डिजिटल अर्काईव्ह

'आज दिनांक' बंद पडलं. मी माझ्या लिखाणात गुंतून पडलो नि वर 'टाइम्स'चा रोजचा रगाडा. नामदेव क्वचितच भेटायचा. तोही आजारी आजारी राहू लागला. एकदा एका साहित्यिक कार्यक्रमात भेटला. तब्येत उतरली होती. कमरेला तामीळ लोकांची वेष्टी गुंडाळलेली. नि शर्ट. हसला नि 'क्यूँ कैसे हो, गुर्जी?' असं विचारलं. गुलजारांविषयी विचारलं. थोडं इकडचं-तिकडचं बोलणं झालं नि डुलत डुलत गाडीपाशी गेला. ती शेवटची भेट.

 

नामदेव ढसाळला पहिल्यांदा कधी भेटलो ते नीटसं आठवत नाहीए. दोन गोष्टी मात्र स्मरताहेत त्या दिवशी पाऊस बदाबदा कोसळत होता आणि पहिल्या भेटीतच वाटलं की, आम्ही खूपदा भेटलोय. 'मैंने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है।'

नामदेव आणि भाऊ खाडे या दोघांत खूप साम्य होतं. भाऊ खाडे म्हणजे गिरगावातल्या आमच्या मांगलवाडीतला दादा. नामदेवसारखाच दिसायचा. जाडजूड, उंचपुरा नि हट्टाकट्टा. भाऊ हाडाचा दादा. एकदम सभ्य. खानदानी बंडखोर. भाऊ खाडे मारामाऱ्या करायचा ते 'नाही रे' वर्गाच्या भल्यासाठी.

बिनधास्त, पिंडी, चिकणा, मांजरपाट, धतिंग, राडा, चिरीमिरी, जंटलमॅन वगैरे भाषा गिरगाव-परळ-लालबागेतल्या दादा लोकांची. ती रांगडी भाषा पुढे नामदेव, भाऊ पाध्येंच्या लिखाणात अवतरली.

मी बातमीदारीत आलो तेव्हा नामदेवभोवती एक झगझगीत वलय तयार झालं होतं. त्याला कारण त्याचं अनघड जगणं. तो टॅक्सी चालवायचा, मारामाऱ्या करायचा. शिवाय, 'गोलपीठा', 1972 चा दलित-शिवसेना राडा, वरळीची दंगल नि दलित पँथर असा भरगच्च ऐवज नामदेवच्या खात्यात जमा होता. त्याचं सगळं रोमहर्षक नि रोमँटिक होतं. तो मुंबईचा चे गवेरा होता. राम पटवर्धन, डॉ. कुमुद मेहता, नारायण आठवले वगैरे थोर समीक्षक त्याच्याकडे आकर्षित झाले होते.

नामदेवचं मराठी अस्सल. वाणी शुद्ध. बोलणं स्पष्ट. आवाज खणखणीत. प्रोलितारिएत, क्लास वॉर, सोशल जस्टिस वगैरे शब्द त्याच्या ओठांवर हमखास खेळत असायचे. दुसरीकडे, तो राजकारणाच्या भुयारात चाचपडत होता. त्याचं राजकारण मला कधीच समजलं नाही. त्याची कविता मात्र टवटवीत होती नि टवटवीतच राहिली. अखेरपर्यंत.

नामदेव कुठं कुठं अचानक भेटायचा. कधी एशियाटिक सोसायटीत, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात (नायगावला), कधी स्ट्रॅण्ड बुक स्टॉलला. स्ट्रॅण्डचे मालक टी. एन. शानभाग यांच्याशी तो लॅटिन अमेरिकन कवितेवर चर्चा करायचा. दुकानातली पुस्तकं फार बारकाईनं चाळायचा नि उभ्या उभ्याच पुस्तकातला बराचसा मजकूर वाचून काढायचा; कधी ताडदेवच्या चुंग फा या चिनी उपाहारगृहात जेवत असायचा तर कधी ग्रँट रोडच्या दिल्ली दरबारात. आगे-मागे अनुयायांचा जथा.

एकदा मला विचारलं, "तू वजरी खातोस काय ?" मी 'नाही' म्हणालो.

"च्यायला, यार तू बामण ना?"

"होय, पण de-class बामण", मी म्हणालो.

"म्हणून आपलं पटतंय, राजा." नामदेवचं अधूनमधून 'राजा', 'मित्रा' वगैरे पालुपद सुरू असायचं. एखादी गोष्ट नाही पटली तर 'बस काय?' असं म्हणायचा. मला भाऊ खाडे आठवायचा.

एकदा नामदेवनं हट्टच धरला. म्हणाला, "चल पोयबावडीला हॉटेलात. तिथली वजरी मस्त लागते." पोयबावडीला जायचं राहिलंच. मी आजवर वजरी खाल्ली नाहीए. मधल्या काळात एक-दोनदा योग आला होता. पण मी मनाशी ठरवलं होतं की, वजरी खायची तर
नामदेवबरोबर. नाही तर नाही.

2005 मध्ये माझं गांधींवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं. नामदेवचा फोन. "आयला छान पुस्तक लिहिलंयस यार तू." पुढे त्यानं चक्क हिंदी सुरू केलं तुम ने गांधी का नस बराब्बर पकडा है. गांधी बहोत चक्कर में डालता है, वगैरे.

तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. म्हणजे 'नामदेव स्टॅण्डर्ड टाइम 'प्रमाणे संध्याकाळचे सहा वगैरे. आजूबाजूचा गोंगाट मला ऐकू येत होता. नामदेव बहुधा जेवत होता. वजरी नि भाकरी.

सुरुवातीला नामदेवकडे अँबॅसॅडर होती म्हणतात. नंतर त्याच्या गाड्या सतत बदलत असायच्या. अखेरच्या काळात एक आलिशान गाडी होती त्याची. स्वतः चालवत होता. "येतोस काय ? फोर्टला जायचंय. बस गाडीत." मी माझी कशीबशी सुटका करून घेतली. नामदेवबरोबर कुठं जायचं म्हणजे मोठी आफतच. वार्ताहराला डेडलाइन असते, नामदेव कालातीत होता. घड्याळाचं नि त्याचं हाडवैर. वेळेचं नियोजन नाही. सगळा उत्स्फूर्त मामला. न्यू थिएटर्सच्या चित्रपटातला हिरो अचानक आपल्या बापाला म्हणतो, "बाबा, चलो कलकत्ते जाना होगा." तसं नामदेवचं. उजाडलं की बाहेर पडायचं. मागचं-पुढचं ठाऊक नाही. वेळेचं भान नाही, काटेकोरपणा नाही. मी म्हणायचो, "ढसाळ, तुम्ही ढिसाळ."

तो हसायचा नि म्हणायचा, "बस क्या!"

तरीही एक-दोनदा मी त्याच्या गाडीत बसलो नि बरंच फिरलो. डिमटिमकर रोड, मोहम्मद अली रोड, काळाचौकी, पोयबावडी, टेमकर गल्ली. जेकब सर्कल-नागपाड्यात मुसलमानांची गच्च वस्ती. नि एकमेकांच्या गळ्यात पडलेली अगणित किरकोळ दुकानं. मध्येच एका चिनी डेंटिस्टचा दवाखाना. डॉ. टांग यूली की असंच काहीतरी नाव. "गुर्जी, मुंबईत सगळे लोक बघा कसे सुखात जगतात. चिनी, यहुदी, ख्रिश्चन, पारशी, मुसलमान, मराठी, गुजराती, कासार सोनार, कोळी, पाठारे परभू. च्यायला, अजब शहर आहे हे." अजब मुंबईचा गजब माणूस म्हणजे नामदेव.

अधूनमधून नामदेव मला 'गुर्जी' म्हणायचा. मला ते खटकायचं. मी एकदा म्हटलं, "नामदेव, तुम्ही कृपा करून मला गुरुजी नका म्हणू. नि गुर्जीही नको. मला जाम ऑकवर्ड होतं. तुम्ही खूप मोठे कवी आहात."

तर नामदेव म्हणाला, "कवी हे अगदी वेगळं फिनॉमेनन आहे. पण मुलांना शिकवणं ही मोठी गोष्ट. तू नि अशोक 'आज दिनांक' च्या पोरांना ट्रेन करताय ना? आयला, ती पोरं कागदावर हगून ठेवतात नि तू, अशोक शहाणे नि सुनील कर्णिक ते साफ करता. हे जाम भारी आहे."

"मग मला सफाई कामगार म्हणा", मी म्हणालो.

नामदेवनं माझ्या पाठीत एक हलका गुद्दा मारला.

एकदा आपल्या घरी घेऊन गेला. बॉम्बे सेंट्रल परिसरातली बैठी चाळ. आजूबाजूला घोड्यांचा तबेला होता. म्हणाला, "घोड्यांच्या मुताचा वास खूप घाण. नाकाचे केस जळून जातात. आता पॅरिसच्या भारीतल्या भारी पर्फ्यूमचा वास नाकाला लागतच नाही."

नामदेवचे वडील व्हरांड्यात बसले होते. नामदेवनं ओळख करून दिली, "हे आमचे गुर्जी अमरीश, वडील यंदा शंभर वर्षांचे होतील." मी वडलांच्या पाया पडलो. नि आम्ही छान जेवलो. नामदेव फार आनंदला. नामदेव मला न चुकता 'अमरीश' म्हणायचा. तेही मला खटकायचं. "माझं नाव अंबरीश आहे", मी एकदा वैतागून म्हणालो. तर तो हसला, "नाम में क्या रखा है ऐसा जनाब शेक्सपियर ने कहा है।" भाऊ पाध्येच्या लिखाणातले लोक मध्येच फिल्मी हिंदी बोलतात, तसं नामदेवचं.

भाऊ पाध्येच्या कथांत नामदेव भेटतो. नामदेवच्या कवितेत भाऊ डोकावतो. मन्या ओकच्या कवितेत चिं. त्र्यं. किंवा रघू दंडवतेशी गाठ पडते नि वर पुन्हा हे सगळे अवलिए नेमाडेंच्या 'कोसला'त सुखानं जगताहेत, अशी एक कल्पना करून बघायला हरकत नाही. या सगळ्यांचा म्होरक्या अशोक शहाणे. हे साठोत्तरी मंडळींचं सगळ्यांत मोठं कॉन्ट्रीब्यूशन. सगळे एकमेकांत बेमालूम मिसळून गेले नि तरीही स्वतंत्र, स्वायत्त जगले. आकाशातले तारे एकमेकांशी योग्य ते अंतर ठेवून वागतात. मात्र, दाही दिशा प्रकाशमान करताना सगळे एकत्र जमतात. विशेष म्हणजे हे सगळं आपोआप घडलं.

दुसरं, या मंडळींनी मराठीच्या चरणी ठिणग्या वाहिल्या. मराठीचा एक मोठा जाळ पेटवला. त्यात मराठीचं सगळं हीण जळून गेलं. नुस्तं भाषेच्या अंगानं पाहिलं तर या मंडळींनी फार मोठी कामगिरी बजावली. याविषयी ज्येष्ठ समीक्षक-अनुवादक चंद्रकांत पाटील यांनी 'काही लेख, काही लेखक' या पुस्तकात सुरेख विवेचन केलंय.

भाषा हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा मुख्य खांब होता. पुढे, सं. म. समिती राजकारणात गुरफटली. साठोत्तरीवाल्यांनी भाषेचा मुद्दा अचूक हेरला. भाषा ही राजकारणाच्या पलीकडे जाते नि वाचकांना मुक्तीचा अनुभव देते.

पुढच्या वीसेक वर्षांत सगळी पांगापांग झाली. मराठीची श्रीमंती आपण धडपणे सांभाळू शकलो नाही. हे असं का व्हावं ? भाषेच्या प्रश्नावर एक स्वतंत्र देश उभा राहिला बांगला देश. भाषेच्या मुद्यावर आपण महाराष्ट्र नीट उभा नाही करू शकलो. का?

साठोत्तरी मंडळी आपल्या आपल्यांतच 'बिस्मिल्ला' करत राहिली काय ? आपण पायाभरणी केलीए. आता इमारत आपोआप फळाला येईल असा भ्रम पैदा झाला काय ? असूया हाही एक निर्णायक फॅक्टर ठरला काय ? ढसाळ-राजा ढाले यांनी समाजकारण, दलित आयडेंटिटी असा राजकारणाकडे जाणारा मार्ग निवडला. नामदेवनं तर निवडणुका लढवल्या. त्यामुळे साठोत्तरी चळवळीचं भाषा हे मूळ सत्व नासलं काय ? 'बिछडे सभी बारी बारी' असं का व्हावं ?

'आज दिनांक' सुरू झालं नि नामदेव नियमित भेटू लागला. अशोक शहाणे सल्लागार संपादक होते. मीदेखील लिखाण करायचो. 'टाइम्स'चं काम आटपलं की, मी 'आज दिनांक'ला जायचो. दादर फूल बाजारातल्या एका इमारतीत शेवटच्या मजल्यावर 'आज दिनांक 'नं आपला छापील संसार थाटला होता. ऑफिसला लागून छान गच्ची होती. तिथं गप्पांचा फड जमलेला असायचा. शहाणेंमुळे नामदेव, कृष्णा कारवार (अतिशय गुणी माणूस. छपाईकलेतला उस्ताद. मितभाषी), सतीश काळसेकर वगैरे लेखकांची सतत ये-जा असायची. सुनील कर्णिक (हा आणखी एक गुणी माणूस. उत्तम संपादन कौशल्य. कर्णिक फार मोजकंच बोलायचे.) 'आज दिनांक'च्या पुरवण्यांचं काम पाहायचे. संपादक कपिल पाटील नामदेवला मानायचे. नामदेवचा 'या सत्तेत जीव रमत नाही' हा कवितासंग्रह पाटील छापणार होते.

संध्याकाळ सरकत सरकत अरबी समुद्राच्या पोटात शिरू लागली की, नामदेव उगवायचा. डुलत डुलत कंपोजिंग विभागात जायचा नि आपला मजकूर कितपत 'मारून' झालाय (हा शब्द फक्त छापखान्यावाल्यांना समजेल.) ते पाहायचा. तो आला की, गप्पांची सगळी सूत्र त्याच्याकडे. कपाळाच्या खुंटीला अडकवलेला चष्मा डोळ्यांवर सरकवून नामदेव आपली ताजी कविता खणखणीत स्वरात म्हणू लागला की वातावरण भारून जायचं. रम्यान, लंडनचा एक तरुण पत्रकार मुंबईत आला होता. दलित साहित्यावर त्याला लिहायचं होतं नि तो ताजमहाल हॉटेलात उतरला होता. नामदेवचा रात्री साडेबाराला मला फोन. अमक्या अमक्या इंग्रजी शब्दाला किती छटा आहेत ते सांग. वर पुन्हा म्हणाला, "अमरीश, तू उद्या माझ्याबरोबर ये. च्यायला, तो पत्रकार गोरा आहे. म्हणजे लेकाचा पक्का साम्राज्यखोर असणार. काहीतरी विचारून मला गोत्यात आणेल. तू उद्या दुपारी बारा वाजता पीपल्स बुक हाऊसला ये. तिथून आपण 'ताज'ला जाऊ."

मी नाही गेलो. नामदेव नाराज झाला. "गुर्जी, आयला तुम्ही लोक मदत करत नाही", वगैरे फोनवर बोलला. मी मनाला अजिबात लावून घेतलं नाही. चारेक दिवसांनंतर 'आज दिनांक'ला भेटला. खळखळून हसला. त्या ब्रिटिश वार्ताहराला नामदेवनं अलगद खिशात टाकलं होतं. तो गडी वासराप्रमाणे चार दिवस नामदेवच्या मागे मागे करत होता. कधी कामाठीपुरा, कधी गांडूबगीचा. नामदेव सांगेल ते मुकाट्यानं लिहून काढत होता. वर 'ताज'मध्ये मेजवानी.

एकदा नामदेव म्हणाला, "अमरीश, मला बाळासाहेबांना (ठाकरे) भेटायचंय. तू त्यांच्याशी बोल." मनात म्हटलं, नसती आफत. नामदेवच्या डोक्यात कोणता सुलेमानी किडा (हा त्याचाच शब्द) वळवळत असेल, ठाऊक नाही. मी म्हणालो, "नामदेव, तुम्हीच थेट बोला ना बाळासाहेबांशी. ते फोन घेतात." नामदेवनं हट्टच धरला. "तू खडा टाकून बघ. त्यांच्या मनात काय ते कळलं पाहिजे. मी फोन केला नि ते 'नाही भेटायचंय तुला' असं म्हणाले तर?"

बाळासाहेब तेव्हा टॉपला होते. त्यांचं सरकार होतं. बातमीदारीसाठी 'मातोश्री' बंगल्यावर जावं लागायचं. एकेकदा मूड असला तर औपचारिक मुलाखत संपल्यावर बाळासाहेब "आणखीन काय?" असं विचारायचे. म्हणजे आपण समजायचं की, ते इतर विषयांवर बोलायला राजी आहेत. मी नामदेवचा विषय काढला. "तो तुझा मित्र काय?" बाळासाहेबांनी विचारलं. मी 'हो' म्हणालो. कवी म्हणून नामदेवबद्दल बाळासाहेबांना आस्था होती. तो घट्टमुट्ट नि करकरीत मराठी आहे हेही त्यांना ठाऊक होतं.

बाळासाहेब म्हणाले, "नामदेव चांगला कवी आहे. पण आमच्या राजकीय भूमिका आता वेगळ्या आहेत. परस्परविरोधी आहेत. भेटून काय करणार? विनाकारण तुम्ही लोक बातम्या कराल. पक्षात चुकीचा मेसेज जाईल." मिनिटभर थांबले नि म्हणाले, "त्याला सांग जुने दोर मी कापून टाकलेत. आता मला शिवसेना घेऊन पुढं जायचंय." 'रिडल्स' प्रकरणामुळे शिवसेना-दलित टेंशन वाढलं होतं.

गंमत म्हणजे नामदेव लवकरच 'सामना'त कॉलम लिहू लागला. त्यानं काय किल्ली फिरवली, ठाऊक नाही. मी त्याला विचारलं नाही. नंतर एका ज्येष्ठ सेना नेत्याकडून माहिती मिळाली की, बाळासाहेबांनी नामदेवला विधानपरिषदेची जागा देऊ केली होती. पण त्याला पद्मश्री हवी होती. ती त्याला मिळाली. मला कळेना. नामदेवला प्रस्थापित व्यवस्थेची, राज्यसंस्थेची state ची शाबासकी का हवीहवीशी वाटली? मग चे गवेराचं काय झालं ?

1992-93 च्या दंगलीत नामदेव आपलं सामानसुमान, पत्नी-मुलांसह (नि कुत्रा) घेऊन ज्येष्ठ इंग्रजी कवी आदिल जस्सावाला यांच्या घरी राहायला गेला. जस्सावाला खूप छान माणूस. नामदेवच्या शब्दात सांगायचं तर 'डीसेंट'. पुढे हसत हसत म्हणाला, "च्यायला, आदिल माझ्या कुत्र्याच्या प्रेमात पडलाय रे. काय फर्स्ट क्लास बडदास्त कुत्र्याची."

'आज दिनांक' बंद पडलं. मी माझ्या लिखाणात गुंतून पडलो नि वर 'टाइम्स'चा रोजचा रगाडा. नामदेव क्वचितच भेटायचा. तोही आजारी आजारी राहू लागला. एकदा एका साहित्यिक कार्यक्रमात भेटला. तब्येत उतरली होती. कमरेला तामीळ लोकांची वेष्टी गुंडाळलेली. नि शर्ट. हसला नि 'क्यूँ कैसे हो, गुर्जी?' असं विचारलं. गुलजारांविषयी विचारलं. थोडं इकडचं-तिकडचं बोलणं झालं नि डुलत डुलत गाडीपाशी गेला. ती शेवटची भेट.

नामदेव 2014 ला वारला. जानेवारी महिना होता. 'टाइम्स'मधून फोन आला. मी मनात म्हटलं, 'नामदेव, बस क्या!'

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके