डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या शतकात एकच महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल खेळाडूंच्या मनोवृत्तीत झालेला दिसतो, तो म्हणजे ‘आम्ही जिंकणारच’ ही भावना आता जागी झालेली आढळते. त्यामुळं त्यांची कामगिरीही सुधारल्याचं आकडेवारी वा स्पर्धांतील कामगिरीवरून सांगता येतं. जागतिक पातळीवर पोहोचलेल्या खेळाडूंची संख्या थोडी का होईना वाढली आहे, आणि ती वाढत जाण्याजोगं वातावरण कायम राहायला हवं. केवळ चीननं केलं म्हणून आपल्याला का जमत नाही, असा प्रश्न करण्याऐवजी आपण जास्तीत जास्त काय करू शकू, याचा विचार व्हायला हवा.

असं म्हणतात की कोणतंही चांगलं नुसतं चांगलं असून भागत नाही. ते तसं दिसावं लागतं, सिद्ध व्हावं लागतं. खेळाडूंचं तसंच असतं. त्यांची कामगिरी चांगली असावी लागते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती योग्य वेळी नोंदवण्याचं कौशल्य त्यांच्यात असावं लागतं.

त्यासाठी संपूर्ण दिनचर्याच योग्य प्रकारं आखावी लागते. म्हणजे त्यात सरावाचं वेळापत्रक येतंच पण त्याबरोबरच खेळाडूचं खाणं पिणं, झोप, इतर कार्यक्रम याबाबतचं नियोजनही आवश्यक असतं.

त्याची मानसिक अवस्था आणि विचार करण्याची दिशाही योग्य असावी लागते. त्यांच्या बरोबर आणि आजूबाजूला असणाऱ्यांचीही त्याबाबत जबाबदारी असते. आणि हे सारं जमतं तेव्हा कुठं तो खेळाडू चमकतो. विजेता बनू शकतो.

विजेता बनणं हे खेळाडूचं उद्दिष्ट असतं, असायलाच हवं. नाही तर मग नुसतं वेळ घालवणं, यापेक्षा खेळाला वेगळं काही महत्त्व द्यायचं कारणच नाही. विजेता ठरतो तो स्पर्धांत. या स्पर्धा अगदी शहर, जिल्हा, राज्य, विभागीय पातळीवर असतात. आणि त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक.

पण या सर्वांपेक्षा महत्त्व पावलेली अशी एक स्पर्धा आहे, ऑलिंपिक. जागतिक पातळीवरचा एक भव्य क्रीडा सोहळा. खेळाडूंना आपलं नाणं वाजवून दाखवण्याची संधी देणारा. खऱ्या अर्थानं नामवंत कोण हे दाखवून देणारा.

तसं पाहिलं, तर ऑलिंपिक विक्रमांपेक्षा कित्येकदा जागतिक विक्रम सरस असतात. तरीही कोणताही खेळाडू जागतिक विक्रमापेक्षा ऑलिंपिक सुवर्णपदकाला अधिक महत्त्व देतो. याचं कारण जागतिक विक्रम हा अनेकदा खेळाडू आधी जाहीर करून, प्रयत्न करून, तो प्रयत्न कोठे करायचा हे ठरवून नंतर करत असतो. त्यामुळं तो जास्तीत जास्त चांगली कामगिरी नोंदवू शकतो.

पण ऑलिंपिकचं तसं नसतं. ऑलिंपिक विक्रम हा ऑलिंपिकमध्येच नोंदला जातो आणि अर्थातच ऑलिंपिक पदकही फक्त ऑलिंपिकमध्येच कमावता येतं.

आता पुन्हा असं वाटणं साहिजकच आहे की, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मग याला एवढं महत्त्व कशासाठी? तर त्याचं कारण ऑलिंपिकच्या तारखा, स्पर्धांचं वेळापत्रक साधारण चार वर्षं अगोदरच जाहीर केलं गेलेलं असतं. नेमक्या त्या वेळेलाच खेळाडूला आपल्या कौशल्याचा परमोच्च बिंदू गाठायचा असतो. त्यामुळंच इतर स्पर्धांच्या विजेत्यांपेक्षा ऑलिंपिक विजेत्याला जास्त मान असतो.

स्पर्धेचा विजेता एकच असतो, हे खरं. पण विजेता कुणाला म्हणायचं याचा दुसराही एक निकष आहे. जो आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवेल त्यालाही विजेता समजावं, कारण असं की त्याची स्वतःशीच स्पर्धा असते आणि ती त्याने जिंकलेली असते. हा निकष सर्वसाधारण खेळाडूंसाठी असायला हवा. म्हणजे त्या खेळाडूची कामगिरी सुधारत असल्याची ती एक पावतीच असेल.

ऑलिंपिक पात्रता फेरीत नोंदवलेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी जो खेळाडू ऑलिंपिकमध्ये नोंदवेल, त्याला विजेता समजायला हरकत नाही. पण अनेकदा (आणि दुर्दैवाने भारतीय खेळाडूंच्या बाबतीत बऱ्याचदा) आपली पात्रता फेरीतील कामगिरी खेळाडू ऑलिंपिकमध्ये नोंदवत नाहीत. मग त्यासाठी अनेक कारणं पुढं केली जातात. त्यात खरं किती आणि पळवाट शोधण्याचा प्रयत्न किती हे त्यांचं त्यांना पुरतं ठाऊक असतं. एखादा मिल्खा वा गुरुबचन सिंग रांधवा, एखादी पी.टी. उषा हे अर्थातच सन्मान्य अपवाद.

आणि हा प्रश्न विचारतानाच गेल्या वर्ष सहा महिन्यांतील बातम्या आपल्या डोळ्यापुढे येतात. अमक्या तमक्याची ऑलिंपिक वारी निश्चित, अमक्यानं लंडन वारी नक्की केली इ. यातून ऑलिंपिकबाबतची आपली मनोवृत्ती नेमकी अधोरेखित केली जाते.

वारी हा शब्द असा की, झालं. सारं काही भरून पावलं. म्हणजे असं की, वारीला जायचं. प्रत्यक्ष देवदर्शन झालं तर चांगलं, पण तसं ते क्वचितच होतं. मग काय, कळसाचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. असंच आपल्याकडं होत असे.

कारण मुळात पथकात खेळाडू कमी आणि अधिकारी जास्त अशी स्थिती असे. बरं त्या अधिकाऱ्यांचा उद्देशच मुळी वारीचा. त्यामुळं ते स्पर्धांच्या ठिकाणी क्वचित आणि अन्य पर्यटन स्थळी जास्त आढळत.

सुदैवानं या एकविसाव्या शतकात ही विसंगती कमी होत आहे. पण तरीही आठवतं ना, बीजिंगमध्ये आपल्या पथक प्रमुखांना आपल्या देशाच्या पहिल्या वहिल्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राचं नावही नीट माहीत नव्हतं आणि त्यांनी त्याला अविनाश बनवून टाकलं होतं. स्वतः अभिनवनंच त्याच्या पुस्तकात याची नोंद केली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या खेळाडूंना विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. आता प्रश्न विचारणाऱ्याला आणि त्याचं उत्तर देणाऱ्यालाही खरी परिस्थिती माहीत असायला हवी. तसं बहुधा नसतं. मग ऑलिंपिक मध्ये काय करणार वगैरे प्रश्न आणि ‘पदक घेऊनच येणार’ अशी उत्तरं येतात.

आता खेळाडूंचं उद्दिष्ट जिंकणं हेच हवं हे खरं, पण खेळाडूला आपली मर्यादा ठाऊक नसते असं थोडंच आहे? तरीही मान्य केलं की ऑलिंपिक स्पिरिटमुळं त्याची कामगिरी थोडी सुधारेल. मिल्खा वा उषा प्रमाणे. पण म्हणून तो एकदम पदकाला गवसणी घालू शकेल कसा?

ज्यांनी ऑलिंपिक पदकं मिळवली त्यांनी त्याआधी अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. मग तो बिंद्रा असेल, वीजेंदर सिंग असेल वा सुशील कुमार, लिअँडर पेस असेल वा करणम मल्लेश्वरी. पण अशी मोजकी उदाहरणं वगळता ऑलिंपिकमध्ये कामगिरीत सुधारणा झाल्याची आपल्याकडची उदाहरणं फारशी नाहीत. हे अर्थात वैयक्तिक स्पर्धांना लागू पडतं.

सांघिक स्पर्धांतही आपल्या खेळाडूंनी मुळात फार कमी वेळा (अपवाद अर्थातच हॉकी) ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवलंय. आणि तिथेही त्यांनी कधी सनसनाटी विजय नोंदवला आहे का, याचा शोधच घ्यावा लागतो. तसा फुटबॉल संघानं मेलबर्नला नोंदवला होता. उपांत्य फेरी गाठली होती. पण नंतर तो संघ पात्रताही गाठू शकलेला नाही, हे सत्य आहे.

खेळाडूंची निवड हा आणखी एक संशोधनाचा विषय. कारण आपल्याकडे नकळत सर्वत्र ‘कोटा’ हा डोक्यात असतोच. त्यामुळं कोणाचं पारडं जड, तर निवड करणाऱ्यांचं. त्यामुळे कोणाची जोडी कोणाबरोबर याबाबतही वाद होतात. खेळाडूंचं मत कधी मानलं जातं, तर कधी नाही. टेनिसबाबत यंदा हे दोन्ही प्रकार आढळले.

या शतकात एकच महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल खेळाडूंच्या मनोवृत्तीत झालेला दिसतो, तो म्हणजे ‘आम्ही जिंकणारच’ ही भावना आता जागी झालेली आढळते. त्यामुळं त्यांची कामगिरीही सुधारल्याचं आकडेवारी वा स्पर्धांतील कामगिरीवरून सांगता येतं. 

जागतिक पातळीवर पोहोचलेल्या खेळाडूंची संख्या थोडी का होईना वाढली आहे, आणि ती वाढत जाण्याजोगं वातावरण कायम राहायला हवं. केवळ चीननं केलं म्हणून आपल्याला का जमत नाही, असा प्रश्न करण्याऐवजी आपण जास्तीत जास्त काय करू शकू, याचा विचार व्हायला हवा. आणखी एक जबाबदारी खेळाडू व त्यांचे चाहते यांच्यावरही आहे. ऑलिंपिकसाठी निवड निश्चित झाली म्हणजे सारं काही झालं, असं समजून लगेच सत्कार समारंभ वगैरे सुरू करू नयेत. तर खेळाडूचं लक्ष त्याची कामगिरी जास्तीत जास्त चांगली कशी होईल यावर केंद्रित होईल, याकडं साऱ्यांनी ध्यान पुरवायला हवं ही बाब कुणी लक्षातच घेत नाही.

आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती अशी की, एखादा दिवस सत्कारात गेला, किंवा एखाद्याच दिवशी वेगळा आहार घेतल्यानं फारसं काय बिघडतंय असं म्हणू नका. कारण वाटतं तेवढं हे प्रकरण साधं नसतं. एक दिवस सराव झाला नाही, किंवा एखाद्याच दिवशी वेगळा आहार घेतला तर खेळाडूची प्रगती किमान दहा दिवसांनी मागे पडते, म्हणजेच त्याची दहा दिवसांची मेहनत वाया जाते. खेळाडूंना चांगली सामग्री अगदी वेळेवर मिळाली तर तिचा उपयोग होतो, ऐनवेळी कितीही चांगली सामग्री मिळाली तरी तिच्यामुळं अपेक्षित फायदा मिळत नाही.

त्याचप्रमाणं प्रशिक्षकांमध्ये वारंवार बदलही योग्य नाही, कारण प्रत्येक प्रशिक्षकाचं खेळाडूंशी नातं वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्यांचे आडाखेही वेगवेगळे असतात. त्यांना खेळाडूंची आमूलाग्र माहिती असायला हवी, म्हणजे केवळ खेळातील बाबी नाही, तर त्यांची प्रकृती, मनोवृत्ती, सवयी इ.सारं काही. ऐन वेळी प्रशिक्षकाची नेमणूक झाली तर तो अशी माहिती कधी मिळवणार? आणि मग त्या खेळाडूसाठी योग्य सरावाचा आणि अन्य कार्यक्रम कसे आखणार? तरीही अपयशाची जबाबदारी आपण त्याच्यावरच टाकतो, हे कसं काय हा प्रश्न कुणालाच पडत नाही, हेच दुर्दैव आहे.

आता ऑलिंपिक सुरू होत आहे. यंदा गेल्या ऑलिंपिकपेक्षा जास्त संख्येनं पदकं मिळण्याची शक्यता आहे, असं सर्वांनाच वाटतंय. ते शक्य करून दाखवण्याची जबाबदारी आपल्या खेळाडूंवर आहे. त्यासाठी त्यांना तुम्हा आम्हा सर्वांच्याच शुभेच्छा आवश्यक आहेत. तेव्हा भारतीय पथकाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा... आणि आता प्रतीक्षा ऑलिंपिक पदकांत किती भर पडणार याची!

Tags: आ.श्री. केतकर प्रशिक्षक खेळाडू पदक ऑलिंपिक A. S. Ketkar Coaches Athletes Medals Olympics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके