डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लक्ष्मण हे रायमाने सरांचे नाव! ऊर्मिला हे त्यांच्या पत्नीचे नाव! मुलाचे नाव क्रांती व मुलीचे नाव प्रेरणा! हे ‘लक्ष्मणायन’ नाममात्रदेखील खूप सूचक आहे. रायमाने सरांनी जी जीवनमूल्ये स्वीकारली, ती जगण्याच्या प्रकल्पात जिथे जिथे गोठविता येतील, तिथे तिथे ती बसविली. सर आणि मी काही वर्षे अगदी सख्खे शेजारी होतो. त्या वेळी क्रांती व प्रेरणा छोटी बालकेच होती. मला या नावांचे मोठे कौतुक वाटायचे. पण एवढेच नाही, सरांनी आपल्या घराचे नाव ठेवले आहे ‘शोध!’ या ‘शोधा’चा मुहूर्त यदुनाथ थत्ते यांच्या हस्ते दारात झाड लावून करण्यात आला.

औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवनात ‘निळी पहाट’ होत होती. डॉ.आंबेडकरांच्या प्रेरक वास्तव्याचे स्पर्श तेथील अणुरेणूंतून जाणवत होते आणि हा अवघा परिसर नवनिर्मितीच्या वेणांनी नखशिखांत थरथरत होता. प्रा.ल.बा.रायमाने मला पहिल्यांदा भेटले, ते अशा वातावरणात! याही वातावरणात हा माझा सहकारी मित्र साने गुरुजी, साधना, राष्ट्र सेवादल आणि मुख्यत: साने गुरुजींचे भावसंस्कृतीचे तत्त्व (की तत्त्वज्ञान?) यासंबंधी त्याच्या खास सात्त्विक संयत शैलीत बोलत राही, याचे मला नेहमीच कुतूहल वाटत असे. आजही हे कुतूहल ओसरलेले नाही... ही गोष्ट साधारणपणे 1963-64 सालची!

परवा 24 जानेवारीला रायमाने सरांनी वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला. आपला सात्त्विक स्वभाव, साधी राहणी, चारित्र्यसंपन्नता, परिवर्तनवादी निष्ठा आणि प्रसिद्धीच्या झोताबाहेरचे अध्ययन-अध्यापनउद्‌बोधनाचे व्रत हे सर्व हा मित्र गेली पन्नास वर्षे अबाधित व अढळ कसे राखू शकला, याचे मला खरोखरच नवल वाटत राहते. गेल्या अर्धशतकात जग बदलले, नागसेनवन बदलले, माणसे, मित्र, आप्तजन बदलले, घडणे-घडविणे कमीकमी पण बिघडणे-बिघडवणे अधिकाधिक होत गेले; पण रायमाने सर जसेच्या तसेच राहिले. त्यांच्या जीवनप्रवाहाचा एक काठ साने गुरुजींचा होता व दुसरा डॉ.आंबेडकरांचा होता; तर मग प्रवाह विचलित होईलच कसा?

बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील अंकली हे माझ्या या मित्राचे मूळ गाव. वडिलांचा तंबाखूचा व्यापार. संत तुकोबांच्या व्यापाराची आठवण करून देणारा हा व्यापारी पिता. खूप वर्षांनंतर रायमाने सरांनी आपल्या वडिलांचे आत्मकथन संस्कारून-संपादून प्रसिद्ध केले. पित्याचीच सात्त्विकता व सचोटी पुत्रामध्येही टिकून राहिली.

रायमाने सरांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण अनुक्रमे कोल्हापूर व बेळगाव येथे झाले. लहानपणी तिसऱ्या इयत्तेत असल्यापासून राष्ट्र सेवादलाशी संबंध आला. कोल्हापूरला प्राचार्य खर्डेकर, प्रा.ल.म.भिंगारे आणि बेळगावला प्रा.कृ.ब.निकुंब, गो.म.कुलकर्णी, ह.श्री.शेणोलीकर यांसारख्या व्यासंगी प्राध्यापकांचे त्यांच्यावर सखोल संस्कार झाले. डॉ.आंबेडकरांचे निकटवर्ती वराळेसाहेब यांच्या सांगण्यानुसार रायमाने सर 1960 नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तेथूनच ते 1994 मध्ये सेवानिवृत्त झाले. नंतर औरंगाबादीच स्थायिक झाले.

साने गुरुजींचे निष्ठावंत शिष्य यदुनाथ थत्ते साधना साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी अहोरात्र भटकंती करत एक गोष्ट केली, ती म्हणजे महाराष्ट्रात गावोगावी समाजाचे ‘अज्ञात आधारस्तंभ’ ठरावेत असे युवक घडविले. रायमाने सर हे त्यांपैकीच एक. शुद्ध चारित्र्य, साधेपणा व सेवाभाव म्हणजे त्या आधारस्तंभाचा पाया होता. अशा अज्ञात आधारस्तंभांचे एक प्रतिनिधी म्हणून मी रायमाने सरांकडे बघतो, अगदी अभिमानपूर्वकतेने!

1960-70 च्या दरम्यान नागसेनवनात दलित साहित्यसंस्कृतीचे एक सृजनशील पर्व उदयास येत होते. डॉ.म.ना.वानखेडे प्राचार्य झाले, त्यांनी  त्या पर्वाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन प्राप्त करून दिले. अनेक विद्यार्थी, शिक्षक दलित जीवनाच्या कथा, कविता, आठवणी लिहीत होते. नाटक व रंगभूमीची आवड व कुवत असलेली मुले-मुलीही खूप होत्या. विविध खेळांतही प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी होते. आणि मुख्य म्हणजे युवा वर्गाची ही विविधतापूर्ण अशी सर्जनशीलता ओळखणारे व तिचे संगोपन-संवर्धन करणारे रायमाने सरांसारखे प्राध्यापकही होते. यशवंत मनोहर, अरुणा लोखंडे, हिवराळे बंधू, योगीराज वाघमारे यांसारखे विद्यार्थी होते; गंगाधर पानतावणे, प्र. ई. सोनकांबळे, गजमल माळी, रायमाने यांच्यासारखे प्राध्यापक होते. श्री. वडजीकर यांच्यासारखे डॉ. आंबेडकरांच्या तालमीत तयार झालेले बहुश्रुत व कार्यतत्पर ग्रंथपाल होते. अशा सामूहिक सर्जनशील उत्थानपर्वाचे फलित म्हणजे दलित साहित्यसंस्कृती निळी पहाट! - रायमाने सर या पर्वाचे एक शिल्पकार होते.

लक्ष्मण हे रायमाने सरांचे नाव! ऊर्मिला हे त्यांच्या पत्नीचे नाव! मुलाचे नाव क्रांती व मुलीचे नाव प्रेरणा! हे ‘लक्ष्मणायन’ नाममात्रदेखील खूप सूचक आहे. रायमाने सरांनी जी जीवनमूल्ये स्वीकारली, ती जगण्याच्या प्रकल्पात जिथे जिथे गोठविता येतील, तिथे तिथे ती बसविली. सर आणि मी काही वर्षे अगदी सख्खे शेजारी होतो. त्या वेळी क्रांती व प्रेरणा छोटी बालकेच होती. मला या नावांचे मोठे कौतुक वाटायचे. पण एवढेच नाही, सरांनी आपल्या घराचे नाव ठेवले आहे ‘शोध!’ या ‘शोधा’चा मुहूर्त यदुनाथ थत्ते यांच्या हस्ते दारात झाड लावून करण्यात आला.

रायमाने चक्क भावविवेकवादी आहेत. त्यांच्या मोठ्या एकत्रित कुटुंबात एक सून मारवाडी, दुसरी लिंगायत आणि तिसरी मुस्लिम आहे. ‘‘मी ना देवाचा, ना धर्माचा मी आहे भारतभूमीचा’’ - यांसारखी काव्यात्मक वचने रायमाने सहज बोलून जातात. ‘‘ना निंदा, ना दुश्मनी, ना वैर, गौतमाची सम्यकता मानणारा मी आणि भारत भूमीशी राष्ट्र सेवादलप्रणीत बांधिलकी...!’’

कविता जगणारी माणसेही असतातच. रायमाने सर हे त्यांपैकीच एक. भावसंस्कृती हे त्यांचे आवडते तत्त्व. भावना हेच संस्कृतीचे प्राणतत्त्व आहे असे त्यांना वाटते. म्हणून भावनेची शुद्धता, शुद्धीकरणाच्या दिशा व प्रक्रिया, भावनेचा विकास व उन्नयन या बाबींना ते महत्त्व देतात. ज्या ज्या विचारांतून, विचारप्रणालींतून, तत्त्वज्ञानांतून भावसंस्कृतीचे या प्रकारचे संवर्धनकार्य केले जाते, ते ते सर्व हा माझा मित्र स्वीकारतो. अश्रू ही भावसंस्कृतीची गहन प्रतिमा आहे... अश्रूंचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या साने गुरुजींचाच हा वारसा व वसा म्हणावा लागेल.

माझ्या या थोर मित्राला अमृतमहोत्सवी वयाच्या सर्व शुभेच्छा!

Tags: प्रा. रा. ग. जाधव लक्ष्मण रायमाने प्रा.ल.बा.रायमाने laxman raymane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके