डिजिटल अर्काईव्ह

एक मुलाखत, एक भाषण, दोन लेख

विकासाचे अर्थशास्त्र हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमांतून ते सतत कार्यरत असतात. महाराष्ट्रात आरक्षणाच्या निमित्ताने जी आंदोलने अलीकडच्या काही वर्षांत होत आहेत, त्यांचा विचार प्रामुख्याने पक्षीय, जातीय व राजकीय दृष्टिकोनातून केला जातो आहे. मात्र त्या समस्यांची खरी उत्तरे विकासाच्या कल्पना व शासनाची धोरणे यांच्यात दडलेली आहेत, अशी आग्रही मांडणी ते करीत आले आहेत. त्या संदर्भातील त्यांचा या अंकातील लेखही पुन्हा एकदा राज्यकर्त्यांसाठी आणि ओपिनियन मेकर वर्गासाठी 'रोड मॅप' दाखवणार आहे.

साधना साप्ताहिकाचे सलग तीन दिवाळी अंक प्रकाशित केल्यानंतर, तीन आठवडे वार्षिक सुट्टी आली. त्यानंतर प्रकाशित होणारा हा पहिला अंक आहे. या अंकातील दोन लेख, एक मुलाखत आणि एक भाषण हे सर्वच लेखन शब्द संख्येचा विचार करता दीर्घ आहे. नेहमीपेक्षा अधिक गंभीर वैचारिक आहे. त्यामुळे वाचकांना थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील. परंतु त्यातील आशय आणि विषय विशेष महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा मिनी विशेषांक झाला आहे.

1965 मध्ये पुणे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअर झालेल्या अशोक अळवणी यांनी, त्यानंतरची साडेतीन दशके राज्य सरकारच्या सेवेत अभियंता म्हणून काम केले आहे. सचोटी आणि कार्यक्षमता यासाठी ते कायम आग्रही राहिले. त्यांचे आपल्या कार्यक्षेत्रावर एवढे प्रेम होते की, निवृत्तीनंतरही ते त्या क्षेत्रात सरकारबरोबर सहकार्य करीत कार्यरत राहिले. साहजिकच, मागील पाच वर्षे देशात राबवल्या जात असलेल्या आणि त्यासाठी प्रचंड आर्थिक तरतूद केलेल्या जलजीवन मिशन प्रकल्पाच्या संदर्भात त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे, त्या ठिकाणची बेफिकिरी, अकार्यक्षमता व भ्रष्टाचार त्यांना विशेष त्रासदायक वाटत आहे. आणि म्हणून ते पोटतिडकीने लढत आहेत. ते करत असलेला झगडा आश्चर्यकारक आणि क्लेशेदायकही आहे. ओपिनियन मेकर वर्गाचे लक्ष त्याकडे वेधले जावे, म्हणून त्यांचा लेख या अंकाची मुखपृष्ठ कथा केली आहे. त्यात वर्णन केलेले सर्वच प्रकार प्रेडिक्टबल आहेत, असे अनेकांना वाटेल. अनेकांना ते अरण्यरुदान वाटेल. मात्र त्या लढाईसाठी त्यांना सलाम करायला हवा.

दुसरा दीर्घ लेख नीरज हातेकर यांचा आहे. विकासाचे अर्थशास्त्र हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमांतून ते सतत कार्यरत असतात. महाराष्ट्रात आरक्षणाच्या निमित्ताने जी आंदोलने अलीकडच्या काही वर्षांत होत आहेत, त्यांचा विचार प्रामुख्याने पक्षीय, जातीय व राजकीय दृष्टिकोनातून केला जातो आहे. मात्र त्या समस्यांची खरी उत्तरे विकासाच्या कल्पना व शासनाची धोरणे यांच्यात दडलेली आहेत, अशी आग्रही मांडणी ते करीत आले आहेत. त्या संदर्भातील त्यांचा या अंकातील लेखही पुन्हा एकदा राज्यकर्त्यांसाठी आणि ओपिनियन मेकर वर्गासाठी 'रोड मॅप' दाखवणार आहे.

तिसरा दीर्घ लेख अरुण कुमार यांचा आहे, मुळात ते त्यांनी भाषण म्हणून लिहिलेले आहे. प्रा. सदानंद वर्दे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेले ते व्याख्यान आहे. कार्यकारी विश्वस्त, संपादक मंडळाचे सदस्य आणि लेखक, वाचक अशा विविध नात्यांनी प्रा. वर्दे साधनाशी निगडीत होते. त्यांची ओळख आणखी विविध प्रकारची आहे, परंतु अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहिल्याने त्यांचे अर्थकारणाच्या संदर्भातील आकलन आणि त्यातून आकाराला आलेल्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेले व्याख्यान अनुवाद करून इथे प्रसिद्ध करणे आम्हाला आवश्यक वाटले.

आणि एक मुलाखत प्रस्तुत संपादकाची आहे. 'थिंक बँक' या युट्यूब चॅनलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ज्या काही मुलाखती घेतल्या, त्यातील ही एक मुलाखत आहे. या मुलाखतीचा सूर अन्यत्र बोलले लिहिले जाते, त्यापेक्षा बराच वेगळा आहे. त्याबाबत मत-मतांतरे येऊ शकतील. परंतु एका वैचारिक नियतकालिकाच्या संपादकाचे आकलन या पद्धतीने त्याकडे पाहिले तरी पुरेसे आहे.

तर या अंकातील दोन लेख, एक भाषण व एक मुलाखत हे सर्व लेखन केवळ वाचून अस्वस्थ व्हावे असे नाही; आपापल्या स्तरावर कृतीला प्रवृत्त व्हावे असे सूचित करणारे आहे. 
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके