मला वास्तवात आणि भासात त्या त्या वेळी आपण तो तो माणूस असल्याचं वाटणं, वाटत असल्याचं दाखवणं हे महत्त्वाचं होतं. 'चौकट राजा' मधल्या 'नंदू'पेक्षा 'रात्र आरंभ मधली ही व्यक्तिरेखा अधिक गुंतागुंतीची आणि अवघड होती. पडद्यावरच्या काही भूमिका करत असताना (शूटिंग करताना) त्यांचा अंदाज येतो. आपल्याला व्यक्तिरेखा जमत्येय असं वाटतं. तशी ती पूर्ण चित्रपटात वठतेही (उदा. 'चौकट राजा'). कधी-कधी चांगली केलीय; छान होईल, असं वाटतं. पण तशी नाही दिसत. स्वतःलाच पटत नाही. अंदाज चुकतो.चित्रपटाला दिग्दर्शक आकार देत असताना, तुकड्यातुकड्यांनी जोडतघडवत असताना, आपली व्यक्तिरेखा तितकी समर्थपणे नाही उभी राहू शकत. ('चिमणराव गुंड्याभाऊ' चित्रपट).पण कधी कधी असंही होतं, की करताना जाणवत नाही, अंदाज येत नाही; आणि भूमिका चांगली होते. 'रात्रआरंभ मध्ये एका माणसाच्या तीन अवस्था साकारताना मला नेमकं कसं झालंय हे कळलं नाही. कधी फडके, कधी ठोंबरे, पुन्हा फडके) कधी खुनी कैदी-मनोरुग्ण. पण चित्रपटाची समीक्षणं वाचल्यावर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार ('चौकट राजा' आणि 'सरकारनामा' नंतर पुन्हा एकदा) आणि 'फिल्मफेअर' पुरस्कार यांची घोषणा झाल्यानंतर कळलं की, भूमिका परिणामकारक वठली
'रात्रआरंभ' चित्रपटात दुहेरी व्यक्तिमत्त्वाची भूमिका करताना मला प्रभाकर फडके 'पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया' या विकाराचे बळी ठरून स्वतःला ठोंबरे समजून वागतात, असं दाखवायचं होतं. कोणीतरी आपल्याला ठार मारणार आहे, असं त्यांना वाटतं. हा 'कोणीतरी' म्हणजे आपला मुलगाच आहे, अशी ते कल्पना करतात. शरीर सौम्य प्रकृती फडक्याचं, पण जगणं संशयी आणि भयग्रस्त ठोंबरेंचं, असं त्यांचं होतं. त्यांच्या भासमय जगात त्यांचा (ठोंबरेंचा) मुलगा जीव घ्यायला आलाय, असं त्यांना वाटतं. त्यांना तो (राजन ताम्हणे) समोर दिसू लागतो. ते त्याच्यावर हल्ला करतात. प्रत्यक्षात फडकेंचा मुलगा (राजन बने) बळी पडतो. हा खुनाचा प्रसंग चेंबूरच्या एका बंगल्यात चित्रित झाला. अतिशय असुरक्षित वाटून ते आपला (कल्पनेतल्या ठोंबरेंचा) मुलगा समजून स्वतःच्या मुलालाच मारतात, हा प्रसंग करताना विकारग्रस्त आणि हिंसक फडक्यांच्या डोळ्यांत खून चढतो हे मला दाखवायचं होतं. खरं म्हणजे हे सगळं 'आतून', 'जाणवून' यावं लागतं. आतलं वादळ, मनातला झंझावात चेहऱ्यावर दाखवणं तसं कठीण नव्हतं. पण दिग्दर्शक अजय फणसेकरला माझे डोळे लाल व्हायला हवे होते.
ते हुकमी तसे करणं शक्य होत नव्हतं. हुकमी रडायला, अश्रुपात करायला डोळ्यांत ग्लिसरीन टाकतात. बोटांवर ग्लिसरीनचे थेंब घेऊन काजळ घातल्यासारखं बोट डोळ्यांतून फिरवायचं. पण तसं करून डोळ्यांत लालसरपणा आला असता, आणि पाणीही आल असतं. पण पाणी नको होतं.डोळे कोरडे आणि लाल हवे होते. यात चेहऱ्याचा टाइट क्लोजअप होता. मी वळून सुनेकडे बघतो. ती नजर सुनेला फार अनोळखी असते; ती प्रेमळ, समजूतदार सासऱ्यांची नसते. सून घाबरते, थरथर कापत दुसऱ्या खोलीत पळते, लपते. मग मला सावरायला आलेल्या खऱ्या मुलाला मी कल्पनेतल्या ठोंबरेंचा खलनायकी मुलगा समजून हातातल्या दांडक्याने मारतो. जोरदार प्रहार करतो. 'क्लोजअप'साठी लाल 'आय् लायनर' वापरला, पण डोळ्यांमध्ये लाली कशी आणावी? अशा वेळी कधीकधी एखाद्या 'शारीरिक कृती'ची मदत होते. लायटिंग वगैरे करून कॅमेरामन लक्ष्मणनी कॅमेरा अगदी सज्ज ठेवल्यावर मी शीर्षासन केलं. मिनिटभर तसा राहून मग सुलटा होऊन कॅमेऱ्याला सामोरा गेलो. एकदा, दोनदा, तीनदा शॉट घेतला. (प्रत्येक वेळी आधी शीर्षासनात उलटा, मग सुलटा!) तिसऱ्यांदा डोळे पुरेसे लाल (खुनशी) झाले. दुभंग व्यक्तिमत्त्वाचं बरंच विश्लेषण पाच टप्पे वगैरे सिनेमात डॉ. कामतांच्या (दिलीप कुळकर्णी) तोंडी आलं आहे.
मला वास्तवात आणि भासात त्या त्या वेळी आपण तो तो माणूस असल्याचं वाटणं, वाटत असल्याचं दाखवणं हे महत्त्वाचं होतं. 'चौकट राजा' मधल्या 'नंदू'पेक्षा 'रात्र आरंभ मधली ही व्यक्तिरेखा अधिक गुंतागुंतीची आणि अवघड होती. पडद्यावरच्या काही भूमिका करत असताना (शूटिंग करताना) त्यांचा अंदाज येतो. आपल्याला व्यक्तिरेखा जमत्येय असं वाटतं. तशी ती पूर्ण चित्रपटात वठतेही (उदा. 'चौकट राजा'). कधी-कधी चांगली केलीय; छान होईल, असं वाटतं. पण तशी नाही दिसत. स्वतःलाच पटत नाही. अंदाज चुकतो.चित्रपटाला दिग्दर्शक आकार देत असताना, तुकड्यातुकड्यांनी जोडतघडवत असताना, आपली व्यक्तिरेखा तितकी समर्थपणे नाही उभी राहू शकत. ('चिमणराव गुंड्याभाऊ' चित्रपट).पण कधी कधी असंही होतं, की करताना जाणवत नाही, अंदाज येत नाही; आणि भूमिका चांगली होते. 'रात्रआरंभ मध्ये एका माणसाच्या तीन अवस्था साकारताना मला नेमकं कसं झालंय हे कळलं नाही. कधी फडके, कधी ठोंबरे, पुन्हा फडके) कधी खुनी कैदी-मनोरुग्ण. पण चित्रपटाची समीक्षणं वाचल्यावर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार ('चौकट राजा' आणि 'सरकारनामा' नंतर पुन्हा एकदा) आणि 'फिल्मफेअर' पुरस्कार यांची घोषणा झाल्यानंतर कळलं की, भूमिका परिणामकारक वठली.
याचं श्रेय त्या अवघड आणि वेगळ्या व्यक्तिरेखेला आकार देणाऱ्या, खूप निराळ्या कथा कल्पनेवर, विषयावर चित्रपट रचणाऱ्या आणि त्यासाठी परिश्रमपूर्वक माहिती गोळा करणाऱ्या लेखक-दिग्दर्शक अजय फणसेकरचं होतं. नसिरुद्दीन शहांना चित्रपट इतका आवडला की अजयच्या ढच्या चित्रपटात मी काम करीन म्हणाले. त्यांनी केलंही. त्या चित्रपटात मीही भूमिका केली. चित्रपट हिंदी होता. प्रमुख भूमिकेत नसिरुद्दीन शहा. चित्रपटाचं नाव 'एन्काऊंटर-द किलिंग'. माझी भूमिका दारूच्या अड्डयाचा मालक 'पुनाप्पा आवाडे' याची. पोलीस एन्काऊंटरमध्ये शूटर्स गँगमधला लाल्या नावाचा एका चांगल्या घरातला मुलगा चुकून मारला जातो. त्या मुलाच्या आईबापांचा शोध घेणाऱ्या इन्स्पेक्टर सॅमी भरुचाला (नसिरुद्दीन शहा) या पुनाप्पाचे अधूनमधून फोन जातात. पोराच्या बापाला मी ओळखतो म्हणून. (पुनाप्पा फोन करतो आणि अर्धवट बोलून ठेवून देतो. पोलिसांना डिवचण्यात त्याला आनंद मिळतो म्हणून.) आईबाप काही प्रेत ताब्यात घ्यायला पुढे येत नाहीत.
मुलगा गँगस्टर होता हे कळलं तर समाजात बदनामी होईल, या कारणाने. आईवडिलांकडून अंत्यसंस्कार होण्यासाठी प्रेत ठेवावं, की बेवारशी ठरवून निकालात काढून फाईल बंद करावी, अशा संभ्रमात हा प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ इन्स्पेक्टर भरूचा असतो. पत्रकार किरण जयवंत (तारा देशपांडे) हिच्या मदतीने मृत लाल्याच्या आईवडिलांचा पत्ता शोधणारा इन्स्पेक्टर भरुचा पुन्नाप्पाला त्याच्या अड्डयावरून धरून आणतो. हा पुनाप्पा कोण आहे आणि मेलेल्या मुलाच्या आई-बापांना (रत्ना पाठक शहा आणि आकाश खुराना) तो खरंच ओळखतो का, गुन्हेगार जगात खेचल्या जाणाऱ्या चांगल्या घरातल्या मुलांच्या समस्येवर तत्त्वनिष्ठ इन्स्पेक्टरची प्रतिक्रिया काय असते, तो काय निर्णय घेतो, हे सगळं सिनेमाच्या दुसऱ्या भागात कळत जातं. सिनेमाचा शेवट ट्रॅजिक आणि अंतर्मुख करणारा होता. कठोर आणि चटका देणारं वास्तव दाखवणाऱ्या या चित्रपटातल्या प्रसंगांमध्ये आणि त्यांतल्या व्यक्तींमध्ये ही पुनाप्पा आवाडेची व्यक्तिरेखा निराळीच होती. हा माणूस कसा आहे, काय बोलतो, बोलतो ते का बोलतो, विश्वसनीय आहे की अविश्वसनीय? इत्यादी प्रश्न पडावेत असं हे एकच पात्र आहे. म्हटलं तर 'कॉमिक', म्हटलं तर खलनायकी, पण प्रामाणिकसुद्धा. चिडवणारा, चिडणारा, हळवा, माणुसकी जपणारा, अशा परस्परविरोधी छटा त्याच्यात आहेत; तो वेगळा वाटावा, नेमका कसा आहे हे कळू नये, त्याच्याबद्दल सस्पेन्स राहावा, असं हे पात्र आहे.
पोलिसांनाही गोंधळवून टाकाणारं, चिडवणारं, उत्कंठा वाढवत नेणारं, असं. म्हणून मग त्याची शैली काहीशी 'कॅरेक्टर' पद्धतीची, रूप विचित्र बेढब, वेडंबिंद्र वाटावं असं. पोलीस आणि सद्यःस्थितीवर, उच्च मध्यमवर्गीय समाजांच्या कातडीबचावू, दांभिक वृत्तीवर ताशेरे ओढणारा हा पुनाप्पा. वर्तमानपत्रातल्या भीषण बातम्या देणाऱ्या पहिल्या पानावर एका कोपऱ्यात मर्मभेदी व्यंगचित्र असतं, तसा आहे. रूप, व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी, उग्र आणि प्रसंगी कठोर दिसण्यासाठी पुढे आलेले, पान खाऊन रंगलेले दात, जाड भुवया, मिशी, रापलेल्या कातडीचा रंग असा अवतार होता. शिवाय कानांना केस चिकटवले होते. (मेकअपमन चेहऱ्यांपेक्षा कान सजवायला जास्त वेळ घ्यायचा.) कानात (बुगडीसारखा) दागिना घालून वावरतोय असं वाटायचं. शिवाय गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटात चार अंगठ्या आणि हातात रंगीत रुमाल होता. एके काळचा सगळे 'उद्योग' केलेला डॉन, सध्या दारूच्या अड्डयाचा मालक असलेला असा हा पुन्नाप्पा करताना मी आवाज खर्जातला लावला होता. हा पुनाप्पा कर्नाटकच्या सीमा भागातला, त्यामुळे उच्चार किंचित दाक्षिणात्य हिंदीचे केले आणि संवादाला कानडी ढंगाचे हेलकावे दिले. पोलीस मला माझ्या दारूच्या अड्डयावरून अक्षरशः उचलून, धक्के मारून जीपमध्ये घालून पोलीस स्टेशनवर नेतात तो सीन नामी होता.
(समाप्त)
Tags: राजन ताम्हणे चित्रपट आकाश खुराना दिग्दर्शक अजय फणसेकर दिलीप प्रभावळकर Rajan Tamhane film Akash Khurana director Ajay Phansekar Dilip Prabhavalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या