डिजिटल अर्काईव्ह

या अंकासाठी निवडलेल्या पाचही कथा 1925 च्या थोड्या आधी किंवा थोड्या नंतर लिहिलेल्या आहेत, म्हणजे या कथांमधून शंभर वर्षांपूर्वीचे भारतातील समाजजीवन पाहायला मिळते. तेव्हापासून आत्तापर्यंत समाजाच्या बाह्य स्वरूपात कितीही बदल झाले, तरी मानवी भावभावना आणि वृत्ती-प्रवृत्ती यांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. म्हणून या कथांमधील सर्व पात्रे आणि त्यातील आशय-विषय केवळ या देशातच नाही, तर जगातील विविध देशांत आजही पाहायला मिळतात. परिणामी, प्रत्येक नव्या पिढीला जीवनविषयक मूल्ये विकसित करण्यासाठी प्रेमचंद यांचे साहित्य आपलेसे वाटले आहे.

साधना साप्ताहिकाच्या हीरक महोत्सवापासून (2008 पासून) बालकुमार दिवाळी अंक नियमितपणे प्रकाशित होत आहे. सुरुवातीची सात वर्षे कथा व लेख यांचा समावेश असलेले अंक प्रकाशित झाले. त्यानंतरची आठ वर्षे विशिष्ट थीम असलेले अंक प्रकाशित केले. त्यामध्ये, सुरुवातीची दोन वर्षे देश-विदेशांतील कर्तबगार मुले-मुली, नंतरची दोन वर्षे भारतातील विविध राज्यांतील कर्तबगार मुले-मुली, त्यानंतरची दोन वर्षे विविध देशांतील विविध भाषांमधील चित्रपट या थीम मध्यवर्ती होत्या. आणि मागील दोन वर्षांतील अंकांत भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र या बारा विषयांचे अंतरंग उलगडून दाखवणारे लेख प्रकाशित केले.

या वर्षी, 'भारतातील विविध भाषांमधील कथा' ही थीम निवडली होती. अर्थातच त्या कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आणि त्यांचे भावविश्व असले पाहिजे, ही पूर्वअट होती. तशी तयारी सुरू केली, मात्र उपलब्ध वेळ आणि काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ती थीम पुढच्या वर्षी घ्यावी असे ठरले. आणि मग, संपूर्ण भारतात मान्यता व स्वीकारार्हता आहे अशा एकाच साहित्यिकाच्या कथांचा अंक या वर्षी काढावा असा विचार मनात आला. साहजिकच, त्यानंतर मनात आलेले पहिले नाव होते प्रेमचंद. तेव्हा असेही लक्षात आले की, चंद्रकांत भोंजाळ यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमचंद यांचे साहित्य मराठीत अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे आणि ते साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित होणार आहे. म्हणून त्यांना विचारले, "अनुवादाची काय स्थिती आहे?" तर ते म्हणाले, "प्रेमचंद यांच्या निवडक कथा आणि निवडक कादंबऱ्या असे दोन खंड अनुवाद करून तयार आहेत, प्रकाशित होण्यास अवकाश आहे." मग त्यांनी अनुवाद केलेल्या कथा खंडामधील पन्नास कथांवर नजर टाकली. त्यातून, मुले-मुली व त्यांचे भावविश्व केंद्रस्थानी आहे अशा पाच कथा निवडल्या, त्याला सुंदर व आकर्षक अशी चित्रे गिरीश सहस्रबुद्धे यांनी काढली आणि हा अंक तयार झाला.

1880 ते 1936 असे जेमतेम 56 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या धनपतराय श्रीवास्तव यांनी उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि पत्रकार-संपादक म्हणून काम केले. दरम्यान त्यांनी 'प्रेमचंद' या नावाने उर्दू व हिंदी भाषांमध्ये विपुल लेखन केले. विसाव्या शतकात ज्यांचे साहित्य भारतातील सर्व भाषांमध्ये स्वीकारले गेले आणि मोठ्या कौतुकास पात्र ठरले अशा साहित्यिकांमध्ये, रवींद्रनाथ टागोर यांच्या पाठोपाठ कदाचित प्रेमचंद हेच नाव घ्यावे लागते. त्यांनी एकूण बारा कादंबऱ्या आणि जवळपास तीनशे कथा लिहिल्या. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांमध्ये वास्तवाचे चित्रण आहे. त्यातही गरिबी, जातिव्यवस्था व स्त्रियांची स्थिती यांना मध्यवर्ती स्थान आहे.

या अंकासाठी निवडलेल्या पाचही कथा 1925 च्या थोड्या आधी किंवा थोड्या नंतर लिहिलेल्या आहेत, म्हणजे या कथांमधून शंभर वर्षांपूर्वीचे भारतातील समाजजीवन पाहायला मिळते. तेव्हापासून आत्तापर्यंत समाजाच्या बाह्य स्वरूपात कितीही बदल झाले, तरी मानवी भावभावना आणि वृत्ती-प्रवृत्ती यांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. म्हणून या कथांमधील सर्व पात्रे आणि त्यातील आशय-विषय केवळ या देशातच नाही, तर जगातील विविध देशांत आजही पाहायला मिळतात. परिणामी, प्रत्येक नव्या पिढीला जीवनविषयक मूल्ये विकसित करण्यासाठी प्रेमचंद यांचे साहित्य आपलेसे वाटले आहे. त्यामुळे 1965 मध्ये आलेल्या 'जब प्यार किसी से होता है' या हिंदी चित्रपटातील 'सौ साल पहले' या गाण्याची इथे आठवण येते. त्या चित्रपटातील त्या गाण्याचा संदर्भ वेगळा आहे. तिथे ते कोणाला अतिशयोक्ती वाटेल, कोणाला कवीकल्पना वाटेल, कोणाला त्यात तत्त्वज्ञान दिसेल. पण प्रेमचंद यांच्या संदर्भात त्या काव्यपंक्ती म्हणजे वस्तुस्थिती आहे. कारण, आजही या देशातील लाखो वाचकांच्या मनातील भावना, "प्रेमचंद, सौ साल पहले हमे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा" अशाच आहेत.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी