शेताच्या कुठल्या भागात किती बिया पेरायच्या याचा अचूक अंदाज शेतकरी स्त्रियांना असतो. घरगुती वापरासाठी किती धान्य लागतं, हे त्यांनाच माहीत असतं; त्यानुसार त्या बियाण्यांचं प्रमाण ठरवतात. त्यांना वेगवेगळ्या प्रजातींच्या बियाण्यांची साठवण करावी लागते; कारण प्रत्येक जमीन ही वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीसाठी योग्य असते. काही पिकं पाणथळ जमिनीत चांगली वाढतात; काही उताराच्या जमिनीवर, तर काही पाण्याची उपलब्धता कमी असणाऱ्या जमिनीत उत्तम वाढतात. हे लक्षात घेऊन शेतकरी स्त्रिया वेगवेगळी बियाणं पेरत जातात.
1960च्या दशकात भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. याचा इथल्या शेतीवर फार मोठा परिणाम झाला. या क्रांतीमुळे जैविक विविधतेपासून, अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या मोजक्या प्रजातींकडे शेती झुकत गेली. पारंपरिक बियाण्यांऐवजी संकरित बियाण्यांवरचा भर वाढला, आणि स्थानिक बियाण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचल्या. बियाणं साठवण्याच्या आणि त्यांची लागवड करण्याच्या पद्धती आणि त्यांविषयीचं पारंपरिक ज्ञानही हळूहळू लुप्त व्हायला लागलं. खरं तर अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरीत बियाण्यांच्या तुलनेत, पारंपरिक बियाणं पर्यावरणपूरक आणि शाश्वत आहे; पण हरित क्रांतीमुळे त्याचं हे महत्त्व मागे पडलं. सुरुवातीला हरित क्रांतीचा हा परिणाम फार ठळकपणे जाणवला नाही; पण आता हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास वेगानं घडत असताना, देशी बियाण्यांची कमतरता जास्त जाणवते आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांवरही या कमतरतेचा प्रतिकूल परिणाम होतो आहे.
आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून, एकाच प्रकारच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रजातींच्या वापरामुळे, आपण जवळपास 75 टक्के वनस्पतींचं जनुकीय वैविध्य गमावलं आहे. माणसाला माहीत असलेल्या अडीच ते तीन लाख वनस्पतींपैकी केवळ 150-200 वनस्पतींचा माणूस वापर करतो; आणि आज वनस्पतींपासून माणसाला मिळणाऱ्या प्रथिनं आणि उष्मांकांमध्ये 60 टक्के योगदान फक्त तांदूळ, मका आणि गव्हाचं आहे. बियाण्यांची विविधता आणि संवर्धन असं नष्ट होत जाण्यामागे औद्योगिक क्रांती, व्यापारी पद्धतीनं केली जाणारी शेती, एक पीक पद्धत असे अनेक घटक असले तरी स्थानिक वाणांविषयी स्त्रियांकडे असलेल्या ज्ञानाचा आणि त्यांच्या निर्णयक्षमतेचा अव्हेर हेही ठळक कारण आहे. वस्तुतः आद्य शेतकरी असलेल्या स्त्रिया शेती शाश्वत करणाऱ्या वेगवेगळ्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब आपल्या घरच्या शेतीत पिढ्यान्पिढ्या करत आल्या आहेत. यामध्ये बियांची साठवण, लागवड यांविषयीचं त्यांचं ज्ञान आणि कौशल्य महत्त्वाचं असतं. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांनी म्हटल्याप्रमाणे, 'बियाणं तयार करताना, बीज अंकुरण्यासाठी आवश्यक गोष्टी, ते तयार करण्याची विशिष्ट पद्धत, मातीची निवड यांबाबतचं ज्ञान असावं लागतं. बी तयार करायचं, तर चांगल्या-वाइटाची पारख करण्याचं कौशल्य, हातांची जलद हालचाल, आर्द्रतेचा अचूक अंदाज आणि हवामानाची जाण हवी. बी पेरताना स्त्रियांना ऋतू, हवामान, रोपाच्या गरजा, मातीची सुपीकता, ऊन वाऱ्याचा जोर माहीत असावा लागतो. प्रत्यक्ष पेरणीसाठी शारीरिक कष्ट आणि संयम लागतो.' स्त्रिया ही सगळीच कामं वर्षानुवर्षं पार पाडत आल्या आहेत. 'बियाण्यांचं संवर्धन करण्याचं काम आम्हा स्त्रियांचंच आहे. पुरुष काय करतात? त्यांना या बाबतीतली काहीच माहिती नाही. बीजसंवर्धन आणि एकमेकींमध्ये त्याची देवघेव हा आमच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे. बिया कुठे आणि किती प्रमाणात साठवायच्या, याची आम्हाला नेमकी माहिती असते. आमच्या आयांकडून आम्ही हे सगळं शिकत गेलो.' सांगेला या राजस्थानातल्या एका लहान गावातल्या साध्या शेतकरी स्त्रीचे हे उद्गार डॉ. वंदना शिवा यांचं म्हणणं अधोरेखित करणारेच आहेत.
बियाण्यांची निवड, पाळीव प्राण्यांचं व्यवस्थापन आणि वनस्पती व प्राण्यांच्या विविधतेचा शाश्वत वापर आणि संवर्धन यांबाबतीतल्या भूमिकेद्वारे पृथ्वीवरच्या शेतीव्यवस्था आणि अन्न व उपजीविकेची सुरक्षितता यांचं भविष्य राखण्याची क्षमता ग्रामीण स्त्रिया वर्षानुवर्ष सिद्ध करत आल्या आहेत. त्या अन्नोत्पादक आणि अन्न पुरवठादार असल्यामुळे, अन्न आणि शेतीमधल्या जनुकीय स्रोतांच्या व्यवस्थापनाशी थेट जोडलेल्या आहेत आणि त्यामुळेच अनेक शतकांच्या व्यावहारिक अनुभवातून त्यांनी स्थानिक प्रजाती, परिसंस्था आणि त्यांचा वापर यांबाबतचं ज्ञान मिळवलं आहे; मुख्य म्हणजे, याबाबतीतले निर्णय घेण्याची क्षमताही त्यांनी आत्मसात केलेली आहे.
शेतकरी म्हणून ग्रामीण स्त्रियांकडे पिकं किंवा अन्न देणाऱ्या इतर वनस्पती वाढवणे, अन्न गोळा करणे आणि विविध प्रकारच्या नैसर्गिक स्रोतांचं (पिकं आणि रानभाज्या, कंद, झाडांचे इतर खाण्याजोगे भाग, रानटी आणि पाळीव प्राण्यांपासून मिळणारी उत्पादनं) एकात्मिक व्यवस्थापन करून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्याची जबाबदारी असते. शेती, परसबागा, आणि कुरणं, जंगलं यांसारख्या सामुदायिक मालकीच्या जागा यांच्या आधारे उदरनिर्वाह करताना स्त्रिया आणि पुरुष यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात आणि या नैसर्गिक संपदेशी त्यांचं नातंही भिन्न असतं. शेतीतल्या पिकांखेरीज, परसबागा हा स्त्रियांसाठी निरनिराळ्या भाज्या, मसाले आणि किरकोळ आजारांवरची घरगुती औषधं पुरवणारा स्रोत असतो. या परसबागांमध्ये स्त्रिया अनेक प्रयोग करतात आणि अनेक रानटी प्रजाती व स्थानिक प्रजाती वाढवतात. थायलंडमधल्या काही स्त्रियांनी आपल्या गावाला लागून असणारं जंगल विकासकामांसाठी नष्ट होणार म्हटल्यावर, अनेक रानभाज्यांचं बियाणं साठवून आपल्या परसबागेत त्यांची लागवड केली. यामुळे त्यांची उपजीविका तर तरलीच; पण खाण्याजोग्या वनस्पतींच्या तब्बल 230 प्रजाती वाचल्या.
हीच गोष्ट शेतीच्या बाबतीतही स्पष्ट दिसते. अन्नासाठी जमिनीच्या छोट्या तुकड्यांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांमध्ये जेव्हा स्त्रिया शेतीचे निर्णय घेतात, तेव्हा त्या वेगवेगळ्या प्रजातींचं बीज साठवून बहुपीक पद्धतीचा अवलंब करतात. यामुळे शेतीतलं वैविध्य राखलं जातं, कुटुंबाला पोषक आहार मिळू शकतो आणि जमिनीचा कस कायम राहतो. हवामानातल्या बदलांमध्ये तग धरून राहण्याची क्षमता या विविध स्थानिक बियाण्यांमध्ये असल्यामुळे उपासमारीचा किंवा कुपोषणाचा धोकाही कमी होतो. पुरुष शेतकरी मात्र पैसा मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीवर भर देतात.
लागवडीच्या बाबतीतले स्त्रिया आणि पुरुषांचे हे भिन्न दृष्टीकोन शेती आणि अन्नाच्या जनुकीय स्रोतांच्या म्हणजेच मुख्यतः बीजसंवर्धनात निर्णायक भूमिका बजावतात. कारण आपल्या कुटुंबासाठी आणि स्थानिक समुदायासाठी सर्वाधिक उपयुक्त काय आहे, याची जाणीव आणि माहिती पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना नेमकी असते. पिकाला बाजारात मिळणाऱ्या भावापलीकडे जाऊन शाश्वत उत्पन्न, कुटुंबाचं पोषण, आणि जमिनीचं आरोग्य, पाळीव जनावरांना मिळणारं खाद्य या सगळ्या गोष्टींचा विचार स्त्रिया करतात. स्त्रियांचा हा दृष्टीकोन आणि बीज आणि इतर नैसर्गिक स्रोतांविषयीचं त्यांचं ज्ञान हे खरं तर आजच्या वैज्ञानिक कसोट्यांवरही उतरणारं आहे. माती, पाणी आणि जैविक विविधता राखण्यासाठी अनेक पिढ्या ते एकमेकींमध्ये वाटलं गेलं आहे, त्यात त्यांनी प्रयोग केले आहेत, नावीन्य आणलं आहे आणि बीजसंवर्धनावर आधारलेल्या शाश्वत शेतीच्या अनेक स्थानिक पद्धती त्यांनी विकसितही केल्या आहेत. एके काळी रानटी असलेल्या, पण नंतर रोजच्या वापरासाठी माणसाळवलेल्या पिकांच्या प्रजातींचं मूल्य आणि त्यांचा विविधांगी वापर यांचं स्त्रियांना असणारं विशेष ज्ञान रानटी प्रजातींपर्यंत विस्तारलेलं आहे. गरजेच्या वेळी या प्रजातींच्या पानांचा, फळांचा, बियांचा, मुळांचा, कंदांचा उपयोग त्या अन्न म्हणून किंवा औषध म्हणून किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून करतात. यामुळेही स्त्रिया या रानवनस्पतींच्या बियांच्या किंवा इतर जनुकीय स्रोतांच्या संवर्धनावर जाणीवपूर्वक भर देतात.
शेतीच्या कामांमध्ये स्त्रियांच्या असलेल्या सामाजिक भूमिकेमुळेही त्यांच्या बीज संवर्धनविषयक ज्ञानाला सतत उजाळा मिळत राहिला आहे. पीक कापणीच्या वेळीही शेताच्या कोणत्या भागातल्या पिकांचं उत्पन्न अधिक चांगलं आलं आहे, याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. बियांचं वजन, दर्जा यांवरून त्या बियाणं जोखतात आणि पीक मळणीच्या वेळी त्या बिया साठवणीसाठी बाजूला ठेवतात. पुढच्या मोसमात पेरणीची वेळ येईपर्यंत, हे बियाणं कापडी पिशवीत भरून त्या कोठीत ठेवतात. भाज्यांच्या बियाण्यांच्या बाबतीत, शेंगा किंवा फळभाजी पूर्ण तयार झाली की, शेतकरी स्त्रिया ती वाळू देतात. वाळल्यानंतर त्यातल्या बिया बाजूला काढतात आणि साठवतात. पेरणीच्या वेळी त्या बाहेर काढून वापरल्या जातात.
शेताच्या कुठल्या भागात किती बिया पेरायच्या याचा अचूक अंदाज शेतकरी स्त्रियांना असतो. घरगुती वापरासाठी किती धान्य लागतं, हे त्यांनाच माहीत असतं; त्यानुसार त्या बियाण्यांचं प्रमाण ठरवतात. त्यांना वेगवेगळ्या प्रजातींच्या बियाण्यांची साठवण करावी लागते; कारण प्रत्येक जमीन ही वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीसाठी योग्य असते. काही पिकं पाणथळ जमिनीत चांगली वाढतात; काही उताराच्या जमिनीवर, तर काही पाण्याची उपलब्धता कमी असणाऱ्या जमिनीत उत्तम वाढतात. हे लक्षात घेऊन शेतकरी स्त्रिया वेगवेगळी बियाणं पेरत जातात.
अनेक पारंपरिक बीजं पावसाच्या लहरीपणाला यशस्वीरीत्या तोंड देऊ शकतात. पावसाने ओढ दिली तरी टिकाव धरून राहणाऱ्या आणि पाऊस आल्यावर जोमात वाढणाऱ्या भातासह इतर अनेक पिकांच्या स्थानिक प्रजातींमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं आणि छोट्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पोषणही होतं. या वाणांचं संवर्धन करण्यात आणि त्यांची विविधता राखण्यात ग्रामीण स्त्रियांचंच योगदान असतं. स्त्रियांद्वारा ज्यांचं व्यवस्थापन होतं, त्या एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण शेतीपद्धतींकडे बारकाईने लक्ष देऊन शेतीतली विविधता सुरक्षित राखणे हे आजच्या काळातलं खरं आव्हान आहे. गेल्या दशकभरातल्या अनेक आंतरराष्ट्रीय करार आणि धोरणांनी स्त्रियांची बीजसंवर्धक ही भूमिका मान्य केली आहे, हे खरं. पण तरीही कृषी-जैववैविध्य आणि त्याबाबतीतल्या स्त्रियांच्या जबाबदाऱ्या आणि हक्क अजून धोरणनिर्मितीच्या दृष्टीनं पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत. त्यांचं याबाबतीतलं ज्ञान आणि कौशल्य तर आजही 'अदृश्य'च आहे. आधुनिक संशोधन विकास आणि वनस्पतींची वाणं तयार करणाऱ्या सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी स्थानिक शेतकरी समुदायाच्या, विशेषतः स्त्रियांच्या क्षमतांकडे दुर्लक्षच केलं आहे. ज्या ज्या ठिकाणी बीजसंवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींवर पारंपरिकदृष्ट्या स्त्रियांचं नियंत्रण होतं, अशा अनेक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि दृष्टिकोनांनी स्त्रियांच्या ज्ञानाला मागास ठरवून टाकलं; यामुळे उत्पादनाचं सुकाणू स्त्रियांच्या हातातून अनेक ठिकाणी निसटलं आहे. याचा परिणाम, स्त्रियांचा सामाजिक-कौटुंबिक दर्जा खालावण्यात जसा झाला आहे, तसाच तो जैविक विविधतेचा ऱ्हास होऊन स्थानिक पर्यावरणाचा तोल ढासळण्यातही झाला आहे.
मात्र, या प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या ठिकठिकाणच्या स्त्रिया आणि त्यांचे समूह हा आशेचा किरण आहे. भारताच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी बीजसंवर्धन करणाऱ्या स्त्रियांनी अनेक दुर्मीळ वाणं तर जपली आहेतच; पण बीजसंवर्धनाच्या या पद्धतीला त्यांनी बियाण्यांच्या देवघेवीची पद्धतही जोडून घेतली आहे. या दोन्ही प्रथा अनेक समुदायांच्या सामाजिक विणीचा भागच आहेत. आपल्याकडचं जास्तीचं बियाणं देऊन आपल्याकडे नसलेल्या प्रजातीचं बियाणं या स्त्रिया एकमेकींकडून घेतात. यामुळे एका कुटुंबाला वेगवेगळी पिकं घेता येतात; पर्यायानं पोषणाच्या गरजा भागतात आणि मुख्य म्हणजे त्या एकूण समुदायाचं बियाण्यांसाठीचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी होतं. वेगवेगळ्या बियाण्यांची जी गरज स्त्रियांना जाणवते, तीच खरी सशक्त शेतीव्यवस्थेच्या मुळाशी आहे.
काही ठिकाणी बियाण्यांच्या देवघेवीची ही पद्धत शेजारच्या किंवा परिसरातल्या गावागावांमध्येही प्रचलित असते. पारंपरिक बियाण्यांना आणि त्यांच्या वापराला चालना देणाऱ्या या पद्धती मुख्यतः स्त्रियांच्या पुढाकारानं पार पडतात. ही देवघेव करताना एकच अट घातली जाते. पीक कापणीनंतर त्या व्यक्तीनं आपलं बी समुदायातल्या इतरही सदस्यांना वाटणं बंधनकारक असतं.
पारंपरिक बियाण्यांचा हा वापर स्त्रियांसाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरतो आहे. ओडिशाच्या झारग्राम जिल्ह्यातल्या काही स्त्रिया नाईलाजानं पूर्वी रासायनिक शेती करत होत्या. या शेतीत बियाणं, खतं आणि कीटकनाशकांचा वापर अटळच होता. यासाठी पाऊण एकराच्या शेतीत खरीप आणि रब्बी हंगामांत पंधरा-वीस हजार खर्च यायचा. मग सावकाराकडून कर्ज घेण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. कर्जाच्या या विळख्यातून या शेतकरी महिलांची सुटकाच नव्हती. शिवाय, हवामानाचे तडाखे बसले की, हातात पीक काही यायचं नाही आणि केलेला खर्च वाया जायचा. पण काही स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी बीजसंवर्धनासाठी या स्त्रियांना प्रोत्साहन दिलं आणि परिस्थिती बदलली. आता या स्त्रियांना बियांण्यासाठी ना बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागतं ना खतं-कीटकनाशकं विकत आणावी लागतात. पारुल महता ही शेतकरी महिला सांगते, "पारंपरिक बियाणं वापरायला लागल्यामुळे आमचा एकरी खर्च 4000 रुपयांवरून 800 रुपयांवर आला आहे. शिवाय, ही बियाणं पर्यावरणपूरक आहेत; दुष्काळ, अति पाऊस अशा संकटांतही तग धरणारी आहेत." कोविड महासाथीच्या काळात शहरातल्या बाजारपेठेत जाऊन बियाणं विकत आणण्यात मोठ्या शेतकऱ्यांना अडचणी आल्या, पण पारंपरिक बियाणं साठवणाऱ्या अनेक शेतकरी स्त्रियांनी आपल्याकडच्या स्थानिक बियाण्यांच्या साहाय्यानं स्वतःचं उत्पादन घेतलंच; पण जास्तीचं बियाणं वाटून आपल्या समुदायालाही मदत केली. आता तर ओडिशा, राजस्थानसह देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये स्त्रियांच्या स्वतःच्या किंवा सामूहिक बीजबँका आहेत.
हे चित्र एक गोष्ट फार नेमकेपणानं स्पष्ट करणारं आहे. स्त्रियांनी स्थानिक बियांण्यांकडे खरेदी-विक्रीची वस्तू म्हणून पाहिलेलं नाही. त्यांच्यासाठी तो एक जिवंत वारसा आहे; पोषण, प्रतिकार, स्मृती आणि पुनर्निर्मितीचा स्रोत आहे. बीजरक्षक म्हणून स्त्रिया करत असलेलं काम हे शेतीच्या सृष्टिव्यवस्थेत गुंतलेलं आहे. ही सृष्टिव्यवस्था खुलं परागीभवन आणि स्थानिक पर्यावरणाचं ज्ञान यांवर अवलंबून असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार, नावीन्य आणण्याचं कसब शेतकरी स्त्रियांकडे असतं. बियांची निवड करताना स्त्रिया केवळ उत्पन्नावर लक्ष केंद्रित करत नाहीत; रुची, पोषणमूल्य, साठवणुकीची क्षमता, औषधी मूल्य आणि सांस्कृतिक प्राधान्यक्रम त्या लक्षात घेतात. हे निकष व्यावसायिक शेतीमध्ये बहुतांशी दुर्लक्षिले जातात; पण स्थानिक समुदायाच्या कल्याणासाठी त्यांचं विशेष महत्त्व असतं.
असं असूनही, स्त्रियांची बीजरक्षक आणि संवर्धक ही भूमिका दुय्यम ठरवली जाते. देशातली बहुतेक औपचारिक बीजधोरणं स्त्रियांच्या बीजव्यवस्था स्वीकारत नाहीत. विकेंद्रित आणि समुदायाच्या पुढाकारानं चालणाऱ्या बीजबँकांना ही धोरणं पाठिंबाही देत नाहीत. स्त्रियांनी पिढ्यान्पिढ्या ज्या बीजसंवर्धनावर आधारलेल्या वैविध्यपूर्ण परिसंस्था राखल्या आहेत, त्यांचं महत्त्व आजही फक्त स्थानिक पातळीवरच मर्यादित राहिलं आहे.
तरीही, ठिकठिकाणच्या ग्रामीण स्त्रिया बदलाची बीजं पेरत राहिल्या आहेत. औद्योगिक क्षेत्राचा दबाव दूर ठेवून देशी बियाण्यांचं त्या रक्षण करताहेत; केवळ शेतीच्या परिसंस्थेचं भविष्य राखून त्या थांबलेल्या नाहीत; जीवनरक्षकाची त्यांची आनुवांशिक भूमिकाही त्या पुन्हा एकदा उजळताहेत... उजळत राहतील.
'स्त्रिया आणि पर्यावरण' हे सदर वर्षा गजेंद्रगडकर यांनी डिसेंबर 2024 मध्ये साधना साप्ताहिकात सुरू केले. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या किंवा पाचव्या अंकात त्यांचे लेख प्रसिद्ध होत राहिले. या बारा लेखांमधून भारतात आणि जगात कुठे काय चांगले घडते आहे, यावर विशेष भर राहिला. ही बारा भागांची लेखमाला साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर एकत्रित वाचता येईल. ही अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणाऱ्या वर्षा गजेंद्रगडकर यांना मनःपूर्वक धन्यवाद.- संपादक साधना
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या