भारतीय स्त्री ही सात्त्विक नि सोज्वळ आहे हे दाखवणं ही सिनेमा धंद्याची गरज होती. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सिनेमा पाहात असे, आजही पाहतो. रुपेरी पडद्यावर नूतन किंवा माला सिन्हाला सात्त्विक भूमिकेत बघून पुरुष प्रेक्षकांच्या मनाला संतोष होत असे : माझी बायकोही अशीच आहे. आता पेच असा झाला की, सगळं जर मंगलमय नि सोज्ज्वळ असेल तर सिनेमाच्या गोष्टीत ताण येणार कसा ? तर मग एक खलनायिका आली. ती दारू पिते, सिगारेटी फुंकते, क्लबात कॅबरे नाच करते. नि नायिकेच्या नवऱ्याला फितवते. ख्रिश्चन किंवा यहुदी नट्यांना 'तशा' भूमिका मिळायच्या.
नादिराची मुलाखत माझ्या झोळीत अल्लद पडली. गुणवंती ही 'टाइम्स'मधली माझी सहकारी नि मैत्रीण नादिराला भेटायला तडपत, तरसत होती. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर नादिरा मुलाखतीला तयार झाली. 'तू येतोस का? हिंदी सिनेमातलं तुला बरंच माहीताय म्हणून विचारत्येय' असं गुणवंती म्हणाली. जरा तणतणतच. तिचा टाइपच तसा होता. जे काय असेल ते स्वच्छ, चोख सांगा नि फुटा. नादिराही अशीच.
"इंटरव्यूला जाऊ", मी म्हणालो.
"अरे, ती नादिरा ना खूप खोपडी (रागीट आणि /किंवा लहरी किंवा दोन्ही) आहे म्हणतात, गुणवंती म्हणाली.
"मग कशाला चाललीएस तिच्याकडे?"
"मला ती आवडते."
माझंही तेच कारण होतं.
मला नादिरा आवडायची. तिच्यात ग्रेस होती; ती राजस होती. भिकारणीच्या भूमिकेतसुद्धा ती क्लियोपात्रा वाटली असती. 'डोळ्यांत तुझ्या ते गूढ निळेसावळे, केसांत वीज ती धुंद कशी सळसळे'
नादिरा पेडर रोडला 'वसुंधरा'त राहायची. म्हणजे आपण हाजी अलीवरून खाली आलो नि पेडर रोड धरला की, आधी कॅडबरी हाऊस लागतं (आता आहे की नाही, ठाऊक नाही. काळाचे चटके बसून ते वितळलंही असेल, कदाचित). कॅडबरी हाऊसला अगदी खेटून 'वसुंधरा'. पन्नास पावलं पुढे 'प्रभु-कुंज' नि आणखी पन्नास पावलं चाललात तर मदनमोहनचं 'मकानी मनोर'.
दुपारी तीन वाजता आम्ही नादिराच्या घराची बेल वाजवली. दारावर घोड्याची नाळ ठोकून बसवली होती. नादिरानं दार उघडलं. छान हसली नि 'कम इन' म्हणाली. वय बरंच झालं होतं, पण ग्रेस कायम होती.
नादिरा अतिशय प्रेमळ वागली नि बोलली. खूप बोलली. तीच बोलत होती. तिला खूप बोलायचं होतं. आम्ही नसतो गेलो तर दूधवाल्याशी किंवा भाजीवाल्याशी बोलायला ती तयार होती. नादिराकडे सांगण्यासारखं पुष्कळ होतं. बोलता बोलता मध्येच थांबली नि म्हणाली, "कहने के लिए मेरे पास बहुत कुछ है, लेकिन सुननेवाला कोई नहीं है. सुननेवाला चाहिए."
आम्ही तिच्यासाठी कप केक घेऊन गेलो होतो. तो तिनं आम्हाला खाऊ घातला; शिवाय आपल्याकडच्या कुकीज नि चॉकलेटं टेबलावर मांडल्या नि 'खाओ' म्हणाली. नि पुन्हा बोलू लागली. तिच्याकडचे चहाचे कप दारूच्या पेल्यासारखे होते.
नादिराचं पाळण्यातलं नाव फ्लॉरेन्स इजिकेल. ती ज्युइश होती. जन्म 1932चा. तारीख 5 डिसेंबर. जन्म बगदादला झाला. पुढे इजिकेल कुटुंब मुंबईला आलं. आई-वडील, फ्लॉरेन्स आणि तिचे दोन भाऊ नागपाड्याला मुस्लीम वस्तीत राहू लागले. मुलं रीतसर शाळेत जाऊ लागली. वडलांचं बस्तान मात्र बसत नव्हतं. वयाच्या बाराव्या वर्षी फ्लॉरेन्स सिनेमाच्या दुनियेत आली.
दोन-चार सिनेमे मिळाले. चालले नाहीत, पण सिनेमावाल्यांचं फ्लॉरेन्सकडे लक्ष गेलं. गोरापान रंग, निळे डोळे, भुरे केस, चेहऱ्यावर गुर्मी, ओठांवर मादक हसू नि नजरेत एक बेफिकिरी. 'तुझ्या कांतिनें चंद्र झळझळे.'
असं म्हणतात की, नर्गिसनं राज कपूरच्या स्टुडियोची वाट धरली ते मेहबूबना आवडलं नाही. नर्गिसला सिनेमात मेहबूबनी आणलं. मेहबूब हिंदी सिनेमातलं झगझगीत नाव. हाताला बेसुमार यश. 'आन' चित्रपटात मेहबूबनी तीन नायिका नक्की केल्या होत्या; पैकी एक होती नर्गिस. ती आर. के. कँपमध्ये गेली म्हटल्यावर मेहबूबनी तिच्या नाकावर टिच्चून फ्लॉरेन्सला सिनेमात घेतलं.
मेहबूबच्या पत्नी सरदार अख्तर यांनी फ्लॉरेन्सचं रुपडं सजवलं; कॅमेऱ्यासमोर बोलायचं-उठायचं-बसायचं कसं; चारचौघांत कसं वागायचं; मेकअप कसा नि किती करायचा वगैरे सगळं तिला शिकवलं. हल्लीच्या कॉर्पोरेटच्या भाषेत सांगायचं तर तिचं 'ग्रूमिंग' केलं. नि तिचं बारसंही करून टाकलं. फ्लॉरेन्सची नादिरा झाली. नव्या नट्यांना 'न'वरून नाव देण्याचा मेहबूबचा रिवाज होता : नर्गिस, निम्मी, नादिरा.
'आन' (1952) हा भारताचा पहिला टेक्निकलर सिनेमा. 'आन'चे तांत्रिक सोपस्कार लंडनला झाले; संगीतकार नौशाद यांनी शंभर वादकांचा वाद्यवृंद जुळवला. असं खूप काही मेहबूबनी केलं. 'आन'वर पस्तीस लाख खर्च केले. म्हणजे चलनफुगवटा वगैरे बाबी धरून आजच्या काळात 25 कोटी.
इतकं करूनही 'आन' तिकीटखिडकीवर फार चालला नाही म्हणतात.
नर्गिस राज कपूरची नायिका झाली हे न पटल्यामुळे नाराज मेहबूबनी नादिराला रुपेरी पडद्यावर पेश केलं राज कपूर आणि नर्गिसला खिजवायला, असा माझा प्रश्न होता. त्यावर नादिरानं 'टेबलावर ठेवलेलं ते निळ्या रंगाचं काचपात्र पाहिलं ? रुबाबदार दिसतं ना? माझ्या भावानं ते अमेरिकेहून पाठवलं', असं भलतंच उत्तर दिलं. अडचणीचा प्रश्न आला की, नादिरा तुमची सोंगटी अलगद सापावर ठेवायची की, तुम्ही धाडदिशी खाली. ती शिडीवर उभी, नि हसायची.
'आन'चा पुढचा भाग (अर्थात सिनेमाबाहेरचा) फारच मजेशीर आहे. राज कपूरनं आपल्या पुढच्या सिनेमासाठी 'श्री 420' नादिराला घेतलं नि तिला मोठी भूमिका दिली आणि एक अफलातून गाणं दिलं 'मुड मुड के ना देख, मुड मुडके'. म्हणजे मेहबूब कँप सोडून नादिरा राज कपूर कँपात गेली. 'श्री 420' ची नायिका होती नर्गिस. नादिराची भूमिका तेवढ्याच तोलामोलाची होती. मेहबूब जळफळत बसले. 'श्री 420' तूफान चालला. नर्गिस नि नादिरा सख्ख्या मैत्रिणी झाल्या.
हा सगळा किस्सा मला खूप रोमहर्षक वाटला. राज कपूर-मेहबूब यांच्या शीतयुद्धावर मी नादिराला तीन-चार प्रश्न विचारले. तिचं काहीतरी वेगळंच. "चारेक वर्षांपूर्वी मी माझ्या भावाकडे इस्रायलला गेले होते. तो तेल अवीवला राहतो. आम्ही सकाळी चहा-न्याहारी करत होतो तोच एकदम सायरन वाजू लागले नि माझा भाऊ, वहिनी नि लहान पुतण्या पटापट जमिनीवर प्रेतवत् पडून राहिले. मी कपाटाच्या मागे लपले. खूप दूर कुठंतरी बॉम्ब पडल्याचा आवाज झाला, लोक किंचाळत होते नि पळत होते. दोनेक तासात सगळं संपलं नि आम्ही जेवायला बसलो. पुतण्या म्हणाला, "आत्या, किती घाबरतेस तू. हे आम्हाला रोजचं आहे", असं ती सांगत होती. मग म्हणाली, "बॉम्बस्फोटापेक्षाही एकटेपण वाईट."
गुणवंतीला छान प्रश्न सुचला. तिनं नादिराला 'श्री 420' विषयी विचारलं. नादिराची कळी खुलली.
"अगं, तुला सांगते 'श्री 420' चं सगळं काम मजेत झालं. It was a big picnic. राजचं (कपूर) काम सगळं चोख. त्याचे तंत्रज्ञ नि इतर कर्मचारी सगळे सिनेमाच्या प्रोसेसमध्ये बुडालेले. कलावंत, गायक, संगीतकार, रेकॉर्डिस्ट, कॅमेरामन सगळ्यांना अभिमान वाटायचा की, आम्ही राजसाहेबांचं पिक्चर करतोय. राज तर सिनेमात इतका गुंतलेला असायचा की, शूटिंगच्या काळात त्याला कासव दिसलं तर सिनेमात ते कुठं बसवता येईल काय हाच विचार तो करायचा. सिनेमात गरज नसेल तर मग ते कासव काय कामाचं ? इतकी कमिटमेंट."
"तुमचं 'मुड मुड के ना देख मुड मुड के' हे गाणं खूप गाजलं."
"खूप गाजलं. त्या गाण्यामुळे मला प्रेसवाले 'मुड मुड के ना देख' गर्ल म्हणू लागले. पण त्या गाण्याचं शूटिंग फार कठीण होतं."
"का?"
"माझ्या अंगात मोठा झगा होता. त्याचं वजन मला पेलवेना. तो पायांत सारखा अडकत होता. वर माझ्या डोक्यावर मुकुट नि पिसं वगैरे लावली होती. शिवाय, हातमोजे, पायांत उंच टाचेच्या सँडल्स नि मी नृत्य करायचं. काही विचारू नका. उकाड्यानं आम्ही सगळेच वैतागलो होतो. सिनेमाचे सेट तेव्हा वातानुकूलित नसत. राज म्हणायचा, 'तू मादक दिसलं पाहिजे.' घामानं चिंब भिजलेली नि मादक."
'श्री 420'मुळे नादिराला पुष्कळ यश मिळालं. पायलीभर नवे सिनेमे तिला मिळाले. तिनं रोल्स रॉईस घेतली; पण ती टाइपकास्ट झाली. तिला 'श्री 420'च्याच धर्तीच्या भूमिका मिळू लागल्या. मादक, मदिर डोळ्यांची खलनायिका. सिनेसृष्टीतली श्रेष्ठ नायिका होण्याचा तिचा मनसुबा धुळीस मिळाला.
नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, माला सिन्हा, नूतन या मुख्य भूमिकेत, तर नादिरा समासाबाहेर उभी एका हातात दारूचा ग्लास नि ओठांच्या जुळ्या चिमटीत जळती सिगरेट.
याचं मूळ हिंदी सिनेमाच्या समाजशास्त्रात आहे. हिंदी सिनेमावाल्यांनी (खास करून ब्लॅक अॅण्ड व्हाइट कालखंड) भारतीय नारीला एकदम उंच चबुतऱ्यावर बसवलं.
भारतीय स्त्री ही सात्त्विक नि सोज्वळ आहे हे दाखवणं ही सिनेमा धंद्याची गरज होती. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सिनेमा पाहात असे, आजही पाहतो. रुपेरी पडद्यावर नूतन किंवा माला सिन्हाला सात्त्विक भूमिकेत बघून पुरुष प्रेक्षकांच्या मनाला संतोष होत असे : माझी बायकोही अशीच आहे. आता पेच असा झाला की, सगळं जर मंगलमय नि सोज्ज्वळ असेल तर सिनेमाच्या गोष्टीत ताण येणार कसा? तर मग एक खलनायिका आली. ती दारू पिते, सिगारेटी फुंकते, क्लबात कॅबरे नाच करते. नि नायिकेच्या नवऱ्याला फितवते. ख्रिश्चन किंवा यहुदी नट्यांना 'तशा' भूमिका मिळायच्या. यातली एक गंमत तर थोरच. मुस्लीम नट्या सात्त्विक नि सोज्ज्वळ दाखवायला हिंदू निर्माते तयार होते; परंतु कॅब्रे दारू वगैरे मादक बाबी ख्रिश्चन-ज्युइश नट्यांसाठी राखीव होत्या.
नादिराला हा प्रश्न विचारला. तिनं सुरेख उत्तर दिलं. ती म्हणाली, "ज्या काळात हिंदू किंवा मुस्लीम स्त्रिया घराबाहेर पडत नसत तेव्हा ख्रिश्चन ज्युइश मुली नोकरी करू लागल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आमच्या समाजातल्या मुली टायपिस्ट, स्टेनो वगैरे कामं करायच्या. त्या स्कर्ट पोलका नेसायच्या आणि पुरुषांबरोबर नृत्य करण्यास त्यांची आडकाठी नसायची. तो आमच्या जगण्याचा, सांस्कृतिक भावजीवनाचा भाग होता. त्यामुळे हिंदी सिनेमात धीट, मोकळ्याढाकळ्या भूमिका आमच्याकडे आल्या आणि ख्रिश्चन-यहुदी मुलींची एक स्क्रीन प्रतिमा आपोआप तयार झाली." नादिरा त्या चौकटीत बंदिस्त झाली.
मूक चित्रपटाच्या काळात सुलोचना ही आघाडीची अभिनेत्री ज्युइश होती. तिचं मूळ नाव रूबी मेयर्स. सुलोचनाचा पगार मुंबईच्या गवर्नरपेक्षा जास्त होता. एस्थर विक्टोरिया अब्राहम (प्रमिला) ही यहुदी होती, तर कुकू अँग्लो-इण्डियन होती. 1950 च्या दशकात कुकूचा नाच हे सिनेमाचं मोठं आकर्षण असायचं. 'अंदाज', 'यहुदी', 'अनोखी अदा', 'चलती का नाम गाडी' हे कुकूचे गाजलेले चित्रपट. 'बरसात' आणि 'आवारा' या राज कपूरच्या दोन चित्रपटांत कुकूच्या पदलालित्याची खूप प्रशंसा झाली. ती एका नृत्याचे सहा हजार रुपये घेत असे.
कुकूनं हेलनला सिनेमात आणलं. हेलनचा जन्म बर्मा देशातल्या (आता म्यानमार) एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या धकाधकीत तिनं आपल्या आईसह बर्मा देश सोडला नि ती कशीबशी कलकत्त्याला (आता कोलकाटा) आली. नि तिथून मुंबईला. कुकूची गादी हेलननं पुढं चालवली.
या सगळ्या मुली गुणी होत्या. कौटुंबिक अडचणींमुळे त्या सिनेमात आल्या. शिक्षण फारसं नसलं तरीही जगण्याकडे पाहण्याची नजर आधुनिक, निखळ होती. कष्ट करण्याची तयारी होती. नादिरा-कुकू हेलन-फिअरलेस नादिया स्वतःच्या अटींवर मानानं जगल्या. पैशाचे व्यवहार कळायचे नाहीत, आर्थिक शिस्त नव्हती. म्हातारपणी मनाला क्लेश झाले. तरीही, भारतीय स्त्रीचं एक न्यारं नि आत्मभानानं निथळणारं रूप त्यांनी कचकड्याच्या पडद्यावर पेश केलं नि भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा मान राखला.
नादिरानं एकूण ऐंशी चित्रपट केले: 'आन', 'श्री 420', 'दिल अपना प्रीत पराई', 'इन्साफ का मंदिर', 'पाकिजा', 'हंसते जख्म' हे तिचे चित्रपट गाजले. मावळत्या वयात तिनं दोन अविस्मरणीय सिनेमे केले : 'जुली' आणि रमेश सिप्पीचा 'सागर'.
मेहबूब हे ब्लॅक अॅण्ड व्हाइट काळातले मातब्बर दिग्दर्शक तर रमेश सिप्पी ('शोले'वाले) हे सत्तरच्या दशकातलं एक मोठं नाव. "दोघांच्या कार्यशैलीत फरक काय ?" असं मी विचारलं.
नादिरा म्हणाली, "मेहबूबसाहेब सेटवर खूप आरडाओरडा करायचे, शिव्या द्यायचे परंतु सिनेमावर त्यांची अद्भुत पकड होती. रमेश सिप्पी कलावंताशी सौम्य आवाजात बोलायचे, अजिबात चिडायचे नाहीत. सिप्पींचीदेखील सिनेमावर पकड असायची."
"दोघांत निवड करायची झाल्यास"
"अर्थातच मेहबूबसाहेब. ते लीजंड होते नि त्यांनी मला सिनेमाचा संस्कार दिला."
नादिरानं दोन लग्नं केली. तिचा पहिला नवरा हा गीतकार होता, नक्शब. लता मंगेशकरांचं विख्यात 'आएगा आनेवाला' हे 'महल'चं गाणं नक्शबनं लिहिलं. नक्शब बाहेरख्याली होता. नादिरानं त्याला सोडलं. दुसरा नवरा अरबी होता. तो काहीच करायचा नाही. खाणं-पिणं नि बिछान्यात लोळणं. नादिरानं त्याला सोडचिठ्ठी दिली.
मीनाकुमारी आणि मोतीलाल हे नादिराचे जवळचे मित्र. ही मैत्री निःस्वार्थ होती. मोतीलाल यांच्या अखेरच्या आजारपणात नादिरानं त्यांची काळजी घेतली. मीनाकुमारीची दारू सुटावी म्हणून नादिरानं हर प्रकारे प्रयत्न केले. मीनाकुमारी मरण पावली. तिचं पार्थिव शरीर घरी आणण्यात आलं. दफनविधीची तयारी करायची ते राहिलं बाजूला. मीनाकुमारीचे नातेवाईक तिच्या संपत्तीचा हिशोब करायला एका खोलीत बसले, असं नादिरा म्हणाली. "मीनाकुमारी रोज सकाळी हातात दिवा घेऊन दुःख शोधायला बाहेर पडायची", असंही ती पुढे म्हणाली.
नादिराचं एकटेपण आगंतुकाप्रमाणे तिच्या दारात रोज हजर असायचं.
मागील वर्षभर महिन्यातून दोन वेळा याप्रमाणे अंबरीश मिश्र यांचे लेख साधना साप्ताहिकात'बोहारणीचं गाठोडं' या सदराखाली प्रसिद्ध होत आलेत, हे सर्व लेख www.weeklysadhana.in वर वाचता येतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Aparna Mahajan- 08 Jul 2026
मला वर्गणीदार व्हायचे आहे. माझ्याकडे हार्ड कॉपी येणार ना?
save