सेनापती वयाच्या 24 व्या वर्षी (1904 मध्ये) परदेशात गेले. 1908 मध्ये परत आले. तेव्हा घरी न जाता थेट बंगालात जाऊन तिथल्या क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे शिक्षण त्यांनी दिले. तिथल्या क्रांतिकारकांशी एकाच वेळी देशभर बॉम्बस्फोट घडवण्यावरून मतभेद झाल्यावर ते थेट पारनेरला निघून आले. गावात येऊन त्यांनी ग्रामस्वच्छतेला आणि महार-मांग वस्तीत जाऊन शिकवायला सुरुवात केली. परदेशात इंजिनिअर व्हायला गेलेला मुलगा गावात येऊन काय करतोय, तर दलित वस्तीत जाऊन खापराने घाण साफ करतोय. गावातले सवर्ण आणि सेनापतींचे वडील चिडले.
अहिल्यानगरच्या 'आत्मनिर्धार फाउंडेशन'ने आयोजित केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभाग समितीने प्रायोजित केलेल्या, स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या संमेलनाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष, संमेलनाची संयोजन समिती आणि साहित्य रसिकहो !
महाराष्ट्राची भूमी ही प्रामुख्याने फुले-शाहू-आंबेडकरांची भूमी समजली जाते. देशाला आणि जगाला महाराष्ट्राची ही मोठी देन आहे. महाराष्ट्रानेही त्यांचा विचारजागर तेवता ठेवलेला आहे. त्यांच्या विचारांना वाहिलेली साहित्य संमेलने महाराष्ट्रभर सतत होत असतात. अण्णा भाऊ साठे यांच्या नावानेही अनेक संमेलने होतात. ती व्हायलाच हवीत. फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ यांची विचारभूमी आपण खूप नांगरली, वखरली, पेरली आणि पिकवली. ती भूमी सुपीकच आहे. आणखी कितीतरी वर्षे ती पिकत राहील. पिकवायलाही हवी. कारण फार दिवस ती भूमी पडीकच होती. आता कुठे आपण ती वहीतीत आणलेली आहे.
पण मित्रहो, हाडाचा शेतकरी हातात आहे तेवढीच जमीन कसून कधी समाधान मानत नाही. तो सतत नांगरल्याविण भुईच्या शोधात असतो. अशी जमीन तो कसायला घेतो, ती सुपीक करतो आणि आपली संपदा वाढवत राहतो. फुले-शाहू-आंबेडकरांच्या भुईभोवती त्याच कसाची आणि त्याच वसाची पुष्कळ भुई नांगरल्याविण पडीक आहे. तीही आपण कसायला हवी. ती प्रक्रिया आता हळूहळू महाराष्ट्राने सुरू केलेली आहे. प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी महात्मा गांधींवर लिहिलेला महाग्रंथ आणि काही काळापूर्वी पुण्यात पार पडलेले 'गांधी विचार साहित्य संमेलन' ही त्याची सुरुवात आहे. आणि आता आपण घेत असलेले हे 'सेनापती बापट साहित्य संमेलन' ही त्याची वहिवाट आहे. फुले-शाहू-आंबेडकर अण्णा भाऊंच्या विचारसंपदेला पूरक ठरणाऱ्या अशा नव्या वहिवाटी आपण निर्माण करायला हव्यात. या अशा क्रांतिकार्याच्या सुरुवातीच्या पायावर, या संमेलनाच्या रूपाने, आपण एक महत्त्वाची वीट लावलेली आहे. म्हणून मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आहे !
पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट (1880 ते 1967) हे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व होते. पारतंत्र्याच्या काळात बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेऊन, देशात येऊन क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचे क्रांतिकार्य त्यांनी केले होते. नंतरच्या काळात ग्रामस्वच्छता, ग्रामसुधारणेपासून, मुळशी सत्याग्रहाच्या शेतकरी आंदोलनापर्यंत इथल्या शेतीमातीतल्या माणसांशी एकरूप झालेले ते व्यक्तिमत्त्व होते. 'देशाचा संसार, माझे अंगावरी, ऐसे थोडे तरी, वाटू द्या हो' असं कळवळून सांगणारा, साने गुरुजींच्या काळजाचा, पण गरज पडेल तर जहाल भूमिका घेणारा, स्वातंत्र्य चळवळीतील खरा सेनापती होते बापट. आता आपण त्यांना जवळजवळ विसरत चाललेलो आहोत. म्हणून या संमेलनानिमित्त त्यांच्या विचारांना मिळणारा उजाळा मला जास्त महत्त्वाचा वाटतो.
फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, लोकहितवादी, आगरकर हे आपल्या देशाला घडवणाऱ्या रांगोळीतले मोठे ठिपके आहेत. पण या मोठ्या ठिपक्यांना जोडणाऱ्या सेनापती बापट यांच्यासारख्या असंख्य रेषाही आहेत. त्यांचीही आपण अधूनमधून आठवण काढली पाहिजे. त्यांच्या विचारांची उजळणी केली पाहिजे. त्यासाठी साहित्य संमेलनासारखे दुसरे निमित्त नाही. साहित्य संमेलनांचा तोच तो कथा-कवितेचा ढाचा राबवून पुसट झालेल्या रेषा गिरवण्यापेक्षा अशा एखाद्या व्यक्तीच्या विचारांना समोर ठेवून त्याच्या मंथनातून त्यांच्या आयुष्याचे सार आणि संदेश लोकांसमोर आला तर समाजाचं काही भलं तरी होईल. म्हणून सेनापती बापट यांच्या विचार आणि जीवनाला वाहिलेलं हे संमेलन मला फार आवडलं आणि या संमेलनाच्या अध्यक्षपदाला मी होकार दिला. कारण या निमित्ताने मलाही सेनापतींच्या विचाराला भिडता येणार होतं. तसं भिडण्याचा आणि सेनापतींचे संदेश नव्याने महाराष्ट्रापुढे ठेवण्याचा प्रयत्न मी पुढील भाषणातून करणार आहे. तो कितपत जमला आहे, ते आपण ठरवायचं.
|1। राजकारणाला धर्माचे अधिष्ठान ।
सेनापतींचे वडील महादेव बापट हे तसे गणेशभक्त होते. पण सेनापतींचा जन्म एकादशीच्या दिवशी झाल्यामुळे त्यांचे नाव त्यांनी पांडुरंग असे ठेवले. सेनापतींनी आयुष्यभर पांडुरंग हे आपले नाव सार्थ केले. त्या श्रीहरी पांडुरंगालाच आपल्या आयुष्याचे अधिष्ठान बनवले. आयुष्यभर सत्य-असत्याशी मनाला ग्वाही करून 'भले तरी देऊ, कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी, हाणू काठी' या वारकरी न्यायाने बॉम्बहल्ल्याच्या क्रांतिकार्याचीही, बॉम्ब बनवण्याच्या मुळापासून तयारी ठेवली. लहानपणापासून सतत सत्याचीच बाजू घेतली. त्यासाठी वेळोवेळी नुकसान झाले, ते सोसले. वसतिगृहात बिनटोपीचे वावरण्यास बंदी असताना, टोपी न घालून विद्रोह केला. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी जाब विचारताच, त्यांच्या बिनटोपीच्या डोक्याकडे बोट दाखवत, सडेतोड युक्तिवाद केला. नौकाविहार करताना सैन्याच्या राखीव जागेत प्रवेश करून नियम मोडल्यामुळे शिक्षा झाली म्हणून, हट्टाला पेटून इंग्रज सरकारला नियमच बदलण्यास त्यांनी भाग पाडले. हे सर्व त्यांनी वयाच्या विशीच्या आत केले. पुढे आयुष्यभर त्यांनी सत्याची ही कास सोडली नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीचा आधार हे सत्यच होते. हे सत्यच त्यांना श्रीहरीचे रूप वाटत असे. आयुष्याचा शेवटही त्यांनी एकादशीचा दिवस पाहूनच केला. एकादशी सुरू झाली का? असे विचारूनच, ती सुरू झाली असे समजल्यावर प्राण सोडले. असे शेवटपर्यंत त्यांनी आपले पांडुरंग हे नाव सार्थ केले.
एकूणच, रानडे, टिळक, गांधी या त्या काळातल्या सर्व राजकारणधुरीणांच्या जीवनाचा आणि विचारांचा आधार धर्मच होता. धर्मात आधी नसलेली देशभक्ती आणि समाजसेवा या धुरीणांनी धर्माच्या कक्षेत आणली. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणातून हळूहळू धर्म हे अधिष्ठान मागे पडत गेले. आणि आज धर्म हे विकृत रूपात राजकारणाचे अधिष्ठान बनले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांनी आधी धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार आचरण केले. आणि मग त्याचे उपयोजन राजकारणासाठी केले. आज केवळ मतांसाठी राजकारणाला धर्माचा आधार दिला जातो. स्वातंत्र्यापूर्वीच्या राजकारणात खऱ्या अर्थानं धर्म आणि कर्मयोगी पुरुषच राजकारणाचे धुरीण होते. आज धर्माला स्पर्शही नको म्हणणारे राजकारणी आणि धर्माला बीभत्स स्पर्श करणारे राजकारणी, दोघेही राजकारणाच्या अधोगतीला आणि गुन्हेगारीकरणाला सारखेच जबाबदार आहेत. एकाने धर्म कोसो दूर ठेवला, त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याने धर्म बगलेत मारला. आज दोन्ही बाजूंनी धर्माची जी अवहेलना सुरू आहे, तेच इथल्या राजकारणाचा स्तर खाली जाण्याचं कारण आहे. धर्माची चेष्टा करणारे आणि धर्मात केवळ स्वार्थ पाहणारे, दोघेही या गोष्टीसाठी सारखेच जबाबदार आहेत. दोघांनाही धर्म कळलेलाच नाही. धर्म आणि राजकारण यांचे संबंध समजून घेण्यासाठी सेनापतींचे जीवन मोठे उपयुक्त आहे. धर्म आणि राजकारण यांविषयीची आपली भूमिका मांडताना सेनापतींनी अनेक काव्ये केली आहेत. त्यांतले हे काही नमुने,
1.
खरा धर्म देशार्थ हा जीव द्यावा
खरा धर्म विश्वार्थ हा जीव द्यावा
खरा धर्म दुष्टांशी दुर्दंड द्यावा
खरा धर्म नेई जना मोक्षगावा
असे सर्व भूतांत जे आत्मतत्त्व
सदा राहणारे विवर्धिष्णु सत्त्व
तयाच्या हिता जी असे स्वात्महिंसा
असे धर्म ती जेवी दुष्टात्महिंसा
2.
हरीच्या चरणी। वाहियेला जीव
शांतीचे वैभव। भोगावया
गावया लागलो। या देवाचे गुण
हेत हा धरून। विसाव्याचा
चाल ही जुनाट। संतांची म्हणुनी
आशा केली मनी। शांतीविशी
शीतलता तरी। नाही जीवा आली
जीवाची काहिली। राहीनाच
चिडूनिया मग। निंदा मिया केली
तेव्हा ती हसली। देवमूर्ती
मूर्ती माझी देश। देशसेवा करी
ऐसे बोले हरी। हसूनिया
यातना देशाच्या। दूर करावया
जीव होमावया। सांगे हरी
हरीचे सांगणे। आदरिले रंगे
तेणे झाले अंग। शांतीमय
शांतीमय व्हावे। ऐसे वाटे जीवा
तरी भावे सेवा। देश देव
।2। स्वच्छतेचा संदेश ।
सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जगाला सांगणाऱ्या महात्मा गांधींचा जन्म 1869चा, याच कामाला लोक चळवळीचे स्वरूप देणाऱ्या गाडगेबाबांचा जन्म 1876चा, तर त्याही आधी हेच काम सुरू करणाऱ्या सेनापतींचा जन्म 1880चा. महात्मा गांधी हे जागतिक व्यक्तिमत्त्वाचे धनी ठरले. सेनापती राष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले. तर गाडगेबाबा हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले. सेनापती आणि गाडगेबाबा हे दोघेही गांधींना देवतुल्यच मानत असत. दोघांचीही गांधींवर अपार श्रद्धा होती. दोघांनीही स्वच्छतेची प्रेरणा गांधींकडून घेतली असणार. पण गांधींना स्वच्छतेची लोकचळवळ करता आली नाही. कारण ते राष्ट्रकार्यात इतके गुंतले होते की, या एकाच विषयाला वेळ देणे त्यांना अशक्य होते. पण आपल्यापुरते आणि भोवतालापुरते स्वच्छतेचे काम करून श्रमाला महत्त्व देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो फार प्रामाणिक होता. म्हणून ग. दि. माडगूळकरांनी लिहिले होते,
'हाती धरोनी झाडू तू मार्ग झाडीलाशी
स्पर्शे तुझ्या महात्म्या ये थोरवी श्रमाशी'
सेनापतींनी आणि गाडगेबाबांनी स्वतंत्रपणे या स्वच्छतेला ग्रामस्वच्छतेची लोकचळवळ बनवले. हे काम आधी कुणी सुरू केले? सेनापतींनी की गाडगेबाबांनी ? असा एक प्रश्न निर्माण होतो. ते निःसंशय सेनापतींनी आधी सुरू केले. पण त्यांनाही राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला प्राधान्य द्यायचे होते. ते त्यांनी दिलेही. पण आयुष्यभर त्यांना शक्य होते तेव्हा तेव्हा आणि जिथे असतील तिथे, रोज दोन ते अडीच तास त्यांनी परिसर स्वच्छतेला महत्त्व दिले. हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. गाडगेबाबा 1905 मध्ये घराबाहेर पडले. बारा वर्षे एकांतात फिरले आणि 1917 पासून त्यांनी सार्वजनिक उपक्रमांना आणि स्वच्छतेच्या लोकचळवळीला सुरुवात केली. त्याआधी भणंग अवस्थेत एकाकी देश पाहत फिरत असताना, वैयक्तिक पातळीवर त्यांनी ही स्वच्छतेची चळवळ सुरू केलेली असणारच. देश समजून घेतला, माणसं समजून घेतली, चळवळीचे टप्पे ठरवले आणि ऋणमोचनपासून आधीच फुटकळ उपक्रमांना सुरुवातही केली. गाडगेबाबा माझ्या जीव की प्राण. त्यांचं चरित्र वाचून मी खूपच भारावून गेलो. गाडगेबाबा होण्यासाठी मी लहानपणी घरून पळालोदेखील होतो. पुढे गाडगेबाबांवर दीर्घकविताही लिहिली. 'गाडग्यात केला, ब्रह्मांडाचा काला, खापराने प्याला, तत्त्वज्ञान' असं मी त्या कवितेत गाडगेबाबांविषयी म्हटलेलं होतं.
सेनापती वयाच्या 24 व्या वर्षी 1904 मध्ये परदेशात गेले. 1908 मध्ये परत आले. तेव्हा घरी न जाता थेट बंगालात जाऊन तिथल्या क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे शिक्षण त्यांनी दिले. तिथल्या क्रांतिकारकांशी एकाच वेळी देशभर बॉम्बस्फोट घडवण्यावरून मतभेद झाल्यावर ते थेट पारनेरला निघून आले. गावात येऊन त्यांनी ग्रामस्वच्छतेला आणि महार-मांग वस्तीत जाऊन शिकवायला सुरुवात केली. परदेशात इंजिनिअर व्हायला गेलेला मुलगा गावात येऊन काय करतोय, तर दलित वस्तीत जाऊन खापराने घाण साफ करतोय. गावातले सवर्ण आणि सेनापतींचे वडील चिडले. सेनापतींनी, 'देशातले लोक हेच माझे देव, त्यांची वस्ती म्हणजे मीही माझे देऊळच साफ करतोय', असं सांगून आई-वडिलांना आणि गावकऱ्यांना आपले म्हणणे आणि वागणे पटवून दिले. विलायतेत पिस्तुलाची नेमबाजी शिकलेला आणि क्रांतिकारकांना बॉम्बचे प्रशिक्षण देणारा तरुण वयाच्या 28 व्या वर्षी खराटा, खोरे आणि खापर हातात घेऊन, त्यांनाच आपली आयुधे बनवून, स्वच्छतेतून देशसेवा करू लागला. पुन्हा देशसेवेत सक्रिय होऊन, अनेक सत्याग्रह करून, आंदोलने, मोर्चे काढून, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी खोरे, खराटा आणि खापराची आठवण ठेवतच होता. आपल्या या उपक्रमाच्या प्रचारासाठी त्यांनी कितीतरी कविता लिहिल्या आणि भाषणे दिली. त्यातले प्रातिनिधिक 'झाडू अष्टक' खाली देत आहे,
'स्वदेशास संपूर्ण व्हावे स्वराज्य
असे भावना ही मनी भव्य पुज्य
अशा भावनेचे भले जे उदार
तयासाठी ही घोषणा हा पुकार
रहा जेथ तो गाव झाडा चला या
रहा जेथ तो देश झाडा चला या
चला या चला घाण काढा चला या
असे मार्ग हा भारता उद्धराया
कशी वागवी आपुले बाळ माता
कशी घालिते नित्य घाणीत हाता
स्मरा ते तसा वागवा हा स्वदेश
चला घाण काढा नको लाज लेश
तुम्हा लाज वाटो करायाशी घाण
नको लाज व्हायाशी मातेसमान
करो घाण अज्ञान सज्ञान बंधू
करा दुर ती होऊनी प्रेमसिंधू
आम्हा काढणे घाण हा राष्ट्रधर्म
अशानेच साधेल की राष्ट्रशर्म'
त्याच काळात सेनापतींनी अस्पृश्यतेविषयी एक छोटीशी पण परिणामकारक कविता लिहिली होती. ती अशी,
'शिवाशिवी नि विटाळ। विटाळाचाची सुकाळ
मनावरी रात्रंदिन। विटाळाचे दडपण
शूद्र ख्रिस्ती जरी झाला। त्याचा विटाळ
संपला हिंदू शूद्राशी विटाळ। ख्रिस्ती जाहले जवळ
|3| शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह |
मुळशी सत्याग्रह हे सेनापतींच्या आयुष्यातले मोठे प्रकरण. त्यामुळेच लोकांनी त्यांना 'सेनापती' ही पदवी उत्स्फूर्तपणे दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिवरायांच्या बारा मावळांपैकी मुळशी पेटा या एका मावळात 54 गावे आणि 12 हजार मावळ्यांना उद्ध्वस्त करणारा वीजनिर्मिती प्रकल्प इंग्रज सरकारने टाटा कंपनीच्या माध्यमातून सुरू करायचा असं ठरवलं. त्यासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू झाली. स्थानिकांनी खूप आक्रोश केला. पण मावळ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचेना. पुण्यातील काही नेते आणि गांधींचा आदेशही टाटा कंपनी मानेना. हे लक्षात आल्यावर सेनापती तिथे धावून गेले आणि त्यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. सेनापतींचा स्वभाव दुसऱ्या एका कवी वसंत बापटांनी एका गाण्यात नेमका लिहून ठेवलेला आहे,
'अन्याय घडो शेजारी, वा दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास, पुन्हा घडवू' मुळशी पेट्यातील शेतकऱ्यांचे हे दुःख भयंकर होते. त्या परिसरातील 54 गावे धरणात जाणार होती. हा सगळा परिसर आंबेमोहर तांदूळ पिकवणारा होता. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण होत होते त्यांच्या पुनर्वसनाचा काहीही विचार कंपनीने केलेला नव्हता. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार होते. यंत्रयुग यावे, वीज यावी म्हणून सेनापती सुरुवातीला या प्रकल्पाचे समर्थक होते. तेव्हा सेनापती टिळकांचा केसरी सोडून केतकरांच्या ज्ञानकोश कार्यालयात नोकरी करत होते. पण शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, हे लक्षात आल्यावर 'अन्याय तिथे सेनापती' या न्यायाने ते सत्याग्रहास तयार झाले. इतकेच नाही तर या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. त्यासाठी तेव्हाच्या शंभर रुपयांच्या मोठ्या पगाराच्या नोकरीवर त्यांनी पाणी सोडले. राजीनामा देऊन ते सत्याग्रहात उतरले. सेनापतींनी केलेला हा संघर्ष एका कादंबरीचा विषय आहे. शंभर वर्षांनंतर का होईना, बबन मिंडे यांनी या विषयावर 'सत्याग्रह' नावाची एक चांगली कादंबरी लिहिलेली आहे.
आपली क्रांतिकारक प्रकृती बाजूला सारून बापट इथे सत्याग्रही झाले. स्वतःच्या तापट स्वभावावर त्यांनी खूप संयम ठेवला. लोकांना आधी, इथे सेनापती आले म्हणजे काहीतरी अजब घडणार, असे त्यांच्या तापट स्वभावामुळे वाटत होते. कारण त्यापाठीमागे, बंगालच्या क्रांतिकारकांच्या बॉम्बपथकात त्यांचेही नाव आल्याची पार्श्वभूमी होती. पण बापट म्हणाले, "मी आता प्रामाणिकपणे सत्याग्रहात सामील होईल." त्यांनी एका कवितेतच लिहून ठेवलेले आहे,
'कसाही छळो वैरी सत्याग्रहात
कसाही छळो वैरी कारागृहात
आम्ही पांडवासारखी शिस्त पाळू
मनीच्या मनी क्रोध काढून जाळू'
या निमित्ताने सेनापतींनी 'सत्याग्रह' या विषयावर खूप चिंतन केले आणि एक स्वतंत्र पुस्तकही लिहिले. त्यात सत्याग्रहाच्या कल्पनेचे चार स्तर मांडले, जे मुळात महात्मा गांधींच्या सत्याग्रह-संकल्पनेत नव्हते. या काळातली त्यांची दैनंदिनी पाहिली की, सेनापती कसे सर्वांगाने या लढ्यात उतरले होते, ते आपल्या लक्षात येईल. सेनापती कोणत्याही गावी गेले की शाळेत, धर्मशाळेत अथवा देवळात उतरत असत. आधी हातात झाडू घेऊन तो परिसर स्वच्छ करीत असत. त्यातून लोकांची मने जिंकीत असत. नंतर लोक जमवून पदे म्हणत एक गावफेरी करीत असत. दुपारच्या वेळी स्नान, भोजन, विश्रांती घेऊन नंतर पत्रव्यवहार पाहत असत. संध्याकाळी कामधाम, जेवणखाण उरकून लोक जमले की, सभा घेत असत. असा एकूण त्यांचा त्या काळातला दिनक्रम असे. सेनापतींनी इतका प्रयत्न करून, तुरुंगवास भोगूनही मुळशी सत्याग्रहाला अपयश आले. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि त्यांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली. व्यथित होऊन त्याविषयी सेनापतींनी एका कवितेत लिहून ठेवले आहे,
'उत्साह होता विपुल आशा सर्वत्र उत्कट
सत्यागृहे की क्षेत्राचे नष्ट होईल संकट
नष्ट झाले क्षेत्र सारे विजयी झाला खळ
बारा हजार दिनांचा होम झाला अमंगळ'
मुळशी सत्याग्रहावर तेव्हा प्रसिद्ध कवी कुंजविहारी यांनी एक अंगाई गीत लिहिलेले होते. त्यातून त्या प्रश्नांची शोकान्त बाजू आपल्या लक्षात येते. ते गीत असे,
'चिमुकले लहानसे घर ते
गवताचे छप्पर भवते
वृंदावन दारापुढते
मी गाईगुरे बांधीतसे त्या ठाई
करी बाळा जो जो गाई
त्या मुंबईच्या धनिक वणिक लोकांना
श्रीमान अधिक करण्याला
कुणी आम्हापरी गोरगरीब जे असती
त्या अधिक भिकारी करिती
मुळशीची सुपीक शेती
बांधूनी धरण त्यावरती
करू म्हणती बिजली बत्ती
हो अनर्थ हा श्रीमंतांचे पायी
करी बाळा जो जो गाई'
शंभर वर्षांपूर्वीचे परकीय इंग्रजी सरकार असो का नंतर आलेले आपले स्वकीय सरकार असो, शेतकऱ्यांच्या भावना फारशा कुणी लक्षात घेत नाहीत, हे अजूनही आपण पाहतोच आहोत. सरकारने कितीही विरोध केला तरी महामार्गासाठी जमिनी अधिग्रहणाचे काम सुरूच आहे. सेनापतींनी मुळशी पेट्यात सुरू केलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कामाची समाप्ती अजून झालेलीच नाही आणि आता कुणी नवा सेनापती होण्याची शक्यताही नाही. म्हणून निदान त्या सेनापतींचे स्मरण तरी करू या.
|4। हैदराबाद संस्थानातील मुक्तिसंग्राम ।
सेनापतींचे चरित्र वाचताना मला सतत उत्सुकता होती की, आमच्या मराठवाड्याशी कधी त्यांचा संबंध आला का ? आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे इतर कुणाही महाराष्ट्रीय राष्ट्रपुरुषांपेक्षा पारतंत्र्याच्या त्या काळात सेनापती बापट मराठवाड्यात जास्त वेळा आले, जास्त काळ राहिले. बंगाल बॉम्बखटल्यावेळी त्यांचं नाव पुढे आल्यावर ते अज्ञातवासात होते. त्या अज्ञातवासातला पंचेवीस टक्के काळ ते औरंगाबादेत म्हणजे आजच्या संभाजीनगरात भूमिगत राहिले होते. एका खानावळीत ते मुळे या नावाने आचारी म्हणून वावरले. तो काळ दहा महिन्यांचा होता. गुप्तता उघड होण्याच्या भीतीने स्थलांतर करून ते इथूनच मध्य प्रदेशात गेले.
पुढे 1938 पासून अनेकदा ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सत्याग्रही म्हणून सहभागी झाले. त्यांनी त्यासाठी चार वेळा सत्याग्रह केला. निजामाने त्यांना पकडून हद्दीबाहेर नेऊन सोडले. एकदा दोन वर्षांची शिक्षाही झाली. पण एका महिन्यातच त्यांना सोडण्यात आले. इथल्या सत्याग्रहावेळी म्हणण्यासाठी प्रभातफेरीगीतेही त्यांनी लिहिली होती. इथल्या लोकांच्या मदतीसाठी काँग्रेस अनुकूल नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी, 'हैदराबाद जनता साहाय्यक काँग्रेसनिष्ठ सत्याग्रही मंडळ' स्थापन करून हे सगळे उपक्रम त्या मंडळाच्या वतीने राबवले. त्या मंडळाच्या वतीने अनेकदा सत्याग्रह करण्यात आला आणि अनेक पत्रके काढण्यात आली. निजामाला निवेदने देण्यात आली. हैदराबाद मुक्तिसंग्रामविषयक लिहिलेल्या सेनापतींच्या मजकुराने आणि गीतांनी 'सेनापती बापट समग्र वाङ्गय' याची 40 पृष्ठे व्यापलेली आहेत
सेनापतींनी हैदराबाद मुक्तीसाठी लिहिलेले एक प्रभातफेरीगीत मला फार आवडले. मराठवाड्यातील लोक दरवर्षी 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिदिन साजरा करतात. पण कधी कुणी सेनापतींची आठवण काढल्याचे मला आठवत नाही. मीही मराठवाड्यातलाच, त्यामुळे ही माहिती समजल्यावर मलाही मोठे अपराधी वाटले. सेनापतींच्या प्रभातफेरीगीतातील या काही ओळी,
'आम्ही हिंदू कोणी कुणी विश्वबंधु
आम्ही एकमेका कुणी बंदू निंदू
आम्हाला न साहे कुणाचा जुलूम
आम्ही चाललो वाकवाया निजाम
निजामीत हिंदू गुलामीत सारे
निजामीत हिंदू छळाचेची वारे
गुलामीतुनी उद्धराया गुलाम
आम्ही चाललो वाकवाया निजाम
हवी लोकशाही नको एकशाही
हवा ही नवी देशी संस्थानिकाही
म्हणूनी नको देशी संस्थान माया
बरे सांगणे देशी संस्थानिका या
मनुष्यत्व देशी जगाया तगाया
झणी पालटा सर्व संस्थानका या
चला एक व्हा वाकवाया निजाम
कुणाचे कसेही असो पक्षनाम
(उत्तरार्ध पुढील अंकात)
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहयोगाने आत्मनिर्धार फाउंडेशनने अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सेनापती बापट साहित्य संमेलन आयोजित केले होते. दि. 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या त्या संमेलनाचे अध्यक्ष होते इंद्रजित भालेराव. त्यांचे अध्यक्षीय भाषण पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. संपादक
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या