डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पूज्य साने गुरुजींच्या तिकिटाचे प्रकाशन : एक आनंददायक सोहळा

‘श्यामची आई’ हाच माझा पासपोर्ट आणि व्हिसा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महात्मा फुले सभागृहात आनंददायक पण उद्बोधक सोहळा संपन्न झाला. साने गुरुजींची जन्मशताब्दी पूर्ण होऊन गेली आणि आता त्यांच्या स्मरणार्थ तीन रुपयांचे तिकीट प्रकाशित झाले. साधना, सेवादल व कथामाला परिवारातील मंडळींनी सभागृह भरलेले होते. प्रा. माधव वझे मुख्य पाहुणे होते. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे गुरुजींचे गीत रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील मुलींनी सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. ग. प्र. प्रधान यांनी प्रास्ताविक केले. सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्यही त्यांनी कथन केले. पोस्ट खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी श्री. संदीप पटनाईक यांनी साने गुरुजींवर तिकीट का काढण्यात आले हे सांगताना ते म्हणाले, ‘‘साने गुरुजी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांचे प्रतीक होते. सेवा, विधायक कार्य आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पून झुंज- असे अनेक पैलू त्यांच्या जीवनाचे होते. त्यांचे आयुष्य फक्त पन्नास वर्षांचे होते. त्यांना जाऊन आता पन्नास वर्षे होऊन गेली. तरीही त्यांची स्मृती जागी आहे. ही त्यांची थोरवी आहे. अपूर्व असे गुण त्यांच्यात होते; म्हणून आपण त्यांच्या स्मृतींचे जतन करतो. केवळ त्यांच्या गुणांचे चीज व्हावे म्हणून हे तिकीट नव्हे, तर हे गुण आपल्यात यावेत यासाठी हा प्रयत्न आहे.’’ त्यांचे अर्थपूर्ण भाषण ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करून दाद दिली आणि तिकिटाचे प्रकाशन झाले. प्रा. माधव वझे यांचे भाषण अंतःकरणाला भिडणारे होते. साने गुरुजींचे विशेष सांगताना त्यांनी मनाचे दरवाजे कसे उघडले हे स्पष्ट केले. प्रा. माधव वझे यांचे भाषण कमालीचे उद्बोधक होते. प्रेक्षक त्यांच्या भाषणाने प्रभावीत झाले. एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद- असे ते दृश्य होते. प्रा. सदानंद वर्दे यांनी आभार मानले आणि सामुहिक राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. मग गर्दी झाली ती तिकीट खरेदी करण्यासाठी.

- वासू देशपांडे
 

‘‘आता या क्षणी मला भांबावल्यासारखं झालं आहे. साने गुरुजींच्या तिकिटाचं प्रकाशन होत असताना, त्या समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण मला बोलावलंत खरं; पण खरं तर माझी ती लायकी नाही. खरोखरच नाही. हे मी सभेपुरतं, औपचारिक बोलतो आहे असं आपण मानू नका. प्रधान सरांनी टेलिफोनवरून मला निमंत्रण दिलं, तेव्हाच मी सरांना म्हटलं की सर, खरं तर तुम्ही त्या जागी असायला पाहिजे. गुरुजींच्या आचार-विचारानं प्रभावीत झालेल्यांची, त्यांचं आयुष्य स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवू पाहणाऱ्यांची एक प्रभावळ, अगदी आत्ता, इथे या सभागृहात दिसते आहे. तर मग मी कोण आणि का म्हणून प्रमुख पाहुणा असावं? 

साने गुरुजींबद्दल आतापर्यंत अधिकारवाणीनं इतकं काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे की, मी काही म्हणूच नये. त्यांचे चरित्र लिहिणारे आता आपल्यामध्ये आहेत. तरीही मीच मला प्रश्न करतो की साने गुरुजी कसे दिसतात? प्रेम, करुणा, सेवा, त्याग यांचा साने गुरुजी हा एक आदिबंध आहे. ‘आमार जीवनी आमार बानी’ - आमचं जीवन हाच आमचा संदेश - असं म्हणण्याचा अधिकार स्वातंत्र्योत्तर भारतात साने गुरुजींचाच आहे. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावरून चित्रपट तयार झाला, त्यामध्ये मी श्यामची भूमिका केली आणि काय सांगू? ‘तिळा उघड’ म्हटल्यावर अलिबाबाची गुहा उघडावी, त्याप्रमाणे 'श्यामची आई या दोनच शब्दांनी आयुष्यामध्ये मला अनेकदा रस्ते मोकळे झाले. इथे झाले; परदेशांत गेलो, तिथेही झाले. त्याबद्दल नंतर सांगतो... पण तरीही त्यामध्ये माझे मोठेपण काय? ‘श्यामची आई’ हा माझ्या आयुष्यात घडलेला एक अपघात होता. चांगला असला तरी तो अपघातच होता, म्हणूनच मी कोणी नाही याची जाणीव आयुष्यभर मी वागवीत आलो आहे. गांधीजींप्रमाणं साने गुरुजी परिवारातले आपण सगळे आज इथे आलो आहोत; आणि या क्षणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, त्याबद्दल खरं तर वेळोवेळी आपण बोलत आलो आहोत. चर्चा करीत आहोत. 

श्यामची आई' आता कालबाह्य झाली आहे का, हा तो प्रश्न. ‘श्यामची आई’ या पुस्तकाबद्दल म्हणायचं तर सर्वांत जास्त विक्री होणाऱ्या मराठी पुस्तकांमध्ये श्यामची आई' हे पुस्तक आजही आहे. याचा अर्थ घराघरांतून ‘श्यामची आई’ विकत घेतलं जाणारं पुस्तक आहे. पण त्यामधली श्यामची आई' आता कुठे असेल तरी का,  असा प्रश्न विचारला जातो. 'श्यामची आई' कशी आहे? करुणा, सात्त्विकता, सोशीकता, आणि आत्मसन्मान यांचं प्रतीक ‘श्यामची आई’ आहे. दापोलीजवळ एका पालगड नावाच्या लहानशा गावामध्ये श्यामची आई श्यामवर- आपल्या मुलांवर संस्कार करीत त्यांना वाढवलं- स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अशी आई कुठे दिसणार? आजची स्त्री सुशिक्षित आहे, मिळवती आहे; निरनिराळ्या क्षितिजांचा वेध ती पुरुषांच्या बरोबरीनं, कधी एक पाऊल पुढे जाऊन घेत आहे. तर ती आता घरामध्ये नसणार. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊ या.

‘श्यामच्या आई’नं श्यामवर उत्कृष्ट संस्कार केले हे तर झालंच, पण श्यामच्या वडिलांनी- भाऊंनीही तसे केलेले आपण पाहतो. घरच्या गाईला गोऱ्हा झाल्यानंतर, श्यामसाठी खर्वस घेऊन ते पाच मैल चालत त्याच्या शाळेत गेले. खर्वस त्याला देऊन काय म्हणाले? ‘‘तुझ्या मित्रांना पण दे हो,  सगळ्यांनी मिळून खा!’’ आणि खरे तर एकट्याने मुळी खाऊच नये. तसाच तो पोहण्याचा प्रसंग. पोहायला जात नाही म्हणून रागावून आईनं शिपटीनं मारण्याची तक्रार श्यामनं भाऊंकडे केल्यावर भाऊ म्हणाले, ‘‘माझा मुलगा हुशार नाही असं कोणी म्हटलं तर त्याचं वाईट वाटणार नाही मला. पण माझा मुलगा भित्रा आहे असं कोणी म्हटलं, तर त्याची लाज वाटेल मला!’’  श्यामनं पत्रावळी येत नाहीत असं म्हटल्याबरोबर भाऊंनी त्याला ते किती सोपं असतं ते दाखवून दिलं आणि अखेरीला आई गेल्यावर श्याम उन्मळून पडणार असे दिसल्यावर भाऊंनीच तर त्याला सांगितलं, की तू इतरांसाठी जग. जगातल्या दुःखी मातांना तू धीर दे..... आणि आपण पाहतो की ते सगळे पुढे गुरुजींच्या आयुष्यामध्ये उतरलं....तर मग ‘श्यामची आई’ हे जर एक प्रतीक असेल तर ते कोणाकोणामध्ये आपण पाहू शकतो? श्यामच्या वडिलांमध्ये नाही का आपण तिला पाहू शकत?

 फर्गसनमध्ये आम्ही असताना व्याख्यानांमधून आपल्या आमच्यावर साहित्यिक संस्कार करणाच्या प्रधानसरांना का नाही आम्ही श्यामची आई' म्हणायचं ? कोणी शिक्षक, शिक्षिका, मित्र, शेजारी, नातेवाईक... कुठूनकुठून संस्कारांचं बीज वाऱ्यावरून उडत येतं आणि आपल्या आयुष्यात रुजतं! त्या सगळ्यांमध्ये आपण श्यामची आई पाहू शकतो! कधी कधी वाटतं की ‘श्यामची आई’ होण्याची जबाबदारी झटकून टाकण्यासाठी पुरुषांनी ती ‘स्त्री’च असली पाहिजे असं तर म्हटलं नाही?  श्यामची आई हे मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेलं आणि मराठी जनमानसात रुजलेलं एक मिथक आहे. आणि म्हणूनच ‘श्यामची आई’चा व्यापक, सर्वसमावेशक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. सुरुवातीला मी आपल्याला म्हटलं की, ‘श्यामची आई’मुळे माझे रस्ते मोकळे झाले. त्याबद्दल सांगतो. मी इंग्लंडला गेलो होतो. तिथे देव नावाचे गृहस्थ भेटले. तिथल्या शाळांमध्ये ते अधिकारी होते. त्यांनी विचारलं की आपण तिथल्या शाळेत जाऊ या आणि त्या लहान मुलांना गोष्ट सांगू या का? मी लगेचच तयार झालो. देवांनी एका शाळेत मला नेलं. एका लहानशा खोलीत ती ८-1० वर्षांची ब्रिटिश मुलं मुकी जमिनीवर बसली होती. देवांनी माझी ओळख करून दिली की ‘श्यामची आई’ चित्रपटात मी श्यामची भूमिका केली आहे वगैरे वगैरे... त्या मुलांना काय कळणार, श्यामची आई म्हणजे काय ते! पण देवांनी सांगितलं की हे माधव वझे तुम्हांला आता गोष्ट सांगणार आहेत म्हणून..... मी सुरुवात केली. मुलांना विचारलं, कोणती गोष्ट पाहिजे तुम्हांला? तशी ती म्हणाली, ‘‘तुम्ही चित्रपटात काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं आता, तर त्या चित्रपटाबद्दल का नाही सांगत?...’’ मग मी श्यामची आई मला तो, श्यामला आई अंघोळ घालते तो प्रसंग मुलांना इंग्रजीत सांगितला. ‘पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनालाही घाण लागू नये म्हणून जप हो!...’ ते सगळं सांगितलं. 

गोष्ट संपली आणि खोलीमध्ये एकदम शांतता. कोणीच काही बोलेना. वाटलं, या मुलांना गोष्ट नाही समजली. काही क्षण गेले. एका चिमुरडीनं हात वर केला आणि म्हणाली, I want to ask you a question.. या नंतरचं तिचं-माझं संभाषण अर्थातच इंग्रजीतून झालं. तिनं विचारलं, ‘‘श्यामच्या आईनं श्यामला अंघोळ का घातली?  माझी आई कधीच मला अंघोळ घालत नाही.’’ त्यावर तिला म्हटलं की, हे बघ, त्यासाठी तुला भारतात, आणि तेही भारतातल्या खेडेगावात यावं लागेल. मूल अगदी आठ-दहा वर्षाचं होईपर्यंत आईच्या ते खूप जवळ असतं आणि त्याला अंघोळ घालताना आईलाही आनंद होतो.... मग दुसरा प्रश्न. पायाला घाण लागेल असे श्यामला का वाटलं? त्याच्या पायात ‘शूज’ नव्हते का? - पुन्हा सगळं स्पष्टीकरण केलं. मुलं अनवाणी असतात. तिथं घरातच टब नसतो. घरापासून अंतरावर, एका दगडावर बसून अंघोळ होते. परतताना पायांना माती लागते. पाठोपाठ प्रश्न आला, पण मनाची घाण अधूंनी धुवावी असं गोष्टीत आलं आहे. तेच मला समजत नाही. मन कसं डोळ्यांतल्या अश्रूंनी स्वच्छ करता येईल ? त्यावर मी विचारलं की, आधी हे सांग, तुझे मन स्वच्छ नाही असं तुला का वाटतं आहे ?- माझ्या प्रश्नावर तिनं लगेच सांगितलं की, माझ्या मनात माझ्या आईवडिलांबद्दल चांगल्या भावना नाहीत... पण मला तसं नको आहे. मन स्वच्छ करायचे आहे मला. पण अश्रूंनी मन कसं स्वच्छ होणार? तेच कळत नाही. मग मात्र मी तिला सांगितलं, की त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. तू स्वतःसाठी खूप रडत असशील. तुझ्यावर अन्याय झाला, तुला कोणी समजून घेत नाही म्हणून तुझ्या डोळ्यांत पाणी येत असेल. पण इतरांची दुःखं पाहून तुझ्या डोळ्यांत येतं पाणी? इतरांकरिता तू कधी रडतेस? इतरांसाठी तू जितके अश्रू ढाळशील. तितकं तुझं मन स्वच्छ होईल...’’ क्षणभर शांतता. माझ्या- डोळ्यांमध्ये पाहत ती चिमुरडी म्हणाली. ‘‘I will try…’’ साता-समुद्रांपार, एका अगदी वेगळ्या संस्कृतीत वाढणाऱ्या त्या मुलीला ‘श्यामची आई’ची गोष्ट समजली होती. 

इंग्लंडमध्ये असतानाचीच गोष्ट. मला फ्रान्सला जायचं होतं. पण लंडनमधलं फ्रेंच कॉन्स्युलेट मला फ्रान्सचा व्हिसा देत नव्हतं. खूप समजावून सांगितलं, हेलपाटे घातले. पण उपयोग होईना. माझा आतेभाऊ मुकुंद भावे मला दररोज त्याबद्दल विचारायचा. एके दिवशी रात्री त्यानं सरळ भारताध्या हायकमिशनमधल्या फर्स्ट सेक्रेटरींच्या घरी फोन लावला. मी मुकुंदला म्हटलं, ‘‘अरे, ते रागावतील, म्हणतील, हे काय खासगी काम आहे का? कार्यालयात येऊन भेटा.. वगैरे...’’ पण माझा आतेभाऊ ऐकेना. त्यानं फोन तर केला. पलीकडून कोणी नाईक नावाचे गृहस्थ बोलत होते. मुकुंद त्यांना सांगत होता, हे पहा माझा भारतातून मामेभाऊ आला आहे. त्याला फ्रान्सला जायचं आहे. पण फ्रेंच कॉन्स्युलेट त्याला व्हिसा देत नाहीये.... भावाचे नाव ना ? माधव वझे... हो हो, तो मोठा आहे चांगला.... फोन सुरू असताना मी त्याला यांबविण्याचा प्रयत्न केला. माझ्याबदल कशाला त्या गृहस्थाला सांगतो आहेस, असं विचारलं देखील. पण मुकुंद बोलत राहिला. फोन त्यानं नंतर खाली ठेवला आणि म्हणाला, ‘‘अरे, 'माधव वझे' हे नाव ऐकल्यावर त्यानं इंग्रजीत विचारलं, That litile boy from ‘श्यामची आई?’ Is he here? मग मी नको का सांगायला की तो लहान मुलगा आता मोठा झालाय म्हणून ?... तर नाईक यांनी तुला कमिशनमध्ये बोलावलं आहे. दुसऱ्या दिवशी मला पाहताच नाईक उठून उभे राहत म्हणाले, ‘‘या, या, अहो तुम्ही आम्हांला रडवलं आहे खूप ‘श्यामची आई’मुळे. बोला, मी काय करू शकतो?...’’ मी काम सांगितलं. त्यांनी फोन्स केले आणि फ्रेंच कॉन्स्युलेटमध्ये जायला सांगितलं. तिथं पोचलो तर सही-शिक्के होऊन माझा फ्रान्सला जाण्याचा व्हिसा तयार होता. 

पासपोर्टमधला तो शिक्का पाहत पाहत पहिल्या मजल्यावरून मी रस्त्यावर उतरलो. माझा विश्वासच बसेना. हे कसं शक्य झालं ? कोणामुळे ? श्यामची आई, साने गुरुजी यांच्यामुळे मार्ग मोकळा झाला होता. माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं. रडूच आलं. रस्त्यातले येणारे-जाणारे माझ्याकडे पाहत होते. एकानं विचारलं, ‘‘तुमची एखादी गोष्ट हरवली आहे का?’’ दुसऱ्यानं विचारलं, ‘‘तू रस्ता चुकला आहेस का?’’ ‘‘तसं काही नाही,’’ असं सांगितल्यावर त्यांनी विचारलं, ‘‘मग डोळ्यांमध्ये पाणी का तुझ्या ?’’- रुमालानं डोळे पुसत मी म्हटलं- ‘‘मला माहीत नाही!’’ ‘श्यामची आई’ चित्रपटाला या एक-दोन वर्षांत ५० वर्षे होतील. माझ्या ह्या भूमिकेचं कौतुक झालं हे खरं; पण खरं तर मी आणखीही खूप काही करीत आलो आहे. चांगली नाटकं दिग्दर्शित केली, नाटकातून कामं केली. आताही मी ‘तुघलक’ नाटक दिग्दर्शित केलं आहे, त्याचे प्रयोग उत्तम होतात. लिहितोही मी साप्ताहिक सकाळमध्ये! असं असलं तरी माधव वझे- अशी माझी ओळख मी सांगतो तेव्हा समोरचे डोळे लकाकतात आणि विचारतात, ‘‘म्हणजे श्यामची आई…’’ ‘श्यामची आई’ हाच माझा पासपोर्ट नि हाच माझा व्हिसा ठरला आहे. 'श्यामची आई ही ओळख मी आनंदानं आणि अभिमानानं, मरणापर्यंत मिरवेन.

(साने गुरुजी यांच्या तिकीट प्रकाशनाच्या वेळी प्रा. माधव वझे यांनी केलेले भापण त्यांच्याच शब्दांत.)
 

Tags: आनंददायक सोहळा पोस्टाचे तिकीट साने गुरुजी स्मरणार्थ pleasant ceremony postal stamp sane guruji memorable weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके