23 सप्टेंबर 2026 रोजी 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने कमालीचे खळबळजनक वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. (त्याबाबत नेमकी माहिती देणारी व भाष्य करणारी योगेंद्र यादव यांची मुलाखत प्रस्तुत अंकात घेतली आहे.) त्या संदर्भात प्रक्षोभक प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येत आहेत. विरोधी पक्षांकडून तर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अटकेची मागणी झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून तरुणाईचे मोठे आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे सर्व आणि यापलीकडे बरेच काही होण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीची वाट पाहण्यात काहीही अर्थ नाही. कारण तोपर्यंत होणारे नुकसान प्रचंड असेल. आता केवळ केंद्र सरकार घालवणे पुरेसे ठरणार नाही. विद्यमान राष्ट्रपती आणि विद्यमान सरन्यायाधीश यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा बाळगणे निरर्थक ठरणार आहे. संपूर्ण देशात आमूलाग्र बदलासाठी लढण्याची गरज निर्माण झाली आहे.
सारांश, जगातील सर्वांत मोठ्या यंत्रणेच्या आयुक्तांची सर्वाधिक सदोष असलेली नियुक्ती प्रक्रिया सर्वाधिक निर्दोष करणे आणि त्या सर्वांत मोठ्या यंत्रणेला सर्वाधिक बलवान करणे, हाच या देशातील जनतेसमोरचा एककलमी कार्यक्रम असला पाहिजे. ती लढाई संसदेत, न्यायालयात, प्रसारमाध्यमांत आणि रस्त्यांवरही केली पाहिजे. अर्थातच, तेवढ्याने भागणार नाही. आणखी बरेच काही करावे लागणार आहे. उदाहरणार्थ, मतदारसंघांची रचना व पुनर्रचना. त्या संदर्भातील लबाडी सांगणारा अनिल गोरे यांचा लेख याच अंकात प्रसिद्ध केला आहे.
- संपादकीय, साप्ताहिक साधना (6) सप्टेंबर 2025)
वरील मजकूर बरोबर तेरा महिन्यांपूर्वीच्या साधनाच्या संपादकीय लेखातील समारोपाचा परिच्छेद आहे. त्या लेखात भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची किती वाताहात झाली आहे, हे विविध उदाहरणांसह दाखवून दिले आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून होणार होती, मात्र त्याच्या आदल्या दिवशी (25 जानेवारी) निवडणूक आयोग ही स्वायत्त घटनात्मक यंत्रणा तयार करण्यात आली. राज्यघटनेतील कलम 324 नुसार ही यंत्रणा अस्तिवात आली आहे. या यंत्रणेला विश्वासार्हता मिळवून देण्याचे काम देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी करून दिले. त्या नंतरच्या चार दशकांतील निवडणूक आयुक्तांनी कमी-अधिक त्रुटी व दोष खपवून घेत निवडणूक प्रक्रियेवरील, परिणामी देशातील लोकशाहीवरील मतदारांचा विश्वास ढळणार नाही याची काळजी घेतली. मात्र निवडणूक प्रचाराच्या काळात उमेदवारांकडून व राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत होते, त्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्याचे काम 1990 ते 96 या काळात मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी केले. राज्यघटनेने निवडणूक आयोग व निवडणूक आयुक्त यांना किती सशक्त केलेले आहे, याची जाणीव तेव्हा देशातील जनतेला झाली. त्यानंतरच्या पाव शतकात आलेल्या सर्व निवडणूक आयुक्तांनी शेषन यांचा कित्ता गिरवला नसला तरी, त्या यंत्रणेवरील विश्वासाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली.
मात्र 2019 नंतर भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोग या यंत्रणेची वाट लागली आहे. ती कशी व का, हे त्या संपादकीय लेखात विशद केले आहे. त्याची कारण मीमांसा 2007 ते 12 या काळात निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेल्या एस. वाय. कुरेशी यांचा हवाला देऊन केली आहे. कुरेशी यांनी एक खूप महत्त्वाचे विधान गेल्या दोन दशकांत अनेक वेळा केले आहे, ते स्वतः निवडणूक आयुक्त असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही : 'भारताचा केंद्रीय निवडणूक आयोग ही जगातील सर्वाधिक सशक्त यंत्रणा आहे, मात्र तिच्या आयुक्तांची नियुक्ती ही जगातील सर्वाधिक सदोष पद्धतीने केली जात आहे'. आणि याच विसंगतीचा प्रचंड गैरफायदा नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या राजवटीने घेतला आहे. त्यांची राजवट जरी 2014 पासून या देशात चालू असली तरी, त्यांना निवडणूक आयोगावर पूर्ण कब्जा 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच मिळवता आला आहे. साहजिकच, त्यानंतरच्या सहा वर्षांत त्यांनी आणलेले सर्व निवडणूक आयुक्त कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वागत आले आहेत. सध्याचे तिन्ही निवडणूक आयुक्त केंद्रीय सत्तेला हवे तसेच वागत आले आणि त्याचा कळस मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गाठला आहे. म्हणूनच 2025 च्या ऑगस्ट अखेरीस राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन, सध्याच्या तिन्ही निवडणूक आयुक्तांनी मतदार याद्यांमध्ये किती व कसे घोळ घातले आहेत, हे जाहीर केले होते. भाजपला नको असलेली नावे मतदार याद्यांतून वगळणे, अनेक बोगस नावे नव्याने समाविष्ट करणे आणि त्या बळावर निवडणुका जिंकणे असा तो प्रकार चालू असल्याचे सप्रमाण दाखवून दिले होते. एवढेच नाही तर, 'काँग्रेसप्रणित सरकार केंद्रीय सत्तेवर येईल तेव्हा या तिन्ही निवडणूक आयुक्तांची चौकशी होईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल' असेही म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, 2029 साठी एक कलमी कार्यक्रम कोणता असला पाहिजे हे साधनाच्या त्या संपादकीयात मांडले होते.
तेव्हापासून, वर्षभर देशभरामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधातील वातावरण धुमसत राहिले आहे. अपारदर्शकता हे निवडणूक आयोगाचे मुख्य वैशिष्ट्य बनले आहे आणि निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात सतत ओरड होत राहिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तर संसदेत महाभियोगाचा खटला चालवण्यासाठी विरोधी पक्षांच्या शंभर खासदारांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्ताव दाखल केला होता. मात्र लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्षांनी तो दाखल करून घेतलेला नाही. तो प्रस्ताव दाखलच करून न घेणे हीसुद्धा संविधानातील किंवा कायद्याच्या अंमलबजावणीतील मोठी त्रुटी म्हटली पाहिजे. त्या संदर्भात भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतलेली नाही. आणि तो महाभियोग दाखल न झाल्यामुळे दरम्यानच्या वर्षभरात ज्ञानेश कुमार यांनी राजरोस दरोडे टाकण्याचे काम चालू ठेवले आहे. ते इतके जास्त आहे की, त्यांचे साथीदार असलेले विवेक जोशी व सुखबीर सिंग संधू हे दोन निवडणूक आयुक्तही मनोमन हादरले आहेत. 'विद्यमान केंद्र सरकार कधी ना कधी जाईल आणि मग आपली चौकशी होईल' ही भीती त्यांच्या मनात दाटून आली असणार. आणि म्हणूनच कदाचित, मागील दहा महिन्यांत त्यांनी चौदा वेळा मुख्य निवडणूक आयुक्तांशी लेखी असहमती नोंदवली असावी. त्यामध्ये, कायद्याप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त वागत नाहीत, कायदा नसताना काही निर्णय घेतले जातात आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अजेंडा मिळत नाही, बैठकीचे इतिवृत्त मिळत नाही, अनेक महत्त्वाचे निर्णय आमच्या परस्पर घेतले जातात असे म्हटले आहे. एवढेच नाही तर, मुख्य निवडणूक आयुक्त आम्हाला डावलून अनेक चुकीचे निर्णय घेत आहेत, त्यात आम्हाला गृहीत धरत आहेत, अशी तक्रार त्या दोघांनी देशाच्या कॅबिनेट सेक्रेटरीकडे केली आहे, म्हणजे केंद्र सरकार व पंतप्रधान यांच्याकडे ! वस्तुतः ते पूर्ण चुकीचे आहे! कारण कॅबिनेट सेक्रेटरी हे प्रशासनातील सर्वोच्च पद आहे ते केंद्र सरकारसाठी, निवडणूक आयोगासाठी नाही! त्यामुळे, त्या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आपली तक्रार राष्ट्रपतीकडे किंवा सर्वोच न्यायालयाकडे करायला हवी होती. त्यांनी तसे केलेले नाही याचाच अर्थ ते स्वतः निर्दोष नाहीत, अनेक गैरकृत्यांत ते सहभागी होत आले आहेत. गेल्या दहा महिन्यांत त्यांनी जे काही कागदोपत्री केले आहे ते केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी !
अर्थातच या तीनही निवडणूक आयुक्तांना प्रलोभने दाखवली गेली आणि दडपणे आणली गेली, हे उघड आहे. तसे करून आपल्याला हवे ते निर्णय नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी करून घेतले आहेत. 'केंद्रिय निवडणूक आयुक्तांवर खटला चालवता येणार नाही व त्यांना तुरुंगात टाकता येणार नाही,' असा कायदा डिसेंबर 2023 मधील संसदेच्या अधिवेशनात विद्यमान केंद्र सरकारने करून घेतला आहे, याचे कारणही हेच असावे. त्यासाठी कोणते कटकारस्थान रचले गेले, हे आता सर्वांच्या लक्षात येत आहे. त्या अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेतील जवळपास दीडशे खासदार निलंबित करून, अत्यंत घाईने व चर्चा होऊ न देता जे काही कायदे केले, त्यापैकी एक कायदा निवडणूक आयुक्तांशी संबंधित आहे. वस्तुतः तेव्हा दीडशे खासदार निलंबित करण्यासाठी अतिशय क्षुल्लक कारण दाखवले होते. तेव्हा लोकसभेच्या गॅलरीतून काही विद्यार्थ्यांनी सभागृहात उड्या मारल्या होत्या, 'त्यांची चौकशी करावी आणि ते विद्यार्थी कोण होते हे जाहीर करावे' अशी मागणी त्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली होती. त्यासाठी संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. ते विद्यार्थी कोण होते हे सरकारने अद्याप सांगितलेच नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सभागृहात उड्या टाकणे यामागेही काही कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते काहीही असो, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे त्यावेळचे अध्यक्ष (उपराष्ट्रपती) जगदीप धनखड हे त्या निलंबन प्रक्रियेत सहभागी होते. आता मुख्य निवडणूक आयुक्तांचे वर्तन इतके बेमुर्वत चालू आहे, त्याला ते दोन अध्यक्षही कारणीभूत आहेत, असे म्हणावे लागेल. म्हणजे हे कटकारस्थान खरे ठरले तर देशद्रोहाचे खटले दाखल होण्यास हे सर्वजण पात्र ठरतील.
मागील वर्षभरात आधी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि नंतर पश्चिम बंगालमध्ये. त्या दोन्ही राज्यांतील निवडणुकांच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोग पूर्वी कधी नव्हे इतका वादग्रस्त ठरला आहे. मतदार याद्यांची सखोल चौकशी या नावाखाली निवडणूक आयोगाने जे काही केले ते दिवसाढवळ्या दरोडे टाकण्यासारखेच होते. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील सत्ता तर अक्षरशः तृणमूल काँग्रेसच्या हातून हिसकावून घेऊन भाजपच्या स्वाधीन केली आहे. त्यामुळे, त्या दोन्ही राज्यांतील निवडणुका अवैध ठरवल्या पाहिजेत, तिथे पुन्हा नव्याने निवडणुका घेतल्या पाहिजेत. मतदार याद्या तपासणी प्रक्रिया देशातील अन्य राज्यांतही ज्या पद्धतीने चालू आहे, ते पाहता लोकशाहीप्रेमी व देशप्रेमी भारतीय नागरिकांचा अभिमान गळून पडला आहे, त्यांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे.
23 सप्टेंबर 2026 रोजी 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने कमालीचे खळबळजनक वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. (त्याबाबत नेमकी माहिती देणारी व भाष्य करणारी योगेंद्र यादव यांची मुलाखत प्रस्तुत अंकात घेतली आहे.) त्या संदर्भात प्रक्षोभक प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येत आहेत. विरोधी पक्षांकडून तर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अटकेची मागणी झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून तरुणाईचे मोठे आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे सर्व आणि यापलीकडे बरेच काही होण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीची वाट पाहण्यात काहीही अर्थ नाही. कारण तोपर्यंत होणारे नुकसान प्रचंड असेल. आता केवळ केंद्र सरकार घालवणे पुरेसे ठरणार नाही. विद्यमान राष्ट्रपती आणि विद्यमान सरन्यायाधीश यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा बाळगणे निरर्थक ठरणार आहे. संपूर्ण देशात आमूलाग्र बदलासाठी लढण्याची गरज निर्माण झाली आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या