डिजिटल अर्काईव्ह

विसावे शतक एका कुटुंबाच्या लोलकातून !

सातारा येथील अच्युत व तारा दाभोलकर यांची दहा मुले-मुली वेगवेळ्या क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने कार्यरत राहिली. आणि त्यांची पुढची पिढीही विविध क्षेत्रांत कर्तबगार ठरली आहे. अशा या दाभोलकर कुटुंबातील अनेकांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने स्वतःविषयी व कुटुंबाविषयी लहान-मोठे लेख लिहिले आहेत, इतरांनीही त्यांच्यावर लिहिले आहे. त्यातील निवडक 25 लेखांचे पुस्तक '155 सदाशिव पेठ, सातारा' या नावाने साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्याचे प्रकाशन 20 मे 2026 रोजी, सातारा येथे होणार आहे. या पुस्तकाचे संपादन भानू काळे व डॉ. अनिल जोशी यांनी केले आहे. या पुस्तकाच्या प्रारंभी अनिल जोशी यांनी लिहिलेला लेख, या कुटुंबाविषयीचे कुतूहल काही अंशी शमवणारा आणि बऱ्याच प्रमाणात वाढवणारा आहे. तो लेख सुरुवातीचा काही भाग कमी करून इथे प्रसिद्ध करीत आहोत.

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात दाभोली नावाचे एक छोटेसे गाव आहे. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २०००च्या आसपास आहे. ह्यावरून विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या गावाची एकंदरीत परिस्थिती काय असावी त्याचा अंदाज आपण सहजच करू शकतो. या गावात अच्युत लक्ष्मण दाभोलकर व त्यांचे तीन भाऊ राहत होते. त्यातल्या एकाने परंपरागत शेती पुढे करत राहण्याचा निर्णय घेतला तर इतर तिघे व्यवसाय व संधीच्या शोधार्थ स्थलांतरित झाले. अच्युतरावांनी नोकरी करत वकिलीची परीक्षा दिली. वेंगुर्ला येथे न्यायालय नसल्याने त्यांनी सातारा गाठले. दाभोलीचे दाभोलीकर किंवा दाभोलकर ही स्वाभाविक व सहज समजण्याजोगी व्युत्पत्ती नाकारत त्यांनी 'दाभोळकर' आडनाव स्वीकारले. यामागे एक व्यावहारिक कारण होते. 'दाभोळकर' हे नाव ऐकायला ब्राह्मणी वाटते आणि त्यावेळी चांगला वकील हा ब्राह्मण असतो, असे खरे-खोटे समीकरण होते. निदान अच्युतरावांना तसे वाटले. अच्युतराव कमालीचे दत्तभक्त होते. त्यांचा विवाह झाला कोल्हापुरातील तेंडोलकर कुटुंबातील कमल तेंडोलकर यांच्याशी. लग्नानंतर कमल यांचे नाव तारा असे ठेवण्यात आले. दाभोलकर परिवार त्यांना 'माई' म्हणून ओळखतो.

माई कोल्हापूरच्या असल्याने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप पगडा होता. त्याकाळी चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत त्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आल्या होत्या. त्या काळात विवाह लवकर होत असल्याने व एकंदरीतच मुलींना जास्त शिकवण्याची प्रथा नसल्याने बहुदा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नसावे. त्या काळात त्या गळ्यात मंगळसूत्र घालत नव्हत्या आणि कपाळाला कुंकूही नसायचे. परंतु अच्युतराव ज्या-ज्या वेळी श्री गुरुचरित्राचे पारायण करायचे त्यावेळी त्या पारायणाला लागणारी सर्व तयारी त्या चोखपणे करून द्यायच्या. त्या काळात, म्हणजे १९३६च्या सुमारास, साताऱ्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ऐक्य दैनिकात त्यांनी 'सहशिक्षण' या विषयावर एक लेख लिहिला होता. हा त्यांचा लेख त्या काळात चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला होता. माईंच्या स्त्रीशिक्षणविषयक जाणिवांचा व उदारमतवादाचा प्रत्यय देणारा असाच हा लेख होता.

विरोधी मताचा आदर करायचा आणि प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे वागायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे हे जाणून त्याप्रमाणे आपले आचरण ठेवायचे ही या कुटुंबाची एक व्यवच्छेदक ओळख. त्याचा उगम माई आणि आबा यांच्या या सहजीवनात होता. या दोघांना एकंदरीत सात मुले व तीन मुली. शिवाय अच्युतरावांचा भाऊ भास्कर याचे अकाली निधन झाल्यामुळे पहिल्यांदा त्यांची लीलावती ही मुलगी व नंतर सुधा ही दुसरी मुलगी याही या दोघांच्या छत्रछायेखाली १५५ सदाशिव पेठ या त्यांच्या साताऱ्यातील घरात वाढल्या. ही सर्व बारा भावंडे सख्ख्या भावंडांसारखीच वाढली आणि आजही त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये हेच सलोख्याचे संबंध आढळून येतात.

देवदत्त, कुंदा (अंबू), श्रीपाद (मुकुंद), चारुदत्त, वेणू, दीनानाथ, नरसिंह, दत्तप्रसाद, अमरजा व नरेंद्र ही या भावंडांची क्रमशः नावे. मुलांची नावे पाहिली की अच्युतरावांच्या दत्तभक्तीची एक प्रकारे प्रचिती येते. नरेंद्र हे नाव ज्येष्ठ पुत्र देवदत्त यांच्या आग्रहामुळे ठेवण्यात आले. सर्वात ज्येष्ठ पुत्र देवदत्त व सर्वात कनिष्ठ पुत्र नरेंद्र यांच्यात २६ वर्षांचे अंतर होते. यांपैकी सात मुलांचा जन्म १५५ सदाशिव या घरातच झाला. सर्व बाळंतपणे नैसर्गिकरीत्या झाली. संततीनियमन साधनांची वानवा आणि स्त्रीआरोग्याची अनास्था यांसारख्या गोष्टी काही प्रमाणात यात अधोरेखित होतात. या घरात वाढणाऱ्या या सर्व मुलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. अभ्यास करा, करू नका, शिका, शिकू नका, विवाह करा, करू नका, कोणाशीही करा. इत्यादी अनेक बाबींचा या स्वातंत्र्यात समावेश होता. परंतु स्वातंत्र्याबरोबरच एक जबाबदारी येते आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचे भान या सर्व मुलांना होते.

या सर्वांनी आपापली क्षेत्रे अत्यंत काळजीपूर्वक निवडली. या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये प्रचलित धारणा तपासून, प्रसंगी त्या स्पष्टपणे नाकारून आपल्याला जे काय वाटते ते निरीक्षण, संशोधन करून सिद्ध केले व मांडले.

१९५५ साली अच्युतरावांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी अचानक निधन झाले. काही काळ त्यामुळे या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु माईंनी खंबीरपणे स्थिती सांभाळली आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव देवदत्त यांनी जणू काही आपल्या वडिलांची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि सर्व भावंडांना शिकवले व वाढवले. आपल्या कुटुंबावर अचानक आलेले आर्थिक अरिष्ट जाणून कुंदा उर्फ अंबूताई यांनी दहावी परीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्याचे नाकारले. वास्तविक पाहता त्या शाळेत एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होत्या. बोर्डाच्या परीक्षेत त्यांच्या शाळेला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परीक्षेच्या प्रवेश अर्जासोबत भरण्याची फी वाचवणे व त्याचा उपयोग कौटुंबिक खर्चासाठी व्हावा हा या नकारामागचा उदात्त हेतू. अंबूताईंनी पुढे जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले व त्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य बनल्या. त्या जन्मभर अविवाहित राहिल्या. त्या व त्यांची आई माई यांच्या वयात फक्त १९ वर्षांचा फरक. लवकर व लहान वयात होणारे लग्न, त्यानंतर होणारी संतती व त्यामुळे एकंदरीतच कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वावर पडणारी बंधने त्यांनी माईंच्या रूपात पाहिली होती. व्यक्तिगत पातळीवर अविवाहित राहणाऱ्या अंबूताईंनी आपल्या पाठच्या दोन बहिणींना मात्र लग्न करून संसार करा, समाजात अविवाहित राहणे सोपे नाही असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला होता.

आपल्या आईबद्दल - माईंबद्दल लिहिताना अंबूताई म्हणतात, 'आमची माई जर त्या काळाची प्रातिनिधिक म्हणून समजले तर त्या काळातच लिहिली गेलेली 'तेथे कर माझे जुळती' ही कविता जास्त प्रकर्षाने पटते. त्या कवितेत कवीने म्हटले आहे -

'ज्या अबला 'निज भावबलाने
करिती सदने हरिहर भुवने
देवपतीना वाहुनि सुमने 
पाजुनी केशव वाढविती 
तेथे कर माझे जुळती'

(मूळ कवितेत असलेल्या 'प्रबला' या शब्दाच्या ठिकाणी 'अबला' हा शब्द घालून त्याला केलेले अवतरण हे अंबूताईंचे आहे. त्यामुळे या कवितेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे.) अशा त-हेने ज्या स्त्रियांनी संसाराला जीवन वाहून घेतले व राष्ट्राला उत्कृष्ट मुले तयार करून देण्यातच स्वतःच्या जीवनाची सार्थकता मानली त्या स्त्रियांची माहिती व महती आपण आज मिळवली पाहिजे व त्यांच्या समाधानी व कर्तृत्वपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली कोणती होती, दहा-बारा किंवा अधिक मुलांना चांगली मूल्ये किंवा चांगली आरोग्यसंपदा त्या कशा त-हेने देऊ शकत होत्या याचा आपण शोध घेतला पाहिजे. अशा स्त्रियांच्या गुणदर्शनांतूनच आजची
 स्त्री आपली प्रतिमा उंचावू शकणार आहे. प्राप्त परिस्थितीशी हसतमुखाने तडजोड करत, आपल्याला मिळालेल्या संधींचा व स्वातंत्र्याचा कुटुंबाला व राष्ट्राला त्या फायदा करून देणार आहेत व आपल्या या जबाबदाऱ्या पार पाडताना येणाऱ्या अडचणी पुढच्या पिढीला येऊ नयेत या दृष्टीने त्या योग्य ते सामाजिक बदल घडवून आणणार आहेत. यातूनच भारतीय संस्कृतीची व राष्ट्राची मान उंचावणार आहे व यातूनच खरी स्त्रीमुक्ती होणार आहे.

अंबूताईंनी हा जो अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता त्याची सविस्तर चिकित्सा दत्तप्रसाद दाभोळकर यांनी प्रस्तुत पुस्तकात त्यांच्यावर लिहिलेल्या लेखात केली आहे.

या कुटुंबातील सर्व स्त्रिया, स्वतः माई आणि या कुटुंबातील पाच बहिणी, सुना या स्वयंप्रकाशित आणि कर्तृत्ववान आहेत. त्या अर्थाने कदाचित त्या काळापेक्षा थोड्या पुढेच आहेत. स्वतः निवडलेल्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत असताना त्यांचे लक्ष कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्याकडेही होते. असे झाल्याने, म्हणजे कौटुंबिक जबाबदारी पडल्याने, त्यांच्या कर्तृत्वावर मर्यादा आल्या का हा एक चिंतनाचा विषय होऊ शकतो. हा खरे तर तत्कालीन समाजरचनेचा दोष म्हणायला हवा. ह्या कुटुंबातील स्त्रियांनी त्यावर मात करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.

माईंनी आपल्या मुलांचे वर्णन करताना 'एक दुसऱ्यासारखे नाही आणि एकही माणसासारखे नाही' असा शब्दप्रयोग केला होता. यातला थोडासा विनोदाचा भाग सोडला आणि या सर्व भावंडांच्या कारकिर्दीचे निरीक्षण केले तर माईंचे म्हणणे किती यथार्थ होते ते समजू शकेल. या ठिकाणी या सर्व भावांच्या कारकिर्दीचा अल्पसा आढावा घेणे योग्य ठरेल.

थोरले देवदत्त त्या काळात मॅट्रिकच्या परिक्षेत मुंबई इलाख्यात पहिले आले होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशी त्यांची कारकीर्द फुलत गेली. सामाजिक जीवनातील शिक्षणाचे महत्त्व जाणून आचार्य विनोबा भावे यांनी 'आचार्य कुल' ही संकल्पना मांडली. त्यांनी शिक्षकांना क्रांतीचे दूत मानले. 'देशभरातील शिक्षणप्रेमी प्राध्यापकांचे व शिक्षकांचे कुल' असे त्याचे स्वरूप होते. या आचार्य कुलाला वैचारिक पाया देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये देवदत्त यांचाही समावेश होतो. 'समन्वय' हा देवदत्तांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. कोणताही व कितीही गहन प्रश्न चर्चेने व विचारांचे सकारात्मक आदानप्रदान केल्याने सुटतो असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या पुण्यातील बंगल्यालाही त्यांनी 'समन्वय' असेच नाव दिले होते. वडिलांच्या काहीशा अकाली झालेल्या मृत्यूनंतर या कुटुंबाची सर्व जबाबदारी देवदत्त यांनी घेतली व पुरेपूर निभवली.

यानंतर क्रमांक येतो ते गणितज्ञ असलेल्या परंतु प्रयोग परिवाराच्या माध्यमातून शेतीविषयक विविध प्रयोग करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती व प्रसिद्धी मिळवलेल्या श्रीपाद दाभोलकर यांचा. Real education must make us vitally savage, but culturally civilised (शिक्षणाने आपली जीवनशक्ती उत्कट बनवली पाहिजे परंतु ती मानवतेच्या, संस्कृतीच्या कोंदणात नांदली पाहिजे) हे रवींद्रनाथ टागोर यांचे मत श्रीपाद यांना मनापासून पटायचे. 'विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन् अनातुरम' हा केंद्रस्थानी असलेला विचार आणि Networking of self-experimenting ventures for nature-friendly and human-friendly prosperity' ("निसर्गपूरक आणि मानवाभिमुख समृद्धीकरिता प्रयोगशील उपक्रमांचे जाळे") हा या परिवाराचा कृती कार्यक्रम. तासगावची द्राक्षक्रांती हे याचे एक फलित. श्रीपाद, ज्यांना मुकुंद असेही ओळखले जायचे, त्यांनी इतक्या क्षेत्रांत प्रयोग केले की त्यांच्या या प्रयोगशीलतेचे प्रतीक म्हणून त्यांना त्यांचे जवळचे मित्र 'वेंचरानंद' म्हणून ओळखायचे. (venture म्हणजे प्रयोग या अर्थाने) ही पदवी त्यांना बाबा आमटे यांनी दिली होती असा उल्लेख काही ठिकाणी आहे.

या प्रयोग परिवाराचे, मुकुंद यांच्या निधनानंतर इतकी वर्षे झाल्यावरदेखील, आजही नाशकात व परिसरात मोठमोठे मेळावे होतात. या मेळाव्यात होणारी भाषणे, चर्चा, संवाद ऐकण्यासाठी हजारो शेतकरी पैसे मोजून उपस्थित राहतात. प्रयोग परिवाराच्या या मेळाव्यातून शेतकऱ्यांना जो संदेश दिला जातो तो खालील तत्त्वावर अवलंबून असतो. सूर्यप्रकाश, विज्ञान, माहितीचे आदानप्रदान आणि निर्णयस्वातंत्र्य या चतुःसूत्रीचा वापर करून आपले प्रश्न आपण सोडवायचे. पूर्वी पोस्टकार्डाच्या स्वरूपात हे माहितीचे आदान-प्रदान व्हायचे. आपल्याला आलेल्या अशा हजारो पोस्टकार्डापैकी प्रत्येकाची दखल श्री. अ. घ्यायचे आणि त्याला उत्तरही द्यायचे. आता पोस्टकार्डाची जागा आधुनिक संवादतंत्रांनी घेतली आहे इतकेच.

विज्ञाननिष्ठा, देशप्रेम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून देशासमोरील विविध प्रश्न सोडवण्याची आस ही या सर्व कुटुंबाची एक विचारसरणी होती. भारतीय शेतीपुढील आव्हाने, ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि त्यावरचे उपाय याचा विचार करण्यात मुकुंद आणि त्यांच्या नंतरचे बंधू चारुदत्त हे अग्रस्थानी होते. शेतीमालाला बाजारभावावर आधारित भाव मिळणे हा भारतीय शेती क्षेत्रासमोरील बरेचसे प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे हे शरद जोशींच्या आधी पंचवीस वर्षे चारुदत्त यांनी सिद्धांत स्वरूपात लिहिले होते. त्यांचे हे ऋण शरद जोशी यांनीदेखील अनेक वेळा जाहीरपणे मान्य केले होते. कोकणातील दुधाची टंचाई दूर करून तेथे धवलक्रांती निर्माण करण्यात चारुदत्त यांचा खूप मोठा वाटा आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील दारिद्र्यनिर्मूलनाचा रस्ता दाखवणारे त्यांचे या विषयावरचे 'महाराष्ट्रातील दुष्काळ व त्यावरील उपाय योजना' हे पुस्तक आजही अभ्यासण्यासारखे आहे. भारतातील दुष्काळ हा एक आर्थिक आजार आहे, आर्थिक दुखणे आहे अशी त्यांची मांडणी होती. त्यांना इतिहासाची आवड होती. राणी ताराबाई यांच्या जीवनावर त्यांनी एक कादंबरी लिहिली होती परंतु ती प्रसिद्ध झाली नाही.

प्रत्येक कुटुंबात पायाचा दगड बनून एकंदरीत कुटुंबाचा सर्वांगीण व निःस्वार्थी विचार करत 'कमी तिथे आम्ही' अशा पद्धतीने काम करणारी मंडळी असतात. दिनानाथ हे या प्रकारात बसतात. त्यांची कमालीची परमतसहिष्णुता दर्शविणारे 'whatever suits you, suits me.' हे त्यांचे परवलीचे वाक्य होते. सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. संघबंदी विरोधात केलेल्या सत्याग्रहात त्यांना कारावासही झाला होता. पुढे त्यांनी संघ सोडला. त्याच्या कारणांबाबत ते फारसे कुणाशी बोललेले किंवा त्याबद्दल त्यांनी काही लिहिलेले आढळत नाही. त्यांनी संघात परत यावे म्हणून त्याकाळच्या अनेक मातब्बरांनी प्रयत्न केला. परंतु दिनानाथ परतले नाहीत. त्यामुळे संघ आणि दिनानाथ यांचे संबंध हा आजपर्यंत एक गूढ विषय आहे. यामुळे त्यांचीही शैक्षणिक कारकीर्द विस्कळीत होऊन इंटर सायन्सला हवा तो क्लास मिळू शकला नाही. परंतु युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेत त्याकाळी आयआयटी पदवीला समकक्ष मानल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश मिळवला. टेक्सटाईल इंजीनियरिंग या विषयात पदवी मिळविली. त्या काळात या विद्याशाखेला एक वेगळे महत्त्व आणि खूप मागणी होती. परंतु स्वभाव थोडासा मनस्वी असल्याने त्यांचे नोकरीच्या ठिकाणी जमायचे नाही आणि जेथे कापड व्यवसाय आहे अशा भारतातील अनेक शहरांमध्ये त्यांनी नोकऱ्या बदलल्या. सेवानिवृत्तीनंतर ते साताऱ्यात परत आले आणि आपल्या मोठ्या कुटुंबाचे संचलन करण्यात त्यांनी मदत केली. आपल्या आईच्या आजारपणात त्यांनी आईची मनापासून सेवा केली. माईंना चमच्याने अन्न भरवणे आणि रोज तास दोन तास त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर वाचून दाखवणे हे काम न कंटाळता व अत्यंत प्रेमादराने केले. वयाच्या ८५व्या वर्षी पुण्यात राहून त्यांनी फिल्म अॅप्रिसिएशनचा एक कोर्सही केला होता.

त्यानंतर ज्यांचा क्रमांक येतो त्या वेणूताई, लग्नानंतर वेणू वसंत पळशीकर. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या त्या पहिल्या महिला प्राचार्य. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सहज मिळू शकणारी नोकरी नाकारत त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काम करणे पसंत केले. गांधी, विनोबा व खादी यांना त्यांनी आयुष्यभर सोडले नाही.

यानंतरचे डॉक्टर नरसिंह दाभोळकर हे सायन मेडिकल कॉलेजचे डीन व फिजिओलॉजी (शरीरक्रियाशास्त्र) या विषयाचे अध्यापक होते. त्यांचा पिंड अध्यात्मिक, चिन्मयानंदवादी होता. ते प्रचंड विद्यार्थीप्रिय असल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या लेक्चर हॉलच्या बाहेर 'डॉक्टर नरसिंह दाभोळकर हॉल' असा फलक संस्थेकडून लावून घेतला आहे. आणीबाणीला पाठिंबा देणारे 'अनुशासन गीता' म्हणून एक पुस्तक त्यांनी लिहिले होते.

याच्यानंतरचा क्रमांक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा. मुंबई विद्यापीठात ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात सर्वप्रथम येऊन सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली येथील श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या ख्यातनाम संख्येच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचला. नवस्वतंत्र भारताला हवे असलेले वैज्ञानिक संशोधन भारतातच होणे गरजेचे आहे या प्रेरणेने झालेला हा प्रवास. या संस्थेतील सर्व संशोधन उपयोजित स्वरूपाचे, म्हणजे ज्याचा सर्वसामान्य नागरिक किंवा भारतीय कंपन्या यांना व्यवहारात फायदा होईल अशा स्वरूपाचे आहे हे याचे वैशिष्ट्य. अशा प्रकारच्या संशोधनासाठी लागणारी नजर व सर्वगामी प्रतिभा यांचा वापर करीत त्यांनी मराठीत खऱ्या अर्थाने शोधपत्रकारिता सुरू केली. नर्मदा प्रकल्प, त्याला होणारा विरोध, त्या मागची खरी-खोटी कारणे आणि वस्तुस्थिती यांचा नेमका अर्थ सांगणारे त्यांचे पुस्तक 'समग्र माते नर्मदे' हे आजही समयोचित आहे. किंबहुना निसर्ग आणि विकास यांच्यात काही द्वंद्व आहे का; असल्यास या द्वंद्वात काही सुवर्णमध्य निघू शकतो का याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. भारतीय विज्ञान संशोधनात संशोधन कमी व देखावा जास्त अशी परिस्थिती असल्याचे परखडपणे सांगत वैज्ञानिकांनी आपल्या संशोधन संस्थांवर व पगारावर होणारा खर्च हा आपल्या संशोधनाची व्यावसायिक विक्री करून मिळवला पाहिजे असे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आहे. भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेचा सदस्य म्हणून त्यांनी त्या खंडात जाऊन केलेले संशोधन हे त्यांचे अजून एक असामान्य काम. त्यांचे लेखन आणि जीवन यांचा समग्र आढावा घेणारे 'रंग याचा वेगळा' हे भानू काळे यांनी संपादित केलेले पुस्तक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा समग्रपणे आढावा घेते.

अमरजा, लग्नानंतर अमरजा चंद्रशेखर नेरुरकर या दाभोळकर कुटुंबीयातील सर्वात धाकट्या कन्या. यांचा क्रमांक दत्तप्रसाद आणि नरेंद्र यांच्यामध्ये लागतो. दत्तप्रसादांनी यांचा 'आम्हा दोघाही भावांना म्हणजे मला व नरेंद्रला स्फूर्ती देणारी आमची बहीण' असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. या अर्थशास्त्रातल्या पदवीधर व डॉक्टरेट होत्या. घरकाम करणाऱ्या महिलांना साप्ताहिकसुट्टी, ठरलेल्या कालावधीसाठी वार्षिक सुट्टी आणि आरोग्य खर्चात मदत मिळावी म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. राम मंदिरासाठी सह्याची मोहीम राबवणाऱ्या झुंडीला त्यांच्या तोंडावर "माझा राम माझ्या हृदयात वसतो आहे. त्याला तिथून काढून क्षणभरासाठीही कोणत्याही सोन्याच्या मखरात किंवा मंदिरात बसवण्याची माझी इच्छा नाही. साक्षात श्री प्रभू रामचंद्र माझ्यासमोर आले तर त्यांनाही मी हेच सांगेन" असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आपली पूर्णवेळ आणि जबाबदारीची नोकरी करीत असताना त्यांनी रमेश पानसे आणि अनुताई वाघ यांच्या ग्राममंगल चळवळीला यथाशक्ती मदत केली होती.

या भावंडांत सगळ्यात शेवटचा क्रमांक नरेंद्र यांचा. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात बिंबवणे व विवेकाचा आवाज जागृत ठेवत अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठीचे त्यांचे सर्व काम व आपल्या निष्ठांसाठी त्यांनी केलेले बलिदान सर्वविहित आहे. त्याशिवाय त्यांचे एक काम खूप महत्त्वाचे आहे. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा चालवणारे 'साप्ताहिक साधना' अडचणीत असताना त्याच्या संपादकत्वाची धुरा त्यांनी स्वीकारली. अनेक वर्षे ते साप्ताहिक यशस्वीपणे चालवले. त्या साप्ताहिकाला मजकुराच्या गुणवत्तेबरोबरच आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल अशा पद्धतीने सर्व रचना केली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विनोद शिरसाठ यांच्या रूपाने आपला एक समर्थ उत्तराधिकारी तयार केला.

या कुटुंबातील पुढची पिढी काय करते आणि तिला या सर्व गोष्टींबाबत काय वाटते? त्यांच्यात आणि आधीच्या पिढ्यांमध्ये काही फरक आहे का ? हे व अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला पडले तर ते स्वाभाविकच आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत पुढच्या पिढीने आधीच्या पिढीच्या हातावर हात मारलेला आहे. देशात व परदेशात अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये, मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये या पिढीचे प्रतिनिधी काम करीत आहेत. या पिढीलाही हवे ते करण्याचे स्वातंत्र्य अर्थातच मिळालेले आहे. जागतिकीकरण किंवा त्यासारख्या वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रभाव म्हणा किंवा विश्वबंधुत्वाकडे होणारी वाटचाल म्हणा किंवा निव्वळ व्यक्तिगत विकासाची आकांक्षा म्हणा, या पिढीतील अनेकजण परदेशात कार्यरत आहेत. आता यातही वेगवेगळे प्रवाह आहेत. यांपैकी काही विदेशात राहूनही मातृभूमीकडे व आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणारे आहेत, आपल्या आईचे सांगणे ऐकून विदेशातील मोठमोठी पदे नाकारत स्वदेशी परतणारे आहेत, तर मुद्दलातच विदेश नाकारणारेही आहेत.

अधूनमधून होणारे स्नेहसंमेलन हे या कुटुंबाचे अजून एक वैशिष्ट्य. त्याला ही मंडळी 'कॅम्प' असे संबोधतात. गेली काही वर्षे ही प्रथा थोडीशी खंडित झाल्याचे दिसते. या अशा स्नेहसंमेलनाच्यावेळी 'माई परिवार' या नावाने एक नियतकालिक प्रसिद्ध केले जाई. यामध्ये आठवणी, किस्से, सल्ले आणि छायाचित्रे यांची रेलचेल असे.

देवदत्त, दिनानाथ आणि लीलावती ही 'त्रिमूर्ती 'दाभोलकर घराण्याचे' लालन, पालन, पोषण करण्यात अग्रेसर होती. या त्रिमूर्तीच्या पश्चात आता ही जबाबदारी चित्राताई दाभोलकर या समर्थपणे पार पाडीत आहेत.

खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांनी व त्याला आनुषंगिक अशा सर्व गोष्टींनी आपल्या समाजजीवनावर ज्याला आपण 'मूलभूत' म्हणू असा परिणाम केला आहे. या नवीन संकल्पनांमुळे झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे आणि त्याला अविश्वसनीय अशा तांत्रिक प्रगतीची जोड मिळाल्याने आपण अधिकाधिक' स्वकेंद्रीत बनत चाललो आहोत. आपली नवीन पिढी आपण घालून दिलेल्या किंवा आपण ज्याला आदर्श समजत होतो अशा सर्व व्यक्तिगत आणि सामाजिक रचना तपासून पाहायला लागली आहे.

शाश्वत विकास म्हणजे काय? लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था यांचे महत्त्व काय? जागतिक तापमानवाढ, लोकसंख्या वाढ, भौतिक प्रगतीसाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा या सर्वांचा ही पिढी गांभीर्याने विचार करते आहे. पहिल्या सर्व प्रचलित व्यवस्था प्रश्नचिन्हांकित होत आहेत; त्यांची जागा घेणाऱ्या नवीन व्यवस्था अजून स्पष्टपणे आकाराला आलेल्या नाहीत अशा संधीकालात आपण आज उभे आहोत.

त्यामुळे कुटुंबसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करणारी व त्याची एक सकारात्मक बाजू सांगणारी एका कुटुंबाची ही कहाणी म्हणूनच आजही आपण अभ्यासावी अशीच आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके