पत्रकार, लेखक, गीतकार आणि स्टोरी टेलर अशी ओळख असलेल्या नीलेश मिसरा यांनी 'मी गोव्यात स्थायिक का झालो' या विषयावर वीस मिनिटे इंग्रजीतून भाषण केले. ते म्हणाले, मला मराठी वाचता येत नाही, म्हणून मी साधना अंकाची सॉफ्ट कॉपी AI ला दिली आणि त्यामार्फत या अंकातील लेखांचे विषय व आशय समजून घेतले. मी दिल्ली, मुंबई, लखनौ या शहरांत राहिलो. परंतु मागील चार वर्षे गोव्यात वास्तव्य करतो आहे. त्याचे मुख्य कारण आता दहा वर्षांची असलेली माझी मुलगी कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक वातावरणात वाढावी याबद्दलच्या माझ्या काही धारणा आहेत.
दि. 20 डिसेंबरचा साधना अंक 'गोवा ज्ञात आणि अज्ञात' या विषयावरील शंभर पानांचा बहुरंगी विशेषांक आहे. त्या अंकाचे प्रकाशन मडगाव (गोवा) येथील गोमंत विद्यानिकेतनच्या फोमेंतो अॅम्फीथिएटरमध्ये आयोजित केले होते. 64 व्या गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत हा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात धर्मानंद कोसंबी यांच्या 'निवेदन' या आत्मथनात्मक पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशनही झाले. गोव्याचे सुपुत्र असलेल्या धर्मानंद यांचे हे पुस्तक शंभर वर्षांपूर्वी (1924 मध्ये) प्रकाशित झाले, त्यांचे 150 वे जयंती वर्ष 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले आहे, ही दोन्ही निमित्तं साधून त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आणली आहे.
पणजी व मडगाव या दोन शहरांतून आणि आसपासच्या गावातून मिळून शंभर लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचा समावेश तर होताच; पण गोवा विशेषांकात ज्यांचे लेख आहेत, त्यातील 13 लेखक उपस्थित होते. दामोदर मावजो, उदय भेंब्रे, जनार्दन वेर्लेकर, आल्बेर्टिना आल्मेदा, जयंती नायक, क्लियोफात कुतिन्हो, मोहनदास लोलयेकर, शकुंतला भरणे, प्राची प्रभू, लक्ष्मीकांत शेटगावकर, मधु सगुण गावडे घोडकिरेकर आणि अर्थातच दत्ता दामोदर नायक व संदेश प्रभुदेसाय.
या आटोपशीर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप कामत यांनी केले, पणजीतील एका महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. ते मागील वीस वर्षांपासून साधना साप्ताहिकाचे वाचक आहेत. त्यांनी या अंकासाठी संपादन सहाय्य केलेले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी चार मुद्दे अगदी थोडक्यात मांडले. साधना साप्ताहिकाला गोवा विशेषांक का काढावासा वाटला, तो अंक संपादित करण्याची प्रक्रिया कशी होती, अंक काढल्यानंतर पुढे काय आणि 'निवेदन' हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून का आणले ?
त्यानंतर या विशेषांकाचे आणि कार्यक्रमाचे संयोजक दत्ता दामोदर नायक यांनी आठ-दहा मिनिटांत मनोगत व्यक्त केले. आता ते साधना ट्रस्टचे सल्लागार तर आहेतच; पण 1960 च्या दशकात साधनाच्या कुमार अंकात लेख लिहिणे, यदुनाथ थत्ते यांच्याशी संबंध येणे आणि अलीकडे प्रवासवर्णनाची लेखमाला व त्यातून 'इकेबाना' हे पुस्तक येणे इथपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख त्यांनी केला. मात्र गोव्याच्या संदर्भात भविष्यांकनं करणारे लेखन गरजेचे आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. याच भाषणात त्यांनी गोवा राज्य सरकारकडे तीन मागण्या केल्या, त्यामध्ये गोव्याच्या नव्या विमानतळाला धर्मानंद कोसंबी यांचे नाव द्यावे ही मागणी आहे.
या अंकाचे अतिथी संपादक संदेश प्रभुदेसाय यांनी कोंकणी भाषेतून भाषण केले. या अंकासाठी लेखक व विषय कसे निवडले आणि त्यांच्याकडून लेखन मागवणे व गरजेनुसार संपादन करणे, ही प्रक्रिया त्यांनी सांगितली. याशिवाय, आगामी वर्षभरात गोव्याच्या भूमीतून या लेखमालेत आणखी 20 लेख साधनातून प्रसिद्ध होणार आहेत, त्यामुळे 2026 च्या अखेरीस एकूण 40 लेखांचे पुस्तक येईल तेव्हा तो किती महत्त्वाचा ऐवज असेल हेही त्यांनी सांगितले. (ते पुस्तक इंग्रजीतही येईल.)
त्यानंतर, 'निवेदन' या पुस्तकाचे प्रकाशन प्रणव आजरेकर यांच्या हस्ते झाले. आणि मग विशेषांकाचे प्रकाशन नीलेश मिसरा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, विशेषांकात लेखन आहे, अशा सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व लेखकांना विचारपीठावर निमंत्रित करण्यात आले. सर्वांचा एकत्रित फोटो घेतला गेला. सर्व लेखकांना अंकाच्या दोन प्रती, निवेदन पुस्तकाची एक प्रत आणि साधना प्रकाशनाचे एक पुस्तक भेट देण्यात आले. भेट देण्यासाठी साधना प्रकाशनाची तीन पुस्तके निवडली होती : 'मला प्रभावित करून गेलेले पुस्तक', 'मला प्रभावित करून गेलेला सिनेमा' आणि नुकतेच प्रकाशित झालेले 'राजकारण जिज्ञासा'.
त्यानंतर, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रणव आजरेकर यांनी पंचवीस मिनिटे इंग्रजीतून भाषण केले. 'निवेदन' हे पुस्तक आणि धर्मानंद कोसंबी यांची विद्वत्ता व त्यांचे लेखन यांचे आगळेवेगळे महत्त्व त्यांनी विषद केले. त्यांना मराठीतील निवेदन हे पुस्तक वाचता आलेले नाही, पण त्यांनी निवेदन या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचलेला आहे. (धर्मानंद यांची नात थोर विदुषी मीरा कोसंबी यांनी तो अनुवाद केलेला आहे) त्यांचे भाषण लिखित स्वरूपात असल्याने नेमके व सूत्रबद्ध झाले. (त्याचा मराठी अनुवाद साधना साप्ताहिकात तर मूळ इंग्रजी भाषण कर्तव्य साधनावर पुढील आठवड्यात प्रसिद्ध करणार आहोत.)
पत्रकार, लेखक, गीतकार आणि स्टोरी टेलर अशी ओळख असलेल्या नीलेश मिसरा यांनी 'मी गोव्यात स्थायिक का झालो' या विषयावर वीस मिनिटे इंग्रजीतून भाषण केले. ते म्हणाले, मला मराठी वाचता येत नाही, म्हणून मी साधना अंकाची सॉफ्ट कॉपी AI ला दिली आणि त्यामार्फत या अंकातील लेखांचे विषय व आशय समजून घेतले. मी दिल्ली, मुंबई, लखनौ या शहरांत राहिलो. परंतु मागील चार वर्षे गोव्यात वास्तव्य करतो आहे. त्याचे मुख्य कारण आता दहा वर्षांची असलेली माझी मुलगी कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक वातावरणात वाढावी याबद्दलच्या माझ्या काही धारणा आहेत. त्यांचे हे भाषण उत्स्फूर्त होते, स्वगत सादर केल्यासारखे होते. त्यामुळे, ते भाषण शब्दांकन करून किंवा त्यांनी नव्याने लिहून दिले तर त्याचा अनुवाद साधनातून प्रसिद्ध करणार आहोत.
दोन प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यावर कुलदीप कामत यांनीच सर्वांचे आभार मानले. नीलेश मिसरा यांच्या हस्ते साधनाचा सहकारी सुदाम सानप यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला साधनाचे सांगली येथील लेखक डॉ. दिलीप शिंदे हेही आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचा सव्वा तासाचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो साधना साप्ताहिकाच्या यूट्यूब चॅनलवर याच आठवड्यात उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी गोव्यातील 'व्हाईस ऑफ गोंय' या यूट्यूब चॅनलसाठी कुलदीप कामत यांनी साधनाच्या संपादकांची पन्नास मिनिटांची मुलाखत (दोन भागांत) घेतली. मुलाखतीचा पूर्वार्ध 'साधनाची वाटचाल व सद्यस्थिती', तर उत्तरार्ध 'आजची राजकीय-सामाजिक स्थिती', या विषयावर आहे. कार्यक्रमाच्या वेळी अनेक लेखक, वाचक, हितचिंतक यांच्याशी ओझरते संवाद झाले. कोकणी भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले लेखक दामोदर मावजो यांच्याशीही संवाद झाला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संदेश प्रभुदेसाय यांनी त्यांच्या लोलये या लहान गावातील मनोशोभा कलाघरात एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. गोव्यातील प्रकाशक व लेखकांना त्यासाठी निमंत्रित केले होते. त्या ठिकाणी साधनाच्या संपादकांनी 'प्रकाशन विश्वासमोरची आव्हाने व संधी' या विषयावर एक तास भाषण केले आणि नंतर एक तास प्रश्न उत्तरे झाली.
मागे वळून पाहताना लक्षात येते, 2025 या वर्षाच्या सुरुवातीला संपादकांनी गोव्याला दिलेल्या दोन भेटींमध्ये या विशेषांकाचे बीज पडले. आणि वर्षाच्या अखेरीस गोवा अनेक अर्थानी जवळचा वाटू लागला. 15 लाख लोकसंख्या असलेले हे छोटे राज्य आहे. दोनशे ते साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून 1961 मध्ये मुक्त होऊन गोवा भारतात विलीन झाला. भारत पावणेदोनशे वर्षे ब्रिटिशांच्या अमलाखाली होता. ब्रिटिश राजवटीचा प्रभाव असलेला महाराष्ट्र आणि पोर्तुगीज राजवटीचा प्रभाव असलेला गोवा, यांच्यात काही वेगळेपण निश्चित आहे. मात्र त्याच वेळी मराठी व कोकणी या दोन्ही भाषा हा या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्या दोन भाषांच्या संदर्भात प्रामाणिक आग्रह असणारे लोक गोव्यात आहेत, पण त्याकडे कन्स्ट्रक्टिव कॉन्फ्लिक्ट म्हणून पाहता येणे शक्य आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या