डिजिटल अर्काईव्ह

साधना प्रकाशनाची पुस्तके वाचकांचा फीडबॅक सर्व्हे 2025

साधना साप्ताहिकाप्रमाणेच साधना प्रकाशनाचीही वाटचाल 77 वर्षांची झाली आहे. साहजिकच, साधना प्रकाशनाच्या पुस्तकांचे वाचक अगदी अलीकडचे म्हणजे एक वर्षापासून ते अगदी जुने म्हणजे साठ वर्षांपेक्षा अधिक काळापासूनचे आहेत. या वाचकांकडून फीडबॅक घेण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर 2025 या काळात, 24 प्रश्न असलेल्या प्रश्नावलीची लिंक पाठवण्यात आली होती. 590 वाचकांनी तो फीडबॅक फॉर्म भरला, त्यातून मिळालेल्या उत्तरांचे विवेचन विश्लेषण करणारे हे निवेदन आहे. अर्थातच, त्या उत्तरांतून तयार झालेले ग्राफिक्स सोबतच्या रंगीत पानांवर आहे. आणि हा सर्व्हे करून देणाऱ्या अक्षय जोशी यांचे छोटे टिपण चौकटीत दिले आहे.

डिसेंबर 2023 मध्ये साधना साप्ताहिकाच्या वाचकांचा फीडबॅक घेण्यासाठी सव्र्व्हे केला होता, तर डिसेंबर 2024 मध्ये साधना साप्ताहिकाच्या बालकुमार व युवा दिवाळी अंकांच्या वाचकांचा फीडबॅक घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. त्या दोन्ही सर्व्हेमधून आलेल्या उत्तरांचे विवेचन व विश्लेषण करणारे 'संपादकीय निवेदन' (त्या सव्र्व्हेचे ग्राफिक्स आणि ते सर्व्हे करून देणारे तज्ज्ञ अक्षय जोशी यांच्या टिपणासह) त्या त्या वेळी साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध केले होते.

डिसेंबर 2025 मध्ये साधना प्रकाशनाचा फीडबॅक मिळवण्यासाठी अक्षय जोशी यांच्याच नेतृत्वाखाली सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी, 24 प्रश्न असलेल्या प्रश्नावलीची गुगल लिंक तयार करण्यात आली. ती लिंक साधनाकडे असलेले नंबर आणि सोशल मीडिया यांच्याद्वारे साधारणतः दहा हजार लोकांपर्यंत पाठवण्यात आली. शिवाय, साधना साप्ताहिकाच्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या अंकांत ती प्रश्नावली छापण्यात आली. त्या प्रश्नावलीत चार प्रश्न ऐच्छिक होते. उर्वरित 20 प्रश्न कंपल्सरी होते, ते सर्व भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नव्हता. आणि एका आयडीवरून एकदाच फॉर्म भरता येणार होता. या सर्व्हेच्या 90 टक्के व 95 टक्के कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी अनुक्रमे 266 व 383 फॉर्म्स भरले जाणे आवश्यक होते, तर 98 टक्के कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी 543 फॉर्म्स भरले जाणे आवश्यक होते.

1 ते 15 डिसेंबर 2025 या काळात हा सर्व्हे करण्यात आला. पहिल्याच दिवशी 154 लोकांनी फॉर्म भरला आणि मुदत संपली तोपर्यंत 590 लोकांनी फॉर्म भरले होते. म्हणजे 98 टक्के कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी हा सव्र्व्हे पात्र ठरला. अर्थातच, या सव्र्व्हेची पद्धती, तिची बलस्थाने व तिच्या मर्यादा यासंदर्भात अक्षय जोशी यांनी त्यांच्या टिपणामध्ये लिहिले आहे. इथे त्या सव्र्व्हेमधून निष्कर्ष काय निघतात आणि ते तसे का निघत असावेत यासंदर्भात अगदी थोडक्यात विवेचन विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिलाच प्रश्न होता 'तुमचे नाव लिहा. ज्यांना कोणाला फक्त फीडबॅक द्यायचा आहे; पण स्वतःचे नाव सांगण्याची गरज वाटत नाही किंवा गोपनीय राहावे असे वाटते, त्यांच्यासाठी ती सोय ठेवली होती. अर्थात, हा फॉर्म भरला जातो, त्या वेळी ईमेल आयडी दिसतो आणि त्यावरून नाव कळण्याची शक्यता असते. परंतु कुठल्याही व कोणाच्याही ईमेल आयडीवरून फॉर्म भरता येत असल्याने गोपनीयतेसाठी पुरेपूर संधी ठेवली होती. तरीही 590 पैकी केवळ 53 लोकांनी स्वतःचे नाव लिहिले नाही, उर्वरित 537 लोकांनी स्वतःचे नाव लिहिले. म्हणजे नाव लिहिणारे लोक 91 टक्के आहेत, तर न लिहिणारे 9 टक्के. मात्र, नाव लिहिणारे व न लिहिणारे यांच्या फीडबॅकमध्ये काही वेगळा ट्रेंड आहे असे दिसत नाही. म्हणजे नाव गोपनीय ठेवून काही नकारात्मक फीडबॅक द्यायचा होता, असे कुठेही दिसत नाही किंवा नावासह फीडबॅक देताना कोणी संकोच केला असेही दिसत नाही.

दुसरा प्रश्न होता, 'तुमच्या गावाचे किंवा शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव लिहा'. या प्रश्नाला आलेल्या उत्तरांतून असे दिसते की, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील लहानमोठ्या शहरांतून आणि लहानमोठ्या गावांतून हे फॉर्म भरले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 163 फॉर्म भरले गेलेत. त्यापाठोपाठ मुंबई जिल्ह्यातून 51, अहिल्यानगर जिल्ह्यातून 40, नाशिक जिल्हा 32 असे आकडे येतात. त्यानंतर कोल्हापूर 28, ठाणे 23, सोलापूर 22 असे आकडे येतात. सातारा, छत्रपती संभाजीनगर, लातूर या तीन जिल्ह्यांतून प्रत्येकी 15 ते 17 दरम्यान फॉर्म भरले गेलेत. तर नागपूर, रत्नागिरी, जळगाव व परभणी चार जिल्ह्यांतून प्रत्येकी 10 ते 12 फॉर्म भरले गेलेत. नवी मुंबई, चंद्रपूर, अमरावती, पालघर, नांदेड, जालना, बीड या सात जिल्ह्यांतून प्रत्येकी 5 ते 8 फॉर्म आलेत. सिंधुदुर्ग, बुलडाणा, धाराशिव व गोंदिया या चार जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 ते 4. गडचिरोली, वर्धा, अकोला या तीन जिल्ह्यांतून प्रत्येकी 2. आणि यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, नंदुरबार, भंडारा या पाच जिल्ह्यांतून प्रत्येकी 1 फॉर्म भरला गेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचा विचार करता, गोव्यातून 6 फॉर्म भरले गेलेत. तर रायपूर, वाराणसी, गुलबर्गा, हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, भोपाळ, बेळगाव येथून 1 किंवा 2 फॉर्म आलेत. बोस्टन व जर्मनी या ठिकाणांवरून एकेक फॉर्म आलेला आहे. म्हणजे एकट्या पुणे जिल्ह्यातून 27 टक्के फॉर्म आलेत आणि वीस जिल्ह्यांतून 24 टक्के फॉर्म आलेत, हे दोन आकडे ग्राफिक्समध्ये पाहिले तरी साधनाचे वाचक आणि एकूणच महाराष्ट्रातील वाचक यांच्या संख्येतील प्रादशिक असमतोल लक्षात येतो.

तिसरा प्रश्न होता 'लिंग कोणते ?' स्त्री व पुरुष यांचे प्रमाण तपासण्यासाठी हा प्रश्न होता. त्याचे उत्तर सांगते, पुरुषांचे प्रमाण 80 टक्के तर स्त्रियांचे प्रमाण केवळ 20 टक्के आहे. अर्थातच, हा असमतोलही योग्य नाही. साधनाच्या यापूर्वीच्या दोन्ही सर्व्हेमध्ये हे प्रमाण साधारणतः एवढेच आहे. स्त्रियांचे प्रमाण वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक अधिक प्रयत्न करायला हवेत एवढाच त्याचा अर्थ. त्यासाठी स्त्री-लेखकांचे व स्त्रियांविषयीचे लेखन अधिक वाढवायला हवे आणि साधनाची पुस्तके स्त्री-वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत.

चौथा प्रश्न होता 'तुमचा वयोगट कोणता?' आलेल्या उत्तरांतून असे दिसते की, 36 ते 50 या वयोगटातील लोक 33 टक्के आहेत, 51 ते 65 या वयोगटातील लोक 33 टक्के आहेत, आणि 65 वर्षांपुढील लोक 21 टक्के आहेत. म्हणजे 35 वर्षांपुढील वाचक 87 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. अर्थातच, 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक केवळ 12 टक्के आहेत. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जे करणे आवश्यक आहे तसेच इथेही. युवा लेखकांची, युवावर्गाला अपील होतील अशा आशय-विषयांची पुस्तके वाढवायला हवीत आणि अर्थातच युवा वाचकांपर्यंत जाण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत.

पाचवा प्रश्न होता 'किती वर्षांपासून साधना प्रकाशनाच्या पुस्तकांशी परिचित आहात ?' या प्रश्नाला आलेल्या उत्तरांनुसार गेल्या पाच वर्षांपासून म्हणणारे 15 टक्के, गेल्या 10 वर्षांपासून म्हणणारे 19 टक्के आणि गेल्या वीस वर्षांपासून म्हणणारे 33 टक्के आहेत. याचाच अर्थ साधना प्रकाशनाच्या पुस्तकांशी परिचित असणारे 67 टक्के लोक गेल्या वीस वर्षांत जोडले गेलेत, हे खूपच चांगले चिन्ह आहे. या वीस वर्षांत साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची संख्या वाढली आणि पुस्तकांची वितरण व्यवस्थाही वाढली, त्याचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे, वीस वर्षांपेक्षा अधिक काळ साधना प्रकाशनाशी परिचित असलेले लोक 22.5 टक्के, तर चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ परिचित असणारे लोक 10.5 टक्के आहेत. याचाच अर्थ 33 टक्के लोक साधना प्रकाशनाशी दीर्घ काळ जोडलेले आहेत, म्हणजे त्यांचा विश्वास कायम आहे. एकुणात विचार करता, साधना प्रकाशन वाढते आहे आणि वाढीसाठी खूपच अनुकूल परिस्थिती आहे, हे या प्रश्नाला आलेल्या उत्तरांतून दिसते आहे.

सहावा प्रश्न होता, 'आतापर्यंत साधना प्रकाशनाची किती पुस्तके वाचली किंवा खरेदी केलीत ?' 5 पेक्षा कमी म्हणणारे 20 टक्के, 10 पेक्षा कमी म्हणणारे 22 टक्के आहेत, तर 20 पेक्षा कमी म्हणणारे 28 टक्के आहेत. अलीकडच्या काळात जोडले गेलेले जे वाचक आहेत, त्यांच्या आकड्यांशी हे आकडे प्रामुख्याने जुळणारे असू शकतात. त्यामुळे, 20 पेक्षा अधिक पुस्तके वाचणारे किंवा खरेदी करणारे लोक 18.5 टक्के, तर 50 पेक्षा अधिक म्हणणारे 12 टक्के लोक आहेत, याचाच अर्थ जवळपास 33 टक्के लोक साधनाशी अधिक जोडलेले आहेत. साधना प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रमाण वाढले आणि वितरण व्यवस्था आणखी सुधारली तर साधना प्रकाशनाच्या कमिटेड वाचकांची संख्याही वाढणार आहे.

सातवा प्रश्न होता 'साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची माहिती कुठून मिळते?' या प्रश्नाला उत्तर देताना एकापेक्षा अधिक पर्याय निवडता येणार होते. त्याप्रमाणे अनेक वाचकांनी दोन किंवा तीन पर्याय निवडले आहेत. तरीही हे उघड दिसते आहे की, 75 टक्के वाचकांना साधना साप्ताहिकातून ती माहिती मिळते, सोशल मीडियावरून 40 टक्के वाचकांना, तर साधना वेबसाइटवरून 33 टक्के आणि साधना कार्यालयातूनही 33 टक्के वाचकांना माहिती मिळते. साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांचे घनिष्ठ नाते यातून अधोरेखित होते. वर्तमानपत्रे व पुस्तक विक्रेते यांच्याकडून माहिती मिळते म्हणणारे वाचक तुलनेने कमी म्हणजे 33 टक्के आहेत, ते साहजिक आहे, कारण विक्रेत्यांची साखळी साधनाकडे पुरेशी चांगली नाही. आणि ती वाढवण्याच्या मार्गात व्यावहारिक अडचणी आहेत. पण अॅमेझॉनवरून माहिती मिळते म्हणणारे फक्त 5 टक्के आहेत, हे काहीसे आश्चर्यकारक आहे; कारण गेल्या दहा वर्षांत साधनाची सर्व पुस्तके अतिशय नियमितपणे व काटेकोर पद्धतीने अॅमेझॉनवर टाकली जातात, तशी नोंद प्रत्येक पुस्तकात असते आणि प्रत्येक जाहिरातीतही असते. त्यामुळे, अॅमेझॉनसाठी विशेष व डोळस प्रयत्न करण्याची गरज आहे, हे या उत्तरातून प्रकर्षाने पुढे आले आहे.

आठवा प्रश्न होता, 'साधना प्रकाशनाची पुस्तके कुठून खरेदी करता?' याआधीच्या म्हणजे सातव्या प्रश्नाशी हा प्रश्न जुळणारा वाटू शकतो, पण तो मुद्दाम ठेवला होता. याचे कारण पुस्तकांची माहिती जिथून होते तिथूनच ती खरेदी केली जातात का, हा अंदाज घ्यायचा होता. आश्चर्य म्हणजे तो आडाखा बरोबर ठरला. अनपेक्षित व उपयुक्त उत्तर मिळाले. साधना कार्यालयातून, ऑनलाइन माध्यमातून व साधना वेबसाइटवरून माहिती जास्त होते, पण त्या तुलनेत तिथून पुस्तकखरेदी थोडी कमी होते. याउलट, पुस्तक विक्रेते व अॅमेझॉनवरून वाचकांना पुस्तकांची माहिती कमी मिळते; पण त्या तुलनेत तिथून खरेदी जास्त होत आहे. म्हणजे पुस्तकांची माहिती देण्यासाठी प्रभावी माध्यमे आणि पुस्तके खरेदी करता येण्यासाठी सुलभमाध्यमे यांचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे, त्यानुसार रणनीती बदलायला हवी.

नववा प्रश्न होता, 'साधना प्रकाशनाच्या पुस्तकांच्या किमती अन्य मराठी प्रकाशनाच्या तुलनेत किती कमी वा जास्त असतात ?' जास्त असतात म्हणणारे लोक केवळ 2 टक्के आहेत, कमी असतात म्हणणारे 44 टक्के आहेत. मात्र, साधारणतः सारख्याच असतात असे म्हणणारे लोकही 44 टक्के आहेत. याचे कारण काय असावे ? अलीकडच्या दहा वर्षांत साधना प्रकाशनाच्या किमती अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांच्या जवळपास जाणाऱ्या आहेत तर दहा वर्षांपूर्वी साधनाच्या किंमती अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांच्या किमतींपेक्षा बऱ्यापैकी कमी होत्या. साहजिकच, साधनाच्या जुन्या वाचकांना साधनाच्या किमती कमी वाटत असाव्यात, नव्याने जोडलेल्या वाचकांना साधारणतः सारख्याच वाटत असाव्यात.

दहावा प्रश्न होता, 'साधना प्रकाशनाची पुस्तके कोणासाठी खरेदी करता?' स्वतः साठी, कुटुंबासाठी, शाळा/संस्थासाठी आणि भेट देण्यासाठी असे चार पर्याय दिले होते. एकापेक्षा अधिक पर्याय निवडण्याला वाव होता. आलेल्या उत्तरांचे ग्राफिक्स पाहता लक्षात येते, चारही आकडे चांगले आहेत. इथे असमतोल नाही. याचा अर्थ, साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची स्वीकारार्हता विविध स्तरीय आहे, त्यामुळे वाढीसाठी बरीच जास्त संधी आहे.

अकरावा प्रश्न होता, 'साधना प्रकाशनाची पुस्तके वाचताना काय विचार करता?' लेखक, विषय आणि आशय असे तीन पर्याय दिले होते. या तिन्हींचा विचार करणारे वाचक जास्त असायला हवेत अशी आमची अपेक्षा असते. तो आकडा 68 टक्के म्हणजे तुलनेने लहान वाटला. फक्त लेखक, फक्त विषय व फक्त आशय यांचा विचार केला जातो तेव्हा वाचनसंस्कृतीवर ते एक प्रकारचे भाष्य असते. साधनेचा वाचक कोणत्या प्रकारातील जास्त आहे, यासाठी हा प्रश्न टाकला होता. बारावा प्रश्न 'साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची शीर्षके व मुखपृष्ठे कशी असतात' हे विचारणारा होता. पुरेशी आकर्षक व आशयसंपन्न असतात असे म्हणणारे लोक 75 टक्के आहेत, ते बरोबर वाटले. आणि तशी ती नसतात असे म्हणणारे लोक 25 टक्के आहेत. कोणत्या वाचकांनी कोणती पुस्तके पाहिली त्यावर हे अवलंबून आहे. साधनाच्या किती टक्के पुस्तकांची मुखपृष्ठे व शीर्षके आशयसंपन्न व आकर्षक असतात असाही एक प्रश्न विचारण्याचे मनात होते, पण प्रश्नांची संख्या वाढवायला नको म्हणून तो विचारला नव्हता; मात्र त्या प्रश्नाचे उत्तरही असेच आले असते असे दिसते.

तेरावा प्रश्न होता, 'साधना प्रकाशनाची पुस्तके कशासाठी वाचता?' मनोरंजनासाठी वाचतो असं म्हणणाऱ्यांचे प्रमाण फक्त 13 टक्के आहे, ते अपेक्षितच होते. 'अभ्यासासाठी' आणि 'प्रभाव टाकून जातात' हे दोन्ही आकडे 70 टक्क्यांच्या आसपास आहेत, हेही बरोबर आहे. परंतु कामातील उपयुक्तता फक्त 36 टक्के लोकांना वाटते, हे तितकेसे योग्य नाही. कामातील उपयुक्तता कशाला म्हणायचे हे व्यक्तिसापेक्ष आहे; पण तरीही हा आकडा वाढायला हवा असे वाटते.

चौदावा प्रश्न 'साधना प्रकाशनाच्या पुस्तकांचे विषय कसे असतात ?' एकारलेले आणि गोलमाल असे म्हणणारे लोक 2 टक्क्यांपेक्षा कमी आहेत हे अगदीच साहजिक आहे. समाजवादी व डावे म्हणणारे लोक 24 टक्के आहेत; पण या लोकांनी त्याच प्रकारची पुस्तके पाहिली असतील आणि त्या प्रकारची पुस्तके 24 टक्के आहेत हेही खरे आहे. आणि 75 टक्के लोक साधनाची पुस्तके 'उदारमतवादी वा सम्यक विचार देणारी' आहेत असे म्हणतात, हे चित्रही वाढत्या स्वीकारार्हतेची पावती देणारे आहे.

पंधरावा प्रश्न होता 'साधना साप्ताहिकातून आलेल्या मजकुराची पुस्तके जास्त आवडली की थेट पुस्तकरूपात आलेल्या मजकुराची'. साप्ताहिकाच्या मजकुरातून आलेली, असे म्हणणारे 18 टक्के आणि दोन्ही प्रकारची आवडली, असे म्हणणारे 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत, याचा अर्थ साप्ताहिकातील मजकुराची पुस्तके आवडणाऱ्यांचे प्रमाण 88 टक्के आहे. तो एकूण विचार करता आमचा अंदाज बरोबरच निघाला. पण दोन्ही प्रकारची पुस्तके आवडली असे म्हणणाऱ्यांची आकडेवारी कमी असेल असाही आमचा अंदाज होता, तो बरोबर आला नाही. याचा अर्थ थेट पुस्तकरूपाने आणलेली पुस्तके निवडताना साप्ताहिकातील मजकुराप्रमाणेच विचार केला गेला असा होतो. हे चित्रही विशेष सुखावणारे आहे.

'थेट पुस्तकरूपात आलेला मजकूर आवडला', असे म्हणणारे केवळ 5 टक्के आहेत. हा वाचकवर्ग जास्त वाचन करणारा असू शकतो. आणि 'सांगता येत नाही' असे म्हणणारे 10 टक्के आहेत, ते साहजिक आहे; कारण अनेक वाचकांना पुस्तके थेट आली की, साधनाच्या मजकुरातून हे तेवढे आठवत नसणार.

सोळावा प्रश्नही 'साप्ताहिक आणि प्रकाशन या दोन्हींचे नातेसंबंध' तपासणारा होता. दोन्हींमधील समानत्व व भिन्नत्व शोधण्यासाठीचा होता. 'साप्ताहिक वाचतो म्हणून प्रकाशनाची पुस्तके घेतो' असे म्हणणारे वाचक 66 टक्के आहेत, हे अपेक्षितच आहे. 'साप्ताहिक वाचत नाही तरीही पुस्तके घेतो', असे म्हणणारे केवळ 20 टक्के आहेत. या दोन्ही आकड्यांचा अर्थ जाहिरात व वितरण यासंदर्भात साप्ताहिकावरील प्रकाशनाचे अवलंबित्व खूपच जास्त आहे. याउलट 'पुस्तके वाचतो आणि म्हणून साप्ताहिक घ्यायला लागलो' असा वाचकवर्ग केवळ 13 टक्के आहे, याचाच अर्थ पुस्तके वाचणारा वाचक साप्ताहिकाकडे पुरेशा प्रमाणात वळत नाही, तो वळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

सतरावा प्रश्न होता 'साधना प्रकाशन ऑडिओ बुक्स, ई-बुक्स, व्हिडिओ यांचा वापर किती करते ?' 58 टक्के लोक म्हणतात की, तो वापर पुरेसा नाही. तर 'समाधानकारक' व 'चांगला' म्हणणारे 42 टक्के लोक आहेत. वस्तुतः मागील पाच वर्षांत ई बुक्स व ऑडिओ बुक्स या दोन्हींची निर्मिती साधनाने जेवढी केली तेवढी मराठीत तरी खूपच कमी प्रकाशकांनी केली आहे. तरीही 58 टक्के लोकांपर्यंत साधनाचे ई बुक्स व ऑडिओ बुक्स गेलेले नसतील तर त्याचा एक अर्थ मार्केटिंग करण्यात आम्ही खूपच कमी पडलो आणि दुसरा अर्थ मुळातच त्या माध्यमांपर्यंत मराठी वाचक पुरेसा आलेला नाही, असा होतो.

अठरावा प्रश्न 'साधना प्रकाशनाच्या पुस्तकांचे संपादन, प्रूफिंग, मांडणी व कागद छपाई कशी आहे' हे विचारणारा होता. उत्तरासाठी अधिक पर्याय निवडता येणार होते. संपादनाला 78 टक्के व मांडणी ला 70 टक्के वाचकांनी पसंती दिली हे बरोबरच आहे. परंतु प्रूफिंग 33 टक्के आणि कागद, छपाई 44 टक्के हे आकडे खूपच कमी आहेत. वस्तुतः या दोन्ही आघाड्यांवरही साधनाची पुस्तके अव्वल दर्जाची असतात; तरीही त्याला इतका कमी प्रतिसाद कसा, हे अनाकलनीय आहे. अनेक वाचकांनी त्या दृष्टीने विचार केलेला नसावा, ही एक शक्यता आहे. पण तसे म्हणावे तर 'सांगता येत नाही' हा पर्याय जास्त लोकांनी निवडायला हवा होता, प्रत्यक्षात तो आकडा केवळ 7 टक्के आहे. त्यामुळे हे खूपच अनाकलनीय वाटते, त्यामुळे तसे का झाले असावे याचा शोध घेणार आहोत.

एकोणिसावा प्रश्न होता 'साधना प्रकाशनाची सूची कशी आहे?' 80 टक्के वाचकांनी 'ती उत्तम दर्जाची आहे' असे म्हणणे स्वाभाविक आहे. 'आमच्यापर्यंत आली नाही' हा आकडा केवळ 10.5 टक्के आहे, हे सुखावणारे आहे, ती खूप वाचकांपर्यंत पोहोचली याचा तो पुरावा आहे. परंतु 'साधारण आहे' असे म्हणणारे वाचक 8.5 टक्के आहेत, ते इतके जास्त अपेक्षित नव्हते, कारण मराठीतील सर्वोत्तम प्रकाशन सूचीमध्ये साधना प्रकाशनाच्या सूचीचा समावेश होतो. तरीही साधारण म्हणणारे 8.5 टक्के असतील तर मोठी शक्यता ही आहे की, सूचीचा फॉरमॅट मागील सात-आठ वर्षे सारखाच असल्यामुळे या वाचकांना तसे वाटले असावे. 

विसावा प्रश्न होता 'साधना प्रकाशनाची वेबसाइट कशी आहे?' 72 टक्के वाचकांनी तिला 'चांगली' व 'समाधानकारक' म्हटले आहे, हे अपेक्षित होतेच. 4 टक्के वाचकांनी 'खूप सुधारण्याची गरज आहे' हा आकडाही अनपेक्षित नाही. आणि 23 टक्के लोकांनी 'ती पाहिलीच नाही', हे म्हणणेही साहजिक आहे; कारण ही वेबसाइट अवघ्या तीन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. पुढील काळात वेबसाइट अधिक लोकांना माहीत होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि तिच्यात आणखी सुधारणाही करणार आहोत.

एकविसावा प्रश्न होता 'साधना प्रकाशनाकडून इंग्रजी पुस्तके आणावीत की नाही, याबद्दल वाचकांचा कल काय आहे?' 'सांगता येणार नाही' आणि 'गरज नाही' असे म्हणणारे आकडे खूप कमी असतील हे आम्हाला अपेक्षित होतेच, तसेच ते आहेत. आम्हाला विशेष कुतूहल होते ते, 'निवडक पुस्तके आणावीत' असे म्हणणारे किती आणि 'जरूर आणावीत' असे म्हणणारे किती निघतात? ते आकडे अनुक्रमे 36 टक्के व 46 टक्के असे आहेत. आम्हाला ते उलटे अपेक्षित होते, म्हणजे निवडक व महत्त्वाची पुस्तके आणावीत असा कौल जास्त वाचकांचा येईल आणि जरूर आणावीत असे म्हणणारा आकडा त्या तुलनेने लहान असेल असे वाटत होते. पण एकूण समाजाचा इंग्रजी वाचनाकडे असलेला कल आणि साधनाकडून वाढत असलेल्या अपेक्षा असा अर्थ या वाचक कौलाचा लावता येईल. सध्यातरी आम्ही निवडक व महत्त्वाची पुस्तके इंग्रजीमध्ये आणण्याच्या दिशेने (2026 मध्येच) पावले टाकत आहोत. गोपाळ गणेश आगरकर आणि न्या. रानडे यांची विशेष महत्त्वाची अशी पाच इंग्रजी पुस्तके या वर्षभरात साधनाकडून प्रकाशित करणार आहोत.

बाविसावा प्रश्न होता, 'तुम्ही साधनेव्यतिरिक्त अन्य कुठल्या मराठी प्रकाशनाची पुस्तके वाचता?' साधना प्रकाशनाचे लेखक, विषय व आशय कोणत्या प्रकाशनाच्या जवळ जाणारे आहेत असे वाचकांना वाटते हे समजून घेण्यासाठी हा प्रश्न समाविष्ट केला होता. वस्तुतः त्याबाबतचा अंदाज आम्हाला पूर्णतः होताच, दहा-बारा प्रकाशकांची नावे स्पष्ट दिसत होती. तरीही वाचकांकडून कोणती नावे जास्त प्रमाणात येतात याचे कुतूहल होते. हा प्रश्न ऐच्छिक होता, त्यामुळे 215 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. उर्वरित 375 लोकांच्या उत्तरांमध्ये प्रत्येकी दोन-तीन ते सात आठ प्रकाशकांची नावे आहेत. त्यात अव्वल स्थानी राजहंस प्रकाशन आहे, त्याचा उल्लेख 107 लोकांनी केलाय. त्यापाठोपाठ मनोविकास 80, मेहता प्रकाशन 61 व मौज 55 असे आकडे आहेत. त्यानंतर लोकवाङ्मय, मॅजेस्टिक, समकालीन व रोहन यांचा उल्लेख 30 ते 40 लोकांनी केला आहे. पॉप्युलर, मधुश्री, देशमुख आणि कंपनी, पद्मगंधा यांचा उल्लेख 15 ते 25 दरम्यान लोकांनी केला आहे. या आकडेवारीवरून प्रकाशकांची लोकप्रियता व दर्जा ठरवता येत नाही, साधना प्रकाशनाची पुस्तके व अन्य प्रकाशनाची पुस्तके यांतील साम्य किती प्रमाणात आहे असे या सव्र्व्हेत सहभागी झालेल्या वाचकांना वाटते, हे ठरवण्याइतपतच ही आकडेवारी उपयुक्त आहे.

तेविसावा प्रश्न ऐच्छिक होता, 'तुमच्या आवडीच्या लेखकांची किंवा पुस्तकांची नावे लिहा.' एकूण 590पैकी 240 लोकांनी याचे उत्तर दिलेले नाही. उर्वरित 330 लोकांनी काही लेखकांची व काही पुस्तकांची नावे दिली आहेत. त्यामध्ये 47 लेखकांचा उल्लेख आलाय तर 66 पुस्तकांचा उल्लेख आलाय. ज्यांचा उल्लेख जास्त वेळा आलाय त्यातून तयार झालेल्या दोन प्रतिमा या अंकाच्या मुखपृष्ठावर घेतल्या आहेत. लेखकांमध्ये सुरेश द्वादशीवार यांचे नाव अव्वल स्थानी आहे, त्यांचा उल्लेख 34 लोकांनी केला आहे. त्यापाठोपाठ नरेंद्र दाभोलकर, साने गुरुजी, मिलिंद बोकील यांचा उल्लेख झाला आहे. तर पुस्तकांमध्ये आदर्श, विकास व श्रीकृष्ण यांनी लिहिलेले 'तीन मुलांचे चार दिवस' हे पुस्तक अव्वल स्थानी आहे, त्या पाठोपाठ 'श्यामची आई'चा उल्लेख केला गेलाय.

चोविसावा प्रश्नही ऐच्छिक होता, 'साधना प्रकाशनासाठी सूचना, तक्रारी व अपेक्षा लिहा.' 320 वाचकांनी त्याचे उत्तर लिहिले नाही, उर्वरित 270 लोकांनी एक ते तीन सूचना, तक्रारी, अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तो एकूण आकडा पाचशे तरी असावा, त्यात बरीच विविधता आहे, मात्र त्यात अनपेक्षित असे मुद्दे कमी प्रमाणात आहेत. त्या सर्वांचा मध्यवर्ती मुद्दा एकच आहे : लेखक व विषय यांत विविधता आणा, तरुण व नव्या लेखकांना पुढे आणा, वितरण व्यवस्था अधिक व्यापक व सक्षम करा.

अशा या 24 प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांचे अगदी माफक शब्दांत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न इथे केला आहे. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रश्नावली तयार करण्यात आणि सर्वदूर पोहचवण्यात साधनाचे कार्यालयीन सहकारी आणि काही हितचिंतकांचे सहाय्य लाभले आहे. अक्षय जोशी या तरुण मित्राने ही कार्यवाही घडवून आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सव्र्व्हेमधून योग्य बोध आम्ही घेऊ आणि प्रकाशनाची पुढील वाटचाल अधिक दमदार होईल यासाठी प्रयत्नशील राहू.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे ( 119 लेख )
vinod.shirsath@gmail.com

मागील दोन दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी