सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असे सांगतात की, जी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत ती शासन व्यवस्थेचीही मूलभूत कर्तव्ये आहेत. दुर्दैवाने अनुच्छेद 51अ अंमलात येऊन 49 वर्षे झाली तरीही शासन व्यवस्थेने या कर्तव्यांचे पालन केल्याचे दिसत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता कोणत्याही नेत्याने या कर्तव्याची पूर्तता करण्याचा प्रयत्नही केलेला दिसत नाही. अगदी अनुच्छेद 51अ अस्तित्वात नाही असे गृहीत धरले, तरीपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे व प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध निकषांवर तपासून घेणे हे घटनेला अभिप्रेत आहे असे म्हणावे लागेल.
एकीकडे लोक नद्यांची पूजा करतात व दुसरीकडे या पवित्र नद्यांमध्ये धार्मिक सण साजरे करण्याकरिता लाखो लोक स्नान करून प्रचंड प्रदूषण निर्माण करतात. एकीकडे वृक्ष हे आपल्या कुटुंबाचे भाग आहेत असे सांगणाऱ्या तुकाराम महाराजांची पूजा करतो व दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी साधूना घरे बांधण्यासाठी शेकडो वृक्ष तोडतो. विकासाच्या चुकीच्या संकल्पनेने पछाडलेली शासनयंत्रणा अधिकाधिक वृक्षांचा नाश करीत असते. आपल्या देशात दूध व अन्नाअभावी असंख्य बालके कुपोषित असताना, तथाकथित धार्मिक कारणांसाठी आपण हजारो लीटर दूध नर्मदा नदीत सोडून देतो.
सन 1975 मध्ये अंतर्गत आणीबाणी जाहीर झाली. सन 1977 च्या सुरुवातीला 42 वी राज्यघटना दुरुस्ती झाली. यामधील अनेक दुरुस्त्या या घटनेच्या मूलतत्त्वांवर घाला घालणाऱ्या होत्या. यातील काही दुरुस्त्या न्यायालयाने रद्दबातल ठरविल्या व काही विधीमंडळाने रद्द केल्या. 42 व्या राज्यघटना दुरुस्तीने आणलेले अनुच्छेद 51अ मात्र कायम राहिले. या कलमाने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ठरविली गेली. कदाचित बदनाम झालेल्या 42 व्या राज्यघटना दुरुस्तीमुळे या अनुच्छेद 51अ कडे कायम दुर्लक्ष झाले असावे. अनुच्छेद 51 अ चे पोटकलम (ह) खूप महत्त्वाचे आहे. या पोटकलमाप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्याचबरोबर मानवतावादाचा पुरस्कार करणे व सुधारणांचा पुरस्कार करणे हेही मूलभूत कर्तव्य ठरते. जिज्ञासू वृत्ती बाळगण्याच्या कर्तव्याचाही त्यात समावेश होतो.
वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोपे आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे प्रत्येक गोष्ट व घटना विज्ञानाच्या निकषांवर तपासून पाहणे. जिज्ञासू वृत्ती असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे सोपे होते. वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबर मानवतावादही पाहिजे. कारण विज्ञान व विज्ञानाचा वापर हा जगाच्या भल्याकरताच करावा लागतो. नुसत्या विज्ञानामुळेच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगल्यानेच निरनिराळ्या धर्मांमध्ये व पर्यायाने समाजामध्ये आवश्यक सुधारणा होऊ शकतात. घटनेच्या अनुच्छेद 25 ने प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य व धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु अनुच्छेद 25 ने दिलेले मूलभूत स्वातंत्र्य हे राज्यघटनेच्या भाग 3 मधील इतर मूलभूत हक्कांना अधीन राहून आहे. घटनेने अनुच्छेद 25 प्रमाणे दिलेले धार्मिक स्वातंत्र्य असले, तरी ते स्वातंत्र्य विधीमंडळाला असलेला समाजहिताचे व समाज सुधारणांचे कायदे करण्याचा हक्क हिरावून घेत नाही, किंबहुना असे कायदे करण्याचा अधिकार हा घटनेनेच अबाधित ठेवलेला आहे. म्हणजेच असे लक्षात आले की, एखादी धार्मिक किंवा सामाजिक प्रथा घटनेने दिलेले इतर मूलभूत अधिकार हिरावून घेणारी आहे, तर अशा प्रथांवर कायदे करून बंदी घालण्याचा अधिकार विधीमंडळाला आहे.
राज्य घटनेच्या 21 व्या कलमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला अर्थपूर्ण आणि संपन्न असे आयुष्य जगण्याचा मूलभूत हक्क आहे. हा मूलभूत हक्क व अनुच्छेद 51-अ (ह) मधील मूलभूत कर्तव्य यांचे एकमेकांशी नाते आहे. जर आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला नाही व तर्कशुद्ध विचार केला नाही, तर खऱ्या अर्थाने समृद्ध व अर्थपूर्ण जीवन जगताच येणार नाही. आपल्या वागण्यामध्ये मानवतावाद नसेल आणि सुधारणा स्वीकारण्याची वृत्ती नसेल तर माणसाचे माणूस म्हणून जगणे निरर्थक ठरते. वैज्ञानिक दृष्टी व जिज्ञासू वृत्ती असणारे शास्त्रज्ञ होते म्हणूनच विज्ञानक्षेत्राची आणि जगाचीही प्रगती झाली. आपण राज्यघटनेची उद्देशिका वाचली तर लक्षात येते की, घटनेचे सार त्यामध्ये आहे. या उद्देशिकेमध्ये सामाजिक न्याय देण्याचे आश्वासन आहे. प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध निकषांवर तपासून पाहिली नाही, तर सामाजिक न्याय कसा मिळणार हा प्रश्न पडतो.
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असे सांगतात की, जी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत ती शासन व्यवस्थेचीही मूलभूत कर्तव्ये आहेत. दुर्दैवाने अनुच्छेद 51अ अंमलात येऊन 49 वर्षे झाली तरीही शासन व्यवस्थेने या कर्तव्यांचे पालन केल्याचे दिसत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता कोणत्याही नेत्याने या कर्तव्याची पूर्तता करण्याचा प्रयत्नही केलेला दिसत नाही. अगदी अनुच्छेद 51अ अस्तित्वात नाही असे गृहीत धरले, तरीपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे व प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध निकषांवर तपासून घेणे हे घटनेला अभिप्रेत आहे असे म्हणावे लागेल. कारण वैज्ञानिक दृष्टीकोन नसेल तर राज्यघटनेने दिलेला अर्थपूर्ण जगण्याचा मूलभूत हक्कच निरर्थक होतो.
वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याचे भान नसल्यामुळे आपण प्रचंड प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास करीत आहोत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे हेही आपले मूलभूत कर्तव्य असताना धर्माच्या नावाखाली आपण नद्या, तलाव, समुद्रकिनारे कायम प्रदूषित करत असतो. विज्ञानाची शिकवण विसरल्यामुळे आपण हवा प्रदूषित करतो. हवेच्या प्रदूषणाचे बळी ठरतात ते झोपड्यांमध्ये राहणारे, रस्त्यांवर काम करणारे व मोलमजुरी करणारे इत्यादी घटक. घटनेला अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाशी ही प्रतारणा आहे. एकीकडे लोक नद्यांची पूजा करतात व दुसरीकडे या पवित्र नद्यांमध्ये धार्मिक सण साजरे करण्याकरिता लाखो लोक स्नान करून प्रचंड प्रदूषण निर्माण करतात. एकीकडे वृक्ष हे आपल्या कुटुंबाचे भाग आहेत असे सांगणाऱ्या तुकाराम महाराजांची पूजा करतो व दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी साधूंना घरे बांधण्यासाठी शेकडो वृक्ष तोडतो. विकासाच्या चुकीच्या संकल्पनेने पछाडलेली शासनयंत्रणा अधिकाधिक वृक्षांचा नाश करीत असते. आपल्या देशात दूध व अन्नाअभावी असंख्य बालके कुपोषित असताना, तथाकथित धार्मिक कारणांसाठी आपण हजारो लीटर दूध नर्मदा नदीत सोडून देतो. यामुळे नदीतील मासे व इतर जीवांना मिळणारा प्राणवायू हिरावून घेतला जातो. ध्वनी प्रदूषणाचे माणसावर होणारे गंभीर परिणाम हे सर्वज्ञात असूनही आपण धार्मिक उत्सव साजरे करीत असताना ध्वनी प्रदूषणविषयक नियम धाब्यावर बसवितो. सणांमध्ये तर ध्वनिक्षेपक, डीजे वापरून ध्वनी प्रदूषण करण्याची एक प्रकारची चढाओढ लागते. दुर्दैवाने हे
सर्व राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या पाठिंब्याने होत असते. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याच्या व सुधारणा करण्याच्या मूलभूत कर्तव्याचा आपल्या समाजातील बहुसंख्य नागरिकांना विसर पडल्यामुळे हे होते. शासन व्यवस्थेचेही हे मूलभूत कर्तव्य असले तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. तशी इच्छाशक्तीच दिसत नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याच्या कर्तव्याचे कायम स्मरण करून देत होते. म्हणूनच त्यांनी श्रद्धेला नव्हे तर अंधश्रद्धेला विरोध केला व अंधश्रद्धा बाळगू नये यासाठी समाजाचे प्रबोधन करण्याचा कायम प्रयत्न केला. अंधश्रद्धेविरुद्धचा त्यांचा लढा हा मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्यासाठीच होता. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर तपासून बघितली पाहिजे हेच ते सांगत व शिकवत आले. पण आपल्या समाजाचे दुर्दैव असे की, डॉ. दाभोलकरांना मृत्यूला सामोरे जावे लागले. आपल्या समाजात ज्या थोड्या व्यक्ती व संस्था सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा यासाठी धडपडत असतात, त्यांना नुसत्या उपेक्षेला नाही तर प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागते.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांच्यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांमुळे महाराष्ट्र राज्य हे समाजसुधारणांचा व प्रबोधनाचा संदेश देणाऱ्यांचे आहे, असे आपण म्हणतो. पण आपण त्यांचे विचार विसरून फक्त व्यक्तिपूजाच करतो. केवळ व्यक्तिपूजेमध्ये समाधान मानत असल्याने आपली पिछेहाट होत आहे. वास्तविक पाहता व्यक्तिपूजेला घटनेत कोणतेही स्थान नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याशिवाय व सुधारणांची कास धरल्याशिवाय पुरोगामीत्व असूच शकत नाही.
वैज्ञानिक दृष्टीकोन असेल तर पक्ष, व्यक्ती व कोणतीही विचारधारा यांपलीकडे जाऊन योग्य किंवा अयोग्य काय हे समजते व ते उघडपणे बोलण्याचे सामर्थ्यही मिळते. जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याचे कर्तव्य आपण सर्व जण व शासनव्यवस्था अंमलात आणत नाही, तोपर्यंत आपण एक समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगूच शकणार नाही.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या