डिजिटल अर्काईव्ह

सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण, प्राणप्रतिष्ठा आणि तर्कतीर्थ भूमिका

सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृत महोत्सव खरंतर या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, आधुनिक विचार व्यवहाराचा उत्सव ! पण त्याचा साधा उल्लेखही नुकत्याच झालेल्या अमृत महोत्सव कार्यक्रमातील अनुषंगिक भाषणे व लेख यांतून झाला नाही. अमृत कालातील भारताचा विकास 'गंगा-जमुना तहजीब' परंपरेतून होत आला आहे. त्या परंपरेने अमृत कालात हा भारत देश सर्व जातधर्मीयांसाठी सर्वधर्मसमभाव, धार्मिक सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी तत्त्वे व मूल्य संवर्धनाचा महोत्सव होय. ती परंपरा अक्षुण्ण राखणाऱ्या संकल्पाचे हे पर्व होय.

 

भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये गुजरात राज्यात असलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराचे असाधारण महत्त्व आहे. भारतीय श्रद्धावान समूहांच्या दृष्टीने ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. इतिहासाच्या दृष्टीने भारतावर गेल्या हजार वर्षांच्या काळात जे मुस्लीम शासक राज्यकर्ते झाले, त्यांनी स्वधर्म प्रचारार्थ येथील हिंदू धर्मीयांची मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यांपैकी काही ठिकाणी सत्तेच्या जोरावर मशिदीही बांधल्या. अशा मंदिरांपैकी सोरटी सोमनाथ मंदिर एक होय. इतिहास काळात या मंदिरावर मोहम्मद गजनी (इ.स. 1024), अल्लाउद्दीन खिलजी (इ.स. 1297), दुसरा मुजफ्फर शहा (इ.स. 1375), झफारखान (इ.स. 1393), औरंगजेब (इ.स. 1702) यांनी हल्ले केले व मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या जागेवर देवी अहिल्याबाई होळकर यांनी इ.स. 1783 मध्ये पुन्हा मंदिर उभारले, ते जुनागडच्या नवाबाने इ.स. 1788 मध्ये पुन्हा उद्ध्वस्त केले. त्या मंदिर नि मशिदीचे अवशेष प्रभासपाटण समुद्रकिनाऱ्यावर 1947 च्या 12 नोव्हेंबरपर्यंत अवशेष रूपात पडून होते.

24 ऑक्टोबर 1947 ला (विजयादशमीच्या दिवशी) तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत सरकारतर्फे सौराष्ट्रातील जुनागड संस्थान बरखास्त केले. त्यामुळे या मंदिर क्षेत्रावर भारत सरकारचा ताबा आला. 12 नोव्हेंबर 1947 रोजी नामदार सरदार वल्लभभाई पटेल (गृहमंत्री), नामदार काकासाहेब गाडगीळ (ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम व खाणकाम मंत्री), जाम साहेब (दिग्विजयसिंह जडेजा) यांनी दिवाळी दिवशी सोरटी सोमनाथ मंदिर स्थळी भेट देऊन या मंदिराच्या पुनर्निमाणाची घोषणा केली. त्यानुसार उभारलेल्या पुनरुज्जीवित मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव 8 मे 1951 ला संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा महोत्सव होऊन सर्व जातधर्मीयांच्या दर्शनार्थ ते मंदिर खुले झाले.

या मंदिराचा अमृत महोत्सव, 8 ते 11 मे 2026 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लेख व सरकारी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. सरकारी संकेतस्थळांवर प्रसंगोचित मजकूर प्रसिद्ध झाला. ते सर्व वाचत असताना, या मंदिर पुनरुज्जीवनाच्या निमित्ताने भारतात एक मोठे सांस्कृतिक संक्रमण आणि वैचारिक मंथन घडून आले होते, याचे विस्मरण झाल्याचे लक्षात आले. कारण हा प्राणप्रतिष्ठापना महोत्सव घडून आला तेव्हा, भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप लक्षात घेता अशा समारंभास राष्ट्रपतींनी उपस्थित राहणे कितपत संयुक्तिक, असा प्रश्न खुद्द तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी (राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनाच) पत्रातून विचारला होता. नव्या देशाच्या ओळखीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या त्या प्रश्नाला तेव्हा राष्ट्रपतींनी उत्तर दिले होते. शिवाय या निमित्ताने महात्मा गांधींशी सन 1947-48 च्या संधीकाळात चर्चा, पुनरुज्जीवित मंदिर सर्व जातीधर्मांस खुले होणार म्हणून तत्कालीन शंकराचार्य, धर्माधिकारी व धर्मपुरोहितांनी बहिष्कार व असहकार पुकारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वाई येथील संस्कृत पंडित व धर्मसुधारक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे प्रमुख आचार्य म्हणून त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कालसंगत भूमिका निभावली होती. परिणामी, तर्कतीर्थांनी पुरोगामी व प्रतिगामी या दोन्ही पक्षांचा रोष ओढून घेतला होता व बहिष्कारही सहन केला होता. तर्कतीर्थांनी या कार्याची त्यचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन दक्षिणा घेण्याचे नाकारून ती रक्कम नियोजित सोमनाथ संस्कृत विद्यापीठात देणगी म्हणून दिली होती. या सर्व महत्त्वाच्या घटना या अमृत महोत्सवात अनुल्लेखित राहिल्या आहेत. इतिहासास संदर्भ गाळून उजाळा देता येत नसतो, म्हणून हा लेखप्रपंच !

संदर्भ गाळून इतिहास सांगण्याचे अनेक तोटे असतात. इतिहास म्हणजे भाकडकथा नसून तो तथ्याधारित वस्तुनिष्ठ वृत्तान्त असतो. इतिहास मूलतः तथ्याधारित व तथ्यअन्वेषी शास्त्र होय. त्यामुळे तथ्यांना बगल देत सांगितलेल्या इतिहासाचे भविष्यावर दूरगामी परिणाम होत असतात. अशा प्रयत्नांमुळे इतिहासाची विश्वसनीयता धोक्यात येण्याचा संभव असतो. अफवा व प्रचारास खतपाणी मिळते. इतिहासाचे राजकारण होण्याचा व त्याचा साधन म्हणून उपयोग (खरं तर गैर वा दुरुपयोग!) होण्याची शक्यता बळावते. इतिहासातील तथ्ये झाकोळली जाऊन तथ्यान्वेषण कालौघात अशक्य ठरते. भविष्यात इतिहास अभ्यास चुकीच्या दिशेने होतो. घटनांचे खरे संदर्भ काळ हरवून बसतो. त्यातून सापेक्ष इतिहास तयार होण्याचे धोके वाढतात. इतिहास एकांगी व सोयीस्कर बनून जातो.

सोरटी सोमनाथ मंदिर नवनिर्माण निर्णय जाहीर केला, बुधवार दि. 12 नोव्हेंबर 1947 या (दिवाळी) दिवशीच या मंदिर निर्मितीसाठी दिग्विजय सिंह जडेजा तथा जामसाहेब यांनी रुपये एक लक्ष आणि 'आरझी हुकूमत' (हंगामी सरकार, जुनागड) तर्फे सामळदास गांधी (शामलदास - पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी) यांनी 51 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले. त्यामुळे या कार्यास गती आली. सरदार पटेल यांच्या या घोषणेचे देशभर संमिश्र प्रतिक्रियांनी स्वागत झाले. या घोषणेस प्रत्यक्ष गती आली ती 23 जानेवारी 1949 रोजी, जामनगर गुजरात येथे या विषयावर एकदिवसीय परिषद योजली गेल्याने. या परिषदेस नामदार सरदार वल्लभभाई पटेल, नामदार न.वि. तथा काकासाहेब गाडगीळ, सौराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री उच्छंगराय नवल शंकर ढेबर, सामळदास गांधी प्रभृती मान्यवर उपस्थित होते. या चर्चेत नियोजित सोमनाथ मंदिर पुनरुज्जीवित करण्यासाठी विश्वस्त मंडळाची निवड झाली. त्यात भारत सरकारचे दोन प्रतिनिधी, दोन लोकनियुक्त प्रतिनिधी, दोन सौराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी (त्यात एक जुनागड प्रतिनिधी) यांचा अंतर्भाव होता.

सन 1947 मध्ये या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या तत्कालीन सक्रिय नेत्यांनी महात्मा गांधींकडून मार्गदर्शन घेतले. त्या अनुषंगाने त्यांनी 28 नोव्हेंबर 1947 च्या प्रार्थना सभेत स्पष्ट केले होते की,

"When Sardar came here, I asked him whether even though he was in the government, he would acquiesce in its giving as much money as it liked for Hinduism from its treasury. After all, we have formed the government or all. It is a secular government, that is, it is not a theocratic government, rather, and it does not belong to any particular religion. Hence it cannot spend money on the basis of communities. For it, only thing that matters is that all are Indians. Individual can follow their own religion. I have many religion and you have yours to follow."

याच प्रार्थना सभेतील भाषणात महात्मा गांधींनी त्यांना लिहिल्या गेलेल्या सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण प्रकल्प संबंधातील एका टिपणाचा हवाला देत, जुनागड सरकार किंवा केंद्रीय सरकार यांनी या प्रकल्पास शासकीय निधी दिला गेला तर तो 'अधर्म' ठरेल असे म्हटले होते. त्या संदर्भाने महात्मा गांधींनी स्पष्ट केले की, 'मी या संदर्भात सरदार पटेल यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी म्हटले की, 'मी जिवंत असेपर्यंत हे होऊ देणार नाही.' 15 डिसेंबर 1950 रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मंदिर उभारणी प्रकल्पाची धुरा नामदार के. एम. मुंशी यांनी सांभाळली. त्यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित 'सोमनाथः दि श्राइन इटर्नल' (मे 1951) स्मरणिकेत याबद्दल सविस्तर वृत्तान्त प्रकाशित केला आहे, तो या मंदिराच्या पूर्व इतिहासावर प्रकाश टाकतो.

सोरटी सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण प्रकल्पाची मूळ कल्पना नामदार सरदार वल्लभभाई पटेल आणि नामदार काकासाहेब गाडगीळ यांची. त्यास जामसाहेब, सामळदास गांधी, के. एम. मुंशी प्रभृती मान्यवरांनी दुजोरा देत ती कल्पना प्रत्यक्षात आणली. ही सर्व मंडळी तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय व आघाडीचे कार्यकर्ते होते. या मंदिर निर्माणसंबंधी तत्कालीन हिंदू राष्ट्रवादी नेत्यांऐवजी काँग्रेसने घेतलेला पुढाकार लक्षात घेता, टीका होणे स्वाभाविक होते. यासंदर्भात के. एम. मुंशी यांनी स्पष्ट केले होते की, सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण प्रकल्प हा धार्मिक प्रतिशोध (रिवेंज) नसून, तो राष्ट्रीयत्वाच्या पुनरुत्थानाचा प्रकल्प आहे. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर त्या वेळी चांगले स्वागत झाले. या मंदिर पुनर्निर्माण काळात विश्वस्त मंडळातर्फे (सन 1950-51 च्या दरम्यान) नामदार के. एम. मुंशी यांनी वारंवार स्पष्ट केले होते की, हा उपक्रम भारतीय राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे. ऐतिहासिक स्मृती दडपून व झाकून कोणत्याही राष्ट्राची धर्मनिरपेक्षता टिकू शकणार नाही. गुलामगिरी व साम्राज्यवादाच्या काळात उद्ध्वस्त सांस्कृतिक प्रतीकांचे पुनरुज्जीवन आवश्यक असते. या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मंदिर पुनर्निर्माण विश्वस्त मंडळाच्या घटनेत, नियोजित मंदिरात सर्व जातधर्मीयांना प्रवेश आणि मंदिराबरोबर संस्कृत विद्यापीठ उभारणी इत्यादी बाबींचा अंतर्भाव आवर्जून करण्यात आला होता. हे कार्य धर्मानुरागींच्या हाती न जाता, ते धर्मनिरपेक्ष कृतीने होईल याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले होते. त्यामुळे मंदिर निर्माणाचे प्रत्यक्ष कार्य लोकवर्गणीतून झाले तरी, लोक आणि शासन यंत्रणा यांच्या संयुक्त सहकार्यातून ते उभारले गेले.

मंदिर पूर्ण होताच प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची तयारी सुरू झाली. त्याचा भाग म्हणून, तत्कालीन शंकराचार्य व विविध धर्मपीठांच्या धर्माधिकारी मंडळींशी संपर्क करण्यात आला होता. परंतु हे मंदिर सर्व जातधर्मीयांना खुले होणार व ते सनातन परंपरेचे उल्लंघन ठरेल, म्हणून यात सहभागी होण्यापेक्षा त्यांनी दूर राहणे पसंत केले होते. अस्पृश्यता निर्मूलन, आंतरजातीय विवाह इत्यादी. महात्मा गांधींच्या प्रयत्नात पूर्वी स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कार्य केले होते, पुरोगामी भूमिका घेतल्या होत्या. ते राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, नामदार काकासाहेब गाडगीळ, नामदार के.एम. मुंशी हे सर्व जाणून होते. त्यामुळे, त्यांनी प्राणप्रतिष्ठा प्रधानाचार्य म्हणून स्वामी केवलानंद सरस्वती व प्रमुख ऋत्विजाचार्य म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनात 160 ऋत्विज व 4 अग्निहोत्री यांनी मिळून 8 ते 11 मे 1951 या काळात सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा उपचार विधी यथासांग पार पाडला. या समारंभास भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सपत्नीक उपस्थित राहण्याचे तत्त्वतः मान्य केले. तेव्हा पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी 2 मार्च 1951 रोजी पत्र लिहून राष्ट्रपतींना आपली असहमती व नाराजी कळवली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की...

"I confess that I do not like the idea of associating yourself with a spectacular opening of the Somnath Temple. This is not merely visiting a temple which can certainly be done by you or anyone else, but rather participating in a significant function which unfortunately has a number of implications. Personally, I thought that this was no time to lay stress on large scale building operations at Somnath. This could have been done gradually and perhaps more effectively later. However, this has been done. I feel that it would be better if you did not preside over these function."

वरील पत्रास उत्तर देणारे पत्र राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दि.10 मार्च 1951 रोजी लिहिले, त्यात स्पष्ट केले होते की...

"Somnath Temple had been built entirely with private subscriptions and he was not doing anything extraordinary if he associated himself with the function, as he visited other places of worships whenever he felt inclined to do so. Moreover, he did not feel it right to refuse the invitation because the Somnath Temple had much historic significance and the invitation came from the Rajpramukh (Jam Saheb) of the state (Saurashtra) who was also the Chairman of the board of Trustees of Shri Somnath trust."

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पुरोगामी भूमिका महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निर्मूलन कार्य चर्चेत आणि त्यांच्या चिरंजीवांच्या आंतरजातीय विवाहातील पौराहित्यातून स्पष्ट झाली होती. सोमनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवात तर्कतीर्थांनी केलेले पौरोहित्य हे सनातन धर्माधिकाऱ्यांचा धर्म सुधारणांना केलेला विरोध लक्षात घेऊन, स्वीकारलेली प्रागतिक भूमिका होती. परंतु त्यांच्या या भूमिकेबद्दल ते सनातन व पुरोगामी अशा दोन्ही पक्षांकडून टीकेचे लक्ष्य केले गेले. सनातन पक्षाचे म्हणणे होते की, हे पारंपरिक धार्मिक कर्मकांड विरोधी व्यवहाराचे (मंदिरात हरिजन प्रवेश) समर्थन होते, तर पुरोगामी मंडळी या पौरोहित्यास धर्मनिरपेक्षता विरोधी कृती ठरवू पाहत होते. खुद्द एम.एन. रॉय यांनी तर्कतीर्थांच्या या भूमिकेवर जाहीर आक्षेप नोंदवला होता. तेव्हा आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण करणारा, धर्मनिरपेक्षता संकल्पना स्पष्ट करणारा एक लेख तर्कतीर्थांनी त्या वेळी दैनिक 'प्रभात' मुंबई मध्ये लिहिल्याची नोंद ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या, अरुंधती खंडकर आणि डॉ. अशोक खंडकर लिखित 'स्विमिंग अप स्ट्रीम' या इंग्रजी ग्रंथात आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे होते की, "धर्मनिरपेक्ष दृष्टिकोण म्हणजे हिंदू विरोध असा होत नाही, किंबहुना तो अन्य धर्मविरोधीही नाही. सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन व पुनर्निर्माण हे बहुसंख्य भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतीक होय. विशेषतः गुजरातमधील; त्यातही जे दैनंदिन पूजाअर्चा करतात अशा नैतिक जीवनोपासक, पारंपरिक समाजाचे. प्रस्तुत पुनरुज्जीवितमंदिर (प्राणप्रतिष्ठापनेनंतर) सर्व जातीधर्मांस खुले होणे, हे भारतीय राज्यघटनेस अनुस्यूत व्यक्तिगत धर्म व पूजा स्वातंत्र्याशी निगडित व सुसंगत होय. ही घटना भारतीय सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या संदर्भातील प्रागतिक पाऊल होय. यातूनच भविष्यात आधुनिक, उदारमतवादी भारतीय समाजमन उदयास येईल."

सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृत महोत्सव खरंतर या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, आधुनिक विचार व्यवहाराचा उत्सव ! पण त्याचा साधा उल्लेखही नुकत्याच झालेल्या अमृत महोत्सव कार्यक्रमातील अनुषंगिक भाषणे व लेख यांतून झाला नाही. अमृत कालातील भारताचा विकास 'गंगा-जमुनी तहजीब' परंपरेतून होत आला आहे. खरे तर त्या परंपरेने अमृत कालात हे संपन्न पर्व भारतासाठी, तसेच सर्व जातधर्मीयांसाठी सर्वधर्मसमभाव, धार्मिक सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी तत्त्वे व मूल्य संवर्धनाचा महोत्सव होय. ती परंपरा अक्षुण्ण राखणार संकल्पाचे हे पर्व होय. सोमनाथ स्वाभिमान पर्वाकडे आपण या दृष्टीने पाहिले तरच तो खऱ्या अर्थाने नव्या पिढीसाठी आत्मविश्वास व अभिमान वृद्धिंगत करणारा संतुलित भावनेचा वळणबिंदू ठरेल !


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र ( 17 लेख )

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके