डिजिटल अर्काईव्ह

अभिनय करताना गाणं हा माझ्या अगदी आवडीचा प्रकार आहे. मला त्यात कायमच सगळ्यात जास्त मजा येते. आणि आत्ता जे मी सांगणार आहे, ते अशा शब्दांत मांडणं तर सोडाच, पण नेमकेपणाने समजतही नव्हतं तेव्हापासून मला असं वाटत आलेलं आहे की, अभिनय करताना गाणं ही माझ्या गाण्याची सगळ्यात खरी अभिव्यक्ती आहे. मला हे पहिल्यांदा जाणवलं ते अतुल तिवारी यांच्यासोबत एक हिंदी नाटक करत असताना. त्या नाटकात मी एक 'मर्सिया' गायचे. मर्सिया म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीला नेण्यापूर्वी अंगणात प्रेत ठेवलेलं असतं ना, त्या प्रेतापुढे गायचं गाणं. त्या नाटकात माझं पात्र सासूचं होतं. माझी सून मरते, आणि तिच्या प्रेतापुढे मी ते गाणं म्हणते, असा प्रसंग होता.

बंगाली आई आणि मराठी वडील यांच्याकडून वैविध्यपूर्ण संगीताचा वारसा लाभलेली, भजन, कीर्तन, संगीत नाटक, सुगम संगीताच्या मैफली, गरबा नाईट, नौटंकी, पाश्चात्त्य लोकसंगीत, ब्रॉडवे म्युझिकल अशा वेगवेगळ्या अंगांनी अभिनय-संगीताशी जोडलेली शर्वरी देशपांडे ही मुंबईतली तरुण गायिका-अभिनेत्री आहे. तिने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून अभिनयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. वेगवेगळी वळणं घेत, वेगवेगळे अनुभव आणि कौशल्यं गोळा करत झालेला तिचा प्रवास रंजक आणि रोचक आहे.

प्रश्न : शर्वरी, तू व्यावसायिक स्तरावर गाणं आणि अभिनय दोन्ही करतेस. याची सुरुवात कशी झाली? तुझ्या घरात गाणं आहे?

- हो. माझे आई-वडील दोघंही संगीत क्षेत्रातले व्यावसायिक कलाकार आहेत. आई प्रणिता दासगुप्ता-देशपांडे गायिका आहे, ती बंगाली कुटुंबातली आहे. तिचे वडील (प्रणवकुमार दासगुप्ता) हार्मोनियम वादक होते. ते संगीतकार सलील चौधरींसोबत काम करायचे. आईची आई मूळची ढाक्याची, ती फाळणीनंतर भारतात आली. तिलाही गाण्याची आवड होती. आणि माझे वडील एकनाथ देशपांडे यांनाही घरातून संगीताचा वारसा मिळाला. ते तबला, ढोलक, हार्मोनियम अशी वेगेवगळी वाद्यं वाजवतात. त्यांची आई, म्हणजे कीर्तनचंद्रिका पद्मावतीबाई देशपांडे. माझे काका, माझी आत्या, माझा भाऊ, माझी चुलत भावंडं सगळेच गाणारे आहेत. ते सगळे लाइव्ह परफॉर्मर्स आहेत. काही वर्षांपूर्वी मराठी भावगीतांचा 'मेंदीच्या पानावर' नावाचा एक खूप लोकप्रिय वाद्यवृंद होता. त्यांच्या कॅसेट्स प्रसिद्ध होत्या. माझे आई-बाबा आणि काका त्यात होते. आई-बाबा मुंबईत आणि नंतर अमेरिकेतही नवरात्रीतल्या गाण्यांचे कार्यक्रम करायचे, त्यातही त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. माझा भाऊ कौशिक टीव्हीवरच्या संगीत स्पर्धेचा विजेता आहे. त्यामुळे संगीत हे जन्मापासून आपसूक ऐकायलाही मिळालं आणि सहजपणे, औपचारिक क्लास न करताही शिकायला मिळालं. वयाच्या चौथ्या वर्षी मी पहिल्यांदा स्टेजवरून गायले. तेव्हापासूनच हळूहळू मला स्टेजचं आकर्षण वाटायला लागलं, आणि कलाकार होण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली.

प्रश्न : अभिनयाची, गाण्याची आवड लहानपणी निर्माण झाली, त्याचबरोबर आणखी कोणत्या आवडीनिवडी जोपासल्यास?

- मला वाचायला आवडतं. मी 'हॅरी पॉटर'ची पुस्तकं वाचत मोठ्या झालेल्या पिढीतली आहे. एकूणच फॅन्टसी आणि भयकथा यांचं मला आकर्षण होतं. त्या प्रकारची इंग्लिश पुस्तकं मी लहानपणी अधिक वाचायचे. याच प्रकारची नाटकं आणि चित्रपट बघायला मला आवडायचे. अजूनही माझं इंग्लिशमधील वाचनच जास्त आहे. आणि फॅन्टसी आणि भयकथांचं गारूडही कायम आहे. पण आता माझ्या कामासाठी आवश्यक असलेलं सैद्धांतिक वाचन, चालू घडामोडी आणि मतप्रवाह, स्त्रीवाद यांविषयीचं वाचन आणि चित्रपट पाहणं वाढलं आहे.

प्रश्न : तू भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहेस का?

- नाही. कधीकधी मला वाटतं की ते घ्यायला हवं होतं. पण बरेचदा असंही वाटतं की, त्या पद्धतीने शिकले असते तर आज जी वाट मी आवडीनं निवडली आहे, त्या वाटेनं नक्कीच जाऊ शकले नसते, आणि सध्या जे काम मी करते आहे, ते मला आवडतं. लहानपणी क्लासला जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला. पण ते शिकणं जमलं नाही. पण माझी आई शिकलेली आहे, आणि मी तिच्याबरोबर सुगम संगीताचा, ताना-पलट्यांचा, गाण्यांचा भरपूर रियाज केला आहे. आताच्या वयात मला असं वाटतं की, माझ्या आवाजाला त्या पद्धतीनेही थोडं वळण लावायला हवं. त्यामुळे मी स्वतःच ते शिकायचा प्रयत्न करते आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातलं संगीत, बंगाली संगीत, भावगीतं आणि लोकप्रिय चित्रपटसंगीत हे तुला घरातून मिळत गेलं. यानंतर नौटंकी व पाश्चात्त्य संगीताचा आणि तुझा परिचय कसा झाला?

- मी पदवीपर्यंत मुंबईत शिकले. कॉलेजमध्ये असताना इंग्लिश गाणी ऐकायचा, ती स्वतः गाऊन बघण्याचा नाद लागला. ते आवडायला लागलं. त्याचंही औपचारिक शिक्षण मी घेतलेलं नाही, पण ऐकून ऐकून आपापलं शिकत गायला लागले.

जुहूच्या मिठीबाई कॉलेजला अकरावीत असतानाच 'इप्टा' नाट्यचळवळीत काम करणारे, लोकनाट्य-संगीताच्या क्षेत्रातले संगीतकार कुलदीप सिंह यांच्या 'गिरजा के सपने' या संगीत नाटकासाठी कोरसमध्ये गायनाची संधी मला मिळाली. तेव्हा पहिल्यांदा नौटंकी आणि उत्तर भारतातले लोकसंगीताशी जोडलेले नाट्यप्रकार मला माहीत झाले. इप्टाचे नावाजलेले दिग्दर्शक एम. एस. सत्यू यांनी ते दिग्दर्शित केलेलं होतं. त्याचे प्रयोग दिल्लीला एनएसडीत (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि मुंबईत पृथ्वी थिएटरसारख्या ठिकाणी झाले. ही केवढी मोठी गोष्ट आहे हे मला तेव्हा फारसं जाणवलंही नव्हतं, पण आज त्याचं अप्रूप वाटतं.

मग मी इप्टाच्या अनेक हिंदी नाटकांत गायला, आणि पुढे अभिनयही करायला लागले. नंतर एम.एस. सत्यू यांची मुलगी शैली सत्यू हिने तिच्या 'चिल्ड्रेन्स थिएटर रेपरटरी'मध्ये काम करण्यासाठी, मुलांना गाणी-गोष्टी-नाटक यांचं प्रशिक्षण देण्यासाठी, तिच्या 'गिल्लो' या संस्थेत मला बोलावलं. तिच्यासोबत साधारण पाच वर्षं मी काम केलं. त्या वेळी मी एकीकडे पवईच्या एस.एम. शेट्टी कॉलेजमधून अॅडव्हर्टायझिंग शिकले. जाहिरात किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायचं असं तेव्हा डोक्यात होतं. पण हिंदी लोकनाट्यांतून गाणं, किंवा शैलीबरोबरचं काम यांतून मला म्युझिकल थिएटरची गोडी लागली. पारंपरिक म्युझिकल थिएटर, शॅडो थिएटर, ऑब्जेक्ट थिएटर असे वेगवेगळे नाट्यप्रकार आणि त्यांतलं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत यांची भुरळ मला पडली. अतुल तिवारी, हंसा मोहली, पूजा पंत अशा मोठ्या लोकांसोबत काम केलं. त्यांच्याकडून 'मूव्हमेंट थिएटर' फार छान शिकता आलं.

गिल्लोमध्ये काम करत असताना देवेंद्र शर्मा यांच्याशी माझी ओळख झाली. ते त्यांच्या कुटुंबातले तिसऱ्या पिढीचे नौटंकी कलाकार आहेत, आणि लोकनाट्यपरंपरांचे अभ्यासक संशोधकही आहेत. नौटंकीच्या गाभ्याला धक्का न लावता तिचं पारंपरिक रूप थोडं बदलून त्याला आधुनिक साज चढवण्याचं काम ते करतात. 'पिया बहरूपिया', 'हनुमान की रामायण' असे खूप प्रसिद्ध, लोकप्रिय झालेले आणि नौटंकीवर आधारित असलेले कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. त्यांच्याकडून दोन वर्षं थेट शिकता आलं. माइकशिवाय मोकळ्या मैदानात गाताना किंवा बोलतानासुद्धा आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचावा यासाठी लागणारं आवाज लावण्याचं कौशल्य, खुल्या गळ्याने गाणं त्यांच्याकडून शिकले. त्यांच्याबरोबर नौटंकीत काम करताना तर शिकलेच, शिवाय त्यांच्या कार्यशाळाही मी केल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन या क्षेत्रातलं शिक्षण घे, असं सुचवलं. मग मी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून अभिनयात मास्टर्स केलं.

प्रश्न : तो शैक्षणिक अनुभव कसा होता?

- तिथल्या अभिनयाच्या अभ्यासक्रमाचा आवाका चांगला व्यापक होता. शिक्षक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या देशांतून आलेले असल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींतल्या नाटक परंपरा, अभिनय तंत्र, श्वास, आवाज, शरीर आणि चेहरा वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तिथे शिकता आल्या. अभिनय, दिग्दर्शन, नाट्यलेखन, नाट्यनिर्मिती,
रंगमंच व्यवस्था असे वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवले जातात. मी अभिनयाच्या वर्गात होते, पण या अन्य अभ्यासक्रमांची तोंडओळख आम्हालाही झाली. वर्गात आम्ही पंधरा विद्यार्थी होतो. खास अभिनयाच्या दृष्टीने संहिता समजून घेणं, भूमिका समजून घेणं, प्रत्येक भूमिकेचे एकमेकाशी असलेलं नातं समजून घेणं, अभिनयाचा आणि नाट्याचा इतिहास असे वेगवेगळे विषय होते. इतिहासाच्या अभ्यासक्रमात क्लासिक ग्रीक, स्पॅनिश, फ्रेंच, रशियन, आशियातलं काबुकी नाट्य, भरताचं नाट्यशास्त्र असा जगातल्या वेगवेगळ्या रंगभूमीचा इतिहास होता. काही युरोपियन शिक्षकांनी फेल्डेनक्राइस तंत्र, लिंकलेटर तंत्र, अलेक्झांडर तंत्र यासारखे हालचालींचे प्रकार शिकवले. हे सर्व शिक्षण प्रात्यक्षिक पद्धतीने झालं. आमचे तास स्टुडिओमध्ये व्हायचे. एक संहिता घेऊन तिच्यावर विशिष्ट पद्धतीने काम करायचं आहे असं शिक्षक ठरवायचे आणि वर्गात एखादं नाटक, एखादं तंत्र, एखादा श्वासाचा किंवा आवाजाचा व्यायाम, हालचाली आणि वाचिक अभिनय हे सगळं आम्ही प्रत्यक्ष काम करत, अभिनय सादर करत शिकलो. आवश्यक तिथे शिक्षक आम्हाला सूचना करायचे, मदत करायचे, एखाद्या विशिष्ट थिअरीचा अभ्यास करायला सांगायचे. पण एकूण शिक्षणाचा 95 टक्के भाग प्रात्यक्षिक होता.

नाटकातलं गाणं हा आमच्या अभ्यासाचा एक विषय होता. पाश्चात्त्य पद्धतीच्या अभिनय शिक्षणात केवळ बोलणं, संवादफेक, चेहऱ्यावरचे हावभाव एवढंच अभिप्रेत नाही. संपूर्ण शरीराचा वापर अभिनयासाठी कसा करायचा, दमसास, आवाज लावण्याची तंत्रं, शरीराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचाली, देहबोली, संवाद आणि गाणं यांत श्वासातून फरक कसा करायचा, गातानाचा अभिनय याविषयी खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मी तिथे शिकले.

प्रश्न : तुझ्यावर तिथल्या कोणत्या शिक्षकांचा प्रभाव आहे?

- आंद्रे सरबन यांनी क्लासिक नाट्यसंहितांचा अभ्यास करण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. निक आणि उला वॉल्ट्झ यांनी हालचाली आणि आपल्याला प्रेक्षकांना जे सांगायचं आहे ते कसं सांगायचं याची विलक्षण समज दिली. डेव्हिड कॅपरेलोटिस आणि जेम्स कॅलेरी यांनी आम्हाला ऑडिशनला जाण्यापूर्वी एखाद्या दृश्याचा अभ्यास कसा करायचा हे शिकवलं. नाट्य क्षेत्रात 'टोनी पुरस्कार' हा जागतिक दर्जाचा, सर्वत्र मान्यता असलेला मानाचा पुरस्कार आहे. तो पुरस्कार मिळवलेले दिग्दर्शक ग्रेग मूअर यांनी आम्हाला संहितेतली गुंतागुंत कशी शोधायची आणि तालमी सुरू करण्यापूर्वी नाटककाराच्या लेखनाचं सर्वोत्तम विश्लेषण कसं करायचं हे शिकवलं.

प्रश्न : या शिक्षणाचा एक माणूस म्हणून तुला काय फायदा झाला?

- एका अर्थाने मी एक जागतिक नागरिक बनले. मला खूप लोकांना भेटता आलं. त्यामुळे आणखी लोकांना भेटावं, त्यांची संस्कृती समजून घ्यावी अशी ओढ निर्माण झाली. प्रवास करता आला, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक बनला. आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा यांच्यात चांगली वाढ झाली. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, या जगात एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका, माझा दृष्टीकोन आकाराला आला. अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध 'ब्रॉडवे म्युझिकल 'मध्ये काम करण्याची संधीही मिळाली.

प्रश्न : ब्रॉडवेवरच्या नाट्यसंस्कृतीविषयी आणि म्युझिकल्सविषयी थोडंसं सांग...

- ब्रॉडवेवर लहान-मोठी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं होतात. त्यांच्या मोठ्या व्यावसायिक स्तरावरच्या नाटकाचं नेपथ्य खूप अवाढव्य, बऱ्याच सोयी करून घेतलेलं असतं. ते वारंवार हलवता येत नाही. त्यामुळे एक नाटक एकाच थिएटरला सलग किमान एक महिना सादर होत राहतं. कधी कधी तर अनेक महिने, वर्ष सातत्याने एकाच ठिकाणी त्या नाटकाचे प्रयोग होतात. एका नाट्यगृहात आज सकाळी एक नाटक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच असे वेगवेगळे सेट लावून प्रयोग तिथे होत नाहीत, होणं शक्यच नाही.

तिकडचं नाटक आपल्याकडच्या नाटकापेक्षा खूप वेगळं आहे. तिथली संगीत रंगभूमी म्हणजे ब्रॉडवे म्युझिकल्सची संस्कृती तर फारच वेगळी आहे. अमेरिकेतली संगीत रंगभूमीच काय, तिथल्या एकूण सर्वच प्रकारच्या संगीतावर कृष्णवर्णीय कलाकारांनी एक वेगळीच छाप सोडली आहे, आणि त्यामुळे त्या संगीतात एक विद्रोह, संघर्ष यांचा वेगळा बाजही आहे.

प्रश्न : तू स्वतःसुद्धा ब्रॉडवे म्युझिकलमध्ये काम केलं होतंस...

- हो. 2001 मध्ये मीरा नायर यांनी 'मॉन्सून वेडिंग' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर वीस वर्षांनी त्यांनी स्वतःच तेच कथानक संगीत नाट्याच्या स्वरूपात बसवलं. बर्कले रेपर्टरी थिएटरने मे 2017 मध्ये 'मान्सून वेडिंग, द म्युझिकल' या नावाने ते ब्रॉडवेवर सादर केलं. ब्रॉडवे म्युझिकल, आणि नाचगाण्यांनी नटलेला बॉलीवूड ड्रामा यांचा संगम त्यात होता. त्यात माझी नवऱ्या मुलीच्या चुलत बहिणीची भूमिका होती. मला गाणीही होती. गाणी, संवाद आणि नृत्याच्या माध्यमातून ती मांडणी केलेली होती. विशाल भारद्वाज यांनी संगीत दिलेलं होतं. मीरा नायरसारख्या जागतिक कीर्तीच्या भारतीय दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभवही सुंदर होता. ब्रॉडवेवर काम करणं हे भारावून टाकणारं आणि आत्मविश्वास वाढवणारं होतं.

प्रश्न : मीरा नायर यांच्यासोबत तू विक्रम सेठ यांच्या 'अ सूटेबल बॉय' कादंबरीवर आधारित वेब सिरीज-साठीही काम केलं आहेस. तो अनुभव कसा होता?

- 'अ सूटेबल बॉय' या सहा भागांच्या मालिकेची निर्मिती 'बीबीसी वन'ने केली आहे. त्याचं दिग्दर्शन मीरा नायर यांचं आहे. त्यात मी नायिकेच्या जिवलग, विश्वासू मैत्रिणीची मालतीची भूमिका केली आहे. कादंबरीतला काळ हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचचा, साधारण 1950-51 चा आहे. मालती ही त्या काळातली विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारी, स्वतंत्र विचारांची, स्वतःची ठाम मतं असलेली मुलगी आहे. ती अतिशय मोकळ्या स्वभावाची आहे. मन, भावना, प्रेम या बाबतींत सखोल विचार करणारी आहे. हे काम करताना बॉलीवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची, त्यांचं काम जवळून बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिळाली.

मीरा नायर या अत्यंत प्रगल्भ विचार करणाऱ्या, स्थळकाळाच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन निखळ मानवी भावनांचं चित्रण करणाऱ्या, संमिश्र सांस्कृतिक अस्मितांविषयी सुंदर तपशीलवार काम करणाऱ्या खऱ्या अर्थाने 'वर्ल्ड क्लास' दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत माझ्या व्यावसायिक करियरच्या सुरुवातीच्या कळताच काम करायला मिळालं ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते मला.

प्रश्न: भारतीय रंगभूमीवर वाचिक अभिनयाला शारीरिक हालचालींपेक्षा जास्त महत्त्व आहे, आणि युरोप-अमेरिकेत शारीरिक हालचालींवर अधिक भर आहे, असं दिसतं. त्याबाबत तुझा काय अनुभव?

- अगदी पारंपरिक नाटकाचा विचार केला तर हा फरक आढळतो. पण आजच्या जगात सगळ्याच स्तरांवर इतकी सांस्कृतिक देवाणघेवाण झालेली आहे की, आपल्याकडेही शारीरिक हालचालींना प्राधान्य देऊन नाटक करणारे, अभिनयाच्या वेगळ्या पद्धती आजमावून पाहणारे, आत्मसात करणारे कलाकार आणि दिग्दर्शक वाढले आहेत. माझ्यापुरतं सांगायचं तर, इप्टा आणि गिल्लोमध्ये काम करताना आम्ही शारीरिक हालचालींचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतच होतो, त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर माझ्यासाठी ते नवीन नव्हतं, मात्र संहिताविश्लेषण खूप नवीन होतं. परत आल्यावर काम करताना मला जाणवलं की, आपल्याकडे सगळ्याच प्रकारचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध नसलं, तरी कार्यशाळांतून जगातल्या वेगवेगळ्या अभिनयतंत्रांचा अभ्यास थोडासा औपचारिक आणि बराचसा अनौपचारिक पद्धतीने होतच असतो. अनेक कलाकार आणि दिग्दर्शक असे वेगळे प्रयोग करताना दिसतात.

प्रश्न : अमेरिकेतून परत आल्यावर तू काय काम सुरू केलंस?

- अमेरिकेतून आल्या आल्या मला काम सुरू करावं लागणारच होतं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज होतीच. अभिनय आणि गाणं अशा दोन गोष्टींचा वापर त्यासाठी करणं मला शक्य होतं. मला अभिनय शिकवण्यासाठी विचारलं होतं. पण मास्टर्स करताना एक गोष्ट पक्की लक्षात आली होती की, मी स्वतः अभिनय करायला शिकले आहे. मात्र, अभिनय कसा शिकवायचा हे मी औपचारिक पद्धतीने शिकलेली नाही. त्यामुळे अभिनय शिक्षक म्हणून मी पूर्ण वेळ काम करूच शकले नसते, याची मला कल्पना होती. त्यामुळे मी नाटकांतून काम करायला सुरुवात केली. आणि त्याव्यतिरिक्त माझा एक गाण्याचा बँडही होता.

माझा एक गायक-गिटारवादक मित्र आहे, जॉन सोन्स. आमची कॉलेजपासून मैत्री आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही एकत्र कार्यक्रम केले होते, आणि मी अमेरिकेतून परत आले तेव्हा तो व्यावसायिक कार्यक्रम करायला लागलेला होता. आम्ही एकत्र बँड सुरू केला. सुरुवातीला बँडमध्ये आम्ही दोघंच होतो. माझे केस कुरळे आहेत आणि जॉनला दाढी आहे, म्हणून 'कर्ल्स अँड बियर्ड्स' असं आमच्या बँडचं नाव ठेवलं होतं.

हळूहळू बरेच कार्यक्रम मिळायला लागले. जॉनबरोबर काम करताना मी गॉस्पेल म्युझिक (ख्रिस्ती भक्तिसंगीत) ऐकलं. अनेक कलाकारांशी ओळख वाढली, एकत्र काम करता आलं. काहून बॉक्स आणि चेलो वाजवणारे दोन कलाकार आमच्यासोबत नियमितपणे यायला लागले आणि आमचा बँड चौघांचा झाला. आम्ही हॉटेल शोज, वेडिंग शोज, रेस्टॉरंट्समध्ये म्युझिकल नाईट्स, पार्टी शोज, कॉर्पोरेट शोज, कधी लहान तर कधी मोठ्या स्टेजवरचे शोज असे खूप कार्यक्रम केले. 2015 ते 2023 या आठ वर्षांत हे कार्यक्रम सातत्याने करत होते. साधारणपणे महिन्याला दोन-तीन शोज करत होते.

या कार्यक्रमांत मी प्रसिद्ध इंग्रजी-हिंदी गाण्यांची कव्हर्स तर गात होतेच, शिवाय आम्ही काही ओरिजिनल गाणीही गात होतो. फ्यूजनचे प्रयोग करत होतो. त्या निमित्ताने विशिष्ट प्रसंगाला साजेशी, विशिष्ट भावना व्यक्त करणारी गाणी स्वतः लिहून, त्यांना चालीही लावल्या. पण आता मी अभिनयात जास्त रमले आहे आणि तो संगीत शिकवण्यात मग्न आहे. त्यामुळे आम्ही बँडचे कार्यक्रम बंद केले आहेत.

प्रश्न : बँडचे कार्यक्रम कसे बांधलेले असतात?

- कार्यक्रमाचं निमित्त हे केंद्रस्थानी असतं. लग्नात, अॅनिवर्सरीत प्रेमाची गाणी, एकमेकांच्या आठवणींची गाणी, कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये मस्तीच्या मूडची, धमाल नाचता येईल अशी गाणी हवी असतात किंवा बॉलरूम पार्टीत स्लो डान्ससाठीची गाणी हवी असतात. रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळ्या थीम घेता येतात. विशिष्ट गायक किंवा बँड, विशिष्ट काळ, विशिष्ट मूड वगैरे.

प्रत्येक कार्यक्रमात खास आमची ओळख असलेली, आमची ओरिजिनल, काही लोकप्रिय जुनी-नवी गाणी घ्यावी लागतात. त्यातून लोकांना आमच्याशी रिलेट करता येतं. काही नवं, वेगळं असंही त्यात पेरता येतं. सर्वसाधारणपणे दोन तास कार्यक्रम असतो. कधी फर्माईश वाढली तर लांबतोही.

प्रश्न : तू स्वतःच गाणी लिहिली आहेत आणि चालीही बांधल्या आहेत. त्याची तुझी प्रक्रिया काय आहे? आधी शब्द सुचतात की चाल?

- मी मोजकीच गाणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहेत. सहज सुचलं आणि गाणं केलं असं माझ्या बाबतीत घडलेलं नाही. गाण्यातून व्यक्त करायचा आशय, विषय आणि भावना हे मला आधीच माहीत होतं. उदाहरणार्थ, एका जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आमचा कार्यक्रम ठरला होता. नवऱ्याने बायकोला सरप्राइज म्हणून खास तिच्यासाठी बनवलेलं गाणं गिफ्ट करायचं ठरवलं होतं. मग मी त्यांच्या नात्याच्या प्रवासाची थोडी माहिती घेतली, आणि त्यावरून एक प्रेमाचं गाणं बांधलं.

भावना हा मी केलेल्या गाण्यांचा पाया होता. कधी आधी शब्द सुचले आणि मग त्यांना चाल लावली, तर कधी चालीवर शब्द सुचत गेले. कधीकधी दोन-दोन ओळींचे शब्द सुचले, मग त्याची चाल सुचली, मग त्या चालीच्या आधाराने पुढची थोडी चाल सुचली, मग त्यावर शब्द सुचले, असं टप्प्याटप्याने, सिंबायॉटिक पद्धतीनेही घडलेलं आहे. शब्द आणि चाल यांच्यातला दुवा म्हणजे त्या गाण्यातल्या भावना असतात. त्या मला हव्या तशा गाण्यातून नेमक्या येईपर्यंत त्यावर काम सुरू असतं. मनात त्या गाण्याची एक अमूर्त कल्पना तयार होणं, त्यावर नेमके शब्द, चाल सुचणं आणि मग ते गायन-वादनाच्या मेळातून साकार करणं हा प्रवास फार छान आहे, हा अनुभव आणखी घ्यायला हवा.

प्रश्न : रेस्टॉरंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट, पार्टी, लग्नं अशा ठिकाणी लोकांचा मुख्य उद्देश गाण्याचा कार्यक्रम ऐकणं हा नसतो. ते काहीतरी वेगळ्या निमित्ताने भेटलेले असतात, आपापसांत गप्पा मारत असतात, अशा ठिकाणी कलाकारांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष असतंच असं नाही. अशा ठिकाणी काम करणं ही तडजोड वाटते का? कलाकाराच्या सर्जनशीलतेवर त्यामुळे मर्यादा येतात का?

- माझे आई-वडीलसुद्धा पूर्वी असं काम करत होते आणि तेव्हा मला या गोष्टीचं वाईट वाटायचं. पण जेवढे जास्त कार्यक्रम पाहिले आणि केले, तसतसं हेही लक्षात यायला लागलं की, त्यातही कलाकारांचा आदर करणारे, त्यांना दाद देणारे, कौतुक करणारे, फर्माईश करणारे
अनेक लोक असतात. कधी कधी लोक तुमच्यासोबत गायला लागतात, नाचायला लागतात, त्या संगीताचा मनापासून आस्वाद घेतात. एखाद्या कार्यक्रमाचं रूपांतर चांगल्या मैफलीत होतं. त्यातून पुढचं काम मिळतं. आणि माऊथ पब्लिसिटीने नवं काम मिळतं, तेव्हा पूर्वी कार्यक्रम ऐकलेले काही लोक खास तुमचं गाणं ऐकण्यासाठीही येतात. एखाद्या निमित्ताने आधी खास गाण्यांचा कार्यक्रम आणि तो संपल्यावर जेवण-पार्टी असंही नियोजन असतं. असे चांगले अनुभव येतात, त्याने काम करण्याचा हुरूप टिकून राहतो. कधीकधी कार्यक्रम दुय्यमच ठरतो, कलाकार बॅकग्राऊंडचा भाग ठरतात, अशा ठिकाणी हा कामाचा भाग आहे असं म्हणून, ते पचवून पुढे जायलाही मी शिकले. रेकॉर्डिंग स्टुडिओतल्यापेक्षा लाइव्ह कार्यक्रमांत पैसाही जास्त आहे. त्यामुळे अनेक कलाकार आयुष्यभरासाठी हे करियर म्हणून निवडतात.

सर्जनशीलतेचा प्रश्न वेगळा आहे. कलाकार स्वतःसाठी, स्वतःपुरतं काम करत असतो, रियाज करत असतो, तेव्हा सर्जनशीलतेला जास्त वाव असतो. तेव्हा जे नवीन सुचेल, जे प्रयोग करून निर्माण होईल, ते कार्यक्रमांत सादर करायचं असतं. कार्यक्रमांतसुद्धा तुम्ही एखाद्या गाण्यात, रचनेत रंगलात की त्यात नवीन काहीतरी सुचू शकतं आणि कार्यक्रमाचा माहौल तसा जमलेला असेल तर ते सुचतंही. त्यामुळे फर्माईशी असलेले लाइव्ह कार्यक्रम करून सर्जनशीलतेवर मर्यादा येतात असं मला वाटत नाही.

प्रश्न : गाता गाता अभिनय करता येतो का आणि असेल तर कसा?

- तुम्ही हा प्रश्न मला विचारलात, थैंक यू. अभिनय करताना गाणं हा माझ्या अगदी आवडीचा प्रकार आहे. मला त्यात कायमच सगळ्यात जास्त मजा येते. आणि आत्ता जे मी सांगणार आहे, ते अशा शब्दांत मांडणं तर सोडाच, पण नेमकेपणाने समजतही नव्हतं तेव्हापासून मला असं वाटत आलेलं आहे की, अभिनय करताना गाणं ही माझ्या गाण्याची सगळ्यात खरी अभिव्यक्ती आहे. मला हे पहिल्यांदा जाणवलं ते अतुल तिवारी यांच्यासोबत एक हिंदी नाटक करत असताना. त्या नाटकात मी एक 'मर्सिया' गायचे. मर्सिया म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीला नेण्यापूर्वी अंगणात प्रेत ठेवलेलं असतं ना, त्या प्रेतापुढे गायचं गाणं. त्या नाटकात माझं पात्र सासूचं होतं. माझी सून मरते, आणि तिच्या प्रेतापुढे मी ते गाणं म्हणते असा प्रसंग होता. त्या वेळी मला भावना आणि गाणं यांचा मेळ घालणं वेगळ्या पद्धतीने शिकायला मिळालं. गाणाऱ्या व्यक्तीचं रडणं गृहीत धरूनच त्यासाठी जागा ठेवूनच मर्सियाची रचना केलेली असते. ते गाताना श्वास विशिष्ट पद्धतीने वापरावा लागतो. अभिनय आणि गाणं यांची सांगड घालताना कायमच श्वासावरचं नियंत्रण महत्त्वाचं ठरतं. त्यातून गाण्यात भावना आणता येतात. त्या वेळी अगदी पक्का सूर किंवा राग यांना महत्त्व राहत नाही, तर raw भावना महत्त्वाची ठरते. ते मला गाण्याचं खरं रूप वाटतं. अशा खऱ्या गाण्यासाठी माझा आवाज वापरणं हे मला आवडतं. गाण्यातून माझी एक गोष्ट सांगणं याची मला भुरळ पडते.

प्रश्न : एखाद्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगात वारंवार तोच अभिनय करणं किंवा तेच गाणं यात एकसुरीपणा जाणवतो का?

- अजिबात नाही. प्रत्येक प्रयोगाची जागा वेगळी असते, तिथलं acoustic वेगळं असतं, प्रेक्षक वेगळे असतात, आणि कलाकारही एका अर्थाने वेगळेच असतात. कारण आपण कधीच आजच्यासारखे जसेच्या तसे उद्या नसतो. आणि नाटकापुरतं सांगायचं, तर अभिनय आणि गाणं हेसुद्धा प्रत्येक वेळी नवं असतं. कलाकाराला एखाद्या वेळी काही नवं सापडतं, काही नवे अर्थ समजतात. प्रत्येक प्रयोग हा एक स्वतंत्र अनुभव असतो. त्यामुळे एकसुरीपणाचा प्रश्नच येत नाही.

प्रश्न: संगीत पक्ष आणि साहित्यपक्ष याबद्दल शास्त्रीय संगीतात बरंच विवेचन आहे. म्हणजे थोडक्यात सूर अधिक महत्त्वाचे की शब्द. तुला काय वाटतं?

- हे दोन्ही तर महत्त्वाचे आहेतच, पण एक तिसरा पक्षसुद्धा मला महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे सच्चा भाव. एक कलाकार म्हणून आणि एक पात्र म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे एखादी भावना व्यक्त करण्यासाठी गाता, तो भावनेचा सच्चेपणा साधला तर रंगमंचावरचं गाणं प्रेक्षकांनाही खरं वाटतं, भावतं. मी असाही अनुभव घेतला आहे की, मी रंगमंचावर नुसती उभी आहे, एका लयीत श्वास चालू आहेत आणि त्या श्वासांच्या लयीत सूर आणि शब्द जोडले जातात आणि गाणं अगदी आतून सहजपणे बाहर येतं. आणि हे सगळं आम्ही त्या पद्धतीने बसवतो आणि प्रत्यक्ष प्रयोगात गातो.

अमेरिकेतल्या आणि भारतातल्या काही चांगल्या गायक अभिनेत्यांकडे पाहूनही मी शिकले आहे. नमित दास नावाचा एक गायक-नट आहे, मी त्याला रोल मॉडेल समजते. अमेरिकन म्युझिक थिएटरमधल्या सिंथिया एरिगो हिचं कामही मला प्रभावी वाटतं.

प्रश्न : सध्या तू काय काम करते आहेस?

- कृष्णाच्या जीवनावर आधारित 'राजाधिराज' नावाचं एक हिंदी संगीत नाटक आहे. त्यात मी यशोदेची भूमिका करते आहे. या नाटकातलं एकमेव एकल गाणं मी रंगमंचावर गाते. या नाटकातल्या संगीताचं वैशिष्ट्य असं की, ते हिंदी चित्रपटांसारखं लार्जर देंन लाईफ आहे, पण ते फिल्मी नाही, रंगभूमीचंच संगीत आहे. त्याचं पार्श्वसंगीत आणि वाद्यमेळ पाश्चात्त्य पद्धतीचा आहे, आणि चाली पारंपरिक भारतीय संगीतावर आधारित आहेत. सध्याचे बॉलीवूडमधले आघाडीचे संगीतकार सचिन जिगर यांनी संगीत केलं आहे. अशा प्रकारचं संगीत, पारंपरिक लोकसंगीत गाणाऱ्या गायकांनी बांधीव रचना गाणं, भारतीय आणि पाश्चात्त्य वाद्यांचा वेगळाच मेळ, हा सगळा 'लाइव्ह' अनुभव पुनःपुन्हा ऐकायला लोक येतात.

एक 'समथिंग लाइक टूथ' नावाचं हिंदी-इंग्लिश नाटक मी करते आहे. शांता गोखले यांनी सत्य, न्याय आणि स्वातंत्र्य या तीन संकल्पनांवर आधारित आणि काही ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेऊन चार एकपात्री प्रवेश लिहिले आहेत. ते इंग्रजीत आहेत. शिल्पा बल्लाळ यांनी ते हिंदीत आणले आणि पर्ण पेठेने नाट्यरूपात दिग्दर्शित केले. त्याला आभा सौमित्रचं संगीत आहे. त्यात माझी भूमिका मरी नावाच्या एका फ्रेंच सैन्यासाठी काम करणाऱ्या सफाई कामगार स्त्रीची आहे. आपण मोठं देशकार्य केल्याचा अभिमान मरीला वाटत असतो, पण त्यातलं सत्य कदाचित वेगळंच असतं असा प्रसंग आहे. या नाटकात मी एक गाणंही म्हणते. आणखीही एका हिंदी नाटकाच्या तालमी सुरू आहेत.

प्रश्न: ऐतिहासिक, पौराणिक आणि एकूणच स्मृतिरंजन प्रकारात मोडणारं संगीत नाट्य हा प्रवाह जगात सर्वत्र दिसतो...

- हो अगदी सगळीकडे, सगळ्या संस्कृतींत. इतिहास, मिथकं, परीकथा आणि जुन्या कथा-कादंबऱ्या यांची मोहिनी सगळीकडे दिसते. त्यांच्या गोष्टी पुन्हा सांगणं किंवा त्या नव्या काळातल्या वेगळ्या संदर्भाच्या आधारे वेगळ्या दृष्टीकोनातून मांडणं हे सगळ्यांना आवडतं.

प्रश्न : आपल्याकडे एकाच नाटकाचे अनेक प्रयोग, अनेक दिग्दर्शक, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तसं अमेरिकेत होतं का?

- युरोप-अमेरिकेत नवं नाटक बसवताना त्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या अंगांनी विचार केला जातो. अभिनय, संगीत, नेपथ्य, वेशभूषा सगळ्यांत प्रयोग केले जातात, पण एकदा ते बसलं की त्यात फारसे बदल होत नाहीत. नवे दिग्दर्शक, नवे कलाकार घेऊन नव्या संचात तेच बसवताना काही वेगळे प्रयोग होतात, परंतु एक चौकट ठरली की त्या चौकटीबाहेर फार कोणी जात नाही. ती चौकट मोडली की बरेचदा त्यातून नवं नाटक जन्माला येतं. 'हॅमिल्टन', 'फँटम ऑफ द ऑपेरा', 'लायन किंग' किंवा ग्रीक पुराणकथांवर आधारित अनेक नाटकं वर्षानुवर्ष ब्रॉडवेवर सादर होत आहेत. एका बाजूने विचार केला तर हे बांधून टाकणारं वाटू शकतं, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यात विशिष्ट नाट्यसंस्कृती आणि नॉस्टॅल्जिया दोन्ही जपले जातात असंही दिसतं.

प्रश्न : एक कलाकार म्हणून सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भूमिका घेणं तुला महत्त्वाचं वाटतं का?

- अर्थात. मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की, अभिनय करताना, त्यातही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना, स्वतःची एक वैचारिक बैठक, भूमिका नसून चालणारच नाही. एक अभिनेत्री म्हणून मी कोणत्या भूमिका स्वीकारते, त्यातून लेखकाने लिहिलेल्या संवादांच्या पलीकडचं जे काही शोधते आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते त्या सगळ्याला त्या-त्या काळातले सामाजिक-राजकीय संदर्भ असतात, आणि मी साकारलेल्या पात्राची आणि माझी स्वतःची एक भूमिका असते. ती कामातून व्यक्त होते. त्याशिवाय मी साकारलेलं पात्र 'माझे' होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे माणूस म्हणून माझ्या विचारांशी जुळणाऱ्या भूमिका आपोआप केल्या जातात. प्रत्यक्ष चळवळीत भाग घेणं, न्यायासाठी आवाज उठवणं हेही मला महत्त्वाचं वाटतं आणि ते मी करते, परंतु त्या अर्थाने कोणत्याही संघटनेशी मी जोडलेली नाही. माझे विचार मी स्वतंत्रपणे व्यक्त करते.

प्रश्न: अशी कोणती भूमिका तू प्रामुख्याने घेत आली आहेस?

- मी स्त्रीवादी आहे. स्त्री म्हणून स्वतंत्र असलेली आई आणि आजी यांना बघत मी मोठी झाले आहे. शिवाय केलेलं वाचन, घेतलेले अनुभव, पाहिलेली नाटकं, चित्रपट, भेटलेली माणसं, माझ्या काही युरोपीय शिक्षिका, ज्यांच्याबरोबर काम केलं आहे अशा विचारी आणि यशस्वी स्त्रिया यांच्या प्रभावातून माझी ही भूमिका घडत गेली आहे, आणि आता ती भूमिका अधिक स्वतंत्र झाली आहे, होते आहे.

महिला शिक्षकांचा किंवा एकूणच स्त्रियांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन मला भावतो. अमेरिकेत मी अशा व्यावसायिक जगात काम करत होते की, स्त्रिया फक्त अभिनेत्री नव्हत्या तर उत्तम दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संपादक, संकलक, नेपथ्य व्यवस्था बघणाऱ्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्ह, बौद्धिक आणि शारीरिक कार्म त्या सहजपणे करत होत्या. त्या पुरुषप्रधान क्षेत्रात प्रवेश करत आहेत असं त्यांना स्वतःला अजिबात वाटायचं नाही. मी आधी इकडे थोडं वेगळं वातावरण अनुभवलेलं होतं, नाट्यक्षेत्रातली अंगमेहनतीची आणि तांत्रिक कामं मुख्यतः पुरुष करायचे आणि महिला ते काम करत असेल, तर त्याचं अप्रूप वाटायचं. पण तिकडे त्या मुलींना आपण हे काम करतो एवढंच वाटत होतं आणि त्याचा माझ्या विचारांवर चांगला प्रभाव पडला.

दुसरी एक गोष्ट मला मनापासून सांगावीशी वाटते, ती म्हणजे 'मी अंशतः स्त्रीवादी आहे', 'मी अमुक विशिष्ट प्रकारची स्त्रीवादी आहे' असं म्हणणं मला पटत नाही. स्त्रीवाद काळाबरोबर विकसित होत गेला, त्याचं स्वरूप चळवळीतून बदलत गेलं असलं, तरी त्याची एक स्पष्ट दिशा आहे. तो वैयक्तिक, माणसागणिक बदलणारा किंवा सापेक्ष स्वरूपाचा नाही. त्यात मान्य करण्याच्या पातळ्या वगैरे नसतात. त्याचा विचार समग्रतेनेच केला पाहिजे, असं मला वाटतं.

प्रश्न: भविष्यात तुला काय करायला आवडेल, तुझी ओळख काय असेल?

- मी जे शिकले आहे, ते शिकवायला मला आवडेल. भविष्यात त्यासाठी मी निश्चित अभ्यास करेन. पण सध्या माझा भर स्वतः एक उत्तम परफॉर्मर होण्यावर आहे. मी जे संगीत नाट्याचे प्रकार शिकले आहे, त्यांचा गाभा कायम ठेवून ते अधिक कालसुसंगत पद्धतीने लोकांपुढे आणणं मला महत्त्वाचं वाटतं. कोणतेही पारंपरिक कलाप्रकार एका जागी थांबल्यासारखे राहू नयेत, काळाच्या प्रवाहात तेही पुढे जावेत, त्यात बदल होऊन त्यांचं स्वरूप नव्या पिढ्यांना आकर्षित करत राहील, असं व्हावं असं मला वाटतं आणि त्यासाठी संशोधन करून मला प्रत्यक्षात त्या पद्धतीचं काम सादर करायचं आहे.

आधी मी आतापेक्षा जास्त गायन करत होते, पण सध्या मी अधिक प्रमाणात अभिनय आणि त्या अनुषंगाने गाणं असं करते आहे. मला एकाच प्रकारात अडकायचं नाही. माझ्या कलेचं अमुक किंवा तमुक प्रकारांत वर्गीकरण होऊ द्यायचं नाही, व्हर्सटाईल किंबहुना 'अनक्लासिफाएबल' राहता आलं, तर ते माझ्यासाठी खऱ्या अर्थाने उज्वल भविष्य असेल.

संवादक :  विनय हर्डीकर व ऋचा मुळे
शब्दांकन :  ऋचा मुळे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शर्वरी देशपांडे,  पुणे ( 1 लेख )

अभिनेत्री व गायिका




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी