डिजिटल अर्काईव्ह

ग्लॅमरच्या जगात राहून त्यापासून कटाक्षाने दूर राहणारा समर. अत्यल्पतावादी. चहा-कॉफीची चवही माहीत नसलेला. साग्रसंगीत स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालतो, पण स्वतः मात्र अल्पाहारी. 'न-खाते, न-पिते, नखाते' हे त्याचं बिरूद आहे. असं हे 'समर नखाते मुक्त विद्यापीठ' 18 जून 2026 रोजी अमृत महोत्सवी वर्ष ओलांडून शहात्तरीत प्रवेश करत आहे. 'गुरू' नावाचे अनेक भेटतात. गुरूचे 'श्याम्पल' दिसतात. पण भाग्यात असेल तरच खरा गुरू लाभतो.' मागील 46 वर्षांपासून मला समरसारखा गुरू लाभला, हे माझं भाग्य.

"तुमचा आवडता सिनेमा कोणता ?"
"लगान."
"लगानमधील काळ नेमका कोणता ?"
"स्वातंत्र्यापूर्वीचा. 1941...1857..." 
"तुम्हाला अतिशय आवड आहे, तो सिनेमा तरी तुम्ही बारकाईने पाहता का? लगानच्या सुरुवातीलाच राणी व्हिक्टोरियाचा कॉइन फिरतो. अमिताभ बच्चनचं कथन सुरू होतं. 'सन अठरा सौ तिऱ्यानबे... अंग्रेजों की हुकूमत'..." झालं.

श्रोते थक्क! प्रो. समर नखाते म्हणतात, "सिनेमा हे हातात पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकची बाटली घेऊन पाहण्याचं माध्यम नव्हे. तुमची आवड तरी तुम्ही सिरियसली घेता का ?"

'सिनेमा कसा पाहावा?' या कार्यशाळेची सुरुवात अशी असते. समर श्रोत्यांचा ताबा घेऊन पुढे बोलू लागतो. "चित्रपटाच्या 'टायटल'पासून प्रत्येक फ्रेमचा बारकाईने विचार करायला हवा. स्टीवन स्पीलबर्गने 'द शिंडलर्स लिस्ट'मध्ये 'टायटल' पासूनच काळ्या रंगाचा वापर का केला? ज्यूंच्या आयुष्यात येऊ घातलेल्या क्रूर काळाची ती खूण आहे. 'डोंबिवली फास्ट'चे टायटल भडक लाल आणि पांढऱ्या रंगात आहे. पांढरपेशा माणूस कसा हिंसक होतो हे यातून सूचित केलं आहे. चित्रपटात दृक् आणि श्राव्य ही दोन्ही माध्यमं एकत्र येतात. इतिहास, भूगोल, कला, समाज, विज्ञान, अर्थ, व्यापार, तंत्रज्ञान आणि राजकारण, असे आपल्या जगण्यातील असंख्य घटक चित्रपटात येतात. त्यातून चित्रपटाची भाषा तयार होत असते. कोणी संवाद ऐकून भावनिक होतं. तर गाणी-नाच किंवा प्रतिमा पाहून उत्तेजित होतं. कारण तशी रचना केलेली असते. आपल्याला चित्रपटाची 'ही' भाषा समजते का? कोणते सिनेमे एका दिवसात 'सौ करोड' पार जातात ? थिएटर मिळत नाही, प्रेक्षक फिरकत नाहीत, असे चित्रपट कोणते ? हे ताडून पाहिलं तर आपली कलेची जाण आपल्या लक्षात येते. सत्यजित राय सांगून गेले, 'भारतीय प्रेक्षक हे दृश्य निरक्षर आहेत. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील ना?"

तुम्ही पुण्यात कला, विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य, वास्तुकला, संगणक किंवा व्यवस्थापन अशा कोणत्याही शाखेत शिकत असाल, समाज कला-साहित्य-नाटक-चित्रपट यांपैकी कोणत्याही विषयाच्या खोलात जाण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमची समर नखाते यांची भेट होणं अटळ आहे. ती झाली नसेल तर, आपल्या प्रवासात काही गडबड झालीय, असं समजायला हरकत नाही.

कधी सायकल, तर कधी स्कूटरवरून साधा झब्बा घातलेला शुभ्र दाढीधारी समर कोणत्याही महाविद्यालयात शिरतो. तेव्हा उत्साही मुलांचा घोळका त्याची वाट पाहत असतो. ते त्याला चित्रपटापासून राजकारणापर्यंत कोणताही प्रश्न विचारतात. तेव्हा वर्तमानकाळाचं मर्म जाणणारा समर त्यांना प्रश्नाच्या मुळाकडे नेतो. "तुमच्या हातात असतो त्या 'अँड्रोइड'चा अर्थ काय? 'अँड्रो 'हा उपसर्ग प्राचीन ग्रीक शब्द अँड्रोस पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ पुरुष, नर किंवा पौरुषत्वाशी संबंधित असा होतो. आपल्या नकळत आपल्या जगाचं 'पुरुषीकरण' असं होत आहे. सर्व प्रतिमा आणि चिन्हं पुरुषी आहेत. जागतिक बाजारपेठ त्यांचं डिझाईन आणि त्याचा प्रसार करत आहे. हे कधी समजून घेणार?" तरुणांचं अवास्तव कौतुक होत असताना समर त्यांच्या संकुचित जगाची जाणीव करून देतो. "तुम्ही तरुणांनी प्रश्न न विचारता, विचार न करता इन्स्टाग्राम आणि रीलमध्ये रमावं, असाच छोट्या पडद्याचा सापळा आहे", असा इशारा देतो.

या मोठ्या (आणि छोट्या) पडद्याला, समर गेली 70 वर्षं जवळून पाहत आहे. त्यानं वयाच्या सहाव्या वर्षीच 'लाईट्स-कॅमेरा-अॅक्शन' ही घोषणा ऐकली होती. तो, व्ही. शांताराम यांचं 'फाईंड'! 'दो आँखे बारह हाथ' मध्ये संध्यासोबत 'धूम तक् तक् धूम' म्हणत बागडणारा मुलगा. 'दीदी' चित्रपटात सुनील दत्त यांच्या वर्गातील पहिल्या बाकावर बसून 'हमने सुना था एक है भारत, सब मुल्कों से नेक है भारत' गाणारा बाल नट म्हणजे मास्टर समर! या चिमुरड्याचा अभिनय इतका सहज आणि नैसर्गिक होता की, तो कॅमेऱ्यासमोर वावरत आहे, असं वाटतच नव्हतं. त्याचे संवाद पाठ असत. एन्ट्री घेऊन चोख काम केल्यावर, स्वारी सेटवर जाऊन बसत असे. त्याला कधीही रिटेक लागत नव्हता. म्हणूनच, एकदा संध्यावर संतापलेले शांतारामबापू म्हणून गेले, 'या बालकाकडून तरी काही शिका.'

'चले जाव' चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिक राम आणि भारती नखाते यांचं समर हे शेंडेफळ ! (थोरली पूजा स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मधले सागर सनदी लेखापाल आहेत.) कम्युनिस्ट विचारांचे राम यांची 1950 च्या दशकातील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील अनेक अग्रणींशी जवळीक होती. ते सजग आणि चतुरस्र वाचक होते. घरात आणि बाहेरही वैचारिक चर्चा ऐकण्यात येत. अशा वातावरणात समर मोठा होत गेला. त्यानं शाळेत असताना 'छोटा जवान', 'भिंतीला कान असतात' आदी सहा चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. बालवयातील प्रसिद्धी मनावर घेऊन अनेक जण त्या 'बाह्य दागिन्यांतच' रममाण होतात. वयानं मोठं झाल्यावरही 'ते बालपण' सोडतच नाहीत. लहान समरला 'चंदेरी' चमकीची क्षणिकता जाणवली असावी. पुढच्या काळात तो 'मोठ्या पडद्या'वर काय? त्यामागे काय ? अशा प्रश्नांचा विचार करत पुढे निघाला.

समर, फर्ग्युसनमधून बी.एस्सी. करत असतानाच 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन'च्या नाटकांत सामील झाला. विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' वरून वाद झाला. डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि समर आदींनी स्वतंत्रपणे 'थिएटर अकादमी'ची स्थापना केली. तेव्हापासून तो तिथल्या प्रत्येक नाटकाची प्रकाशयोजना करत गेला.

'फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट'मधील तोंडी परीक्षेचा दिवस. समरच्या समोर खुद्द मृणाल सेन ! त्यांनी त्या काळातील वादग्रस्त 'सखाराम बाईंडर'चं विश्लेषण विचारलं. समर सांगत गेला, "ते, स्त्री-पुरुष संबंधांमधील राजकारण आणि हिंसेवरचं प्रखर भाष्य आहे. त्यात विवाहसंस्था, पौरुषत्व आणि नैतिकतेच्या कल्पनांचं विच्छेदन आहे." सेन यांनी त्याला खुलून दाद देत, त्याची 'दिग्दर्शन' पदवीसाठी निवड केली.

समरला एफ.टी.आय. आय. मध्ये चित्रपटाचं जागतिक दालन खुलं झालं. तो साहित्य, चित्र आणि संगीत या सर्व कलांचा संगम असणाऱ्या चित्रपट कलेचा समग्रपणे अभ्यास करू लागला. चित्रपटाच्या अनुषंगाने तो नाटकाच्या प्रकाश योजनेकडे पाहूलागला. तो नाटकातील शब्द, मुद्राभिनय आणि संगीत यांना एकसंध करणारा प्रकाश कसा असावा, रंगमंचावरील अवकाशाला वेगळी मिती कशी द्यावी, त्यात अनेक रंगछटा कशा भराव्यात, हा सखोल दृश्य विचार प्रकाशयोजनेतून आणू लागला. 'घाशीराम कोतवाल'मधील नाना फडणवीस (मोहन आगाशे) यांचा प्रवेश आठवा ! समरने रंगमंचावर दूरवरून चालत येणाऱ्या नानांवर बीम लाईट टाकला. त्यामुळे तो 'लाँग शॉट' दिसू लागला. ते मध्यभागी आल्यावर केवळ त्यांच्यावर स्पॉट लाईट आला आणि तो क्लोज-अप वाटू लागला. 'महानिर्वाण'मधील अखेरच्या दृश्यात भाऊराव (चंद्रकांत काळे) चितेवर उभे राहतात. अंधार पसरलेल्या रंगमंचावर केवळ भाऊरावांच्या आकृतीवर प्रकाश. समरने त्यात हलकेच लाल रंग मिसळला आणि त्या ज्वाला भासू लागल्या. 'तीन पैशांचा तमाशा' मध्ये प्रियकरासह अनेक पुरुषांकडून शोषण झालेली झीनत तळेगावकर (माधुरी पुरंदरे) कव्वालीतून आक्रंदते. त्या वेळी तिच्यावर आलेला यातनादायक लाल प्रकाश प्रेक्षकांना कातरत असे. 1970 च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीकडे विशेष सामग्री उपलब्ध नव्हती. स्पॉटलाईटची आणि डिमरची संख्या तोकडी असे. तो स्वतःच वायरचं जोडकाम करायचा. कित्येक वेळा शॉक बसायचे. तरीही तो अनेक 'प्रयोग' करत राहिला. छाया-प्रकाशाच्या प्रयोगातून अभिनेत्यांची रूपे अधोरेखित करणे. नाटकातील दृश्याला अर्थवाही करणे, ही समरची कामगिरी अद्वितीय ठरली.

डॉ. जब्बार पटेल यांनी 1973 मध्ये 'सामना' चित्रपटाची तयारी सुरू केली. त्याबद्दल ते सांगतात, "समर तेव्हा एफ.टी.आय.आय.च्या दुसऱ्या वर्षाला होता. मी त्याला म्हटलं, 'माझ्यावर जबाबदारी आलीय खरी. पण मला सिनेमातलं ओ की ठो माहीत नाही.' तो कोल्हापूरजवळच्या पहिल्या शूटिंगसाठी दहा दिवस सुटी घेऊन आला. त्यानं मला 'फ्रेम' म्हणजे काय? त्यात काय आणि कसं दिसावं, याचा विचार कसा करावा? इथपासून तो शॉट कसा घ्यावा ? कॅमेरा किती उंचीवर असावा? तो क्रेनवर कधी घ्यावा ? हे सगळं शिकवलं. तो 'सामना'चा सहदिग्दर्शक असला तरी दिग्दर्शनातील त्याचा वाटा त्याहून मोठा आहे. समर हा माझा फिल्म गुरू आहे आणि मी त्याचा पहिला विद्यार्थी!"

'एफ.टी.आय.आय.' मधील शिक्षण आटोपल्यावर समर तिथेच प्राध्यापक झाला. त्याचं चौफेर मित्रवर्तुळ, एफ.टी.आय.आय. च्या कँटिनमध्ये, वडाच्या वृक्षांखाली गप्पा मारत बसू लागलं. 1979-80 च्या सुमारास देशात प्रचंड घडामोडी चालू होत्या. अवघ्या 19 महिन्यांतच जनता पक्ष सरकार कोसळून काँग्रेस सरकार सत्तेवर आलं. त्याआधी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केलेला 'जनता पक्ष' प्रयोग फसला. राजकीय विचार बाजूला जाऊन संधीसाधूवाद बोकाळू लागला. समाजात बदल घडवू इच्छिणारे विद्यार्थ्यांचे गट हताश झाले. अनेक संघटना फुटल्या. बेकारी आणि महागाईमुळे देशभर अस्वस्थता वाढीस लागली. यावर चर्चा सुरू असताना समरनं मित्रांना सांगितलं, "बंगालमध्ये बादल सरकार यांनी पथनाट्य चळवळ सुरू केली आहे. ते म्हणतात, 'कष्टकरी वर्ग काही थिएटरपर्यंत येणार नाही. आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. सादरकर्ते आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर पुसून टाकणं आवश्यक आहे'." असं सांगत समर म्हणाला, "आपणही पथनाट्यातून सभोवतालची परिस्थिती व्यक्त केली पाहिजे." यासाठी त्यानं 'माध्यम' ही कोणतीही औपचारिकता नसणारी संस्था सुरू केली. त्याच्या सोबत भरत अवचट, दीपक देवधर, माधुरी पुरंदरे, अनिल झणकर, कामोद देशपांडे आणि अश्विनीकुमार धर्माधिकारी आले. 'माध्यमीय' परिवार वाढत गेला. अनिल शिदोरे, मेघन मांजरेकर, मिलिंद देशमुख, रोहिणी टांकसाळे, आसावरी घोटीकर, सुजाता देशमुख, स्वाती चव्हाण आणि मी सहभागी होत गेलो. 'माध्यम'चं पहिलं पथनाट्य झालं, 'लोकशाही म्हंजे हाये काय ? आमाला तर म्हाईत न्हाय !' आणि समरमुळे महाराष्ट्रात पथनाट्याचं लोण आलं.

तेव्हा मी पुण्यात नवखा होतो. मेडिकल इंजिनिअरींगची अॅडमिशन हुकल्यानं पॉलीटेक्निकला आलो होतो. माझं वाचन तुटपुंजं. गप्पांमध्ये शब्दच फुटत नसत. 'माध्यम'मध्ये गप्पांचे विषय मार्क्स, मर्देकर, मुक्तिबोध, कामू, कोसंबी आदी असत. पुण्यातल्या स्थानिक मुलांचा जबर आत्मविश्वास आणि बोलण्याची 'स्टाईल' पाहून स्वतःची नगण्यता दृढ व्हायची. अशा माझ्या न्यूनगंडानं भरलेल्या अवस्थेत मला समर भेटला. त्याला समोरच्याची देहबोली पाहून त्याची मानसिकता नेहमीच लक्षात यायची. त्यानुसार तो त्यांना वेगळ्याच प्रवासाला घेऊन जायचा. त्यानं पहिल्या भेटीतच आमच्या 'अहो जाहो'ला कात्री लावली. पाठीवर थाप मारत म्हणाला, 'कधीही वेळ मिळाला की एफ.टी. आय. आय. ला चक्कर मार.' एवढा मोठा माणूस आणि माझ्यासारख्याशी इतका आपलेपणा ?

मग, मलाही कॉलर टाइट करून सांगता येऊ लागलं, 'एफ.टी.आय.आय.ला जाऊन समर नखातेशी गप्पा मारून आलो.' भेटलं की समर सहज म्हणायचा, 'आज संध्याकाळी काही काम नसेल तर ये इकडे. एफ.टी.आय.आय.मध्ये बर्गमनचा 'द सेव्हन्थ सील' दाखवताहेत. गेटवर माझं नाव सांग.' तेव्हापासून मला आपसूकच एफ.टी.आय.आय.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित होणाऱ्या 'स्क्रीनिंग'चा लाभ सुरू झाला. पुढे, 'थिएटर अकादमी'च्या सर्व नाटकांचा 'खुला पासपोर्ट' ही मिळाला. 'घाशीराम', 'तीन पैशांचा तमाशा', 'बेगम बर्वे' सारखी नाटकं 'बालगंधर्व'ला, मी पहिल्या रांगेतून पाहिली. समरमुळे प्रकाश योजना कक्षातूनही नाटकं पाहता आली. तिथं त्याच्याशी गप्पा व्हायच्या. मध्येच तो म्हणायचा, 'तुझ्या समोरची ती लिव्हर खाली खेच.' मी सांगकाम्यासारखं खेचायचो आणि डाव्या विंगेतून लाईट यायचा. 'लाईटिंग' करणाऱ्या त्याच्या हातांची कमाल दिसायची. माझ्या डोक्यातही प्रकाश पडायचा.

त्या वेळी 'थिएटर अकादमी', साहित्य आणि संस्कृतीला हादरे देत बदल घडवत होती. ती नाटकं आणि कलावंतांना जवळून पाहता येईल, अशी कल्पना मी कधीही केली नव्हती. समरमुळे हे शक्य झालं. याहून अधिक काय लागतं ?

'माध्यम'ने 1979 ते 1988 या आठ वर्षांत सुमारे 200 पथनाट्यं सादर केली. त्यात लोकांच्या समस्यांपासून फारकत घेतलेलं राजकारण, महागाई, महिला अत्याचार, दलित अत्याचार, असंघटित कामगार आणि धार्मिक उन्माद असे अनेक विषय असायचे. 'माध्यम'ने विविध संघटनांसाठी कार्यक्रम केले. कारखाने आणि वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकऱ्यांच्या सोयीच्या वेळेत अनेक पथनाट्यं सादर केली.

समरनं बसवलेल्या पथनाट्यात प्रसंगानुसार कविता आणि गाणी यायची. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर आणि हेमंत जोगळेकर आदींच्या कवितांचं अभिवाचन व्हायचं. समरनं बा. सी. मर्डेकरांची 'गाता धर्माचे पवाडे, उघडी झालेली कवाडे, दाविती अब्रूची हाडे टांगलेली' ही कविता वाचून दाखवली. माधुरीनं ती 'पसायदाना'च्या चालीवर बसवली. तिनं, मंगेश पाडगावकर यांच्या 'लाथेच्या भीतीने डावा हात ढुंगणावर ठेवून, उजव्या हाताने सलाम' या कवितेला जॅझ शैलीत समूह गीत केलं. कधी 'अल्ला तेरो नाम', 'तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा' अशी समूह गीतं बसवून घेतली. गीतं लिहिणं, चाली देणं, त्याला अनुरूप समूह नृत्य बसवणं, योग्य प्रसंगी चित्रं आणि कळसूत्री बाहुल्यांचा वापर अशी अनेक कामं माधुरी करायची.

'माध्यम'च्या तालमी 'एस.पी. कॉलेज'च्या मागे असलेल्या मुलींच्या 'नूतन विद्यालया'त व्हायच्या. सगळ्यांच्या चर्चातून नाटकाचा विषय आणि दृश्यं ठरायची. समर, नाटकाच्या शैलीसाठी दरवेळी वगनाट्य, प्रौढ साक्षरता शिबिर, वरात, फिल्मी मुकदमा, आमचं बी एशियाड, अशा नवनवीन कल्पना आणत असे. समर नेहमी सांगत असे, "पथनाट्य ही एक उत्स्फूर्त कला आहे. सतत विचार करून आलेली ती एक प्रतिक्रिया आहे." दलितांच्या वस्त्या जाळल्याच्या घटनेनंतर त्यानं 'मॉन्स्टर्स इंटरनॅशनल' या काल्पनिक संस्थेकडून 'होलिकोत्सव रजनी' सादर केली.

"किती घरं जाळली ?"
"दोन!"
"तुम्ही किती जण होता ?"
"शंभर !"
"लाज नाही वाटत? हीच का तुमची देशनिष्ठा ? सात जण होतो आम्ही. पन्नास झोपड्या खाक केल्या होत्या."
संवादात असा झणझणीत उपहास होता.

1987. राजस्थानमध्ये 18 वर्षांची रूप कंवर सती गेली. त्या घटनेचं समर्थन आणि उदात्तीकरण करणारे महाभाग होते. समरने हा प्रसंग पथनाट्यात दाखवताना मुलीला गुंगीचं औषध दिलं. मिरवणुकीने नवऱ्याच्य चितेवर ठेवलं. तिच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये यासाठी, उच्चरवात मंत्रघोष आणि ढोल-नगारे यांचा दणदणाट केला. वर्तुळाकारात उभ्या प्रेक्षकांना झिणझिण्या यायच्या. नंतर त्यानं स्त्रियांना सदैव तुच्छतेची वागणूक देणाऱ्या सर्व धर्मांच्या पुरोहितांना फोडूनही काढलं.

खेडेगावांतील पथनाट्यात तिथे झालेल्या बलात्कारांचं, त्यानं समालोचनासारखं धावतं वर्णन केलं.

…"आपण पाहतोय, ती शेताकडे निघाली आहे. आणि नेमक्या या वेळी मोटरसायकलनं किक मारली आहे. ते तिघे आता तिला उसाच्या फडात घेऊन जात आहेत. ती किंचाळते आहे.... माफ करा. यापुढचं थेट प्रक्षेपण आम्ही आपल्याला दाखवू शकत नाही."

दोन मध्यमवर्गीय घरांत घडलेल्या जयश्री लाटकर आणि मंजुश्री सारडा या हुंडाबळींमुळे महाराष्ट्र हादरून गेला. तेव्हा 'माध्यम'ने बळी गेलेल्यांच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन पथनाट्यं सादर केली होती.

नुसतं नाटक करून निघून जायचं नाही, तर जमलेल्या लोकांशी त्याबाबत चर्चा करायची, असा समरचा आग्रह असे. कोणालाही कोणताही प्रश्न विचारला तर नेमकं उत्तर देता यावं, यासाठी तालीम आटोपल्यावर 'कोणी काय वाचलं पाहिलं' यावर घनघोर चर्चा होत असे. तो म्हणायचा की, नुसती 'माहिती' सांगू नका. त्यावर प्रक्रिया करून स्वतःचं मत तयार करा.

या काळात समरशी माझ्या प्रदीर्घ भेटी वाढत गेल्या. भीड गेल्यानं मी प्रश्नांमागून प्रश्न विचारू लागलो. मित्र, मला 'वेताळ' म्हणू लागले. त्याच्या बोलण्यात आलेली कार्ल युंग, एरिक फ्रॉम, बाँड रसेल, दि.बा. मोकाशी, दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांची पुस्तकं मी वाचू लागलो. एकदा गप्पांच्या ओघात मी म्हणालो, "फाशी आवश्यकच आहे." तेव्हा समर धाडधाड बोलत गेला, "एक मिनिट. गुन्हेगार कसा घडतो? तो या समाजाचा भाग नाही का ? त्याला सुधारण्याची संधी मिळू नये का? फाशी म्हणजे राज्यसंस्थेनं ठरवून केलेली हत्या नाही का?" असं म्हणत त्यानं जपानी दिग्दर्शक नगिसा ओशिमा यांच्या 'डेथ बाय हँगिंग'ची कथा ऐकवली.

एका युवकाला खुनाच्या आरोपाखाली फाशी दिली जाते. फाशी झाल्यानंतर तो चक्क शुद्धीवर येतो. परंतु त्याची स्मृती हरवलेली असते. आता अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहतो, स्मृती हरवलेल्या व्यक्तीला पुन्हा फाशी देता येईल का? स्वतःचा गुन्हा आठवत नाही, तो खरोखर 'गुन्हेगार' आहे का? यानंतर अधिकारी, डॉक्टर आणि धर्मगुरू मिळून त्याची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करतात. ते त्याच्याकडून त्या गुन्ह्याचा पुन्हा अभिनय करून घेतात. हे सांगून समर म्हणाला, "न्यायव्यवस्था परिपूर्ण आहे का? त्यांना फाशी देण्याचा अधिकार असू शकतो का?"

हा माणूस माझ्यासाठी एवढा वेळ का देतो? एवढी तळमळ ?

'समग्रता' हे समरचं वैशिष्ट्य. त्याचं आवडतं वाक्य आहे, 'सुटं असं काही असतं का? आपलं जगणं आणि कला सुटं करता येईल का? जगण्यात सगळं येतं तसंच ते कलेतही आलं पाहिजे ना?' त्यानं आम्हाला 'हंगेरीतील दिग्दर्शक इस्तवान झाबो यांचा 'मेफिस्टो' (1981) चुकवू नका असं सांगितलं. हा चित्रपट घडतो तो 1930 च्या दशकातील जर्मनीमध्ये. हा चित्रपट कलाकार, सत्ता, नैतिकता आणि फॅसिझम यांच्यातील गुंतागुंत, त्यांचे जटिल आंतरसंबंध कसे असतात? हे दाखवतो.

समर एकानंतर एक सिनेमे सुचवत जायचा. त्याच्या बोलण्यातून ऋत्विक घटक, स्वर्गेइ आयझेन्स्टाइन, ज्याँ गोदार्द, राइनर व्हेर्नर फासबिंडर, आंद्रे वायदा असे दिग्दर्शक नेहमीच भेटायचे. त्यांच्या चित्रपटांत रंग, आकार, दृश्य आणि ध्वनी यांत अमूर्तता कशी दिसते ? चित्रपटांतून तत्त्वज्ञान, कला आणि राजकारण यांचा परस्परसंबंध कसा व्यक्त होतो? हे चित्रपट काव्याच्या पातळीवर कसे जातात? अभिजात कलांच्या सहवासात वारंवार आलं तरच त्यांच्याशी आपला अर्थपूर्ण संवाद कसा होतो ? - हे तो उलगडून दाखवायचा. आजही समर स्वतःचं असाधारण निरीक्षण आणि चिंतन यातून अनेक संदर्भ लीलया जोडत असतो. अनेक शक्यतांचे विराट कॅन्व्हास उभे करतो.

एकदा आमच्या एका मित्रानं आत्महत्येचा प्रयत्न केला. आम्ही त्याला भेटायला गेलो. त्या घटनेचा अजिबात उल्लेख न करता, समरनं इकडच्या तिकडच्या भरपूर गप्पा मारल्या. त्याला हसवलं. घरी परतल्यावर त्याला पत्र लिहिलं. तो त्या मित्राशी सतत बोलत राहिला आणि मित्र सावरत गेला. नंतर तो मित्र मला म्हणाला, 'समर माझ्यासाठी एवढा वेळ काढतो म्हणजे मीसुद्धा काही तरी असेन ना ?'

1980 च्या सुमारास चळवळीतील काहींनी आत्महत्या केल्या होत्या. त्यातील अनेक समरच्या चांगल्या ओळखीचे होते. कोणाच्या बोलण्यात आत्महत्येचे विचार दिसू लागताच समर सावध व्हायचा. त्या व्यक्तीच्या 'पिंडा'नुसार तो संवाद साधत जायचा.

मी पुण्यात 'महिंद्र ओवेन'मध्ये नोकरी करत होतो. कंपनीतील राजकारण आणि खेळ्या मानवत नव्हत्या. मी नोकरी सोडून गावी गेलो. जाताना समरला सांगायचं होतं. मात्र 'हे कसं सांगावं ? तो काय म्हणेल?' अशा विचारांमुळे हिंमत होत नव्हती. मी लातूरला येऊन कन्सल्टन्सी सुरू केली. 'इतर वेळ नाटक-फिल्म सोसायटी लोकविज्ञान-ग्रंथाली यासाठी देऊ. प्रयत्न करून बघू. आपटलो तर सावरायला मित्र आहेतच', असा विचार होता. दोन महिन्यांनंतर पुण्याला गेलो. एफ.टी.आय.आय. गाठलं. समर भेटला.

दबकतच मी बोलू लागलो, "अरे, मला जाताना सांगायचं होतं. पण..."

समरनं मला थांबवलं, "एक मिनिट ! स्पष्टीकरण मागणं आणि ते द्यावं लागणं हे 'नातं' असू शकतं का ? तू काहीही न बोलता, मी तुला समजून घेतलं पाहिजे ना? गावी जावंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. झालं. आता तू निर्णय घेतलास ना ? आता कसं चाललंय? ते सांग."

मौनराग.

महाराष्ट्रातील अनेक लघुउद्योगांची 1980 च्या दशकात दुर्दशा झाली होती. देणी चुकत नव्हती. येणी वेळेवर येत नव्हती. बँकांचे हप्ते वाढत होते. जप्तीची धास्ती होती. योग्य दर मिळत नव्हते. चोहो बाजूंनी कोंडी झाल्याने अनेक लघुउद्योग बंद पडत होते. मी नोकरी सोडून अंधारात उडी घेतली होती. माझं काय होणार? काही कळत नव्हतं. माझी 'अवस्था' पाहून खांद्यावर हात टाकत तो म्हणाला, "तू वाचतो-ऐकतो पाहतो, ते कुमार गंधर्व - सत्यजित राय काय कामाचे ? त्यांच्याकडून सगळं आत घेता आलं पाहिजे. भक्कमपणा आला पाहिजे ना? आणि फार तर काय होईल? हे सोडून दुसरं काही करता येईलच की. अवघड वगैरे काही नसतं रे."

..आणि मला कुमारांची बंदिश आठवली. 'सबरस एक भयो है' सगळं एकत्रच आहे. तसं दिसू लागलं.

समरनं, 'सापत्नेकरांचं मूल' (मकरंद साठे), 'बोट फुटली', 'अब्द अब्द' (माधुरी पुरंदरे) अशा मोजक्याच नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. माधुरीनं ज्याँ कोक्तो यांच्या 'द ह्युमन व्हॉइस' एकांकिकेचा 'अब्द अब्द' हा मराठीत अनुवाद केला होता. समरनं, 1985 मध्ये या एकपात्री एकांकिकेचे प्रयोग थेट घरांमध्ये जाऊन केले. मराठीमधील 'समीप रंगमंचा'ची (इंटिमेट थिएटर) ही पहिली अनुभूती होती. यात प्रियकराने झिडकारलेल्या तरुणीचं त्याच्याशी सलग 40 मिनिटं दूरध्वनीवरील संभाषण होतं. तिचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसतो. जाग आल्यावर, ती जिवाच्या आकांताने त्याच्याशी संवाद साधतेय. ती अस्थिरता, एकटेपणा आणि भीती यांनी ग्रासून गेली आहे. सोबतीला आहे फक्त टेलिफोन! नाटकासाठी पलंग, टेलिफोन आणि टेबल-लॅम्प एवढीच सामग्री होती. समरनं छाया-प्रकाशाच्या सर्जक वापरातून अत्यल्प अवकाशाला अंगावर आणलं होतं. माधुरीच्या आवाजातील आरोह-अवरोह, संवादाची लय आणि देहबोली पाहून, प्रेक्षक अवाक् होत.

समर एफ.टी.आय.आय. मध्ये अध्यापन, दूरदर्शन-साठी माहितीपट, 'थिएटर अकादमी'ची नाटकं, 'माध्यम'कडून पथनाट्यं आणि मित्रांचा गोतावळा, अशा आघाड्यांवर कामं करत होता. तेव्हाच त्याला (1985-86 मध्ये) आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची 'फुलब्राइट शिष्यवृत्ती' मिळाली. तो अमेरिकेतील 'बोस्टन विद्यापीठा'त 'व्हिडिओ प्रोग्रॅमिंग अँड प्रॉडक्शन'चा अभ्यास करू लागला. तेव्हा तो तिकडून पत्र पाठवायचा. कागदाचा रंग आणि आकार, शब्द आणि चित्र यांना गुंफणारी रचनादेखील वेगवेगळी असायची. त्यात रेखाचित्रं, कविता, उतारे असं बरंच काही असे. त्यानं ऐकलेल्या नोएम चोम्स्की आणि एडवर्ड सैद यांच्या व्याख्यानांचं सार कळवलं होतं. त्यात त्याच्या शैलीचे प्रश्न होते, 'सत्ता, हिंसा आणि भाषा हातात हात घालून चालत असतात. सत्तेची भाषा कशी असते ? सत्ता तुमच्या नकळत तुमची भाषा कशी बदलते ? अव्यक्त हिंसा कशी असते?'

समर एफ.टी.आय.आय. चा अधिष्ठाता झाला. वरिष्ठ पदावर गेल्यावर अध्यापन कमी आणि व्यवस्थापन, प्रोटोकॉल, खरेदी प्रकार वाढत जातात. तो त्यात कधीच रमला नाही. त्यानं काही महिन्यांतच राजीनामा दिला. तेव्हापासून तो अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांत नाट्यशास्त्र, चित्रपट, दृश्यकला, वृत्तपत्रविद्या आणि जनसंपर्क माध्यम शिकवू लागला. देशभर निरनिराळ्या कार्यशाळा घेऊ लागला. त्यानं कोलकात्यामधील 'सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट' साठी अभ्यासक्रमाची रचना करून दिली. त्याचे विद्यार्थी लडाख ते तामिळनाडू आणि मणिपूर ते गुजरात असे सर्वत्र पसरलेले आहेत. एफ.टी. आय. आय. मध्ये संजय लीला भन्साळी, श्रीराम राघवन, रसूल पुकुट्टी आणि उमेश कुलकर्णी आदी, पुढे जनसंपर्क माध्यम शिकवताना नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे हे त्याचे विद्यार्थी होते. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या श्रेयनामावलीत उल्लेख असतो- 'विशेष आभार समर नखाते'

पुण्यात जागतिक चित्रपट संस्कृती विकसित करण्यासाठी 2002 मध्ये 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ)' सुरू झाला. तेव्हापासून समर हा 'पिफ'चा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. तो दरवर्षी जागतिक दर्जाच्या चित्रपटांची निवड करतो. प्रेक्षकांना विविध देशांतील सिनेमांचा परिचय करून देतो. मनमोकळ्या गप्पा, चर्चासत्रे आणि दिग्दर्शकांशी संवाद घडवतो. विद्यार्थ्यांना दृश्यसाक्षर करतो. त्याच्यामुळे 'पिफ' हे चित्रपट समजून घेण्याचं आणि त्यावर विचारमंथन करण्याचं स्थान झालं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूरमध्येही 'पिफ'च्या छोट्या आवृत्त्या सादर केल्या जातात.

गेल्या वर्षी तो 'पिफ'साठी लातूरमध्ये आला. त्यानं 'श्रीकिशन सोमाणी विद्यालया'तील मुलांशी तन्मयतेनं गप्पा मारल्या. यू-ट्यूबवरून इराणी दिग्दर्शक बाबक अन्वरी यांचा 'टू प्लस टू' हा आठ मिनिटांचा लघुपट दाखवला. नंतर तो मुलांना म्हणाला, 'काय वाटलं, आता तुम्ही बोला.' मुलं हळूहळू बोलू लागली.

'2+2=5 म्हटलं नाही तर बंदुकीची गोळी ही हुकूमशाही आहे', 'हिटलरचा काळ..', 'तालिबानी..'

एक मुलगी म्हणाली, '2+2=5 म्हणजे चुकीचं समीकरण जबरदस्तीने लादणं. उदा. शिक्षण मेडिकल !' 

उभी हयात दृश्य माध्यमांत घालवलेल्या समरच्या 'दृष्टी'ची महती जाणकारांना नक्कीच होती. 'दूरदर्शन'नेही ती जाणून त्याच्यावर माहितीपट तयार करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानं राज्यभर खेडोपाडी हिंडून 'मतिमंद मुलांसाठी शाळा', 'महिलांनी चालवलेले अनाथालय', 'एन.सी.सी' आणि 'औद्योगिक सुरक्षा' या विषयांवर माहितीपट केले. विजय तेंडुलकरांनीही त्याला मालिका दिग्दर्शनाची गळ घातली होती. त्याच्याकडे इतरही दिग्दर्शनाच्या अनेक चांगल्या संधी चालून आल्या होत्या. पण त्याला 'चित्रपट करणारे आणि पाहणारे' घडवणं महत्त्वाचं वाटत आलं. तो त्याच मार्गावर चालत राहिला.

'पिफ'मध्ये ओम पुरींची प्रकट मुलाखत होती. तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेल्या समरला पाहून पुरी म्हणाले, "इथे येऊन सर्वांना संबोधित करावं असा अधिकार नखाते सरांना आहे. तुम्ही त्यांना तिकडे बसवलं आहे. त्यांच्यासमोर बोलायचं या कल्पनेनं मी गर्भगळीत झालोय.'

पुण्यातील 'आशय फिल्म क्लब'ने 2016 मध्ये 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया'चे माजी संचालक पी. के. नायर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू केला. पहिला पुरस्कार समरला बहाल करण्यात आला. त्या वेळी तो म्हणाला, "चित्रपट बघितला आणि बघून झाला, या दोन बायनरींमध्ये अडकून चालणार नाही. बायनरीच्या भाषेतील शून्य आणि एक या दरम्यान असणाऱ्या असंख्य शक्यतांनाच 'कला' असं म्हणतात. पुढील पिढ्यांनी, ते स्वतः आणि चित्रपट यांच्यातील संबंध अधिक व्यापक केला पाहिजे. त्यासाठी त्यांना स्वतःकडे काटेकोरपणे पाहून स्वतःला घडवावं लागेल."

समर हा मौखिक परंपरेला आधुनिक करणारा समाज शिक्षक आहे. कोणाला कोणासाठी वेळच नाही, अशा काळात तो सर्वांना 24x7 उपलब्ध असतो. ठरलेल्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचतो. प्रत्येकाशी आतड्यापासून बोलतो. कोण, कसं ऐकतं? याची तमा तो बाळगत नाही. त्याचं बोलणं म्हणजे धबधबा असतो. त्याला अनेक कल्पना सुचत जातात आणि त्या आडपडदा न ठेवता तो मुक्त हस्ते देत जातो. कोणी त्याला वैयक्तिक-कौटुंबिक सामाजिक समस्या सांगतं, तर कुणासाठी तो 'पापक्षालन स्थळ' असतो. त्याच्यामुळे किती जणांनी सर्जनशील कृती केल्या किंवा त्याच्या सहज सोप्या संवादामुळे किती आत्महत्या टळल्या, हे कोणालाच सांगता येणार नाही.

समरनं दिलेले संदर्भ (त्याच्या आवडत्या शब्दात काँटेक्स्ट) समजावून घेतले, तर दरवेळी नवीन काही हाताला लागतं. ती सामग्री कित्येक वर्षं उपयोगी पडते. समर स्वतःपासून इतरांपर्यंत सर्वांचंच कठोरतेणे परीक्षण करतो. त्याचं ते बोलणं काही वेळा अतिशय निर्दय वाटू शकतं. प्रत्यक्षात त्याचा हल्ला त्या विशिष्ट विचारांवर असतो. आपल्यामध्ये तहेतऱ्हेचे भ्रम अपसमज-अहंकार असतात. विचारांत बंदिस्तपणा असतो. हे 'सुप्त गुण' तो बोलण्यातूनच पकडतो. कधी त्यांचा पराकोटीचा उपहास करतो, कधी हळुवारपणे समजावून सांगतो. उद्देश एकच - समोरच्याला अंतर्मुख करणे. त्याचा सिद्धान्तच आहे, 'आय केअर यूटू मच; सो आय डोन्ट केअर यू.' हे ज्यांच्या लक्षात येतं, तेच त्याच्यासोबतच्या ज्ञानयात्रेत सहभागी होतात.

ग्लॅमरच्या जगात राहून त्यापासून कटाक्षाने दूर राहणारा समर. अत्यल्पतावादी. चहा-कॉफीची चवही माहीत नसलेला. साग्रसंगीत स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालतो, पण स्वतः मात्र अल्पाहारी. 'न-खाते, न-पिते, नखाते' हे त्याचं बिरूद आहे. असं हे 'समर नखाते मुक्त विद्यापीठ' 18 जून 2026 रोजी अमृत महोत्सवी वर्ष ओलांडून शहात्तरीत प्रवेश करत आहे.

पंडित कुमार गंधर्व 'गुरूबानी' गाताना सांगत, 'सभोवतालचं समग्र आकलन करून देईल, असा गुरू मिळणं खूप कठीण आहे. 'गुरू' नावाचे अनेक भेटतात. गुरूचे 'श्याम्पल' दिसतात. पण भाग्यात असेल तरच खरा गुरू लाभतो.' मागील 46 वर्षांपासून मला समरसारखा गुरू लाभला, हे माझं भाग्य. आणि माझ्यासारखे असे भाग्यवान हजारो आहेत.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर ( 58 लेख )
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके