आपल्या वडिलांना पी. जी. वुडहाऊस हे ब्रिटिश विनोदी लेखक खूप आवडायचे आणि आईला अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथा आवडायच्या. याचं स्मरण त्यांची कन्या असणाऱ्या भारती पांडे या लेखक-कवयित्रीनं अगदी वेगळ्या स्वरूपात जागवलं आहे. त्यांनी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दोन पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्याचे ठरवले आहे. पहिला पुरस्कार वडील रा.द. पुसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पी. जी. वुडहाऊस पुरस्कार आणि दुसरा आई इंदुमती पुसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा अगाथा ख्रिस्ती पुरस्कार. 2026 चा 'पी.जी. वुडहाऊस पुरस्कार' ज्येष्ठ लेखक मुकुंद टाकसाळे यांना आणि 'अगाथा ख्रिस्ती पुरस्कार' सौरभ वागळे या तरुण रहस्यकथा लेखकाला ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते 21 जून 2026 रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या समारंभात देण्यात आला. तेव्हा मुकुंद टाकसाळे यांनी केलेले हे भाषण.
आजवर मराठीतल्या यच्चयावत विनोदी लेखन करणाऱ्या थोर साहित्यिकांच्या - असे साहित्यिक ज्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत, याची नम्र जाणीव माझ्या मनात सतत जागती असते - नावाने दिले जाणारे अनेक पुरस्कार मला मिळालेले असूनही आज हा जो 'पी.जी. वुडहाऊस पुरस्कार' मिळतो आहे, त्याचं मोल माझ्या लेखी फार मोठं आहे. पुरस्कार कुणाच्या नावाने, कोण देतं आणि कुणाच्या हस्ते दिला जातो, या साऱ्याच गोष्टी त्या पुरस्काराचं मूल्य वाढवत असतात. म्हणूनच हा पुरस्कार देण्यासाठी माझी निवड करण्यात आली याबद्दल भारतीताई, मी तुमचा आणि तुमच्या निवड समितीचा मनापासून आभारी आहे.
पहिल्यांदा पुरस्कार कुणाच्या नावाने ? तर पी.जी. वुडहाऊसच्या. म्हणून अनेकांनी माझं अभिनंदन केलं. फेसबुकवरसुद्धा बऱ्याच जणांनी आवर्जून हा उल्लेख केलेला आहे. अर्थात मला तर आनंद झालाच. आपले सध्याचे राजकारणी बोलतात त्या स्टाइलने सांगायचं झालं तर, 'पी.जी. वुडहाऊसचं आणि माझं खूप जुनं नातं आहे'. म्हणजे उमेदवारीच्या काळापासून. म्हणजे माझ्या, त्याच्या नाही. आता असं नातं सांगितलं की लोकांना हसूच येतं. खोटं वाटतं. पण मी खरंच सांगतोय. मी निरेला खेडेगावी होतो, त्या काळापासून पु.लं.चा आणि माझा पत्रव्यवहार होता. आणि त्यांनी पत्रात कधी तरी मला 'पी.जी. वुडहाऊस वाचा, डिकन्स वाचा' असं लिहिलेलं होतं. पुलंचं काय जातंय असा उपदेश करायला? निरेला जिथं मराठी पुस्तकं मिळायची मारामार तिथं वुडहाऊस कुठला मिळायला ?
पण बारामतीला कॉलेजात आल्यावर तिथल्या कॉलेजच्या ग्रंथालयात एक जुनंपुराणं पी.जी. वुडहाऊसचं पुस्तक सापडलं. त्या काळात एकमेव वीरकरांची डिक्शनरी मराठी लोकांच्यात खूप प्रसिद्ध होती. निदान मला तरी तेवढीच ठाऊक होती. ती डिक्शनरी घेऊन मी वुडहाऊसची कादंबरी वाचायला बसलो. सुरुवात केली आणि जवळ जवळ प्रत्येक शब्दच अडू लागला. शब्द अडला की मी डिक्शनरी उघडायचो. पुढे पुढे तर आपण वुडहाऊस वाचायला बसलोय की डिक्शनरी तेच समजेना. तो नाद मी तिथंच सोडून दिला. पण पुढे कधी तरी ब्रिटिश लायब्ररीच्या सौजन्याने आणि मदतीने इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा थोडाफार आत्मविश्वास आला. मी वुडहाऊस वाचू लागलो आणि तो मला चक्क आवडू लागला.
वुडहाऊसची ती Idyllic दुनिया मोठी बहारीची आहे. तिथं युद्ध नाहीत, द्वेष नाही, त्यातल्या पात्रांना नोकरीची चिंता नाही, एकमेकांत स्पर्धा असेल तर ती एखादी चांगली मुलगी पटवणं एवढीच. सगळा लुटुपुटीचा मजेमजेचा मामला. व्हिक्टोरियन का नेमकं सांगायचं झालं तर ती एडवर्डियन काळातल्या उमराव विश्वाची 'गोड पॅरडी' आहे. 'Right Ho Jeeves, The Inimitable Jeeves, Carry on Jeeves, The Code of Woosters...' अशा कादंबऱ्यांतील जिव्हज, बर्टी वुस्टर, फिन्कनॉटल, आण्ट अगाथा, आण्ट डहालिया अशी किती तरी पात्रं सांगता येतील. वुडहाऊसचं गद्य वाचणं हा एक अनुभव आहे. त्यातले चटपटीत संवाद, कोट्या... अहाहा! वाचायला लागलो की आपण वाचतच जातो, इतकं प्रवाही आणि मजेशीर गद्य.
पण मला स्वतःला मात्र जिव्हजच्या कथांपेक्षा वुडहाऊसच्या मलिनरच्या कथा, युक्रिजच्या कथा अधिक आवडतात. 'मीट मिस्टर मलिनर' या कथासंग्रहातील 'हनिसकल कॉटेज' ही त्यातली माझी अत्यंत आवडती कथा आहे. मलिनरच्या कथा सुरू होतात, 'अँगलर'ज रेस्ट' या पबमध्ये. तिथं संध्याकाळचा अड्डा असतो. कुणी तरी या अड्ड्यात आपला चमत्कारिक अनुभव सांगतो. त्यावर तिथं बसलेला मिस्टर जेम्स मलिनर म्हणतो, हे तर काहीच नाही, माझी एक आत्या होती ना... माझा एक पुतण्या होता ना... आणि मग त्यांची अतिविक्षिप्त कथा सुरू करतो.
तर या 'हनिसकल कॉटेज' कथेमध्ये त्या मलिनरचा एक पुतण्या रहस्यकथा लेखक म्हणून प्रसिद्ध असतो. इथल्या सौरभ वागळ्यांसारखा. त्याची एक मावशी या पुतण्याच्या नावाने तिची 'हनिसकल कॉटेज' ही बंगली ठेवून मरते. तिची एक अट असते, यानं त्या बंगलीवजा घरात राहायला हवं. हा त्या कॉटेजमध्ये राहायला येतो, ती मावशी 'मिल्स अॅन्ड बून स्टाइल'च्या गोड गोड प्रेमकथा लिहिण्यात प्रसिद्ध असते. हा तिथं राहायला आल्यावर आणि लिहायला लागल्यावर त्या मावशीचं भूत त्याच्या मानगुटीवर बसतं. आणि त्याची रहस्यकथेची शैलीच बदलून जाते. त्या मावशीच्या भुतामुळे त्याची कादंबरीची रहस्यकथेची भाषा त्याच्या इच्छेविरूद्ध, कशी कुणास ठाऊक, पण एकदम गोडगोड आणि रोमॅन्टिक व्हायला लागते. पहिल्या दोन-चार पानांत एक-दोन खून पाडणारा हा आपला लेखक असा का करतो आहे हे त्याच्या लिटररी एजंटला, प्रकाशकाला कळतच नाही. त्याला स्वतःलाही समजत नाही. तशात त्या कॉटेजसमोरच एक छोटासा अपघात होऊन एक सुंदर तरुणी जायबंदी होते आणि हा हिरो तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे रहस्यकथेच्या भाषेचा पुरताच खून त्याच्या हातून व्हायला सुरुवात होते. शेवटी तो कॉटेज सोडून परत आपल्या घरी येतो आणि मग त्याचं लेखन पूर्ववत मुडदे पाडू लागतं आणि त्यामागचं रहस्य शोधू लागतं. खरं तर मलिनरच्या 'मलिनरज बकअप हो' 'बिशप'ज मुव्ह' या कथांविषयीही मला सांगावं वाटतं आहे. पण मी तो मोह आवरतो.
सुरुवातीला या मलिनर कथांच्या प्रभावाखाली मीही 'माझा चोखंदळ चुलत चुलता' सारखी कथा लिहिली आहे. काही रोमॅन्टिक प्रेमकथाही वुडहाऊसला पुढे ठेवून लिहिल्या आहेत. वुडहाऊस नव्यानं वाचायला घेणाऱ्यांनी मलिनरकथा, यूक्रिजच्या कथा घ्याव्यात. एकदम भारी. 'लाफिंग गॅस' सारखी हॉलिवूडच्या पार्श्वभूमीवरील कादंबरीही अफलातून आहे. तिलाही सुरुवातीला हात घालायला हरकत नाही.
मला इंग्रजी वाचन जमायचं नाही, त्या काळात सुरुवातीला मी मराठीत वुडहाऊस कुणी आणलेला आहे का याचा शोध घेत होतो. पण नाही सापडला. फार पूर्वी - माझ्या लहानपणी - 'मोहिनी'तून कुमुदिनी रांगणेकरांनी 'जिव्हज'चा 'जिवाजीराव' करून केलेली काही गोळाबेरीज-रूपांतरं वाचल्याचं स्मरतं आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलसचिव असणारे व.ह. गोळे यांचं 'साहित्य संस्कृती मंडळ' हे पुस्तक आलं. या नावाने वुडहाऊसच्या काही कथांचं भाषांतर केलेलं होतं. श्री विद्या प्रकाशनानं ते पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. वाईट भाषांतर केलेलं होतं. पुस्तक प्रकाशन समारंभाला पु.ल. आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष प्रमुख पाहुणे होते. राजाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले, 'मला वुडहाऊस अजिबात आवडत नाही, त्याचा विनोद मला समजत नाही, अपील होत नाही.' 'मला समजत नाही' हे त्यांनी इंग्रजी समजत नाही, या अर्थानं म्हटलेलं नव्हतं. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि स्वतः विनोदी लिहायचेदेखील. पण हेही खरं आहे की, वुडहाऊसबद्दल असं मत व्यक्त करणारे राजाध्यक्ष हे एकमेव नव्हेत. असे आणखीही काही जण आहेत. अशा दुर्दैवी लोकांबद्दल वुडहाऊसप्रेमी लोक काय म्हणतात ते ठाऊक आहे का? ते म्हणतात, 'वुडहाऊस न कळणाऱ्यांना तेवढीच शिक्षा पुरेशी आहे.'
माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या दोन आठवणी पी.जी. वुडहाऊसशी निगडित आहेत, तशाच त्या मराठीतल्या दोन महत्त्वाच्या साहित्यिकांशीही निगडित आहेत. विजय तेंडुलकरांनी त्यांच्याजवळचा वुडहाऊसचा संग्रह मला भेट दिलेला होता. मी नाशिकला काही काळ मुक्त विद्यापीठात नोकरीला होतो. त्या काळात कुसुमाग्रजांच्या म्हणजे तात्यासाहेबांच्या नेहमीच गाठीभेटी व्हायच्या. एकदा बोलताना असाच वुडहाऊसचा विषय निघाल्यावर मी तात्यासाहेबांना म्हणालो, "मला वुडहाऊसचं आत्मचरित्र 'पफाँमिंग फ्ली' कुठे मिळालं नाही. विकत मिळालं नाही, ब्रिटिश लायब्ररीतही मिळालं नाही."
यावर ते म्हणाले, "माझ्याकडे ते आहे. मी शोधून ठेवतो. तू उद्या ये."
दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पुस्तक माझ्या हातावर ठेवलं. मी म्हणालो, "वाचून तुम्हाला परत करतो."
यावर ते म्हणाले, "परत करण्याची गरज नाही. माझ्यातर्फे भेट समज."
तेही पुस्तक माझ्या संग्रही आहे. वुडहाऊस म्हटलं की या दोघांचीही सुखद आठवण माझ्या मनात जागी होते.
भारतीताई, काही जुन्या आणि जाणत्या लोकांनी आपले वडील रा.द.पुसाळकर आणि आई इंदुमती पुसाळकर यांना आम्ही ओळखतो आणि कसं ते सुसंस्कृत दांपत्य होतं, हेही मला आवर्जून सांगितलं. मुंबईहून अरुण नाईकांचा अभिनंदनाचा फोन आला होता. अरुण नाईक म्हणजे नाटककार राजीव नाईक यांचे थोरले बंधू, मुद्रणमहर्षी बापूराव नाईक यांचे चिरंजीव. त्यांनी तुमच्या आई-वडिलांचा विशेष गौरवानं उल्लेख केला. ते म्हणाले, लहानपणी सुट्टीत आम्ही त्यांच्या घरी जायचो. त्यांच्या घरी राहिलेलोदेखील आहे. माझ्याकडेसुद्धा पी.जी. वुडहाऊस आणि अगाथा ख्रिस्ती यांचा सगळा संग्रह आहे.' (सांगता येत नाही, कदाचित त्यांचाच नकळत प्रभाव असेल.) पण हे ऐकल्यानंतर मलाही, तुमच्या आई-वडिलांच्या हयातीत आपण त्यांना का भेटलो नाही, याची थोडी चुटपूट लागून राहिली.
आजकाल ललित पुस्तकं वाचणारा मराठी वाचक भेटत नाही. दिसतसुद्धा नाही. अशा काळात माझ्या याही वयात आपलं विनोदी लेखन कुणी तरी वाचलेलं आहे, कुणाला तरी आठवतं आहे, आणि ते वुडहाऊसच्या नावाचा पुरस्कार देण्याइतकं महत्त्वाचं वाटतं आहे, हे मला खरोखरच फार सुखावणारं आहे. लोक वाचत नाहीत, यात त्यांचा बिचाऱ्यांचा काही दोष नाही. अलीकडे मोबाइलवर रील्स इतकी आकर्षक येतात की ती पाहण्यातून वाचायला स्वतंत्र असा वेळच होत नाही. आपण एखादा महत्त्वाचा फोन करण्यासाठी मोबाइल हाती घेतला की अर्धा-पाऊण तास रील्स बघण्यात वेळ कसा जातो ते समजतदेखील नाही. बराच वेळ झाल्यावर आपण मोबाइल कशासाठी हातात घेतला, हेच आठवत नाही. या रील्समधून वेळ मिळालाच तर मोबाइलवरच इतकं काही वाचायला मिळतं की हातासरशी तेच वाचण्याचा मोह होतो. पुस्तक विकत घ्या किंवा लायब्ररीतून आणा... फार कटकट असते हो ती. तशात पुणं हे विद्येचे माहेरघर असल्यानं इथं नव्यानं आलेलं जे विद्यापीठ आहे व्हाटसअॅप विद्यापीठ त्याचे नव-ग्रॅज्युएट इतके आहेत की, त्यांना मोबाइलवर येणारे मेसेज वाचणं आणि ते फॉरवर्ड करणं या 'होमवर्क' मधून बाकी काही वाचायला वेळच उरत नाही.
तुम्हाला गंमत सांगतो. परवा घरी काही तरी इलेक्ट्रिकचं किरकोळ काम निघालं. शेजारच्या एका पंचाहत्तरीतल्या गृहस्थांचं इलेक्ट्रिक सामानाचं दुकान आहे. ते इलेक्ट्रिशियनला घेऊन आमच्याकडे आले. त्यांनी आमच्याकडची पुस्तकाची कपाटं पाहिली आणि त्यांचे डोळे लकाकले. ते म्हणाले, "मला एखादं वाचायला देता का?"
मी म्हटलं, "तुम्हाला कुठलं हवं ते तुम्ही शोधा." (त्यांनी फार महत्त्वाचं निवडलं तर द्यायचं नाही, असं मी ठरवलं होतं. कारण मी पुस्तकांबाबत फार पझेसिव्ह आहे. पण ती वेळ त्यांनी माझ्यावर आणली नाही.)
त्यांनी एक अगदी छोटं - ॲनिमिया झाल्यासारखं जे हडकुळं पुस्तक होतं ते उचललं. मला हायसं झालं. मी त्यांना म्हटलं, "हे आर्थिक क्रांतीबद्दलचं पुस्तक आहे. तुम्हाला ते वाचायला जड वाटेल. त्यापेक्षा एखादं गोष्टीचं पुस्तक देऊ का ?"
यावर ते गृहस्थ म्हणाले, "मला पुस्तक वाचायला नकोच आहे. दुपारी जेवल्यावर जरा दोन मिनिटं पुस्तक समोर धरलं की लगेच झोप येते. तेवढ्यासाठी पुस्तक नेतो आहे. तुम्हाला लगेच लागणार नाही, असंच पुस्तक द्या. म्हणजे मला परत करण्याची घाई नको."
लक्षात घ्या, माझ्या तोंडावर, एका लेखकाच्या तोंडावर त्यांनी झोपेसाठी म्हणून पुस्तक मागितलं. नंतर कधी वाटेत भेटले की ते नजर चोरायचे. ओशाळ्या स्वरात म्हणायचे, "वाचायचं राहिलंय हो."
मी त्यांना म्हणायचो, “राहू द्या हो. पण झोप तर चांगली येतेय ना?"
यावर ते खुलून म्हणाले, "हो, हो, जरा डोळ्यावर धरायचा अवकाश की लगेच झोप येते हो."
"मग राहू द्या हो. तुम्ही ते नाही परत केलं तरी चालेल."
असे नमुने भेटत असतात. मराठी सुशिक्षित लोकांच्या वाचनाची ही परिस्थिती आहे.
समोर माझी पत्नी संध्या बसली आहे, ती माझी पहिली वाचक. काहीही लिहिलं की मी तिला आधी दाखवतो. तिला माझ्या विनोदाला हसणं कंपलसरी असतं. त्यामुळे बाकी कुणी हसलं, नाही हसलं तरी मला फरक पडत नाही. आपल्याजवळ हमखास हसणारी 'हुकमाची राणी' आहे, हा दिलासा मला कायम पुरून उरणारा असतो. यातला विनोदाचा भाग सोडा, पण ती चांगली संपादक आहे. मला पुरस्कार मिळतो तेव्हा त्यात तिचा वाटा असतोच असतो.
आता शेवटचा मुद्दा, पण अत्यंत महत्त्वाचा. तुम्ही मला भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कार देता आहात, हा माझा सर्वात मोठा गौरव आहे. आमच्या पिढीतला हा महत्त्वाचा साहित्यिक आहे. आमच्या पिढीचा हिरो आहे. कुठलाही खरा साहित्यिक, हा प्रस्थापित व्यवस्थेच्या, प्रस्थापित सरकारच्या विरोधातच उभा असतो. त्यांचं उगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातलं अध्यक्षीय भाषण, त्यातलं चिंतन, मनन आणि प्रस्थापित सरकारविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध
खणखणीतपणे मांडलेली भूमिका, याला खरोखरच तोड नाही. 'केवळ अपूर्व' असं या भाषणाचं वर्णन करता येईल. याची तुलना करायचीच झाली तर दुर्गाबाई भागवतांच्या कराडच्या आणीबाणीविरुद्धच्या अध्यक्षीय भाषणाशी करता येईल. आणि हे विधान मी नशापाणी न करता, पूर्ण शुद्धीवर असताना करतो आहे. दुर्गाबाईंच्या काळात घोषित आणीबाणी होती, सासण्यांनी आजच्या अघोषित आणिबाणीविरुद्ध आपला बुलंद आवाज उठवलेला होता. सासणे, मला तुमचा मनापासून अभिमान वाटतो. तुम्हाला जाहीरपणे हे सांगायचं राहून गेलं होतं. ती संधी मी आज साधली.
-'I don't सासण्यांच्या कथा वेगळ्या, काहीशा गूढ म्हणता येईल अशा आहेत. अशा कथा लिहिणारा लेखक इतकी निर्भीड, स्पष्ट भूमिका घेईल, हे कुणाच्या कल्पनेतही आलं नसेल. हेही काहीसं पी. जी. वुडहाऊससारखंच झालं. त्याच्या कथा या हसवणाऱ्या, सुखावणाऱ्या, डोक्याला ताप न देणाऱ्या, 'आनंदी अशा 'इडिलिक वर्ल्ड'मधल्या. पण जेव्हा रेडिओवरून बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितलं hate in the plurals.' मी घाऊक द्वेष करत नाही. एका वंशाच्या, एका धर्माच्या, एका जातीच्या, एका समूहाच्या विरुद्ध घाऊक द्वेष करणं वुडहाऊसला कधीच मान्य नव्हतं. अलीकडे जरा पुढच्या व्यक्तीला टोकरलं की तो लगेच एखाद्या धर्माच्या लोकांना शिव्या द्यायला लागतो, ते आटोपल्यावर मग कुठल्या तरी जातसमूहाला शिव्या देतो. तर अशा या विपरीत काळात राग, द्वेष, संताप, निराशा असल्या नकारात्मक भावना सतत मनात वागवण्यापेक्षा पी. जी. वुडहाऊस यांच्या कथा-कादंबऱ्या वाचून मन आनंदित ठेवावं, आणि त्यासाठीच त्यांचा 'Don't hate in the plurals' हा संदेशही बरोबर घेऊन जायला हवा.
धन्यवाद.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या