डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

महाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले

महात्मा फुले (1827 ते 1890) यांना 63 वर्षांचे आयुष्य लाभले तर सयाजीराव महाराज (1863 ते 1939) यांना 75 वर्षांचे आयुष्य मिळाले. सयाजीराव बडोद्याच्या गादीवर 1875 मध्ये म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षी विराजमान झाले आणि 1881 मध्ये बडोदा संस्थानाचा राज्यकारभार पाहू लागले. तेव्हा त्यांचा महात्मा फुले यांच्याशी पहिल्यांदा संबंध आला आणि म.फुले यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे साधारणत: दहा वर्षे कायम राहिला. त्या दोघांच्या वयात 33 वर्षांचे अंतर होते आणि म.फुले यांचे निधन झाले तेव्हा सयाजीराव महाराज फक्त 27 वर्षांचे होते. 10 एप्रिल हा सयाजीरावांचा बडोदा संस्थानाच्या गादीवर विराजमान होण्याचा दिवस आणि 11 एप्रिल हा म.फुले यांचा जन्मदिवस आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

महाराष्ट्रातील मालेगावजवळील कौळाणे गावातून बडोद्याच्या राजपदी महाराजा सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली. बडोदा गादीला वारस नसल्याने बडोद्याचे भूतपूर्व महाराज खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी महाराणी जमनाबाई गायकवाड यांनी त्यांना दत्तक घेतले. बडोदा संस्थान महाराष्ट्राबाहेर असल्याने इथल्या अनेकांचे या संस्थानाकडे बारकाईने लक्ष होते. त्यामुळेच पुण्याच्या सार्वजनिक सभेने त्यांना राज्यकारभार हाती घेतल्यावर लगेचच 29 डिसेंबर 1881 रोजी मानपत्र दिले. त्या वेळी सीताराम हरी चिपळूणकर आणि रा.विश्वनाथ नारायण मंडलिक उपस्थित होते.

सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानाचा राज्यकारभार हाती घेतल्यापासून लगेचच समाजसुधारणा करण्याचा विडा उचलला. त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक समाजधुरिणांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. सयाजीराव महाराजही महाराष्ट्रात समाजसुधारणेच्या अंगाने घडणाऱ्या प्रत्येक बाबीकडे लक्ष ठेवून होते. सयाजीराव महाराजांनी संस्थानचा राज्यकारभार हाती घेतला त्या आधीपासूनच मुंबईच्या ‘नेटिव्ह ओपिनियन’ वृत्तपत्राचे संपादक मामा परमानंद यांचे बडोदा संस्थानाकडे लक्ष होते. त्यांना भारतातील प्रत्येक संस्थानातील प्रजेची नेहमी काळजी वाटत असे. संस्थानिकांनी सत्तेचा उपयोग स्वतःसाठी न करता प्रजेसाठी करावा, असे त्यांना नेहमी वाटत होते. एक आदर्श राजा कसा असावा याबद्दल ते वृत्तपत्रातून लिहीत.

त्याच काळात त्यांना सयाजीराव महाराजांचे कार्य समजू लागले. सर्व संस्थानिकांत प्रजेचा तारणहार म्हणून सयाजीराव महाराजांकडे मामा परमानंद पाहू लागले. मामांचे ज्याप्रमाणे सयाजीराव महाराजांकडे लक्ष होते; अगदी तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारकांकडेही होते. मामांनी शिफारस केलेले रामचंद्र धामणस्करांची सयाजीराव महाराजांनी नायब सरसुभे (जिल्हाधिकारी) पदावर नेमणूक केली. महाराजांचे समाजकार्य धामणस्करांनी जवळून पाहिले. काही काळानंतर धामणस्करांनी महात्मा फुलेंबद्दल महाराजांना सांगितले. महाराजांनी महात्मा फुलेंना बडोद्यास बोलावून घेतले. दोन समविचारी व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांची मैत्री पक्की होणार, या न्यायाने काही काळातच महाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले यांची घनिष्ठ मैत्री झाली.

सयाजीरावमहाराज व महात्मा फुले स्नेहसंबंध

जोतिराव फुले बडोद्यात आल्यावर त्यांनी सयाजीराव महाराजांना ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथाचे हस्तलिखित वाचून दाखवले. सयाजीराव महाराजांनी हा ग्रंथ वेळात वेळ काढून पूर्णपणे ऐकला. त्याचे प्रकाशन होण्यासाठी मदत केली. त्याबद्दल या ग्रंथाच्या उपोद्‌घातात महात्मा फुले लिहितात : ‘श्रीमंत सरकार गायकवाड सेना खासखेल समशेर बहादूर सयाजीरावमहाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो त्या वेळी आपल्या सर्व राजकीय कामातील अमोल्य वेळांत काटकसर करून अप्रतिम उत्साहाने व सप्रेम भावाने मजकडून हा ग्रंथ साग्र लक्षपूर्वक ऐकिला व श्री.महाराजांनी आपल्या औदार्याप्रमाणे मला द्रव्याद्वारे मदत करून माझा यथासांग अत्युत्तम आदरसत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे.’1

महात्मा फुले बडोद्यात वारंवार जात होते. महाराज त्यांची व्याख्याने राजवाड्यात आयोजित करत. त्याबाबतच्या आठवणी महात्मा फुलेंच्या समकालीनांनी लिहून ठेवल्या आहेत. गोविंद गणपत काळे लिहितात- ‘बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांशी तात्यांचे (महात्मा फुले) मोठे प्रेम असे. ते वर्षातून एकदा तरी बडोद्यास जात असत व तेथे 10-15 दिवस राहत असत.’2 बडोद्यात गेल्यावर महाराज आणि महात्मा फुले  यांची अनेक विषयांवर चर्चा होत असे. या दोन महनीय व्यक्तींमधील स्नेहसंबंध उत्तरोत्तर वाढतच गेले. महात्मा फुलेंचे दुसरे एक समकालीन महादू सहादू वाघोले यांनी यासंबंधीची आठवण सांगितली आहे. एकदा बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या आमंत्रणावरून तात्यासाहेब बडोद्यास जाऊन तीन महिने मुक्कामास राहिले होते. त्या वेळी माझे वडील सहादूबा वाघुल हे त्यांच्याबरोबर त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी नेले होते. तेथून परत आल्यावर माझे वडील सांगत असत की, तात्यासाहेब हे महाराजांचे पाहुणे म्हणून बडोद्यास महाराजांकडे होते. ते महाराजांच्या पंक्तीला जेवावयास असत. महाराजांनी तात्यांचा उपदेश नेहमी ऐकावा व त्यांचा संवाद आणि बोलणे नेहमी चालत असे. महाराज हे तात्यांशी रोज एक तास बोलत असत. तात्यासाहेबांनी लिहिलेल्या आसूडाचे चारही भाग महाराजांनी ऐकले. महाराज तात्यांना फार मान देत असत.’3

महाराज आणि महात्मा फुले यांचे ऋणानुबंध लवकरच जुळले. महाराज राज्यकारभार कसा करावा याचा अभ्यास भारतात फिरून करत होते. याच प्रवासात महाराज इ.स. 1885 मध्ये पुण्यात आले. त्या वेळेलाही त्यांना पुण्याच्या सार्वजनिक सभेतर्फे पुन्हा मानपत्र देण्यात आले. महाराजांना पुणे शहराविषयी कायमच आकर्षण वाटत होते. महाराज पुण्यात आल्यावर बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती ॲड. गंगाराम मस्के, न्या.रानडे, महर्षी वि.रा. शिंदे यांच्या भेटी घेत. त्यांच्याबरोबर समाजसुधारणांबद्दल चर्चा करत. यामध्ये म.फुलेंचाही प्रामुख्याने समावेश होतो. महाराज पुण्यात आल्यावर महात्मा फुलेंची आठवण काढत. त्यांची भेट घेण्यासाठी घोडागाडी पाठवत. त्यांना बोलावून घेत. सयाजीराव महाराजांनी बडोद्यात समाजसुधारणा करताना पारंपरिक चाली-रीती सोडून देण्यासाठी कायदे केले.

कालांतराने महाराजांच्या लक्षात आले की, सर्व सुधारणा कायद्याने करता येत नाहीत. त्यासाठी लोकांना शिक्षणाने सुज्ञ करावे लागेल, हे त्यांनी जाणले. त्यांनी बडोदा संस्थानात सर्वांना शिक्षण देण्यावर भर दिला. बऱ्याच वेळा महाराजांनी याविषयी महात्मा फुलेंबरोबर चर्चा केली. त्याविषयीची आठवण गोविंद गणपत काळे यांनी दिली. ‘महाराजांनी मागासलेल्या बहुजन समाजाच्या समाजसुधारणेकडे लक्ष पुरवावे म्हणून जोतिरावांनी प्रथम प्रथम चांगले प्रयत्न केले व त्यात त्यांना यश येऊन महाराज जेव्हा बहुजन समाजाच्या सुधारणेकडे लक्ष देऊ लागले, तेव्हा तात्यांना मोठा आनंद झाला होता.’4

सयाजीराव महाराजांनीही स्वतः शिक्षण घेतले होते. अनेक वेळा परदेश दौरे केले होते. त्यामुळे त्यांना समाजसुधारणेचे महत्त्व समजले होते. त्यातच महात्मा फुलेंबरोबर समाजसुधारणेच्या नानाविध पैलूंवर चर्चा झाल्याने त्यांना अधिकची प्रेरणा मिळाली. या सर्व देवाण-घेवाणीतून सयाजीराव महाराज आणि महात्मा फुले यांचे संबंध अधिकच दृढ झाले.

बडोद्यातील समाजसुधारणा

सयाजीराव महाराजांचे शिक्षण चालू असतानाच त्यांना समाजातील खालावलेल्या परिस्थितीची जाणीव त्यांच्या शिक्षकांनी करून दिली होती. त्यामुळे त्यात बदल करावयाला पाहिजे, हेही त्यांना समजले. शिक्षण चालू असताना सर्वप्रथम त्यांनी अस्पृश्यांच्या हॉटेलमध्ये अहमदाबाद येथे जेवण केले. त्या वेळी या तरुण राजाचे वय होते अवघे सोळा-सतरा. राज्यकारभार हाती येताच त्यांनी समाजसुधारणा सुरू केल्या. त्यांनी बडोदा संस्थानात समाजसुधारणेसाठी पुढील कायदे केले- बालविवाह प्रतिबंध कायदा, सिव्हिल मॅरेज ॲक्ट (ऐहिक लग्ननिबंध), धार्मिक स्वातंत्र्य निबंध, हिंदू विधवा विवाह मान्यता कायदा, हिंदू विवाह नोंदणी कायदा, पुरोहित परवाना कायदा, दत्तक नोंदणी कायदा (एकदा दत्तक गेल्यावर सख्ख्या भावाच्या वाटणीत वाटा नाही.), हिंदू वारसा नोंदणी कायदा, अविभक्त कुटुंब नोंदणी कायदा, हिंदू मिळकत नोंदणी कायदा, विवाहविच्छेद कायदा (हिंदू आणि पारशी), जातिभेद निवारण विच्छेद कायदा, संन्यास दीक्षा नोंदणी कायदा (जैन), कन्याविक्री प्रतिबंध कायदा, मुलींना वडिलांच्या मिळकतीत कायदा, बालसंरक्षण कायदा, बालकामगार कायदा. पडदापद्धतीही बंद केली. समाजसुधारणेच्या दृष्टीने असे अनेक कायदे केले.

महाराज फक्त कायदे करून थांबले नाहीत, कायद्याप्रमाणे स्वतःचे आचरण ठेवले. फक्त कायदे करून सुधारणा होत नाहीत याची त्यांना कल्पना होती. अगोदर कायदा करायचा, त्याबाबत जनमताचा अंदाज घ्यायचा, शिक्षणातून लोकांना सुधारणेबाबत जागृत करायचे, जनमत अनुकूल होताच कायद्याची अंमलबजावणी करावयाची- अशा प्रकारे समाजसुधारणा करण्याची पद्धत  त्यांनी अवलंबली होती.

सयाजीराव महाराजांनी बडोद्यात आदिवासी आणि अस्पृश्यांपासून सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. महाराजांनी बडोद्यात मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले होते. त्यांच्या मृत्यूसमयी (1938-39) सर्व प्रकारच्या प्राथमिक शाळांमधून एकूण 3,31,218 विद्यार्थी शिक्षण घेत होते. समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाप्रमाणे उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. अनेकांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी परदेशात पाठवले. महाराजांचे समाजसुधारणेतील कार्य पाहून इ.स. 1918 मध्ये मुंबईत भरलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. तसेच त्यांचे हे कार्य पाहून महात्मा गांधीजींनी येरवडा जेलमधून 8 मार्च 1933 रोजी पत्रात लिहिले, There can be no doubt that His Highness the Maharaja Saheb of Baroda deserves the warmest congratulations of us all for his treatment of Harijans and his withdrawing all State recognition of untouchability.

तर महाराजांनी केलेल्या अस्पृश्यांच्या सुधारणासंबंधी महर्षी वि.रा.शिंदे म्हणतात, ‘केवळ कालानुक्रमाप्रमाणे पाहिल्यास भारतीय अस्पृश्योद्धारामध्ये श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांचा नंबर तिसरा लागतो. पहिल्या अस्पृश्योद्धारकाचा मान म.जोतिबा फुले यांना, दुसरा बंगाल्यांतील ब्राह्म समाजाचे प्रसिद्ध परोपकारी गृहस्थ बाबू शशिपाद बानर्जी यांना आणि तिसरा मान आमचे गुर्जराधिपती श्रीमंत महाराजांकडे जात आहे. फुले यांचे प्रयत्न इ.स. 1852 मधील, बानर्जींचे प्रयत्न 1865 मध्ये आणि महाराजांचे प्रयत्न 1883 मध्ये म्हणजे त्यांना राज्याचे अधिकार मिळाल्यापासून दुसऱ्या-तिसऱ्या वर्षांपासून सुरू झाले.’5

सयाजीराव महाराजांनी समाजसुधारणेचे कार्य चांगले केले म्हणून परोपकारी संस्थेने ‘पतितपावन’ ही पदवी दिली, तर धर्म आणि समाजसुधारणेतील त्यांचे कार्य पाहून दुसऱ्या जागतिक धर्मपरिषदेच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली. महाराजांनी संस्थानात सुधारणांसाठी खूप काम केले.

 सयाजीराव महाराजांची महात्मा फुलेंना आर्थिक मदत

 महात्मा फुले सर्वप्रथम बडोद्यात गेले, त्या वेळी त्यांनी सयाजीराव महाराजांना ‘शेतकऱ्यांचा असूड’ हा ग्रंथ वाचून दाखवला होता. तो ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी महाराजांनी मदत केली. याचा उल्लेख याअगोदर आला आहे. महाराज फुलेंना वेळोवेळी आर्थिक मदत करत होते. सत्यशोधक समाजातर्फे काढण्यात आलेल्या शाळेला महाराजांनी मोठी मदत केली. त्याबाबत कृ.गो. सूर्यवंशी म्हणतात, ‘1888 साली एक फ्री स्कूल काढावे असे ठरले. श्री. सयाजीराव महाराज यांनी दरमहा 100 रुपये मदत देण्याचे अभिवचन दिले. शाळेचे भवितव्य आता चांगले दिसू लागले.’6 दरमहा 100 रुपयांची मदत बरेच दिवस चालू होती. महाराजांनी पुण्यातील बहुजनांच्या उद्धारासाठी चाललेल्या कार्याला मदत केली.

महात्मा फुले पक्षाघाताने आजारी पडले त्या काळात मामा परमानंदांनी महात्मा फुल्यांच्या मित्रांना मदत करण्याचे आवाहन केले. अनेकांनी त्यांना मदत केली. पुढे दीड-दोन वर्षांनी महात्मा फुले पुन्हा आजारी पडले. मामाही या काळात आजारी होते. मामांनी धामणस्करांतर्फे सयाजीरावांना मदत करण्याविषयी विनंती पत्र पाठवले. या पत्रावरून सयाजीराव महाराजांना महात्मा फुले आजारी असल्याचे समजले. ही बातमी समजल्यावर त्यांनी मदत केली. त्याबाबत बाबा भांड म्हणतात, ‘फुले आजारी असल्याची हकिगत सयाजीरावांना समजली आणि त्यांनी फुल्यांसाठी बराच पैसा पाठविला.’7 महाराजांना या महामानवाबद्दल खूप आदर होता. त्यांचे कार्य त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळेच महात्मा फुलेंच्या जीविताविषयी महाराजांना काळजी वाटत होती. दुर्दैवाने पुढे महात्मा फुले खूपच आजारी पडले. त्या काळात महाराजही आजारी होते. त्यामुळे मदतीची कार्यवाही वेळीच होऊ शकली नाही. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाई फुले आणि दत्तकपुत्र यशवंत यांच्यासाठी महाराजांनी मामा परमानंदांच्या विनंतीवरून मदत केली.

त्याबाबत ग्यानोबा कृष्णाजी ससाणे म्हणतात, ‘तात्या वारल्याचे कळताच बडोद्याचे श्रीमंत सयाजीरावांनी काकूला (सावित्रीबाई फुले) पुष्कळ पैसे पाठवले. ते बँकेत ठेवले होते व त्याच्या व्याजावर काकू व यशवंत आपले दिवस काढत होते.’8 ‘पुण्यश्लोक सावित्रीबाई यांचा शोध व बोध : एक सोपपत्तिक दर्शन’ या लेखात रा.ना. चव्हाण लिहितात,  ‘मामा परमानंद यांनी विनंतीअर्ज केल्यानुसार शेवटी सयाजीरावांनी श्रीमती सावित्रीबाई व यशवंत यांना दरमहा 50 रुपये मदत मिळण्याची व्यवस्था केली. मदत मिळू लागली तेव्हा जोतिबा हयात नव्हते. सयाजीरावांना जोतिबांचे स्मारक व्हावे, असे उत्कटतेने वाटत होते.’9 सयाजीराव महाराजांना महात्मा फुलेंचे कार्य व स्त्री शिक्षणात सावित्रीबार्इंचे योगदान आदर्श वाटत होते. फुले कुटुंबाशी त्यांचा ऋणानुबंध जुळला होता. त्यामुळेच त्यांचे या कुटुंबाकडे जातीने लक्ष होते. महाराज आणि महात्मा फुले कायमच एकमेकांच्या संपर्कात होते.

त्यामुळे महात्मा फुले एका अखंडात म्हणतात, ‘गायकवाडी आश्रय घोत्याची नजर।। होती अनावर। फी न घेता ।।1।।’

सयाजीराव आणि महात्मा फुले यांचे संबंध काही काळातच वेगळ्या पातळीवर प्रस्थापित झाले. सयाजीराव महाराजांच्या मनात महात्मा फुलेंविषयी कायमच आदर असल्यामुळे सत्यशोधक समाज आणि त्यांचा प्रसार व प्रचार करणाऱ्यांनाही महाराजांनी मदत केली. दामोदर सावळाराम यंदे हे सयाजीराव महाराज आणि महात्मा फुले यांच्या काळातील बहुजनवर्गातील महत्त्वाचे लेखक, प्रकाशक व सुधारक होते. महाराजांच्या आमंत्रणावरून मुंबईतील वास्तव्य सोडून ते बडोद्यास गेले. तेथे त्यांनी प्रथम ‘बडोदा वत्सल’ हे वृत्तपत्र सुरू केले. काही काळानंतर ‘सयाजी विजय’ वृत्तपत्र चालवले.

महाराज आणि यंदे यांचीही साहित्याच्या माध्यमातून चांगली मैत्री झाली. महाराजांनी विशेष दरबार भरवून साहित्यातील कार्याबद्दल यंदेंचा सत्कार केला. या सत्काराच्या दुसऱ्या दिवशी सत्यशोधक समाजाच्या काही लोकांची व्याख्याने महाराजांनी आयोजित केली होती. त्याबद्दलची एक आठवण यंदे देतात. ‘दि.17 फेब्रुवारी 1930 रोजी महाराजांनी लक्ष्मी विलास राजवाड्यावर सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्या लोकांचे एक व्याख्यान मुद्दाम करविले होते. त्या वेळी मी तेथे हजर होतो. व्याख्यान संपल्यावर महाराजांनी महात्मा जोतिराव फुले यांचे उदाहरण अनेकवार देऊन त्यांनी केलेल्या कार्याची महती गायली. नंतर त्यातील एक व्याख्याते नारो बाबाजी महाघट ह्यांना मदतीदाखल महाराजांनी रोख रुपये 200 दिले.’10 सयाजीरावमहाराजांनी महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतरही त्यांच्या समविचारांच्या लोकांना मदत केली.

एकमेकांचा आदर

महात्मा फुले बडोद्यास किती वेळा गेले आणि किती दिवस राहिले, याबाबतचे पुरावे आज उपलब्ध नाहीत. तसेच महाराजांनी महात्मा फुलेंची पुण्यात किती वेळा भेट घेतली, याचेही पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु दोघांचे विचार समान होते, दोघांचे ध्येय समाजसुधारणा हे एकच होते. ते संधी मिळताच एकमेकांना भेटत होते. त्यामुळे काही काळातच ते एकमेकांचा आदर करू लागले.

याविषयी ग्यानोबा कृष्णाजी ससाणे म्हणतात, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड तात्यांचे शिष्य होते. मी तात्यांबरोबर लोणावळ्यास गेलो असता मला दिसून आले की, सयाजीराव महाराज जोतिरावांचा फार मान राखतात. ते जोतिरावांशी सल्लामसलत घेऊन समाजसुधारणा करीत असत.’11 महाराजांनी बडोद्यात केलेल्या अनेक समाजसुधारणा ह्या इंग्रज अमलाखालील हिंदुस्थानापेक्षा पुढे होत्या, त्याचबरोबर काळाच्याही पुढे होत्या. दूरदृष्टीच्या होत्या. दामोदर सावळाराम यंदेंचा बडोद्यातील बराच काळ सयाजीरावमहाराजांच्या सानिध्यात गेला. त्या काळात महाराजांनी महात्मा फुलेंविषयी यंदेजवळ गौरवोद्‌गार काढले.

त्याबद्दल यंदे म्हणतात, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासात माझा जो काही काळ गेला, त्या काळात कितीतरी वेळा महाराजांनी महात्मा जोतिराव फुले ह्यांच्याबद्दलची आठवण काढून त्यांची थोरवी भरल्या मुखाने गायिलेली मी माझ्या कानांनी ऐकली आहे. त्यांच्याबद्दल महाराजांना मोठा अभिमान वाटे. व महाराजांच्या मनात जोतिरावांबद्दल उच्च दर्जाचा आदर वसत असे. जोतिरावांच्या सत्यनिष्ठेची, त्यांनी केलेल्या कार्याची व त्यांच्या बहुमोल त्यागाची थोरवी आपल्या मंडळींना उपदेश करते वेळी महाराज हटकून सांगत असत. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.’12

महाराजांनी फुलेंचा केलेला आदर सांगताना यंदे आणखी पुढे म्हणतात, ‘‘जोतिराव फुले यांचे नाव घेतेवेळी महाराज त्यांच्या नावापूर्वी हटकून ‘महात्मा’ हा बहुमानदर्शक शब्द वापरत असत, हे मला पक्केपणी माहीत आहे. ते जोतिरावांना ‘आधुनिक महात्मा’ म्हणत असत. बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्याला अर्वाचीन  काळी जागविणारा ह्या देशातील पहिला पुरुष जोतिबा हेच होय. त्यांचे कार्य विशाल आहे आणि त्यांचा त्याग तर त्याहूनही अधिक थोर आहे. त्यांनी ज्या मार्गाने कार्य केले आहे, त्याच मार्गाने कार्य झाल्यास आपल्या राष्ट्राचे हित व उद्धार होणार आहे. महात्मा बुद्धाप्रमाणे मानवजातीच्या उद्धाराचे कार्य जोतिराव करीत असल्यामुळे त्यांना ‘महात्मा’ म्हटले पाहिजे. असे सयाजीराव महाराज म्हणत. इतकेच नव्हे तर महाराजांनी मुंबईच्या मंडळींना जोतिरावांना ‘महात्मा’ ही पदवी देण्याबद्दलची सूचना केल्यावरून सन 1888 च्या उन्हाळ्यात जोतिराव मुंबईला आले असता त्यांचे रघुनाथमहाराजांच्या समाधीवर एक व्याख्यान झाले. त्याप्रसंगी मुंबईकरांनी त्यांना ‘महात्मा’ पदवी अर्पण केली. ह्या सभेस मी हजर होतो.’’13

महात्मा फुलेंचे समाजोद्धाराचे कार्य महाराजांना माहीत असल्यामुळे त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यास त्यांचे पाठबळ होते. सयाजीरावमहाराज ज्याप्रमाणे महात्मा फुलेंचा आदर करत, त्यांना सन्मान देत. त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनाही या तरुण राजाबद्दल खूप आदर होता. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा विचारही व्यक्त केले होते. महाराजांचे कार्य, विचार आणि कर्तृत्व पाहून महात्मा फुलेंनी महाराजांचा एक फोटो पत्राच्या माध्यमातून मागवून घेतला. त्याबद्दल लक्ष्मणराव ठोसर म्हणतात, अनव्या घरात महात्मा फुलेंची राहणी फार साधी असे. पुढे त्यांचा हॉल होता. सयाजीरावमहाराजांनी त्यांना आपला ऐेशर्यसंपन्न असा फोटो पाठविला होता. त्यावर त्यांनी साध्या पोशाखातील फोटो घेऊन पाठवा म्हणून त्यांना कळवले. त्यावरून महाराजांनी घोड्यावर साध्या पोशाखात बसलेला फोटो पाठविला. तो महात्मा फुले यांनी आपल्या पुढील हॉलात आपल्या बैठकीसमोर टांगून ठेवला होता.’14

महात्मा फुलेंनी पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या कार्याची थोरवी गायली होती. त्यांचे कार्य सर्वांना समजावे यासाठी पोवाडा लिहिला होता. तशाच प्रकारचा पोवाडा सयाजीराव महाराजांबद्दल पत्ररूपाने लिहिला. श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड, संस्थान बडोदे यांना पत्र-

येऊ द्या दया मना, दया मना।। भटे केली दैना।।धृ.।‌।

विद्याबंदी मूळ पाया केला दैनवाणा।।

आर्याजींनी शुद्रा आणिला खरा पशूपणा।।1।। येऊ द्या.।।

मौजेसाठी खर्च, स्त्रियांची करितो हेळणा।।

तमाशांत मर्द नाचती उणे पुरुषांना।।2।। येऊ द्या.।।

वेसवेचे गाणे ऐकता मळवी नीतींना।।

मुळ पातकी होती दोष देती गरितांना।।3।। येऊ द्या.।।

वसूलाचा पैसा खर्चून खिचडी ऐद्यांना।।

कष्ट करी शेती खाती चटणी-भाकारींना।।4।। येऊ द्या.।।

वर्षासने भटजी नेती खुल्ला खजिना।‌।

शेतकरी कष्ट करुनी करिती भरणा।।5।। येऊ द्या.।।

शेतांतील बैल मरती औती आगोलींना।।

गोप्रदाने भटजी खाती सोयरी की माना।।6।। येऊ द्या.।।

पक्वन्नांची नित्य भोजने आर्यभटांना।।

जन्मांतरी शेतकऱ्याला तुकडा मिळेना।।7।। येऊ द्या.।।

हात जोडून भटास देती रोख दक्षणा।।

सार्वजनिक सूट नाही कधी कुळंब्यांना।।8।। येऊ द्या.।।

नाचे पोरे भटाभिक्षुकां शालजोड्या दाना।।

उत्तम शेती करितो त्याला बक्षिस कां द्याना।।9।। येऊ द्या.।।

दारुवर कर लादिता बढती दुर्गुणा।।

परिणामी काय होईल कैसे उमजेना।।10।। येऊ द्या.।।

अक्षरशुन्य शुद्रादिकां कांहींच कळेना।।

अशा मुक्यांचे बाप आतां तुम्हीच कां व्हाना।।11।। येऊ द्या.।।

कष्टाळूंची दैना दाविली मुख्य प्रधाना।।

दयानिधी आहां म्हणूनी लिहिलें पदांना।।12।। येऊ द्या.।।

गेली घडी पुन्हा येईना माहीत सर्वांना।।

सर्वकाळ पुर वाहीना पर्वती दऱ्यांना।।13।। येऊ द्या.।।

उदकाची किंमत ती ठावी रणी शिपायांना।।

काशीकर तुच्छ मानितो गंगाबार्इंना।।14।। येऊ द्या.।।

जोतीराव सयाजीरायाला करितो प्रार्थना।।

वाहत्या गंगेमध्ये एकदा हात कां धुवाना।।15।। येऊ द्या.।।

महात्मा फुलेंनी सयाजीराव महाराजांना हे पोवाडारूपी पत्र लिहिले. या पत्राचा विषय दीन-दलितांचे शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे मागासलेपण असा होता. त्यांना महाराजांविषयी वाटणाऱ्या आपलेपणामुळेच अशा प्रकारचे पत्र लिहिले. हे पत्र तत्कालीन दीनबंधू  वृत्तपत्रातही प्रकाशित करण्यात आले होते.

दोघेही सुधारणांचे अग्रदूत

सयाजीराव महाराज आणि महात्मा फुले यांनी ज्या काळात समाजसुधारणा सुरू केल्या त्या काळात दोघांनाही समानच समस्यांना तोंड द्यावे लागले. इकडे महाराष्ट्रात सनातन मंडळींचा ज्या प्रकारे सुधारणांना विरोध होता, तसाच बडोद्यातही होता. महात्मा फुलेंकडे विरोध मोडण्यासाठी त्यांच्याकडे सत्ता नव्हती, तर महाराजांकडे सत्ता असूनसुद्धा समाजसुधारणेसाठी तिचा गैरवापर करता येत नव्हता. कारण महाराजांना माहीत होते की, कोणतीही सुधारणा लेखणीच्या एका तडाख्याने किंवा दंडुकेशाहीने होऊ शकत नाही. समाजावर सामाजिक रूढी-परंपरांचा पगडा, अंधश्रद्धा, जाती- जातींतील परस्परद्वेष, कमी दर्जाचे विचार असतील; तर लगेचच सुधारणा होत नसतात याची त्यांना जाणीव होती. कायद्याने, जुलमाने, दंडुक्याच्या धाकाखाली आणि लोकमताविरुद्ध केलेल्या सुधारणा ह्या चिरकाल टिकणाऱ्या नसतात. यामुळेच जनमताचा कौल घेत, सुधारणेबाबत लोकांना जागृत करत महाराजांनी सुधारणा केल्या.

महात्मा फुलेंच्या आणि सयाजीराव महाराजांच्या समाजसुधारणा ज्ञानाच्या उपासनेतून, सत्यनिष्ठा व मानवाचे कल्याण समोर ठेवून पुढे आल्या होत्या. महात्मा फुलेंनी जगातील सुधारक पुरुषांच्या विचारांचे वाचन केले होते. महाराजांनी समाजसुधारणेसंबंधी जगातील महत्त्वाच्या ग्रंथांचे वाचन, मनन आणि चिंतन केले होते. समाजात मागे पडलेल्या लोकांची दुःखे महात्मा फुलेंच्या लेखणीतून समोर आली. महाराजांनी संस्थानात दुष्काळ पडल्यावर त्यावर केलेल्या उपाययोजना आणि मदत यावर आधारित ‘दुष्काळाच्या नोंदी’ नावाचा ग्रंथ लिहिला. अनेक भाषणांतून, पत्रांतून आणि ‘मागासलेल्या वर्गाचे शिक्षण’ या लेखातून वंचित- बाधित घटकांची दुःखे कायम समोर आणली. त्यावर उपाय काढले.

सयाजीराव महाराज राज्यकारभार हाती घेण्याअगोदर एका प्रवासात इ.स.1877 मध्ये अहमदाबाद येथे कनिष्ठ वर्गाच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांनी बालवयातच सवर्ण-अस्पृश्य दरीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदरपासूनच या जुलमी प्रथा आणि भेदाभेद पाळण्यावर महात्मा फुलेंनी प्रहार करण्यास सुरूवात केली होती. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्रियांच्या जीवनात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. सयाजीराव महाराजांनी मुलींच्या शाळा काढून संस्थानात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मुलींच्या शारीरिक, गृहशास्त्र आणि इतर शिक्षणासाठी शाळा काढल्या. महात्मा फुलेंनी आपला पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला होता. त्याचप्रमाणे महाराजांनी राज्यकारभार हाती आल्यावर राजवाड्यातील खंडोबाचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. महात्मा फुलेंनी गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. महाराजांनीही विधवाविवाहास प्रोत्साहन देत विवाह घडवून आणले. स्वतः विवाहासाठी उपस्थित राहिले. 

महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात बंड घडवून आणले. महाराजांनी संस्थानात शेतकऱ्यांना दुष्काळात तसेच इतर वेळीही मोठी मदत केली. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. महाराजांनी बालविवाह कायद्याने बंद केले. महात्मा फुलेंनी दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. महाराज स्वतः निर्व्यसनी होते. त्यांनी स्वतःच्या आचरणाने सर्वांना आदर्श घालून दिला. संस्थानात नशिल्या वस्तूंवर कायद्याने बंदी घातली. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराजांनी हिंदू धर्मात काय- काय सुधारणा करता येतील यासंबंधी वेगवेगळ्या भाषणांतून उपाययोजना सुचवल्या. महाराजांच्या धर्मविषयक अभ्यासामुळे, विचारांमुळे त्यांची दुसऱ्या जागतिक धर्मपरिषदेच्या (शिकागो) अध्यक्षस्थानी निवड झाली.

समाजसुधारणेत तर महात्मा फुले पहिले क्रांतिकारक ठरतात. समाजात प्रबोधन करण्यासाठी त्यांनी अनेकांचा रोष ओढावून घेतला. महात्मा फुलेंप्रमाणे महाराजांनाही समाजाच्या आणि परंपरावादी वडिलधाऱ्या व्यक्तींच्या रोषाला सामोरे जावे लागले. महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन समाजकार्यासाठी प्रवृत्त केले. सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या कार्यात मोठा हातभार लावला, स्वतःही समाजप्रबोधनाचे मोठे काम केले. त्यासंबंधी लेखन केले. महाराजांनी महाराणी चिमणाबाई यांना सुशिक्षित केले. स्वतःबरोबर जगप्रवास घडविला. महाराणी चिमणाबाई यांनी  जगप्रवासाने आणि ग्रंथांच्या वाचनाने स्वतःहून पडद्याची घातक चाल सोडून दिली. ही चाल सोडून देणाऱ्या त्या हिंदुस्थानच्या राजघराण्यातील पहिली स्त्री होत्या. तसेच त्यांनी 'The Position of Women in India’ हा अजोड ग्रंथ लिहिला. या दोन महनीय व्यक्तींच्या सहचारिणीही महान होत्या. महात्मा फुलेंनी त्यांच्या आर्थिक भरभराटीच्या काळात अनेकांना शिक्षणासाठी आणि इतर लोकोपयोगी कामासाठी आर्थिक मदत केली.

सयाजीराव महाराजांनीही आयुष्यभर हिंदुस्थानातील तसेच परदेशातीलही अनेक कर्त्या व्यक्तींना, समाजोपयोगी संस्थांना उदारहस्ते खूप मोठी मदत केली. त्यामध्ये खेळ, शिक्षण, समाजकारण, राजकारण, क्रांतिकारक, अर्थकारण अशा नानाविध क्षेत्रांतील धुरंधर व्यक्तींचा समावेश होतो. दोघांनी वेगवेगळ्या प्रांतांत कार्य केले असले तरी, उमेदीच्या काळात ते दोघेही एकमेकांच्या अनुभवाची देवाण-घेवाण करत होते. या दोन महनीय व्यक्तींच्या काही सुधारणांचा उल्लेख आला असला, तरी त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. तत्त्वतः तशी तुलना होऊही शकत नाही. कारण दोघांच्या कामाचा उद्देश एक असला तरी स्वरूप निरनिराळे होते. परिस्थिती भिन्न होती.

महाराष्ट्रात कडव्या परंपरावादी लोकांचा विरोध होता, तर बडोद्यात वेगळ्या भाषेतील प्रजेमध्ये सुधारणा करावयाच्या होत्या. दोन्हीकडे समाजरचना भिन्न होत्या. परंतु दोघांच्या कामाचे ध्येय मात्र एक होते, ते म्हणजे मानवाचे कल्याण. महात्मा फुलेंनी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात समाजपरिवर्तनाचे अजोड कार्य केले. त्याचा वारसा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी गुजरात प्रांतात चालवला. समाजातील दुःख दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी असे म्हणता येईल, महात्मा फुलेंनी समाजसुधारणेचा पाया घातला आणि त्यावर सयाजीरावमहाराजांनी सोनेरी कळस चढवला.

संदर्भ -  
1.‘फुले महात्मा, महात्मा फुले समग्र वाङ्‌मय’, (संपादक- कीर धनंजय, मालशे सं.ग.) म. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, स.आ.2006, पृ.265.
2. काळे गो. ग., आठवण, ‘महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी’, (प्रकाशक- रघुवंशी ग.वि.,) रघुवंशी प्रकाशन, पुणे, 1990, पृ.15,
3. वाघोले म. स., उनि, पृ. 31.
4. काळे गो. ग., उनि, पृ. 15.
5.शिंदे वि.रा., ‘श्री.महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य’, समाविष्ट, श्री सयाजी गौरवग्रंथ’, भाग-3, (संपादक मानेपाटील, रा.शा.) वाढदिवस मंडळ बडोदे-मुंबई, 1933, पृ. 81.
6. सूर्यवंशी कृ.गो., ‘सत्यशोधक समाज’, समाविष्ट, ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’, (संपादक-नरके हरी), महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई, पा.आ. 2018, पृ.396.
7. भांड बाबा, ‘लोकपाल राजा सयाजीराव’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, 2013, पृ. 59
8. ससाणे ग्या. कृ., आठवण, समाविष्ट, ‘महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी’, उनि., पृ.41.
9. चव्हाण रा.ना., ‘पुण्यश्लोक सावित्रीबाई यांचा शोध व बोध: एक सोपपत्तिक दर्शन’, समाविष्ट, ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’, उनि., पृ. 455.
10. यंदे दा.सा., ‘आठवण’, समाविष्ट, महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी’, उनि., पृ.3.
11. ससाणे ग्या. कृ., उनि, पृ. 41.
12. यंदे दा,सा., ‘आठवण’, समाविष्ट, ‘महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी’, उनि., पृ. 3.
13. तत्रैव, पृ. 3
14. ठोसर डे. ठो., ‘आठवण’, समाविष्ट, ‘महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी’, उनि.,पृ.6.                           

Tags: महात्मा फुले महाराजा सयाजीराव गायकवाड Sayajirao Gaekwad Rajendra magar mahatma phule sayajirao maharaj weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजेंद्र मगर

डॉ. राजेंद्र मगर हे महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद येथे संशोधन सहायक आहेत.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात