'संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास' या पुस्तकात 30 मुलींनी त्यांचा शैक्षणिक जीवनप्रवास शब्दबद्ध केला आहे. (हरिती प्रकाशन, लातूर) अनिल जायभाये व पंचशील डावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. हे लेखन वाचकांना अंर्तमुख करते. तसेच लिंगभावात्मक दृष्टीकोनातून संवेदनशील बनवते. यात एकविसाव्या शतकातील दलित-बहुजनांच्या मुलींचा शैक्षणिक संघर्ष दिसून येतो. जातिव्यवस्था, समाजरचना, कुटुंबपद्धती, सामाजिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक व धार्मिक जीवन व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अडथळा ठरतात, याचे दर्शन प्रस्तुत ग्रंथात होते. जात, वर्ग व पितृसत्ताक समाजरचनेशी या लेखिकांना पदोपदी झगडा द्यावा लागला. शिक्षण, प्रेम, कुटुंब, मातृत्व व नोकरी इत्यादींसाठी सतत संघर्ष करावा लागला. त्याचे प्रतिबिंब या लिखाणात उमटलेले आहे.
संघर्षगाथा हा बहुजन मुलींच्या जीवनप्रवासाचा संवेदनशील आणि प्रेरणादायी दस्तऐवज आहे, ब्लॅक आणि दलित साहित्याच्या आशयाशी त्याची नाळ जुळते. या पुस्तकातील 30 आत्मकथनांपैकी 15 दलित महिलांच्या कथा असून, भटक्या जमाती व दुर्बल घटकांतील मुलींच्या संघर्षाचीही प्रभावी मांडणी यात आहे. 1980 ते 2023 या कालखंडातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा त्यांच्या शिक्षणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. 23 ते 45 वर्षे वयोगटातील या महिलांमध्ये, 18 जणींचा विवाह शिक्षणाच्या प्रवासात झाला त्यामुळे शिक्षणात खंड पडला, तरीही त्यांची जिद्द अविचल राहिली. प्रेमविवाह करणाऱ्या सहा जणींपैकी दोघींनी आंतरजातीय विवाह केला असून चौघींनी जाती अंतर्गत विवाह केला आहे. या सर्व लेखिका ग्रामीण भागातील आहेत. कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. एकविसाव्या शतकातही महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत समाजव्यवस्था अनुकूल नाही, असा अनुभव त्यांनी घेतला, त्यांचा संघर्ष बहुपदरी आहे. ज्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावरील भेद स्पष्टपणे जाणवतो. हे वाचताना वाचक या महिलांच्या संघर्षाशी जोडला जातो, त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा साक्षीदार बनतो.
यातील काही आत्मकथनांचा थोडक्यात गोषवारा पुढे मांडला आहे.
निशा शिंदेचा जीवनप्रवास कठोर संघर्षाचा आहे. बडिलांनी तिला नाकारले, आईला भंगार गोळा करत जगावे लागले, तर आजीने तिला आधार दिला. सावत्र वडिलांकडून अपमान सहन करत तिने उच्च शिक्षणाची जिद्द सोडली नाही आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संध्या वाडकरचा संघर्ष वेगळ्या पातळीचा आहे. शिक्षणासोबत प्रेमाचा. दहावीतील आकर्षण प्रेमात बदलले, परंतु शिक्षणात अडथळा येऊ न देता तिने प्रेमविवाह केला, प्रियकर शिक्षणात मागे राहिला तरी तिने त्याचा स्वीकार केला आणि कुटुंब, मातृत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावत उच्च शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात असलेली जिद्द आणि आत्मसन्मान वाचकांना प्रेरणा देणारा आहे.
ग्रामीण भागातील मुलांना माहितीच्या अभावामुळे अनेक संधी गमवाव्या लागतात. दारिद्रयामुळे कुटुंब आर्थिक संकटात असते, ज्यात शिक्षणाचा खर्च मोठा अडथळा ठरतो. मुलांच्या शिक्षणाला अधिक महत्त्व देत मुलींच्या शिक्षणावर मर्यादा घातल्या जातात, ज्यामुळे त्यांना वडील व भावाची संमती, तसेच विविध अटी मान्य कराव्या लागतात. संवेदनशील आणि जिद्दीने भरलेल्या मुली शिक्षणाच्या संधीचा उपयोग करूनशासकीय, निमशासकीय पदांसाठी प्रयत्न करतात, पोलिसांसारख्या कठीण नोकऱ्यांसाठी मेहनत घेतात. पालक आर्थिक अडचणी असूनही मुलींना शिक्षण देण्यासाठी त्याग करतात. तसेच, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाचा ठामपणे सामना करतात. प्राजक्ता लोंडाळ यांच्या संघर्षमय प्रवासातून ही कठीण परिस्थिती प्रकर्षाने जाणवते आणि वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करते.
स्नेहा चामले यांचे आत्मकथन प्राध्यापकांच्या सहवासातून वैचारिक परिवर्तनाच्या प्रवासाचे आहे. गावात मुलींना दहावीपर्यंत शिक्षण मिळते, मात्र गावाबाहेर शिकण्यास अनेक मर्यादा येतात. काही मुली जिद्दीने शिवणकाम करून शिक्षणाचा खर्च भागवतात, जसे भावना कदम यांनी केले. आशा पठाणचा संघर्ष अधिक कठीण होता. तिचा जन्म दलित कुटुंबात झाला. पित्याकडून उपेक्षा सहन करावी लागली. पुढे आईचा दुसरा विवाह झाला. त्या मुस्लीम कुटुंबात स्वीकृती मिळविण्यासाठी पदोपदी संघर्ष करावा लागला. तिचे आधीचे आशा नाव बदलून आएशा ठेवण्यात आले, धार्मिक आणि कौटुंबिक बंधने लादण्यात आली. अशा खडतर वाटेवर ती निरंतर प्रवास करत राहिली. शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडचणी असूनही ती बारावी परीक्षेत प्रथम आली. वृत्तपत्रात तिचे मूळ नाव आल्याने सावत्र वडिलांनी सत्काराला नकार दिला, ज्याचा तिच्यावर मोठा परिणाम झाला. तरीही सर्व अडथळे पार करत तिने उच्च शिक्षण घेतले आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. तिचा प्रवास दलित-मुस्लीम संस्कृतीतील संघर्षांचे उदाहरण आहे.
शिक्षित कुटुंबातील सुमेधा ढवळे लेखन कौशल्य विकसित करून कथा-कवितांतून आपली ओळख निर्माण करते. अंजली कुलकर्णी दारुड्या वडिलांमुळे आर्थिक संकटांचा सामना करत, काम करून शिक्षण पूर्ण करते आणि प्रेमविवाहानंतरही संघर्ष करत कुटुंबाचा आधार होण्याचा प्रयत्न करते. जन्नत शेखला दहावी नापास झाल्यावर घरातील रद्दी विकून परीक्षा शुल्क भरावे लागले. पुढे मुक्त विद्यापीठातून पदवी आणि नांदेड विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रातून तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पूनम ढगेला गायन, नृत्य, लेखनाचे कौशल्य असूनही वडिलांच्या दबावामुळे ते जोपासता येत नाही.
तरीही ती घरबसल्या उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवते. स्वाती हाळसपुरे गरिबीमुळे शिक्षणात अडथळा येऊनही हॉस्पिटलमध्ये काम करून पदवी पूर्ण करते. विवाहानंतर शिक्षण थांबते, पण पतीच्या मदतीने ती पुन्हा शिक्षण सुरू करते. वैशाली सोमवंशी बाहेरगावी शिक्षण घेताना अडचणी सहन करते. नृत्याची आवड असूनही ती जोपासता येत नाही, पण कुटुंब आणि शिक्षकांच्या सहकार्याने उच्च शिक्षण पूर्ण करते. या सर्व संघर्षमय प्रवासातून प्रत्येक मुलीच्या जिद्दीची कहाणी समोर येते.
माया चव्हाणने दुर्गम खेड्यातील कठीण परिस्थितीत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, चिखलाचे रस्ते, उसाच्या फडातील अडथळे आणि स्मशानभूमीची भीती पार करत ती शिकली. गावातील लोकांनी तिला शिक्षण टाळण्याचा सल्ला दिला, परंतु आई-वडिलांच्या पाठिंब्याने तिने उच्च शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवली. अलका मस्केचे बालपण दारुड्या वडिलांमुळे संघर्षमय परिस्थितीत गेले. झोपडपट्टीतील हालअपेष्टा सोसून आईच्या मेहनतीमुळे ती शिकली. लग्नानंतरही शिक्षणाची आवड कायम ठेवत तिने पदवी पूर्ण केली. आयुष्यभराच्या संघर्षाला यश मिळतंय अशी चिन्हं दिसू लागली. परंतु दोन मुलांनंतर केलेली शस्त्रक्रिया असफल ठरली अन् तिसरे अपत्य जन्माला आले. त्यामुळे सरकारी नोकरीपासून वंचित व्हावे लागले. पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी ती आता अथक प्रयत्न करत आहे. छाया जगताप वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तिरस्काराला सामोरी गेली. गरिबीमुळे आईला शेण काढावे लागले, तर तिला शेतमजुरी करावी लागली. दिव्याच्या उजेडात अभ्यास करत तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. भावाच्या निधनाने परिस्थिती आणखी कठीण झाली, पण तिच्या जिद्दीने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. या मुलींचा संघर्ष हा सामाजिक अडथळ्यांना मात देत स्वनिर्मितीची प्रेरणा देणारा आहे.
प्रियंका लाडलापुरेच्या वडिलांनी दूध आणि पेपर वाटून शिक्षणाचा खर्च भागवला. अलका समुखराव यांचे वडील हलगी वाजवून उपजीविका करत होते, तर प्रचंड गरिबीतही त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. शाखा निवडण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने अलकाने कला शाखेत प्रवेश घेतला. तिच्या वडिलांनी वीटभट्टीवर काम करून तिला शिकवले, घरात लाईटनव्हती, त्यामुळे कंदिलाखाली अभ्यास करावा लागला. शिक्षक होण्याची इच्छा शुल्काच्या अडथळ्यामुळे अपूर्ण राहिली. बारावीनंतर बी.सी.एस.ए. घेतले, पण परीक्षेच्या शुल्कासाठी पैसे नसल्याने वर्ष वाया गेले. शिक्षण थांबल्याने लग्न लावून दिले गेले, तरीही मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. घर, नोकरी आणि कॉलेजचा तिहेरी संघर्ष करत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिचा प्रवास कठीण परिस्थितीतही जिद्द टिकवणाऱ्या मुलींच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
विद्या हातोलकर, सधन शेतकरी कुटुंबातील मुलगी, शिक्षणासाठी आंबाजोगाईत नातेवाइकांकडे राहिली, जिथे घरकामाचा भार वाढला, लातूरमध्ये बी.एस.डब्ल्यू. करताना दलित साहित्याची ओळख झाली आणि सामाजिक विचारांची जाणीव झाली. पदवी पूर्ण केल्यावर कुटुंबाच्या लग्नाच्या आग्रहास स्पष्ट नकार दिला. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना रणजित या दलित युवकाशी मैत्री झाली आणि त्यांनी समाजाच्या बंधनांना आव्हान देत आंतरजातीय विवाह केला. दोन्ही कुटुंबांचा विरोध, तुटलेले नातेवाईक आणि सामाजिक त्रासाचा सामना करत, गरिबीला सामोरे जात त्यांनी जीवन संघर्ष केला. विद्याने जिद्दीने समाजकार्य विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तिचा प्रवास सामाजिक अडथळ्यांना तोंड देत स्वनिर्मितीचे प्रतीक आहे.
वैष्णवी राठोड गरीब बंजारा कुटुंबातील मुलगी, जिच्या वडिलांनी बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले, त्यामुळे घराचा आर्थिक ताण वाढला. आईच्या कामावरच अन्न मिळत असल्याने तिचे शिक्षण मोठ्या संघर्षातून झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावी पूर्ण करून लातूरमध्ये अकरावी-बारावी शिकली. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता, म्हणून शेतमजुरी करून मोबाईल घेतला आणि शिक्षण सुरू ठेवले. घरातील सततच्या भांडणांमुळे अभ्यासात अडथळे आले, तरीही ती पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकली. अंजना राठोडच्या आई-वडिलांचा ऊसतोडीचा व्यवसाय असल्याने तिला बालवयातच कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. बहिणीच्या लग्नानंतर कर्ज वाढल्याने पालकांना वारंवार उचल घेऊन ऊसतोडीसाठी जावे लागले, ज्यामुळे अंजनाला शेतमजुरी करून शिक्षण खर्च भागवावा लागला. महाविद्यालयाच्या प्रवासासाठी लागणाऱ्या खर्चासाठी ती रविवारी शेतात काम करत होती. कठीण परिस्थिती असूनही तिचा शिक्षणप्रवास जिद्दीने पुढे गेला. या दोघींचा सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षणाची उंची गाठण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे.
आश्विनी साखरेला जन्मताच आईसह घराबाहेर काढण्यात आले. कठीण परिस्थितीत तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले, नंतर एम.ए. पूर्ण करून विवाह केला, पण यश मिळाले नाही. पुढे एम.एस.डब्ल्यू. करून स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिला वाटते, तिचे जीवन केवळ कुटुंबासाठी आहे. श्रद्धा शेळकेच्या वडिलांच्या दूरस्थ नोकरीमुळे त्यांच्याशी संवाद कमी राहिला. त्यांच्या आजारपणामुळे दहावीनंतर शिक्षणात खंड पडला, पण नंतर मेहनतीने उच्च शिक्षण प्राप्त केले. वैशाली थोरातला जन्मताच तिरस्काराचा सामना करावा लागला. संयुक्त कुटुंबव्यवस्थेमुळे घरकामाची जबाबदारी तिच्यावर टाकली गेली. डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. शिक्षण आणि विवाहाच्या दबावात तिने दहावी, बारावी, बी.ए. पूर्ण केले. पुढे बी.एड., एम.ए., एम. फिल. करत उच्च शिक्षण घेतले. कुटुंबातील तणावामुळे लातूर सोडून पुण्यात नोकरी केली, पण तेथेही नातेवाइकांशी जुळवून घेताना संघर्ष झाला. शेवटी एम.ए. समाजशास्त्र पूर्ण करून पीएच.डी. साठी प्रवेश घेतला. घरकाम, नातेवाइकांचे त्रास, तिरस्कार आणि आत्मक्लेश अशा संघर्षातून तिने स्वतःला अधिक मजबूत बनवले. तिच्या जिद्दीचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
स्नेहा शिंदेने लहानपणापासून नृत्याची आवड जोपासली आणि शिक्षणासोबतच डान्स प्रक्टिस करत दहावी पूर्ण केली. वडिलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची अपेक्षा ठेवली, पण तिने नृत्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. दुबईतील इंटरनॅशनल डान्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आणि मिस महाराष्ट्रचा सन्मानही मिळवला. तथापि, तिच्या आयुष्यात आव्हानात्मक काळ आला. बारावीनंतर झालेल्या विवाहात तिची फसवणूक झाली. पतीकडे नोकरी, घर नव्हते आणि तो तिला मानसिक व शारीरिक त्रासही देत होता. अखेरीस तिने माहेरी परत येऊन बी.ए आणि एम.ए. समाजशास्त्रात शिक्षण घेतले, ज्यामुळे तिच्या विचारांची स्पष्टता आणि प्रगल्भता वाढली. आज ती दुसऱ्या विवाहानंतर स्थिर कौटुंबिक जीवन जगत आहे आणि नृत्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आम्रपाली कांबळे नोकरदार कुटुंबात जन्मली, पदवी शिक्षण घेत असताना विवाह झाला, तरीही तिने शिक्षण पूर्ण केले. तेरा वर्षांनंतर पुन्हा एम.एस.डब्ल्यू. ला प्रवेश घेतला. कुटुंब, मुले आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळत तिने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि चांगल्या संस्थेत नोकरी मिळवली. राजश्री कांबळे दलित कुटुंबात जन्मली. तिला वाटत होते की, बहिणीसारखेच तिचेही लग्न लवकर होईल. पण वडिलांनी तिला शिक्षणासाठी पाठबळ दिले. लातूरमध्ये शिक्षण घेताना सामाजिक बंधने तोडून स्वतंत्र जीवनाचा अनुभव घेतला. कुटुंबाच्या विरोधाला सामोरे जात राहूल लोंढे यांच्यासोबत प्रेमविवाह केला. आज ती व राहूल हरिती बुक गॅलरी आणि वाचन चळवळीत सक्रियपणे योगदान देत आहेत. त्यांचा प्रवास सामाजिक रूढींना मोडून स्वनिर्मितीचा मार्ग शोधण्याची प्रेरणा देणारा आहे.
मोहिनी देशमुख उच्च जातीय शेतकरी कुटुंबातील असून तिने पितृसत्ताक समाजव्यवस्थेचा त्रास बालपणीच अनुभवला. वडिलांचे व्यसन आणि आईला होणारा मानसिक व शारीरिक त्रास पाहून ती भयभीत झाली होती. चुलत्याच्या मदतीने शिक्षण घेतले, मात्र महाविद्यालयीन काळात येणाऱ्या आकर्षणाचा सामना करत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तिचा विवाह झाला, परंतु तिला हवे तसे यश मिळाले नाही, ही तिची खंत आहे. ती म्हणते, "स्वतःचं काहीच अस्तित्व उरलं नाही." कावेरी माने हुशार आणि सुंदर असूनही बारावीनंतर पाहुण्यांच्या आग्रहामुळे विवाहबद्ध झाली. दोन मुलींच्या जन्मानंतर संकटे ओढवली. वडिलांच्या इच्छेनुसार तिने सात वर्षांनंतर पदवीसाठी प्रवेश घेतला, पण दरम्यान पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि ती दुःखाच्या गर्तेत सापडली. तरीही हिंमत ठेवून ती लातूरला आली, मुलांचे शिक्षण चालू ठेवले आणि स्वतःही शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली. त्या दोघींचा संघर्षही जिद्द आणि आत्मसन्मानाची प्रेरक कहाणी आहे.
लक्ष्मी हवालदारचा जीवनप्रवास शिक्षण, प्रेम, प्रेमविवाह, कुटुंब आणि नोकरीसह विविध स्तरांवर संघर्षमय होता. धनगर समाजातील युवकाशी प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह केला, ज्याला दोन्ही कुटुंबांचा तीव्र विरोध झाला. आर्थिक अडचणींना तोंड देत तिने 14 वर्षांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पंचशील डावकरचे बालपण आर्थिक आणि सामाजिक अडचर्णीत गेले. वडिलांच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण घराची जबाबदारी आईवर (अक्कावर) पडली. चप्पलही मिळत नसल्याची परिस्थिती होती. सामाजिक व्यवस्थेचे विडंबन असे की, आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे पंचशीलला व्यवस्थित वागणूक मिळे. घरच्यांना मात्र दलित म्हणून सतत जातिभेद सहन करावा लागला, उच्च शिक्षणासाठी तिने शासकीय वसतिगृहाचा आधार घेतला. शिक्षणासोबत सूत्रसंचालन, वक्तृत्व आणि लेखन कौशल्य विकसित केले. पत्रकारितेची पदवी घेऊन मुंबईच्या एका मराठी चॅनलसाठी काम केले, पण जातीय पक्षपातामुळे ते काम सोडावे लागले. नेट व सेट परीक्षेत यश मिळवून ती साहाय्यक प्राध्यापक झाली आणि पीएच. डी. साठी संशोधन सुरू ठेवले. हा प्रवास जिद्द, संघर्ष आणि स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नाने भरलेला आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना हा ग्रंथ मुला-मुलींच्या मूलभूत अडचणी समजून घेण्याची संधी देतो. शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेत धोरणात्मक बदल करण्याची जाणीव देतो. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना मुलींच्या शिक्षणाचा व्यापक प्रभाव समजून घेण्यासाठी तो मार्गदर्शक ठरेल. मुलींच्या भावनिक आणि मानसिक स्थितीची दखल घेण्याची जाणीव यातून व्यापक पातळीवर निर्माण व्हायला हवी. शिक्षण हे केवळ अर्थार्जनाचे साधन नसून, स्वत्वाची ओळख निर्माण करणारा मार्ग आहे, हे मौलिक सूत्र हा ग्रंथ अधोरेखित करतो. प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये तो पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हाती अगदी योग्य वयात असे पुस्तक पडले तर त्यांना नवी प्रेरणा मिळेल. कितीही अडचणी आल्या तरी हार न मानता नवी उंची गाठण्यासाठी आयुष्यात ते सतत प्रयत्नशील राहतील.
Tags: latur college university laxmi havaldar mohini deshmukh amripali kamble vaishnavi rathode vidya hatolkar ashwini sakhre sneha chamle sneha shinde farmers rular student student marathi book sangarash gatha hariti prakashan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या