डिजिटल अर्काईव्ह

'गोमंतकातील मराठी साहित्याचा इतिहास' हा केवळ साहित्यनिर्मितीचा इतिहास नसून तो संस्कृती, भाषा आणि स्वत्व जपण्यासाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाचा इतिहास आहे. पोर्तुगिजांची धार्मिक दडपशाही, इन्क्विझिशन आणि त्याद्वारे देशी भाषांवर लादलेले कडक निर्बंध यांतून तावून सुलाखून निघालेल्या जीवनाचा पुरावा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गोमंतकीय जनतेने आपली भाषा, धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करतानाच मराठी वाङ्गयनिर्मितीची अखंड परंपराही जिवंत ठेवली. गोव्यात आणि गोव्याबाहेर राहून गोमंतकीयांनी केलेली वैविध्यपूर्ण अशी मराठी साहित्यनिर्मिती ही केवळ गोमंतकातच नाही, तर केंद्रवर्ती मराठी साहित्यविश्वातही आपला असा खास ठसा उठवून गेली.

ऐतिहासिक, राजकीय पार्श्वभूमीवर गोमंतकातील मराठी साहित्याचे मुक्तिपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि समकालीन म्हणजेच एकाविसाच्या शतकातील साहित्य असे कालखंडानुसार स्थूल विभाग करता येतात. या सर्व कालखंडांत गोमंतकात निर्माण झालेल्या मराठी साहित्याने केंद्रवर्ती मराठी साहित्याला नेमके कोणते योगदान दिले, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

उपलब्ध अल्प साहित्यावरून मध्ययुगात महाराष्ट्राप्रमाणेच गोमंतकातही आध्यात्मिक प्रेरणेने प्रेरित होऊन निर्माण झालेली साहित्यपरंपरा होती, असे म्हणता येते. पोर्तुगीज दडपशाहीत केल्या जाणाऱ्या 'आऊत द फॅ' या दहनोत्सवात देशी भाषांतील अनेक ग्रंथांची होळी करण्यात आली; तरीही मराठी साहित्याचा प्रवाह खंडित झाला नाही. पुराणश्रवणाची सवय असलेल्या नवख्रिस्त्यांच्या आग्रहावरून पुराणग्रंथांची रचना करण्यासाठी धर्मोपदेशकांनी शेजारील प्रदेशातून धार्मिक ग्रंथ चोरून मागविले, असे इतिहास सांगतो. हिंदू धर्मग्रंथांच्या आधारानेच हिंदू धर्माचे खंडन आणि ख्रिस्ती धर्माचे मंडन करण्यासाठी मराठी पुराणग्रंथ समोर ठेवून त्यांच्याच 'देशी' म्हणजे मराठी भाषेत फादर स्टिफन्सने 'ख्रिस्तपुराण' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने 'मराठी प्रशंसा' केली आहे. 'द्रोणपर्व' आणि 'योगवासिष्ठ' रचयिता कवी नामदेव याच्या 'योगवासिष्ठ' ग्रंथातही अशी 'मराठी प्रशंसा' असून, या दोन्ही ग्रंथांमधील 'मराठी प्रशंसा' या काव्यात कमालीचे साम्य आहे. कवी नामदेव हा फादर स्टिफन्सपूर्व कवी असून, त्याचे रोमन लिपीत लिहिलेले हे ग्रंथ अलीकडेच ब्राग येथील ग्रंथालयात सापडले आहेत.' फादर स्टीफन्सप्रमाणेच या काळात अनेक धर्मोपदेशकांनी मराठी भाषेतून पुराणशैलीत धार्मिक ग्रंथांची निर्मिती केली. गोमंतकातील मराठी साहित्याचा एक वेगळा प्रवाह म्हणून याची नोंद घेता येते.

आज उपलब्ध असलेला गोमंतकातील पहिला मराठी ग्रंथ म्हणून सोळाव्या शतकातील कृष्णदास शामा म्हणजेच 'सामराज' या कवीच्या 'कृष्णचरित्रकथा' याच ग्रंथाचे नाव घेता येते. भागवताच्या दशम स्कंधावर आधारलेला असा हा टीकाग्रंथ असून, याचा रचनाकाल इ.स. 1526 अशी नोंद ग्रंथातच आहे. या ग्रंथाची रोमन लिपीतील हस्तलिखित पोथी इतिहासाचार्य पिसुर्लेकर यांना इ.स. 1924 मध्ये ब्राग येथील संग्रहालयात सापडली. भागवताच्या एकादश स्कंधावरील टीका म्हणजे 'एकनाथी भागवत' या ग्रंथाची रचना इ.स. 1573 म्हणजे कृष्णदास शामांच्या नंतर सुमारे 47 वर्षांनी झाली. ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करता येते. उपरोल्लेखित ज्ञानदेव हे कवी याच काळात होऊन गेले.

मध्ययुगात सांस्कृतिकदृष्ट्या गोमंतक हा प्रदेश बऱ्याच अंशी शेजारील कर्नाटक, महाराष्ट्राशी संलग्न होता. त्यामुळे या प्रदेशातही नाथ आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. साहजिकच, या काळात केंद्रवर्ती साहित्याप्रमाणेच गोमंतकातही आध्यात्मिक प्रेरणेतून साहित्य निर्माण झालेले दिसते.

मुक्तिपूर्व कालखंडातील दुसऱ्या भागात म्हणजे अठराव्या शतकातील मराठी साहित्यातही पूर्णप्रकाशानंदस्वामी, संत सोहिरोबानाथ आंबिये हे कवीही अशा आध्यात्मिक प्रभावातूनच पुढे आलेले दिसतात. त्यांची पदे आणि तत्त्वज्ञानपर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या काळातील विठ्ठल नृसिंह केरीकर या गोमंतकीय पंडित कवीचे मराठी साहित्याला लाभलेले योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे. गोमंतकाबाहेरही विद्वान शास्त्री म्हणून त्यांची ओळख होती. काशीच्या पंडितांनी त्यांना दोन पाटांचे आसन देऊन मानपत्रही दिले होते म्हणून त्यांना मानाने 'दुपाटी विठ्ठल' असे म्हणत असत. त्यांनी अनेक आख्यानपर रचना केल्या. सावंतवाडी येथील भोसले राजांच्या आज्ञेवरून त्यांनी 'सावंतविजय' या संस्कृत काव्याचे ओवीबद्ध मराठी भाषांतरही केले होते असा उल्लेख सापडतो. आध्यात्मिक आख्यान काव्ये, ओवीबद्ध आणि आर्याबद्ध रचना, पदे आणि गौळणींची रचनाही त्यांच्या नावावर आहे. मराठी साहित्यात अमर झालेली, होनाजी बाळाच्या नावाने रूढ असलेली 'घनश्याम सुंदरा श्रीधरा' ही भूपाळी आणि विठ्ठल केरीकरांची 'भूपाळी' यांतील साम्य अभ्यासकांना तोंडात बोटे घालायला लावते. इ.स. 1715 ते 1789 हा केरीकरांचा काल असून, होनाजी बाळा हा इ.स. 1754 ते 1844 या काळात होऊन गेला. बा. द. सातोस्कर यांनी या दोन्ही रचनांमधील साम्यस्थळे दाखवून कदाचित होनाजी बाळाने गाण्यासाठी ही भूपाळी निवडून त्यात आवश्यक असे फेरफार केले असावेत असे म्हटले आहे. या काळात रघुनाथ कवीचे 'कोंकणाख्यान' खूप गाजले. कोकण प्रांतातील सारस्वतांच्या शैव-वैष्णववादाचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने याची रचना झाली आहे. येथील सृष्टिसौंदर्याचे वर्णन करून कोकण प्रांताला मराठी साहित्यातून अजरामर करण्याचे काम त्यांनी केले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील धर्मानंद कोसंबी हे बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे अभ्यासक होते. 'जातककथा' या नावाने लिहिलेल्या बुद्धकथा, 'भगवानबुद्ध' हा चरित्रात्मक ग्रंथ, 'बोधी-सत्त्व' नावाचे नाटक आणि 'धर्मानंद' हे आत्मचरित्रात्मक निवेदन असे साहित्य त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, त्यांनी पाली भाषेतून अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी बौद्ध धर्म आणि पाली भाषेच्या अभ्यासातून मराठी साहित्याला एक वैचारिक अधिष्ठान दिले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांचे बहुतेक साहित्य पुनर्प्रकाशित केले. या काळातील एक वेगळा साहित्यप्रवाह म्हणून त्यांच्या साहित्याची नोंद घेता येते.

पोर्तुगीज लोकशाहीच्या कालखंडात गोमंतकाने मोकळा श्वास घेतला. सामाजिक जागृतीत नियतकालिकांचे असलेले महत्त्व पटल्याने गोमंतकात या काळात पत्रकारिता पुढे आली. साहित्य, सामाजिक-साहित्यिक चळवळी, वाचनालये यांच्यासोबतच नियतकालिकांची निर्मिती झाली. इ.स. 1872 मध्ये प्रकाशात आलेले 'देशसुधारणेच्छू' हे नियतकालिक म्हणजे गोमंतकातील आधुनिक मराठी साहित्याची नांदीच ! नियतकालिकांच्या माध्यमातून मराठी भाषासाहित्याला योगदान देणाऱ्यांमध्ये 'भारत' कार हेगडे देसाई, 'स्वयंसेवक'कार प्रियोळकर बंधू, 'भारतमित्र' कार ना. भा. नायक, 'हिंदु'चे सुकेरकर आणि दत्तात्रेय व्यंकटेश पै, 'पथ्यबोध'चे दादा वैद्य यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. समाज प्रबोधनाबरोबरच या नियतकालिकांनी मराठी साहित्यिक निर्माण करण्यात मोठा हातभार लावला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच मराठी भाषा आणि साहित्य या प्रांतांत चैतन्य संचारले होते. पुढील काळात नियतकालिकांप्रमाणेच मराठी भाषा आणि साहित्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने काही संस्थाही स्थापन झाल्या. इ.स. 1912 मध्ये मडगाव येथील दहा तरुण एकत्र येऊन सुरू केलेली 'सारस्वत ब्राह्मण समाज' म्हणजेच आज 'गोमंत विद्यानिकेतन' नावाने परिचित असलेल्या संस्थेचे नाव आवर्जून घ्यावे लागते. या संस्थेने त्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक असे कितीतरी उपक्रम राबविले. इ.स.1935 पासून 'अखिल गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन' भरविण्याची कल्पना अमलात आणली. पोर्तुगिजांच्या आधिपत्याखाली असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गोव्यात आणि गोव्याबाहेर जाऊनही अशी संमेलने भरविली. आज शतकोत्तरही ही संस्था असे विविध उपक्रम राबवीत आहे. 'ज्ञानकोश 'कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी गोमंतकात वापरल्या जाणाऱ्या समानार्थी स्थानिक मराठी शब्द आणि वाक्प्रचारांचा समावेश मराठी शब्दकोशात करण्यासाठी 'सत्संग' मासिकाचे संस्थापक रामचंद्र वामन करंडेशास्त्री यांच्याशी संपर्क साधला. हे काम करण्यासाठी त्यांनी गोमंतकातील विद्वानांना एकत्र आणून 'गोमंतक साहित्य सेवक मंडळ' या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या पुढाकाराने इ.स.1930 मध्ये मडगावला पंधरावे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. 'धि गोवा हिंदु असोसिएशन', 'गोमंतक मराठी अकादमी' या संस्थांचेही गोमंतकातील भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनात आणि त्याद्वारे यशस्वी पिढी घडविण्यात महत्त्वाचे योगदान आहे.

मुक्तिपूर्व काळापासून लेखन करणारे गोमंतकीय लेखक वि. स. सुखठणकर यांनी 'सह्याद्रीच्या पायथ्याशी'च्या रूपाने मराठी कथासाहित्यात प्रादेशिकता आणली. तर सूर्याजी महात्मे यांची 'वेशधारी पंजाबी' ही मराठीतील पहिली रहस्यप्रधान कादंबरी ठरली. या काळात सा. घ. कंटक, लक्ष्मणराव सरदेसाई, पं. महादेवशास्त्री जोशी. बा. द. सातोस्कर, स.शं. देसाई हे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'ज्योत्स्ना', 'ध्रुव', 'यशवंत', अशा नियतकालिकांमधून लेखन करीत. बा. भ. बोरकर, दामोदर अच्युत कारे अशा कवींनी मराठी कवितेत आपले स्थान प्रस्थापित केले होते.

गोवा स्वतंत्र झाला आणि गोमंतकातील सृजनशील साहित्याला पोषक वातावरण मिळाले. गोमंतकाच्या वाङ्गयेतिहासाचा हा दुसरा कालखंड. गोमंतकातील प्रादेशिक मानसिकता आणि झपाट्याने होणारे सामाजिक अभिसरण यांमुळे होणारे सामाजिक बदल या काळातील साहित्यातून टिपले जाऊ लागले. अनुभवांची व्याप्ती वाढली. सामाजिक-सांस्कृतिक संघटना उभ्या झाल्या. नवनवे विषय लेखकाला खुणावू लागले. मुक्तिपूर्व काळापासूनच गोव्यात मूळ धरलेल्या खाणव्यवसायाने धोक्यात आणलेले गोमंतकातील कृषिजीवन, पर्यटनाच्या नावावर फोफावलेला चंगळवाद, स्पर्धात्मक भोगवादी जीवन जगण्यासाठी आखाती देशांत नोकरी स्वीकारण्याची मानसिकता, मुक्तीनंतर गोव्याचे संघराज्यात झालेले विलीनीकरण, पुढे 1963 मधील निवडणुकीतून आलेले लोकनियुक्त सरकार, पंचायत राज, खेड्यापाड्यांत घुसलेल्या राजकारणामुळे निवडणुकांना चढलेले रंग, या सर्व गोमंतकाच्या सामाजिक जीवनातील फार मोठ्या घटना ठरल्या. औद्योगिक विकासामुळे गरजेपोटी बिगरगोमंतकीयांची आयात आणि त्यातून झालेले सांस्कृतिक अभिसरण अशी प्रचंड मोठी पार्श्वभूमी या काळातील साहित्याला लाभलेली दिसते. या काळातील डॉ. अरुण हेबळेकर, डॉ. प्रल्हाद वडेर, शरद दळवी, डॉ. विठ्ठल ठाकूर, विजय कापडी, पु. शि. नार्वेकर, बाळ सप्रे, गजानन रायकर, ज्ञानेश्वर कोलवेकर, माधवी देसाई, रेखा मिरजकर, वासंती नाडकर्णी, अंजली आमोणकर या आणि अशा अनेक कथाकारांच्या योगदानाची नोंद घेणे आवश्यक वाटते.

कथासाहित्याप्रमाणेच या काळात कादंबरी-लेखनालाही बहर आला. मुक्तिपूर्व काळापासून लेखन करणारे लक्ष्मणराव सरदेसाई, बा. द. सातोस्कर, व्यंकटेश अनंत पै रायकर, प्र. श्री. नेरुरकर यांनी पोर्तुगीज, फ्रेंच कथा-कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करून मराठी अनुवादात्मक साहित्यात भर घातली. गोव्यातील तत्कालीन सामाजिक प्रश्न मांडणारी बोरकरांची 'भावीण' मराठी वाचकांपर्यंत पोहोचली. प्र. श्री. नेरूरकर, सुभाष भेंडे, वि. ज. बोरकर, अवधूत कुडतरकर, ह. मो. मराठे, ज्ञानेश्वर कोलवेकर, चंद्रकांत गवस, रा. का. बर्वे, इंद्रायणी सावकार, माधवी देसाई यांच्या कथा-कादंबऱ्या, त्यांतील प्रादेशिक वर्णने आणि भूमिनिष्ठ संस्कृती यांमुळे केंद्रवर्ती मराठी साहित्यात वेगळेपणाने उठून दिसतात. एका बाजूला नव्याचे आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला जुन्याला चिकटून राहण्याची मानसिकता अशा अवस्थेत निर्माण झालेला सामाजिक-सांस्कृतिक संघर्ष इंद्रायणी सावकारांच्या 'गोवा' या कादंबरीत दिसतो. 'रिंग ऑफ सॅटर्न', 'जोनास आर्क', 'आदित्य', यांसारख्या अनेक दर्जेदार विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहून डॉ. हेबळेकरांनी मराठी विज्ञानसाहित्यात आपले खास स्थान निर्माण केले. गोमंतकातील वर्तमान समाजवास्तवाचे दर्शन घडविणारी त्यांची 'सलोमीचे नृत्य' (इ.स. 1984) ही सामाजिक कादंबरी वाचकांना थक्क करून सोडते. वास्तव जीवनातील पर्यावरणीय, शासकीय विषयांतील अनेक प्रश्नांवर काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या अनिल परुळेकर यांच्या कादंबऱ्याही आपल्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेतात. गजानन देसाई, विश्राम गुप्ते, रेखा मिरजकर यांच्याही कादंबरीतून नवनवीन समकालीन प्रश्न आले आहेत. दैनंदिनी शैलीत मांडणी केलेली रा. का. बर्वे यांची 'होमखांड' ही कादंबरीही रचनेचा वेगळा प्रकार म्हणून पाहता येते.

मुक्तिपूर्व कालापासूनच बा. भ. बोरकर, दामोदर अच्युत कारे, शंकर रामाणी, गजानन रायकर यांनी काव्यप्रांतात आपली नाममुद्रा उमटविली होती. पुढील टप्प्यावर गोपाळराव मयेकर, अनिल सामंत, अशोक बोरकर, पुषा पाग्रज या आणि अशा कित्येक कवींनी (विस्तारभयास्तव नामोल्लेखही टाळावा लागत आहे.) गोमंतकातील मराठी कविता पुढे नेली. नव्या संवेदनशीलतेचे भान ठेवून निसर्गानुभूती, प्रेमभावनेतील तरल अनुभूती घेऊन येणाऱ्या वरील कवींच्या कवितांप्रमाणेच, जीवनातील दाहकता अधोरेखित करणाऱ्या कविता लिहिणारे नरेंद्र बोडके, लोटलीकर, विष्णू वाघ यांनीही मराठी कवितेत मोलाची भर घातली. बालकविता लिहिणाऱ्या नीलिमा आंगले किंवा गझलरचना करणाऱ्या राधा भावे, दत्तप्रसाद जोग, सचिन मणेरीकर यांच्याही मराठी साहित्यातील योगदानाची नोंद घेतलीच पाहिजे. शांता लागू यांचे विडंबनकाव्यही आपला वेगळा ठसा उमटविते. मराठी कवितेत आपले स्थान निर्माण केलेल्या संध्या बोरकर, मेघना कुरुंदवाडकर, रेखा मिरजकर, मीना समुद्र, गिरीजा मुरागोडी, अनुजा जोशी, दया मित्रगोत्री या आणि अशा कितीतरी कवींची नावे अवर्जून घेता येतील. गोमंतकात नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी कविता स्पर्धा, कार्यशाळा, नियतकालिकांमधून प्रसिद्धी, साहित्य संमेलनांमधून कविकट्ट्याची योजना, 'काव्यसंध्या', 'काव्यशारदा' यांसारखे कार्यक्रम विविध गट वा संस्था सातत्याने आयोजित करीत असतात. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभतो, त्यातूनच अनेक कवी प्रस्थापित होण्याची प्रक्रिया चालूच असते.

कोकण प्रांतातील नाट्यकला मंदिराच्या आधाराने वाढली. आजही मंदिराच्या आवारात सादर केल्या जाणाऱ्या नाटकांकडे धार्मिक भावनेनेच पाहिले जाते. हौशी नाट्य मंडळांप्रमाणेच स्पर्धात्मक मंडळे आजही गोमंतकात नाट्यनिर्मिती करीत आहेत. विष्णुदास भाव्यांचे 'सीतास्वयंवर' हे पहिले लिखित नाटक इ. स. 1843 मध्ये रंगभूमीवर आले. त्यापूर्वी सुमारे पाव शतक म्हणजेच इ.स. 1818 मध्ये गोमंतकातील रघुनाथ शेठ यांनी लिखित स्वरूपातील दशावतारी नाटक रंगभूमीवर आणले होते. किर्लोस्करांनी गोमंतकातील कृष्णभट्ट बांदेकर या रामभक्ताकडून संगीत नाटकाची प्रेरणा घेऊन इ.स.1880 मध्ये 'संगीत शाकुंतल' हे पहिले संगीत नाटक पुण्यातील रंगभूमीवर सादर केले. गोमंतकातील हिराबाई पेडणेकर या मराठीतील पहिल्या स्त्री-नाटककार असून त्यांनी 'जयद्रथ विडंबन', 'दामिनी' आणि 'पद्मिनी' अशी नाटके लिहिली आहेत.

पुढील काळात मो.ग. रांगणेकर, ह.वि. देसाई, बबन प्रभू या गोमंतकीय नाटककारांचे केंद्रवर्ती मराठी नाट्यलेखनातील योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे. समकालीन नाटककारांमध्येही विष्णू सूर्या वाघ यांचाही मराठी नाट्यक्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला पाहिजे. त्यांचे 'तुका अभंग अभंग', गोमंतकातील पोर्तुगीज राजवटीवर प्रकाश टाकणारे 'शिवगोमंतक' ही नाटके फार गाजली. राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण ही त्यांच्या नाट्यविषयाची त्रिसूत्री आहे. विजयकुमार नाईक, सोमनाथ नाईक, प्रशांत मार्दोळकर, गोविंद नाईक, उल्हास प्रभुदेसाई यांनीही वेगळे विषय आणि प्रायोगिक मांडणी करून बरीच नाटके मराठी रंगभूमीला दिली.

मराठीत गाजलेल्या 'मी कोण' या राजाराम पैंगीणकरांच्या स्फोटक आत्मचरित्राचा उल्लेख करणे आवश्यक आहे. एकूणच, मराठीत साहित्यात धर्मानंद कोसंबी, पां. पु. शिरोडकर, विनायक मयेकर, प्रभाकर वैद्य, पं. महादेवशास्त्री जोशी, बा. द, सातोस्कर, लता मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, माधवी देसाई या आणि अशा अनेकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचे स्थान महत्त्वपूर्ण असेच आहे.

'मुंबई वर्णन' हे सर्व देशी भाषांतील पहिले स्थलवर्णन असून, ते गोविंद माडगावकर या गोमंतकीय लेखकाने लिहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात बा.भ. बोरकरांच्या 'कागदी होड्या', 'घुमटावरले पारवे', 'चांदण्यांचे कवडसे', 'पावलापुरता प्रकाश' या संग्रहांनी मराठी ललित निबंध या प्रकारात आपली मुद्रा उमटविली. पुढील काळात ललित निबंध वा मुक्त गद्य या साहित्यप्रकारात गोमंतकीय लेखकांनी भरीव योगदान दिले. विशेषतः, 90 च्या दशकात गोमंतकात या वाक्यप्रकाराला बहर आला. माधवी देसाई, सचिन कांदोळकर, सुमेधा कामत, रेखा मिरजकर अशा अनेकांचे दर्जेदार ललित निबंधसंग्रह प्रकाशित झाले. या काळातील उषा पाणंदीकरांच्या प्रवासवर्णनांचीही आवर्जून नोंद घ्यावी लागते. एकूणच, या काळात प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहांतील बहुतांश लेखांना वर्तमानपत्रांतून पूर्वप्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळेच गोमंतकातील ललित लेखनाच्या विकासात वर्तमानपत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे म्हणता येते.

वैचारिक, समीक्षा, संशोधनाच्या क्षेत्रातील गोमंतकीय लेखकांच्या योगदानाला तर लक्षणीय वारसा आहे. अ. का. प्रियोळकरांनी मुंबईतील मराठी संशोधन मंडळाचे संचालकपद समर्थपणे भूषविले होते. संशोधनक्षेत्रातील त्यांच्या योगदानाला तोड नाही हे निर्विवाद ! त्यांनी अनेक नियतकालिकांतून मिश्कील शैलीत ललित लेखनही केले आहे. कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेपूर्वी सुमारे दहा वर्षे त्यांची 'वसुंधरेची वल्लभाराधना' ही कविता 'विविध ज्ञानविस्तार' (जून 1925) या अंकात प्रसिद्ध झाली होती. कोणत्याही विद्यापीठाची औपचारिक पीएच.डी. पदवी न घेता मुंबई विद्यापीठाने पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. इतिहास संशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि जुन्या ख्रिस्ती मराठी वाङ्गयाचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी 'नलदमयंती स्वयंवरा'ची पहिली पाठशुद्ध चिकित्सक आवृत्ती तयार केली. मुक्तिपूर्व काळापासून संशोधनाला वाहून घेतलेल्या प्रियोळकरांप्रमाणेच बा. द. सातोस्कर (गोमंतक संस्कृती आणि प्रकृती), पं. महादेवशास्त्री जोशी (भारतीय संस्कृती कोश), श्रीराम कामत (विश्वचरित्र कोश) यांनी मराठी भाषासाहित्यात फार मोलाची भर घातली आहे. याशिवाय, डॉ.वि. बा. प्रभुदेसाई, डॉ. गं.ब.ग्रामोपाध्ये, डॉ. प्रल्हाद वडेर, डॉ. केशव सद्रे, डॉ. कोमारपंत, रवींद्र घवी ही काही नावेही नोंदवावी लागतील. एस. एस. नाडकर्णी यांनी तर समीक्षेची समीक्षा आणि समीक्षेचे संपादन (औदुंबर अर्थध्वनी, बालकवी समीक्षा, चाफा समीक्षा, पिंपात मेले ओले उंदीर-समीक्षा) करून मराठी साहित्यातील एक वेगळा प्रवाह पुढे नेला. लोकसाहित्य, पर्यावरणीय लेखन करणारे आणि वसुंधरा पुरस्काराचे मानकरी असलेले राजेंद्र केरकर, लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचेही समकालीन मराठी साहित्यातील योगदान उल्लेखनीय असेच आहे.

गोमंतकीयांचे काव्य, कादंबरी, नाटक, ललित गद्य, पत्रकारिता, संशोधन, समीक्षा, भाषांतर अशा मराठी साहित्याच्या सर्व प्रांतांत मोलाचे योगदान आहे. आजही गोमंतकातील विविध संस्था, शासकीय आणि अशासकीय पातळींवर मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी विविध योजना राबवीत आहेत. ऐतिहासिक काळात संघर्षातून उभे राहिलेले हे साहित्य आज मराठी वाङ्गयाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळवून आहे आणि भविष्यातही ते तितक्याच तेजाने उजळत राहील, यात शंका नाही.

 

संदर्भ सूची -

1. गोमंत-शारदा, गोमंतकातील मराठी कविता - 1526 ते 1965, संपादक रामदास प्रभू, पृ.167.
2. तत्रैव.
3. प्रभुदेसाई डॉ. वि. बा., घवी रवींद्र (संपा.), गोमंतकीय मराठी वाङ्गयाचा इतिहास, खंड 1, प्र.आ., गोमंतक मराठी अकादमी प्रका., पणजी, 2003
4. तत्रैव.
5. नाईक गोविंद, रंगभूमी आणि नाटक, गोमंतकीय मराठी वाङ्ख्याचा इतिहास, खंड 1, प्र.आ., गोमंतक मराठी अकादमी प्रका., पणजी, 2003. पृ.406.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी