डिजिटल अर्काईव्ह

जे.एन.यू. मधून एम.ए.ची पदवी प्राप्त केल्यावर चतुर्वेदी यांनी प्रदीर्घ काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कामगिरी केली. साप्ताहिक 'धर्मयुग' ते 'संडे ऑब्झर्व्हर', 'महानगर', 'रविवार' अशा हिंदीतील प्रमुख वृत्तपत्र संस्थांशी त्यांचा संबंध आला. अगदी बातमीदारापासून ते संपादकापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली. पुरोगामी विचारांच्या आदर्शाने चतुर्वेदी झपाटलेले होते. पैशाच्या मागे न धावता आपल्यातील ध्येयवादी आणि धडाडीच्या प्रवृत्तीला त्यांनी कायम जोपासले. स्वतःचे विचार निर्भीडपणे समाजापुढे मांडत एक सच्ची पत्रकारिता करण्यातच जीवनाचे सार्थक होईल, यावर त्यांचा प्रामाणिक विश्वास होता आणि तोच त्यांनी आचरणात आणला.

अनुराग चतुर्वेदी यांचे आत्मचरित्र हे थोडे वेगळ्या धर्तीचे आहे. एका वर्णनात्मक शैलीतून त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक त-हेचे किस्से थोड्याफार गोष्टीरूपाने वाचकांपुढे सादर केले आहेत. त्यामुळे पुस्तकात त्यांनी आपले कौटुंबिक जीवन, विद्यार्थिदशेतील दिवस, बदलत जाणारे समाजजीवन, पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध अनुभव, समाजवादावर असलेली निष्ठा, अनेक त-हेच्या राजकीय नेत्यांशी आणि चित्रपटसृष्टीतील नटनट्यांशी आलेले वैयक्तिक संबंध यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. मला स्वतःला हे पुस्तक वेगळे वाटले. कारण राजस्थानातील हिंदी भाषक लोकांच्या विवाहाच्या किंवा इतर प्रथा, परंपरा आणि थोड्याशा सरंजामी व्यवस्था असलेल्या लोकांच्या जीवनशैलीबद्दल मला थोडेफार कुतूहल होते, त्याबद्दल वाचायला मिळाले. त्याचप्रमाणे हिंदी भाषेतील साहित्य आणि त्या भाषेत होत जाणारे साहित्य-संवाद यांबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटले. त्याबद्दल या पुस्तकात नक्कीच काहीतरी मिळाले. तसेच, भारतीय राजकारण आणि समाजवादी चळवळ यांच्या भवितव्याबाबत मला कायम विचार करावासा वाटला, त्यात मला रस आहे त्यावर पुस्तकात खूप मनापासून विचार मांडलेले आहेत. शिवाय, चतुर्वेदी आणि मी एकाच काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकलो, त्यामुळे आम्ही एक काळ बरोबर जगलो आणि तो अनुभवला. आम्हाला अनेक समकालीन मित्रदेखील आहेत. अर्थात, मी हे पुस्तक वाचताना त्यांच्या विविध अनुभवांशी समरस होऊन ते वाचू शकलो.

चतुर्वेदी यांचा जन्म राजस्थानमधील एका घरंदाज कुटुंबात झाला. त्यांचे वडील नंदबाबू हे राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचे समाजवादी विचारक आणि हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्यिक /कवी होते. नंदबाबू अनेक सामाजिक चळवळींना जोडले गेले होते आणि त्यांनी मेधा पाटकर किंवा अरुणा रॉय यांच्या आंदोलनांनासुद्धा पाठिंबा दिला होता. त्यांनी आयुष्यभर जपलेले लेखनाचे व्रत चतुर्वेदी यांच्यासाठी खरोखर स्फूर्तिदायी ठरले. चतुर्वेदी यांना वडिलांनी लिहिलेल्या काही पत्रांत उत्कटता आणि काव्यात्मक शैलीची जाणीव होते. वडिलांची तत्त्वनिष्ठा आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आईचे विलक्षण मनोधैर्य अतिशय सुंदर शब्दांत लेखकाने रेखाटले आहे. तसेच, आपली पत्नी क्षमा हिच्याबद्दल भरभरून लिहिले आहे आणि तिलाच हे पुस्तक अर्पण केले आहे.

उदयपूरच्या रम्य परिसरात चतुर्वेदी वाढले, तेथील सरोवरे आणि अरावली पर्वताच्या रांगा त्यांच्या कायम स्मृतीत राहिल्या. त्याच संदर्भात उदयपूर विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरू जी. एस. महाजनी आणि सरोवराच्या काठाशी त्यांना हिंडायला जाण्याच्या सवयीचा उल्लेख चतुर्वेदी करतात. एके काळी महाजनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि गणितासारख्या विषयात त्यांनी अनेक पिढ्या घडविल्या होत्या. याचा अर्थ रँग्लर महाजनी हे पुणे आणि उदयपूर यांना जोडणाऱ्या दुव्यासारखे आहेत.

उदयपूरहून पुढे उच्च शिक्षणासाठी समाजशास्त्र या विषयात एम.ए. करायला चतुर्वेदी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू.) गेले. ते प्रांजळपणे लिहितात की, दिल्लीत प्रथमच त्यांनी लिफ्ट आणि टेलिव्हिजन यांसारख्या गोष्टी बघितल्या. त्यांच्यासारख्या एका हिंदी भाषक विद्यार्थ्याला जीवनातील विविधता आणि बौद्धिक प्रवाह जवळून बघण्याचे दुर्मीळ भाग्य तिथे लाभले. त्या काळात जे.एन.यू. मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक नामांकित प्राध्यापक होते. प्रा. योगेंद्र सिंह यांच्यासारखे विद्वान मार्गदर्शक त्यांना लाभले हे त्यांचे मोठे भाग्यच होते. विद्यापीठात वसतिगृहापासून ते वर्गापर्यंत चर्चा आणि संवादाचे वातावरण होते. तेथील ग्रंथालयसुद्धा नेहमी गजबजलेले वाटे. विद्यार्थी चळवळ त्या वेळी जोरात होती आणि विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका फार चुरशीच्या आणि बौद्धिकदृष्ट्या चालना व चैतन्य देणाऱ्या होत असत. अशा वातावरणात विद्यार्थ्यांची बौद्धिक, सांस्कृतिक आणि मानसिक वाढ झाली नाही तरच नवल.

विद्यार्थी संघटनेत त्या वेळी प्रकाश करात, आनंद कुमार आणि देवीप्रसाद त्रिपाठी हे विद्यार्थी नेते खूप सक्रिय होते. आणीबाणीच्या दुर्दैवी काळात जे.एन.यू. मधील अनेक विद्यार्थी नेते सरकारशी दोन हात करायला दंड थोपटून उभे राहिले. परिणामी, काहींच्यावर खटले भरले गेले, काही भूमिगत होते आणि त्रिपाठी यांच्यासारख्या विद्यार्थी नेत्याला तुरुंगवास भोगावा लागला. अर्थात, पुढील काळात एक दिवस त्रिपाठी राज्यसभेचे सदस्य झाले आणि प्रकाश करात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले. चतुर्वेदी यांच्याप्रमाणे मीसुद्धा आणीबाणीचे दिवस अनुभवत होतो. त्यामुळे पुस्तक वाचताना तो काळ मी पुन्हा जगलो.

जे.एन.यू. मधून एम.ए.ची पदवी प्राप्त केल्यावर चतुर्वेदी यांनी प्रदीर्घ काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कामगिरी केली. साप्ताहिक 'धर्मयुग' ते 'संडे ऑब्झव्र्व्हर', 'महानगर', 'रविवार' अशा हिंदीतील प्रमुख वृत्तपत्र संस्थांशी त्यांचा संबंध आला. अगदी बातमीदारापासून ते संपादकापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली. पुरोगामी विचारांच्या आदर्शाने चतुर्वेदी झपाटलेले होते. पैशाच्या मागे न धावता आपल्यातील ध्येयवादी आणि धडाडीच्या प्रवृत्तीला त्यांनी कायम जोपासले. स्वतःचे विचार निर्भीडपणे समाजापुढे मांडत एक सच्ची पत्रकारिता करण्यातच जीवनाचे सार्थक होईल, यावर त्यांचा प्रामाणिक विश्वास होता आणि तोच त्यांनी आचरणात आणला.

पत्रकारितेच्या जगातील 'धर्मयुग'चे तत्कालीन संपादक धर्मवीर भारती यांच्याकडून चतुर्वेदी यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि भारतींमुळे त्यांच्यावर हिंदी भाषेतील पत्रकारितेच्या विश्वात अनेक उत्तम संस्कार झाले. भारती संकुचित वृत्तीचे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगिळांच्या मराठी कथा अनुवादित करून 'धर्मयुग'मध्ये प्रसिद्ध केल्या. पत्रकारिता विश्वातील निखिल वागळे यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची लढाऊ वृत्ती त्यांना खूप भावली. पुस्तकात हिंदी पत्रकारितेतील अनेक दिग्गजांचा चतुर्वेदी यांनी परिचय करून दिलेला आहे.

पत्रकारिता म्हटल्यावर राजकारणातील लोकांशी संबंध येणे स्वाभाविक होते. चतुर्वेदींनी बाळ ठाकरे यांची जी मुलाखत घेतली, तेव्हाची द्विधा मनः स्थिती मला आवडली. त्या काळात ते 'संडे ऑब्झर्व्हर' च्या हिंदी आवृत्तीचे संपादक होते आणि त्या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक एम. जे. अकबर होते. ठाकरे चतुर्वेदी यांना म्हणाले, 'ज्या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक मुसलमान आहेत त्या वृत्तपत्राला मी मुलाखत देणार नाही.' त्यावर चतुर्वेदी म्हणाले, 'त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना आग्ऱ्याहून सुटका झाल्यावर रायगडापर्यंत पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. विशेषतः, मथुरेच्या चौबे यांनी तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून मदत केली होती. परिणामी, चौबे कुटुंबाचे नंतर हाल झाले होते.' शिवाजी महाराजांसाठी आमच्या कुटुंबाला खूप अन्याय सहन करावा लागला. आता तो तुम्ही करू नका. हे ऐकल्यावर ठाकरे थोडे पाघळले आणि त्यांनी मुलाखत दिली. परंतु ठाकरे यांचे सांप्रदायिक विचार आणि त्यांनी ज्या तन्हेने त्यांच्या पूर्वजांच्या कामगिरीचा आधार घेऊन ती मुलाखत घेतली गेली याबद्दल चतुर्वेदींना थोडे अपराधी भावनेने ग्रासले. ठाकरे यांच्या आक्रमक आणि सांप्रदायिक / प्रांतीय विचारांचा चतुर्वेदींना राग येत असे आणि शिवाय वागळे यांना ते 'मच्छर' म्हणत असत याची त्यांना चीड येत असे. मुंबईमधील एक नागरिक म्हणून धर्म आणि जाती-वादामुळे समाजात पेरलेले विष किती खोलवर रुजत गेले होते याचा खेदकारी प्रत्यय चतुर्वेदींना 1990च्या दशकात आला.

पुस्तकात अनेक समाजवादी नेते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर/स्वभावावर टिपणे आहेत. चतुर्वेदी समाजवादी वर्तुळात वाढल्यामुळे मधू लिमये, लोहिया, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, राजनारायण नेपाळचे प्रदीप गिरी आणि लोहियांच्या वैचारिक वारसदार उषा पारेख यांचे उल्लेख तर आहेतच; पण मंडल आयोगानंतर पुढे आलेले नीतिश कुमार, शरद यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांचे विचार आणि राजकारण यांचे समर्पक विश्लेषण चतुर्वेदी यांनी केले आहे. त्याशिवाय, जे.एन.यू.मध्ये शिकलेल्या आणि पुढे राष्ट्रीय पातळीवर उदयाला आलेल्या जनता दलातील बिहारच्या दिग्विजयसिंग यांच्या राजकीय कारकिर्दीचा उत्तम आढावा घेतला आहे. या सर्व नेत्यांशी लेखकाचे व्यक्तिगत संबंध आल्यामुळे वाचकांची त्यांच्या राजकारणाशी वेगळीच ओळख होते.

मुंबईतील कुर्ला ते कुलाबापर्यंत वास्तव्य करत गेलेल्या चतुर्वेदींचा चित्रपटसृष्टीशीसुद्धा संबंध आला. तो संबंध ते फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य होते, म्हणून वाढत गेला. त्यामुळे राजेश खन्ना, देव आनंद, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि डिम्पल कपाडिया यांच्यासारख्या लोकप्रिय नटनट्यांचे आणि यांचे संबंध कसे आले याचे रसभरीत वर्णन पुस्तकात आहे. तसेच संगीत दिग्दर्शक जयदेव यांचेही लेखकाशी मैत्रीचे नाते होते.

एकंदर, आपल्या क्षेत्रात चतुर्वेदी यांनी खूप यशस्वी वाटचाल केली; परंतु आजची पत्रकारितेची स्थिती त्यांना भयावह वाटते. कारण पत्रकारिता हळूहळू मनोरंजनात बदलत गेली आणि मीडियाचे रूपांतर उद्योगात झाले आहे. आज सरकार आणि भांडवलदार साऱ्या प्रसारमाध्यमावर नियंत्रण ठेवीत आहेत. दुर्दैवाने, आज प्रत्येक प्रश्न हिंदू-मुस्लीम तणावाच्या लोलकातून बघितला जातो. वाढत्या धार्मिक उन्मादाने समाजातील वातावरण गढूळ झाले आहे. तसेच कोविडकाळात इतके मृत्यू झाले तरी देशाला झालेला सामूहिक विस्मृतीचा रोग आणि देशातील एकूणच विषारी आणि भीतिग्रस्त वातावरण याबद्दल चतुर्वेदी यांनी रास्त चिंता व्यक्त केली आहे.

सरतेशेवटी, मला काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. एक, भारताला समाजवादी चळवळीने अनेक उत्तम खासदार, आमदार आणि नेते दिले. त्यांतील पहिल्या पिढीचे बहुसंख्य नेते फार प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ होते. दोन, समाजवादी चळवळीचे समाज प्रबोधन कार्यातील योगदानसुद्धा फार महत्त्वाचे आहे. तीन, लोहिया आणि जयप्रकाश यांच्यासारख्या आदरणीय समाजवादी नेत्यांनी 1960 च्या दशकात आणि 1970 च्या दशकात म्हणजे आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाशी (भाजप) यांच्याशी सहकार्य केले. पुढे जनता दल स्थापन झाल्यावर भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. जयप्रकाश यांच्यासारख्या थोर नेत्याने मान्यता दिल्यामुळे संघ ताठ मानेने उभा राहू शकला. या त्यांच्या चुकांमुळे आज सारा भारत संघप्रणीत संप्रदायवादाची कटू फळे चाखत आहे. राजकीय डावपेचातील असल्या तडजोडी किती महाग पडू शकतात, हे आज आपण पदोपदी अनुभवत आहोत. अर्थात समाजवादी वर्तुळात किंवा खुद्द चतुर्वेदींना आज याबद्दल नेमके काय वाटते याची कोणतीच कल्पना पुस्तक वाचून येत नाही; पण त्यांनी एक उत्तम आत्मचरित्र लिहिल्याबद्दल आणि त्याचा सुबोध अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केल्याबद्दल या दोघांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन हर्षे,  दिल्ली ( 28 लेख )
rharshe163@gmail.com

अलाहाबाद विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी