डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुलांसाठी दिला जाणारा शांततेचे नोबेल समजला जाणारा किताब २००६ मध्ये ओमला मिळाला. तेव्हा तो केवळ १४ वर्षांचा होता. वयाच्या आठ वर्षांपर्यंत सावकाराच्या शेतीची वेसही ओलांडू न शकणारा ओमप्रकाश त्यानंतर सहाच वर्षांनी देशाची सीमा पार करून नेदरलँडला पोहोचला. मुलांसाठीचा शांततेचा पुरस्कार हा नोबेल पारितोषिकविजेत्यांच्या हस्ते दिला जातो. ओमप्रकाशला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नोबेलविजेते एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला.

रस्त्यावर फुगे विकणारी, सिग्नलवर पुस्तकं विकणारी, हॉटेलात चहा-ऑर्डर घ्यायला येणारी चिमुरडी मुलं पाहिलीत तुम्ही? या मुलांना शाळा माहीत नसते. चांगलं जेवण माहीत नसतं. मजा करायची माहीत नसतं. मग माहीत काय असतं- तर फक्त काम करायचं. ही मुलं असतात बालकामगार. पण काही ठिकाणी तर या बालकामगारांना विकत घेतलेलं असतं. एकदा विक्री झाली की, ही छोटी मुलं त्यांच्या मालकांची कायमची गुलाम होतात. त्यांच्याकडून नुसतं काम करवून घेतलं जातं. खूप खूप म्हणजे खूपच. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस अशी त्यांची तऱ्हा होते. काही वेळा तर उपाशीपोटीच काम करायला सांगतात. ही सगळी तुमच्यासारखीच छोटी-छोटी मुलं पण कामगार. बापरे! काय भयंकर आहे.

आज अशाच एका मुलाची गोष्ट सांगणार आहे,  जो एक गुलाम बालमजूर होता. पण त्याच्या चांगल्या कामगिरीनं त्याला मुलांसाठी असणारं जागतिक स्तरावरील शांततेचं पारितोषिक मिळालं. या मुलाचं नाव आहे ओमप्रकाश गुर्जर. दि.३ जुलै १९९२ रोजी ओमचा जन्म झाला. राजस्थानाच्या अलवर जिल्ह्यातील थानागानी तहसीलमध्ये सरदाणा की ढाणी या छोट्या गावात तो राहत होता. आई-वडील, सात बहिणी आणि दोन भाऊ, असे ओमप्रकाशचे मोठे कुटुंब. ओमप्रकाशच्या वडिलांनी गावातल्या एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि कर्जाच्या मोबदल्यात त्यांनी स्वत:सह कुटुंबाला गहाण ठेवलं होतं. गहाण म्हणजे काय, तर या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब त्या सावकार महाशयांकडे चाकरी करणार. त्यांचे गुलाम बनून त्यांच्या घरातली, शेतातली कामं करणार. काही सावकारमंडळी कर्ज फिटलं तरी सांगत नाहीत; त्यांना फुकटात काम करणारे गुलाम मिळालेले असतात ना, म्हणून. ओमच्या बाबांनी कर्ज घेतले आणि संपूर्ण कुटुंब गुलाम झाले, त्या वेळेस ओमप्रकाश होता अवघा पाच वर्षांचा. पाच वर्षांचा गुलाम, बालकामगार.

मालकाची माणसं रोज ओरडायची, ‘‘ए ओमप्रकाशऽ चल रे, शेतातले तण उपटून काढ... बकरीला चरायला ने... गुरांची राखण कर... त्यांना वैरण घाल. अरे, सावली पाहिली की लगेच झोपू लागलास? चल उठ, इथं काम करायला आणलं आहे,  झोपायला नाही.’’ बिचारा चिमुकला ओमप्रकाश उठून पुन्हा कामाला लागायचा. इवलासा कोवळा ओमप्रकाश गुरांबरोबर गुरासारखं राबू लागला. शाळा तर काही ठाऊकच नव्हती त्याला. बस्‌- काम एके काम. वर कामात जराशी चूक झाली की, त्याची चांगलीच धुलाई ठरलेली असे. त्याच्या आसपासही असं कुणी नव्हतं सांगायला की, ‘अरे, लहान आहे रे तो, मारताय कशाला?’ आई-बाबाही मुलाचा मार निमूट पाहायचे, कारण तेही तर गुलामच होते. बरं, हे एवढ्यावरच थांबायचं नाही. चोप तर बसायचा, पण काही वेळा जेवणही दिलं जात नसे. एक तर दिवसातून कसंबसं दोनदा जेवण, त्यात अंगतोड मेहनत आणि त्यातून जेवणही नाकारले की बस्स! त्याच्या पोटातल्या कावळ्यांनाही ओरडण्याची ताकद उरायची नाही. निष्ठुर आणि क्रूर होती ती माणसं.

पण सगळीच कुठं असतात क्रूर आणि निष्ठुर? जगात प्रेमळ माणसंही तर असतात. गुलामीच्या तीन वर्षांनंतर ओमप्रकाशच्या आयुष्यात ‘बचपन बचाव आंदोलन’ ही संस्था आली. (शांततेचं नोबल पारितोषिक २० १४ मध्ये मिळालेल्या कैलाश सत्यार्थींची ही संस्था.) ‘पैशांसाठी काम करणं हे लहानग्यांचं काम नाही. लहान मुलांचं बालपण असतं ते शाळेत जाण्यासाठी, भरपूर अभ्यास करण्यासाठी, दोस्तांसोबत खेळण्यासाठी. लहान मुलांकडून काम करून घेणं चुकीचं आहे,’ असं जेव्हा त्या संस्थेचे गावात आलेले कार्यकर्ते सांगत होते, तेव्हा ओमप्रकाशला व त्याच्यासारख्या इतर मुलांना सुरुवातीला त्याचा अर्थ कळतच नव्हता. हे लोक आपली सुटका करवून कुठं नेतील, अशी भीती त्यांना वाटत होती.

‘‘तुमची मुलं लहान आहेत,  त्यांना कामाला जुंपू नका.’’ बचपन बचावचा एक कार्यकर्ता पालकांना आणि सावकाराला उद्देशून म्हणाला.

 ‘अरे तू कोण आहेस रे सांगणारा? त्याच्या वडिलांनी कर्ज घेतलंय. ते फेडण्यासाठी त्यांना आमच्याकडे आयुष्यभर गुलाम बनून राहावं लागेल आणि सोडवायचं असेल तर पैसे दे.’’  सावकारदेखील गरजला.

‘‘लहान मुलांकडून काम करवून घेणं गुन्हा आहे. बालकामगार ठेवणं गुन्हा आहे. लहान मुलं कुणाची गुलाम नाहीत. त्यांनाही काही हक्क असतात. त्यांना शिक्षण घेण्याचा, मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.’’ कार्यकर्त्यानं समजूतीची भूमिका घेतली. पण ‘लहान मुलांचे अधिकार-हक्क’ ही भानगड ना पालकांना कळत होती, ना सावकाराला. त्यामुळं ओमप्रकाशचे आई-वडील त्या कार्यकर्त्यांशीच हुज्जत घालत राहिले. पण कार्यकर्त्यांनीही पीछेहाट केली नाही. त्यांनी पालकांना गोष्टी रीतसर समजावल्या. ओमप्रकाश गुलामीत राहिला तर त्याचेही भविष्य अंधकारमयच राहणार, हे पटवून दिलं. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच ओमप्रकाशचे पालकही सावकाराकडे सुटकेसाठी जोर धरू लागले. शेवटी सावकार तयार झाला. ओमप्रकाशच्या आई-बाबांनी योग्य वेळी त्याला साथ दिली, म्हणून तो त्या दलदलीतून २६ एप्रिल १९९९ रोजी बाहेर पडू शकला.

सावकाराच्या गुलामीतून सुटका झाल्यानंतर त्याला द्वारापूर येथील पुनवर्सन केंद्रात नेण्यात आले. राजस्थानमधील हे बालआश्रम अशा पीडित मुलांसाठीच पूर्णवेळ काम करते. सुटका झालेल्या मुलांना प्रशिक्षण-शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था काम करते. इथं आल्यानंतर ओमप्रकाशला काय जाणवलं, ठाऊक आहे? तो आठ वर्षांचा होईतो त्याने त्याचं ‘सुदृढ बालपण’ गमावलं आहे. बालआश्रमातच त्याला पहिल्यांदा जाणवलं की,  लहान मुलांचंही कुणी तरी ऐकतं. त्यांच्या मतांचा आदर करून निर्णय घेता येतो. इथं आल्यावर त्याला खेळतात कसं, हेही माहीत नव्हतं. कारण कळत्या वयापासून कामच तर करत आला होता ना! पण इथं तो खेळायला शिकला. मग शाळेत जाऊ लागला. नवे कपडे मिळाले. चांगलं अन्न मिळालं. इथं त्याचा वाढदिवस पहिल्यांदा, म्हणजे नवव्या वर्षी साजरा करण्यात आला. ओमप्रकाश आता स्वतंत्र होता, मुक्त होता; तरीही त्याला त्याच्यासारख्या अन्य कामगारमुलांविषयी काळजी वाटत होतीच. त्याचं संवेदनशील मन इतरांच्या दु:खाने कासावीस होई.

त्याच दरम्यान ओमप्रकाशला त्याच्या शाळेतील शिक्षक आणि बालआश्रमातील कार्यकर्त्यांकडून कळाले की, बालकांचे हक्क जोपासणारा आणि त्यासाठी जनजागृती करणारा कायदा आहे. ओमप्रकाशला जणू जादूची छडी गवसली! त्यानं भारतात असलेल्या बालकायद्यांचा अभ्यास सुरू केला. भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही कोणते कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते याचा त्याने पुरेपूर अभ्यास केला. या कायद्यानं पाठशाळामधील मुलांसोबत बालकांच्या हक्कांची व्याख्या केलेली होती. इतकंच नव्हे, तर बालहक्कांचे रक्षण करण्याचं किंवा जोपासण्याचं काम कुणा एकाचं नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे- संपूर्ण समाजाची. हे सारं ओमप्रकाशच्या छोट्या मनात नोंदवलं जात होतं.

दर शनिवारी-रविवारी तो गावी जाई, तेव्हा गावातल्या इतर मुलांना सांगायचा, ‘‘तुम्ही इथून बाहेर पडा. माझ्यासोबत चला. शाळेत शिकू या. तिथं चांगलं जेवण मिळतं. कपडे मिळतात.’’ तो त्यांच्या पालकांनाही हे सांगू लागला. पण ते त्याच्यावरच खेकसायचे, ‘‘मुलं काम नाही करणार तर खाणार काय? ते शेळ्या-बकऱ्या चरायला नाही नेणार तर कोण?’’ ओमप्रकाशही त्यांचा पाठपुरावा सोडत नव्हता. कालांतराने ओमप्रकाशमध्ये झालेला बदल त्या गरीब पालकांना दिसू लागला. शेवटी ते तयार झाले. अशा कित्येक मुलांची त्याने सुटका केली.

ओमप्रकाश हुशार असल्याने त्याचा शाळेतील अभ्यासही चांगला होऊ लागला. तो बारा वर्षांचा असताना शाळेतील बालपंचायतीचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. शाळेतल्या अडचणी गावातील सरपंचांपुढे मांडण्याचं काम अध्यक्ष करत असे. अध्यक्षपदी असताना ओमप्रकाशकडून मुलांसाठी एक खूप चांगली गोष्ट घडली. तो ज्या पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता, तिथं पालकांकडून १०० रुपये फी घेतली जात होती. पण पब्लिक स्कूलमध्ये तर शिक्षण मोफत देणे बंधनकारक असल्याचे त्याच्या वाचनात आले होते. त्याने हा मुद्दा जयपूर कोर्टातील मुख्य न्यायाधीशांकडे नेला. शाळेत मोफत शिक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली. ओमप्रकाशच्या म्हणण्यात तथ्य होते. कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल देत ‘पब्लिक स्कूलने पालकांचे पैसे परत करावेत’, असा आदेश दिला. ही गोष्ट इथंच थांबली नाही, ती केस राजस्थानच्या मानवाधिकार आयोगाने ऐकली आणि एक खूप महत्त्वाचा निर्णय झाला. राजस्थानमधील सर्व पब्लिक स्कूलमध्ये कुठल्याही प्रकारची फी आकारण्यास पूर्णपणे बंदी आली. ओमप्रकाशने राजस्थानातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

आता ओमप्रकाश बचपन बचाव आंदोलनाचा सर्वांत कमी वयाचा सक्रिय कार्यकर्ता बनला होता. तो बालविवाह रोखू लागला, पथनाट्यात सहभागी होऊ लागला आणि बालमजुरांची सुटका करण्यात पुढाकार घेऊ लागला. एकदा असाच तो सोन्याची तार बनवणाऱ्या फॅक्टरीत कार्यकर्त्यांसोबत गेला. त्या वेळेस त्यानं पाहिलं की, शासकीय अधिकारी सुटका केलेल्या मुलांसोबत फारच वाईट पद्धतीनं वागत होते. मुलांशी तुच्छतेनं बोलायचे, त्यांच्यावर चिडायचे. तेव्हा ओमप्रकाशने त्यांना जाब विचारला. ती वयानं मोठी माणसं असल्यामुळे तीही पुन्हा ओमप्रकाशलाच रागवायची. शेवटी त्यानं ‘बालमजुरांची सुटका केल्यानंतर कशा रीतीनं  त्यांना वागणूक दिली पाहिजे,’ याची नियमावली सांगितली आणि तसं वागवण्याची विनंती केली. तर काय घडलं, माहिती आहे? शासकीय अधिकाऱ्यांना काही पत्ताच नव्हता की, असेही काही नियम आहेत म्हणून!

त्यानंतर ओमप्रकाशच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, जिच्यामुळे त्याला वेगळाच धडा मिळाला. त्याला इटली या देशात शिक्षण आणि बालकामगार याविषयावरील परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं. पण त्याच्याकडे जन्मदाखला नव्हता. त्याच्याकडे जन्माचा पुरावा म्हणून काहीच नव्हतं. त्यामुळं त्याला पासपोर्ट मिळाला नाही. इटली वारी चुकली. मग त्यानं जन्मप्रमाणपत्र काय असतं, कुठे मिळतं, याची माहिती घेतली. तो जन्मला याची नोंद त्याच्या वयाच्या अकराव्या वर्षी झाली. मग त्याच्या लक्षात आलं की अरे, हे  तर फारच महत्त्वाचं कागदपत्र आहे. शिवाय भारतासारख्या देशात बालहक्क राबवायचा असेल, तर बालकाची ‘बालक’ म्हणूनच ओळख प्रथम निर्माण होणं गरजेचं आहे. मग त्यानं दौसा आणि अलवर जिल्ह्यात जन्मनोंदणी कॅम्पेन सुरू केली. याबाबत केवळ बोलून तो थांबला नाही, तर त्याने ५०० मुलांना त्यांच्या नोंदणीसाठी सोबत केली. या मुलांसोबत शासकीय अधिकाऱ्यांकडे खेटा मारल्या आणि त्यांना जन्मप्रमाणपत्र मिळवून दिलं. 

ओमप्रकाश नवनव्या कल्पना घेऊन काम करतच होता. वयाच्या तेराव्या वर्षी (सप्टेंबर २००५ मध्ये) त्यानं जयपूर ते दिल्ली हा ३६ तासांचा सायकलप्रवास केला. या प्रवासात त्यानं काय केलं माहिती आहे? रस्त्यावरील हॉटेलांमध्ये जाऊन तो मालकांना ‘बालकामगार ठेवू नका’ म्हणून समजावू लागला. काही ठिकाणी त्याला हुसकावण्यात आलं, काही वेळा तर थपडासुद्धा खाव्या लागल्या; पण तो हे निरंतर करत राहिला. केवढी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती!

ओमप्रकाशचं हे निरंतर झटणं आणि त्याच्या नि:स्वार्थ कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. मुलांसाठी दिला जाणारा शांततेचं नोबेल समजला जाणारा पुरस्कार त्याला २००६ मध्ये मिळाला. तेव्हा तो केवळ १४ वर्षांचा होता. वयाच्या आठ वर्षांपर्यंत सावकाराच्या शेतीची वेसही ओलांडू न शकणारा ओमप्रकाश त्यानंतर सहाच वर्षांनी देशाची सीमा पार करून नेदरलँडला पोहोचला. मुलांसाठीचा शांततेचा पुरस्कार हा नोबेल पारितोषिकविजेत्यांच्या हस्ते दिला जातो. ओमप्रकाशला दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नोबेलविजेते एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. त्याला ४५ लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. केवढी मोठी रक्कम आहे ना! या रकमेचं ओमप्रकाशनं काय केलं, माहितीये?  त्यानं ही रक्कम दिल्लीतील मुलींसाठी काम करणाऱ्या ‘सपोर्ट’ या संस्थेला व नेपाळच्या एका संस्थेला दिली. गरिबीत जगणाऱ्या ओमप्रकाशनं स्वत:साठी एक रुपयाही घेतला नाही. आजही तो भाड्याच्या घरात राहतो.

आता ओमप्रकाश २६ वर्षांचा झाला आहे. त्याने जयपूर येथील पूर्णिमा विद्यापीठातून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात पदवी व एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं आहे. बालकामगार मुलांची सुटका करण्याबरोबरच ठोस कृती कार्यक्रम, पॉलिसी मेकिंगमध्येही तो सक्रिय आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्टच सांगायची राहिली ना! २०१२ मध्ये त्याने स्वत:ची एक संस्था सुरू केली. जयपूर विद्यापीठाच्या भोवताली झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुला-मुलींना शिक्षण मिळत नव्हतं. त्याला हे खटकलं. त्यावर नुसत्या बाष्कळ गप्पा मारण्यात त्याला रस नव्हता. त्यानं लगेच आपल्या दोन मित्रांसह स्वत:ची संस्था सुरू केली- पाठशाला. इथं त्याचे मित्रही शिकवायला येतात. लेखन-वाचनकौशल्य, गणित आणि अर्थातच गोष्टीही. नियमित अभ्यासापलीकडे काही वेळा फक्त कलागुणांची किंवा नाटकाचीसुद्धा पाठशाळा भरविली जाते. या मुलांच्या डोळ्यांतील आनंदाची चमक पहायला ओमला फार आवडते.

त्याचं एक स्वप्न आहे- लहान मुले जिथं आनंदी राहू शकतील, असं जग निर्माण करायचं आहे. जिथे मुलांचं कुठल्याही प्रकारे शोषण होणार नाही... शाळेत जातील, आनंदात राहतील असं जग! ओमची गोष्ट सांगणारा हा लेख लिहिण्याआधी मी त्याच्याशी फोनवरून बोलले आणि त्याला म्हटलं,  ‘साधनाचा हा बालकुमार अंक वाचणाऱ्या मुलांना तुला काही सांगायचंय का?’  ओमप्रकाशनं तुम्हाला एक प्रश्न विचारायला सांगितला आहे. प्रश्न असा की,' आता कुणी बालकामगार म्हणजे लहान मुलगा/मुलगी शाळेत न जाता काम करताना दिसला तर तुम्ही काय कराल?  अंहं, उत्तर नको. कृती करून पाहा! कशी करायची कृती? तुमच्या सरांना आणि बाईंना विचारा, त्यांना सगळं ठावूक असतं.'

(लेखन : हिनाकौसर खान, पुणे)

Tags: ओमप्रकाश गुर्जर शांतता पुरस्कार हिनाकौसर खान बालकुमार दिवाळी अंक 2018 प्रेरणादायी Inspirational story Peace Prize Heenakausar Khan-Pinjar Balkumar Diwali ank 2018 Omprakash Gurjar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ओमप्रकाश गुर्जर,  राजस्थान, भारत

बालहक्क आणि मुलांच्या शिक्षणहक्कासाठी काम करणारा तरुण कार्यकर्ता.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके