डिजिटल अर्काईव्ह

हे नवीन पुस्तक वाचल्यावर मला आधुनिक नेपाळच्या उदयाविषयी बरंच काही शिकायला मिळालं. भारतात 1950 च्या दशकात काय घडत होतं याबद्दलही असाच एखादा खंड (किंबहुना खंडांची मालिका) तयार करता येईल का, याबद्दलही मी विचार करू लागलो. स्वातंत्र्यानंतरच्या या पहिल्या दशकात कलकत्ता, दिल्ली, मुंबई व बंगळुरू इथे कॅफे व कॉफी-हाऊस अशी ठिकाणं सांस्कृतिक देवाणघेवाणीची केंद्रं म्हणून उदयाला आली. अशा एखाद्या किंवा अधिक कॅफेंचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो. ओन्ता यांनी नेपाळी अभ्यासकीय नियतकालिकांवर केलेलं काम वाचताना मला मुंबईतील 'इकॉनॉमिक वीकली' (नंतर 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली' असं नामकरण) या अग्रगण्य नियतकालिकाचा इतिहास आठवला. या इतिहासाचा अभ्यास केला तर स्वातंत्र्योत्तर भारतातील बौद्धिक विचारप्रवाहांच्या उदयावर बराच प्रकाश पडेल.

माझ्यासारखी पार्श्वभूमी असणारे भारतीय म्हणजे मध्यमवर्गीय, व्यावसायिक कुटुंबांमधले आणि इंग्रजी बोलणारे भारतीय सर्वसाधारणपणे स्वतःव्यतिरिक्त इतर देशांबाबत माहिती मिळवण्यासाठी किंवा आकलन वाढवण्यासाठी पाश्चात्त्य माध्यमांकडे पाहतात. अमेरिका व इंग्लंड हे या संदर्भात स्वाभाविक प्राधान्यक्रमावर असतात, पण फ्रान्स व इटली यांनाही वरचे स्थान असते.

लहान असताना मला या देशांविषयी कळलं, पण सुदैवाने माझ्या जडणघडणीसंदर्भातील परिस्थितीने माझ्या अधिक निकट असलेल्या देशांविषयीही माझ्या मनात कुतूहल निर्माण केलं. सर्वसाधारणपणे माझ्या सामाजिक वर्गातील भारतीय या देशांविषयी अनास्था राखून होते. असाच एक देश म्हणजे नेपाळ. या देशाच्या संस्कृतीविषयी व इतिहासाविषयी मला लहानपणापासूनच माहिती होती. मी ज्या शहरात राहत होतो ते डेहराडून उर्वरित उत्तराखंडप्रमाणे अठराव्या शतकाअखेरीला नेपाळमधील गुरखा साम्राज्याच्या राजवटीखाली आलं. गुरख्यांनंतर तिथल्या राज्याची धुरा हाती घेतलेल्या ब्रिटिशांनी डेहराडूनमध्ये अनेक लष्करी तुकड्या तैनात केल्या आणि त्यातील अनेक सैनिक मूळचे नेपाळचे असल्यामुळे त्यांना 'गुरखा रेजिमेन्ट' असं नाव दिलं.

माझ्या लहानपणावरचा नेपाळी प्रभाव बराच ठळक आहे. 1950 च्या दशकात नेपाळहून पळून आलेल्या राणा उमरावांनी स्थापन केलेल्या शाळेत मी शिकलो. माझ्या घरापासून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गढी या नावाची एक नेपाळी भाषकांची वसाहत पसरलेली होती. मूळ नेपाळचे असणारे पूर्व बंगालमधील ख्यातनाम फूटबॉलपटू रामबहादूर छेत्री हे माझे क्रीडा क्षेत्रातील पहिले हिरो होते. फूटबॉलचा मोसम नसेल तेव्हा ते कलकत्त्याहून डेहराडूनला येत आणि माझ्या काकांसोबत एक क्रिकेट क्लब चालवत. हे संबंध टिकून आहेत. मी मोठं झाल्यावर अनेकदा नेपाळला जाऊन आलो आणि काठमांडूतील एक नेपाळी संपादक माझ्या सर्वांत घनिष्ठ मित्रांपैकी एक आहे.

त्यामुळे 'नेपाळ इन द लाँग 1950ज्' हे प्रत्युक्ष ओन्ता, लोकरंजन परजुली व मार्क लिश्ती यांनी संपादित केलेलं आणि काठमांडूतील मार्टिन चौतरी यांनी अलीकडेच प्रकाशित केलेलं निबंधांचं पुस्तक मी अत्यंत उत्सुकतेने वाचलं. राणा उमरावशाहीचं पतन झाल्यानंतरच्या कालखंडावरचे लेख या पुस्तकात आहेत. मागच्या शतकापासून नेपाळी राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या राणांनी स्वतंत्र विचारांवर व सांस्कृतिक सर्जनशीलतेवर घट्ट पकड ठेवली होती. 'नेपाळ इन द लाँग 1950ज्' या पुस्तकात राणा उमरावांकडून सत्ता गेल्यानंतर लोकपातळीवरील अभिव्यक्ती कशी फोफावली याचं दस्तऐवजीकरण केलेलं आहे.

प्रवाश गौतम यांनी लिहिलेला या पुस्तकातील पहिला लेख टीलौरी माइलाको पासल या चहादुकानाबद्दचा आहे. दोन महायुद्धांमध्ये लढलेल्या नेपाळी सैनिकांना परदेशात चहाची सवय लागली आणि ती त्यांनी त्यांच्या मायभूमीत पसरवली. या दुकानात लोकशाही अधिकार कार्यकर्त्यांपासून ते फूटबॉलपटू व त्यांच्या चाहत्यांपर्यंत अनेक जण येत असत. लोकशाही अधिकार कार्यकर्त्यांसाठी हा कॅफे म्हणजे 'बैठकीचं ठिकाण' झालं. तिथे भेटून हे कार्यकर्ते माहितीची देवाणघेवाण करत, एकमेकांशी संवाद साधत आणि राजकीय घडामोडी व नियोजन यासंबंधी चर्चा करत...' फूटबॉलपटूंच्या इथल्या भेटीगाठींविषयीची आठवण एका फूटबॉलपटूनेच नोंदवली आहे. तो म्हणतो, 'आम्ही खेळ सुरू होण्यापूर्वी नाश्त्यासाठी टीलौरी माइलाको पासल इथे भेटायचो आणि मग सामना झाल्यावरही भेटायचो... तिथे आम्ही मुख्यत्वे आमच्या खेळाविषयी बोलत असू कोण जिंकलं, आपापला खेळ कसा सुधारायचा, खेळताना कोणते डावपेच लढवायचे, वगैरे. आम्ही चित्रपटांविषयीही बोलायचो' (काठमांडूमध्ये तेव्हा नुकतीच चित्रपटगृहं उघडली होती). 

काठमांडू खोऱ्यातील इतर उपाहारगृहं तेव्हा सर्व जातींसाठी खुली नव्हती, पण टीलौरी मलाइको पासल मात्र 'सर्वजातीय ग्राहकांसाठी खुलं' होतं. अशा बाबतीत असांकेतिक धोरण ठेवणं व्यवसायासाठी चांगलं असल्याचं हे दुकान चालवणाऱ्या भावांनी लक्षात घेतलं. तरीही, सूक्ष्म मार्गांनी सामाजिक पूर्वग्रह टिकून होते, त्यामुळे कनिष्ठ जातीय लोकांना सर्वसाधारणतः दुकानाबाहेर खावं-प्यावं लागत असे, आणि उच्चजातीय ग्राहक मात्र आतमध्ये बसून खात असत.

बंदना ग्यावली यांनी लिहिलेला लेखही रोचक आहे. आर्थिक वृद्धीचा पाठपुरावा करत असताना 1950 च्या दशकात नेपाळी कल्पनाविश्वात 'बिकासा'ची (विकासाची) कल्पना रुजली. एका अमेरिकी तंत्रज्ञाने लिहिल्याप्रमाणे, 'शंभराहून अधिक वर्ष नेपाळच्या विकासाची गळचेपी करणारा विलगतेचा विळखा सोडवून हा देश नुकताच मुक्त झाला. शेजारच्या भारताप्रमाणे - किंबहुना आशियातील व आफ्रिकेतील सर्वच उदयोन्मुख राष्ट्रांप्रमाणे नेपाळलाही खऱ्या अर्थाने 'विकसित' होण्यासाठी अधिक रस्त्यांची, अधिक कारखान्यांची, अधिक ऊर्जाप्रकल्पांची, अधिक संख्येने व अधिक आकाराच्या शहरांची गरज भासू लागली. भांडवलशाही असो वा समाजवादी असो, कोणत्याही विचारसरणीकडे झुकलेल्या बुद्धिजीवींसमोर हे सामायिक कल्पनाचित्र होतं. यात फरक इतकाच होता की, भांडवलशाहीस्नेही बुद्धिजीवींना बाजारपेठ व परकीय साहाय्य यातून विकास येईल असं वाटत होतं, तर समाजवादी बुद्धिजीवींना राज्यसंस्था व अग्रणी पक्ष विकास साधेल असा विश्वास होता.

(ग्यावली यांनी उल्लेख केला नसला तरी, 1950 पासून पुढील दशकांमध्ये नेपाळ व भारत या देशांमधील मुलग्यांची पहिली नावं म्हणून 'बिकास' किंवा 'विकास' हे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले, हे लक्षात घ्यायला हवं.)

प्रत्युक्ष ओन्ता यांनी राणांच्या सत्तेचं पतन झाल्यानंतर बौद्धिक व साहित्यिक उत्पादनाची नवीन रूपं कशी उदयाला आली याचा ऊहापोह केला आहे. नेपाळचा इतिहास व संस्कृती यांविषयीचं लेखन छापणारं नियतकालिक प्रकाशित करणाऱ्या नेपाळ सांस्कृतिक परिषदेवर केंद्रित असा त्यांचा लेख आहे. राष्ट्रीयत्वाच्या नव्याने उदयाला येणाऱ्या संकल्पनांसाठी भूतकाळातील आता न दिसणारे अवकाश मांडण्याचाही प्रयत्न त्यामागे होता.

परिषदेच्या नियतकालिकातील एका सुरुवातीच्या अंकातील संपादकीयामध्ये त्याचा उद्देश पुढीलप्रमाणे मांडलेला होता 'आपल्या देशातील संचित जुन्या ज्ञानाशी ओळख करून घेतली नाही तर राष्ट्राभिमान निर्माण होणार नाही. नेपाळमधील नवीन युगाचा आरंभनुकताच होतो आहे... राष्ट्राच्या प्रतिष्ठेला आणि राष्ट्रवादाच्या भावनेला चालना देण्यासाठी प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंतचा इतिहास, आपल्या पूर्वजांचं यश आणि विविध जातींमधील परस्परव्याप्ती व त्यांचं एकत्र येणं जाणून घेणं आवश्यक आहे.'

नेपाळ सांस्कृतिक परिषद चालवणाऱ्या बुद्धिजीवींमधील ऊर्जा व सर्जनशीलता यांवरही ओन्ता यांनी टिप्पणी केली आहे. पण हे सर्व धुरीण पुरुष होते आणि जवळपास सर्वच उच्चजातीय होते, हेही ते नमूद करतात. या सर्वांच्या लेखनात आर्थिक प्रगतीसाठी सांस्कृतिक पुनरुत्थान गरजेचं मानलेलं होतं. त्यांनी हाती घेतलेले कलात्मक व साहित्यिक प्रकल्प 'देशाच्या भावी भौतिक प्रगतीशी घट्ट जोडलेले' होते. अशा रितीने संस्कृतीला विकासाच्या सेवेशी रुजू करण्यात आलं.

लोकरंजन परजौली यांनी नेपाळमधील पहिल्या आधुनिक विद्यापीठाच्या स्थापनेविषयी लिहिलं आहे. या विद्यापीठाचं नामकरण राजे त्रिभुवन यांच्यावरून करण्यात आलं. सुरुवातीपासूनच 'भारतीय व अमेरिकी या दोघांसाठीही स्वतःची सत्ता / प्रभाव दाखवण्यासाठीचं मैदान म्हणून या विद्यापीठाचा वापर झाला.' काही प्रवर्तकांना त्रिभुवन विद्यापीठाने पटणा विद्यापीठाचा आदर्श घेऊन पुढे जावं असं वाटत होतं. या संदर्भात एका नेपाळी शिक्षणतज्ज्ञाने भविष्यवेधी इशारा दिला होता : 'विसाव्या शतकाच्या अखेरीला नेपाळने पूर्णतः निराळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या भारतीय विद्यापीठांचं गुलाम वृत्तीमधून अनुकरण केलं, तर भारतीय शिक्षणतज्ज्ञांनाही त्याचा आनंद होईल, असं मला वाटत नाही... भारतीय विद्यापीठांच्या अपुरेपणावरून तिथल्याच शैक्षणिक धुरीणांमधील चिंता वाढते आहे, हा त्या विद्यापीठांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा पुरावाच आहे.'

सदर पुस्तकातील इतर लेख भूसुधारणा, अमेरिकी अर्थसाहाय्य आणि परदेशी पर्यटकांसाठी काठमांडूमध्ये एक हॉटेल चालवणाऱ्या भपकेबाज रशियन उद्योजक, अशा विषयांवरील आहेत. वृत्तपत्रं, अभिलेखागारं व सरकारी दस्तऐवज, तसंच मुलाखती यांसारख्या विस्तृत प्राथमिक स्रोतांचा वापर करून हे लेख लिहिले गेल्याचं दिसतं. त्यामागे कष्टपूर्वक केलेलं संशोधन आहे आणि लेखनही सुलभ रितीने झालेलं आहे.

हे नवीन पुस्तक वाचल्यावर मला आधुनिक नेपाळच्या उदयाविषयी बरंच काही शिकायला मिळालं. भारतात 1950 च्या दशकात काय घडत होतं याबद्दलही असाच एखादा खंड (किंबहुना खंडांची मालिका) तयार करता येईल का, याबद्दलही मी विचार करू लागलो. स्वातंत्र्यानंतरच्या या पहिल्या दशकात कलकत्ता, दिल्ली, मुंबई व बंगळुरू इथे कॅफे व कॉफी-हाऊस अशी ठिकाणं सांस्कृतिक देवाणघेवाणीची केंद्रं म्हणून उदयाला आली. अशा एखाद्या किंवा अधिक कॅफेंचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो. ओन्ता यांनी नेपाळी अभ्यासकीय नियतकालिकांवर केलेलं काम वाचताना मला मुंबईतील 'इकॉनॉमिक वीकली' (नंतर 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली' असं नामकरण) या अग्रगण्य नियतकालिकाचा इतिहास आठवला. या इतिहासाचा अभ्यास केला तर स्वातंत्र्योत्तर भारतातील बौद्धिक विचारप्रवाहांच्या उदयावर बराच प्रकाश पडेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विविध शाखांचा उदय आणि भारतातील व इतर ठिकाणांमधील आर्थिक जीवनाला आकार देण्यातील या शिक्षणसंस्थांची भूमिका, याबद्दल अजूनही आपल्याकडे चांगलं संशोधनपर पुस्तक का नाही, याचंही मला आश्चर्य वाटू लागलं. काठमांडूमध्ये रॉयल हॉटेल चालवणाऱ्या रशियन उद्योजकावरचा सदर पुस्तकातील निबंध वाचल्यावर भारतातील ताज व ओबेरॉय यांसारख्या विख्यात हॉटेलांच्या उदयाबद्दलही संशोधन करण्याला प्रेरणा मिळू शकते.

वर्षभरापूर्वी प्रकाशित झालेल्या एका लेखात ('बिग ब्रदर', द टेलिग्राफ, 24 ऑगस्ट 2024) मी असं प्रतिपादन केलं होतं की, आपल्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी नेपाळ व बांग्लादेश यांसारख्या देशांविषयीचा अहंकारी तुच्छतावाद सोडून देण्याची गरज आहे. 'नेपाळ इन द लाँग 1950ज्' हे पुस्तक वाचल्यावर मला त्या प्रतिपादनाला एक जोड द्यावीशी वाटते, ती अशी: आपल्या शेजाऱ्यांकडून काही धडे घेतले तर भारताला आर्थिक व परराष्ट्रीय धोरणांव्यतिरिक्त इतरही बराच काही लाभ होऊ शकतो.

अनुवाद : प्रभाकर पानवलकर

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक ( 281 लेख )

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी