डिजिटल अर्काईव्ह

16 मे 2022. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एक तरुणी प्रवेश करते. उंच, सडपातळ, नाकेली, गोरटेली. ती जिल्हाधिकाऱ्यांना म्हणते, 'मी कालपर्यंत प्रवीण होते. मी पुरुष शिक्षक होते, आता मला स्त्रीवेशात राहायचं आहे. स्त्रीसारखं राहायचं आहे'. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी नजर बारीक करून बघितलं. त्या अवाक झाल्या. त्यांच्या ध्यानात आलं, आपल्यासमोर जी व्यक्ती उभी आहे, तिचा आवाज धड पुरुषांसारखा नाही की स्त्रियांसारखा नाही. समोरची व्यक्ती स्त्रियांसारखा आवाज काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतेय. दिसणं स्त्रीसारखं वाटत असलं तरी स्त्रीसारखं दिसण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या ध्यानात आलं, कालपर्यंत पुरुष शिक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रवीणला स्वतःची ओळख बदलायची आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता हवी आहे. ही व्यक्ती म्हणजे आजची रिया आळवेकर. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती ओळखली. इतर अभ्यागतांना बाहेर जायला सांगितलं. रिया आळवेकरांना आपल्या जवळ बसवून घेतलं. खास वेळ देऊन सगळी कहाणी ऐकून घेतली. आणि धीर दिला, "काही काळजी करू नकोस. पण ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी तू स्टेबल आहेस ना ? तू तुझ्या निर्णयाशी ठाम आहेस ना ?"

"हो. मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे." रिया आळवेकर म्हणाल्या. जिल्हाधिकारी म्हणाल्या, "मग आता तू पाय मागे घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे." जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी रियाचं काम हातात घेतलं. हाताखालच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हा स्तरावरची समिती, कायदेशीर प्रक्रिया सगळ्यांचा अभ्यास करून प्रवीणला रिया आळवेकर म्हणून मान्यता देण्यापर्यंत प्रवास चालू झाला.

प्रवीण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. प्रवीणची रिया आळवेकर झाली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. प्रवीणची रिया झाली असली तरी खरा प्रश्न यानंतरचा होता. कालपर्यंतचा प्रवीण शाळेत साडी नेसून गेला तर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया असतील आणि सर्व जण त्यांना कसं स्वीकारतील ? त्यांनी स्वीकारलं नाही आणि उलटसुलट प्रतिक्रिया आल्या, वादविवादाचे प्रसंग आले तर परिस्थिती हाताळणं अवघड झालं असतं. प्रवीणचा रिया होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आणि जीवघेणा होता. त्यांना पुन्हा संघर्ष करायला लावणं म्हणजे खाईत लोटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असती.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या म्हणाल्या, "ही केस पूर्ण गोपनीय ठेवा. नोकरीच्या कागदपत्रांत योग्य ते बदल करा. तीन महिने जिल्हा परिषद कार्यालयामध्येच मॅडमना ठेवा. मॅडमना साडीमध्ये हजर होऊ द्या." एका स्त्री अधिकाऱ्यांनी दुसऱ्या स्त्रीला दिलेला हा सन्मान होता. कदाचित, जिल्हाधिकारी स्त्री असल्यामुळेच रिया यांचा खडतर प्रवास सुखकर झाला असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनीही मनाचा मोठेपणा दाखवला. ते म्हणाले, "इतर कोणत्या पदावर काम करण्यापेक्षा माझ्याच कार्यालयात पीए म्हणून बसा." रिया आळवेकर या संगणक हाताळण्यामध्ये प्रवीण होत्या. ही गोष्ट महत्त्वाची ठरली. स्वागत कक्षामध्येच रियांना बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली. रिया संगणकासह खुर्चीवर अभिमानाने विराजमान झाल्या. त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच रियांना स्वीकारलं असल्यामुळं पुढे काही अडचण निर्माण होण्याचा प्रश्न आला नाही.

जिल्हा परिषदेमध्ये काम करताना रियांना कोणतीच अडचण आली नव्हती. परंतु त्यांचा जीव होता मुलांना शिकवण्यामध्ये. मुलांच्यात रमण्यामध्ये. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून जवळ शिक्षकांची रिक्त पदं असणाऱ्या शाळा होत्या. रियाला हवी ती शाळा देण्याची तयारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी दाखवली होती. सोय आणि सुरक्षितता याचा विचार करून ओरोस बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये रियाला रीतसर नियुक्ती देण्यात आली. पुरुषाच्या शरीरातून स्त्रीच्या शरीरात रूपांतरित झालेल्या रिया 22 ऑगस्ट 2022 रोजी साडी नेसून ओरोस बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ताठ मानेनं आणि आत्मविश्वासाने हजर झाल्या. या शाळेत त्यांनी 22 ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2025 त्या कालावधीमध्ये नेकीनं, सचोटीनं आणि झोकून देऊन काम केलं. शाळेचा नावलौकिक वाढवला. तिथं काम करताना त्यांना कधीच कोणतीही अडचण आली नाही. शाळेतील स्त्री-पुरुष शिक्षकांनी त्यांना सहज स्वीकारलं. ओरोस बुद्रुक या शाळेतून रिया यांची बदली आता पनदूर शाळेत झालीय.

जानेवारी 2023 मध्ये मी ओरोसच्या शाळेला भेट दिली होती. दुपारपर्यंत शाळेतल्या उपक्रम आणि योजनांची माहिती घेतली. शाळेतलं शैक्षणिक कामकाज बघितलं. दुपारी मुलांच्या सोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला. मुलांनी नृत्य आणि नाट्याच्या स्वरूपामध्ये छान सादरीकरण केलं. अर्थात, ही रिया यांचीच निर्मिती होती. रियांचंही काम बघितलं. शिकवण्याची पद्धत बघितली. त्यांच्याशी मला हवा तसा संवाद करता आला नाही.

त्यानंतर मी रिया यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो; पण त्यालाही फारसं यश येत नव्हतं. दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला. मी सप्टेंबर 2025 मध्ये पुन्हा संपर्क साधला. माझ्या प्रयत्नांना यश आलं. भेट ठरली.

30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी ओरोसच्या शाळेला भेट दिली. माझ्यासोबत सांगलीचे संवेदनशील डॉक्टर दिलीप शिंदे होते. डॉ. शिंदे हे अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसाठी सेवाश्रम चालवतात.

आम्हाला रिया यांची शाळेतल्या वावरण्यात वागण्यात, बोलण्यात सहजता जाणवत होती. त्यांच्याकडे बघून कोणी म्हटलं नसतं की, ही स्त्री नसून ट्रान्सवुमन आहे. हे रियांना कसं जमलं असेल? एवढी सहज गोष्ट आहे का ती? पुरुषाच्या शरीरात स्त्री असणं आणि पूर्ण शरीर बदलून स्त्रीसारखं राहणं आणि तेही आसपासच्या सर्वांनाच माहीत आहे की, ही ट्रान्सवुमन आहे. हे कसं काय जमलं असेल त्यांना? प्रवीण ते रिया हा प्रवास कसा झाला? प्रवीणची रिया होण्यासाठी कोणाची मदत मिळाली, कोणी हात दिला? या स्थितीपर्यंत कशा पोहोचल्या असतील रिया ? या सर्वांची मला उत्सुकता होती. त्यांचा प्रवास संघर्षाचा, कष्टाचा, जिद्दीचा होता. वाट आडवळणाची होती. काटेकुटे, दगडधोंडे, टक्केटोणपे सगळं पचवून त्या आता स्वतःचं समाधानाचं आयुष्य जगत आहेत. त्यांनी मुख्य टप्पा पार केलाय. सर्व विष पचवून स्वतःला सिद्ध केलंय. या गोष्टीचा अभिमान त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. त्यांनी भरभरून सांगितलं सगळं.

"मला कोणी सांगितलं नाही. शिकवलं नाही. माझा मार्ग मीच शोधला. शालेय जीवनात घुसमट चालू होती, बायकांच्यात राहायचे, बायकांच्यात कामं करायचे. थोडं मोठी झाल्यावर कळत गेलं. आपण मुलींसोबत बसतोय. इतरांपेक्षा वेगळा विचार करतोय. आपण असं नाही करायला पाहिजे. किती ठरवलं तरी जमायचं नाही. मी तात्पुरती मुलांबरोबर बसायचे आणि पुन्हा मुलींच्यात जाऊन मिसळायचे. कुठेतरी एक आकर्षण असतं. ते व्हायला लागलं. आपल्याबरोबरची मुलं काय विचार करतात हे कळतं. पण मला कशातच इंटरेस्ट नव्हता. नंतर कळालं की, आपण वेगळेच आहोत. आठवीपर्यंत एवढं काही वाटलं नाही. नववी, दहावीत हे वाढलं. मी नेमकं काय करू? कुठे उभे राहू? हा संघर्ष सुरू होता. अभ्यास सुरू होता. सगळं सांभाळून जगणं पुढे चालू होतं. डिप्रेशनमध्ये गेले. विषाच्या बाटलीपर्यंत गेले. जगणं नकोसं वाटू लागलं. आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण एकच, चुकीच्या शरीरात जन्म. मला मनासारखं जगता येत नाही. खूप निराशा आलेली. कुटुंबाचं सुख नाही. आपले लोक आपल्यापासून लांब आहेत. आपण वेगळे आहोत. पण अभ्यास करायचे. स्वतःला सांभाळत पुढे गेले. दहावी, बारावीनंतर आपण ठरवतो की, मला काय बनायचं आहे. मी ठरवलं होतं, होईन तर शिक्षकच.

डी.एड. झाल्यानंतर माझी अवस्था बघून माझ्या घरच्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं. खूपच घुसमट व्हायला लागली. आपलं कोणी नाही असं वाटायचं. मी माणसांपासून लांब लांब राहायचे. मानसोपचार तज्ज्ञ काय करणार? त्यांनी गोळ्या दिल्या. मी त्यांना सांगितलं, "मला माझ्या पद्धतीने राहू दे. या गोळ्यांनी काय होणार आहे?" तुम्ही गोळ्यांनी फक्त धुंदीत राहू शकता. बधिर केलं जातं. तात्पुरतं विचार थांबवू शकता. मन नाही बदलू शकत.

"मी 2012 या वर्षी नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला. माझी कुणाची ओळख नव्हती. मी माझ्या समाजात गेले नव्हते. मी फक्त एक मुलगा म्हणून जगत होते. एक काळ असा होता की, घुसमट व्हायची. शाळेत लक्ष लागायचं नाही. पहिल्या शाळेत मी पुरुष शिक्षक होते; परंतु माझं चालणं, बोलणं, वागणं स्त्रीसारखं होतं. माझं असं असण्यावरून गावातल्या कोणी कधी मला हिणवलं नाही. टोमणे मारले नाहीत की, कोणाकडून कधी कसला त्रास झाला नाही. याचं कारण माझं काम चांगलं होतं. मुलांच्यामध्ये मिसळण्यात, त्यांना शिकवण्यात आनंद मानायचे मी. तरीही खूप अवघडल्यासारखं व्हायचं. खूप रडायचे मी. मग मीच मला प्रश्न विचारायचे. उत्तरही मीच द्यायचे, 'मी रडून होणार काहीच नाही. मग मी काय करू ? नेमकं कसं करू ?' माझा जन्म चुकीच्या शरीरात आहे. या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. नंतर नंतर कळायला लागलं. हा त्रास मी स्वतःच स्वतःला करत आहे. चांगले मार्क्स पाडले म्हणून मी नोकरीला लागले. चांगलं काम करायचं. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून.

"सन 2015 पासून मी हार्मोन्स ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना म्हणाले, "मला हार्मोन्स ट्रीटमेंट सुरू करा". डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यांनी मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचं प्रमाणपत्र आणायला सांगितलं. मी प्रमाणपत्र मिळवलं. उपचार सुरू झाले. मला या समाजात राहायचं आहे, तर मला माझा गुरू केला पाहिजे. 2017 मध्ये मी गुरू केला. कोल्हापूरच्या मयूरी आळवेकर या माझ्या गुरू. मी एकटी किती दिवस थांबू ? ट्रान्सजेंडर लोक एकटे थांबत नाहीत. गुरुपरंपरा आहे. तिकडे जावंच लागतं. घरात स्वीकारत नाहीत. ते प्रश्न विचारत राहणार. आपल्याला आणखी मानसिक त्रास होणार. आपल्याला हवं तसं जगता नाही येणार. मला गुरुघरी हवं तसं राहता येत होतं. साडी नेसता येत होती. माझ्या डोक्याला लांब केस नव्हते, त्या वेळी मला नकली केस लावता येत होते. मला कसंही फिरता येत होतं. गुरू केल्यानंतर आपलं कोणीतरी आहे असं वाटलं. माझ्या गुरू खूप चांगल्या आहेत. त्या आधार देतात. पाठीशी उभ्या राहतात. त्यांच्यामुळेच हे चांगले दिवस बघते मी. नोकरी सुरूच होती. 2019 या वर्षी सर्जरी केली. दोन महिन्यांमध्ये प्रकृती ठीक झाली. तशीच शाळेत हजर झाले. पुरुषांचेच कपडे घालत होते. टॉयलेटला जाताना अडचण यायची. वाटलं, आता पुरुषांच्या वेशामध्ये नाही राहिलं पाहिजे. आता स्त्रीच्या वेशात राहिलं पाहिजे. हे कसं शक्य होईल, याचा विचार केला. अभ्यास केला, शासन निर्णय बघितले, परिपत्रकं चाळली. सरकारी नोकरीत असल्यानंतर असं लिंगबदल करून कोणी नोकरीत आहे का? भारतात अशी कोणती केस झालीय का? बीड जिल्ह्यामध्ये अशी केस झाली होती. पोलीस मुलगी होती. ललिता. तिला मुलगा व्हायचं होतं. ललिताला ललित व्हायचं होतं. तिनं शस्त्रक्रियेच्या परवानगीसाठी अर्ज केला. तिच्या वरिष्ठांनी अर्ज नाकारला होता. पोलीस भरती होताना महिला आणि पुरुषांचे शारीरिक पात्रतेचे निकष वेगळे असतात. त्यामुळे असं घडलं होतं. ती महिला पोलीस म्हणून भरती झाली होती. तिला कोर्टात जावं लागलं होतं. शिक्षक होताना अशी शारीरिक पात्रता बघितली जात नाही. मला मुलांच्यासमोर, समाजासमोर, गावासमोर जायचं होतं. त्यांच्यासमोर जाताना स्त्रीवेशात जाताना किमान पन्नास टक्के चांगलं दिसणं महत्त्वाचं होतं. मी पहिल्यांदा केस वाढवायला सुरुवात केली. नंतर हार्मोन्स ट्रीटमेंट सुरू केली. एके दिवशी मी साडी नेसून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. 'कालपर्यंत मी पुरुषांच्या वेशात राहत होते. आज तुमच्यासमोर मी अशी आहे. मला असं राहायचं आहे.' सगळी प्रमाणपत्र मी त्यांच्यासमोर ठेवली. 'परिणाम काहीही होऊ शकत होता. माझी नोकरी जाऊ शकत होती. मग काय झालं असतं? याचा खूप ताण होता. मी बघते समाज कसा आहे."

नंतर रियांनी हार्मोन्स रिप्लेसमेंट सर्जरीविषयी सांगितलं, क्रोजीनवा आणि स्टेस्टो चेक केले तर कळतं, तुम्ही किती टक्के पुरुष आणि किती टक्के स्त्री आहात. स्त्रीसारखं बनविण्यासाठी, नाजूकपणा येण्यासाठी, स्त्रियांसारखा आवाज येण्यासाठी, केस वाढण्यासाठी हार्मोन्स दिले जातात. जेंडर चेंज करण्याची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी असं बरंच.

रियाचं पुढचं बोलणं ऐकलं आणि माझी बोलतीच बंद झाली. रिया म्हणाली, "सर्वसाधारण माणसांचा एकदाच जन्म होतो. आमचा तीन वेळा जन्म होतो. पहिला जन्म होतो तो आईच्या उदरातून. दुसरा जन्म होतो ते आपण काय आहोत हे कुटुंबाला सांगताना. खूप संघर्ष असतो तो. आणि तिसरा जन्म होतो आमच्या नसा कापल्या जातात तेव्हा. त्या व्यक्तीला माहीत असतं दुःख काय असतं ते. आमच्या नसाच कापून टाकल्या जातात. आपल्या शरीरातला एक भाग कापून काढला जातो आणि एक भाग जोडला जातो. काही गोष्टी बाहेरून आत घालाव्या लागतात. या गोष्टी भयानक असतात. अशा स्थितीत मन खूप शांत ठेवावं लागतं."

अंगावर सरसरून काटा आला. आपण कल्पनाच करू शकत नाही. आपण कल्पना करून पाहू या की, आपलंच लिंग कापून टाकायचं आहे. स्त्रीचे स्तन कापायचे आहेत. स्त्रीची योनी कापायची आहे. किंवा आपण पुरुष असलो तर आपलं लिंग आणि वृषण छाटून टाकायचं आहे. काय वाटेल? हे खूप भयानक आहे. ही फक्त शारीरिक लढाई नाही. मन, बुद्धी, भावना काय काय उलथापालती होत असतील ! या लढाईची आपण कल्पनाच करू शकत नाही. किन्नरांच्या भावनेपर्यंत त्यांच्या दुःखापर्यंत, वेदनेच्या तळापर्यंत पोहोचू शकत नाही. चुकीच्या शरीरात असलेल्या भिन्न लिंगी व्यक्तींच्या भावभावना आणि वेदना समजून घेणे खूपच कठीण गोष्ट आहे. पुरुषाला एक वेळ स्त्रीच्या मनाचा थांग लागेल. पुरुषांच्या मनाच्या तळाशी स्त्री पोहोचू शकेल; परंतु किन्नराच्या दुःखाच्या जवळ पोहोचण्यासाठी किन्नरच व्हावं लागेल. 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे' हे तंतोतंत लागू पडतं इथं.

रिया सांगत होत्या, "आमच्या समाजात आत्महत्या केल्याची कितीतरी उदाहरण आहेत. एकमेव कारण हा जन्म. आणि समाजाकडून मिळणारी वागणूक. मी माझी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेणेही अवघड आणि तो प्रत्यक्षात आणणंही अवघड. हार्मोन्स तुमची बॉडी चेंज करतात. डॉक्टरांनी सांगितलेलं, डोळ्यांतून पाणी काढायचं नाही. हार्मोन्स क्रिएट होतील आणि तुमच्यावर परिणाम होईल. म्हणजे विचारावर, भावनांवर नियंत्रण ठेवायचं. ही खूप अवघड गोष्ट असते. जास्त विचार करायचा नाही. जास्तीत जास्त आनंदी राहायचं. खाण्यावर लक्ष द्यायचं. व्यायाम करायचा. जिथं चांगलं वाटतंय, ते करायचं. तिथं लक्ष घालायचं. उपचार चालू असताना खूप जपावं लागतं. चिडचिड होणं, हाडं ठिसूळ होणे. खूप बदलांना सामोरं जावं लागतं."

काही गोष्टी बाहेरून शरीरात घालाव्या लागत असतील तर शरीर ते कसं स्वीकारत असेल ? आपल्या पायात मोडलेला काटासुद्धा आपलं शरीर स्वीकारत नाही. आपलं स्वास्थ्य हरवतं. दातात अडकलेला अन्नाचा कण आपली झोप उडवतो. ही तर पूर्ण लिंगबदलाची शस्त्रक्रिया आहे. शिवाय, हार्मोन्समध्ये होणारे बदल. आणि डॉक्टर सांगतात की, डोळ्यांतून पाणी काढायचं नाही. एवढं सोसून, भोगूनही डोळ्यांतून पाणी काढायचं नाही. हे कसं शक्य आहे ! कसं मिळवायचं भावनांवर नियंत्रण! किशोरवयात हार्मोन्समध्ये बदल होतात. भावना टोकदार होतात. वादळी व्यक्तिमत्त्वाचा काळ असतो तो. किती गोंधळ उडालेला असतो. क्षणात आनंदी, तर क्षणात दुःखी. क्षणात उत्तेजित तर क्षणात शांत, क्षणात राग, चिडचिड. इथंही हार्मोन्स बदलाची प्रक्रिया आहे. कदाचित रिया आळवेकरांना सगळं शब्दातून सांगता आलं नसेल. आपण या संघर्षाची कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी आणखी एक सांगितलं, "हे स्वीकारलं नसतं, तर किती शक्यता होत्या? घरच्यांनी लग्न केलं असतं, समाजानं टोचलं असतं, कुणी गैरफायदा घेतला असता, कुणाशी प्रेम जुळलं असतं, आणखी काय काय !"

"खूप घुसमट व्हायची. मी पहिल्या शाळेत जायचे त्या वेळी माझं लक्षच लागायचं नाही. खूप रडायचे मी. नेमकं मी काय करू? माझा जन्म चुकीचा आहे. खूप त्रास व्हायचा. मग विचार केला, मी चांगले मार्क पाडले, नोकरीला लागले. याच्यातूनही मार्ग निघेल. काहीतरी होईल चांगलं. पूर्वीच्या शाळेतही चालणं, बोलणं असंच होतं. स्त्रियांसारखं. पण शिकवणं चांगलं होतं. मुलांच्यात मिसळण्यामध्ये, त्यांना शिकवण्यामध्ये आनंद मानायचे मी. त्यामुळे बदली झाल्यानंतर पालक मला सोडत नव्हते."

मला आश्चर्य या गोष्टीचा वाटलं की, आजचा धडधाकट शिक्षक अशैक्षणिक कामानं, ऑनलाइन कामानं, रोज रोज माहितीच्या लिंक भरून घायाळ झाला आहे. तन, मन, धन झोकून देऊन काम करणारे शिक्षकही आज या माहिती भरभरून हवालदिल झालेले दिसतात. या कामामुळे विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देता येत नाही. त्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळे ते दुःखी कष्टी होताना मी सतत पाहतोय. आणि हे अगदी वास्तव आहे. ज्यांना काम करायचं नाही असे आपापले जोडधंदे सुरू करून सुखासीन आयुष्य जगत आहेत. अशा या वातावरणात रिया इतक्या चित्रविचित्र आणि विसंगतीनं भरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःचा तोल सांभाळत उत्तम दर्जाचं काम कसं करत असतील, हा माझ्यापुढचा प्रश्न होता. त्याविषयी मी त्यांना विचारलं. रियांनी जे उत्तर दिलं, ते अगदी साधं होतं; परंतु आचरणात आणण्यासाठी खूपच कठीण होतं. रिया म्हणाल्या,

"मी एक वाक्य आचरणात आणलंय, जेव्हा मी गेटच्या आत येते तेव्हा मी बाकी काही डोक्यात आणत नाही. मी ट्रान्स आहे, माझं आयुष्य असं आहे, माझं कुटुंब आहे, मी हे सगळं बाजूला ठेवते. मी माझ्या कामाशी एकरूप होते. गेटच्या बाहेर गेले की, मी शाळा माझी कधीच म्हणत नाही."

आपण आपली बाहेरची दुःखं घरी घेऊन जातो. दुःखांना बाहेर ठेवणं सहज साध्य होत नाही. घरातल्या कटकटी कामाच्या ठिकाणी डोक्यात असतातच. मग व्हायचा तो परिणाम होतो. असं झालं की कुठलंच काम धड होत नाही. कसलंच समाधान मिळत नाही. रियांनी जगण्या-वागण्यात सहजता आणली होती.

रियांची आयडॉल टीचर म्हणून जिल्ह्यात पहिल्या पाचमध्ये निवड झालीय. वर्गाची तयारी आणि मुलाखतीमधून दिसणारं शिक्षक म्हणूनचं व्यक्तिमत्त्व, इतर शिक्षकांपेक्षा कामाचं वेगळेपण इत्यादी निकषांवर ही निवड केली गेलीय. सर्वसाधारण शिक्षकांचा विचार करता त्यांच्यापेक्षा रियांचं काम काकणभर सरस आहे, असं म्हणावं लागेल. स्वप्रेरणेने काम करणाऱ्यांमध्ये रियांचा समावेश होतो. रियांचा जगण्याचा संघर्ष होता. स्वतःची ओळख काय आहे हे शोधण्याचा, स्वतःची ओळख इतरांना पटवून देण्याचा.

बाजार मागणं, सिग्नलवर उभं राहून दुकान मागणं अशी ज्या समाजाची ओळख आहे, त्या समाजाच्या आपण आहोत असं रिया म्हणतात. रियांना वाटतं, 'माझ्या समाजातील लोकही माणसंच आहेत. सर्वसामान्य माणसं जे जे करू शकतात ते ते माझ्या समाजातील माणसंही करू शकतात. त्यांना या समाजाचा अभिमान आहे. त्या भावनेतूनच पुढचा जन्म हाच मिळाला तरी चालेल असं त्यांना वाटतं.

माझा रिया सांगत होत्या, "सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समूहनृत्य स्पर्धा होतात. केंद्र, बीट, तालुका, जिल्हास्तरावर या स्पर्धा होतात. नोकरीला लागल्यापासून माझं स्वप्न होतं. ही ट्रॉफी माझ्या विद्यार्थ्यांनी जिंकली पाहिजे. नृत्याला कोरिओग्राफ असेल. मी तेव्हापासून प्रयत्न करत होते. ही ट्रॉफी आम्हाला कधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षी केंद्रात स्पर्धा झाल्या. त्या वेळी मी मॅडमना सांगितलं होतं, 'या वेळी ट्रॉफी आपली !' केंद्र, बीट, तालुका स्तरावरती आमच्या शाळेचा नंबर आला. जिल्ह्याच्या स्पर्धेच्या वेळीही मी मॅडमना म्हणाले होते, 'या वर्षी ट्रॉफी आपली.' आमच्या नृत्याला जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळाला." त्यांच्या बोलण्यातून याचा आनंद ओसंडून वाहत होता.

मी विचारलं, 'बऱ्याच यशस्वी ट्रान्सजेंडरचा ओढा कलेकडे आहे असं दिसतं. बरेच ट्रान्सजेंडर फिल्म इंडस्ट्रीत आहेत, ब्युटी पार्लर चालवतात, मेकअप करण्याचं काम करतात, नृत्य करतात. कलेच्या क्षेत्रात प्रमाण जास्त दिसतं, असं का ?"

"आम्हाला वरदान आहे ते. साजशृंगाराचं वरदान ! गाणी, लावणी, नृत्य यांची आवड असते. ट्रान्सजेंडरना जेवण चांगलं बनवता येतं. स्त्री म्हणून मनस्वी जगायला आवडतं." रिया म्हणाल्या.

आमच्या गप्पा सुरू होण्यापूर्वी सरस्वती विसर्जनाची तयारी सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवरात्रीच्या काळात सरस्वती पूजन आणि शारदोत्सव साजरा केला जातो. पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेतील शिक्षक यांचं सरस्वतीसमोर नृत्य आणि गाणी सुरू होती. त्यामध्ये रियांनी सहभाग घेतला होता. ते मला आठवलं. मी विचारलं, "तुम्ही ट्रान्स वुमन शिक्षक, सावित्रीबाई फुले आणि सरस्वती पूजन यांच्याकडे कसं बघता किंवा हे सगळं कसं जोडून घेता?"

रिया म्हणाल्या, "बघा, मी बायकांच्या मिसळले नसते आणि बाजूला बसले असते, तर मी स्वतःहूनच जाणीव करून दिली असती, की मी वेगळी आहे. इतके दिवस मी रडत होते, कशासाठी? मला हे करायला जमत नव्हतं. बायकांच्यात जायला मिळत नव्हतं. फुगडी खेळता येत नव्हती. आता ही संधी आहे. आनंद लुटते मी. मला शिक्षकांच्याकडून, पालकांकडून, सगळ्यां-कडून पाठिंबा मिळतो. आपण गेलो आणि लोकांनी बाजूला काढलं असं नाही होत. मी त्यांच्यात गेले नाही, तरी मला ओढून नेतात. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, पालक एकत्र नृत्य करतात. आम्ही भांडतोय, आम्हाला समानता पाहिजे. स्त्री-पुरुष ट्रांसजेंडर ही समानता कशी साधणार? माणसासारखं वागणे, माणूस म्हणून वागवणे, मानवता हीच समानता. शाळेत मला 'तृतीयपंथी' हा शब्दच वापरू दिला जात नाही. सगळे स्त्री म्हणूनच मला वागवतात. मुलंही लळा लावतात. सगळ्या मुलांना माहीत आहे, मी कोण आहे ते. पण ते जाणवू देत नाहीत. मला हाताला धरून ओढत नेतात. स्त्रीशिक्षक म्हणूनच मुलं माझ्याकडे बघतात. 'माझ्या रिया मॅडम' असा उल्लेख मुलं आवर्जून करतात. त्यांच्या नजरेत कधीच वेगळेपणा जाणवला नाही. घरातल्या व्यक्तीप्रमाणे जवळ येतात, बसतात, फोटो काढतात. घरी येतात. 'मॅडम, तुम्ही आमच्या घरातल्या आहात', अशा पद्धतीने मला सर्वांकडून वागणूक दिली जाते. इथं माणूस महत्त्वाचा नाही. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही. तर तुमचं काम महत्त्वाचं आहे."

सर्वसाधारणपणे रस्त्यावर, बाजारात कोणी पारलिंगी व्यक्ती दिसली तर मुलं, माणसं एक तर त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघतात, हसतात किंवा काही वेळा आक्रमकपणा बघून घाबरतात. या शाळेत मात्र वेगळं घडतंय. लहान वयातच या मुलांना कळतंय, 'अशीही माणसं असतात. आपल्यासारखीच हाडामांसाची.' 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' हे इथली मुलं कृतीतून शिकत आहेत.

रियांनी शाळेत स्वतःचं स्थान निर्माण केलंय. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागतात. वेगळ्या प्रांतातल्या, वेगळ्या जाती-धर्मातल्या माणसांनाही माणसं सहजासहजी जवळ धरत नाहीत. मात्र, शाळेतील शिक्षकांनी वेगळ्या समूहातील व्यक्तीला स्त्री म्हणून मनापासून स्वीकारलंय. काही ठिकाणी शाळेत शिक्षकांच्यात गटतट असतात. शाळेची प्रगती न होण्यामागे त्यांच्यातील वाद हे कारण काही वेळा महत्त्वाचं ठरतं. वादासाठी फार मोठं कारण लागतं असंही नाही. इथ मात्र हसतखेळतं वातावरण दिसलं मला. या शिक्षकांचंही करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, अधिकारी वर्ग हे सर्वच रियांच्या सोबत राहिले. ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकही रिया यांच्या कामाविषयी भरभरून बोलल्या. 'शाळेच्या कार्यालयीन कामांमध्ये व ऑनलाइन कामांमध्ये रिया त्यांना मदत करतात. सूत्रसंचालन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी याचा बराचसा भाग रिया यांच्याकडेच असतो. पहिलीच्या वर्गाची उत्तम तयारी करण्यातही त्यांचा हातखंडा आहे.'

माझ्या निरीक्षणानुसार, शाळांमध्ये पहिलीचा वर्ग शक्यतो महिला शिक्षकच सांभाळतात. मूल शाळेत रमायचं असेल, त्याची शाळेशी नाळ जुळायची असेल, मूल शाळेत टिकवायचं असेल तर त्यासाठी महिला शिक्षकच चांगली भूमिका पार पडतात. तुमच्या माझ्या मनात रिया आळवेकर या ट्रान्सजेंडर आहेत असं ठसलेलं असलं, तरी प्रत्यक्षात शाळेत इतर स्त्री शिक्षक असूनसुद्धा पहिलीचा वर्ग रिया घेतात.

अजूनही आपल्या आसपास असे प्रविण असू शकतात. त्यांना रिया व्हायचं आहे, परंतु घरच्यांना, समाजाला तोंड देण्याचं धाडस त्यांना होत नाही. त्यांची घुसमट होत होत असेल. गुदमरत जगणं सुरू असेल. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' हे किन्नरांच्या बाबतीत हजार टक्के बरोबर आहे. रात्रंदिन नव्हे तर जगण्याचा प्रत्येक क्षण युद्ध घेऊनच येतो. रिया यांच्या आयुष्यात अनेक भरकटण्याचे क्षण आले असतील. कड्याच्या टोकावर उभं राहून तोल सांभाळावा लागला असेल. तोल सांभाळता आला नसता तर रिया सिग्नलवर टाळी वाजवताना दिसल्या असत्या. वादळात टिकून राहण्याचं कारण म्हणजे शिक्षण.

रियांना आपल्या वेगळेपणाची जाणीव आहे. त्याची बोचणीही आहे. कधी कधी हे नसावं वाटतं. या ऐवजी सर्वसामान्य माणसासारखा जन्म मिळाला असता तर चांगलं झालं असतं असंही वाटतं. परंतु आहे हे आयुष्य स्वीकारल्यामुळे आज जी काम करण्याची संधी आहे किंवा आयडॉल टीचर म्हणून पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळाला यांचंही त्यांना समाधान आहे. रिया गुरूंच्याकडे गेल्यानंतर किन्नर समाजासाठी जेवढी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु शाळेच्या वेळेत इतर कामाला त्या जराही स्थान देत नाहीत. खूप लोक बोलतात, सत्कार करायचा म्हणतात, पण शाळेच्या वेळेत बाहेर कुठेही जायचं नाही. समाजाच्या कामासाठीही जायचं नाही, हे त्यांनी मनाशी पक्के ठरवलंय. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असं जर शाळेबाहेर जाऊ लागले तर लोक नावं ठेवतील. पालक म्हणतात, 'हा तुमचा गुण आम्हाला आवडला.' रविवारी मात्र रिया समाजाच्या कामासाठी इतर कार्यक्रमासाठी वेळ देतात.

सर्वसामान्य माणसासारखं स्त्री किंवा पुरुष असं आयुष्य मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण स्त्री आणि पुरुषांपेक्षा वेगळे दिसणारे किन्नर समाजामध्ये दिसतात. आयुष्य नको वाटण्याची वेळ त्या प्रत्येकावर येत असेल. कारण समाजानं अजून त्यांना स्वीकारलेलं नाही. आज काही ठिकाणी पुरुषांनी ट्रान्स उमनशी लग्न केल्याची उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित आणखी काही वर्षानंतर समाज हे सहज स्वीकारेल. सतीची चाल बंद झाली. विधवांचे विवाह होऊ लागले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती स्त्रिया होऊ शकल्या. दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी हे कोणाला सांगितलं असतं तर पटलं नसतं, परंतु आज ते सत्यात उतरलं आहे. स्त्री आणि पुरुषांप्रमाणेच इतर समुदायातील लोकही माणसंच आहेत. आणि हे नैसर्गिक आहे, हे स्वीकारायला हवं. कधीतरी असा काळ येईल, त्या वेळी स्त्री आणि पुरुष इतर समुदायांतील व्यक्तींची कुचेष्टा करणार नाहीत, टिंगल-टवाळी करणार नाहीत. त्यांच्याकडे सहजतेने बघतील. त्यांना सहजतेने स्वीकारतील. त्या वेळी या समूहातील लोकांचं आयुष्य सर्वसामान्य माणसांसारखं होईल. आयुष्याचा तिटकारा येऊन मृत्यूला जवळ करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

मयुरी आळवेकर या रियांच्या गुरू. या सगळ्या प्रवासात गुरूंचा पाठिंबा महत्त्वाचा होता. त्यामुळेच नाव बदलताना त्यांनी आपल्या नावापुढे गुरूंचं नाव जोडलंय. आता रिया मयूरी आळवेकर ही त्यांची ओळख आहे. रियांनी आत्मसन्मान मिळवलाय. हे त्यांचं मोठं यश आहे. ट्रान्सजेंडर असूनही त्यांना मिळणारा सन्मान केवळ शिक्षणामुळे मिळतोय, आजचे हे दिवस शिक्षणामुळेच आपण पाहू शकतोय याची जाणीव त्यांना आहे.

मला जोतीबांच्या 'विद्ये विना मती गेली' या अखंडाची आठवण झाली. आपल्या आसपास कित्येकांनी आपली ओळख लपवून ठेवली असेल. रोज नव्या तुफानाला तोंड द्यावं लागत असेल. आजही कित्येक बालकं स्वतःशीच संघर्ष करताना गुदमरत असतील. त्यांना मोकळा श्वास मिळण्याची गरज आहे. तरच ते समाजात सन्मानानं, ताठ मानेने जगू शकतील. त्यासाठी त्यांना चांगल्या शिक्षणाची सोय, कुटुंबाचा आणि समाजाचा पाठिंबा या गोष्टी श्वासाइतक्याच महत्त्वाच्या आहेत. मला लक्ष्मी त्रिपाठी, चांदणी गोरे, शमिभा पाटील, दिशा पिंकी शेख, गौरी सावंत, सान्वी जेठवाणी अशी काही नाव आठवत होती. हे लोक ट्रान्सजेंडर समुदायाच्या भल्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागृती करत आहेत. असं बरंच माझ्या मनात सुरू होतं आणि समोर रिया आळवेकर होत्या.

पहिलीच्या मुलांना आई होऊन शिकवणारी रिया, तंत्रस्नेही शिक्षक रिया; गाणी, गोष्टी आणि कृतीतून शिक्षण आनंददायी करणारी मुलांची आवडती शिक्षक रिया, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणणारी रिया, शिक्षक प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मार्गदर्शक रिया, मुख्याध्यापकांना शालेय कामकाजामध्ये मदत करणारी रिया, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य बसवणारी कोरिओग्राफर रिया, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी रिया, पालक आणि समाजासोबत राहणारी शिक्षक रिया, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य असणारी रिया, स्वतःच्या कर्तृत्वावर अनेक पुरस्कार, मिळवणारी रिया, लिंगबदल करून स्त्रीचं आयुष्य मनसोक्त जगणारी रिया, शरीर आणि लिंग यांच्यात निसर्गाने केलेल्या फसगतीमध्ये अडकलेल्यांना, मदत करणारी रिया, ट्रान्सजेंडर कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा आणि राज्याच्या समितीवरील सदस्य असणारी रिया. अशी विविध रूपं मनात साठवत, रियांचा निरोप घेतला.

 

रिया आळवेकर
Mob.9307749330

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र ( 30 लेख )
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी