डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नेहरूंनी पंतप्रधानपदाची व पटेलांनी उपपंतप्रधानपदाची शपथ व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडून घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत आर.के.षण्मुखम्‌ चेट्टी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बलदेवसिंग, जॉन मथाई, एन.गोपालस्वामी अय्यंगार, मौ.अबुल कलाम आझाद, डॉ.राजेंद्रप्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जगजीवन राम, सी.एच.भाभा, रफी अहमद किडवई, राजकुमारी अमृतकौर, न.वि. उपाख्य काकासाहेब गाडगीळ, के.सी. नियोगी आणि मोहनलाल सक्सेना यांचा समावेश होता. 
देश स्वतंत्र झाला होता आणि त्या मध्यरात्री दिवाळी साजरी करीत होता. ती साजरी करण्यात एकटे गांधीच सामील नव्हते. ते बंगालमधील दंगली शमविण्यात आणि तिथे हिंदू-मुसलमानांचे ऐक्य घडवून आणण्यात गुंतले होते...
 

दि. 22 मार्च 1947 या दिवशी माऊंटबॅटन हे त्यांच्या पत्नीसह भारतात आले. त्यांच्या नियुक्तीची घोषणा 20 फेब्रुवारीलाच झाली होती. मात्र माऊंटबॅटन यांची इच्छा इंग्लंडच्या नाविक दलाचे प्रमुख (ॲडमिरल) व्हावे, अशी होती. आपले ते स्थान कायम ठेवूनच आपण व्हाईसरॉयचे पद स्वीकारू, ही आपली अट ॲटली सरकारकडून मान्य करून घेऊन मगच ते भारतात आले.

नेहरूंची आणि त्यांची मैत्री जुनी होती. नाविक दलाचे अधिकारी या नात्याने ते सिंगापूरला असतानाच नेहरूंनी त्यांच्याकडे काही काळ मुक्काम केला होता. माऊंटबॅटनचे विमानतळावर स्वागत करताना ते नेहरूंना म्हणाले, ‘‘मि.नेहरू, मी भारताचा अखेरचा व्हाईसरॉय नाही. या देशाला स्वातंत्र्य द्यायला आलेला पहिला व्हाईसरॉय आहे.’’

‘‘आम्हीही तुमच्याकडून तीच अपेक्षा बाळगली आहे.’’ हे त्यावरचे नेहरूंचे उत्तर होते.

‘‘तुम्हा दोघांपैकी कोणी कोणाला अधिक प्रभावित केले असा प्रश्न पत्रकारांनी नेहरूंना विचारला तेव्हा ‘बहुदा दोघांनीही’ असे उत्तर त्यांनी दिले. या भेटीत माऊंटबॅटन यांनी नेहरूंना त्यांचे जीनांविषयीचे मत विचारले. जीनांशी दीर्घकाळ राजकीय वैर असणारे नेहरू त्यांच्याविषयी काही तिरकस उत्तर देतील, असे त्यांना वाटले होते. प्रत्यक्षात नेहरूंनी दिलेल्या उत्तराने ते विस्मित आणि आनंदितही झाले. नेहरू म्हणाले, ‘जीनांच्या वाट्याला त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात, वयाच्या साठाव्या वर्षी यश आले. त्यामुळे त्यांच्या सगळ्या व्यवहारात एक कटुता आली आहे. मात्र त्यांच्या यशाचे रहस्यही त्यांनी कायम घेतलेल्या नकारात्मक भूमिकेत आहे...’

‘‘तुम्हाला भारतासमोरची सर्वांत मोठी समस्या कोणती वाटते?’’ या माऊंटबॅटनच्या प्रश्नाला ‘‘दारिद्य्राची’’ असे एका शब्दाचे उत्तर नेहरूंनी दिले.

माऊंटबॅटन भारतात आले त्यावेळी त्यांचे वय 46 वर्षांचे, तर त्यांच्या पत्नी एड्‌विना यांचे 45 वर्षांचे होते. इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांच्या कुटुंबातून आलेल्या एड्‌विनाचा विवाह माऊंटबॅटन यांच्याशी 1921 मध्ये दिल्लीतच झाला होता. माऊंटबॅटन हे कमालीचे निर्णयक्षम व कोणाची फारशी भीडमुर्वत न बाळगणारे अधिकारी होते. शिवाय हाती घेतलेले काम शक्य तेवढ्या जलद गतीने करण्याची वृत्ती त्यांच्यात होती.

जून 1948 हा भारत सोडण्याचा इंग्लंडने निश्चित केलेला मुहूर्त असला तरी तोवर देशात सुरू असलेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगली चालू राहणे त्यांना अनिष्ट वाटत होते. त्याचसाठी त्यांनी स्वत:च्या मनाशी ऑगस्ट 1947 पूर्वीच सत्तांतर करण्याचे योजले होते. गांधी, पटेल व नेहरूंविषयी त्यांच्या मनात असलेला आदर मोठा होता आणि जीनांशीही समोरासमोरच्या वाटाघाटी करणे त्यांना जमणारे होते. त्यांच्या समोरची समस्या काहीशी व्यक्तिगत होती. ज्या व्हिक्टोरिया राणीने, म्हणजे त्यांच्या पणजीने भारत जिंकला तो स्वतंत्र करण्याची जबाबदारी घेऊन ते देशात आले होते.

देशात दंगली सुरू होत्या. दि. 4 मार्चला पंजाबात 13 जण ठार तर 105 जण जखमी झाले होते. त्याचे पडसाद अमृतसर, अटक, रावळपिंडी आणि मुलतानमध्येही उमटले. दि.5 मार्चला लाहोरमध्ये 7 जणांची हत्या झाली तर 82 जण जखमी झाले. नेहरूंनी दंगलग्रस्त भागांना भेटी दिल्या आणि लोकांना शांत करण्याचे प्रयत्न केले. या वेळी सोबत येण्याची त्यांनी केलेली विनंती जीनांनी नाकारली होती. या दंगली अशाच सुरू राहिल्या तर भारतात गृहयुद्धाचा भडका उडेल ही चिंता ब्रिटिश सरकारलाही भेडसावत होती. त्याचमुळे पंतप्रधान ॲटली यांनी दि.3 डिसेंबरला नेहरू व बलदेवसिंग या काँग्रेसच्या आणि जीना व लियाकल अली या लीगच्या पुढाऱ्यांना चर्चेसाठी इंग्लंडला बोलावून घेतले.

त्या वेळी ही चर्चा वेळेत संपवून 9 डिसेंबरला होणाऱ्या घटना समितीच्या पहिल्या बैठकीला मला हजर राहता आले पाहिजे, अशी अट नेहरूंनी घातली. ती सरकारने मान्य केल्यानंतरच नेहरू इंग्लंडला गेले. त्याआधी मेरठमध्ये काँग्रेसच्या कार्यसमितीसमोर बोलताना ब्रिटिश सरकार व मुस्लिम लीग यांच्यात एक गुप्त समझोता झाला असल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ‘भारतातला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वर्ग आणि मुस्लिम लीग यांच्यात एक मानसिक समझोता झाला आहे आणि अंतरिम सरकारात लिगच्या मंत्र्यांनी सरकारची जी अडवणूक चालविली आहे तिचे खरे कारणही तेच आहे’ असे ते म्हणाले. याच कारणासाठी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दोनदा केली. मात्र वॅव्हेल यांनी त्यांना दोन्ही वेळेला अडविले. नेहरूंच्या मनात मात्र वॅव्हेलविषयीही फारसा विश्वास तोपर्यंत उरला नव्हता.

लंडनमधील चर्चा कोणत्याही समझोत्यावाचून संपली आणि नेहरू बलदेवसिंग यांच्यासोबत भारतात परत आले. घटना समितीच्या पहिल्या बैठकीला लीगचा एकही सदस्य हजर नव्हता. तरीही ती बैठक व्यवस्थित झाली. तिचे अध्यक्षस्थान भूषविणारे डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांनी आपल्या भाषणात- ‘भारताने अमेरिकेच्या राज्यघटनेचा आदर्श आपल्या समोर ठेवण्याची’ सूचना समितीला केली. (ती अर्थातच स्वीकारली गेली नाही.)

दोनच दिवसांनी डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्या स्थायी अध्यक्षपदी निवड झाली. आपल्या पहिल्याच भाषणात समितीला उद्देशून त्यांनी लीगच्या अनुपस्थितीचा उल्लेख केला. ‘ते नसले तरी आताची घटनासमिती आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. तिच्या निर्णयांवर दुसऱ्या कोणाचेही नियंत्रण असणार नाही.’ पुढे बरेली येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, ‘‘भारताची राज्यघटना भारतीयांच्या इच्छेनुसार व गरजेनुसार तयार केली जाईल.’’ एका अर्थाने राजेंद्रबाबूंनी तो इंग्लंड व लीग या दोहोंनाही घटना समितीच्या कामापासून दूर राहण्याचा दिलेला इशाराच होता.

माऊंटबॅटन यांच्या या काळात गांधीजींशी अनेकवार भेटी झाल्या. त्या प्रत्येक भेटीत गांधींनी त्यांना आश्चर्याचे  अनेक धक्के दिले. ‘नेहरूंच्या अंतरिम सरकारने राजीनामा द्यावा आणि देशाचे पंतप्रधानपद जीनांकडे सोपवावे. त्यामुळे कदाचित हा देश अखंड राहू शकेल आणि त्यात सुरू असलेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीही थांबतील.’ ही गांधीजींची सूचना त्यांना अचंबित करणारी होती. देशात होत असलेला रक्तपात हा गांधीजींच्या तेव्हाच्या चिंतेचा सर्वांत मोठा विषय होता.

माऊंटबॅटन यांची जीनांशी झालेली भेट फारशी सौहार्दाची नव्हती. जीनांनी वयाची सत्तरी ओलांडली होती व ते आजाराने थकले होते. येता क्षणीच ते माऊंटबॅटन यांना म्हणाले, ‘‘माझ्या अटी मान्य होतील, तरच मी यापुढच्या चर्चेत भाग घेईन.’’ त्यावर ‘‘त्यासाठी तरी किमान आपली ओळख होऊ द्या- ’’ अशी नम्र सूचना माऊंटबॅटन यांनी त्यांना केली. त्या भेटीनंतर माऊंटबॅटन आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना म्हणाले, ‘‘जीना हा माणूस कमालीचा थंड आणि हाती काही लागू न देणारा आहे. त्याला बोलते करण्यातच माझा अर्धा वेळ खर्ची पडला.’’ त्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारले, ‘‘पण जीनांची प्रतिक्रिया कशी होती?’’ माऊंटबॅटनने उत्तर दिले, ‘‘मला ती अखेरपर्यंत कळू शकली नाही.’’

एप्रिलच्या मध्याला देशातील हिंसाचार एवढा वाढला की, ‘गांधी आणि जीना यांनी एकत्र येऊन जनतेला आवाहन करावे’ अशी विनंती माऊंटबॅटन यांनीच त्यांना केली. त्यानुसार 15 एप्रिलला काढलेल्या त्यांच्या संयुक्त पत्रकात जनतेला शांतता व संयमाचे आवाहन करण्यात आले. ‘भाषा, लिखाण व वर्तन यापैकी कशानेही कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी सर्व धर्मांच्या लोकांनी घेतली पाहिजे’ असे या पत्रकात त्यांनी म्हटले. या पत्रकाचा हिंसाचारावर फारसा परिणाम मात्र झाला नाही. पंजाबात शीख व मुसलमान आणि जम्मूत मुसलमान विरुद्ध शीख व हिंदू अशा दंगली सुरूच राहिल्या. काँग्रेस व लीग यांच्यात एकवाक्यता होत नव्हती आणि कॅबिनेट मिशनची योजनाही अमलात येण्याची चिन्हे दिसत नव्हती. परिणामी, फाळणी किंवा हिंसाचार असे दोनच पर्याय साऱ्यांसमोर उरले.

अंतरिम सरकार धर्मांत विभागले गेले होते. त्याच्याकडून कोणत्याही परिणामकारक कृतीची अपेक्षा नव्हती. मुस्लिम लीगचे मंत्री दंगलींना उघडपणे प्रोत्साहन देत होते आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा त्यापुढे नाइलाज होताना दिसत होता. लष्करात हिंदूंएवढेच मुस्लिम शिपाईही भरती होते. त्यामुळे त्याचा एका मर्यादेपलीकडे वापर करता येणे सरकारला जमणारे नव्हते. शिवाय आपल्याच जनतेवर आपले लष्कर सोडणे, ही गोष्ट अमानवी ठरणारीही होती. माऊंटबॅटन, नेहरू, पटेल व काँग्रेसमधील बहुतेकांना आता फाळणी अपरिहार्य असल्याचे कळून चुकले होते. गांधीजींचा अपवाद वगळता अखंड भारताची भाषा साऱ्यांनी सोडली होती...

या वेळी नेहरू आणि पटेल हे गांधींपासून वेगळे होतानाही दिसले होते. आताच्या हिंसाचाराहून फाळणी होणे आणि पाकिस्तान अस्तित्वात येणे हेच अधिक चांगले, ही भूमिका त्या दोघांनी प्रथम घेतली होती. काँग्रेसची संघटना मात्र तिला मान्यता द्यायला तयार नव्हती. त्या वेळी नेहरू माऊंटबॅटनना म्हणाले, ‘‘हे फार काळ चालू देता येणार नाही. एक तर तुम्ही तुमची योजना सांगा, अन्यथा मी माझ्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन.’’ पटेल त्याही पुढे जाऊन माऊंटबॅटनना म्हणाले, ‘‘तुम्ही स्वत: राज्य करीत नाही आणि आम्हालाही ते करू देत नाही.’’ यानंतर दि. 19 एप्रिलला माऊंटबॅटन यांनी आपल्या ब्रिटिश सहकाऱ्यांसमोर फाळणीची अंतिम योजना तयार केली. त्यासाठी पंजाब व बंगालची फाळणी मान्य करायला जीना तयार आहेत काय, हे विचारायला त्यांनी लॉर्ड इस्मे या सरकारच्या प्रमुख प्रशासनाधिकाऱ्याला त्यांच्याकडे पाठविले. त्यावर ‘सगळा पाकिस्तान मिळत नसेल, तर वाळवीने खाल्लेला पाकिस्तानही मला चालेल’ असे उत्तर जीनांनी त्यांना दिले. मात्र जीनांच्या याविषयीच्या भूमिका अखेरपर्यंत बदलतच राहिल्या. त्यांच्यावर चर्चिल यांनी आणलेल्या दडपणामुळे त्यांनी अखेर बंगाल आणि पंजाबच्या फाळणीला मान्यता दिली.

माऊंटबॅटन यांनी फाळणीची योजना सिमला येथे नेहरूंना प्रथम सांगितली. त्या वेळी ‘‘हिंदुस्थानचे हिंदुस्थान व पाकिस्तान अशा दोन देशांत विभाजन करण्याखेरीज आम्हाला मार्ग दिसत नाही’’ असे ते म्हणाले. त्यावर संतापलेल्या नेहरूंनी उत्तर दिले, ‘‘ही फाळणी नाही. भारत ही पाच हजार वर्षांची अखंड परंपरा आहे. कोणा एकाच्या मागणीवरून या परंपरेचे खंडन करणे आम्हाला मान्य नाही. ब्रिटिश सत्तेचा वारसा भारताकडे व त्याच्या घटना समितीकडेच तुम्हाला द्यावा लागेल. पाकिस्तान हा त्याचा वेगळा पडलेला एक तुकडाच तेवढा असेल. जे फाळणीवादी असतात, ते वारसदार नसतात.’’

दि. 3 जूनला नेहरू, जीना, बलदेवसिंग व माऊंटबॅटन यांनी देशाला उद्देशून फाळणीची घोषणा केली. त्या चौघांनीही त्यासाठी रेडिओवरून भाषणे केली. त्यातले सर्वाधिक प्रभावी भाषण नेहरूंचे होते. ते म्हणाले, ‘‘फार मोठी जबाबदारी घेतलेली आम्ही फार लहान माणसे आहोत. या जबाबदारीने आम्हाला मोठे केले आहे. फाळणी कोणालाही आवडणारी नाही. पण आताच्या हिंसाचारावर त्याएवढा दुसरा परिणामकारक उपायही नाही. जिथे ऑपरेशन गरजेचे असते तिथे साधे उपचार चालत नाहीत...’’

गांधींना फाळणी मान्य नव्हती. पण आता त्यांचाही नाइलाज झाला होता. नेहरूंवरील आपली नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘तो राजा आहे. पण राजा जे सांगेल ते सारे आपल्याला आवडलेच पाहिजे, असे मात्र नाही. त्याची कृती आवडली नसेल, तर तसे त्याला सांगा.’’ असे ते काँग्रेसला उद्देशून म्हणाले. स्वातंत्र्याला तीन महिने राहिले असतानाच फाळणीसोबत येणाऱ्या देशाच्या मालमत्तेच्या वाटणीची चर्चा दिल्लीत सुरू झाली. लष्करी व मुलकी अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस दल, विमाने, जहाजे, बंदुका, तोफा, फर्निचर आणि अगदी टाईपरायटर्सपर्यंत... देशाचे भौगोलिक व मालकीविषयक वाटप कसे व्हावे, यासाठी नेमलेल्या रॅडक्लिफ कमिटीचा अहवाल त्यासाठी साऱ्यांसमोर होता.

(लष्करातील विमाने, रणगाडे व अन्य शस्त्रे समान वाटून घेतली गेली. हे वाटप बंदुका आणि त्यांच्या गोळ्यांपर्यंत गेले. ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकाच्या लेखकद्वयांनी या वाटपासंबंधी केलेली एक गमतीशीर नोंद येथे सांगण्यासारखी आहे. व्हाईसरॉयच्या दिमतीला तेव्हा पंधरा घोडागाड्या होत्या. त्यातल्या सात पाकिस्तानच्या, तर सात हिंदुस्थानच्या वाट्याला आल्या. पंधराव्या गाडीचे काय करायचे, हा प्रश्न समोर आला; तेव्हा पाकिस्तानचे प्रतिनिधी त्या गाडीची दोन चाके आपल्या सोबत घेऊन गेले.)

पंजाब आणि बंगालच्या विधी मंडळांनीच त्या स्थितीत आपापल्या प्रांतांच्या फाळणीचा निर्णय घेतला. वायव्य सरहद्द प्रांतात सार्वमत घेतले गेले. त्यात भारताच्या बाजूने 2800 तर पाकिस्तानच्या बाजूने 88000 मते पडली. सरहद्द गांधींच्या राष्ट्रीय एकात्मतेवरील निष्ठेहून पठाणांची धर्मनिष्ठा भारी ठरली होती.

दिल्लीत देशातले सारे संस्थानिक एकत्र आले होते  आणि आपण भारतासोबत राहायचे की पाकिस्तानात जायचे, याचा विचार कोणत्याही चर्चेवाचून न करता ते व्हाईसरॉयच्या प्रचंड प्रासादात फिरत होते... देशातील बहुतेक सारी संस्थाने भारतीय प्रदेशात येणारी होती. पाकिस्तानच्या क्षेत्रात फक्त तीन संस्थाने होती. जीनांनी ती पाकिस्तानात तत्काळ विलीनही करून घेतली. दिल्लीबाहेर हिंदू, मुसलमान व शीख यांच्या दंगली पेटल्या होत्या. देशाच्या दोन्ही तुकड्यांमधून एक कोटींहून अधिक लोक निर्वासित होऊन आपला नवा निवारा शोधायला बाहेर पडले होते.

जीनांना या कशाचेही दु:ख नव्हते. त्यांनी 7 ऑगस्टलाच कराची गाठली आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल या नात्याने शपथ घेऊन त्या देशाच्या प्रशासनाची सारी सूत्रेही त्यांनी स्वत:कडे घेतली. काँग्रेसने मात्र ते पद काही काळासाठी माऊंटबॅटन यांच्याकडेच प्रशासनातील सातत्याखातर ठेवले. दिल्लीत हे सारे घडत असताना एकटे गांधीच नौखालीकडे तेथील दंगली शमवायला 7 ऑगस्टला निघून गेले होते.

डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची पहिली बैठक 9 ऑगस्टला झाली. तीत उद्‌घाटनाचे भाषण करताना राजेंद्रबाबू म्हणाले, ‘‘गांधी हा आपला प्रकाशमार्ग आहे. गेली 30 वर्षे आपल्याला दिशा दाखवण्याचे व पुढे नेण्याचे काम करणारा हा महात्मा यापुढेही आपल्याला मार्गदर्शन करीतच राहणार आहे.’’ नेहरू म्हणाले, ‘‘या घटकेला माझा पहिला विचार गांधी या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराकडे जात आहे. या राष्ट्रपित्याने देशाची परंपरा व प्रकृती या दोहोंचेही प्रतिनिधित्व केले आहे. आम्ही त्यांचे योग्य शिष्य होऊ शकलो नाही, हे आमचे शल्य आहे.

मात्र त्यांचा संदेश आमच्या मनावर कोरला आहे. तो आमच्यासमोरचा आदर्श आहे. कितीही वादळे आली आणि संकटे कोसळली, तरीही आम्ही त्यांचा संदेश व त्यांनी दिलेले स्वातंत्र्याचे वरदान उंचावर फडकावतच राहणार आहोत.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘आपण आज कठोर परीश्रमाची शपथ घेत आहोत. या देशासाठीच नव्हे, तर या जगासाठी एक शांत व समाधानी जीवनप्रणाली निर्माण करण्याची प्रतिज्ञा करीत आहोत. स्वातंत्र्य अविभाज्य असते. ते अखंड व अभंग राखायला आपण बांधले गेलो आहोत.’’

घटना समितीच्या बैठकीनंतर माऊंटबॅटन यांच्या निवासस्थानी राजेंद्रबाबू व नेहरू जाऊन त्यांना भेटले आणि त्यांनी देशाच्या व्हाईसरॉयपदाचा स्वीकार करावा, अशी अधिकृत विनंती त्यांना केली. त्याच वेळी नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची नावे त्यांच्या खात्यांसह माऊंटबॅटन यांच्या सुपूर्द केली.

भारतावरील इंग्रजांची सत्ता संपली होती. दि.15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिनाचा औपचारिक सोहळाच तेवढा व्हायचा होता. स्वातंत्र्य आले तेव्हा नेहरूंच्या वयाची 58 वर्षे पूर्ण व्हायला तीन महिने बाकी होते. सरदारांनी बहात्तरी ओलांडली होती आणि गांधीजी 78 वर्षांचे होते. बापूंचा प्रभाव साऱ्या देशावर होता. मात्र राजकारणाची सूत्रे नेहरू व पटेलांच्या हाती आली होती. त्यांना गांधींचा सल्ला शिरोधार्य होता, पण आता अखेरचा निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. गांधीजी याही घटकेला देशातील जनतेला रस्त्यावर आणू शकतात एवढे ते तिच्या अंत:करणात आहेत, हे त्या दोघांएवढेच देशालाही कळत होते. याच काळात नेहरूंनी लिहिले, ‘बापू आभाळातून उतरले नाहीत; ते कोट्यवधी जनतेतून आले आहेत.’

दि. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नेहरूंनी पंतप्रधानपदाची व पटेलांनी उपपंतप्रधानपदाची शपथ व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडून घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत आर.के.षण्मुखम्‌ चेट्टी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बलदेवसिंग, जॉन मथाई, एन.गोपालस्वामी अय्यंगार, मौ.अबुल कलाम आझाद, डॉ.राजेंद्रप्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जगजीवन राम, सी.एच.भाभा, रफी अहमद किडवई, राजकुमारी अमृतकौर, न.वि. उपाख्य काकासाहेब गाडगीळ, के.सी. नियोगी आणि मोहनलाल सक्सेना यांचा समावेश होता. 

देश स्वतंत्र झाला होता आणि त्या मध्यरात्री दिवाळी साजरी करीत होता. ती साजरी करण्यात एकटे गांधीच सामील नव्हते. ते बंगालमधील दंगली शमविण्यात आणि तिथे हिंदू-मुसलमानांचे ऐक्य घडवून आणण्यात गुंतले होते...

Tags: लॉर्ड माऊंटबॅटन Lord Mountbatten सुरेश द्वादशीवार Suresh dwadashiwar Nehru Pandit Jawaharlal Nehru नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके