डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका फोटोग्राफरला पाहायला मिळालेले प्रधानसर

प्रधानसर व दादा गुजर यांनी राष्ट्र सेवादल, युक्रांद व महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे लहान मुलांसाठी बालबोध पीठ स्थापन करून बालआनंद मेळावे घेतले. त्यामध्ये मुकुंद तेलिचेरी, ल.म. कडू. दिलीप भंडारी, सुभाष अवचट अशा कलाकारांकडून मदत घेऊन प्रधानसरांनी विविध कार्यक्रम राबविले. महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे विविध प्रकल्प पाहण्यासाठी डॉ. दादा गुजर हे प्रधानसरांना सोबत नेत असत. तेव्हा फोटोग्राफर म्हणून मीही सोबत असे. मी पाहिलेला अनुभव असा की, खेडेगावातील हिरवीगार शेती, झाडे व पाणतलाव पाहून सर खूप आनंदी होत. तसेच उजाड, जिरायत पाण्यापासून वंचित असलेले खेडे व शेती पाहून व्यथित होत. अशा वेळी काही ग्रामस्थ प्रधानसर व दादा गुजर यांना पाहुणचारासाठी घरी बोलावत. घरासमोरील अंगणात तुळसी वृदांवन पाहून ‘येथे गोकुळ नक्कीच नांदत असेल,’ असे म्हणून सर्वांसोबत चर्चा करत असत.

11 जून 1960 रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाने साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली. तेव्हापासून आदरणीय ग.प्र. प्रधान व महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी रुग्णालय यांचे ऋणानुबंध होते.

या संस्थेचे कार्यक्षेत्र हडपसर व परिसरातील बारा वाड्या हे होते. कुटुंब नियोजन, आधुनिक शेती, पाणी अडवा पाणी जिरवा, शैक्षिणिक प्रकल्प असे विविध उपक्रम संस्था राबवत असे. अशा वेळी जर्मनी, इंग्लंड, इस्रायल या देशातील पाहुणे येत असत. तेव्हा प्रधानसर पाहुण्यांचे स्वागत करून समन्वय साधत. संस्थेत अनेक शिबिरे, मेळावे कार्यक्रम होत असत. रौप्य महोत्सव व तत्सम कार्यक्रमात सूत्रसंचालन व संस्थेच्या कार्याची माहिती देणे हे काम प्रधानसर करत असत. त्या काळात भारताचे उपराष्ट्रपती आर. व्यंकटरामन, मधु दंडवते, केंद्रिय आरोग्यमंत्री मोहसिना किडवाई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, देशी-विदेशी सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहिले. प्रधानसर व प्राध्यापक मधु दंडवते हेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन करत असत.

1974 मध्ये राष्ट्र सेवादल कलापथकाचा रौप्यमहोत्सवी मेळावा हडपसर येथील साधना विद्यालय व महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या प्रांगणामध्ये झाला. स्टेजवरील सजावट व रंगमंच व्यवस्थेसाठी मुंबईतील राष्ट्र सेवादलाचे भाऊ कदम, नागेश हटकर, वसंत इपते या कलाकारांबरोबर मी काम करत होतो. मंडपाचे काम हडपसर येथील शिंदे मांडववाले यांना दिले होते. परंतु त्यांच्याकडे मांडवाचे साहित्य अपुरे होते. स्टेजवरील रंगमंचासाठी काम करताना लोखंडी पाईप व दोर ओढण्यासाठी कप्पी, पुली हवी होती. त्यावेळी पुणे शहरातून आणणे शक्य नव्हते. स्टेजजवळच महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वर्कशॉपमध्ये आम्हाला हवे तसे लोखंडी पाईप व कप्पी होते. ते मिळवण्यासाठी संस्थचे प्रमुख डॉ. दादा गुजर यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. याची मी प्रधानसरांना कल्पना दिली. मग प्रधानसर आम्हास दादांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. दादांनी  आम्हाला संस्थेतर्फे लोखंडी पाईप व कप्पी, बांबू, वासे हे साहित्य दिले, व मदतीला मजूर व कारागीरही दिले. हे सर्व प्रधानसरांमुळे साध्य झाले. काम रात्री उशिरापर्यंत चालले होते. कवी वसंत वापट, निळू फुले, राम नगरकर, विठ्ठल तुपे, झेलम परांजपे, सदानंद वर्दे, सुधाताई वर्दे स्टेजवरती होते. त्यावेळी प्रधानसर डॉ.दादा गुजर यांना स्टेजवर घेऊन आले व बरीच चर्चा घडवून आणली. तेव्हा दादांनी व सरांनी आम्हास शिस्त व नियोजन याबाबत समज देऊन मार्गदर्शन केले.

प्रधानसर व दादा गुजर यांनी राष्ट्र सेवादल, युक्रांद व महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे लहान मुलांसाठी बालबोध पीठ स्थापन करून बालआनंद मेळावे घेतले. त्यामध्ये साने गुरुजी कथामालेचे मुकुंद तेलिचेरी, ल.म. कडू. दिलीप भंडारी, सुभाष अवचट अशा कलाकारांची मदत घेऊन प्रधानसरांनी विविध कार्यक्रम राबविले.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे बालग्राम होते तेथे अनाथ मुलांचे संगोपन व पालनपोषण होत असे. या मुलांमध्ये दुसरे साने गुरुजी म्हणूनच प्रधानसर रमत. त्यांच्याबरोबर डॉ.दादा गुजर, रामभाऊ तुपे, कदम गुरुजी, माधव देशपांडे, यदुनाथ थत्ते, राजाभाऊ मंगळवेढेकर येत असत. सासवड येथील गोपाळराव गायकवाड, रावसाहेब पवार अशा अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रधानसर विविध शिबिरे घेऊन लहान मुलांसाठी कार्यक्रम करीत असत.

प्रधानसरांनी पुणे येथील त्यांचे राहते घर (वास्तू) 2004 मध्ये साधना ट्रस्टला दिले व ते हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात निवासी झाले, ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. तेव्हा सरांच्या खोलीमध्ये डॉ.दादा गुजर व प्रधानसर हे सकाळ, दुपार, संध्याकाळ वेळ मिळेल तसे एकत्रित भोजन व चहा घेत. सरांचा आहार खूप साधा व कमी असे. संस्थेचे सुमतिभाई शहा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध तूप, आवळा, गूळ (साखर) व आयुर्वेदिक औषध वापरून च्यवनप्राश बनविण्याचे प्रशिक्षण देत असत. काही विद्यार्थी प्रधानसरांना एक चमचा का होईना देऊन आशीर्वाद घेत असत. प्रधानसर रुग्णालयात रुग्णांची चौकशी करून आजार बरा होण्याबाबत धीर देत.

तिथे सरांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोक सतत येत असत. राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते, मित्र परिवार व विद्यार्थी, मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. दत्ता बनकर यांचे लग्न प्रधानसरांनी कन्यादान करून केले. तसेच भाई वैद्य, पन्नालाल सुराना, राजू बहाळकर, सुभाष वारे, दत्ता भंडार, शिवाजी पवार, हमीद दलवाई यांची पत्नी मेहरुन्निसा दलवाई, सय्यदभाई, शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन, गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी गोव्याचे प्राध्यापक माधव पंडित, शारदाताई सवाईकर, तसेच हडपसर येथील हिरामन फुलारे व अस्लम जमादार हे वारंवार भेटत असत. मुस्लिम समाजात पुरोगामी विचार रुजविण्यासाठी अल्पसंख्याक चळवळ उभारण्याचा सल्ला व मार्गदर्शन प्रधानसरांनीच केले. तसेच पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील कार्यकर्तेही भेटत असत.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे विविध प्रकल्प पाहण्यासाठी डॉ. दादा गुजर हे प्रधानसरांना सोबत नेत असत. तेव्हा फोटोग्राफर म्हणून मीही सोबत असे. मी पाहिलेला अनुभव असा की, खेडेगावातील हिरवीगार शेती, झाडे व पाणतलाव पाहून सर खूप आनंदी होत. तसेच उजाड, जिरायत पाण्यापासून वंचित असलेले खेडे व शेती पाहून व्यथित होत. अशा वेळी काही ग्रामस्थ प्रधानसर व दादा गुजर यांना पाहुणचारासाठी घरी बोलावत. घरासमोरील अंगणात तुळसी वृदांवन पाहून ‘येथे गोकुळ नक्कीच नांदत असेल’, असे म्हणून सर्व कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करत असत.

डॉ.दादा गुजर व त्यांचे चिरंजीव अनिल गुजर व अरुण गुजर आणि सर्व गुजर कुटुंब व संस्थेतील सर्व सेवकवर्ग यांनी ग.प्र. प्रधान यांची शेवटपर्यंत मनोभावनेने सेवा केली.
 

Tags: प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके