मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. जर आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर आपले वस्तुमान वाढेल; परंतु गतीच्या दिशेने आपली जाडी कमी होईल. आणि काळ... time... अगदी मंदावेल. तुमच्या मनगटावरचं घड्याळ अगदी मंद होईल. आता तुम्हालाही वाटेल की, माझं डोकं फिरलंय. पण, मी सांगतोय ते खरं आहे. आपलं जीवशास्त्रीय अर्थाने म्हातारं होणंदेखील अत्यंत मंद होईल. आपण समजा प्रकाशाच्या वेगाने आकाशगंगेच्या केंद्राकडे जाऊन परत आलो तर त्याला आपल्या पृथ्वीवरच्या हिशेबाने पाचसहा दिवस लागतील. परंतु इथे पृथ्वीवर तोवर पन्नास किंवा साठ वर्षे उलटून गेली असतील.
अंक 1
(प्रेक्षक बसलेले असताना मोझार्टचा 'A major' मधील 'कॉन्चेर्टो नंबर फाइव्ह' वाजत आहे.
संगीत मंदावत असताना, आइन्स्टाईनच्या अभ्यासिकेवर हळूहळू प्रकाश पडतो. रंगमंचाच्या मध्यभागी एक टेबल आणि खुर्ची आहे. टेबल पुस्तके आणि कागदांनी भरलेले आहे. मेजाच्या एका कोपऱ्यात एकच फूल असलेली फुलदाणी आहे. मेजाच्या उजवीकडे एक मोठा काळ्या रंगाचा फळा आहे. तो अनेक अस्पष्ट बीजगणितीय समीकरणांनी भरून गेलेला आहे. मेजाच्या डावीकडे, प्रेक्षकांसमोर एक जुनी आरामदायी खुर्ची आहे. तीवर एक सैलसर आवरण घातलेले आहे. खुर्चीच्या बाजूला एक लहान टेबल आहे. त्यावर एक फळांचा वाडगा आहे. खुर्चीवर एक टक्सिडो जॅकेट, एक शर्ट आणि बो टाय ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला काळ्या बुटांची जोडी आहे. त्यात मोज्यांची गुंडाळी आहे. रंगमंचावर उजवीकडे अजून एक छोटे टेबल आहे. त्यावर पुस्तकांचा आणि कागदांचा ढीग आहे. त्यावरच मध्यभागी पेटीमध्ये एक व्हायोलिन ठेवलेले आहे.
आइन्स्टाईन प्रेक्षकांकडे पाठ करून मेजाशी बसून काम करत आहे. त्याने जुना स्वेटर आणि ढगळ विजार घातलेली आहे. त्याचे पाय उघडे आहेत. दिवे पूर्णपणे चालू आहेत. तो त्याच्या समोरील वही मिटतो, प्रेक्षकांकडे पाहतो आणि मेजावर त्याच्या हाताचा तळवा दोनदा आपटतो.
आइन्स्टाईन : (स्पष्ट जर्मन लहेजात) मी या टेबलावर दोनदा माझा हात आपटला. एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या क्षणी.... बरोबर ? (विराम)
हे असं कसं काय असू शकतं? ही.. ही खोली ज्या पृथ्वीवर आहे, ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. आणि आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरचे सर्व काही.. तुम्ही, मी, ही खोली, हे टेबल, सौर व्यवस्थेचा solar systemचा एक हिस्सा आहोत. ही खुद्द सौर व्यवस्था गतिमान आहे. सर्व काही नेहमीच हालचाल करत असतं. मग मी दोन वेगवेगळ्या वेळी, मी एकाच ठिकाणी दोन ठोके कसे काय देऊ शकेन? असं घडूच शकत नाही. मी इथं.. इथं पहिला ठोका दिला ते ठिकाण... दुसरा ठोका देईपर्यंत... त्या तिथपर्यंत पोहोचलं होतं... दाराबाहेर... (पुन्हा हात आपटतो) आता हे ठिकाण तेच आहे का वेगळं, हे फक्त ते ज्या खोलीत आहे, त्याच्या सापेक्ष आहे. जर ते दुसरं ठिकाण तेच असायचं असेल तर, आपण आपल्या मनातली काळाची जाणीव थोडा वेळ विसरली पाहिजे. आणि हे तितकंच खरं आहे की, आपण काळाचा अवकाशाशी असलेला संबंध विचारात घेतल्याशिवाय काळ निश्चित करू शकत नाही…
(विराम)
तुम्हाला असं वाटतंय ना की, आज माझा वाढदिवस आहे आणि जणू त्या निमित्तानं मी व्याख्यान झोडतोय? पण, मला जे बोलायचंय त्यासाठी मला माझ्या वाढदिवसाची वाट बघायची गरज नाही. मला जे बोलायचं असतं ते मी केव्हाही बोलू शकतो. मी कोणालाही घाबरत नाही. सत्तरी ओलांडण्याचा हा मोठाच फायदा आहे. आजकाल मला कोणीही अशी सक्ती करू शकत नाही की, मी विषयाला धरूनच बोललं पाहिजे. म्हणून मी अगदी अघळपघळ बोलू शकतो. आता, मी व्याख्यान देण्याचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला सांगतो... माझ्यासाठी सर्वांत असह्य गोष्ट म्हणजे व्याख्यानाआधी करून दिलेला माझा परिचय ऐकणं. जर माझ्याबद्दल जे काही सांगितलं जातं, त्यावर जर मी विश्वास ठेवला तर त्याचा अर्थ मी भ्रमिष्ट झालो आहे. पण, माझं डोकं अजून व्यवस्थित ठिकाणावर आहे. म्हणून मी ते ह्या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो.(विराम)
आज मला काहीही बोलावंस वाटत नाहीये. (विराम)
एकक 2
पण, जर कोणी मला आग्रहच केला तर मी विज्ञानाबद्दल नेहमीच, कधीही बोलू शकतो. हां, आता असं नेहमीच म्हटलं जातं की, माझे सिद्धान्त स्पष्ट करणं खूप कठीण आहे. परंतु, मला असं प्रामाणिकपणे वाटते की, ते सर्वांना समजणं अगदीच शक्य आहे. सत्य हे आहे की, अनेक गणितज्ञांनी माझा स्वतःचाच सिद्धान्त अशा काही पद्धतीने स्पष्ट केलाय की, आता मला स्वतःलाच तो समजून घेताना गोंधळायला होतं. म्हणून, माझा सिद्धान्त समजून घेताना तुमच्या डोक्यात उडालेल्या गोंधळापेक्षा माझ्या डोक्यात उडालेला गोंधळ शंभर पट जास्त आहे.
तुम्हाला खरं सांगू? Theory of relativity -सापेक्षता सिद्धान्त समजणं इतकं कठीण नाही. अशी कल्पना करा की, एका लोहमार्गाच्या रेल्वे ट्रॅकच्या दोहो बाजूला शेताडी पसरलीय आणि काही लोक...
(प्रेक्षकांच्या अर्ध्या भागाकडे निर्देश करतो.)
...समजा, तुम्ही सर्व जण रुळांच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर उभे आहात. अचानक, आकाशात दोन विजेचे लोळ चमकतात आणि.. आणि, कडाड... तुम्हाला मेघगर्जना ऐकू येते, आणि हे विजेचे लोळ तुमच्या दोन्ही बाजूंच्या ट्रॅकवर, समान अंतरावर कोसळतात. तुम्ही सर्व जण म्हणाल की, दोन्ही लोळ एकाच वेळी कोसळले, हो ना? आणि बरोबरच आहे तुमचं. पण, आता असं समजा की, आता समजा एक आगगाडी काही प्रवाशांना घेऊन.. अशी इकडून तिकडे येत आहे.
(प्रेक्षकांच्या दुसऱ्या अर्ध्या भागाकडे निर्देश करतो.)
समजा, ते लोक तुम्ही आहात... आगगाडीत बसलेले लोक. आणि तुम्हाला खिडकीतून विजेचा लोळ कोसळताना दिसतो.
(आधीच्या अर्ध्या भागातल्या लोकांकडे निर्देश करत.)
तुम्ही.. तुम्ही आपल्या जागी स्थिर उभे आहात... तुम्हाला दोन्ही लोळ पूर्वीप्रमाणे एकाच वेळी कोसळताना दिसतील. पण, (प्रेक्षकांच्या दुसऱ्या अर्ध्या भागाकडे निर्देश करत) तुम्ही.. तुम्ही एका लोळाकडे वेगाने जात आहात आणि दुसऱ्या लोळापासून दूर जात आहात. म्हणजे, तुम्ही ज्या लोळाकडे वेगाने जात आहात तो तुम्हाला प्रथम दिसेल आणि दुसरा लोळ नंतर. कारण त्याच्यापासून तुम्ही दूर जाताय ना ! आणि तुम्ही म्हणाल की, एक लोळ आधी पडला आणि दुसरा त्याच्या अंमळ नंतर... हो ना? अगदी बरोबरच आहे तुमचं. (विराम) आणि जर अजून एक दुसरी दुसरी आगगाडी विरुद्ध दिशेने आली तर? त्या आगगाडीत बसलेल्या लोकांना...
(विराम. तो संभाव्य प्रवाशांना शोधतो, यश येत नाही.)
समजा, त्या आगगाडीमध्ये मी आहे. तर, तुम्ही लोक या आगगाडीमध्ये उभे आहात आणि तुम्ही अजूनही (दिशा दर्शवत) 'या' दिशेने जात आहात आणि मी माझ्या आगगाडीमधून 'त्या' दिशेने जात आहे. (विरुद्ध दिशा दर्शवत.) आपण सर्व जण वीज पडण्याची वाट पाहत आहोत. तयार व्हा. (थांबा) तय्यार....?
(तो प्रेक्षकांना हात हलवतो.)
कडाड... तर, माझ्यासाठी, हा लोळ आधी पडला. तुमच्यासाठी, तो लोळ आधी पडला. आणि तुम्हासाठी.... तुम्ही पावसात भिजत उभे आहात, एका जागी... पण, तुमच्यासाठी दोन्ही लोळ एकाच वेळी पडले. आणि आम्हा तिघांचंही बरोबरच आहे. काळ हा निरीक्षकाच्या हालचालीशी सापेक्ष असतो. एका माणसाचं 'आत्ता' हे दुसऱ्या माणसाचं 'नंतर' असतं. (विराम)
एकक 3
जेरुसलेममध्ये एक हिब्रू विद्यापीठ आहे. ते खूप देणग्या गोळा करतात. त्यासाठी ते मेजवान्या आयोजित करतात. मी वाईझमानच्या मृत्यूपूर्वी... वाईझमान... हाइम वाईझमान... मी त्याच्यासोबत झिऑनिस्ट चळवळीमध्ये असायचो. झिऑनिस्ट चळवळ ? नाही माहीत ? ज्युईश राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि रक्षणासाठी चालवलेली चळवळ. दुर्दैवाने, या विद्यापीठातले लोक... काय म्हणू बरं?... खूप चेंगट... दीर्घसूत्री आहेत. कुठलीही गोष्ट करायला ते फाऽऽऽर वेळ घेतात. एखाद्या समस्येचं उत्तर न सापडणं ही माझ्यासाठी सर्वांत नावडती गोष्ट आहे. आधीच आपल्यासमोर कामाचे डोंगर उभे असताना असा चेंगटपणा करणं म्हणजे... खरं सांगू का? नुसता हवेत विचार करणं फार फार अवघड असतं... आणि चूकही असतं. समोर नियमांच्या संचाचा पूर्वपक्ष असल्याशिवाय तर्कशुद्ध निष्कर्ष काढणं शक्य नाही. आणि, तसं करणं चूक... नुसतं चुकीचंच नव्हे, तर भ्रष्टाचार आहे. नियमांच्या संचाचं विधान आवश्यक आहे. नियमांशिवाय, ज्ञान मिळवणं अशक्य आहे.
(तो व्हायोलिनकडे वळतो.)
पण, भाषण देण्याऐवजी, मी तुम्हाला व्हायोलिनवर काहीतरी वाजवलं तर ते तुम्हाला कदाचित अधिक आवडेल आणि समजेलही. (व्हायोलिनच्या पेटीतून व्हायोलिन काढतो, गजासाठी इकडे तिकडे पाहतो.) गज इथंच कुठेतरी होता...
(विंगेकडे तोंड करून)
हेलन ? तू माझा गज पाहिलास का ? (तो थांबतो. कोणताही प्रतिसाद नाही.)
जाऊ दे. मी आता क्वचितच लोकांसमोर वाजवतो. लोक तिथंही प्रश्न विचारतात... काय करू या भोगाला ? एकदा एका महिलेनं मला विचारले, 'संगीतामुळे आपल्यावर होणाऱ्या परिणामाचे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्टीकरण दिले जाऊ शकते का?' मी तिला म्हटलं, 'हो. हे नक्कीच शक्य होईल. बीथोव्हेन सिम्फनीचे वर्णन स्वरलहरींच्या वारंवारतेच्या भिन्नतेमुळे घडणारे घटित असे करता येईल. पण, ते अर्थविहीन ठरेल.' संगीताला स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.
(जणू प्रेक्षकांपैकी कोणीतरी त्याच्याकडे पाहतं आहे, हे बघून स्वतःच्या उघड्या पायांकडे पाहतो.)
मोजे ही एक अनावश्यक गुंतागुंत आहे. (विराम) त्यात फक्त ब्लॅक होल्स तयार होतात.
प्रिन्स्टनमधल्या प्राध्यापकांसाठी मी म्हणजे एक कुतूहलाचा विषय आहे. जणू एखाद्या संग्रहालयातली काचेच्या कपाटात ठेवलेली वस्तू. पण, मी ते मनावर घ्यायचं सोडून दिलं आहे. प्रिन्स्टनमध्ये काही पारंपरिक गोष्टींना माहात्म्य दिलं जातं; पण त्याकडे लक्ष न देता, मी स्वतःपुरतं, अभ्यासासाठी अनुकूल आणि जवळजवळ विचलित न होणारे वातावरण निर्माण करू शकलो आहे. मला इथे खूप छान वाटतं. कारण मला कोणाकडूनही काहीही नको आहे. पुस्तकं, व्हायोलिन, माझा बिछाना, टेबल आणि ही खुर्ची एवढंच पुरेसं आहे. प्रिन्स्टनमधले काही प्राध्यापक क्वांटम सिद्धान्तावर विश्वास ठेवतात आणि म्हणतात की, 'ज्या घटनांचे स्पष्टीकरण देता येत नाही त्या यादृच्छिकतेने घडतात'. पण, मला हे पटत नाही. ते माझी टर उडवतात, त्याला माझी हरकत नाही. पण, माझं म्हणणं आहे की, विचार करा. मी आता नाहीतरी झाल्यागेल्यात जमा आहे. पण, निसर्गात यादृच्छिकता नसते. देव जगाशी फासे खेळत नाही. एक असं एकत्र क्षेत्र Unified field - नक्की असणार. मी गेल्या पंचवीस वर्षांपासून ते हुडकतोय... पण, मला अद्याप ते गवसलेलं नाही. पण, ठीक आहे. अजून थोडा वेळ आहे माझ्याकडे. (विराम)
माझ्या अमेरिकन मित्रांनो, शेवट अजून दूर आहे.
(विराम)
एकक 4
मी तुम्हाला बेल्जियमच्या राणी एलिझाबेथबद्दल सांगतो. ती माझी मैत्रीण होती. आम्ही व्हायोलिनवर युगलगीतं वाजवायचो. एकदा तिने मला भेटीसाठी बोलावले आणि मी तिच्या गढीचा रस्ता विसरलो. म्हटलं, तिला फोन करून पत्ता आणि जवळच्या खाणाखुणा विचाराव्यात. तुम्ही कधी एखाद्या राजाला किंवा राणीला फोन केलायत ? नाही नं? मग मला तुम्हाला सांगायलाच हवं की, ते महामुश्कील काम आहे. मी नंबर फिरवला. ऑपरेटर लाइनवर आला. (फोनवर बोलण्याचा अभिनय करत.) "नमस्कार. मला राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलायचंय. कृपया त्यांचा नंबर जोडून द्याल का?"
"अच्छा.. आपण?"
"मी डॉ. आइन्स्टाईन..."
"ते सापेक्षतावाले आइन्स्टाईन?"
"हो हो."
"बोला. मी जॉर्ज वॉशिंग्टन बोलतोय. काय काम आहे?"
"सांगितलं ना, राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलायचंय. कृपया त्यांचा नंबर जोडून द्याल का?"
"तुम्हाला नंबर माहीत नाही?"
"नाही महोदय."
"असं कसं? तुम्ही मारे एवढे शोध लावलेत, तुम्हाला साधा एक नंबर शोधता येत नाही? काय फेकतोयस !" खट्ट...
खरं म्हणजे मी राणीचा नंबर लिहून ठेवायला हवा होता, किमान मला तो शोधता यायला हवा होता. पण आईशप्पत सांगतो, ना माझ्याकडे तो लिहिलेला होता, ना ही मला तो शोधता आला. काय करू? तुम्हाला हसायला येतंय; पण मी तिथल्या अनोळखी स्टेशनवर, खिशात पैसे नसताना अडकलो होतो. जवळ फक्त व्हायोलिन आणि माझ्या पत्नीने बांधून दिलेलं जेवण. मला अजून भूक लागली नव्हती, म्हणून मी व्हायोलिनवर मोझार्टचा कॉन्चेर्टो नंबर फाइव्ह इन अ मेजर वाजवायला सुरुवात केली. माझ्या सुदैवाने, राणीच्या चालकाला ते ऐकू गेलं आणि तो लांबून धावत-पळत आला. तो पहिल्या वर्गाची बोगी लागते तिथे मला शोधत होता. पण, मी कधीही पहिल्या वर्गाने प्रवास करत नाही. कारण पहिल्या वर्गाची बोगी जनता बोगीपेक्षा लवकर थोडी पोहोचते ?
(विराम)
बेल्जियम काँगोमध्ये जगातल्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा जास्त युरेनिअम आहे. युरेनिअम... माहित्ये ना? ते अणुबॉम्ब करायला लागतं. माझी एक सहकारी मला म्हणाली की, तू हे राणीला सांग. मी म्हणालो, "काहीतरीच काय? ती एवढी राणी आहे, तिला माहीत असेलच की. तर ती म्हणाली, "गैरसमज आहे तुझा. बायकांना साध्यासाध्या गोष्टी माहीत नसतात". म्हटलं, "ठीक आहे. आता तू म्हणतेच आहेस तर सांगतो". मग मी राणी भेटल्यावर तिला सांगितलं, "सावध रहा. जर्मन येतायत... ते तुमच्याकडे युरेनिअम मागतील. पण, तुम्ही त्यांना युरेनिअम विकूबिकू नका". तर राणीसाहेब म्हणाल्या, "असं का? बरं झालं बाई सांगितलंस ते... मी बघते."
(व्हायोलिनकडे बोट दाखवत.)
हे.. हे तिनंच मला भेट म्हणून दिलंय. (व्हायोलिन पेटीत ठेवतो.)
एकक 5
संगीत... संगीताची ओळख मला लहानपणीच झाली, माझ्या आईमुळे. माझी आई... आमच्या घरातली खरी संगीतप्रेमी ती... तिला विशेषतः मोझार्ट अतिशय आवडायचा. ती मला नेहमीच ते गाणं म्हणायची.
('आईन क्लाईन नाख्टम्युझिक'मधील काही बार गातो.)
माझे वडील खूप आनंदी होते. एकदम खुशमिजाज... आणि त्यांच्या अशा मोठ्ठया, उंच मिश्या होत्या. मी पाच किंवा सहा वर्षांचा असेन... आजारी पडलो होतो... तेव्हा पपांनी मला एक छोटुस होकायंत्र-कॉम्पस दिलं. माझ्यासाठी ती जगातील सर्वांत जादूची भेट होती. मला आठवते की, मी तासन्तास त्या होकायंत्राकडे पाहत राहायचो आणि विचार करायचो की, ते कसंही फिरवलं तरी ही सुई एकाच दिशेकडे कशी वळत राहते ? मला ते होकायंत्र इतकं आवडायचं की... आता, हे पपांना कितपत कळलं असेल... नाही सांगता येत मला... ओऽह, माझे पपा... पण, होकायंत्रानं माझ्यावर केलेलं गारुड आजही माझा पिच्छा सोडत नाही.
मग... माझा काका... अंकल जेकब... कदाचित त्याच्यामुळेच मला गणिताची आवड निर्माण झाली असेल. (अंकल जेकबच्या स्वरात) आता अल्बर्ट, आज आपण एक खेळ खेळणार आहोत. याला म्हणतात बीजगणित... आल्जेब्रा... हे एक अतिशय मजेशीर शास्त्र आहे. समज, आपण शिकारीला जातोय... hunting... कदाचित तुमच्यापैकी अनेकांना हे थोडं विचित्र वाटेल... किंवा अनेकांना कदाचित वाटणारही नाही; पण मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे... जर्मनीमध्ये खूप दाट झाडी, तळी असायची. अगदी जंगलं नाही, पण... तर खांद्यावर शॉटगन लटकावून... अगदी वाघसिंहाची नाही, पाणकोंबड्या... ससे अशा लहान प्राण्याची शिकार करणं असा प्रकार असायचा. तर, आल्जेब्रा... अंकल जेकब म्हणायचा, 'जेव्हा आपण शिकारीला निघतो तेव्हा आपल्याला हे माहीत नसतं की, आज कुठली शिकार मिळणार आहे. म्हणून आपण त्याला 'X' म्हणायचं. जेव्हा आपल्याला शिकार गवसते तेव्हा आपण त्यावर झडप घालतो आणि त्याला त्याचे योग्य नाव देतो. याला म्हणतात आल्जेब्रा.
(विराम)
मला आठवतंय, मी लहान असताना... नऊ किंवा दहा वर्षांचा असताना... मी फार कमी बोलायचो. म्हणजे बरोबरीच्या मुलांच्या तुलतेनं. माझ्या आईवडिलांना वाटायचं की, काहीतरी गडबड आहे. खरं म्हणजे मी इतर मुलांसारखा बडबड्या नव्हतो... कमी बोलायचो. पण, त्यांना अशी भीती वाटायची की, मी मानसिकदृष्ट्या मंद तर नसेन ? आईनं तर एकदा मला डॉक्टरांकडेही नेलं होतं. आणि पपा... त्यांची चिंता निराळीच होती. ते मला बरोबर घेऊन माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेले आणि त्यांना विचारलं की, याला कसलंतरी व्यावसायिक व्यवसायासाठी शिक्षण द्यावं का? म्हणजे पोटापाण्यासाठी हा काहीतरी हातपाय हलवू शकेल.
(मुख्याध्यापकाच्या आवाजात) असं बघा सर आइन्स्टाईन, त्याचा फार काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. तुमचा मुलगा अल्बर्ट कधीही कोणत्याही गोष्टीत यशस्वी होणार नाही.
(स्वतःच्या आवाजात) मी सहसा इतर लोकांचं बोलणं मनावर घेत नाही. पण... लहान मुलांना ऐकून घ्यावं लागतं.
एकक 6
(स्वेटर काढतो आणि बाहेर जाण्याचे कपडे घालू लागतो.)
माझा जन्म एका ज्यू कुटुंबात झाला. ज्यू असणं म्हणजे काय असतं हे मला त्या वयात कळत नव्हतं. पण, आम्ही धर्मनिष्ठ होतो असं मला नाही वाटत. माझ्या आई-वडिलांनी मला कॅथॉलिक शाळेत घातलं होतं. आजही मला आठवतं की, आम्हाला इतिहास शिकवणारे शिक्षक एके दिवशी दोन असे लांब खिळे घेऊन आले आणि म्हणाले, "ख्रिस्ताला क्रूसावर चढवून त्याच्या हातापायांना असले खिळे ठोकले होते".
मी धर्माबद्दल कधीच बोलत नाही... कधीच नाही. मला त्या गोष्टीशी काही देणंघेणंच नाहीये. याचा अर्थ असा नाही की, देवाने जग कसे निर्माण केले हे जाणून घेण्यात मला रस नाही. पण, याबाबतीत देवाला काही पर्याय होता का याबद्दल मला आत्यंतिक कुतूहल आहे. देव subtle... सूक्ष्म आहे; पण तो विद्वेषी नाही. माझ्या मर्यादित व्यासंगानुसार विश्वामध्ये सुसंगती असते... harmony! काही जण असे म्हणतात की, देव नाही. पण, मला हे समजत नाही की, हे लोक त्यांच्या मतांचं समर्थन करण्यासाठी माझं उदाहरण का देतात ?
एकदा न्यू यॉर्कमध्ये एका बिशपशी चर्चा करताना माझी चांगलीच पंचाईत झाली. कारण मी कुठेतरी असं म्हणून गेलो की, 'सध्याच्या भौतिकवादी काळात शास्त्रज्ञ हेच एकमेव सच्चे धार्मिक लोक आहेत. कारण विश्वाच्या उत्पत्तीबद्दल विचार करण्यात दुसरं कोण आयुष्यभर धडपडतं?' बिशप म्हणाले की, 'धर्माबद्दलचे माझे विचार तद्दन मूर्खपणाचे आहेत, कारण आकाशगंगेसाठी आपलं आयुष्य कशाला फुकट घालवायचं?' माझ्या हे लक्षातच आलं नाही की, जोवर तुम्ही आपला जीव पणाला लावायला तयार होत नाही, तोवर तुमचा धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्धच होत नाही.
(विराम)
एकक 7
माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला आठवते. मला अनेकदा प्रश्न पडायचा की, जर मी प्रकाशाच्या किरणामागे त्याच्याच वेगाने धावलो तर तो कसा दिसेल ? मी प्रकाशाबद्दल काही बोलू का ?
सापेक्षतेनुसार, निरीक्षकाची हालचाल काहीही असो, प्रकाश स्थिर वेगाने प्रवास करतो. जेव्हा मी पहिल्यांदा हे सांगितले तेव्हा काही लोक म्हणाले, "तुम्ही असं म्हणताच कसं? डोकं फिरलंय तुमचं!" मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. जर आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर आपले वस्तुमान वाढेल; परंतु गतीच्या दिशेने आपली जाडी कमी होईल. आणि काळ... time... अगदी मंदावेल. तुमच्या मनगटावरचं घड्याळ अगदी मंद होईल. आता तुम्हालाही वाटेल की, माझं डोकं फिरलंय. पण, मी सांगतोय ते खरं आहे. आपलं जीवशास्त्रीय अर्थाने म्हातारं होणंदेखील अत्यंत मंद होईल. आपण समजा प्रकाशाच्या वेगाने आकाशगंगेच्या केंद्राकडे जाऊन परत आलो तर त्याला आपल्या पृथ्वीवरच्या हिशेबाने पाचसहा दिवस लागतील. परंतु इथे पृथ्वीवर तोवर पन्नास किंवा साठ वर्षे उलटून गेली असतील. कल्पना करा... अहो, आपली नातवंडं आपल्यापेक्षा मोठी झालेली असतील. (विराम) मी परत येऊन माझ्या सेक्रेटरीशी लग्न करू शकेन. पण, मला नाही वाटत ती इतकी वर्षे बिनलग्नाची राहील. कोणी सांगावं, कदाचित पृथ्वीवर कोणीच शिल्लक राहणार नाही.
माफ करा.
गॅब्रिएल इमॅन्युएल | अनुवाद : विश्वास सहस्रबुद्धे
(कॅनडामधील नाटककार गॅब्रियल इमॅन्युएल यांनी 'आइन्स्टाईन' या शीर्षकाचे नाटक 1985 मध्ये लिहिले. त्या इंग्रजी नाटकाचे एकपात्री प्रयोग मागील दहा वर्षे प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शाह हे अधूनमधून करीत आहेत. या नाटकाचा मराठी अनुवाद विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला आहे आणि त्याचे मराठीत प्रयोग करण्याचे हक्कही त्यांनी मिळवले आहेत. या नाटकाच्या संहितेचे छोटे पुस्तक येत्या 18 एप्रिलला (आइनस्टाईन यांचा 71 वा स्मृतिदिन) साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत, या नाटकाचे अभिवाचन स्वतः विश्वास सहस्रबुद्धे साधना कार्यालयात करणार आहेत. त्या निमित्ताने या नाटकातील सुरुवातीचा एकतृतीयांश भाग येथे प्रसिद्ध करीत आहोत.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या