लावले. केस पेपरवर सर्व स्पष्ट लिहिले. मग अॅम्बुलन्सने ससूनला आणले. सर्व जण शुद्धीवर आले. उपचार सुरू झाल्यावर भाऊ तिथल्या डॉक्टरांना म्हणाला, "अरे, मला तपासा, मला काही गंभीर दुखापत झाली का ते पहा." वीस वर्षांपूर्वी प्रॅक्टिस सोडलेला हा डॉक्टर इतकी बरोबर ट्रीटमेंट कसा देतो, हे ससूनचे विद्यार्थी व त्यांचे सर पाहत होते. खरंच मेडिकल अभ्यास व प्रॅक्टिकल्स भाऊने खूप सिरीयसली केलेले होते. 1969 ते 72 पर्यंत त्याने पुण्यातील महात्मा फुले मंडईजवळ दवाखाना चालवला होता, तोही जोरात.
चंद्रशेखर यांनी मला सांगितलेला किस्सा येथे द्यावासा वाटतो. ते पंतप्रधान असताना एकदा आजारी पडले, तेव्हा त्यांच्या सरकारी डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट भाऊने त्यांना बदलायला लावली. चंद्रशेखर मला म्हणाले, "परवीनजी, आपके भाईसाबने तो कमाल कर दी. पीएमओ से आये हुए डॉक्टर के साथ बहस करके अपनीही ट्रीटमेंट देने का आग्रह किया और हमेशा की तरह मेडिकल नॉलेज मे आपके भाईसाब जीते."
भाऊचा कुटुंबावर जीव होता. आई-वडील, मावश्या, काका यांच्याशी तो विद्रोह करायचा, पण त्यांची मनं जिंकून होता. त्याच्या नगरच्या निवडणुकीत आमचे आई-वडील, बहिणी प्रचाराला आले होते. माझे आजी-आजोबा (आईकडून) त्याच्यावर खूप प्रेम करायचे. दादांना (वडिलांना) त्याचा अनेक वेळा राग यायचा. पण शेवटी ते त्याची बाजू घ्यायचे. पुढे संस्थेच्या कामात दादा लक्ष घालायचे, हिशोब लिहायचे. तिथल्या कार्यकर्त्यांना शिकवायचे.
लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय 1984 मध्ये स्थापन झाले. माझे वडील 1992 मध्ये गेले. त्यानंतर ज्युनिअर कॉलेज सुरू झाले. ग्रामस्थांनी सर्वानुमते डॉ.ग.दा. सप्तर्षी ज्युनिअर कॉलेज असे नामकरण सुचविले, भाऊने ते ठेवले. 2001 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सुरू केले. गेली 42 वर्षे दिमाखात उभ्या असलेल्या या संस्थेच्या आवारातच भाऊच्या अस्थी ठेवल्या आणि त्यावर पिंपळाचे झाड लावले आहे.
भाऊ आणि आमचे कुटुंबीय यांच्यातला मी दुवा बनलो होतो. भाऊंच्या चुकांबद्दल आणि कौतुकाच्या मुद्द्याबद्दलही ते सर्व माझ्या जवळ बोलायचे. दादांनी एकदा मला सांगितले होते, "भाऊला म्हणावं, इथे नको कार्य करू. त्याच्या जिवाला धोका आहे." मी म्हणायचो, "जिवाला धोका चहू बाजूंनी आहे, त्याचे कार्यच मुळात चौकटीबाहेरचे आहे." मग मला म्हणायचे, "ते काहीही असो. प्रवीण, तू त्याच्याबरोबर राहा, त्याला कधी अंतर देऊ नकोस." मी वडिलांचा हा शब्द पाळला की माझ्यावरच्या त्याच्या असीम प्रेमाखातर त्याचा शिलेदार बनलो ! मला हे कोडं अजून उलगडत नाही.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या