डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!

श्री.राजा ढाले यांच्यासारख्या तरुणांच्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव करून देऊन त्यांना अधिक तेजस्वी व कर्तृत्ववान बनवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये हवे तेवढे आज नाही. ती किमया साने गुरुजीच करू शकले असते. आमच्या अंगी ती कर्तबगारी नाही म्हणून आम्ही इतरांच्या सुरात सूर मिळवावा आणि दलित समाजातील तरुणांचा त्यांना शिव्या देऊन तेजोभंग करावा काय? ते पाप आम्ही कधीही करणार नाही. ते कृत्य साने गुरुजींच्याशी बेइमानी करण्यासारखे आहे. त्यांच्या शिकवणीशी ते विसंगत आहे. तरीही राजा ढालेंसारख्या तरुणांना आम्ही नम्रपणे असे सांगू इच्छितो की, राष्ट्रध्वजाचे प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये त्यांच्याकडून चूक होत आहे. राष्ट्रध्वज हे आमच्या ध्येयाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा तो मानबिंदू आहे. सामाजिक व आर्थिक समानतेवर आधारलेला जो नवा समाज आम्हाला निर्माण करावयाचा आहे, त्याचे ते प्रतीक आहे. प्रचलित शासनाचे ते प्रतीक नाही.

साधनाच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन विशेषांकातील काही मजकुरामुळे गेले कित्येक दिवस चांगलीच वावटळ उठवून दिली आहे! राजा ढाले यांच्या लेखातील राष्ट्रीय ध्वजाची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारची शब्दरचना माझ्या निदर्शनास आणण्यात आली, तेव्हा लगेच मी ‘साधना’चा कार्यकारी विश्वस्त या नात्याने घडलेल्या प्रमादाबद्दल जनतेची माफी मागितली. ‘साधना’चे संपादक श्री.यदुनाथ थत्ते यांनी देखील क्षमा मागितली. इतकेच नव्हे तर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा देखील माझ्याकडे सादर केला. श्री.यदुनाथ थत्ते यांचा ‘साधना’शी अत्यंत घनिष्ट असा संबंध प्रारंभापासूनच आहे. साने गुरुजी हयात असताना देखील संपादकीय कामामध्ये गुरुजींचे ते उजवे हात होते. गुरुजींच्या पश्चात ‘साधना’च्या संपादनाची मुख्य जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली आहे. आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन हे संपादक होते त्या वेळी देखील, संपादनकार्याचा मुख्य भार यदुनाथांनाच उचलावा लागत असे. त्यांच्या राजीनाम्याचे काय करावयाचे, ते मी एकटा ठरवू शकत नाही. विश्वस्त मंडळाची बैठक घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा लागेल. व्यक्तिश: मला असे वाटते की जो प्रमाद अनवधानाने घडला आहे, त्याचे परिमार्जन माफी मागितल्याने व्हायला पाहिजे.

बहुसंख्य हितचिंतकांची आणि ‘साधना’ वाचकांची जी शेकडो पत्रे आमच्याकडे आली आहेत, त्यांपैकी एखादा अपवाद सोडून सर्वांचे मत त्यांनी राजीनामा देऊ नये, असेच आहे. काही आक्रस्ताळी मंडळींनी राजीनाम्याचा आग्रह धरला असला किंवा राजीनाम्याचा पुरस्कार केला असला तरी, त्यांपैकी फारच थोडी मंडळी ‘साधना’च्या वाचकांपैकी किंवा हितचिंतकांपैकी आहेत. ज्या प्रमादाबद्दल यदुनाथ यांनी क्षमायाचना केली आहे, राजीनामा दिला आहे व कायद्यान्वये होणारी शिक्षा भोगायची तयारी दाखवली आहे, तो त्यांच्या अपरोक्ष घडलेला आहे. क्षमा मागण्याचे प्रसंग ‘साधना’वर वेळोवेळी येत नसतात. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता या आक्रस्ताळी लोकांच्या आग्रहाला किती महत्त्व द्यायचे, ते ठरवले पाहिजे.

साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले त्या वेळेपासून श्री.थत्ते यांचा ‘साधना’शी अजोड ऋणानुबंध आहे. साने गुरुजींच्या इच्छा-आकांक्षांचे त्यांना जितके आकलन झालेले आहे, तितके आमच्यापैकी किती लोकांना झाले असेल, हे सांगणे अवघड आहे. गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न त्यांनी ज्या पोटतिडिकीने आत्मसात  केले आहे, तसे आत्मसात करणारी मंडळी फार थोडी. ते स्वप्न साकार करण्यासाठी ते आपली वाणी आणि लेखणी सतत राबवत असतात. त्यांच्या विशुद्ध चारित्र्याची ज्यांना ओळख आहे त्यांना सध्या चालू असलेल्या प्रकारामुळे विषाद वाटावा, हे स्वाभाविकच आहे. साने गुरुजींचा कळवळा दाखवत थत्ते यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरली जावी आणि त्यांची तिरडी बांधून तिचे दहन करण्याचा उपद्‌व्याप केला जावा, हे कशाचे लक्षण आहे? राष्ट्रध्वजाबद्दल श्री.थत्ते यांच्यापेक्षा अधिक प्रेम आपणाला आहे, असे या मंडळींना वाटते काय? हा शुद्ध दमदाटीचा प्रकार आहे. त्यांच्यापुढे गुडघे टेकण्याइतके कच्च्या दिलाचे यदुनाथ नाहीत, हे विरोधकांनी पक्के लक्षात ठेवावे.

‘साधना’च्याद्वारा गुरुजींना जे कार्य साधायचे होते, त्याचा आम्हांला कधीच विसर पडणार नाही. ‘जे का रंजले गांजले’ असेल त्याला पोटाशी कवटाळणाऱ्या साने गुरुजींनी, आजकाल स्वराज्यामध्ये दलित समाजावर जे अत्याचार होत आहेत, ते पाहिले असते तर त्यांनी काय केले असते याची आम्हाला कल्पना देखील करवत नाही! निश्चितच त्यांनी दलितांचीच बाजू उचलून धरली असती आणि त्यांच्यावर होणाऱ्या  अन्यायांविरुद्ध ते प्राणपणाने लढले असते.

धडपडणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून कितीही प्रमाद घडले तरी आईच्या अंत:करणाने त्यांना पाठीशी घालणे हा गुरुजींचा सहजधर्म होता. एकदा एका दलितवर्गीय तरुणाने त्यांना फसवले, तेव्हा गुरुजींच्या अवतीभोवती असणाऱ्या आम्हा मंडळींनी त्या तरुणावर कठोर टीका केली, पण गुरुजींना ते मुळीच रुचले नाही. त्यांना आमचा राग आला. ते म्हणायचे, ‘‘ही तरुण मंडळी अशा चुका करतात, याची मुख्य जबाबदारी आम्हा सुशिक्षितांची आहे. शेकडो वर्षे आम्ही त्यांना खातेऱ्यात दडपून ठेवले. त्यांच्याकडून सदाचाराची अथवा शिष्टाचाराची अपेक्षा करण्याचा आम्हांला काय अधिकार?’’ गांधीजी म्हणायचे, ‘‘त्यांना आमच्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे.’’ स्वराज्यामध्ये दलितवर्गावर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्या समाजातील तरुण संतप्त झालेले पाहून गुरुजींना आनंदच झाला असता. त्यांच्या तोंडून वेडेविद्रे शब्द बाहेर पडले तरी त्यांना त्यांनी बोलू दिले असते, त्यांची तोंडे बंद केली नसती. त्यांचे वेडेविद्रे बोल देखील त्यांनी सुधारून घेतले असते. गेली कित्येक वर्षे ‘साधना’चे संपादक आणि विश्वस्त गुरुजींची ही परंपरा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने काही प्रयोगही करत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेला दलितांच्या दु:खांना वाचा फोडणारा विशेषांक हे त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे.

स्वराज्यामध्ये होणाऱ्या अत्याचारांनी ज्यांची मने प्रक्षुब्ध झाली आहेत, अशा दलितवर्गीय तरुणांच्या भावनांचा आविष्कार त्यांच्या लेखांमधून झालेला आहे. त्यांची भाषा लब्धप्रतिष्ठित लोकांना अशिष्ट वाटेल, रुचणार नाही. परंतु भाषा सोज्वळ नाही म्हणून त्यांच्या दु:ख-संतापाचा आविष्कारच होऊ होऊ नये, असे आपण म्हणणार आहोत काय? त्यांची भाषा विशुद्ध कशी होईल याची चिंता, प्रतिष्ठित वर्गांनीच करायची आहे. परंतु तूर्त तरी त्यांच्या भावनांचा आविष्कार पूर्णत्वाने व्हावयाचा असेल तर त्यामध्ये थोडाफार गढूळपणा येणारच. त्याबद्दल आकांडतांडव करून भागणार नाही. प्रश्न आहे तो त्यांच्या प्रक्षुब्ध आणि संतप्त मनाला सांत्वना देण्याचा. त्यांची तोंडे बंद करून आपला कार्यभाग साधणार नाही. त्याने भाषा शुद्ध ठेवण्याचे समाधान लब्ध-प्रतिष्ठितांना लाभेल; परंतु समाजजीवनाचा प्रवाह मात्र अधिकाधिक गढूळ बनत जाईल. दु:ख संतापाचे रसायन समाजाच्या पोटात खदखदत राहील आणि मग त्याचा स्फोट अत्यंत किळसवाण्या पद्धतीने होऊ शकेल. ते नको असेल तर दलितांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांना दूर लोटण्याऐवजी जवळ केले पाहिजे. घटनेने त्यांना मिळालेल्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली होता उपयोगी नाही. त्यांचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना खास सवलती मिळाल्या पाहिजेत. तसे होईल तरच ते पुढारलेल्यांची बरोबरी कालांतराने करू शकतील. ही जबाबदारी केवळ शासनाची नाही, साऱ्या समाजाची आहे. याच दृष्टीने साने गुरुजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरप्रवेशाच्या मोहिमेत सतत सांगत, की मला कायदेमंडळातील कायदा नको; हृदयाचा कायदा हवा आहे. दलितांना नोकरी वगैरेंच्या बाबत खास सवलती मिळतात म्हणून तक्रारी करीत राहणे, हा या उच्च समाजातील लोकांचा उद्योग होऊन बसला आहे! गांधीजी म्हणत, भंगी समाजातील एखादी भगिनी राष्ट्रपती होईल तेव्हा मला खरा आनंद होईल! गेल्या पंचवीस वर्षांमध्ये त्या दृष्टीने आम्ही काय दिवे लावले आहेत? स्वत: आपली जबाबदारी पार पाडायची नाही आणि दलितांच्या नावाने खडे फोडायचे, असा हा चावटपणा आता थांबलाच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा खरा अर्थ काय आहे? ते कशाचे प्रतीक आहे, हे या आरडाओरडा करणाऱ्यांना माहीत असते, तर त्यांनी ही कोल्हेकुई केली नसती.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही याच ध्वजाखाली लढलो. 26 जानेवारीला दर वर्षी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. वाटेल तितका त्याग करावा लागला तरी आम्ही तो करू, पण स्वातंत्र्य मिळवू; सर्व जाती- जमातीच्या लोकांना समानतेची वागणूक देऊ; त्यासाठी नवी समाजव्यवस्था निर्माण करू, अशी अभिवचने आम्ही जनतेला दिली. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आम्ही दलितवर्गीयांना किती न्याय दिला? सत्याला साक्षी ठेवून बोलायचे झाले तर आम्हांला आमच्या कर्तव्यच्युतीबद्दल लाज वाटायला हवी! ज्या समाजामध्ये त्यांना माणुसकीने वागवले जात नाही, त्यांचा उपयोग नरबळी देण्यासाठी केला गेला तरी उच्चवर्णीयांमध्ये प्रक्षोभ निर्माण होत नाही; परंतु असल्या अमानुष अत्याचारामुळे एखाद्या तरुणाकडून रागाच्या भरात अभद्र शब्द बाहेर पडले, तर प्रचंड  हलकल्लोळ मात्र माजतो, हे कशाचे लक्षण? ज्या समाजामध्ये कोट्यवधी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचाराबद्दल हमी नाही, इतकेच काय; परंतु ज्या दलित समाजातील स्त्रियांची अब्रू भर दिवसा लुटली जाते, अशा समाजव्यवस्थेबद्दल त्यांना आपुलकी का वाटावी? असल्या स्वराज्याचे प्रतीक जो राष्ट्रध्वज, त्याच्याबद्दल रागाच्या भरात अशिष्ट उद्‌गार काढल्याबद्दल आम्ही आकाशपाताळ एक करतो; राष्ट्रध्वजाच्या पावित्र्याचा हवाला देऊन गलिच्छ शिव्याशाप देऊ लागतो, याला काय म्हणावे? बहुसंख्य सवर्ण समाजाकडून जी पापे आणि अत्याचार प्रत्यक्ष घडत आहेत, त्याबद्दल त्यांना जाब कोण विचारणार?

श्री.राजा ढाले यांच्यासारख्या तरुणांच्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव करून देऊन त्यांना अधिक तेजस्वी व कर्तृत्ववान बनवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये हवे तेवढे आज नाही. ती किमया साने गुरुजीच करू शकले असते. आमच्या अंगी ती कर्तबगारी नाही म्हणून आम्ही इतरांच्या सुरात सूर मिळवावा आणि दलित समाजातील तरुणांचा त्यांना शिव्या देऊन तेजोभंग करावा काय? ते पाप आम्ही कधीही करणार नाही. ते कृत्य साने गुरुजींच्याशी बेइमानी करण्यासारखे आहे. त्यांच्या शिकवणीशी ते विसंगत आहे. तरीही राजा ढालेंसारख्या तरुणांना आम्ही नम्रपणे असे सांगू इच्छितो की, राष्ट्रध्वजाचे प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये त्यांच्याकडून चूक होत आहे. राष्ट्रध्वज हे आमच्या ध्येयाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा तो मानबिंदू आहे. सामाजिक व आर्थिक समानतेवर आधारलेला जो नवा समाज आम्हाला निर्माण करावयाचा आहे, त्याचे ते प्रतीक आहे. प्रचलित शासनाचे ते प्रतीक नाही. देश स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हापासून आम्ही त्याची पूजा बांधीत आलो. स्वातंत्र्याच्या काळात ज्या शौर्य, धैर्य, त्याग इत्यादी गुणांचा आविष्कार झाला, त्याचे रंग या ध्वजाला चढलेले आहेत. शेकडो लोकांनी या झेंड्याने प्रतीत होणाऱ्या ध्येयांसाठी आपल्या पंचप्राणांची आहुती दिली आहे; म्हणूनच आम्ही याला पवित्र मानतो. या झेंड्यासाठीच सर्व जातीजमातींच्या आपल्या हजारो जवानांनी 1962, 65 आणि 71 साली आपले रक्त सांडले, हे विसरून कसे चालेल?

त्या मानचिन्हाबद्दल अभद्र उद्‌गार काढणे, म्हणजे त्या वीरांचाच अवमान करण्यासारखे नाही काय? आम्हाला नम्रपणे असे सांगावयाचे आहे की, या ध्वजामुळे आम्हाला ज्या ध्येयाचा बोध होतो, त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपण पुरुषार्थी बनून लढू या. तुमचा राग, तुमच्या भावना समजून घेण्याला आमची तयारी आहे; तरीपण तुम्हाला जे प्रत्यक्ष भोगावे लागत आहे, त्याची फार फार तर कल्पनाच आम्ही करू शकू. ‘ज्याचे जळे त्याला कळे’ हेच खरे आहे. अनुभूती आणि सहानुभूती यांच्यात काही अंतर राहणार, हे आम्ही जाणतो. पण म्हणूनच, ज्यांना समाजपरिवर्तनाची निकड आहे त्यांनी आपला राग अभद्रपणे व्यक्त करण्यामध्ये आपली शक्ती खर्ची घालू नये. ती जतन करून वाढविली पाहिजे, कारणी लावली पाहिजे. सवर्ण समाजामध्ये देखील दलितांशी समरस होणारे असंख्य लोक आहेत. त्यांना राष्ट्रीय ध्वजाबद्दल नितांत प्रेम आहे. त्यांची सहानुभूती अभद्र शब्दांनी गमवू नका. अन्याय तसाच चालू ठेवू मागणाऱ्यांना अशी फाटाफूट व्हायला हवी आहे. त्या दृष्टीने तुम्ही आपल्या संतापाचा आविष्कार करताना अभद्र शब्द वापरण्याचा मोह शक्य तितका आवरला पाहिजे. तसे केल्याने तुमच्या भावनांना पूर्ण अभिव्यक्ती कदाचित मिळणार नाही; परंतु क्रांतिकार्यातील व्यवहार लक्षात घेऊन, तुम्ही त्याबद्दल खंत मानू नये. साने गुरुजींची ‘साधना’ सदैव दलितांच्या पाठीशीच राहील. त्यांना अंतर देण्यापेक्षा ‘साधना’च्या जीवनाची समाप्ती झाली तरी चालेल. स्वातंत्र्योत्तर काळातील आपले जीवितकार्य ‘साधना’ला आता गवसले आहे. ते पार पाडण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. मात्र तुमचे सहकार्य आम्हाला मिळाले पाहिजे.

(9 सप्टेंबर 1972 च्या अंकात कार्यकारी विश्वस्त एस.एम.जोशी यांनी लिहिलेला हा लेख आहे.)
  
 

Tags: रावसाहेब पटवर्धन आचार्य जावडेकर यदुनाथ थत्ते राष्ट्रध्वज दलित साने गुरुजी राजा ढाले तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही एस.एम जोशी Durga Bhagwat Ravsaheb Patvrdhan Achary Javdekar Yadunath Thatte Rashtrdhwaj Dalit Sane Guruji Raja Dhale Tejobhangache Pap Amhi Karnar Nahi Sadhana S.M.Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके