डिजिटल अर्काईव्ह

2022 मध्ये गोवा विद्यापीठाद्वारे मी केलेल्या प्रयत्नांमुळे दुऱ्याची कोंड धावें -त्तार सत्तरी या जागी पुरण शेती परत एकदा दिमाखाने उभी राहिली. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने हा प्रकल्प मी हाती घेतला होता. या वेळी अनेक विद्यार्थी, शिक्षक, लेखक आणि संशोधकांनी भेटी दिल्या. त्या यशस्वी प्रयोगानंतर एका वर्षाच्या अंतराने चालू वर्षी सत्तरी तालुक्यात धावें-त्तार, शिर-सावर्डे, साट्रे आणि केरी अशा चार ठिकाणी एकूण पाच पारंपरिक पुरण शेतींची लागवड करण्यात आली.

 

सेंद्रिय खताद्वारे पिकवण्यात येणाऱ्या पुरण शेतीला शेकडो वर्षांचा वारसा आहे. गोव्यातल्या महादई नदीच्या खोऱ्यात तिचं जन्मस्थान. जागतिक शेती विश्वात आपलं असं वेगळं स्थान जपणारी ही शेती गोवा राज्यातल्या सत्तरी तालुक्यात चक्क नदीच्या पात्रात केली जाते. या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी खास नियोजन करण्याची गरज नसते. भाताच्या रोपासाठी सदर पाणी नदीच्या पात्रातून नैसर्गिकरीत्या आत जातं, हे या शेतीचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

नदीच्या खोऱ्यात धो धो पडणारा पाऊस नदीच्या प्रवाहाद्वारे मातीचा गाळ घेऊन खाली येतो. या गाळातील माती, वाळू, खडे, पालापाचोळा (कुसारे) किंवा इतर पदार्थ नदीकाठावर साठतात. या नैसर्गिक प्रक्रियेला गाळ साचणे किंवा निक्षेपण असं म्हणतात. नदीच्या पाण्यासोबत खाली येणारी चिकट काळी माती आणि सेंद्रिय पदार्थ हे शेतीसाठी अतिशय सुपीक असून भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान असतात.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्याचा वेग कमी झाल्यावर शेतकरी नियोजित शेताच्या जागेची पाहणी करतात. कामाच्या व्यापाचा अंदाज घेतल्यानंतर नदीच्या पात्रात साठवलेली वाळू, माती, दगड गोटे काढून पुरण शेतासाठी सपाट तळ तयार केला जातो. घरातली सगळी मंडळी या कामाला लागतात. हे काम एकूण क्षेत्राप्रमाणे कमी-अधिक महिनाभर चालते.

पुरण शेतात काम करण्याची अनोखी अशी पारंपरिक पद्धत आहे. नदीपात्रात तयार केलेल्या तळावर विशिष्ट झाडाच्या फांद्या तोडून त्या पसरल्या जातात. तद्नंतर त्याच्यावर माती टाकती जाते. पालापाचोळ्याने युक्त असलेले कुसारे हे सेंद्रिय खत त्याच्यावर टाकले जाते. या प्रक्रियेमुळे पुरण शेतीची जमीन कसदार होते.

एका बाजूने हे काम चालू असताना नदीपात्राच्या बाजूने शितारी (कुंपण) लावली जाते. आणि उर्वरित तिन्ही बाजूंनी लाकडी खांब पुरून कुंपण उभे केले जाते. ही सगळी कामे एकामागून एक अशी ठरलेली असतात. यासाठी कुटुंबातल्या वयस्कर जाणकार व्यक्तींची मदत लागते. जवळच्या डोंगरावर जाऊन शितारी तसंच कुंपणासाठी लागणारं साहित्य आणलं जातं.

एकेकाळी बेळो, तायचूंव, सोट्टी अशी भाताची बियाणं वापरली जायची. नंतरच्या काळात ज्योती, अन्नपूर्णा, आयआर 8, कर्जत अशा संस्कारित बियाणांचा वापर शेतकरी करायला लागले. बी रुजायला टाकल्यानंतर एकवीस दिवसांनी रोप लावणीसाठी तयार होतं. पुढील तीन महिने इतर कामे चालू राहतात. पाळीव आणि जंगली जनावरांपासून शेताची रखवाली करावी लागते. कणसं बाहेर येऊ लागल्यावर शेताला अनेक रोगांची लागण होण्याची भीती असते. आणि त्यातच पक्ष्यांचा उपद्रव.

मे महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कोसळायला लागला तर केलेले कष्ट पाण्यात जाण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी अत्यंत काळजीपूर्वक कामाचं नियोजन करतो. कापणी, मळणी आणि गवत घरी पोहोचेपर्यंत तो स्वतःला जुंपून घेतो. मुसळधार पाऊस पडून नदीच्या पात्राची पातळी वाढली तर शेती पाण्याखाली जाते. सत्तरी तालुका हा डोंगराळ भाग असल्यामुळे तिथे भातशेती क्वचितच पाहायला मिळते. गरीब कष्टकरी शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पुरण शेती करण्यास पुढाकार घ्यायचे. काहींना चार-पाच महिने, तर काही पुरण शेतकरी वर्षभर या शेतावर अवलंबून असायचे.

गोवा शासनाने 2005 मध्ये महादई नदीच्या पात्रात वसंत बंधाऱ्याची उभारणी केल्यामुळे पुरण शेताची जमीन पाण्याखाली गेली. याचा फटका पुरण शेतकऱ्यांना बसला. शेती कसण्यासाठी जमीन शिल्लक न राहिल्यामुळे पाहता पाहता पुरण शेती इतिहासजमा झाली. सरकार दरबारी प्रयत्न करूनसद्धा शेतकऱ्यांना निराशेशिवाय हाताला काही लागलं नाही. 'तुमच्याकडे जमिनीची कागदपत्रे आहेत का?' हा एकच प्रश्न.

1998 मध्ये मी केलेल्या सर्वेक्षणानुसार एका महादई नदीवर एकूण 33 गावांतील 523 कुटुंबे पुरण शेती करायची. सावर्डे, वेळगे धामशें, भिरोंडे, पाडेली आणि वांते या गावांत सर्वाधिक पुरण शेती करणारी कुटुंबे होती. वाळंवटी नदी, वेळसाची नदी, नानोडची नदी तसेच रगाडा नदीच्या पात्रात मोठ्या संख्येने स्थानिक लोक या शेतीची परंपरा जपायचे. नदीच्या पात्रात शेती असल्यामुळे या अशिक्षित शेतकऱ्यांजवळ शेतजमिनीची कागदपत्रे येणार कुठून !

शेती संस्कृती आणि गोसंस्कृती हे दोन महत्त्वाचे व्यवसाय ग्रामीण जीवनाचा कणा असून स्थानिक अर्थव्यवस्था त्यांच्यावर अवलंबून होती. वयस्कर व्यक्तींना या पुरण शेतीच्या तांत्रिक बाजूची माहिती आहे. पंचविशीतील नवी पिढी या पारंपरिक शेतीविषयी अनभिज्ञ असून ते कधी न पाहिलेल्या शेती संदर्भात उदासीन आहेत.

2022 मध्ये गोवा विद्यापीठाद्वारे मी केलेल्या प्रयत्नांमुळे दुऱ्याची कोंड धावें त्तार सत्तरी या जागी पुरण शेती परत एकदा दिमाखाने उभी राहिली. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने हा प्रकल्प मी हाती घेतला होता. या वेळी अनेक विद्यार्थी, शिक्षक, लेखक आणि संशोधकांनी भेटी दिल्या. त्या यशस्वी प्रयोगानंतर एका वर्षाच्या अंतराने चालू वर्षी सत्तरी तालुक्यात धावें-त्तार, शिर-सावर्डे, साट्रे आणि केरी अशा चार ठिकाणी एकूण पाच पारंपरिक पुरण शेतींची लागवड करण्यात आली. गोवा विद्यापीठ आणि गोवा राज्य संशोधन अधिष्ठान, पर्वरी यांच्या वतीनं पुरण शेतीचं पुनर्जीवन करण्याचा हा माझा दुसरा प्रयत्न असून स्थानिक पुरण शेतकरी गणेश पर्यंकर, कृष्णा सावंत, धानो गांवकर, उदय गांवकर आणि गोपीनाथ गांवस यांच्या सहकार्याने पुरण शेतीला संजीवनी देण्यात आली.

बंधाऱ्यामुळे या सेंद्रिय शेतीची दीर्घ परंपरा खंडित झाली असली, तरी पुरण शेतीची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत, या मताचा मी असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) आणि भारतीय ज्ञान प्रणालीद्वारे अशा वैशिष्ट्यपूर्ण शेतीचे संवर्धन झाले पाहिजे. "गेली पंचेचाळीस वर्षे या नदीच्या पात्रात पुरण शेती झाली नव्हती, यंदा ती आम्हाला पाहायला मिळाली", असे उदगार साट्रे सत्तरीचे ज्येष्ठ नागरिक धानो गांवकार यांनी काढले. "पस्तीस वर्षांच्या कालखंडानंतर कळटी नदीच्या पात्रात केरी गावात पुरण शेती बहरली आहे. हे भाग्य आमचं नसून या नदीचं आहे." पेशाने शिक्षक असलेले गोपीनाथ गांवस यांचं हे मनोगत.

आजपर्यंत पुरण शेतीवर मी अनेक लेख लिहिले. इयत्ता नववीसाठी पुरण शेतीवर माझा पाठ आहे. याच विषयावर मी लिहिलेली 'पुरण' ही कोंकणी कादंबरी 2022 मध्ये प्रकाशित झालेली आहे. आणि याविषयी तांत्रिक माहिती देणारे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. माझे कुटुंब पुरण शेती करायचे. मी त्यात काम केलंय. स्थानिक लोकांनी पुरण शेतीचं महत्त्व ओळखून ही सेंद्रिय शेती करण्यास पुढाकार घ्यायला हवा. एखादी परंपरा अखंडितपणे जोपासली तरच त्याला उज्ज्वल भविष्य असतं. माणसाच्या पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, पण, शेतीच्या या पुनर्जन्मासंदर्भात मी आशावादी आहे.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके