डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

श्यामची आई : आजचा संदर्भ

या लेखनस्पर्धेला महाराष्ट्राच्या मोठ्या भागांतून चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धालेखांची एकूण संख्या तीनशेवर होती. श्यामच्या आईची आजची प्रस्तुतता काही विकल्प ठेवून सामान्यपणे मान्य करण्यात आल्याचे या स्पर्धालेखांतून दिसून आले. मात्र अशी प्रस्तुतता पूर्णपणे नाकारणारेही काही लेख आहेतच. एकूण श्यामच्या आईचा स्वीकार व नकार असेच उभयविध असे या प्रतिसादाचे स्वरूप आहे.

पारितोषिकांसाठी निवडलेले लेख व लेखक

1) सौ. शैलजा व. देशपांडे - पहिले पारितोषिक

2) धनंजय ज. गुडसूरकर - दुसरे पारितोषिक

3) सुरेश द. देशपांडे - तिसरे पारितोषिक

4) कु. वैभवी विश्वनाथ प्रभू - उत्तेजनार्थ

5) विद्या साठे - उत्तेजनार्थ
******
1
सौ. शैलजा व. देशपांडे
6. पराग, शिवाजीनगर,नौपाडा, ठाणे 400602.

आचार्य अत्रे म्हणतात त्याप्रमाणे 'श्यामची आई' हे एक महामंगल स्तोत्र आहे. प्रेम, जिव्हाळा, सेवावृत्ती, त्याग यांची ‘श्यामची आई’ ही साक्षात मूर्ती आहे. वागण्यातील नीटसपणा व व्यवहारातील नेमकेपणा व स्वभावातला करारीपणा यांनी तिचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. जीवनात सुंदर विचारांचे, दयाळूपणाचे, कृपाळू वृत्तीचे धडे तिने श्यामला गिरवावयास लावले. दारिद्र्यातही तिने आपली सत्त्वशीलता व अस्मिता सांभाळली. अभिमानाने जगण्यास तिने श्यामला शिकविले. मोह, आसक्ती, हव्यास वखवख त्या वेळीही नव्हती असे नाही, पण त्या काळात ही अवदसा समाजाच्या अंगावर धावून आली नव्हती. त्यामुळे चांगल्या विचाराने सुसंस्काराने श्यामला जपणे तिला जमले. तो काळ असा होता की सद्गुण से सद्गुणच मानले जायचे. तो बावळटपणा समजला जायचा नाही. 

स्वातंत्र्यानंतर काळ बदलला. समाजाचा पोत बदलला, जीवनमूल्ये बदलली, बदलली कसली- घसरणीला लागली. प्रेम, सेवा, वडील माणसांवरची श्रद्धा, आज्ञाधारकपणा या जीवनमूल्यांचा मागमूस राहिला नाही. एक शांत, संथ, खोल अर्थाचे जीवन जे श्यामच्या वाट्याला आले होते; त्यातील स्थैर्य नष्ट झाले. त्यात अंधश्रद्धा, अविश्वास, भ्रष्टाचार यांची खळबळ माजली. माणूस व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आत्मकेंद्रित झाला. साधेपणाचे व सरळपणाचे हसे झाले. अशा वातावरणात श्यामच्या आईने ज्या जीवनमूल्यांचा उपदेश केला ती सध्याच्या दांभिक वातावरणात कितपत टिकाव धरतील? कारण 21 व्या शतकातील आईपुढची आव्हाने वाढली आहेत. 
आई या नात्याभोवती जो हळुवारपणा व भावुकतेचे होते ते आता राहिले नाही. आई म्हटले की आजकालची मुले गहिवर काढून भावनाविवश होणार नाहीत. आजकालची मुले स्वतःच्या निर्णयावर ठाम असतात. आईच्या पदरावर ती अवलंबून राहणार नाहीत. आईच्या हातचे पानगे, पातोळे त्यांना आवडतीलच असे नाही. पिझ्झा, न्यूडल्स खाण्यात ती आपले ज्ञान समजतील. श्यामच्या आईने श्यामला घडविले. तिच्या शिकवणीने श्याम भावुक व हळुवार झाला. त्याला चांगल्या-वाइटाची जाण आली. पण सध्या जे रूक्ष, कोरडे, व्यवहारी वातावरण आहे; त्यात असा सद्गुणी पण हळुवार श्याम टिकणे कठीण! सध्याच्या स्पर्धेच्या युगात वाटेत जे अडथळे येतील त्यांना कापीत जाऊन यशाचे शिखर गाठणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मन कठोर करणे आवश्यक आहे.

साधनशुचितेचे महत्त्व कमी झाले आहे. साध्य महत्त्वाचे! आणखी काही भव्यदिव्य करून दाखविण्याआधी ‘स्वतःच्या अस्तित्वासाठीच' झगडा करणे हे या पिढीपुढचे आव्हान आहे. श्याम जरासा चुकला तर श्यामच्या आईने कधी रागाने तर कधी प्रेमाने परत रुळावर आणले. पण हल्लीच्या परिस्थितीच्या दट्ट्यामुळे आपले मूल अनुचित मार्गाने गेले तर मूग गिळून गप्प बसावे लागते. भोळेभाबडे, निष्पाप, निरागस कोकरू हल्लीच्या प्रदूषणाच्या झंझावातात चिरडून पडेल. निधड्या छातीचे व कठोर मनाचे मूलच येथे टिकणार. आजकालचे विषाक्त वातावरण, एकमेकाला ढकलून पुढे जाण्याची वृत्ती, दुटप्पीपणा, शिक्षणक्षेत्रात गाइड्स व कोचिंग क्लासेसनी घातलेले थैमान, वैद्यकीय क्षेत्रात सुरुवातीला घेतलेली समाजसेवेची शपथ व नंतर भरभक्कम फीच्या मागे लागलेले डॉक्टर्स अशा एक ना अनेक गोष्टी पाहून श्यामच्या आईने निष्पाप फुलासारखे राहा, सर्वांवर प्रेम करा, असा उपदेश करण्याआधी ‘स्वतःला सांभाळ’ असे सांगितले नसते काय? हक्कासाठी, पैशासाठी सख्खे भाऊ जिथे एकमेकांच्या उरावर बसतात, तिथे आईला आपल्या मुलाने हळवेपणाने वागणे पटणार नाही. 
श्यामच्या आईला काटकसरीने संसार करणे व मुलांना नीट वळण लावणे ही आव्हाने होती.

पण आज तिला कितीतरी अडचणींना सामोरे जावे लागले असते. गरिबी असेल तर प्रतिष्ठेचा बाऊ न करता आजच्या आईला पोळीभाजी केंद्र टाकावे लागेल. बटाटेवडे विकावे लागतील, शिवण शिवावे लागेल व नोकरी करावी लागेल. कारण कसेही करून तिला मुलांना शिकवावयाचे आहे. संकटे, स्पर्धा, गरिबीतून यातून वर काढावयाचे आहे. नुसते शिक्षणावर भागत नाही. तर व्यक्तिविकासाकरिता मुलांना टायपिंग, कॉम्प्युटर, क्रीडा, कला या सर्वांची जरूर आहे. आपल्या भावना कुरवाळायला तिला वेळ नाही. जगातील अनंत घातक व अमंगळ गोष्टींना तोंड देण्याकरिता आजच्या श्यामने कणखर व वज्राप्रमाणे कठोर बनले पाहिजे, आर्त व अगतिक बनून चालणार नाही.

काळ बदलला, काळाची मागणी बदलली. संदर्भ बदलले हे खरे! पण श्यामच्या आईने जे संस्कार श्यामच्या जीवनावर केले ते विकासाबाधित असून असली सोन्याप्रमाणे आहेत. शेवटी माणसाला सत्य, प्रेम, माणुसकीची कास धरावी लागणार आहे. सध्याच्या जेटयुगात वरवर श्यामची आईची शिकवण ही अगदी बाळबोध वाटली तरी तीच शिकवण माणसाला तारेल. माणसाला एकाकीपण,  आत्मकेंद्रीपणा, दुरावा, रूक्ष- कोरडा व्यवहार या जीवघेण्या दूषितांपासून वाचवेल. आपल्या हिंदू धर्मातील उच्च संस्कारांनी भारलेली ती माउली खरोखरच श्याम म्हणतो त्याप्रमाणे, शापभ्रष्ट देवता होती. तिने श्यामला प्रेम, अहिंसा, मनाचे मोठेपण यांबरोबर डोळस सामाजिक जाणीव दिली व जगायचे भान दिले. ती समाज कार्यकर्त्री नव्हती. पण सामाजिक चळवळीचे अध्वर्यू काय करतील, असे कार्य ती घरातून करत होती. श्यामला दलित म्हातारीची मोळी उचलावयास लावून आपल्या सामाजिक जाणिवा किती प्रगल्भ आहेत हे तिने दाखवून दिले. 

पाश्चात्त्यांच्या अनुकरणाने आपल्या साध्यासुध्या संस्कारांवर आधुनिकीकरणाचा पडदा पडला आहे. तरी ग्रहणकाल संपल्यावर जसे स्वच्छ सूर्यदर्शन होते त्याप्रमाणे आपल्या मूलभूत संस्कृतीची जाण समाजाला येईल. आपल्या समाजातील काही हिस्सा आपले जुने संस्कार सांभाळून आहे म्हणूनच समाज टिकून आहे. संयम, धैर्यशीलता, प्रेम, दया, मनाची शांती, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा हे सद्गुण जे रोजच्या जगण्यातून श्यामच्या आईने श्यामला शिकविले त्या गुणांचे मूल्य कधीही कमी होणार नाही. त्यामुळेच जाणकारांनी या सद्गुणांची कास सोडली नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की खुले अर्थकारण, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना, अति महत्त्वाकांक्षा, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे श्यामच्या आईचे स्वच्छ निर्मल संस्कार जरी झाकोळल्यासारखे वाटले तरी खवळलेल्या समुद्रातील धोक्याच्या जागा दाखविणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे ते भावी पिढीला मार्गदर्शक ठरतील खास. 

2
धनंजय ज. गुडसूरकर
 मु. पो. गुडसूर, ता. उदगीर, जि. लातूर

"आई. मला एवढी दहा पानं लिहून काढावयाची आहेत. जरा दादाला मदत करायला सांगशील? आज लिहायला हवीत. सकाळी गुरुजींना पुस्तक परत करावयाचं आहे.’’ 
"अरे श्याम, टी.व्ही.वर क्रिकेटची मॅच चालू आहे. मलाही पाहावयाची आहे. तू असं कर, या पानांची झेरॉक्स काढून आण,’’ इति श्यामची आई! 

श्यामच तो. त्याला आईचा सल्ला पटला, आईजवळचे पैसे घेऊन त्याने झेरॉक्स काढून आणली व गुरुजींना पुस्तक परत दिले. आज अगदी सहज दिसणारी ही घटना. कुठल्याही नव्हे आपल्याच घरात अनुभवावयास मिळेल. घटना साधीच पण विचार करावयास लावणारी! वरील प्रसंगात श्याम व श्यामची आई ही पात्रांची नावे जाणीवपूर्वक घातली आहेत. या प्रसंगाचा ‘श्यामची आई'शी संदर्भ द्यावयाचा म्हटल्यास श्यामची आई म्हणाली असती, ‘‘बाळा, दादाला मदत करायला सांगेन हं! पण त्याने लिहून दिलेले तुला काय कामाचे? आपण लिहिलेले चांगले स्मरणात राहते, आपले काम आपण करावे हेच खरे! थोडे कष्ट घेऊन लिहून काढ. हवे तर गुरुजींना अजून एक दिवस पुस्तक ठेवण्यासाठी मी विनंती करीन!"

हे दोन प्रसंग श्यामच्या आईच्या आणि आजच्या पिढीच्या संदर्भातीत फरक दाखवून देतात. श्यामच्या आईच्या विचारांची अर्थपूर्णता व परिणामकारकता या घटनेत दडली आहे. आपल्या घरी रामरक्षेचे पुस्तक नाही म्हणून आपणांस रामरक्षा पाठ नाही, शेजारच्या भास्करकडे पुस्तक आहे म्हणून तो पाठ करून शेखी मिरवतो, या जाणिवेने श्याम त्याच्याशी भांडण करतो, तेव्हा ती माउली श्यामला भास्करजवळचे पुस्तक घेऊन रामरक्षा लिहून काढावयास सांगते. स्वतः लिहून काढून पाठ केलेली रामरक्षा जेव्हा श्याम आई-भाऊंना म्हणून दाखवितो तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असतो. त्या आनंदाची जाणीव आज झेरॉक्स करून आणावयास लावणाऱ्या मातापित्यांस व बालकास केव्हाही अनुभवावयास मिळणार नाही. तत्कालीन व आजची परिस्थिती बदलती हे खरे असले तरी त्या विचारांची परिणामकारकता केव्हाही संपणार नाही. काही घटनांची कृती आज निरर्थक असेल, पण त्यामधून आलेले संदर्भ आजही तितकेच मोलावे आहेत. या संस्कारांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. अन्यथा या घटनांची तोडमोड करून व काळ बदलल्याचे संदर्भ लावून त्या कशा निरर्थक आहेत याची शाब्दिक कसरत करणे फारसे अवघड नाही. 

एकविसावे शतक आता उजाडते आहे असे म्हणावयास हरकत नाही. विसाव्या शतकाच्या प्रारंभात श्याम घडला. एका शतकाच्या कालावधीत त्या काळातील किती समस्या संपल्या याचा विचार केला असता वाढलेल्या समस्यांची यादीच हाती येईल. या शतकाने भौतिक समृद्धी आणली. जग जवळ आणले, पण माणसे दूर गेली. कालाय तस्मै नमः म्हणत मूठभर चंगळवाद्यांच्या परिवर्तनाच्या जयघोषाखाली सारी मूल्येच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. शिक्षित मंडळीसुद्धा बुद्धी गहाण ठेवून वागत आहेत. या उलट प्रतिगामी काळात स्वतःचा विवेक जागृत ठेवून विचार व आचारांचे संस्कार करणाऱ्या श्यामच्या आईचे संदर्भ कसे कालबाह्य होतील? संगणकयुगात वावरणारा माणूस दैववादाच्या मागे लागला असताना 'श्यामची आईच’ आज दीपस्तंभ ठरू शकते. स्पृश्य-अस्पृश्याची संकल्पना श्यामला अस्वस्थ करते तेव्हा आई सांगते, 'आज त्यांच्याजवळ पैसे नाहीत म्हणून ते अस्पृश्य, पण देवाला सारीच प्रिय असतात. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. सर्वत्र कर्मकांडाच्या जुन्या व खुळचट प्रवृत्तीचे राज्य असताना विवेकी विचार करून त्याला कृतीची जोड देणाल्या त्या माउलीचा विचार आज दिशाहीन झालेल्या समाजासाठी होकायंत्र ठरू शकतो. 

स्पर्धा ही आज जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे आणि यश हे साध्य! हे 'साध्य' कोणत्याही मार्गाने 'साध्य’ करण्यासाठी पालकसुद्धा कोणताही संकोच बाळगत नाहीत. हे 'शार्टकट’ वापरण्याचे दुष्परिणाम आज जाणवू लागले आहेत. शिकलेले अभियंते, डॉक्टर- एवढेच नव्हे तर शिक्षकसुद्धा समाजाला लुबाडून मानसिक शांती गमावून बसले आहेत. ‘शिकून मोठा हो, पण मनाने चांगला राहा. मोठा नाही झालास तरी गुणी हो', ही या माउलीची शिकवण आणि तो विसरल्यामुळे रोजच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मातापित्यांची सेवा, दीनदुबळ्यांची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा करण्याचे शिक्षण आपल्या कृतीतून देणारी 'श्यामची आई' कळ्या तोडणाऱ्या श्यामला निसर्गाचे जे तत्त्वज्ञान सांगते ते आज करोडो रुपयांच्या जाहिराती सांगू शकत नाहीत, हे निसर्गाचे तत्वज्ञान कालबाह्य होणार आहे काय? दलितांची शेती पूर्वजांनी लुबाडली म्हणून स्वतःला दोष देणारी, दारिद्र्य आले म्हणून जावयाला बरेवाईट बोलणाऱ्या स्वत:च्या पित्याला रोखठोक बोलणारी, दुसऱ्याच्या घरार्एवजी स्वत:ची चंद्रमौळी झोपडी पसंत करणारी, पाप करण्याची लाज वाटावी, चांगले काम करण्याची नव्हे असे सांगणारी, गरिबीत राहूनही ध्येयवाद आचरणारी, नणंदेच्या मुलाला दूध पाजणारी, दलित मजुरणीच्या आजारात तिची काळजी घेणारी अशी आईची शेकडो रूपं गुरुजींना घडवून गेली.

त्या काळी तिने शिक्षित माणसाबद्दल व्यक्त केलेले विचार आज तंतोतंत लागू पडतात. ती श्यामला सांते, ‘‘शीक. पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. ही भीती आज आपण अनुभवत आहोत आणि म्हणूनच जेवढा काळ अधिक लोटेन तितकी जास्त 'श्यामच्या आई’ची गरज आहे. चंगळवादाच्या, भोगवादाच्या या प्रवाहात या कृतियुक्त ग्रंथाची गरज आहे. ‘मोह सोडणे म्हणजे धर्म’ हे धर्माचे खरे सूत्र सांगणाऱ्या श्यामच्या आईचा आवाज आज धर्मवेड्यांच्या गोंधळात क्षीण वाटत असला तरी...  हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस अमुचा येत आहे, तो उद्या असणार नाही...  या काव्यपंक्तीप्रमाणे चंगळवादाच्या छोट्या प्रतिष्ठेच्या बेगडी धर्मवादाच्या परावलंबी आणि अकार्यक्षमतेच्या या गोंधळी परिपाकाचा उबग येऊन 'श्यामच्या आई’ला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, एवढे मात्र निश्चित! 

3
सुरेश द. देशपांडे
'सोनोरी', 36, परई, ठाणे 400601.

‘श्यामच्या आई’ने लोकांच्या जीवनात एक अमोघ आणि अढळ असे स्थान प्राप्त केले आहे, ते कालत्रयी कमी होणे शक्य नाही. परंतु गुरुजींची 'श्यामची आई' व आजच्या श्यामची आई या दोन मातांमध्ये एक फार मोठा फरक जाणवतो. आजच्या श्यामच्या आईचे प्रेम हे प्रेम नसून तो नुसताच वरवरचा मुलामा आहे. आजची श्यामची आई ही एक पोटार्थी गृहिणी असून ती नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करून चार पैसे कमावते. त्यामुळे श्यामला घडविण्यात ती खचितच कमी पडते. आजचा श्याम बिचारा पाळणाघरातल्या कृत्रिम आजीकडे, काकूकडे विनासंस्कार वाढत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरता सध्याचे आईवडील व त्यांचा श्याम या दोघांनाही आपापल्या इच्छेविरुद्ध वागावे लागत आहे. आणि शेवटी निराशा पदरी पडून नाइलाजास्तव जीवनात अपयशाचे धनी व्हावे लागते आहे!! 

आजच्या श्यामचे भावविश्व निश्चितच वेगळे आहे. त्याचा भाव, श्रद्धा, प्रेम कशावर आहे हे त्याच्या आईवडिलांनासुद्धा कळणार नाही. एखादे वेळस त्याचे भावविश्व कार्टूनमध्ये असेल, क्रिकेटच्या मॅचमध्ये असेल, 'बुगी वुगी’मधल्या ब्रेक डान्स-रेकॉर्ड डान्समध्ये असेल, एखाद्या शाहरुख खानच्या सिनेमामध्ये असेल, गच्चीमधून कटणाऱ्या किंवा उडणाऱ्या पतंगामध्ये असेल, व्हिडिओ गेममधल्या कराटे चॅम्पियनमध्ये असेल!! अशा तन्हेच्या विविध भावविश्वांमध्ये आजचा श्याम गुंतलेला दिसतो. त्यामुळे गुरुजींचा श्याम हल्लीच्या बालमनात मला तरी कुठे आढळत नाही. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना आजच्या श्यामला संगणक त्याच्या आईपेक्षा जवळचा प्रेमळ वाटतोय! त्याचप्रमाणे दूरदर्शन म्हणजे त्याची बौद्धिक गरज भागवणारी आई! पाळणाघरातली आजी, काकू, शाळेतील शिक्षक, आईवडील, शाळेतील शिक्षक हे त्याचे सांगाती आहेत. ह्या सर्वांच्या आधाराने आजचा श्याम जगात उभा राहणार आहे. ह्या सर्वांमध्ये मातृप्रेम म्हणजे काय हे जाणून घ्यायला वेळ आहे कुठे? 

आजच्या अणुयुगात आणि स्पर्धेच्या गर्तेत आजच्या श्यामने आत्मप्रौढी, संवेदनशून्यता, संकुचित मनोवृत्ती, स्वार्थीपणा वडीलधाऱ्या माणसांचा कळत नकळत उपमर्द, हे सर्व वाईट गुण एव्हाना आत्मसात केले आहेत. त्यामुळे परमपूज्य गुरुजींचा श्याम हा फक्त पुस्तकातच स्थिर आहे. ग्रंथवाचन करताना जरी दोनचार अश्रू ओघळले, तरी गुरुजींच्या श्यामप्रमाणे ते आईचे पाय धुणारे गरम अश्रू नसतात. 'श्यामच्या आई’चे प्रसंगोचित कठोर प्रेम आणि पुन्हा मायेने जवळ घेण्याची प्रवृत्ती आणि रात्रीची झोपमोड होते म्हणून मुलाला दूर झोपवणारी आजच्या श्यामची आई ही केवढी दोन टोके !! 

त्यामुळे गुरुजींच्या श्यामचे भावविश्व व त्याची परिणामकारकता आजच्या श्यामला भावणे आणि मातृप्रेमाची अनुभूती होणे हे जरा दुरापास्तच वाटते. गुरुजींचा श्याम जरी अर्थपूर्ण असला, तरी आजचा श्याम त्यामधे स्वतःला फार काळ गुंतवून ठेवणार नाही. परमपूज्य गुरुजींचा हा अमूल्य ठेवा तो लगेच चाळून हातावेगळा करून लगोलग कपाटात ठेवून मोकळा होईल,


4.
कु. वैभवी विश्वनाथ प्रभू
घाटे गुरुजींचे घर, हिंदू कॉलनी, कुडाळेश्वरवाडी, मु.पो.ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग 416 520.

'मातृप्रेमाचे महान स्तोत्र' म्हणून गौरविलेले अन् महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन ज्यामुळे समृद्ध व संपन्न झालेले हे पुस्तकच मुळी कायमस्वरूपी संस्कार करणारे आहे. ह्या आठवणी प्रसिद्ध करण्यामागचा साने गुरुजींचा हेतू जन्मदात्रीबद्दलच्या प्रेम, भक्ती, कृतज्ञता या अपार भावना वाचकांच्या मनात उमलवणे हाच होता. 'इंदिरेस पत्र' किंवा 'अब्राहम लिंकनचे पत्र’ अशा स्वरूपाचे उपदेश यात नाहीत. येथे शब्दाशब्दांत त्यांच्या आईची महती जाणवते, हा श्याम आत्मचरित्र नाही तर मातेची शिकवण शब्दबद्ध करतो. प्रत्येक मुलाचे आपल्या जननीवर प्रेम असते अन् अशी कुठली आई असेल जी आपल्या मुलावर वात्सल्याचा वर्षाव करत नसेल? पण 'तळव्यांना माती लागू नये म्हणून जपतोस तसं मन मलिन होऊ नये म्हणूनही जप', 'जवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे. दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे यासारखा आनंद नाही, असे म्हणू शकते ती 'श्यामची आई!’ 'मोह सोडणे म्हणजेच धर्म’ अशी शिकवण आजची 'कॉम्प्युटर इंजिनिअर' किंवा 'फॅशन डिझायनर’ असलेली आई देऊ शकेल? 

जगात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक जीवाची खरी शिक्षणदात्री असते ती त्याची आई! ती देह देते तसंच कोऱ्या पाटीसारखं एक मनही देते. त्याला योग्य-अयोग्य मूल्यमापन शक्य नसतं. या अवस्थेतच त्याच्यावर होणारे संस्कार दृढतम असतात. याचा अर्थ एवढाच की लहान मुलाचं मन फार संस्कारक्षम असतं. अगदी मेणासारखं म्हणा! त्या बाबतीत श्याम फार भाग्यवान निघाला. आजच्या परिस्थितीशी तुलना करता विसंगत वाटावी अशी आई त्याला मिळाली होती. म्हणूनच ह्या गोष्टी काल्पनिक असाव्यात असाही आक्षेप घेतला जातो. पण अशी माता त्याला मिळाल्याखेरीज तिने, घडवल्याखेरीज का श्यामचा साने गुरुजी झाला? तो एवढा मोठा झाला, त्याने फुलांचे हृदय जाणले, मुलाचे मन रंजविले, आगाऱ्यांची सेवा केली, विद्यार्थ्यांची क्षुधा शमविली, निराधारांना आधार दिला, शेतकरी-कामगारांचा कैवार घेतला, लेखणीने क्रांती केली. ही सारी देणगी त्याच्या आईचीच तर होती. कधी रागाने तर कधी अनुरागाने त्याला घडवणारी माता थोरच होती. आजच्या घडीला जर तुम्हांला श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलला किंवा रावणाला दहा तोडे होती हे पटते तर भोळीभाबडी प्रेमस्वरूप आई अर्थहीन वाटण्याचे कारण...? ...कारण एकच. आजचा बदलता समाज, सामाजिक मूल्ये अन् जीवनपद्धती.

एकविसाव्या शतकात आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी पुरुषांच्या बरोबरीने वावरणारी आजची अंतर्बाह्य बदललेली. ऑफिस, करिअरच्या गर्तेत मुलाला कोवळ्या वयातच पाळणाघरात ठेवणारी किंवा आयांवर सोपवणारी अधिक स्मार्ट, 'जीनियस', शिस्तप्रिय बनवण्यासाठी पाचगणीला पाठवणारी आई अन् मुलाला धीट बनवण्यासाठी त्याला शिंपटीने बडवणारी व नंतर अर्ध्या जेवणावरून उठून त्याच्या वळांना तेल चोळणारी अन् डोळ्यांत अश्रू आणून त्याला दही खाऊ घालणारी ‘श्यामची आई' किती भिन्न आहेत ही दोन रूपे!  आपला अभ्यास, क्लास, मित्रपरिवार, त्याच्याविषयीच्या इतरांच्या अपेक्षा, वाढती स्पर्धा या साऱ्यातून वजा होणारा तीन वर्षांचा श्याम पाठीवरचे ओझे सांभाळत मॉम आणि मॅम (मॅडम) यातील सूक्ष्म फरकाच्या शोधात के. जी.त जातो. स्कूल, होमवर्क, टी.व्ही., कार्टून फिल्म, व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर या आखीव-रेखीव आयुष्यात किती महत्त्व दिले जाते? मग जेव्हा कधी तरी तो मुलगा ‘श्यामची आई’ वाचतो किंवा अभ्यासतो तेव्हा त्या मायलेकरांच्या हृदयस्पर्शी आठवणी त्याला दंतकथा वाटतात.

कारण त्याच्या मम्मीने त्याला गाई-गुरांवर, फुलापानांवर, झाडा-झुडपांवर मनुष्याप्रमाणे प्रेम करायला शिकवण्याचे प्रसंग झालेले नसतात. मग हे वास्तव त्या काळजाला हात घालेल अशी आपण अपेक्षाच का करावी? आईच्या मांडीत डोके खुपसून निजणारा श्याम आणि त्याच्या केसांतून आपला प्रेमळ हात फिरविणारी आई आपल्या श्यामला भेटलेलीच नसते. अशा वेळी आपल्या आसपास वावरणाऱ्या आईच्या तुलनेत त्याला 'श्यामची आई' कृत्रिम (अतिशयोक्तिपूर्ण) भासली तर त्यात नवल ते काय आणि का वाटावे? दुनिया, बदलते आदर्श यांच्या झंझावातात श्यामच्या आईची परिणामकारकता अजूनही तशीच असेल, जशी चौसष्ट वर्षांपूर्वी म्हणजे 1935 होती अन् यापुढेही राहील असे समजणे कितपत योग्य आहे?


5
विद्या साठे
तपस्या, बी-4, रोड नं. 2/3, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057.

'श्यामची आई' एक प्रगल्भ स्त्री. सुविद्य नसली तरी सुसंस्कारित. पांडवप्रताप, महाभारताचा तिचा व्यासंग दांडगा आहे. या प्रगल्भतेतून तिने श्याम घडवला. मायेने जिव्हाळ्याने ओथंबलेल्या या माउलीने श्यामवर डोळस प्रेम केलं. 
मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या समुद्राची पूजा करून कडोसरीचे चार आणे समुद्रात फेकणाऱ्या श्यामच्या आईने समुद्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञतेच्या पोटी नम्रतेचा जन्म होतो. गुरावासरांवर, पानाफुलांवर, निसर्गावर प्रेम करायला निसर्गावर प्रेम करायला श्यामला आईनं शिकवलं. दुसऱ्याला फुलं मिळू नयेत म्हणून फुलं उमलण्याआधीच गुलबक्षीच्या कळ्या तोडणाऱ्या श्यामची तिने कडक शब्दांत कानउघडणी केली. आज अशी आई घरोघरी असेल तर अमृता देशपांडेसारख्या निष्पाप कळ्या तोडण्यासाठी कोणाचेच हात कधी धजावणार नाहीत... 

श्यामची आई कर्मं नाही. तिने माणुसकीचा धर्म स्वीकारला आहे. असहाय महारणीला मदत करायला ती श्यामला सांगते. तिला राष्ट्राबद्दल, देशाबद्दल अभिमान आहे. श्यामला पोहता यावे म्हणून कठोरपणे त्याला पाण्यात ढकलणारी आई, आजारी मोलकरणीला प्रेमाने भात व लिंबाचे लोणचे पाठवणारी श्यामची आई, स्वतःच्या कृतीतून श्यामला संस्कारित करते.  स्वतःला बरं नाही म्हणून श्यामकरवी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला प्रदक्षिणा घालून घेतल्या आणि कोणतंही चांगलं काम करण्याची कधी लाज बाळगू नको, असा महत्त्वपूर्ण संदेश तिने दिला. आजच्या आईने अडीअडचणीच्या वेळी मुलाकडून (मुलीकडून नव्हे) स्वयंपाक करून घ्यायला हरकत नाही. 

पत्रावळी लावल्या नाहीस तर जेवायला मिळणार नाही, असे ठामपणे बजावणाऱ्या श्यामच्या आईने मनगटाच्या जोरावर कष्ट करून काम तडीस नेण्याची जिद्द श्याममध्ये निर्माण केली.  वाङ्निश्चयात फुकट मिळवलेली दक्षिणा श्यामच्या आईने गड्याला देऊन टाकली. कष्टाशिवाय मिळालेला मोबदला, लाचारी, मिंधेपणा झुगारून स्वाभिमान शिकवला. श्रमाचा पूजक होऊन सौंदर्यनिर्मितीची प्रेरणा दिली. आज घराघरांत हा संदेश पोहोचला तर भ्रष्टाचार, लाचलुचपतीने पोखरलेला समाज सात्त्विक व सुंदर होईल. तळव्यांना माती लागेल म्हणून काळजी घेणारी ही माउली मनही स्वच्छ व निर्मळ ठेवण्यासाठी बजावते. 

बायकांना कधीकधी पुरुषांची कामे करावी लागतात. पुरुषांना बायकांची करावी लागतात. त्यात कमीपणा कसला? असं सहजतेने सांगणाऱ्या श्यामच्या आईने सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आपल्या हाती विश्वासाने  सोपविली आहे असं मला वाटतं. श्याम सर्व घरकाम करतो असं ती अभिमानाने सांगते. पुरुषाप्रधान संस्कृतीच्या तिच्या कल्पना मला अत्यंत परिपक्व वाटतात. श्यामच्या आईवडिलांचे परस्पर संबंध, एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होणं. परस्परांबद्दलचा आदर, प्रेम आजच्या पिढीला समृद्ध करतात. कुटुंबाची चौकट अधिक बळकट करतात. 

श्यामची आई सोशीक आहे. पण दुबळी नाही. क्षमाशील असली तरी तिच्या मर्यादा आहेत. ती स्त्रीवादी असल्याचा कुठेच स्पष्ट उल्लेख नाही. तरीही बायकोला विकण्याचा निर्लज्ज सल्ला देणाऱ्या सावकाराची ती कडक शब्दांत निर्भर्त्सना करते. श्रीमंत माणसांना त्यांच्या श्रीमंतीची ऐट वाटू नये व गरिबाला गरिबीची लाज वाटू नये म्हणून देवाला तुळशीपत्रे, पाने वाहा, असे धर्मात सांगितले असल्याचा तिचा सर्कशुद्ध युक्तिवाद अत्यंत बोलका आहे. आता काळ बदलला. जुने प्रश्न नाहीसे झाले. नवीन निर्माण झाले. पण श्यामच्या आईची शिकवण कधीच कालबाह्य झाली नाही. प्रकाशाचा, तेजाचा तो दिवा आतुरतेने साद घालतोय. आजची आई सुशिक्षित, आर्थिक स्वातंत्र्य असलेली आहे. प्रत्येक आईने या तेजाला प्रतिसाद दिला तर घराघरांतून साने गुरुजी नाही. पण सुजाण नागरिक निर्माण होतील. देशाचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असेल. सारेच श्रमाचे पूजक होतील. प्रेमाची, माणुसकीची देवाणघेवाण होईल. 

समाजाच्या तत्त्वांचे आज झपाट्याने पतन होत आहे याचे भान आजच्या श्यामच्या येईल तर ते अधिक हिताचं, आदर्शवाद रामासारखा नाही, तर श्रीकृष्णासारखा असावा, कणखर, अन्यायाला खडसावणारा, नुसतंच तत्त्वांना कवटाळून न बसता नीरक्षीर विवेकबुद्धी जागृत झाली पाहिजे. अन्याय करायचा तर नाहीच पण अन्याय खपवूनही घ्यायचा नाही. नैराश्याने संपून न जाता, मोहाला बळी न पडता आत्मनिर्भर होऊन वाटचाल करायची आहे. वाटेतल्या काट्यांची जाणीव ठेवून फुले वेचण्याचं तारतम्य आजच्या श्यामला येणं अधिक गरजेचं आहे. श्यामच्या आईच्या संस्काराची बैठक बळकट आहे. ती अधिक वैविध्यपूर्ण करायची आहे. आजच्या आईसमोरचं आव्हान जास्त कठीण आहे. 

श्यामच्या आईवर घरकामाची, बालसंगोपनाची जबाबदारी होती. अर्थार्जनाची नव्हती. आज अशी श्रमविभागणी नाही. त्यामुळे आई व वडील या दोघांनी मिळून या तेजाला प्रतिसाद द्यायचा आहे. अंतर्बाह्य उजळण्यासाठी, समाजाला उजळवण्यासाठी.

Tags: विद्या साठे ’ उद्याची आशा vidya sathe  ‘श्यामची आई hope for tomorrow  'shyamchi aai' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके