मानवाला खरोखरच शांती हवी असेल, तर त्याचा मार्ग ज्या शिक्षणातून जातो, ते शिक्षण कसं असलं पाहिजे, याचं मूलगामी विवेचन 'शिक्षण आणि शांती' या जेन साही यांच्या पुस्तकात आहे. वैशाली जेन साही यांच्या जातकुळीतील आहे. तिला दैनंदिनी लिहिण्याची सवय आहे. तिच्या दैनंदिनीमधील काही नोंदी तिच्या पुस्तकात बघायला मिळतात. 'टीचर' या पुस्तकाची लेखिका सिल्व्हिया अॅश्टन वॉर्नर हिचे 'टीचर' हे पुस्तक वाचत असतानाची नोंद तिने तिच्या दैनंदिनीत केली आहे. ती म्हणते, 'तिच्या आणि माझ्या काही समान भावना बघून मला वाचताना भडभडून येते.' सिल्व्हिया आणि वैशालीच्या शिकवण्याच्या मुलांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनांमध्ये खूपच साम्य आहे. वैशालीची शाळा 'तोतोचान'च्या शाळेसारखी आहे.
सुरुवातीच्या काळात काही शिक्षक, अधिकारी तिला 'विचित्रच आहे' असं म्हणायचे. तिच्या विचारानं काम करणं न जमणाऱ्यांना, तिच्या विचारांचा प्रतिवाद करणं अवघड असणाऱ्यांना, असं बोलणं सुचायचं. एका मेंढीमागून दुसऱ्या मेंढ्यांनी जावं, हे तिला मान्य नसतं. निसर्गानं आपल्याला मेंदू दिला आहे, तो विचार करण्यासाठी. दुसऱ्याच्या मेंदूनं आपण चालायचं कारणच काय ? तिचा प्रवास प्रवाहाबरोबर क्वचित दिसतो. ती व्यवस्थेच्या चौकटीत बसत नाही. आजारी पडल्यानंतर ती सहजासहजी औषधोपचार घेत नाही. ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका : वैशाली गेडाम. यंत्रणेतील 'येस सर, येस सर' म्हणून मान तुकवण्याची सवय झालेल्यांना वैशाली विचित्र वाटल्यास नवल नाही. त्यांना तिच्या नादाला लागण्यापेक्षा तिचा विषय सोडून देणं सोईस्कर वाटतं. वैशालीला वाद-विवाद करताना, मत मांडताना मी कधीही आवाज वाढवलेलं किंवा आक्रस्ताळेपणा केलेला पाहिला नाही. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि ठामपणा असतो. तिची लढाई तर्कसंगत असते. शांततेसाठी शिक्षणाचा आग्रह धरणारी वैशाली शांत, संयमी आणि निर्मळ आहे.
कोणी म्हणेल, 'साहेबांनी मागितलेली माहिती अगोदर देऊ या. त्यांचा रोष पत्करणं परवडणारं नाही. मुलं काय आजची उद्या शिकतील; पण साहेबांनी डूख धरला तर? धडपणानं आपली नोकरी करू या.' वैशालीला इतरांच्या म्हणण्याशी देणंघेणं नसतं. ती म्हणते, 'माहिती देण्यासाठी मी नोकरी करत नाही. मुलांना 'शिकवण्यासाठी' मी आहे. ते माझं 'पहिलं काम' आहे. मी ते अगोदर करणार.' हक्काची रजा काढतानाही वैशाली हा विचार करते.
तिच्या धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) या शाळेला मी आणि प्रतिभा भराडे यांनी भेट दिली. आमच्यासोबत वैशालीचे गट शिक्षणाधिकारी धनराज आवारी होते. प्रवासात मुलांचं शिकणं, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यातून निघणारे मार्ग हेच आमच्या गप्पांचे विषय होते. प्रश्न-प्रतिप्रश्न करत, तिचं समजून घेत गप्पा सुरू होत्या. ती नदीसारखी खळखळून बोलत होती.
ही तिची आदिवासी भागातील शाळा. तिनं बहुतेक नोकरी आदिवासी भागातच केली आहे. लोकांच्यात राहावं, मिसळावं म्हणून ती काही काळ तिथल्या लोकांबरोबर आदिवासी वस्तीत राहिली. आदिवासींच्या झोपडीत. बाथरूम म्हणजे काट्याकुट्यांचा वापरून तयार केलेला आडोसा. तिथं कुटुंब सोडून ती एकटीच राहत होती. वैशालीला वाटतं, 'गाव शाळेत आलं पाहिजे. गावात ज्या काही रूढी, परंपरा, लोककला आहेत त्यांचा उपयोग मुलांना शाळेत रमवण्यासाठी, शिकण्यासाठी करता आला पाहिजे.' म्हणजे काही शिक्षकांना वाटतं, नेमकं त्याच्या उलट.
मुलं जे गावात करतात, ते करण्याची संधी मुलांना ती शाळेत देते. त्यासाठी तिला वेगळं शिकवावं लागत नाही. मुलं घरून येतानाच शिकलेलं घेऊन येतात. त्यांना मोकळीक असल्यामुळं मुलं शाळेतही तेच करतात. मुलं मोकळी होतात. ती म्हणाली, "या मुलांची बोली वेगळी आहे. त्यांच्या दृष्टीने मराठी ही परकी भाषा आहे. अक्षरओळख लवकर होत नाही, काही अक्षरांच्या आवाजाचे शब्द त्यांच्या बोलीमध्ये नाहीत. मुलांना मराठी समजत नाही, म्हणून मी त्यांना प्रश्नपत्रिकेमध्ये दहा गोंडी शब्द लिहा, असं सांगते. मराठीचे पाच लिहा आणि गोंडीचे दहा लिहा. मी वर्गामध्ये शिकवताना मराठी भाषा वापरते. इतर वेळी मुलांबरोबर स्थानिक गोंडी भाषेत बोलते. शिकवताना मात्र मी तेच शब्द वापरते, की जे पुस्तकात आहेत. नियमित वापरात असणारे शब्द मुलांना समजतात. काही शब्द पूर्णपणे अपरिचित असतात. अशा वेळी एकेका शब्दाची त्यांना ओळख करून द्यावी लागते. 'रचना', 'घोषणा' हे शब्द उलगडून सांगावे लागले. काही वेळा एका शब्दासाठी स्वतंत्र तासिका घ्यावी लागते."
वैशालीनं तिचा अंकलेखनाचा अनुभव सांगितला, "मुलांना अंकांची चिन्हे लक्षात राहीनात. मुलांना वाचता येत आहे. लिहिता येत आहे. मग मी त्यांना सांगितलं, याचं नाव दोन आहे. याचं नाव तीन आहे. ज्या दिवशी मी हे सांगितलं ना, त्या दिवशी पाचच्या पाच अंक त्यांच्या ध्यानात राहिले. आपण याला 'एक' म्हणतात, हा 'एक' आहे. याला 'दोन' म्हणतात असं सांगतो. ते काही त्यांना समजायचंच नाही. त्यांच्या डोक्यावरून जायचं. व्यक्तीला नाव देतो तसं याचं 'नाव' एक आहे. याचं 'नाव' दोन आहे, असं सांगितलं. पूर्वी मी जे काही वाक्य बोलत होते ते त्यांच्या 'पदरातच पडत नाही' असं होतं; पण याचं नाव एक आहे हे वाक्य 'पदरात पडलं.' अशी गंमत आली मला". वैशाली उत्साहानं सांगत होती. मला हे तिचं 'पदरात पडलं' खूपच आवडलं. समजलं, कळालं यापेक्षा 'पदरात पडलं' हे खूप काही सांगून गेलं. भाषेची मजा वेगळीच आहे. मी म्हटलं, "तुझं ऐकून माझ्याही पदरात बरंचसं पडलं. आम्ही सगळेच खळखळून हसलो. वैशाली पुढं म्हणाली, "एवढे दिवस मला मुलांना समजेल असं सांगता येत नव्हतं." सर्वसाधारणपणे शिक्षक म्हणतात, 'याला किती शिकवलं तरी समजत नाही. मठ्ठ आहे हा, याचा बुद्धयंक कमी आहे.' परंतु वैशाली म्हणत होती, "मुलांना समजेल असं मला सांगता येत नव्हतं." मुलांना दोष देण्यापेक्षा ती स्वतःची कमतरता मान्य करते आणि मुलांना कसं समजेल याचा विचार करते.
वैशालीला लागलेला हा शोध तिला खूपच आनंद देत होता. मुलं शिकावीत म्हणून ती सतत वेगवेगळं करत राहते. त्यासाठी तिची अखंड धडपड सुरू असते. तिचं शिकवता शिकवता शिकणंही सुरू असतं. अशा शिकण्या-शिकवण्याच्या अनुभवाच्या हजारो नोंदी वैशालीने केलेल्या आहेत. या नोंदी पुस्तकरूपाने आल्यास शिक्षण अभ्यासकांना आणि शिक्षकांना चांगला दस्तऐवज उपलब्ध होऊ शकतो. असं शिकण्या-शिकवण्यासठी शिक्षकाजवळ खूप संयम आणि शांती असावी लागते. तिला वाटतं, शिक्षण ही वैश्विक शांततेची प्रक्रिया असली पाहिजे. म्हणूनच बाकीचे विद्यार्थी शिकत असताना एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात चाललेलं शिकू वाटत नसेल, त्याला वर्गाच्या बाहेर दुसरंच काही करावं वाटत असेल तर वैशाली त्याला तशी मुभा देते. त्याला शिकण्याची कधी ना कधी इच्छा होणार आहे हे तिला माहीत असतं. ते मूल परत वैशालीकडे येतं आणि त्याला काय शिकायचं आहे ते सांगतं. हा विश्वास तिने तिच्या कामातून मिळविला आहे.
मुलांच्यावरती 'अप्रगत', 'ढ', 'गब्बू', 'नर्मदेतला गोटा' असे शिक्के मारणं तिला पसंत नाही. वैशाली म्हणते, 'मुलांना मनातले गुपित खोलण्याची शाळेत संधी नसते. ही मुले मन मोकळं न करू शकल्यामुळे गुरुजींच्या शिकवण्याकडे आकर्षित होऊ शकत नाहीत. म्हणून ती गुरुजींच्या रागास बळी पडतात. अशा प्रकारे, ही मुले हळूहळू करपत जातात. गुरुजींच्या, पालकांच्या, समाजाच्या दृष्टीने 'ढ' बनतात.'
'पालक मुलांच्याकडे लक्ष देत नाहीत, ते आदिवासी आहेत, मागास वर्गीय आहेत, त्यांना शिक्षणाविषयी अनास्था आहे', असं म्हणून ती पालकांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही, की 'मुलांची बोलीभाषा वेगळी आहे म्हणून मुले शिकू शकत नाहीत', असं म्हणून स्वतःची सुटका करून घेत नाही. उलट, त्यांना समजून घेते. त्यांची भाषा समजून घेते. शिकून घेते. शाळेत पाऊल टाकल्यापासून तिचं हे सुरू होतं. शिकवताना अडचणी येतील तसं मार्ग काढणं सुरू असतं.
शिकणं-शिकवणं ही खूप आनंददायी गोष्ट आहे. एखाद्या मुलाला एखादं अक्षर येऊ लागलं, तरी खूप काही जिंकल्याचा आनंद त्याला मिळत असतो. शिक्षकांचंही तसंच आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना समजत नसेल आणि ते समजावण्यासाठीचा एखादा शोध लागला तर शिक्षकांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते ती. जसं की, वैशालीला संख्यांना नावं देण्याचा शोध लागला. ही शिक्षकांसाठी आयुष्यभराची शिदोरी असते.
वैशालीच्या मनात मुलांच्या प्रगतिपुस्तकाविषयी वेगळीच कल्पना आली. तिच्या पुस्तकातील एक प्रसंग आहे. एकदा एका प्रशिक्षणाच्या वेळी तिने नवीन प्रकारचे प्रगतिपुस्तक बनविणार असल्याचे सांगितले. त्या वेळी शिक्षकांनी विचारले, "शासनाने सांगितल्याप्रमाणे श्रेणी भरणार ना?" ती म्हणाली, "नाही. त्यापेक्षा वेगळे करून पाहीन." शिक्षक म्हणाले, "असे कसे? शासनाने सांगितले तर तसेच मूल्यमापन आपल्याला करावे लागेल. आपण शासनाशी बांधील आहोत. त्यामुळे शासन म्हणेल तसेच करावे लागेल". वैशाली म्हणाली, "मी शासनाची बांधील नाही". त्या वेळी मोठाच वादंग झाला. जणू वैशालीने काही गुन्हा केला होता. शिक्षकांनी तिच्यावर हल्ला केला, "तुम्ही शासनाशी बांधील नाही म्हणता. शासनाचे धोरण राबवत नाही. शासनाने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर काय करावे?" वैशाली म्हणाली, "तो काय माझा गुन्हा झाला? माझ्या क्षेत्रात मी स्वतंत्र आहे प्रयोग करण्यास. आपल्याला प्रयोगांची गरज आहे. मी समाजाशी बांधील आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांशी बांधील आहे. मी माझ्या पेशाशी बांधील आहे. मी तत्त्वांशी, कायद्याशी बांधील आहे. शासनाचे काय आहे, शासक बदलत असतात. सरकार बदललं की ध्येयधोरणे बदलतात. उपक्रम बदलतात. जुन्या योजना जातात, नव्या येतात. या प्रकारात मी माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा का करू ? मी शिक्षणाचे शाश्वत सत्य शोधीन आणि कोणतेही शासन आले तरी त्याच मार्गावरून चालीन".
त्या प्रशिक्षणात शिक्षकांना प्रश्न विचारला, "प्रत्येक मूल शिकू शकतं का?" वैशाली म्हणाली, 'हो'. बाकी शिक्षक म्हणाले, 'नाही'. दुसरा प्रश्न विचारला, "मुले अध्ययन अक्षम असतात का?" वैशाली म्हणाली, 'नाही'. इतर शिक्षक म्हणाले, 'हो.' म्हणजे शासनाशी बांधील असणाऱ्यांना मुलं 'अध्ययनक्षम असतात आणि सर्व मुलं शिकू शकत नाही' असं वाटतं आणि वैशालीला मात्र 'सर्व मुलं शिकू शकतात' असं वाटतं.
मुलांना प्रश्नांची उत्तरं देणं किंवा लिहिणं आवडत नाही. त्यांना प्रश्न विचारायला आवडतं. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न रुंजी घालतात, पिंगा घालतात. ते प्रश्न गुरुजींना विचारावे असं वाटतं; परंतु शाळेत फक्त गुरुजींनीच प्रश्न विचारायचे असतात, अशी एक रूढी झालेली आहे. वेगवेगळ्या मुलांना एकसारखं शिकवलं जातं अन् एकसारखंच मूल्यमापन केलं जातं. मुलं शाळेत खूप गोष्टी करत असतात; परंतु त्याची नोंद घेतली जात नाही. वर्षाच्या शेवटी त्यांच्या हातात संख्यांनी भरलेला आणि अर्थहीन श्रेणी भरलेला कागद पडतो. वैशाली म्हणते, 'या मुलांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. सर्व मुलांच्यामध्ये सारख्या क्षमता नसतात; परंतु प्रत्येक मुलांमध्ये कोणती ना कोणती क्षमता असते. म्हणूनच वैशालीला प्रत्येक मूल अ आहे असे वाटते. ती आपल्यालाच प्रश्न विचारते, 'मुलं आपण शाळेत का घालतो ? त्यांना काय येत नाही, तो कोठे कमी आहे हे सांगण्यासाठी की त्याला काय येतं हे सांगण्यासाठी ? ज्या गुणांची आपण माणसांमध्ये अपेक्षा करतो त्या गुणांना आपण शिक्षण घेताना, त्याच्या प्रगतिपुस्तकात कोठे स्थान देतो? ही बिचारी मुले संख्यात्मक गुणांच्याच मागे धावतात. कारण त्यांचं महत्त्व आपण आजतागायत अधोरेखित केलेलं आहे. मग माणसे नीतिमान नाहीत, ही ओरड का करायची ?'
प्रगतिपुस्तकाच्या नोंदींबद्दल वैशाली म्हणते, 'मुलांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिका भरणे जड जाऊ लागले. गुणपत्रिका लिहिताना संबंधित मुलगा पूर्णपणे माझ्या डोळ्यांसमोर यायचा. मला त्याच्या वर्षभराच्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. त्याच्यात असलेल्या अनेक क्षमता कौशल्य, नीतिमूल्ये आठवायची. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे त्याने केलेले विभोर प्रदर्शन मला आनंद देऊन जायचे. मुख्याध्यापकांनी माझ्याकडे सोपवलेल्या कोऱ्या गुणपत्रिकांमध्ये तो मावतच नाही, असे मला वाटायचे.' या काळात वैशाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मरडा (मोठा) येथे कार्यरत होती. त्या वेळी तिने केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकातील नोंदी खूप वेगळेपणा दर्शविणाऱ्या आहेत.
निखिल चौधरी हा दिव्यांग मुलगा. त्याच्या प्रगतिपुस्तकातील काही नोंदी अशा, 'भाषा सांगितलेला प्रत्येक शब्द तू म्हणून पाहतोस. तू शाळेत आल्यावर पुष्कळ वेळ पुस्तके पाहत बसतोस. पुस्तकातील चित्रांची नावे मला सांगतोस. गणित रस्त्याने जाणाऱ्या गाड्या तू मोजतोस. नुसत्या आवाजावरून कोणाची गाडी येत आहे हे बिनचूक सांगतोस. कार्यानुभव स्वतःच्या हाताने पाणी पितोस. कला-गाणे लागले की, तू नाचतोस. हातात पेन किंवा खडू घेऊन रेघ ओढतोस. शारीरिक शिक्षण - आता तू पुष्कळ चांगला चालतोस. पुष्कळ वेळ उभा राहू शकतोस. तोंडातून गळणारी लाळ तू स्वतः रुमालाने पुसतोस.'
वैशाली तिच्या 'माझे प्रगतिपुस्तक - शोध शांतीचा' या पुस्तकात म्हणते, 'माझ्या शाळेतील मुलांनी देशासाठी तयार व्हावं. चांगलं नागरिक व्हावं. ते संवेदनशील, जाणीवजागृती समृद्ध असलेले आणि देशप्रेमाने, मानवी मूल्यांनी प्रेरित झालेले असावेत, असे मला वाटते; पण माझ्या गावात हे होत नव्हते कारण गावात अतिशय घाण, हागणदारी, दारू, जुगार अशा समस्या मला दिसत होत्या. या समस्यांतून गाव बाहेर पडल्याशिवाय मुलांमध्ये मूल्ये रुजणार नाहीत याची जाणीव मला झाली आणि मी गाव आदर्श करण्याच्या प्रयत्नांना लागले. अपरिमित प्रयत्न मी त्यासाठी केले.' यासाठी वैशालीनं गावात फिरतं वाचनालय चालवले आहे. गावातील चौकात ग्रामगीतेचे वाचन आणि त्याचे निरूपण सातत्याने केले आहे. तिला जे पटतं, वाटतं ते ती कोणाची वाट न पाहता करत राहते. त्यासाठी होणाऱ्या त्रासाची ती तमा बाळगत नाही.
आम्ही वैशालीच्या शाळेत गेलो. शाळेच्या सभोवताली झाडी. शाळेची इमारत साधीच. बाहेरून रंगवलेली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोंडा अर्जुनी (गोंडगुडा). शासनाने सांगितलेली सर्व शिक्षा अभियान वगैरेची बोधचिन्हं भिंतीवर चितारली होती. शाळेसमोर ध्वज कट्टा. दगड लावून केलेले विविध आकार. त्यांना दिलेला पांढरा रंग. त्यावर लिहिलेले शब्द 'अचानक, ताल, नैसर्गिक, मांसाहारी, अंदाज, अनेक, रचना, स्वप्न'. 'हे शब्द कसले?' विचारलं, तर मुलांना न समजलेले शब्द असं कळालं. आम्ही प्रवासात जी चर्चा केली होती, तेच दगडांवरती दिसत होतं.
आमच्याभोवती मुलं गोळा झाली. आम्हाला शाळेतलं काय काय दाखवणार म्हटल्यावर मुलांचा उत्साह ओसंडून वाहू लागला, 'गाणी, नाच, नाटक, कबड्डी'. आम्ही नुकताच शाळेच्या परिसरात प्रवेश केला होता. तशी त्यांची आमची ओळखदेख नव्हती. मुलं मात्र आमची जुनी ओळख असल्यासारखं बोलत होती, आमच्यात मिसळली होती. मुलं वैशालीला 'ताई' म्हणत होती आणि दुसऱ्या शिक्षकांना 'सर'.
न समजलेले शब्द मुलं कशी शिकतात हे वैशालीने आम्हाला वर्गात दाखवलं. 'स्थिर' हा शब्द शिकवायचा तर शरीर स्थिर राहण्यापासून ते ध्यानाच्या स्थितीपर्यंतची स्थिरता, मनाच्या स्थिरतेपर्यंत मुलांना घेऊन जाणे तिचं उद्दिष्ट असतं. एखाद्या शब्दाचा पर्यायी अर्थ सांगणे एवढा तिचा मर्यादित हेतू नसतो. शब्द तात्पुरता समजणं आणि तो आठवणीत ठेवणं यापेक्षाही तो शब्द अंगात उतरणं, कृतीत उतरणं, त्या शब्दाच्या विविध छटा, कंगोरे समजणं असं बरंच तिच्या डोक्यात असतं. वरवरचं आणि तात्पुरतं हे तिला माहीत नसतं. आपल्याकडे अभ्यासक्रम (पर्यायाने शिक्षण) संपवण्याची घाई असते, ती तिच्याजवळ नाही.
असं छोट्या छोट्या कृतींतून-उपक्रमांतून काही वेळा मुलांना सुचलेल्या गोष्टींमधून वेगवेगळ्या अनुभवांमधून मूल जातं. एक प्रकारे त्याचं तेच शिकण्यास उद्युक्त होतं आणि शिकतं. म्हणजे वैशाली स्वतः न शिकवता विद्यार्थ्यांनी शिकण्याची परिस्थिती निर्माण करते, शिकण्यापर्यंत त्यांना पोहोचवते.
वैशालीने 'बचत' या शब्दाविषयी मुलांच्या बरोबर गप्पा मारल्या. 'बचत म्हणजे काय?' विचारलं. एक मुलगी म्हणाली, 'लगीत करून बँकेत टाकणे'. 'लगीत करणे' म्हणजे वाढवणे, जास्त करणे, हे मुलांनी सांगितलं. मग उंची, पैसे, वाढवता येतात हे मुलांनी सांगितलं. वैशालीनं विचारलं, 'उंची वाढवता येते, म्हणजे ही बचत झाली का?' मुलं म्हणाली, 'नाही.' 'पैशाची बचत लगीत (जमा) करून झाली,' असं मुलांनी सांगितलं.
मुलांशी बोलता बोलता वैशाली चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे फळ्यावर नोंद करीत होती. त्यामुळे झालेल्या चर्चेचा पुन्हा आढावा घेता येणार होता. या नोंदी वाचून त्यांवर पुन्हा विचार करता येणार होता.
वैशाली म्हणाली, "आईने तुम्हाला पाच रुपये दिले म्हणजे बचत झाली का? तुम्ही काय केले?" मुलं म्हणाली, "आम्ही ते जमा करून ठेवले". 'म्हणजे बचत झाली का? परंतु जमा झाले म्हणजे बचत झाली असे होत नाही.' मग बचत म्हणजे नेमके काय हे मुलांना सांगता येईना. त्या वेळी वैशालीने विचारलं, 'तुम्ही काय केलं नाही ते सांगा.' मग मुले म्हणाली, आम्ही खाल्ले नाही.' वैशालीने विचारलं, 'तो खर्च करणे आवश्यक होतं का ?' मग वैशालीने 'आवश्यक' म्हणजे काय हे मुलाला समजलं आहे का याची खात्री केली. आवश्यक म्हणजे जरुरी, गरज, असं मुलांनी सांगितलं. 'मग चॉकलेट खाणे ही गरज होती का?' मुले म्हणाली, 'नाही.' वैशाली म्हणाली, "आपण उपाशी मरणार नाही आहोत. बचत होते केव्हा? विनाकारण खर्च नाही केला तर. मग आपल्या जवळचे वाढत जाते. अशी कोण कोणती बचत आपण करू शकतो?" मुलं वस्तूंची नावे सांगत होती. 'मग त्याची बचत कशी करतो', असा प्रश्न वैशाली विचारायची. हवी तशी उत्तरं मिळत नव्हती. मग 'बचत का करतो', असं विचारलं. 'गरज नसताना पैसे खर्च केले तर काय होतं?' मुलं म्हणाली 'नुकसान'. नुकसान होऊ नये म्हणून कोणकोणत्या गोष्टींची बचत करावी लागते ? 'नुकसान पैशाचं थोडंच होते! समाजाचं होते, पृथ्वीचं होते.' वैशालीनं मुलांना थोडीशी मदत केली. मग मुलं बोलू लागली, 'पृथ्वी आम्हाला पाणी देते. पाण्याची बचत करायला पाहिजे.' मग पाण्याची बचत कशी करतो विचारलं. 'जेवढे लागतं तेवढेच पाणी घ्यायचं. फेकायचं, द्यायचं नाही.' 'तुम्हाला उन्हाळ्यात पाण्याची अडचण होते की नाही? सर्व बोअरवेल सुरू राहते का? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं ?'
मुलांचे उत्तर 'पाण्याची बचत. अन्नाची बचत. जादा घ्यायचं नाही, फेकायचं नाही. जेवताना सांडायचं नाही'. वैशाली म्हणाली, 'माणसं उपाशी राहतात. आपल्या गावात लोक उपाशी राहत नाहीत. त्यामुळं ही गोष्ट आपल्या गावात नाही. पण दुसऱ्या गावात उपाशी राहतात. काही लोकांना गरिबीमुळे एक वेळही जेवण मिळत नाही. आपण नाश केलं, वाया घालवलं, फेकलं म्हणजे आपल्याला जास्त होतं आणि कोणालातरी भेटत नाही.' वैशालीबरोबर मुलंही बोलत होती. मुलांनी सांगितलं, 'ज्यांना भेटत नाही, जे भुकेले राहतात त्यांना द्यायचं. बचत झाली, की आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. दुसऱ्यांना देण्यासाठी अगोदर आपल्याजवळ पाहिजे.' एक मुलगा म्हणाला, 'दुसऱ्याला देण्याची हिंमतही पाहिजे.' एक मुलगी म्हणाली, 'झाडांची बचत करायची. त्यांना मरू द्यायचं नाही'. त्या वेळी वैशालीने स्पष्ट केलं, 'त्याला आपण म्हणतो वृक्षांचे संगोपन'. मग संवर्धनाविषयी सांगितलं. कशाकशाची बचत करता येऊ शकते याविषयी मुलं भरभरून बोलत होती. मुलांचं योग्य ते स्वीकारून, अयोग्य असल्यास आवश्यक तेथे वैशाली दुरुस्ती करत होती. शेवटी बचत फक्त पैशाची नाही, तर इतर गोष्टींचीही करता येते, असं मुलांच्या तोंडूनच तिने काढून घेतलं.
सर्वसामान्य शिक्षकांनी बचत म्हणजे काय किंवा बचत या शब्दाला पर्यायी शब्द सांगितले असते. त्यांना 'कठीण शब्दाचा अर्थ' सांगितल्याचं समाधान मिळालं असतं. वैशालीने 'बचत' या शब्दाबरोबर मुलांची 'सफर' घडवून आणली होती. बचत या विषयाकडे किती विविध अंगांनी बघितलं वैशालीनं! इथं सांगणं, माहिती देणं नव्हतं, तर मुलांना विचार करायला लावणं, मुलांनी माहिती देणं, पूर्वीचा अनुभव आणि माहिती यांची एकमेकांशी सांगड घालणं, माहितीचा उपयोग करणं, पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञाननिर्मिती करणं, पूर्वीच्या धारणांची मोडतोड करून नवीन धारणा तयार करणं असं बरंच घडलं होतं. खऱ्या अर्थानं इथं ज्ञानाची निर्मिती होत होती. हे सगळं करत असताना सहज मूल्यशिक्षणही होत होतं. या सर्वांचा मेळ बसवणं ही तर खरी शिक्षकांची कसोटी असते.
नंतर आम्ही गावातून मुलांसोबत फेरफटका मारला. मुलं आमची 'गाइड' झाली होती. झोपडीसमोर बांबूच्या दोन काठ्या पडल्या होत्या. "हे काय आहे?" म्हणून मी विचारलं. मुलं म्हणाली, "बांबूचा घोडा". घोडा म्हणजे बांबूच्या पायाच्या अंगठ्याएवढ्या जाड दोन काठ्या. या काठ्यांना खालच्या बाजूच्या छोट्या काटक्या. या काटक्यांना बांबूचा तुकडा जोडला होता. ही झाली पाय ठेवण्यासाठी जागा. काठ्या हातात धरून या पायठ्यावर पाय ठेवायचे आणि चालायचं. प्रत्येक मुलाकडे असा घोडा आहे. ज्याच्या त्याच्या उंचीनुसार कमी-जास्त उंचीचा. इथल्या रूढीनुसार हा घोडा मुली चालवत नाहीत. ही माहिती मुलांकडून मिळाली. श्रावणात, विशेषतः पोळ्याला तसेच विविध कार्यक्रमांच्या वेळी धोती, अंगरखा असा पारंपरिक पोशाख आणि पायात घुंगरू बांधून या काठीवरून मोठी माणसं चालतात. मुलं त्यांचं अनुकरण करतात.
मुलांनी आम्हाला कोंबडीचं घर आणि बकरीच्या घराची माहिती दिली, 'आमचं कसं घर असतं तसं त्यांचंही राहू शकतं ना!' तिथं टोपणं पडली होती. त्याविषयी मुलं म्हणाली, "कोंबडीला औषीध पीवायचं. कोंबडी मरत राहते ना, तवा औषध डालायचं आणि त्याच्या तोंडामधी टाकायचं. मग मरत नाय." मुलं त्यांच्या भाषेत मोकळेपणाने माझ्याशी संवाद साधत होती. त्यांना चुकण्याची आणि परक्यांची भीती नव्हती.
आम्ही वैशाली राहत होती ते झोपडीवजा घर बघितलं. आम्ही परत शाळेत आलो. मुलं आपापला घोडा घेऊन शाळेत आली होती. पायठ्यावर पाय ठेवून घोड्यावर उभं राहत होती. छोटीशी मुलं आता उंचच्या उंच दिसत होती. तोल सावरत लीलया चालत होती. पावलाबरोबर काठ्या चालत होत्या. लांबच लांब ढंगा पडत होत्या. कोणी दोन्ही काठ्यांची वरची टोकं एका हातात पकडून दुसऱ्या हाताची चार बोटं कानाच्या वर डोक्याला लावून सॅल्यूट ठोकत होती. मुलं-मुली दोरीवरच्या उड्या मारत होती. कोणी विविध योगासनं करून दाखवत होतं. काही मुली दोन्ही हातांवर तोल सावरत डोंबाऱ्यांच्या मुलींसारख्या कोलांटउड्या मारून दाखवत होत्या. एक दोन मुलं-मुली झोपाळ्याच्या लोखंडी बारला गुडघ्यात पाय अडकवून, पायाचे पंजे अडकवून खाली डोकं करून, हात मोकळे सोडून उलटं लोंबकळत होती. आमच्या काळजाचा ठोका चुकत होता; पण त्यांना कसलीच भीती नव्हती. मूल वरून पडलं, त्याचा हातपाय मोडला, काही बरंवाईट झालं, तर मला निलंबित व्हावं लागेल ही भीतीही वैशालीच्या मनात नव्हती. माझ्या मनात विचार आला, धाडसी माणसं शांत असतात आणि भित्री माणसं अशांतता निर्माण करतात.
नंतर मुलींनी फेर धरून लोकनृत्य दाखवलं. त्यांना कोणी मार्गदर्शन करत नव्हतं. स्वतःच एकमेकांशी चर्चा करून मुली निर्णय घेत होत्या. मोठ्या माणसांचं बघितलेलं, ऐकलेलं माणसांच्या बरोबर गायलेलं, नाचलेलं मुली अनुकरणातून शिकल्या होत्या. सगळं दाखवताना मुलांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आमच्याशी भरभरून बोलणं, जवळीक साधणं, बिलगणं त्यांना गोड वाटत होतं. आम्हीही त्यातल्या गोडव्याची अनुभूती घेत होतो. मुलांना अशा बाहेरून येणाऱ्या माणसांची सवय आहे. ती आपल्या ताईशी जसं वागतात तसंच शाळेत आलेल्या पाहुण्यांशीही आपुलकीनं वागतात. जीव लावतात. 'जीव लावणे' या वाक्प्रचाराचा जिवंत पुरावा आमच्याभोवती पिंगा घालत होता. संवेदनशील नागरिक घडण्याची सुरुवात कशी होऊ शकते याचं उदाहरण आमच्यासमोर होतं. आमचा पाय शाळेतून निघत नव्हता. आम्ही गाडीत बसेपर्यंत मुलं आमच्याभोवती घुटमळत होती. गाडीत बसताना आम्हाला 'पुन्हा या' म्हणून आग्रह करत होती. हात हलवून निरोप देत होती.
मला वैशालीचं पुस्तक सारखं आठवत होतं. वैशाली म्हणते, 'शिक्षण घेऊन मुले प्रयोग करतीलच याची शाश्वती नाही, मात्र प्रयोग करून मुले शिकतातच हे शाश्वत सत्य आहे'. 'कमाल आहे. शाळेत लहानपणी मुलांना प्रयोग करू द्यायचे नाहीत. प्रयोगासाठी स्वातंत्र्य द्यायचे नाही आणि नंतर मुले मोठी झाल्यावर प्रयोग करत नाहीत म्हणून ओरड करायची'. 'शिक्षण दिलं जात नाही तर ते घेतलं जातं. शिकणे ही माणसाची नैसर्गिक मूलभूत गरज आहे म्हणून प्रत्येक मनुष्य शिक्षण घेत असतो. आपली चूक इथेच झाली, की आपण शिक्षण देण्याचा विचार केला व प्रयत्नही केला. यातूनच पुढे शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या. शिकणे म्हणजे पाठ करणे नव्हे. शिकणे म्हणजे त्याचे उपयोजन करणे होय. माणसे शिकत नाहीत म्हणून पाठ करत आहेत.
याला पर्याय म्हणून वैशाली 'माझे प्रगतिपुस्तक' हा उपाय आपल्याला देते. तिला वाटतं, हा उपाय शांततेच्या उंबरठ्यावर नेऊन उभा करू शकतो. आपल्याला वैश्विक शांतता हवी आहे. म्हणूनच 'माझे प्रगतिपुस्तक : शोध शांतीचा' हे वैशालीचे पुस्तक शिक्षकांनी, पालकांनी आणि शिक्षण-अभ्यासकांनी वाचले पाहिजे. अधिकाऱ्यांनी तिच्या कामाची पद्धत बघावी, समजून घ्यावी. इतर शिक्षकांमध्ये रुजवावी. इतर शाळांमध्ये थोडंफार करून खात्री करावी. वैशाली काय म्हणते हे समजून घेतलं तर शिक्षणखात्याला सोन्याचे दिवस बघायला मिळतील.
मानवाला खरोखरच शांती हवी असेल, तर त्याचा मार्ग ज्या शिक्षणातून जातो, ते शिक्षण कसं असलं पाहिजे, याचं मूलगामी विवेचन 'शिक्षण आणि शांती' या जेन साही यांच्या पुस्तकात आहे. वैशाली जेन साही यांच्या जातकुळीतील आहे. तिला दैनंदिनी लिहिण्याची सवय आहे. तिच्या दैनंदिनीमधील काही नोंदी तिच्या पुस्तकात बघायला मिळतात. 'टीचर' या पुस्तकाची लेखिका सिल्व्हिया अॅश्टन वॉर्नर हिचे 'टीचर' हे पुस्तक वाचत असतानाची नोंद तिने तिच्या दैनंदिनीत केली आहे. ती म्हणते, 'तिच्या आणि माझ्या काही समान भावना बघून मला वाचताना भडभडून येते.' सिल्व्हिया आणि वैशालीच्या शिकवण्याच्या मुलांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनांमध्ये खूपच साम्य आहे.
वैशालीची शाळा 'तोतोचान' च्या शाळेसारखी आहे. मुलांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. शिकण्याचं स्वातंत्र्य आहे. अनुभव घेण्याच्या खूप संधी आहेत. तिला प्रत्येक मूल वेगळं दिसतं आणि त्यानुसार ती मुलांची कधी आई होते, कधी आजी होते, कधी बहीण होते तर कधी मित्र होते. गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, लीलाताई पाटील यांचा वारसा घेऊन वैशाली जगते आहे, वारसा घेऊन पुढे चालते आहे.
वैशाली गेडाम, चंद्रपूर
Mob.8408907701
वैशालीची शाळा ज्या गावात आहे त्या गावात गोंड संस्कृती आहे. त्यांच्या कायद्यानुसार मुलींना, स्त्रियांना वाद्यांना हात लावण्याची, वाद्याजवळ जाण्याचीही परवानगी नाही. वैशाली सुरुवातीला या शाळेत गेली तेव्हा एक बेस ड्रम शाळेत होता. हा बेस ड्रम वाजविण्यासाठी वैशालीने मुलींना म्हटले तर मुली पुढे येईनात. मुलगे म्हणाले, "बायाइले हात लावाले जमत नाई ताई." मुलींनीही त्यांची री ओढली.
या गावात उत्सव झाला तेव्हा त्यांची वाद्ये नीट समजून घेण्यासाठी वाद्याजवळ गेली त्या वेळी तिला दूरच थांबवण्यात आले. बायांना, अगदी लहान मुलींनासुद्धा त्यांच्या कायद्यानुसार वाद्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती. वैशालीला बरेच दिवस वाटत होतं की, आपल्या शाळेत मुलांचं बँड पथक असावं. आता वैशालीने शाळेचं बँड पथक तयार केलंय. या पथकामध्ये मुले आणि सर्व मुलींचा सहभाग आहे. मुलीही वाद्ये वाजवतात. नुकतंच बाल क्रीडा संमेलनामध्ये या पथकाने उत्तम संचालन केलं. ते पाहण्यासाठी गावातील लोक आले होते. त्यांनी मुलींचं कौतुक केलं.
गावाच्या मालकीची सुरपेटी आहे. ती मुली आणि वैशाली वाजवत असतात. तिच्या दुरुस्तीचा खर्च वैशालीच करते. बँड पथकासाठी लागणाऱ्या बेस ड्रम, स्नेअर ड्रम्स, बिगुल्स, बासऱ्या झांज, मुऱ्याकस, डफली या वाद्यखरेदीचा सर्व खर्च वैशालीने केला आहे. एक वेळ खर्च करणं सोपं, परंतु समाजाचा कायदा, रूढी बदलणं कठीण गोष्ट आहे. एखादी चाल बदलणं किती अवघड असतं हे इतिहासाकडे वळून बघितल्यावर आपल्या ध्यानात येईल. बांबूचा घोडा वापरायची परवानगी मुलींना नसते. आता मुलीही या घोड्यावरून दिमाखात शाळेतून गावात चालत जातात. लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांना आपलंसं करत वैशालीने हा बदल घडवलाय. वैशालीने ही किमया केली आहे.
मी वैशालीला म्हणालो, "खूप अवघड आणि मोठा बदल केलास". ती म्हणाली, "बदल करणे हेच शिक्षकाचे काम आहे. बदल करत नसतील ते शिक्षक कसले ! शिक्षकच गावात बदल घडवून आणू शकतात".
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या