डिजिटल अर्काईव्ह

या वर्षीच्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने 27 जून 2026 रोजी महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र (पुणे) आणि साधना साप्ताहिक यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील दोन तज्ज्ञ (डॉ. आनंद बंग व डॉ. हमीद दाभोलकर) आणि दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी (तेजस्वी सातपुते व हिंमत जाधव) यांची दीर्घ मुलाखत मुक्ता पुणतांबेकर व सोनाली काळे यांनी घेतली. प्रामुख्याने तरुणाईसाठी झालेल्या त्या मुलाखतीचे शब्दांकन लवकरच साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध होईल. मात्र गेल्याच महिन्यात निधन झाले त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अमली पदार्थ व व्यसनमुक्ती या क्षेत्रात मोठे काम करून ठेवले आहे. त्याचेच एक छोटे उदाहरण म्हणून त्यांच्या "वादळाचे किनारे" या पुस्तकाचा उल्लेख करता येईल, व्यसनांना बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील लहान मुले ही त्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे. साधना प्रकाशनाकडून आलेल्या त्या पुस्तकातील एका मुलीची गोष्ट इथे प्रसिद्ध करीत आहोत. अमली पदार्थ विरोधी दिवसाचे निमित्त आणि डॉ. नाडकर्णी यांचे स्मरण म्हणून !

एकदा का झोप अंगावर चढायला लागली की चुटकीला दुसरे काही दिसत नाही. हेलकावे खाणाऱ्या एसटी बसमध्ये ती रात्रभर अशी झोपली होती की जणू घरीच पांघरुणात लपेटलेली आहे. आईची मांडी हे त्याचे एक कारण होते. त्या दोघी बसल्या होत्या तिथे तिसरी सीट.

रिकामीच होती. त्यामुळे ऐसपैस पसरायची सोय होती. काका आला होता अमरावती स्टँडवर सोडायला आणि इथे उतरवून घ्यायला येणार होती मीराताई. चुटकीला मीराताईचा लळा होता. ती इंजिनिअर होते आहे याचा अभिमानही होता. पुण्यामधल्या शिवाजीनगरच्या स्टॅन्डवर मीराताई भेटली तेव्हा चुटकी तिला चिकटलीच.

मीराताईच्या रूमवर जाऊन अंघोळ-नाश्ता आटोपून त्या तिघी ऑटोमध्ये बसल्या आणि मीराताईने सांगितले, "विश्रांतवाडी... येरवडा" चुटकीने मनातल्या मनात उडी मारली. बाबा भेटणार... गेला महिनाभर बाबा 'हॉस्पिटल'मध्ये आहे हे चुटकी ऐकत होती. पण अमरावती तर मोठे शहर आहे. पुण्याला का आणले त्याला ?... जाताना छान बॅग भरून, देवाला.

नमस्कार करून गेला होता बाबा. आईला म्हणत होता, "जायलाच हवं का तिथे इतक्या लांब ?... पोरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो ना सोडली म्हणून..." बाबाने चौथ्या वेळी शपथ घेतली तेव्हा चुटकीनेच त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला होता. आईने चुटकीला समजावून सांगितले होते की कॅन्सरसारख्या आजाराला कसे थेट मुंबईचे टाटा हॉस्पिटल गाठतात तसे दारूच्या व्यसनासाठी पुण्याचे मुक्तांगण गाठतात.

तर ह्या मुक्तांगणची इमारत चुटकीला किल्ल्यासारखी दिसली. त्याच्यावर कुठे भगवे निशाण लावले आहे का?... तिची नजर शोधत होती. आवारात बऱ्यापैकी गर्दी होती. आईने बाबांचे नाव सांगितले. आलेल्या सर्वांची नावे लिहिल्यावर, अंकुश दरवेशनी आईची पिशवी, पर्स तपासण्यासाठी मागितली. इथे हिरव्या रंगाच्या बॅजेस लावलेल्या सर्वांचे नाव-फोटो वाचायला चुटकीला गंमत येत होती... अंकुश दरवेश... वेगळेच नाव आहे.

"काही लपवलेले नाही त्या पर्समध्ये..." आई म्हणाली.

"अगदी खात्री आहे आम्हांला ताई... पण आमचे मित्र कधीकधी त्यांच्या आजारामुळे घरच्या माणसांना भरीस पाडतात... विडी, तंबाखू अशा गोष्टी आणायला. म्हणून आपण सावध राहायचं" असे संजय बसागरे म्हणाले... सं... ज... य... बसा... गरे !

लोखंडी दरवाजातून आत आल्यावर चुटकीला समोर माशांचा मोठा फिशटँक दिसला. आणि त्याच्या मागच्या अंगाला मस्त उतरत्या पायऱ्यांचे थिएटर. त्याच्या समोर मोठे मोकळे स्टेज. त्या काळ्या दगडी भिंती आणि त्यावरचे हिरवेगार वेल सकाळच्या उन्हात चमकत होते. सगळ्या नातेवाइकांना चहा विचारला जात होता. एक टाय लावलेले, थोडे टक्कल असलेले गृहस्थ इकडे तिकडे फिरत होते. ते चुटकीकडे बघून ओळख असल्यासारखे हसले... 'अमोल पोटे'... चुटकीला आता ह्या खेळाची गंमत वाटायला लागली होती... आपला बाबा कधी भेटणार हा प्रश्न होताच.

एवढ्यात सगळ्या नातेवाइकांना एका प्रशस्त हॉलमध्ये बोलावण्यात आले. आई-चुटकी आणि मीराताई अगदी समोरच्या भागातच बसल्या. कितीतरी लोक आले होते. चुटकीपेक्षा लहान आणि मोठी दोन्ही गटांमधली मुले-मुली होती. आजी-आजोबांच्या वयाची मंडळी होती. त्या हॉलच्या भिंतींवर रंगीत फोटोग्राफ लावले होते. त्यातल्या एकात आमिर खान होता आणि एकामध्ये प्रकाश बाबा आमटे. चुटकीने बरोबर ओळखले आणि काही फोटोंमध्ये दिसणारी ती स्मार्ट, सुंदर, मोकळ्या केसांची ताई तर समोरच होती. तिचे नाव मुक्ताताई. ती इकडची मुख्य आहे म्हणे. किती मस्त... सगळ्या आजारी पुरुषांना मदत करणारी एक मुलगी. चुटकीलाही तिच्या 'मुलगी' असण्याचा अभिमान होता. तिने कल्पना चावला, डॉ. आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दलची माहिती व्यवस्थित वाचली होती.

मुक्ताताईच्या शेजारी आले, दत्ता श्रीखंडे... ते तानाजी मालुसरेंसारखे दिसत होते... भरदार मिशा, पिळदार शरीर, कपाळावर टिळा. पण चेहरा हसरा होता.

"तुम्हां सगळ्यांचे मुक्तांगण परिवारात स्वागत..." असे गोड आवाजात म्हणाली मुक्ताताई. पुढचा तासभर खूप प्रश्नोत्तरे झाली. त्यातला बराच भाग चुटकीला कळला नाही. पण तरीही ती मुक्ताताईच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तो दत्ताकाका एके काळी व्यसनामध्ये अडकला होता. त्यानेच सांगितले. चोरीमारी, गुन्हेगारी असे प्रकार केल्यावर तो इथे आला आणि बदलला. आता त्याची मुले मोठी झाली, त्याने तर एमए नावाची डिग्री घेतली.

"आपला बाबापण बदलू शकणार." चुटकी मनात म्हणाली. पहिलीत असताना बाबा तिला रोज बाइकवर सोडायचा शाळेला. सकाळीसकाळी त्याच्या कुशीत बसून वारा खायला भारी वाटायचे. तेव्हा भांडणतंटा काही नव्हता. चुटकी तिसरीत आली तेव्हापासून बाबाची, आईची तसेच बाबा काका, बाबा-आजोबा अशी भांडणे सुरू झाली. "माझा वाटा माझ्या ताब्यात टाका" हे वाक्य चुटकीच्या चांगलेच लक्षात होते. आजोबा एकदा म्हणाले होते, "अरे बाप आहे तुझा मी ! वाऱ्यावर कसा सोडेन तुम्हांला?" तर बाबा म्हणाला होता, "उपकार नको आहेत तुमचे... हक्क द्या." आई मध्ये पडली तर तिला ढकलले होते त्याने. त्या रात्रीपासून चुटकीला भीतीची स्वप्ने पडायला लागली होती... तिच्या आठवणीमध्ये कधीच घडले नव्हते अशी अजून एक गोष्ट तेव्हापासून सुरू झाली. रात्री झोपेमध्ये, तिचे अंथरूण ओले व्हायला लागले मधूनमधून.

"व्यसनाच्या काळामध्ये सगळे कुटुंब मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा अनेक त्रासांमधून जात असते." दत्ताकाका सांगत होता. चुटकीने आईकडे पाहिले. आईच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या, गळ्यामध्ये साधे दोऱ्यात ओवलेले मंगळसूत्र... किती काम करते ती घरात. कोणाचेही मन मोडत नाही, आज्ञा तोडत नाही. आणि एवढे असूनही आई चुटकीचे लाड जमतील तसे पण मनापासून करते. पाचवीच्या पुस्तकात, कविता होती ना चुटकीला... 'जवा हाताला चटके, तवा मियते भाकर.' ती कविता समजून सांगताना गुरुजी म्हणाले होते, "संसारामध्ये अडचणी आल्याशिवाय कुटुंबाचे पालनपोषण करता येत नाही असे बहिणाबाई म्हणतात." पण इथे आई सारखे चटके खात होती. बाबाला वाटायचे की तिचे बाबावरचे प्रेम कमी झाले आहे. चुटकीने ऐकलेही होते तसे.

"तूपण आता त्यांना सामील झाली आहेस" तो म्हणायचा.

"अहो, त्यांना म्हणजे कुणाला?... तुमचे आई बाप, तुमचे भाऊ-वहिनी... मी आधी आले ह्या घरात की तुम्ही?" चुटकीला एक-एक प्रसंग आठवत होते. मुक्ताताई म्हणाल्या की ह्यानंतर एक मीटिंग सगळ्या आयांसाठी, पत्नींसाठी, बहिणींसाठी आहे... आणि खेळण्याची वेळ आहे सर्व मुलांसाठी... त्यासाठी सगळ्यांनी 'अंकुर' वर्गामध्ये जायचं आहे. मीराताई म्हणाली, "चल मी येते तुझ्या बरोबर..."

हा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता. जिन्यावरून जाताना चुटकी बाबांना शोधत होती. तिला वॉर्डाचे दरवाजे दिसले. डॉक्टरांच्या खोल्या दिसल्या. जिन्यावरून जाताना खमंग वास आला. त्या दारावर लिहिले होते 'सहचरी किचन'... "व्यसनाचा आजार ज्या घरात आहे अशा स्त्रियांनी चालवलं आहे हे स्वयंपाकघर" मीराताईला सांगत होत्या... सोनाली काळे... इकडची माणसं सगळी हसतमुख आहेत. इकडचे 'पेशंट्स' सुद्धा बिछान्यावर पडून नाही आहेत. सगळीकडे हालचाल आहे. कितीतरी वर्गपण एकाच वेळी सुरू आहेत. संपूर्ण पांढऱ्या गणवेशात वावरणारे, लायब्ररी असे दारावर लिहिलेल्या वर्गात बसून वाचणारे... हे सगळे बाबासारखेच दारू सोडायला आलेत?... म्हणजे इतक्या सगळ्यांना असा त्रास आहे? चुटकीचे डोके सुरूच होते. बाहेर मोकळी गच्ची आणि त्याला लागून असलेल्या वर्गामध्ये जवळजवळ पंधरा-वीस मुले-मुली होती. दहा वर्षांखालच्या मुलांचा वर्ग मृणालिनीताई घेणार होती आणि अकरा वर्षांपुढच्या मुलांसाठी मृण्मयीताई. चुटकी बरोबर अकरा वर्षांची... ती 'मोठ्या' मुलांच्या गटात आली. सोबत मीराताईसुद्धा. ओळख करून देताना मीराताई म्हणाली, "माझे काका येथे उपचार घेताहेत. आणि ही त्यांची मुलगी..." 

"अर्पिता... आम्ही अमरावतीहून आलो आहोत..."
"खूप छान नाव आहे तुझे" मृण्मयीताई म्हणाली. "पण घरात सगळे मला चुटकी म्हणतात..."
"हे नाव तर फारच 'भारी' आहे." ताई म्हणाली.
अर्पिताला सगळ्यांसमोर चुटकी म्हटलेले खरं तर आवडत नाही. पण आज तिला वाटत होते की ह्या ताईने तिला त्याच नावाने हाक मारावी.
ताईने एक मोठे पोस्टर लावले होते समोर... त्यात खूप 'इमो-जी' होते. त्याप्रमाणे सगळे जण वेगवेगळ्या भावनांची नावे लिहीत होते... प्रेमळ, आनंदी, रागावलेला, घाबरट... किती नावे निघाली. आपल्या मनातल्या भावना ओळखायच्या तर त्या वेळी नेमके काय करायचे ?
"अर्पिताने विचार करायचा... चुटकीने भावना ओळखायची. असा खेळ करू या आपण... मी अर्पिता बनते, तू चुटकी..." मृण्मयीताई म्हणाली. "लक्षपूर्वक पाहा हं माझ्याकडे... मी प्रसंग सांगते. रात्रीची वेळ आहे. बाबा घरी आलेले नाहीत अजून..."
चुटकी मृण्मयीताईच्या समोर बसली होती. मृण्मयीताईच्या, अर्पिता बनून केलेल्या हालचाली तिला कळत होत्या. अर्पिता होमवर्क करत होती. वाचतावाचता थांबली. दरवाजाकडे बघितले.
"आजपण उशीर होणार बहुतेक... आणि आल्यावर काही घडलं तर... परवा हातच उगारला होता त्यांनी आईवर... काय घडणार कोणास ठाऊक" अर्पिता बनलेली मृण्मयीताई स्वतःशीच बोलत होती.
"भीती... काळजी... चिंता... टेन्शन" चुटकीच्या तोंडून शब्द आले.
"शाब्बास... आपण स्वतःशी, ज्या गप्पा मारतो ना मनात, तेच असतात आपले विचार." ताई म्हणाली. "म्हणजे मी बाहुलीशी गप्पा मारते ते माझे विचार असतात." चुटकी म्हणाली.

"मी आत्ता, तुझी बोलकी बाहुली झाली होते... तर आपल्यासारख्या मुलांसाठी ह्या भावना नवीन नाहीत." 'आपल्यासारख्या?' चुटकीने विचारले. त्यावर मृण्मयीताईने तिची स्वतःची गोष्ट सांगितली. ती चुटकीहूनही लहान असताना तिच्या बाबांना ह्या आजाराने गाठले होते. त्यांनी मुक्तांगणची मदत घेतली आणि स्वतःला बदलवले. इतकी वर्षे तो बदल टिकवलाच पण स्वतःमध्ये खूप चांगले गुणसुद्धा जोपासले त्यांनी. तर त्या काळामध्ये चुटकीएवढ्या वयाची मृण्मयीताई मुक्तांगणच्या अशा वर्गांना यायची. तेव्हा मुक्ताताईच्या आई ते वर्ग घ्यायच्या... अरे, त्यांचाच फोटो पाहिला आपण खालच्या हॉलमध्ये. आणि दाढीवाल्या आजोबांचा... चुटकी मनात म्हणाली. आणि मुक्ताताईपण तेव्हा नुकतीच सायकॉलॉजिस्ट बनली होती.

"सायकॉलॉजिस्ट म्हणजे?..." चुटकीने दबल्या आवाजात मीराताईला विचारले. पण ते मृण्मयीताईने ऐकले. "सायकॉलॉजिस्ट म्हणजे मनाचा अभ्यास करून मनाचे आरोग्य कसे जपावे हे सगळ्यांना शिकवणारे... विचार, भावना आणि वागणे अशा तिघांनाही प्रगतीकडे न्यायला मदत करणारे... तर चुटकी तुझ्याशी जशी आज मी बोलते आहे तशी मुक्ताताई माझ्याशी गप्पा मारायची... तेव्हापासून मी ठरवले की एक दिवस मीपण मुक्ताताईसारखी बनून इथे काम करणार." मृण्मयीताई म्हणाली.

"आणि खरेच तसं झालं... काय भारी" मीराताई म्हणाली. "मी तर इंजीनिअरिंग करते आहे... मला काय काम करता येईल... मी काही सायकॉलॉजिस्ट नाही."
"पण तू आणि तुझे कुटुंब हा प्रश्न जवळून पाहता आहात... अनुभवता आहात... तो अनुभव तुला इथे आमच्या सोबत शेअर करता येईल... तू आपल्या मीटिंग्जना तर ये... आणि त्या 'ऑनलाइन' पण असतात." ताई म्हणाली.
"भारी... म्हणजे मीपण तुला भेटू शकणार गावाहून" अक्षरशः उडी मारत चुटकी म्हणाली.
"आपल्या मनात जेव्हा खूप निगेटिव्ह भावना निर्माण होतात तेव्हा काय होतं?" मृण्मयीताईने विचारले. सगळे जण एकेक करून बोलायला लागले.
"इतर मुलांचे किती मस्त चाललं आहे आणि आपलीच वाट लागलीय... असे वाटते." एक मुलगा म्हणाला.
"मी देवाची रोज प्रार्थना करते... बाबाला बुद्धी दे म्हणून." चुटकीच्याच वयाची एक मुलगी म्हणाली.
"आपला बाबा दारुडा आहे म्हणून लोक आपल्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतात." नववी-दहावीतला एक दादा म्हणाला.
चुटकीला ही सगळी वाक्ये तर पटलीच, पण इतक्या साऱ्यांच्या मनात आपल्यासारखेच विचार येतात हे ऐकून तिला थोडे बरे वाटले.
"आपल्या मनामध्ये म्हणजे अर्पिताच्या विचारांकडे चुटकी पाहू शकते..." मृण्मयीताई सांगत होती.
"पण त्या दोघी एकच आहेत ना..." एका मुलीने विचारले.

"तरीसुद्धा शक्य आहे... बघ हं. तू तुझ्या नाडीचे ठोके मोजू शकतोस की नाही... स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देऊन किती वेळा हवा आत घेतलीस-सोडलीस हे मोजू शकतोस की नाही... तसेच आपण मनातल्या गप्पांकडेपण पाहू शकतो." ताई शांतपणे समजावून सांगत होती. "अशी सवय स्वतःची स्वतःला लावली की आपण त्या भीतीला, चिंतेला समजून घेऊ शकतो... इतर लोक आपल्या बरोबर जे बोलतात त्याचा अर्थ कसा घ्यायचा ते ठरवू शकतो... आता समज मी तुझ्या शेजारी राहणारी काकू आहे... तुमच्या घरात घडणाऱ्या गोष्टी ती पाहत असते. तिला तुझ्याबद्दल प्रेम, काळजी आहे... मधूनमधून ती तुला बोलावते, खाऊ देते... तेव्हा तिचा चेहरा कसा असतो डोळ्यांसमोर आण... चल आपण करून पाहू या" क्षणात मृण्मयीताई काकू बनली. चुटकी अर्पिता बनली.

काकूने अर्पिताला बोलावले. चौकशी केली. खाऊ दिला. आणि अर्पिताला निरोप दिला... "येत जा गं मधूनमधून... भूक लागली तरी सांगत जा मला... ये आता..." आणि अर्पिता वळत असताना स्वतः शी बोलल्यासारखी ती काकू म्हणाली, "अरेरे... बिच्चारी !"

पाहणाऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया उमटल्या.
"कोणत्या भावना होत्या काकूंच्या" ताईने विचारलं.
'दया...'
'सहानुभूती...'
'कीव...' मीराताई म्हणाली.
मृण्मयीताईने पांढऱ्या फळ्यावर ह्या भावना लिहिल्या. आणि 'अरेरे बिच्चारी!' हे शब्दसुद्धा लिहिले. "कोणत्या शब्दाला कोणत्या भावना जोडाल?" तिने विचारले.

"अरेरे म्हणजे दया..." एक जण म्हणाला. "बिच्चारी म्हणजे कीव..." मीराताई म्हणाली. "तुम्हांला कोणत्या भावनेचा आणि काय त्रास झाला?" मृण्मयीताईने विचारले.

"दया तरी एक वेळ ठीक आहे... त्यातून काकूंचे प्रेम दिसते... पण कोणीही मला बिच्चारी का म्हणावे?... ते नाही आवडले." एक मुलगी म्हणाली. "खरं आहे... दुसऱ्याने आपली काळजी करावी पण कीव करू नये असे आपल्याला वाटते. पण समोरच्या माणसाच्या बोलण्यावर आपला कंट्रोल नाही तर आपण काय करू शकतो?" मृण्मयीताई.
"काळजी, प्रेम दाखवल्याबद्दल 'थैंक यू' म्हणू आम्ही." एक मुलगा म्हणाला.
चुटकी सगळ्यांचे संभाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकत होती.
"आणि त्यांनी समजा आपली कीव केली तरीसुद्धा..."
मीराताई म्हणत होती तर अचानक चुटकी म्हणाली, "अर्पिता सांगेल चुटकीला... आपण नाही एकमेकींची कीव करायची... इतरांना करू दे."
"शाब्बास चुटकी... कसं सुचलं तुला हे" चुटकीला जवळ घेत मीराताई म्हणाली. चुटकी खूश होती. एवढ्यात एका मुलीने 'बिच्चारी' शब्दाखाली लिहिले, 'विचारी.' सगळे छान हसले.
"जगाला म्हणू दे बिच्चारी... आपण आहोत विचारी." सगळे एकसाथ म्हणाले.
वर्ग संपल्यावर चुटकी आईकडे आली तर आईसुद्धा खूश दिसत होती. तिच्याशी एक आजी बोलत होत्या... प्रफुल्ला मोहिते... छान होत्या त्या पण, गोऱ्यापान... हसऱ्या !...

त्यानंतर हे सगळे बाबांना भेटायला गेले. बाबा बसले होते, त्यांच्या सोबत मानव सर बसले होते. बाबा एकदम मस्त दिसत होते. चुटकी त्यांच्या गळ्यात पडली. बाबांनी मानव सरांबरोबर सगळ्यांची ओळख करून दिली. "अर्पिता, कसे दिसताहेत बाबा?" मानव सरांनी विचारले.

"छान दिसताहेत." कधी नव्हे ते चुटकीला लाजल्यासारखे झाले.
"तुझे बाबा इथे सगळ्यांसोबत खूप नवीन गोष्टी शिकत आहेत... त्यांना नवे आणि चांगले मित्र मिळताहेत." मानव सर सांगत होते. ते खरं होतं कारण बाबांनी अर्पिताची ओळख करून दिली किती जणांबरोबर... नितीन सर, निहार सर, ढवळे सर, मंगेश सर ! खूप जण होते.

इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या स्टेजवर बाबांबरोबर चुटकी, आई, अर्पिता जेवायला बसल्या. "मस्त जेवण असते इकडे..." बाबा सांगत होते. जेवण वाढणाऱ्या हेमेंद्रकाकांनी चुटकीला एक सफरचंद आणून दिले. "मानव सर म्हणताहेत की महिन्याचा कोर्स पूर्ण झाला की अजून थोडे दिवस राहा... आम्हांला मदत कर." बाबा सांगत होते. चुटकीने कान टवकारले.

"तुम्ही काय करणार?" आईने विचारलं.
"ठरवलं नाही अजून... आठवण खूप येते तिकडची." बाबा म्हणाले.
"बाबा, तुम्ही समजा राहिले इथे तर आम्ही परत एकदा तुम्हांला भेटायला येऊ आणि मग पुन्हा एकदा तुम्हांला न्यायला येऊ... हो की नाही आई!" मान कलती करून आईकडे पाहत चुटकी म्हणाली.
"काका, आपण पुण्यापासून लांब राहतो... ह्याच वेळी जास्त दिवस राहिलात तरी चालेल पण पूर्ण फ्रेश होऊनच या घरी." मीराताई म्हणाली.
जेवण झाल्यावर निरोपाची वेळ आली. तेव्हा चुटकीला बाबाला सोडून तर जायचे नव्हतेच; पण बाबांच्या शाळेलापण सोडून जायचं नव्हतं... हे हॉस्पिटल कुठे होतं? ही तर बाबांची शाळा... हॉस्टेल !... अर्पिता चुटकीला सांगत होती. चुटकी मनातल्या मनात मान डोलावत होती.

बाबाची मोठ्ठी पप्पी घेऊन चुटकी बाहेर पडली तेव्हापासून तिच्या आणि अर्पिताच्या गप्पा सुरूच होत्या. रात्रीच्या बसमध्ये ती आणि आई बसल्या, मीराताईचा निरोप घेऊन. बसमध्ये लाइट लावलेले होते. चुटकीला खिडकीची सीट मिळाली होती. खिडकीच्या काचेत चुटकीला, अर्पिता दिसत होती.

"बिच्चारी नाही, विचारी." अर्पिता म्हणाली.
चुटकी हसली. अर्पिता बोलत राहिली.

"बाबा बरा होऊन घरी येणार आहे... आपल्याला भीती वाटू शकते... बाबा पहिल्यापेक्षा छान वाटत होता... तो व्यायामसुद्धा करतो आहे... योगासने करतो आहे... त्याचा चेहरा गोरा झाला आहे... खूप छान माणसे आहेत ती सगळी... त्यांच्या बॅजवर हिरव्या रंगाचा पक्षी आहे... पिंजऱ्यातून बाहेर पडणारा... मुक्ताताई सायकॉलॉजिस्ट आहे... मृण्मयीताई तिच्याकडून शिकते आहे... अर्पिता आज मृण्मयीताईकडून शिकली... स्वतः स्वतःची कीव नाही करायची... किती जण एकत्र येताहेत... एकमेकांना मदत करत आहेत... आपण स्वतःची मदत करायची... मग झोपेत स्वप्ने नाही पडणार घाबरवणारी... उद्या शाळेत विचारणार, कुठे गेली होती म्हणून... तेव्हा काय सांगायचं?... गावच्या जत्रेला गेलो होतो... मुक्तांगणची जत्रा... चालेल... खूप मज्जा आली पण...

अर्पिता आणि चुटकीचे हे बोलणे खूप वेळ चालू राहिले असते. पण तेवढ्या वेळात बस स्टॅन्डबाहेर पडली. आणि बसमधले लाइटच बंद झाले. थोडा वेळ चुटकी अंधारात पाहत राहिली. पण तिला भीती वाटली नाही... दिवसभराच्या धावपळीने आता झोप अनावर झाली होती. चुटकी पुन्हा एकदा आईच्या कुशीत गपगार, गुडुप झोपली... ह्या वेळी स्वतःच्या कुशीत तिने जपून ठेवली होती 'मुक्तांगण' नावाची शाळा... 'मुक्तांगण' नावाची जत्रा आणि 'मुक्तांगण' नावाचे घरसुद्धा !


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आनंद नाडकर्णी,  ठाणे ( 19 लेख )
anandiph@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली मराठी पुस्तके विशेष वाचकप्रिय ठरली असून, त्यांच्या iph या संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात, वेध हा त्यातील विशेष उल्लेखनीय.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके