डिजिटल अर्काईव्ह

'ओळखीची अनोळखी अक्षरे'च्या निमित्ताने...

'काठोकाठ भरू द्या प्याला' असं केशवसुतांनी म्हटलं आहे, तो जगण्याचा प्याला उषा मेहता यांनी काठोकाठ भरून घेतला आहे. त्यातून ओसंडणारं सारं आयुष्यही आपल्या कवेत घेतलं आहे. म्हणूनच या वयातही त्या आनंदी असतातच, शब्दांच्या भुलभुलैयात रमतात. 'ओळखीची अनोळखी अक्षरे' यातील अनेक कवितांत आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःकडे पहाताना त्या म्हणतात, 'कळतंय मला... कालौघात गाडला जाणारा मी एक रेतीचा कण आहे... रेतीकणाला रेतीत मिसळण्याचं दुःख कशाला?'

कवितेचा मराठी साहित्यातील स्त्रियांच्या प्रवास सुरू होतो तो मुक्ताबाई, जनाबाईंपासून. पुढे, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक यांच्यासोबत नव्यानं शिक्षित होत असलेल्या स्त्रिया आपल्या मनातील भावना शब्दांत उतरवायला लागल्या. यांतील बऱ्याचशा स्त्रिया या मध्यम वर्गीय घरांतील असल्यानं त्यांचं लेखन पुरुषांच्या लेखनाला प्रमाण मानूनच होत होतं. त्यामुळे त्या काळात लिहिली गेलेली बरीचशी कविता ही 'पुरुष' या केंद्राभोवतीच फिरत राहिली. पद्मा गोळे यांच्या काही कवितांत पुरुषाचं देवत्व नाकारलेलं दिसतं, तसंच बाईची घुसमटही दाखवली गेली असली तरी त्या काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रियांच्या कवितेत प्रेम, विरह, दुःख, मातृत्वातील आनंद, थोडंफार जीवनविषयक चिंतन येत होतं. बऱ्याच प्रमाणात सौंदर्यलक्षी असलेली ही कविता लिहिणाऱ्या स्त्रियांना त्या काळात बऱ्यापैकी मान्यताही मिळाली. याच काळात बहिणाबाई चौधरी यांच्या चिंतनशील आणि साध्या-सोप्या भाषेत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविताही लोकांसमोर आल्या. गेल्या नव्वद वर्षांतील मराठी स्त्रियांच्या कवितेचा विचार केला तरी या काळात कवयित्रींच्या पाचसहा पिढ्या लिहिताना दिसतात. या सर्व कवयित्रींचा आपापला एक बाज होता, आपापली शैली होती आणि प्रत्येकीनं आपापली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. आजही त्या करताहेत, आपल्या
नावाचा ठसा मराठी साहित्यावर उमटवताहेत.

उषा मेहता या अशाच एक कवयित्री. गेली पन्नास-साठ वर्षं त्या लिहिताहेत. आजवर त्यांचे 'आभास', 'अप्रूप', 'अन्वय', 'मितवा', 'निरंतर', 'काटेसावर' आणि अलीकडेच आलेला 'ओळखीची अनोळखी अक्षरे' असे सात कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. धीरूबेन पटेल यांच्या 'किचन पोएम्स'चा अनुवादही प्रकाशित झाला आहे. याबरोबरच त्यांचे तीन बालकवितासंग्रह, काही संपादनं आणि शब्दांकन केलेली काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'निरंतर' या कवितासंग्रहाचा हिंदीत अनुवादही झाला आहे. अलीकडे आलेलं त्यांचं 'कोलाज' हे ललितलेख संग्रहांचं पुस्तकही गाजतं आहे.

त्यांचा एकूण लेखनप्रवास पाहिला, तर त्यांचं सारं जगणं हे कवितेनं व्यापलं आहे हे लक्षात येतं. कोलाजमधील लेखही कवितेसारखेच तरल भावबंध उलगडणारे, माणसं वाचतनाच त्यांना माणूस म्हणून समजून घेणारे आणि त्यांच्या कवितेला, त्यांच्यातल्या कलेला थेट भिडणारे असे आहेत.

ही कवयित्री खरं तर, गेल्या पन्नास वर्षांतील स्त्रीच्या जगण्याला, तिच्या शोषणाला आवाज देणाऱ्या स्त्रीमुक्ती चळवळीची साक्षीदार आहे. आणीबाणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला आहे. त्याविषयीच्या लेखांचा समावेश असलेलं पुस्तकही त्यांनी संपादित केलं आहे. पण तरीही, त्यांची नाळ मुख्यत्वे जुळली ती भावकवितेशी. अर्थात, त्यांची कविता भावविश्वात रमत असली तरी त्यांना वास्तवाचंही भान आहे. आजूबाजूच्या वातावरणात घडणाऱ्या घटितांवर त्यांचं लक्ष आहे. त्यांचे सगळे संग्रह एकत्रितपणे वाचले तर लक्षात येतं की, कधी तरल, सौंदर्यलक्षी, कधी वास्तवाला थेट भिडणारी, तर कधी प्रेमात गळ्यापर्यंत बुडणारी आणि त्याच वेळी आपलं स्वत्व जपणारी, स्त्रीनिष्ठ अनुभव जपणारी अशी ही कवयित्री आहे. 'मितवा' या एका दीर्घ कवितेत एकीकडे त्यांच्यातली कवयित्री, 'ही गहिरी रात्र / या तारकांमधून / मी पाहते आहे तुझा भावविभोर चेहरा / हळुवारपण जाणवतंय तुझं / पालवणाऱ्या पानांमधून.' असं म्हणत हळुवार होते आणि दुसरीकडे या भावविभोर चेहऱ्याला खडबडून जागं करत म्हणते,

'मातृत्व म्हणजे जीवनाची परिपूर्णता 
माता म्हणजे प्रेम, सेवा, त्याग यांची सगुण मूर्ती 
असले काही फंडे नाहीत हं डोक्यात माझ्या
तुझ्याही नसावेत.'

हे असं म्हणत 'स्व'वर तोललेल्या बाईच्या जगण्याच्या वर्तुळात तिचं मूल केंद्रबिंदू होत असलं तरी आपलं स्वत्व जपूनही ठेवते.

उषा मेहतांच्या सातही काव्यसंग्रहांत त्यांच्यातली तरल, संवेदनशील कवयित्री सतत भेटत राहते. पण त्याबरोबरच ती बाहेरच्या विश्वाशी, जगाशी आणि त्यातल्या अस्वस्थतेशी जोडलेली आहे, हे आपल्याला सांगत राहते.

उषा मेहतांच्या पहिल्या सहा कवितासंग्रहांची नावं नेटकी आणि अर्थपूर्ण आहेत. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या 'ओळखीची अनोळखी अक्षरे' ह्या संग्रहाचं नाव जरा लांब असलं तरी त्या संग्रहातील कविता इतर संग्रहांप्रमाणेच आयुष्याविषयीचं चिंतन, आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचं भान व्यक्त करतात. या सातही कवितासंग्रहांतून या कवयित्रीचा जो प्रवास झालेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. एका स्वप्नवत जगात रमणाऱ्या तरुणीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 'ओळखीची अनोळखी अक्षरे' या संग्रहापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा एक प्रगल्भ सर्जनशील कवीची
अस्वस्थता दिसायला लागते. आणि मग त्या म्हणतात, 'नसतो सोपा हा प्रवास खऱ्या स्वतः पर्यंत पोहोचण्याचा...

करायचाच झाला हा प्रवास तर 
स्वतःला सोलून काढावं लागतं 
थेट अंतर्मनापर्यंत खणून बघावं लागतं.. 
बुद्धी आणि मन लढाई सुरू राहते अखंड 
अंतःप्रवाहातल्या त्या गुंतागुंती आणि भयप्रद भोवरे 
केवढी तोडफोड होत राहते मनातल्या मनात

तरी पण... निर्धास्त होऊन पोहोचू शकतो आपण स्वतः पर्यंत..'

('नसतोच सोपा हा प्रवास' - ओळखीची अनोळखी अक्षरे)

हा साराच प्रवास तसा अस्वस्थ करणारा. विशेषतः ज्या थांब्यावर त्या पोहोचल्या आहेत त्या थांब्यावर दाटून आलेली अस्वस्थता अनेकदा कवितेतून प्रवाहित होताना दिसते, 'काटेसावर'मधील एका कवितेत त्या म्हणतात,

'ढासळू लागलेत पुन्हा बांध मनाचे 
सुरुंग लागलेत भल्याभल्यांच्या निःस्वार्थी प्रयत्नांना 
कोसळताहेत सतत पूल विश्वासाचे
वेळोवेळी पाझरायला लागतं मन वेड्यासारखं.' 

ह्या वेळोवेळी पाझरायला लागलेल्या त्यांच्या मनाचं दर्शन आपल्याला त्यांच्या केवळ कवितेतूनच होतं असं नाही, तर त्यांनी केलेल्या ललित लेखनातूनही दिसत राहतं.

त्यांच्या कवितेत त्या सतत संवाद करत राहतात त्यांच्या मित्रमैत्रिणींशी, प्रियकराशी, बाळाशी, सख्यांशी आणि मुख्य म्हणजे स्वतःशी.

'कित्येक वर्षांत नव्हती भेट 
स्वतःशी स्वतःची 
उलगडले नव्हते नाते
स्वतःचे स्वतःशी.'

स्वतःलाही अवचित भेटणारी ही कवयित्री नातेसंबंधातून निर्माण होणारी अनेक भावस्पंदनं त्यांच्या कवितेतून सतत टिपताना दिसते. उषा मेहता शब्दांशी खेळातातच, पण कधीकधी वेगळेच रंग लेऊन येणाऱ्या या शब्दांना घाबरतातही. त्यांच्या भाषेत माधुर्य आहे, गोडवा आहे. त्या जे शब्द निवडतात तेही खूप तरल, नाजूक, भावविभोर असे असतात. टोकदार शब्द त्या वापरत नाहीत. मला वाटतं, हा त्यांच्या पिढीच्या कवयित्रींचा विशेष स्वभावच होता. जे काही पोहोचवायचं ते आक्रमक न होता. त्यामुळेच शांताबाई, इंदिरा संत, शिरिष पै जी संयत भाषा वापरतात त्याच प्रकारच्या भाषेचा वापर आपल्याला उषा मेहतांच्या कवितेतही दिसतो.

आजच्या जगण्यावर, या जगण्यातील विसंगतींवर, आर्थिक आणि सामाजिक विषमतेनं माणसाच्या जगण्यात आलेल्या बकालीपणाबद्दल, वरवरच्या समृद्धीवर, माणसामाणसांत वाढत चाललेल्या दरीबद्दल त्या सतत बोलतात. संवेदनशील कवीचं मन अशा घटनांनी दुखतंच आणि हे दुखलेलं मन वाहत राहतं, भळभळत राहतं शब्दांतून. पण आक्रमक न होता असंच हळुवारपणे ते मनही ही कवयित्री समजून घेत मनाची समजूत काढत व्यक्त होत राहते.

'निसर्गद्रोह्यांना फितूर झाल्यासारखं आकाश, 
कधी काय विध्वंस करेल... सतत दहशत
पुरती विस्कटून गेलीय
ऋतुभानानुसार असलेली जीवनशैली 
सामान्यांच्या जगण्याचे झालेत पिचके बांबू 
मिळतातही मदतीची भ्रामक, पोकळ आश्वासनं,

देशविकासासाठी जाणारच की काहींचे बळी 
असं मानणाऱ्या बलवानांचा 
'कसा प्रतिकार करणार हे पिचके बांबू.."

असे प्रश्न ही कवयित्री उभे करते आणि सामान्य माणसाच्या जगण्यातली असाह्यता अधोरेखित करते. 'काळपिसं उडताहेत, बदलताहेत अर्थ जगण्यामरण्याचे..' असं म्हणत या काळावर भाष्य करते. 'अर्थच बदलताहेत', 'नीट उमजलंय', 'संहारपर्व' यांसारख्या कवितांतून ही अस्वस्थता जाणवत राहते.

जीवन-मृत्यू या दोन गोष्टींवर अतिशय प्रगल्भ भाष्य ही कविता करते. जगणं ही एक प्रकारची अपरिहार्यताच असते अनेकदा, पण ती अपरिहार्यताही समजून घेण्याचं बळ या कवयित्रीत आहे.

त्यांची 'अन्वय' या संग्रहामधली 'कालगती' ही कविता याचं उत्तम उदाहरण आहे.

'जितंजागतं माणूस तुमचं 
मरून गेलं 
अचानक डोळ्यांदेखत शांत झालं 
तर तुम्ही काय करू शकता...
पहिला घोट घ्याल पाण्याचा या जगात तुमचं माणूस 
नसल्यानंतरचा..

पहिला घोट.. 
कधीतरी कळेलच भुकेनं खड्डा पडतोय 
तल्लफ येईल चहाची मध्येच 
हवीशी वाटेल अंघोळ कढत कोमट पाण्याची 
आणखीही काय काय हवंस होत राहील सरकत राहील 
काळ थंडगार अजगरासारखा 
मंद गतीनं ओढून घेत 
बधिर करील, आठवणी भिनवीत... 
... कुणीतरी गोजिरं गालाला गाल लावेल
पाखरासारखं चिमणं हृदय बोलेल तुमच्याशी 
उद्याविषयी

इलाजच उरणार नाही मग मढेपण झुगारण्याखेरीज 
तेही निमित्तच, जीवनेच्छा जाणवायला 
जात्या क्षणांचा अन्वयार्थ उमगायला.'

आयुष्याशी आपण सर्वांनीच केलेला करार आपल्याला ही कालगती स्वीकारायला कशी भाग पाडते, याचं यथार्थ चित्रण त्या करतात. आपल्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं माणूस वजा झाल्यानंतर झालेली ही अवस्था अगदी नेमक्या आणि तरल शब्दांत त्यांनी मांडली आहे.

हे जगणं समजून घेऊन त्याला भिडण्याची जी आस आणि ऊर्मी आहे ती उषा मेहता यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. 'काठोकाठ भरू द्या प्याला' असं केशवसुतांनी म्हटलं आहे. तो जगण्याचा प्याला त्यांनी काठोकाठ भरून घेतला आहे. आणि त्यातून ओसंडणारं सारं आयुष्यही आपल्या कवेत घेतलं आहे. म्हणूनच या वयातही त्या आनंदी असतातच, शब्दांच्या भूलभुलैयात रमतात. अर्थात, या वयात जगण्याबद्दलची कृतार्थता आणि मरणाचा स्वीकारही त्या सहज व्यक्त करतात. 'ओळखीची अनोळखी अक्षरे' यातील अनेक कवितांत आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःकडे पाहताना त्या म्हणतात, 'कळतंय मला... कालौघात गाडला जाणारा मी एक रेतीचा कण आहे... रेतीकणाला रेतीत मिसळण्याचं दुःख कशाला ?'

हा प्रश्न कळला आणि त्याचं उत्तरही सापडलं की मग आयुष्यात सुरू झालेली पानगळ सहज समजून घेता येते. पण या वयातही वसंतागमनाची वाट पाहणं थांबवता येत नाही, असं 'पानगळ सुरूच' या कवितेत त्यांनी कबूल केलं आहे.

आयुष्याच्या या टप्प्यावर दिवस कमी राहिलेत हे जाणवत असलं तरी त्याचं दुःख त्या करत नाहीत. 'आनंद करीत' या कवितेत त्या म्हणतात,

'दुःख याचं की किती आवरायचं राहतंय सारंच काही, याचं.'

आपला नंबर लागणार आहेच, पण वाचायचं किती राहून गेलंय, याची खंत त्यांना वाटत राहते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतानाही त्यांना आनंद साजरा करायचा आहे. आणि हे त्या स्वतःला सतत सांगत राहतात, 'खरोखरीच संपून जाईपर्यंत, जगत राहावं आनंद करीत.'

अनेक वादळं अंगावर आली तरी ती झेलत राहणारी ही कवयित्री आपल्या अनेक मित्रमैत्रिणींवर, कवींवर, त्यांच्या कवितेवर भरभरून लिहीत राहिली. त्या लेखांचा 'कोलाज' गेल्या वर्षीच प्रकाशित झाला आहे. 'कोलाज' हा त्यांचा ललितलेखसंग्रह सर्वांनाच भावला आहे त्याला कारण त्यांची अनुभव टिपण्याची एक सहज शैली आहे. आजूबाजूच्या जगातलं, जगण्यातलं असं सगळं टिपण्याचा त्यांचा स्वभाव असल्यानंच हे असं भरभरून लिहिता येतं. कवितेच्या, विशेषतः त्यांच्या पिढीच्या तरल रोमँटिक कवितेच्या कायम प्रेमात असल्यामुळे विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट यांची कविता त्या सहज पोहोचवत होत्या. यशवंत देवांसारख्या संगीतकारावर प्रेम करत राहिल्या. शिक्षिका असलेल्या उषा मेहतांनी लहान मुलांसाठीही खूप लिहिलं. त्यांच्या अंगात असलेला उत्साह आणि सतत काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्या जवळ जाणाऱ्या माणसांना सतत जाणवत राहते. आणि त्यांच्या आणखी जवळ गेलं की, त्यांचे अनेक पैलूही कळायला लागतात.

केवळ स्वतःसाठी त्या जगल्या नाहीत, तर समाजात, देशात, राज्यात जे जे घडत होतं त्याविषयी त्या सतत सजग राहिल्या. आणि जे जे योग्य आहे त्याच्या बाजूनं कायम उभ्या राहिल्या. त्यामुळेच त्या केवळ प्रेम करून थांबत नाहीत, केवळ कविता लिहून थांबत नाहीत, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतात, आणीबाणीच्या काळात सरकारविरोधातील आंदोलनात सक्रिय होतात, ग्रंथालीसारख्या वाचन चळवळीतल्या शिलेदार होतात, आणि साने गुरुजींचा 'प्रेमाचा धर्म' शिकवण्यासाठी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी जोडून घेतात. साने गुरुजींनी रुजवलेली आंतरभारतीची कल्पना अंगी बाणवत आंतरभारती अनुवाद केंद्राच्या सचिव होतात आणि धीरूबेन पटेलांच्या 'किचन पोएम्स'चं भाषांतरही करतात.

आपल्या आयुष्यात माणसानं काय काय करायला हवं याचं एक उत्तम उदाहरण त्या घालून देतात.

इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं जगणं जगणाऱ्या उषा मेहता यांचं अर्थात कविता हेच पहिलं प्रेम राहिलं आहे हे मात्र कबूल करावं लागेल. त्यांच्या आत दडलेल्या कवयित्रीला सतत शब्द सोबत करोत, अशी मी शुभेच्छा व्यक्त करते.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी