डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बहादूरशाहच्या हत्येचे आवर्तन

साधना वाचकांकडून आलेली व विदर्भातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी जमविलेली अशी मिळून दोन लाख रुपयांची रक्कम देवेंद्र गावंडे व गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत, साधना ट्रस्टचे विश्वस्त रा.ग.जाधव यांच्या हस्ते बहादूरशाहची पत्नी शेवंता आलाम व त्यांचा मुलगा संतोष या दोघांच्या हाती 9 जुलै 2012 रोजी सुपूर्द केली.

15 ऑगस्ट 2009 चा साधना विशेषांक नक्षलवाद या विषयाची वैचारिक वा सैद्धांतिक चर्चा करणारा होता. 2010 मध्ये संपूर्ण वर्षभर ‘दंडकारण्यातून’ ही देवेंद्र गावंडे यांची नक्षलवादग्रस्त भागातील वस्तुस्थितीचे चित्रण करणारी लेखमाला साधनाने प्रसिद्ध केली.

8 जुलै 2011 रोजी, ‘नक्षलवादाचे आव्हान’ हे पुस्तक महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले, त्या पुस्तकात ‘दंडकारण्यातून’ ही संपूर्ण लेखमाला आणि त्या विशेषांकांतील तीन लेख यांचा समावेश आहे. मागील वर्षभरात या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपल्या आणि तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच्या संपूर्ण वर्षभरात केवळ एक लेख साधनाने प्रकाशित केला, तोही देवेंद्र गावंडे यांचाच आहे.

31 मार्च 2012 च्या अंकातील ‘बहादूरशाहच्या प्राणाचे मोल मोठे आहे’ या शीर्षकाच्या त्या दीर्घ लेखात एक विधान असे होते, ‘‘आपण आता मारले जाणार आहोत याची कल्पना आल्याने बहादूरशाहने मृत्युपूर्वी पत्नी व मुलासाठी किमान घर तरी बांधून ठेवू असे ठरवले. पण पैसे असले की भिंती चढवायच्या, पैसे संपले की काम थांबवायचे असा प्रकार सुरू होता. आता त्याची हत्या झाल्याने त्या घराचे बांधकामही थांबले आहे.’ तो लेख वाचून, नक्षवादाच्या समस्येच्या संदर्भात मनोभूमिका तयार असलेल्या साधनाच्या वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून बहादूरशाहच्या अपूर्ण राहिलेल्या घरासाठी मदत पाठवायला सुरुवात केली.

साधना वाचकांकडून आलेली व विदर्भातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी जमविलेली अशी मिळून दोन लाख रुपयांची रक्कम देवेंद्र गावंडे व गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत, साधना ट्रस्टचे विश्वस्त रा.ग.जाधव यांच्या हस्ते बहादूरशाहची पत्नी शेवंता आलाम व त्यांचा मुलगा संतोष या दोघांच्या हाती 9 जुलै 2012 रोजी सुपूर्द केली.

त्या कार्यक्रमात देवेंद्र गावंडे यांचे झालेले भाषण हेलावून टाकणारे होते, ते म्हणाले, ‘मी लिहिलेल्या लेखाचा शेवट असा काही होईल, असं मला वाटलं नव्हतं. पण आता वाटतंय, हा शेवट नसून सुरुवात आहे. गेल्या 20 वर्षांतील 13 वर्षे मी सुरुंग पेरलेल्या रस्त्यावरून प्रवास केला, त्यातला पन्नास टक्के प्रवास बहादूरशाहबरोबर केला आहे... आपलं मरण अटळ आहे, हे बहादूरशाहला सहा महिने आधीच कळलं होतं. त्याची ती घालमेल अस्वस्थ करणारी होती.

माझ्यामुळे तो अडचणीत आला का, असाही विचार माझ्या मनात येतो. पण आपल्या चळवळीपेक्षा कोणीही मोठे होता कामा नये आणि स्थानिक पुढारी आपल्या कलानेच चालले पाहिजेत अशी भूमिका असलेल्या नक्षलवाद्यांनी बहादूरशाहची हत्या करून त्या भागातील नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे.

28 जानेवारी 2012 रोजी बहादूरशाहची हत्या केली, त्यानंतरच्या पाच महिन्यांत स्थानिक पातळीवरील 17 लोकप्रतिनिधी नक्षलवाद्यांकडून मारले गेले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ दिल्या, पण 107 लोकप्रतिनिधींना राजीनामे द्यायला लावले आहेत. अनेकांकडून निवडणुका लढवल्या म्हणून दंड वसूल केला आहे. आणि आता त्याही पुढे जाऊन त्या लोकप्रतिनिधींवर ‘स्थानिक आदिवासींना जमा करून ‘माओ’च्या नावाने सरकारविरोधात मोर्चे काढा’, असा दबाव आणायला सुरुवात केली आहे... बहादूरशाहच्या हत्येचे हे आवर्तन आहे.’... देवेंद्रचे 15 मिनिटांचे भाषण नक्षलवादग्रस्त भागातील जनतेपुढे काय वाढून ठेवले आहे, याचे विदारक चित्र रेखाटणारे होते.

या कार्यक्रमाच्या आधी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी साधनाकडे पाठवलेला संदेश असा आहे. ‘‘जनतेसाठी चळवळ सुरू केल्याचा दावा करणाऱ्या नक्षलवाद्यांची भूमिका ही लोकांच्या हितासाठी नसून निरपराध माणसांचा बळी घेणारी आहे. विकास नाही म्हणून आलेली ही चळवळ आता विकासाच्या आड येत आहे. अनेक निरपराध माणसांचे बळी नक्षली विचाराने घेतले आहेत. पोलिस आपल्या परीने लढत आहेतच, तरीही निरपराध बळी पडलेल्या एकाला लोकांनी पुढाकार घेऊन देऊ केलेली मदत मी अत्यंत महत्त्वाची मानतो. एकप्रकारे लोकांनी नक्षली हिंसाचाराच्या विरोधात उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

लोकशाही जाणणाऱ्या व लोकशाहीचे महत्त्व कळलेल्या ज्या नागरिकांनी उत्स्फूर्त मदत केली त्यांची ही मदत म्हणजे समाजाने नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला दिलेले पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही प्रभावी उत्तर आहे, असे मी मानतो.’’

साधनाच्या वाचकांसमोर नक्षलवादाच्या संदर्भात आतापर्यंत इतके काही मांडून झाले आहे की, वरील दोन प्रतिक्रियांवर वेगळे काही भाष्य करण्याची गरज नाही.

Tags: नक्षलवाद गिरीश गांधी देवेंद्र गावंडे बहादूरशाह संपादकीय   sampadkiy editorial Naxalism Girish Gandhi Devendra Gawande Bahadur Shah weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके