एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यांवरच अवलंबून असतो, याचे भान सोडून चालत नाही. सर्व आघाड्यांवर सुव्यवस्थित कार्यवाही व्हावी यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करून, त्याप्रमाणे कार्यवाही होत राहील यावर आम्ही भर देत आहोत. व्यावसायिकता आणि ध्येयवाद परस्पर विरोधी नाहीत, याचे विस्मरण होऊन आता चालणार नाही. विश्वासार्हता व आर्थिक स्थैर्य या दोन आघाड्यांवर काम केले तर समस्या येत नाहीत. गुणवत्ता व विश्वासार्हता टिकवता आली तर आर्थिक घडी व्यवस्थित बसवता येते.
15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचा 78 व्या वर्षातील हा शेवटचा अंक आहे. यानंतर येणारा अंक 79 वा वर्धापन दिन विशेषांक असेल. त्या अंकात लुई फिशर यांनी लिहिलेल्या 'A Week with Gandhi' या डायरीचा अनुवाद असेल. जून 1942 मधील पहिल्या आठवड्यात फिशर सेवाग्राम आश्रमात गांधींच्या सहवासात राहिले होते. 'चले जाव' चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधींच्या मनात काय खळबळ चालू होती, हे त्या डायरीतून सूचित होते आहे. एक सर्वांग सुंदर रोजनिशी आणि तिचा तेवढाच उत्तम अनुवाद असा हा अंक एक बौद्धिक मेजवानी असेल. त्यानंतर लगेच येणारा अंक 'वैज्ञानिक दृष्टीकोन कसा विकसित होतो' या विषयावरील असेल. साधना ट्रस्ट संचलित ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळेतील भाषणांचा तो अंक असेल. याच केंद्राच्या वतीने जून 2026 अखेर 'मुलाखती कशा घ्याव्यात' या विषयावर कार्यशाळा झाली होती, त्या कार्यशाळेमधील सादरीकरणाचे शब्दांकन असलेला अंक सप्टेंबर अखेर येईल. सप्टेंबरच्या सुरुवातीला वि.स. खांडेकर यांचा पन्नासावा स्मृतिदिवस आणि शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची 150 वी जयंती येते आहे, त्या निमित्ताने दोन मिनी विशेषांक येतील. ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबर सुरुवातीला बालकुमार, युवा आणि मुख्य असे तीन दिवाळी अंक येतील. बालकुमार व युवा दिवाळी अंकांची नोंदणी मोहीम 15 ऑगस्टपासून सुरू करीत आहोत. याशिवाय, सप्टेंबर मध्याला शरदचंद्र यांच्या (मामा वरेरकरांनी अनुवादित केलेल्या) 'शेषप्रश्न', 'चरित्रहीन' व 'देवदास' या तीन कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून येतील. आणि सप्टेंबर अखेरीस न्या. एम. सी. छगला यांच्या 'रोझेस इन डिसेंबर' या पुस्तकाच्या अनुवादाची नवी आवृत्ती येईल. एकंदरीत विचार करता, पुढील तीन महिने साधनाच्या दृष्टीने जरा जास्तच धामधुमीचे असतील.
अशा पार्श्वभूमीवर, साधनाच्या आगामी वाटचालीसंदर्भात आपल्या वाचकांना थोडे अवगत करावे असे आम्हाला वाटते. सामान्यतः आगामी पाच वर्षे समोर ठेवून आम्ही साप्ताहिकाचे नियोजन करत आलो आहोत. अर्थातच, आताही पुढील पाच वर्षे आमच्या नजरेसमोर आहेत. मात्र सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, साधना ट्रस्टच्या अंतर्गत विविध विभाग असले तरी साप्ताहिक हा मध्यवर्ती विभाग आहे. अन्य सर्व विभागांना जोडणारा आहे, म्हणजे अन्य विभागांना सर्व प्रकारची रसद पुरवणारा आणि त्यांच्याकडूनही रसद घेणारा! त्यामुळे, साधना साप्ताहिक अधिकाधिक बळकट करणे आवश्यक असते. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, कोणत्याही काळात माध्यमांच्या समोर आव्हाने होतीच! अर्थात, प्रत्येक काळाची आव्हाने वेगळी होती. आताही तसेच आहे. मात्र कोणत्याही काळात आव्हानांपेक्षा संधी जास्त असतात, अशी आमची पक्की धारणा आहे. ती आव्हाने पेलवण्यासाठी आपण सक्षम आहोत का, हा खरा प्रश्न असतो. त्याचा अर्थ, पूर्वतयारी जेवढी जास्त व पायाभरणी जेवढी भक्कम, तेवढ्या प्रमाणात संधी जास्त आणि त्याच प्रमाणात आव्हानांचा सामना करता येणे सोपे असते.
साहजिकच, आजही सर्वच माध्यमांसमोर त्यातही मुद्रित माध्यमांसमोर आव्हाने वेगवेगळी आहेत. विशेषतः त्यांनी स्वतःहून अंगीकारलेले काम अधिक चांगल्या प्रकारे करता येणे आणि ते अधिकाधिक परिणामकारक ठरणे, हे त्या आव्हानांच्या केंद्रस्थानी असते. सध्या जगभर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल ही तीन प्रकारची माध्यमे आहेत. वाचक मिळवण्यासाठी मुद्रित माध्यमांसमोर अन्य दोन माध्यमांनी अडचणी निर्माण केल्या आहेत, असे वरवर पाहता दिसते. पण ती नाण्याची एक बाजू झाली. मुद्रित माध्यमाला विकसित होण्यासाठी अन्य दोन प्रकारच्या माध्यमांचा फायदाही झालेला आहे. तरीही, मुद्रित माध्यमांना आशय व विषय या संदर्भात अडचणीत येत आहेत. त्यामध्येही वृत्तपत्रांच्या समोरील अडचणी वेगळ्या आणि साप्ताहिके, मासिके व अन्य नियतकालिके यांच्यासमोरील अडचणी वेगळ्या आहेत. भारताचा विचार करता, इंग्रजी व हिंदी भाषांमधील मुद्रित माध्यांसमोरील अडचणी वेगळ्या आणि प्रादेशिक भाषांमधील मुद्रित माध्यमांसमोरील अडचणी वेगळ्या आहेत.
साधना साप्ताहिकाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक अंक अधिकाधिक वाचनीय करणे आणि त्यातील विषय अधिकाधिक ताजे असणे हे सर्वांत महत्त्वाचे आव्हान ठरते आहे. गतकाळातील व भूतकाळातील लेखन कमी करत जाण्याची गरज एका बाजूला आहे, तर ठोकळेबाज व अकादमीक स्वरूपाचे लेखन टाळण्याची गरज दुसऱ्या बाजूला आहे. या दोन्ही आघाड्यांवर करावी लागणारी कसरत जरा त्रासदायक आहे. मजकूर चांगला, पण गतकाळातील आशय-विषय हा एक पर्याय; आणि मजकूर ताजा, पण आशय-विषयात नावीन्य नाही असा दुसरा पर्याय, हे दोन पर्याय समोर असतात तेव्हा निवड करताना पेच निर्माण होतो. तारतम्याने निर्णय घेतला जातो. परंतु बहुतांश वेळा पहिला पर्याय निवडला जातो. अशाच प्रकारचा दुसरा एक पेच नेहमीच असतो. महाराष्ट्रात जे काही घडते ते आपल्या वाचकांसमोर वृत्तपत्रांतून, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून आणि सोशल मीडियातून खूप तत्परतेने येत असते; आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही घडते त्यातील ठळक घडामोडी वगळता प्रादेशिक वाचकांना त्यात फारसा रस नसतो; आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध राज्यांत जे काही घडते ते समजून घेण्यात वाचकांना जास्त रस असतो, पण ते लेखन मिळवण्यासाठी अनुकूलता अजिबात नसते. या पेचातून मार्ग काढण्यासाठी आम्ही मुलाखती, भाषणे, शब्दांकन व अनुवाद या चारही प्रकारांचा खूप वापर करीत आलो आहोत. इतका की, हे चार प्रकार वापरले नसते तर गेल्या दशकभरात साधनाचे अंक अगदीच सामान्य दर्जाचे झाले असते.
अर्थातच, वरील दोन्ही प्रकारच्या पेचांतून मार्ग काढतच यापुढची वाटचाल करावी लागणार आहे. मात्र तो मार्ग काढण्यासाठी पूर्वीपेक्षा आताची अनुकूलता जास्त आहे. आतापर्यंत मुलाखती, भाषणे, लेख यांचे शब्दांकन व अनुवाद प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून मराठीत आणत आलोत, क्वचित काही वेळा हिंदीतून. या पुढील काळात त्या दोन्ही भाषांव्यतिरिक्त देशाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या भाषांमधील तसा ऐवज मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करायची गरज आहे. शिवाय, वेगवेगळ्या राज्यांत हिंदी व इंग्रजी बोलू-लिहू शकणारे लोक आता ऑनलाईन सहज उपलब्ध होऊ शकतात, त्यातूनही नवे लेखन मिळवण्यासाठी वाव आहे. या प्रक्रियेत दक्षिणेकडील राज्ये आणि ईशान्य भारत यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हे सर्व करता आले तर नवे विषय, नवे लेखक, आणि अर्थातच नवे वाचकही साधनाशी अधिक जोडले जातील.
साधनाची एक मोठी मर्यादा अशी राहिली आहे की, प्रामुख्याने राजकीय व सामाजिक विषयांवरील लेखन अंकांतून प्रसिद्ध होते, काही प्रमाणात साहित्य व संस्कृती. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण, शेती या विषयांवरील लेखनाचे प्रमाण खूप कमी राहिले आहे. या मर्यादेवर मात करणे हे काम यापुढील काळात प्राधान्यावर असेल. अर्थातच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींच्या संदर्भात वेचक व वेधक प्रसिद्ध करत राहणे आवश्यकच ठरणार आहे. यालाच जोडून आणखी एक मर्यादा अशी आहे की, साधनामध्ये व्यक्तीवरील लेखनाचे प्रमाण जरा जास्तच राहिले आहे. लेखक व वाचकही त्यालाच जास्त अनुकूल असतात म्हणून तसे घडते. परंतु समाज जीवनातील प्रश्न व समस्या यांना हात घालणारे लेखन, नवे विषय अजेंड्यावर आणणारे लेखन, त्यावर उपाययोजना सुचवणारे लेखन आणि चळवळी-आंदोलने करणारांना बळ देणारे लेखन वाढवण्याची गरज आहे. एवढेच नाही तर सद्यःस्थिती काय आहे, हे सांगणारे लेखन कमी करून उद्या परवा साठी दिशादर्शन करणारे लेखन वाढवण्याची गरज आहे. त्यालाच जोडून तिसरी एक मर्यादा पुढे येते. ती म्हणजे साधनातील लेखन माहितीपूर्ण जास्त असते. आपल्याकडे प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरात पार्श्वभूमी बरीच द्यावी लागते, त्यात माहिती जास्त द्यावी लागते. त्यामुळे, वाचकांना आशय-विषय समजून घेणे सोपे जाते. मात्र मुळापासून समजून घेणारे वाचक जेवढे जास्त, तेवढे विश्लेषणात्मक लेखन वाढवता येते. माहिती व भाष्य, माहितीसह भाष्य व प्रामुख्याने भाष्य अशा चढत्या पायऱ्या असतात. आपले बहुतांश लेखन पहिल्या पायरीवरच अडकते आहे. पुढच्या दोन पायऱ्या गाठणे एकूणच समाज विकासासाठी आवश्यक आहे.
अशा पार्श्वभूमीवर, साधनातील लेखनाचा दर्जा वाढवा यासाठी आम्ही विविध आघाड्यांवर प्रयत्नशील आहोत. त्यामधील एक घटक साधना डिजिटल अर्काईवचा सर्जनशील व इनोव्हेटिव्ह पद्धतीने वापर. अर्काईववर पाऊण शतकातील मिळून तीन हजार अंक आहेत, त्यामध्ये लहान-मोठे तीस हजारपेक्षा अधिक लेख आहेत. यातील विविधता चकित करणारी आहे. मराठीत तर नाहीच, पण अन्य भारतीय भाषांमध्येही अशा प्रकारचे अर्काईव क्वचितच असेल. या अर्काईव्हवरील मजकुराचा वापर ग्राफिक्स, चित्रे, ऑडिओ, व्हिडिओ आणि अन्य अनेक प्रकारे करता येईल. त्यातून केवळ गतकाळ येणार नाही, आज-उद्यासाठी उपयुक्त असे काही सादर करता येणार आहे. त्यासाठी अर्काईव महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. दुसऱ्या बाजूला ग.प्र. प्रधान अभ्यास व संशोधन केंद्रामार्फत अभ्यासवृत्ती व कार्यशाळा हे दोन उपक्रम राबवले जात आहेत. तिथून मिळणारा ऐवज साप्ताहिक व प्रकाशन या दोहोंना उपलब्ध होणार आहे. त्या केंद्राकडून आम्ही अधिक अपेक्षा बाळगून आहोत. त्यामुळे अधिक मनुष्यबळ व अर्थबळाची गुंतवणूक करून ते केंद्र वाढवण्याची इच्छा बाळगून आहोत. तिसरा भाग अर्थातच प्रकाशन. साप्ताहिकातील लेखन प्रकाशनामार्फत जतन करता येते व नव्या वाचकांपर्यंत पोहोचवता येते; त्याचप्रमाणे प्रकाशनाकडूनसुद्धा साप्ताहिकाला नवे लेखन, नवे लेखक, नवे विषय उपलब्ध होत असतात. याशिवाय, दरवर्षी साधनाचे लहान-मोठे कार्यक्रम व उपक्रम होत असतात, त्यांचाही या ना त्या प्रकारे उपयोग साप्ताहिकाला होणारच आहे.
मात्र एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यांवरच अवलंबून असतो, याचे भान सोडून चालत नाही. सर्व आघाड्यांवर सुव्यवस्थित कार्यवाही व्हावी यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करून, त्याप्रमाणे कार्यवाही होत राहील यावर आम्ही भर देत आहोत. व्यावसायिकता आणि ध्येयवाद परस्पर विरोधी नाहीत, याचे विस्मरण होऊन आता चालणार नाही. विश्वासार्हता व आर्थिक स्थैर्य या दोन आघाड्यांवर काम केले तर समस्या येत नाहीत. गुणवत्ता व विश्वासार्हता टिकवता आली तर आर्थिक घडी व्यवस्थित बसवता येते. साधनाचे कुठलेही उपक्रम आर्थिक नफा तर सोडाच, काही प्रमाणात तोटा पत्करूनच चालवले जातात, त्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी व नव्या उपक्रमांच्या गुंतवणुकीसाठी अनेक हितचिंतक पुढे येत असतात. त्यासाठी व्यक्तिगत देणग्या व जाहिराती यांचा उपयोग होत असतो, अलीकडे काही हितचिंतक सीएसआर निधीमार्फत मदत करतात. त्यामुळे, काम करताना ताण कमी होतो, उत्साह वाढता राहतो. आणि म्हणूनच, साप्ताहिकाच्या अंतरंगाबरोबरच अंकाची छपाई, मांडणी यांवर लक्ष केंद्रित करत आलो आहोत. गेल्या दशकभरात साधनाचे तीन दिवाळी अंक व दोन-तीन विशेषांक यांची बहुरंगी छपाई करत आलो आहोत. जानेवारी 2027 पासून साधनाचे सर्व अंक बहुरंगी छपाईचे असतील यासाठी नियोजन करीत आहोत. त्याचप्रमाणे, सवलतीच्या दरातील पोस्टाच्या वितरण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांतील अनियमितता पाहून, अलीकडच्या सहा महिन्यांत 'मॅगझिन पोस्ट' या सेवेचा उपयोग करीत आहोत. ती सेवा जरा खर्चीक आहे, पण त्यामुळे अनेक वर्गणीदार वाचकांची गैरसोय थांबली आहे.
सारांश, पुढील पाच वर्षांत साधना साप्ताहिकाने गुणात्मक व संख्यात्मक या दोन्ही बाबतीत बरीच वाढ केलेली असेल, सार्वजनिक जीवनात सकारात्मक हस्तक्षेप करण्याचे प्रमाण वाढलेले असेल. अर्थातच, त्यासाठी साधनाचे वाचक, लेखक व हितचिंतक साथ देत राहतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे, भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि साधनाच्या 79 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या